Showing posts with label सनिमा. Show all posts
Showing posts with label सनिमा. Show all posts

Friday, May 28, 2021

दिठी, क्लोजर आणि शोकाचा सामूहिक खेळ

सुमित्रा भावे ह्यांच्या निधनाच्या बातमीनंतर ‘दिठी’ चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झालेली, कितीही कोडगी वाटली तरी अशी बाब आहे. पण मला तो चित्रपट बघावासा वाटत होता तो चित्रपट ज्या कथेवर आधारित आहे त्या कथेमुळे. मला ही कथा पुरेशी आठवत नाही आणि सध्या माझ्याकडे ती वाचायलाही नाही. पण मला आठवत आहेत ते दिवस जेव्हा मी ही कथा वाचली होती. NBT ने दि.बा. मोकाशींची कथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली होती. १९९६-९७च्या सुमारास (मला ठाम आठवत नाही) मी ही कथा वाचली. त्या वेळेला माझी आपल्या खोल सवयीची माणसे गमवायच्या दुःखाशी, त्यातल्या प्रसंगी जायबंदी करू शकणाऱ्या शोकाशी काहीच ओळख नव्हती. त्यामुळे मला ती कथा तेव्हा काहीच कळली नसावी.

पण त्या कथेच्या उल्लेखाने जागे होणारे स्मृतीदृश्य आहे हे मला हवेहवेसे आहे. त्या कथेतले रामजीने पाण्यात पोटॅशियम टाकल्याचे, हाताला तेल लावल्याचे उल्लेख हा माझा आणि कथेचा संपर्कबिंदू आहे. हे उल्लेख, त्यांची दृश्यरूपे डोळ्यासमोर येतात आणि मला रात्री ८ च्या सुमारास एका खोलीत दिवाणावर पडून पुस्तक वाचणारा एक मुलगा दिसतो. दिवाणाच्या एका बाजूला त्याचे आजोबा खुर्चीवर बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकून त्याची आजी काही काम करते आहे. ह्या सारे चित्र एका वाताभेद्य पारदर्शी फुग्यात आहे. तो मुलगा कथेची पाने भराभरा वाचत जातो, कथेचे शीर्षक त्याला लक्षात राहते, आणि शेवटाची काही तर एकाला एक जुळल्याची भावना.

कितीही हवेहवेसे वाटले तरी ह्या वाताभेद्य फुग्यातल्या वेळेत परत जाता येणार नाही. पण त्यातल्या काही संदर्भांना स्पर्श करून, मग त्या संदर्भाचे मनाशी खेळ करून, वर्तमानाच्या घुसमटीला विसरायची पळवाट, एस्केप मिळवता येईल. म्हणून मला ‘दिठी’ बघायचा होता.
--

Saturday, May 1, 2021

The Disciple नंतर

‘प्रेस्टीज’ च्या सुरुवातीला आपल्याला कळतं कि कोणत्याही जादूच्या प्रयोगाचे तीन भाग असतात, the pledge, the turn and the prestige. एक दाखवलं जातं, मग त्याला अनपेक्षित कलाटणी मिळते आणि मग अपेक्षित आणि अनपेक्षित जुळून येतं. ‘The Disciple’ हा तसा प्रयोग आहे, फक्त जादूचा नाही, तर माणसाने आपली औकात समजून घेण्याच्या चिरंतन प्रश्नाचा. त्यासोबत ‘कला नावाचा प्रकार आणि मार्केटशाहीच्या युगात त्याची peer reviewed system पासून मतदान/लाईक्स सिस्टीम पर्यंत होणारी वाटचाल ह्यावर चित्रपट बकुबी भाष्य करतो. हे भाष्य subtle आहे, आणि त्यामुळे प्रभावी आहे. पण ह्या subtle approach मुळे हा चित्रपट एका मर्यादित वर्तुळाचा असणार आहे. Netflix वर रिलीज करून त्यांनी ह्या दृष्टीने अचूक काम केलेलं आहे.   

चित्रपटात जोशी नावाच्या माणसाचे काही मिनिटाचे संवाद आहेत तो चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही हे ‘सांगणं हे मला गरज आहे हे सांगणंच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे. राजकीय नेते जेव्हा होणार नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ शक्यता आहे असा असतो, शक्य आहे म्हणजे करायला सुरुवात केली आहे असा असतो आणि जे करणार आहेत ते सांगतंच नाहीत, कारण अनपेक्षित असणं हेच प्रतिस्पर्ध्याला चकवायला महत्वाचं असतं तसं ‘मला नकोय अमुक अमुक हे सांगण्यात मला हवंय हाच सिग्नल असतो. ज्याला अशी गरज नाही तो सांगायला म्हणून तरी कोणाला का शोधेल? कलाकाराची आत्ममग्नता हा त्याच्या परफॉर्मन्सचाच भाग असतो आणि तो परफॉर्मन्स हा दुसऱ्या कोणासाठीच असतो. कलेच्या व्याख्येतच ती निर्माण करणारा आणि तिचा आनंद घेणारा अशी दोन टोके आहेत.

पण ह्यातल्या एका टोकाला वाटतं कि ते स्वायत्त आहे. त्यांचा असा गंड सांभाळणारे लोकही असतात, जे खरं दुसरं टोक असतात, पण ते स्वतःला अदृश्य करतात. त्यांना पहिल्या टोकाकडून मिळणारं मनोरंजन पुरेसं असतं.

संगीताच्या बाबतीत सोशल मिडियामुळे कोण कलाकार ह्याची व्याख्याच बदलली आहे. आधी तुम्ही पुरेसे कलाकार आहात का नाही ह्यावर तुमच्या जेष्ठ peers चा बराच प्रभाव होता. मुळात शिष्याचे कौशल्य आणि कारागिरी ही शिक्षकांच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून होती. आणि त्यांच्या हाती असलेल्या ह्या पॉवरमुळे ह्या जेष्ठांचा आदर ही आवश्यक नीती होती. तुम्हाला सुरुवातीला मिळणारा रिलीज हा ह्या रेफेरीजच्या तुमच्या बद्दलच्या मतांवर, feedback वर अवलंबून होता. तुम्ही कलाकार आहात का नाही हे तेच ठरवणार होते. दुसरा पर्याय काय होता? लोकांनी वाहवा दिली असती, पण उपजीविका?

