Showing posts with label बघ्या. Show all posts
Showing posts with label बघ्या. Show all posts

Sunday, February 26, 2017

हंडाभर चांदण्या


       मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता.
      
प्रतिमा: https://www.pahawemanache.com/review/handabhar-chandanya-marathi-experimental-drama-review
नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि प्रश्न ह्यांची गुंफण ‘हंडाभर चांदण्या’ ला उत्तम जमली आहे.
       नाटक बघताना मला जाणवलं की नाटकाच्या शेवटच्या थोडासा आधी नाटकाचा सर्वात वरचा, सर्वात तीव्र भिडणारा बिंदू येतो. तिथेच नाटक थांबवून प्रेक्षकाला भिरकावून देणं अधिक परिणामकारक झालं असतं असं माझं मत आहे. अर्थात नाटकाचा शेवट हाही फिटिंग एंड आहे, पण तीव्रतर बिंदू आणि शेवट ह्यांच्यामधला प्रवास हा एकदम भावनागच्च प्रकाराने होतो. थंड, निर्विकार स्टोरी-टेलिंगकडे मी बायस असल्याने कदाचित माझं असं मत असेल.
       कदाचित नाटक लिहिणाऱ्याने ज्या वस्तुस्थिती, ज्या निरीक्षणांवर नाटक लिहिलं त्यात असणारी अस्वस्थता, त्यात असणारी प्रश्न तडीस लागावा ही निकड ह्याचा विचार केला तर शेवट योग्यच आहे असं मला नंतर जाणवलं.
--
       ह्या वर्षी पाण्याचा प्रश्न बिकट नाहीये. होळीला पाणी जपून वापरा, क्रिकेट मैदानांवर पाणी वाया घालवू नका, पाण्याचे लोडशेडींग ह्या बातम्या आपण ह्या वर्षी वृत्तपत्रांत वाचणार नाही. ह्या साऱ्या बातम्या अडवून ठेवण्याचा पाणीसाठा महाराष्ट्रातील धरणांत ह्यावर्षी आहे, मराठवाड्यातही आहे. त्यामुळे ह्यावर्षी नुसतंच उकडणार आहे. आत्ता हे लिहितो आहे तेव्हा माझ्या माथ्यावर एक शक्तिहीन पंखा भिरभिरतो आहे. खिडकीतून येणारी हवा हळूहळू गरम होणार आहे. मोबाईलवर आजचे कमाल तापमान ३८.५ डिग्री सेल्सियस असं दिसतं आहे. महाभिकार, अंथरुणावर टेकलेली शरीराची पंख्याला दुरावलेली बाजू भिजवून टाकणारे चिकचिकीत दिवस आणि त्यात हे गरगर चालणारं गर्दीचं शहर.
       २०११ ची जनगणना सांगते कि २०११ साली महाराष्ट्रात २५.५ लाख ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरापासून १ किमीहून अधिक अंतरावरून प्यायचं पाणी आणायला लागत होतं. शहरी भागात ५.५ लाख कुटुंबांना ५०० मीटरहून अधिक अंतरावरून प्यायचं पाणी आणायला लागत होतं. ग्रामीण भागात ३२% कुटुंबांना तर शहरी भागात ८६% घरांना प्रक्रिया केलेले पाणी नळाने मिळत होते. ६ वर्षानंतर ह्यात किती बदल झालेला असेल? ह्यावर्षीचा मान्सून नीट झाला नाही तर पुढच्या वर्षी किती आक्रोश होईल?
--
       नाटकांत कवनंसदृश्य गाणं वापरणं हे ‘हंडाभर चांदण्या’ चं एक वैशिष्ट्य आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नेही गाण्यांचा उपयोग फर्मास केलेला होता.
       मी हे नाटक बघू शकलो कारण मराठी भाषा, नाट्यसंस्कृती वगैरे गोष्टीची जपणूक करण्यासाठी स्थापन झालेल्या एका संघटनेने अशी सुंदर, छान नाटके दाखवण्याचा उपक्रम हातात घेतलेला आहे. ते १०० रुपयांत नाटक दाखवणार असतील तर मी त्यांची सुरुवातीची आणि शेवटची ‘सुंदर, छान, भाषेची-नाटकांची जपणूक, शहरी अस्मितेवर फुंकर (....करांचे प्रेम फेम), हा आमचा प्रयत्न, (आणि कुख्यात असे) ह्या ठिकाणी’ असे शब्द असलेली कमाल १० मिनिटाची आत्मस्तुती ऐकण्यास तयार आहे. पण ‘हंडाभर चांदणे’ पाहून त्याला सुंदर, छान असे म्हणू शकणाऱ्या लोकांबाबत किंवा मग माझ्या नाटक समजण्याच्या क्षमतेबाबत माझा मनात जी आशंका आहे ती काय जाणार नाही.
--