आज तर मी ‘कलाकार आहे का नाही हा स्वतःच ठरवायचा मामला आहे. मला वाटत असेल मी अमुक अमुक करू शकतो तर मी तो आहे असं आपण म्हणतोच. आणि एखाद्याला तू तसा नाहीस हे सांगणं म्हणजे हिंसाच हेही नवे मूल्य आपण आणलेले आहे. क्रिटीकल, मन दुखावणारा feedback देणं हे आपण सुजाण व्हायच्या नादात थांबवलेलं आहे. आणि कोणी दिलाच असा feedback तर आपण दुसऱ्या कोणाला तरी गाठू शकतो. फी दिली कि मला हो म्हणणारा कोणीतरी असेलच. आणि कोणी हवा कशाला, मी थेट स्वतःला रिलीज करून लोकांच्या लाईक्सचा सर्वोच्च निकष थेटच ताडून पाहू शकतो.

शिक्षकांची, जेष्ठ peers ची सद्दी ही अनेक क्षेत्रांत संपुष्टात येते आहे. तुम्ही स्वतःला स्पर्धेत थेट सहभागी करू शकता. कोणीतरी तुम्हाला निवडायची गरज नाही. अर्थात काही क्षेत्रांत अजूनही निवडीच्या शुक्राचार्यांना वाव जास्त आहे (खेळ, academia इत्यादी.)

लोकांच्या रिंगणात थेट उतरताना कौशल्य आणि रंजकता ह्याचं मिश्रण तुमच्याकडे असायला लागतं. पण दर्दी लोकांच्या खाजगी रिंगणात रंजकतेला फारशी किंमत नाही. लोकप्रिय आणि उत्कृष्ट ह्यांचे नाते असे विचित्र आहे. एखादी गोष्ट उत्कृष्ट आहे कि नाही हे ठरवायला तिला मोठा ट्रायल पिरीयड लागू शकतो. पण लोकप्रियतेच्या बेभान स्टेडीयमला एवढा वेळ नाही. जिंकण्या-हरण्याच्या स्पर्धेची प्रत्येक आवृत्ती थोडाच वेळ आहे आणि तुम्हाला मर्यादित attempts आहेत. आणि परत जे उत्कृष्ट असेल ते रंजक असेल असे नाही.

हा क्वालिटीचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जास्त फंडामेंटल आहे. तो म्हणजे  How to make peace with one’s own mediocrity. You are good at something and maybe you touch the best at time, but not consistently to call yourself best. मग तो बेस्टचा पाठलाग करायचा का त्याला खुबसुरत मोड देकर सोडून द्यायचं? आपला आणि त्या विलक्षण क्षणांचा संबंध आपल्या आनंदापुरता ठेवायचा आणि स्पर्धेतून अलगद अदृश्य व्हायचे? का गिरवत रहायचे, अपयश हे यशाची पायरी असे अपयश दाबत दाबत वर सरकायचे? पण हा वर सरकायचा स्पीड पुरेसा नसेल तर? मग करायचं काय?

लोक साधना, सत्य वगैरे ढाचे देऊ शकतात, पण ही सगळी आंबट द्राक्षांची वाईन. त्याचीही मजा आहे, पण वाईन बनून टुन्न होईपर्यंत फार उलाघाल.

किंवा मग आपलं काही न झाल्याचा कडवटपणा मनात ठेवून आपल्या अस्तित्वात तो हळूहळू मुरू द्यायचा. तसं उघडपणे काही म्हणायचं नाही, पण होईल तसा जगावर सूड उगवायचा, जो/जे समोर असेल त्याच्यामार्फत.

संजय मांजरेकरचं आत्मचरित्र ह्याबाबतीत मला फार आवडलं. त्याने फार प्रामाणिकपणे त्याची असूया, असुरक्षितता मांडली आहे. आणि कडवट अस्तित्वाचे तो एक उत्तम उदाहरणही आहे कदाचित!

काहीही करून, आपल्याला आपल्या तोकड्या असण्याच्या जाणिवेचे काहीतरी करावेच लागेल. एकतर तोकडे नसण्याच्या किनाऱ्याला जायला, without rope वगैरे छलांग मारावी लागेल (जसं batman करतो, माई म्हणतात), किंवा खुबसुरत मोडवर मागे परतून आपल्यापुरते आनंदाचे वर्तुळ आखायला लागेल, किंवा कडवट, सिनिकल होत जाण्याचा स्वाभाविक मार्ग.

असं करूनही केव्हातरी आपल्याला ते खुणावतच राहील, what it could have been, how beautiful it can be.

Well done, चैतन्य ताम्हाणे. I will be looking forward to your next.    

Thursday, February 20, 2020

Parasite: उपभोगरम्य स्वप्नांचा paradox


शेवटी मी Parasite पाहिलेला आहे. आणि अनेक दिवसांनी टोरेंट शोधून डाऊनलोड करून तो पाहिला, म्हणजे परजीवी प्रकाराने परजीवी अशा नावाचा चित्रपट!
तर parasite मध्ये एक प्रसंग आहे. घर पावसाच्या पाण्यात बुडाल्याने बाप आणि मुलगा रात्रीच्या निवाऱ्याची सोय केलेल्या हॉलमध्ये झोपलेले आहेत. ह्या प्रसंगाच्या आधी येणाऱ्या प्रसंगात कुटुंबावर ओढवलेल्या एका कठीण संकटाला कसं तोंड द्यायचं ह्याची चर्चा चालू असताना बापाने माझ्याकडे काही plan आहे असं म्हटलेलं असतं. आता त्या हॉलमध्ये, पुराने बाधित शेकडो लोकांच्या मध्ये झोपलेले असताना, मुलगा बापाला विचारतो कि काय आहे तुमचा plan. बाप एकूणच कुटुंबासोबत जे घडलं त्याच विचारात असतो. मुलाच्या प्रश्नाला तो त्याच्याच धुंदीत उत्तर देतो. तो म्हणतो कि हे इतके बेघर लोक असा रात्री कॉमन हॉलमध्ये झोपायचा plan करून आले नव्हते.
बापाचे dialogues
Ki-woo, you know what kind of plan never fails? No plan at all. No plan. You know why? If you make a plan, life never works out that way. Look around us. Did these people think, “let’s all spend the night in the gym?” But look now. Everyone’s sleeping on the floor, us included. That’s why people shouldn’t make plans.
With no plan, nothing can go wrong. And if something spins out of control, it doesn’t matter. Whether you kill someone or betray your country. None of it fucking matters.
मला हा सीन बघताना गली बॉय मधला असाच बाप मुलाचा संवाद आठवला.
बाप म्हणतो – तेरेको वही सिखा रहा है जो मै सिखा है. तेरा सपना तेरी सच्चाईसे मेल खाना चाहिये.
मुलगा – मै नही बदलेगा अपना सपना अपनी सच्चाई से मेल खाने के वास्ते. मै अपना सच्चाई बदलेगा जो मेरे सपने से मेल खाये.
--

स्वप्नं बघावीत का नाहीत हा एकदम फंडामेंटल प्रश्न आहे.
एक पिक्चर म्हणतो, बघा, येईल तुमचेही स्वप्न खरे व्हायचा टाईम. आणि एक म्हणतो, जे आहे त्यात असण्याची अवस्था खरी. कसलं स्वप्नं वगैरे!
दोन्ही सिनेमांचे प्रिमाईस सारखेच, बाप ड्रायव्हर, घर म्हणजे जवळजवळ भिंतींमधील थोडी जागा.
पण गली बॉय एकदम capitalist (एवढी झोपडपट्टी दाखवली, पण कॉमन संडास नाही दाखवले!) आणि Parasite एकदम मार्क्सिस्ट (पब्लिक ट्रान्सपोर्टने येणाऱ्या लोकांना एक विशिष्ट वास असतो असं म्हणणारा मालक!)?
स्वप्नं बघायची शर्यत जिंकणाऱ्याना लाभदायी ठरत असेलच, पण समूह म्हणून आपण पर्यावरणाच्या नाशाच्या ज्या टोकाला आहोत त्याला ही उपभोगरम्य आयुष्याचे स्वप्न बघण्याची लतच कारणीभूत नाही का!
समजा आपण एकदम ‘ठेविले अनंते..’ असे जगू लागलो तर?
--

आपण बरेच पिक्चर पाहिले, आता काय किक बसणार असं वाटत असताना एकदम Parasite! आणि मग त्यावर हा तितकाच परपोशी लेखनप्रपंच!!
एक नंबर पिक्चर आहे बाकी.

Friday, March 2, 2018

वाचलेले-पाहिलेले काही

वाचलेले 
१. एम. जे. अकबर ह्यांचे 'Kashmir: Behind the Vale'. 
इस्लामच्या माझ्या आकलनाची सुरुवात हे अकबर ह्यांच्या 'Shade of Swords' ने झाली होती. त्यानंतर त्यांचं 'Pakistan: A Tinderbox' हे पुस्तक वाचताना संदर्भ आणि प्रवाही लिखाण ह्या दोन्हीची सांगड घालण्याच्या त्यांच्या कौशल्याची मला जाणीव झाली होती. काश्मीरबाबतचे त्यांचे पुस्तक हे २००२ सालचे आहे. त्यामुळे मागच्या १७ वर्षांतील घटना त्यांत नाहीत. पण काश्मीरच्या दीड हजार वर्षाच्या इतिहासाची एकदम ओघवती मांडणी त्यांनी केलेली आहे. 
मध्ये 'पटेल असते तर कसा काश्मीर प्रश्न आलाच नसता' अशी चर्चा चालू होती. नेहरू हे काश्मीरबाबत किती आग्रही होते, त्यांनी प्रश्न युनोत नेला (आणि ही चूक होती हे नंतर त्यांना जाणवलं) पण तिथल्या भारतीय प्रतिनिधीने तो चुकीच्या पद्धतीने कसा मांडला आणि पटेलांच्या हिशेबात मुस्लीम बहुसंख्य काश्मीर हे भारतात येणार नाही हेच होते ह्या गोष्टी एम.जे. अकबर ह्यांनी पुस्तकात सविस्तर मांडलेल्या आहेत. 
इट्स अ गुड रीड. Must to get a soberer perspective on Kashmir issue. 
२. 'When Crime Pays' by Milan Vaishnav 
लोकप्रतिनिधी आणि गुन्हेगारी ह्यांच्या संबंधांची चिकित्सा करणारे हे पुस्तक आहे. पुस्तक semi-academic स्वरूपाचे आहे. त्यामुळे भव्य मांडणीपेक्षा नेमकी पण सखोल मांडणी असलेले आहे. 
वैष्णव ह्यांचे मुख्य मुद्दे असे आहेत: 
भारतीय लोकशाहीचे गुन्हेगारीकरण हे १९५०-६० पासूनच सुरू आहे. पण तेव्हा गुन्हेगार हे राजकारणी म्हणून अस्पृश्य होते. पण राजकीय नेत्यांना त्यांचे उपद्रव मूल्य टिकवायला लागणारी मसल पॉवर आणि गुन्हेगारी जगताला लागणारी पोलीस अभयाची स्पेस आणि ह्या पोलीस दलाचा राजकीय नेतृत्वाकडे असणारा कंट्रोल ह्यामुळे लोकप्रतिनिधी आणि गुन्हेगार अशी लिंक बनली. ह्या काळात गुन्हेगार हे प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांच्या छायेत होते. 
१९७० पासून कॉंग्रेस राज्यांच्या स्तरावर दुर्बल बनली. गुन्हेगारांच्या कारवाया स्थानिक असल्याने त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे अभय गरजेचे होते. सतत बदलू शकणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे गुन्हेगारांना आपला व्यवहार सुरळीत ठेवणे कठीण झाले. त्यामुळे आपणच लोकप्रतिनिधी बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 
राजकीय पक्षांची रिसोर्सेसची गरज आणि मतदारांची जात आणि सरकारी कामे होण्यासाठी कोणा बाहुबलीचा रेफरन्स लागण्याची गरज ह्या दोन्हीचे पर्याय गुन्हेगार बनले. म्हणजे मतदारांनी त्यांना जाणीवपूर्वक (भीतीच्या पोटी नव्हे!) निवडून दिले. 
पण गुन्हेगार लोकप्रतिनिधी झाल्याने त्यांनी आपली परत निवडून येण्याची शक्यता जास्त राहावी म्हणून सरकारी यंत्रणा दुबळी राहील आणि सामाजिक भेगा जिवंत राहतील अशाच स्वरूपाचे राजकारण केले/करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासचे काही थोडे लोक वगळता अन्यांचा तोटाच आहे. 