       आपण नाटक कुठे बघतो ह्याचा नाही म्हटलं तरी एक छोटासा रोल असतोच. पृथ्वीला नाटक बघणं, एन.सी.पी.ए.ला experimental theatre ला नाटक बघणं, आणि अमुक महान मनुष्य नाट्यगृह अशा नाट्यगृहांत नाटक बघणं हे वेगवेगळं होऊन जातं. बसण्याची रचना, नाटक आणि आपल्यातलं अंतर हे घटक त्यांचं काम करत असतात. ह्या भौतिक घटकांच्याइतकाच महत्वाचा भाग असतो बघायला आलेले लोक.
       भारतातल्या, किंवा अलम दुनियेतल्याच म्हणा बहुतेक गोष्टी ह्या सोशल नेटवर्कने प्रभावित असतात. म्हणजे माझ्या सिनिकल दुनियेत तर सारं काही ‘मित्रोक्रसी’ वरच चालतं. नाटक बघायला कोण येतं ह्यातही अशा सोशल नेटवर्कचा भाग असतो. जनरली मी ज्या अमुक महापुरुष नाट्यगृहात नाटक बघतो तिथे व्यावसायिक नाटकांना जो क्राउड असतो त्यात अर्धे लोक बिन नातेवाईक लग्नांना जावं तसे दिसणारे असतात आणि बाकीचे मॉलमधले मध्यमवर्गीय दिसतात तसे असतात. ते नाटकातल्या प्रसंगांना काही फार दाद वगैरे देत नाहीत, पण खोचक उपजातीय/भाषिक/भंपक शहरी आयडेंटिटी जोक्सना मनमुराद हसतात. आठवड्याचे पाच-सहा दिवस उपजीविकेचे कुरण चर-चर चरल्यावर तोंड पुसायला टिश्यू पेपर घ्यावा तसे लोक शेवटच्या दिवसाला काही करतात. त्यातला एक हुच्च टिश्यू-पेपर म्हणजे व्यावसायिक नाटके बघणे.
       पण आठवड्याचे सारेच दिवस वीकेंड नसल्याने काही वेळेला ‘हंडाभर चांदण्या’ सारखा प्रकार येतो. मेन स्ट्रीम तिकिटांच्या १/३, १/२ दर. त्यात शहरात अनेक नाटकग्रुप, आयोजकांचे तगडे सोशल नेटवर्क. त्यामुळे नाटकाला दोन गट येतात, एक आपण अभिनय करतो, नाटकवाले आहोत ह्या कैफातील तरुण गट, आणि आपलं कोणीतरी आहे ह्या नाटकात म्हणून आलेले कबिले, ज्यांची वयाची रेंज १-८० वर्षे. काही नामचीन लोक आणि त्यांचे ऐकायला आतुर काही त्यांच्या आजूबाजूला. १०० रुपये तिकिटाचे नाटक असल्याने ४० रुपयाला २ समोसे विकणारा मात्र बंद.
       अर्ध्याहून अधिक प्रेक्षक हे नाटकाच्या मध्यात तुटल्यासारखे झालेले, वरकरणी विनोद, पण आतून सिनिकल, वेदनादायी कमेंट करणाऱ्या संवादांना खळखळून हसणारे लोक.
       अर्थात मला आजूबाजूला कोण नाटक बघतायेत हे फार वेळ जाणवलं नाहीच. समोरचं नाटक मला खेचून गेलं.
       अर्थात प्रेक्षकांचं तुटणं हे काही अमुक ठिकाणीच होतं असं नाही. पाच-एक वर्षापूर्वी मुंबईतल्या एका हुच्च ठिकाणी नसरुद्दिन शहाचे ‘वेटिंग फोर गोदो’ बघताना पब्लिक असंच गंडलं होतं. त्यात ‘नसरुद्दिन शाह है यार’ असं म्हणून आपण आणि सोबत आपण इम्प्रेस करू इच्छित असलेले पार्टनर घेऊन आलेले लोक तर ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ मध्ये गेलेले. आपण खर्च करीत असलेल्या एक-एक रुपयाबद्दल विचार करणारा आणि तेव्हा महिना १.५ लाख रुपये कमावणारा माझा एक मित्र, ज्या आमच्या मित्राने हा बेत मुळात केलेला, त्याला म्हटला, ‘this is last time I am watching something like this.’ इंग्लिश कविता लिहिणारा एक मित्र म्हटलेला, ‘I am trying to figure out what has happened’.
--
       डाऊनलोड करून पाहणं हा माझा सिनेमा पाहायचा फेवरीट मार्ग आहे कारण गरिबी. पण नाटकाला काय असं करू शकत नाही. पण मुंबईत इकडे-तिकडे जाऊन नाटकं बघणं झेपत नाही. त्यामुळे केव्हातरी आपल्या गावात काही वेगळं आलं कि आपण एवढा ताव मारतो.
मास्तर आणि संभा - नाटकातील एक प्रसंग प्रतिमा: https://www.pahawemanache.com/review/handabhar-chandanya-marathi-experimental-drama-review


       ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं नसेल आणि बघायची संधी आली तर ‘हंडाभर चांदण्या’ बघणं चुकवू नका असा खास बोधप्रद अभिप्राय मी सुंदर-छान आयोजक आणि त्यापरत्वे माझा स्वार्थ आणि फार नाव व्हायची संभाव्यता दिसत नसतानाही कसके काम करणारे मास्तर, संभा आणि बाकीचे कलाकार ह्यांना आठवून देतो.   