३. सुजाता गिडला ह्यांचे Ants among Elephants 
हे पुस्तक आधी यु.एस. मध्ये प्रकाशित झाले. तिथे भारतातील जातीव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे पुस्तक असा त्याचा गवगवा झाला. त्यानंतर ते भारतात आले. 
लेखिकेच्या आधीच्या दोन पिढ्यांची आणि विशेषतः तिच्या मामाची ही गोष्ट आहे. लेखिका ही आंध्रातील ख्रिश्चन दलित आहे. ती हे पटवून देते कि कितीही विसंगत वाटलं तरी तिला, विशेषतः तिच्या आधीच्या दोन पिढ्यांना  ख्रिश्चन असूनही दलित असण्याचेही भोग वाट्याला आलेलेच आहेत. अर्थात तिला ख्रिश्चन म्हणून काही नेटवर्क बेनिफिट मिळाला आहे का ह्याबाबत काही स्पष्टीकरण नाही. 
लेखिकेचा मामा हा नक्षल चळवळीत होता. पण तिथेही त्याला सामाजिक भेदभावांचा सामना करावाच लागला. 
लिखाणात आणि मुळातल्या अनुभवांत जो प्रामाणिकपणा आहे तो पुस्तक वाचताना भिडत राहतो. लेखिकेच्या आईची शिकायची आणि त्यानंतर मुलांना चांगले आयुष्य द्यायची धडपड हा भाग प्रचंड ताकदीने आला आहे. 
जाती आणि त्यातून लाखोंच्या आयुष्यांची झालेली परवड ह्याबद्दल मोठे भाष्य करणारे हे पुस्तक नाही. पण अन्यायाच्या ह्या अजस्त्र backlog ला टक्कर देताना 'परतावा देणारे शिक्षण' हा किती मोलाचा मार्ग आहे ह्यावरचा विश्वास वाढवू शकेल असे पुस्तक आहे. 

पाहिलेले
१. लव्ह पर स्क्वेअर फीट - विकी कौशलचा हा चित्रपट नेटफ्लिक्स वर रिलीज झाला आहे. थोडा पसरट आहे आणि उथळही. मी विकी कौशलसाठी पाहिला. 

२. क्राऊन सिझन २ - इंग्लंडच्या राणीवर बेतलेली ही सिरीज आहे. सुरुवाताचे काही भाग एकूणच सिरीजला कौटुंबिक मालिका करून सोडतात कि काय असे वाटतात, पण नंतर सिझन ग्रीप पकडतो. संवादात वापरलेले शब्द हा सुद्धा ह्या मालिकेचा एक विशेष म्हणायला लागेल. त्यांतला राणीने कसं वागावं ह्याबाबत लिखाण करणाऱ्या एका स्तंभलेखाकाबद्दलचा एपिसोड एकदम विशेष आहे. आपल्याला जे बोलायचं आहे ते ठाम, पण व्यक्तीशः टीका टाळून  आग्रही आणि समर्पक शब्दांतून कसं सांगता येतं आणि कसं सांगावं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण हा भाग आहे. 

३. Black Mirror - सिझन ४ 
Black Mirror बद्दल फार काही सांगायला नको. कारण जे ह्या पंथात आहे त्यांनी हा माल सेवन केलेलाच असणार आहे आणि जे ह्या पंथात नाहीत त्यांनी हा प्रयोग करूच नये! 

४. Inside Edge 
Amazon Prime वर ही हिंदी-इंग्लिश मालिका आहे. क्रिकेटमधील लीग, त्यातील डावपेच आणि फिक्सिंग अशा चविष्ट घटकांवर सेक्स, रहस्य आणि ग्रीप ठेवणारी पटकथा असा मसाला आहे. सुरुवातीच्या काही भागांनंतर ती नेहमीचे रस्तेच गिरवते. पण तरीही वेगळा प्रयत्न आहे. रिचा चढ्ढा आणि विवेक ओबेरॉय ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे. 

Saturday, December 23, 2017

‘गच्ची’ आणि काही लोकल निरीक्षणे

  
      ह्या आधी दोन हातांच्या बोटावर मोजता येईल एवढ्या लोकांसोबत मी कधीही थेटरात सिनेमा पाहिला नव्हता. काल असा मौका मला मिळाला. मेट्रो आयनॉक्स ह्या ऐन मुंबई नगरीत असलेल्या थेटरात, उत्तम साउंडमध्ये ‘गच्ची’ पाहता आला. थीम, अभय महाजनचा अभिनय आणि संवाद ह्याचे अगदी पैकीच्या पैकी मार्क सिनेमाला द्यावे लागतील. सिन्स दाखवण्याची पद्धत आणि पार्श्वसंगीत हेही पूरक आहे. प्रत्यक्षातही काही तासांची गोष्ट सांगणारे, flashback किंवा गुंतागुंतीची backstory न वापरणारे पिक्चर असतात त्यात ‘गच्ची’ येईल. शेवतालाच चित्रपट आधी मेंटेन केलेलं प्रेशर सोडून एकदम सुट्टा, हलका होतो, पण ते चित्रपटाची मजा घालवण्याएवढं खुपत नाही.
Image result for gachchi abhay mahajan
      अभय महाजनच्या अभिनयाने मी इम्प्रेस झालेलो आहो. BhaDiPa च्या मराठी Sad-गृहस्थमध्येच मला तो आवडला होता.
      गोष्ट करूण किंवा थरार करण्यापेक्षा घडते तशी सांगत जाऊन एकप्रकारे विसंगत विनोदी करणं आणि तरीही अशा फॉर्मच्या वापराच्या प्रदर्शनात न जाता चित्रपट घडता ठेवणं हे दिग्दर्शकाला जमलेलं आहे.
     मला नेहमी पडतो तसा हे बघायला येणारे कितीजण असणार आहेत हा प्रश्न चित्रपटावर पैसे लावणाऱ्याला पडला असेल का हा प्रश्न मला कालही पडला. अर्थात ह्यांत कशाला काढता असलं काही असा उद्वेग नाही तर वेगळे प्रयोग करण्याचं आर्थिक गणित आणि आडाखे काय असतात ह्याचं कुतूहल आहे. चित्रपट बघायला आलेल्यांची तुरळक संख्या हे हा प्रश्न पडायचं एक कारण होतं.
      मुंबईच्या धडकत्या कोअरपासून दूर माझं जे धर्मशाळा उपनगर (Dormitory suburb- कारण दिवसभर लोक उपजीविका आणि कम्यूट करतात आणि रात्री झोपायला घरी येतात!) आहे तिथे ‘गच्ची’ चा पर थेटरी १ शो होता आणि तोही दुपारी १.३० किंवा २.३० चा. संध्याकाळचे किंवा रात्रीचे शोज सगळे ‘टायगर’ ला. मग मेट्रो आयनॉक्सला ६ चा शो आहे हे पाहून मला वाटलं कि त्यांना शोसाठी पब्लिक यायची थोडी ज्यादा खात्री असावी. पण आले होते ६ जण. मग जिथे दुपारचे शोज होते तिथे काय झालं असेल? J
 कदाचित काही दिवसांनी नेटफ्लिक्स किंवा Amazon वरच नवे प्रयोग करणारे चित्रपट येतील. That will be a good development and sound business model in my opinion.
--
                मोबाईलच्या मोठ्या स्क्रीनचा एक परिणाम म्हणजे लोक त्यांच्या मोबाईलवर काय करत आहेत हे दुसऱ्यालाही दिसू शकतं. हे वापरणाऱ्याला ठाऊक असतं. पण अनेकदा हे बेअरिंग जातं आणि मग मोबाईल स्क्रीन काय चाललं असेल वापरणाऱ्याच्या मनात/जगात ह्याचे इंटरेस्टिंग नमुने देऊ शकते. हे थोडं perversion आहे हे मला मान्य आहे. पण लोक काय करतात ह्याचा विचार करताना त्यांच्या वागण्याकडे निरखून बघणं ही सवयच मुळातली pervert असावी असा डिफेन्स मी देतो.
      तर एका गृहस्थाच्या स्क्रीनवर मला दिसला एक व्हॉटसअप मेसेज:
10 seats for the 11 am show for movie (नाव कळलं नाही, पण प्रादेशिक भाषेत). Can we have TZH for 11 am show till Monday? J
--
असा छान पिच्चर बघून, नीट पोटोबा करून ही सगळी मजा रिचवायला जणू छान पाचक व्हावे म्हणून लोकल ट्रेनने मी परत येत होतो.  
एक कम्युटर, गर्दीच्या धप्पाक लोंढ्याच्या अग्रब्भागी दादरला डब्यात आला. ट्रेन रात्री ९.४५ ची कर्जत फास्ट आणि डबा फर्स्टक्लासचा. सहा जण बसलेले आणि दोन जण उभे अशा एका खाचेत तो तिसरा उभा राहिला. ठाणे गेल्यावर उभ्या असलेल्या पैकी पहिला बसला. तिसऱ्याच्या आशा पालवल्या कारण आता ५ मध्ये २. पण पुढे काही हालचाल नाही. डोंबिवलीला जो उभ्या लोकांत दुसरा होता त्याने आशा सोडली आणि परित्यागी भावनेने तो खाचेतून बाहेर आला. आता तिसरा चांगलाच कावला होता. त्याला बदलापूरहून पुढे जायचं होतं. बसलेल्या लोकांपैकी ४ जण झोपले होते. २ कानांत घालून बसले होते. हा मनुष्य अजून कावत चालला. शेवटी रडतखडत लोकल कल्याणाच्या आधी आली तेव्हा एकजण बसा असं त्याला म्हणाला तेव्हा हा तिसरा तिरसटला. म्हटला, ‘नको. बसा. बसूनच रहा. कशाला कोणाला जागा द्या.’ जो जागा द्यायला चाललेला तो एकदम ओशाळला, पण परत बसला. मग परत उभा राहिला आणि मी कसा नेहमी मदत करतो, पण आज जरा बरं वाटत नाहीये म्हणून बसलो असं म्हणून आपली गिल्ट साफ करू लागला. वाफ निघालेला तिसरा आता बसला आणि म्हणू लागला ‘लोक तर काय सी.एस.टी. पासून बदलापूरपर्यंत बसतात, काही वाटत नाही. सहा लोकांत तीन उभे होते, तरी कल्याणपर्यंत मी उभा होतो. काय म्हणायचं’. मग त्याने आणि त्याला सीट दिलेल्यांनी खांदे पुरेसे हलवून जगाच्या वाईट असण्यावर खुंटा बळकट केला.
हे मी बघत उभा होतो, तसं माझ्यापुढे बसायच्या सोडतीत येउच न शकलेला आणि लोकल फारच वेळ दोन स्टेशनात उभी राहिल्याने आपण नेमके कुठे आहोत असा existential चिडीला आलेला एक कम्युटर पण होता. त्यांत त्याला उशीर होतोय ह्याने वैतागलेली एक व्यक्ती त्याला मेसेज करत होती. त्यामुळे त्याला तो बघत असलेला पिक्चर पॉज करून करून रिप्लाय करायचा होता. त्याचा एक रिप्लाय
Once our lives get on track, I swear we will never see these trains again.

मग गाडी हलली track वरून, पुढे गेली. मी उतरून घरी जाऊन झोपलो ‘गच्ची’ मधला टाऊनमधल्या चाळीत राहणारा ‘श्रीराम’ आठवत आठवत! परदुःख शीतल!!        😔

Sunday, December 17, 2017

वाचलेले-पाहिलेले काही


१.     Empire of the Indus

नद्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्या सिस्टिम्स ह्याबाबत लिहिणाऱ्या परिणीता दांडेकर ह्यांच्या लिखाणात ह्या पुस्तकाचा उल्लेख माझ्या एका मित्राने वाचला. मग त्याच्याकडून मला ह्या पुस्तकाबाबत कळलं.
सिंधू नदीचा भूगोल आणि तिच्या अनुषंगाने आलेला काळाचा प्रवाह (इतिहास, राजकारण, माणसे) अशा दोन प्रतलात हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेखिका पत्रकार आहे. पुस्तक हे academic नाही, पण म्हणून त्यात सरसकटीकरण नाही आणि लिखाण ससंदर्भ आहे. गुंतून एकसलग वाचत जावं असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात आणि मध्यातला प्रामुख्याने सध्याच्या पाकिस्तानशी अनुषंगून असलेला सद्य आणि ऐतिहासिक भाग हे ताकदवान आहेत. शेवटचा तिबेटमधला भाग थोडा भावूक आहे.
२.     Empire of Indus  वाचताना पाकिस्तानबद्दल वाचावं असं मला वाटू लागलं. Pakistan: A Hard Country’ हे पाकिस्तानबद्दलचं एक उत्कृष्ट पुस्तक मी वाचलं होतं. पण भारत-पाकिस्तान संबंध हे त्यात फारसे आलेले नव्हते. त्यामुळे The Longest August:The Unflinching Rivalry Between India and Pakistan’ हे पुस्तक मी वाचायला घेतलं.
पुस्तकाचे लेखक दिलीप हिरो (Dilip Hiro) हे academician नाहीत किंवा पत्रकारही नाहीत. ते शिक्षणाने इंजिनीअर आहेत. पण पेशाने लेखक आहेत. मुस्लीम देशांच्या बाबतीतल्या इतिहास आणि राजकारण ह्यांवर त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे आणि ही यादी स्तिमित करणारी आहे. संदर्भ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्यांची त्यांच्या लिखाणात कमतरता नाही. पण त्याचवेळी त्यांच्या लिखाणात ते निःसंदिग्ध भूमिका घेतात.
The Longest August मध्ये नेहरूंच्या self-righteousness वर त्यांनी वारंवार टीका केलेली आहे आणि अनेकदा त्यांचा हा स्वभाव चुकीच्या धोरणांना कसा कारणीभूत ठरला ह्याचीही मांडणी ते करतात. तसंच भारताची पाकिस्तान आणि चीनच्या संबंधातली भूमिका ही कधीही बोटचेपी नव्हती किंबहुना महत्वाकांक्षी होती ह्याचेही दाखले ते देतात. (भारताने आजवर म्हणजे मे २०१४ च्या अगोदर, आणि विशेषतः नेहरूंच्या काराकिर्दीत परराष्ट्र धोरणात मार खाल्ला आहे हि अनेकांना खरी वाटणारी मांडणी प्रत्यक्षात अत्यंत विसंगत आहे. दिलीप हिरो त्याचे अनेक दाखले देतात. केवळ दिलीप हिरोंनी केली आहे म्हणून मी असे म्हणत नाही. प्रत्यक्ष पुरावे आणि तर्कसुसंगत विचार केला तर हे कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. पण आपल्याला आवडणारे नेते सोडले तर बाकी सगळ्यांचे राजकारण हे व्यक्तीहिताचे आणि देशघातकी ह्याच फ्रेमचा भारतातील ओपिनिअन मेकर्सवर किती पगडा आहे ह्याचे उदाहरण म्हणजे हि मिथके असावीत. किंबहुना ही मिथके काही एक हेतूनेच प्रसवली गेली असावीत असेच म्हणायला लागेल.)
       २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते २०१४ च्या मध्यापर्यंत एवढ्या वर्षांचा प्रवास गतिमानता आणि खोली ह्यांचे संतुलन ठेवून ४७५ पानांमध्ये (+ १०० संदर्भ आणि अन्य पाने) मांडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम मानसिकता, राजकारण आणि धर्म ह्यांची तेव्हापासून असलेली अपरिहार्य सांगड (जी नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक वापरली, आणि स्वातंत्र्यानंतर ती नव्हतीच असे भासवायचा किंवा होती ती केवळ मुस्लिमांची होती असे समज पसरवले गेले) आणि १९४७ नंतर राहिलेले कमी-जास्त वितुष्टाचे भारत-पाक राजकीय संबंध, भारताची त्याच्या आकार आणि इतिहासाने आलेली स्वाभाविक महत्वाकांक्षा आत्यातून जन्माला आलेली पाकिस्तानची स्वाभाविक आणि पायाभूत भारतभीती असे अनेक घटक दिलीप हिरो ह्यांनी स्पष्ट केलेले आहेत.
       स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम मानसिकता, तिची मुघल सत्तेच्या ऱ्हासात असलेली मुळे आणि त्यातून द्विराष्ट्र सिद्धांताकडे झालेली वाटचाल ह्याबद्दल एम.जे.अकबर ह्यांचे Tinderbox: The Past and Future of the Pakistan हे पुस्तकही वाचण्यासारखे आहे.
३.     दिलीप हिरो ह्यांच्या वर उल्लेखलेल्या पुस्तकात झिया उल हक ह्यांच्या विमान अपघाताच्या वर्णनात मला A case of exploding Mangoes ह्या कादंबरीचा उल्लेख मिळाला. पाकिस्तानचे १९७० आणि ८० च्या दशकातले लष्करशहा झिया उल हक ह्यांच्या संशयास्पद विमान अपघाताचे fictional account ह्या कादंबरीत आहे. मनू जोसेफ ह्यांच्या लिखाणाशी साधर्म्य असणारा सिनिसिझम लेखक मोहम्मद हनीफ ह्यांचा आहे. फटाफट वाचून होणारी पण उथळ न होणारी अशी हि कादंबरी आहे. कादंबरीला एका सत्य घटनेची अपरिहार्य पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी राजकीय असल्याने कादंबरीतील अनेक ताकदीच्या जागा कमी उठाव घेतात.

४.     Godless

Netflix वर ही एकाच सीझनची (अद्यापतरी!) मालिका आहे. Western ह्या genre मध्ये तिची गणना होईल. काय घडणार आहे हे तसं भाकीतेबल असलं तरी दाखवायची तऱ्हा म्हणून Godless पहावी. घोड्यांचा कथेतला वापर वेगळा आहे. शेवटच्या भागातली फाईट तर एक नंबर.

५.     Suburra: Blood on Rome  

रोम ह्या शहरांत घडणारी राजकारणी, माफिया आणि काही नामचीन अवैध कामे करणारी कुटुंबे ह्याबाबत च्या इटालियन टी.व्ही. सिरीजचा हा Netflix वरचा पहिला सिझन आहे. तशी मसाला सिरीयल आहे. पण टिपिकल अमेरिकन मालिकांच्या मायोनीज थरारापेक्षा वेगळी आहे. ह्याच नावाचा एक सिनेमाही आहे.

६.     मोह, माया, मनी

रणवीर शोरे, नेहा धुपिया ह्यांचा हा मध्ये केव्हातरी आलेला सिनेमा मी Netfilx वर पाहिला. फटाफट श्रीमंत व्हायचं आहे असा नवरा, नवऱ्यापासून लपवून आयुष्य जगणारी बायको आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या निवडींनी होणारी उलथापालथ अशी गोष्ट आहे. पण फार काही मजा नाही.

७.     बापजन्म

हा सिनेमा Amazon Prime वर आहे. गोष्ट चांगली आहे, सादरीकरण तितकं गोळीबंद नाही. अजून आटोपशीर आणि कमी हुंदके देणारा चित्रपट करणं शक्य होतं असं वाटतं.

८.     अस्तु

हाही Amazon Prime वर पाहिला. चित्रपटाची गोष्ट संस्कृत प्रोफेसरची करून उगाच एलिट तोरा का दाखवत आहेत असं मला सुरुवातीला वाटलं. पण हळूहळू चित्रपट आपल्याला भिडतो, विशेषतः मोहन आगाशेंची भूमिका. पण त्यांचा प्रोफेसर म्हणून असलेला व्यासंग केवळ ते संस्कृत श्लोक म्हणतात त्यातून फार दिसत नाही. हा संबंध अगदी वरपांगी वाटतो. भैरप्पा ह्यांच्या वंशवृक्ष नावाच्या कादंबरीत एक असंच संशोधकाचे पात्र आहे, बहुतेक सदाशिव नावाचे. ते संस्कृतीबद्दल संशोधन करत आहेत एवढेच सारखे कादंबरीत येते, पण काय करत आहेत ह्याबद्दल काही जास्ती येतंच नाही. Poetry नावाची South Korean फिल्म आहे. म्हातारपण, स्मृती आणि चूक-बरोबर ह्याचं जजमेंट ह्यांची माझ्या डोक्यात रुतून बसलेली इमेज म्हणजे हि साउथ कोरियन मूव्ही. 'अस्तु' इतका रुतत नाही, पण खूण सोडू नक्की शकतो.             

Sunday, November 19, 2017

‘न्यूटन’, निष्काम कर्मयोग आणि बाकी लिहिण्याचा इगो

‘न्यूटन’ बद्दल मी वाचलेल्या प्रतिक्रियांना दोन टोके होती. एक होत्या भारावलेल्या आणि दुसऱ्या होत्या ‘न्यूटन’ राष्ट्रद्रोही गटातला आहे असा शिक्का त्यावर लावणाऱ्या. त्यामुळे सरकार, सैनिक हे चुकू शकतात अशा आशयाचं काही विधान ‘न्यूटन’ मध्ये असणार एवढं तरी मला कळलं होतं. मी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, कारण चित्रपट त्याच्या गोष्टीबाबत, अभिनयाबाबत बघायचा असल्याने हे बघणं laptop च्या, मोबाईलच्या स्क्रीनवरही होईल असा विचार मी केला. ‘न्यूटन’ amazon prime वर आहे, पण डाऊनलोडला अद्याप नाही.
एवढी बोटे का दाखवली आहेत हे चित्रपट बघून कळतं! स्त्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Newton_(film)

       ‘न्यूटन’ ला राष्ट्रीय सांस्कृतिक सरदार का नाके मुरडत आहेत हे कळणं कठीण नाही. राष्ट्रीय सांस्कृतिक सरदारांची जी पायाभूत गृहीतके आहेत त्यांतले एक म्हणजे सैनिक चुकू शकत नाही आणि चुकला तरी त्याची चूक ही क्षम्यच असते किंवा अपरिहार्य असते. आणि जो कोणी अशा चुकू न शकणाऱ्या गोष्टींच्या चुका दाखवतो तो नक्कीच शत्रूचा हस्तक. ‘न्यूटन’ मध्ये अशा आशयाच्या कमेंट्स आहेत. काही ठिकाणी तर मुद्द्दाम आदर्शवादी संवाद घालून कमेंट्स करायचा प्रयत्न आहे. इथे पिक्चर गंडला आहे असं मला वाटतं. आणि नक्षलवादाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर गोष्ट उलगडते ह्याचा एक परिणाम म्हणजे ही दाट पार्श्वभूमी हाच चित्रपट आहे असं होण्याचा समज.
       पण ‘न्यूटन’ काय आहे हे तर संजय मिश्रा आणि राजकुमार राव ह्यांच्यावर चित्रित, चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या एका संवादात आहे. 
https://www.youtube.com/watch?v=uF0q-EQw7AE

माझ्या प्रामाणिक असल्याने काय फरक पडतो हा विचार येणं म्हणजे तुम्हाला प्रामाणिक असण्यापेक्षा आपल्या इगोची अधिक पडली आहे. प्रामाणिक का असावं कारण आपल्याला तसं करावसं वाटतं म्हणून, तसं केल्याने तसं न करण्यापेक्षा आपल्याला अधिक बरं वाटेल म्हणून, युटीलिटेरीअन मामला! पण असं प्रामाणिक असण्यासाठी प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अध्यात्मिक प्रकार, निष्काम कर्मयोग. फळ मिळणं तर सोडा, पण इतरांचे उपहास, प्रसंगी तुमचं प्रामाणिक असणं, तुमचं नियम कर्तव्य बजावण्याची भूमिका हि इतरांच्या मार्गातील अडथळा आहे हे तुम्हाला बाकीच्यांकडून ऐकावं लागणं, आणि वाईट म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाने आमचं नुकसान झालं असं तुम्ही ज्यांना आपलं मानलं असे लोक म्हणणं. हा एकदम मूलभूत पेच आहे. ‘न्यूटन’ हा प्रश्नाची दास्तान आहे खरंतर, पण ह्या प्रश्नाच्या गाभ्याला तो सगळीकडून खोलवर पोचत नाही, केवळ एक अणकुचीदार नेमका टोचा तेवढा देतो.
       त्या पहिल्या संवादानंतर केवळ उलगडण्याची उत्सुकता म्हणून मी ‘न्यूटन’ बघत होतो. पण एका बाजूने मला अनेक गोष्टी आठवत चालल्या होत्या. मी घाबरूनच गेलो होतो खरंतर. वय वाढत जातं तसं आपण एकतर आपल्या कामात बुडून जाऊ शकतो आणि कामाबाहेरच्या जगाला कोडगे होतो किंवा सिनिकल होऊ शकतो, पण जर आपण पुस्तके-सिनेमे ह्यांनी अस्वस्थ होत असू तर आपल्यासारखा च्युत्या कोण नाही. त्यामुळे ‘न्यूटन’ मला हिट करत होता तसं मी कात्रीत सापडत होतो.
       (वय वाढत जाण्याच्या जाणीवेवर मी एक उपाय शोधला आहे. पूर्वी लोक सरासरी कमी जगत, त्यामुळे त्यांना कमी वर्षे भारावून जायची, अस्वस्थ व्हायची मुभा होती. आपलं सरासरी आयुर्मान वाढल्याने आपण  अधिक काळ अशी फेज ठेवू शकतो. ह्या नव्या intuition ने मल थोडं बरं वाटतं.)
       एकवेळ माझं एकदम फेवरीट पुस्तक असलेल्या ‘रारंगढांग’ मध्ये एक वाक्य आहे. विश्वनाथ मेहेंदळेचे वडील त्याला लिहितात त्या पत्रात. ‘ज्या गोष्टी करायच्या हे आपण ठरवलं आहे त्या कोणत्याही परिस्थतीत पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य असते असे मला वाटते’ अशा आशयाचा त्याला शेवट आहे. हे वाक्य मला वेगवेगळ्या अंगांनी कळत राहिलं आहे (किंवा हे माझे रिकामचोट चाळे आहेत!). ह्यांत एकतर तुम्ही नेमकं काय करावं ह्याचं काही बंधन नाही, ते तुमच्यावर आहे. बरं हे वाक्यही पत्थर कि लकीर असे सत्य नाही, त्याचा शेवट ‘असे मला वाटते’ असा आहे. आणि त्याचा मधला भाग आहे तो एकदम चिवट आहे, डोक्याला चिकटून राहणारा आहे.
       त्याच वयांत केव्हातरी जेव्हा केवळ आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवायची खाज प्रशस्त किंवा गर्दीचे धोपटमार्ग चालू देत नव्हती आणि बाकीच्या रस्त्यांवर चालायला लागणारी ग्रीट (Grit) काय असते हे कळत नव्हतं तेव्हा असे रस्ते चालून आलेल्या एका माणसाने मला एक वाक्य सांगितलेलं -  सामाजिक काम म्हणजे समाधान असं नाही आणि करिअर म्हणजे समाधान नाही, केवळ जगरहाटी असंही नाही.
       ‘न्यूटन’ पाहताना हे का आठवलं? कारण तो पहिला संवादच. कदाचित माझ्या मनात जे उमटतं आहे तितकं त्या संवादात नसेलही. पण चांगल्या वाक्यांची हीच मजा असते, त्यांना इतके कंगोरे असतात कि प्रत्येकाला त्यातून जे दिसतं ते वेगवेगळं असू शकतं आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणी अशी वाक्ये केवळ चमकदार उथळही वाटतात.
       कदाचित असंही आहे कि आपल्या जगण्याची पायाभूत चौकट ही आता आहे असं आहे ह्या कर्मठतेकडून rationality बेस्ड उपयुक्ततावादाची आहे. एखाद्यानं नियम पाळावेत एवढं आता बरोबर वाटत नाही. हे नियम वागणाऱ्या माणसांच्या स्वहित साधण्याच्या प्रेरणेला बाधा आणणारे नकोत आणि असे असतील तर माणसांत नाही, किंवा केवळ माणसांत नाही, तर नियमांतही गफलत आहे असा विचार आपण आता करू शकतो.
       जर आपल्या राँग साईड जाण्याने योग्य दिशेने जाणाऱ्या एकही वाहनाला अडथळा होणार नसेल तर माझं रॉंग साईड वाहन चालवणं का चुकीचं मानावं? दुसऱ्याची थेट हानी न करेपर्यंत मला माझं हित साधायची कितीही मुभा आहे किंबहुना दुसरा जोवर हरकत घेत नाही तोवर त्याची हानी नाहीच असं मानून मला माझं हित साधायची मुभा आहे हे आपलं नवं मूल्य आहे.
       असो.
       काही काही वाक्यं आपल्यावर पक्के व्रण करून जातात. ‘न्यूटन’ चा संवादही तसाच होता. कदाचित आपल्याला कोसत राहण्याचं इंद्रिय सतत जागं राहिलं तर अशी वाक्यं, अशा जाणीवा येत राहतील. पण एक असं लक्षात राहिलेलं वाक्य हेही आहे कि प्रत्येक माणूस केव्हा न केव्हा तरी स्वतःला फसवतोच, तेव्हाच तो सुखी होतो.

       हे लिहिणं तरी इगोच आहे खरंतर. माझ्या प्रामाणिकपणाची, नियत कर्तव्यांची, मी माझ्यासाठी योग्य-अयोग्य ह्याची जी रेषा ठरवली आहे तिला ओलांडायचं किंवा नाही अशी to be or not to be वेळ येईल तेव्हा मी नेमका काय ते मला कळू शकेल. ‘न्यूटन’ अशा रेषेवर गेलेल्या एका माणसाची गोष्ट आहे. नक्षलवादाची किंवा सरकारी व्यवस्थेची वगैरे ही गोष्ट नाही. मला काही गोष्टी पूर्ण करायच्याच आहेत, माझ्यासाठीच करायच्या आहेत  आणि मी त्या पूर्ण करेनच हा असामान्य चिवटपणा दाखवणाऱ्या एका साध्या माणसाची ही साधी गोष्ट आहे.            
'रारंगढांग' मधलं हे अजून एक वाक्य.  

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...