Tuesday, September 6, 2016

काही काल्पनिक मुलाखतीतील संपादित अंश

बघ्या: सर, हे वेगळं केलेलं निर्माल्य तुम्ही कुठे कंपोस्ट करता? सर : (विद्यार्थ्याने काढलेल्या फोटोत सस्मित होत) कसं आहे, समाजात पर्यावरणाची जाणीव रुजणं महत्वाचं आहे. आम्ही मागची अनेक वर्षे हे काम करीत आहोत. आज ह्या कृत्रिम तलावावर १०००० शाडूच्या मातीचे गणपती विसर्जनाला येतात. ६ वर्षामागे, जेव्हा मी प्रोफेसर म्हणून जॉईन झालो, तेव्हा ४००० गणपती येत, सारे पी.ओ.पी. चे. हा डोळस बदल आहे. ही श्रद्धेला दिलेली दिशा आहे. शेवटी गणपती विद्येची देवता आहे. बोला, विज्ञानमूर्ती मोरया बघ्या: असं, असं.. ---- बघ्या: सर, तुम्ही गणेशोत्सव ही लोकांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे असं म्हणता आहात. म्हणजे जरा स्पष्ट कराल का? तुम्ही गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल बोलताय का? सर: हे पहा, आपण लोकशाहीचे नागरिक आहोत. मी आहे. मी मोहरम मिरवणुकांना काही म्हणत नाही. मी ३१ डिसेंबरच्या जल्लोषाला काही म्हणत नाही. कारण शेवटी प्रत्येक माणसाचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग वेगळा आहे. आणि माणसांच्या ह्या वैविध्यानेच देश, समाज, मानवता संपन्न होत असते. बघ्या: सर, आपण सध्या कुठे असता? सर: अरे, 'जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि उत्सवप्रियता' ह्यावर एक प्रबंध वाचायला आलोय इथे हेलसिंकीला. ये कधी आलास पवईला तर. --- बघ्या: पर्यावरणवादी हे निव्वळ खुसपटवादी आहेत असं कसं म्हणता तुम्ही? नेते: छटपूजेला ह्यांना त्रास होत नाही चौपाटी घाण केल्याचा. गणपती तेवढा खुपतो. परंपरांची काटछाट आम्ही सहन करणार नाही. मांगल्य, श्रद्धा आहे आमची, तुम्ही ज्याला मातीची मूर्ती मानता. प्रश्न काढण्यापेक्षा उत्तर द्या अथवा गप्प बसा. लुडबुडू नका. बघ्या: आणि ध्वनी प्रदूषण हा चिमूटभर अति-शहाण्या लोकांचा भ्रम आहे असंही तुम्ही म्हणालात? नेते: पहाटेचे भोंगे ऐकू येत नाहीत तुम्हाला? ते डेसिबल कोण मोजतो? लक्षात घ्या, आमच्या श्रद्धेवर उठाल, तुम्हाला इथून उठवू. बघ्या हो, हो करत उठून सूममध्ये जातो. -- बघ्या: आचार्य, एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा 'बाई, जरा जपून दांडा धर' गाण्यावर काढली तर गैर होईल का? आचार्य: पाखंडी होऊन प्रश्न विचारणं सोपं आहे. धर्माचे स्वरूप सूक्ष्म आहे. लोकांच्या वरकरणी विसंगत वाटणाऱ्या वर्तनात इतिहासाची खोल परंपरा आहे. ह्या भूमीत झालेल्या तपस्वी-योग्यांनी लोकांना धर्माचे सूक्ष्म स्वरूप समजणार नाही म्हणून परंपरा निर्माण करून दिल्या आहेत. त्यात कालौघात त्रुटीआल्या तरी त्यात युगानुकूल बदल घडवणारे दार्शनिक इथे जन्माला येतातच. गुणधर्म आहे तो ह्या मातीचा. आमच्या हरद्वारच्या आश्रमात जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक हा धर्म समजून घ्यायला येतायेत. कधी तुम्हीही या.. बघ्या: आ, हा.

Thursday, March 24, 2016

बघ्या, होळी आणि आवाहनांना आलेले रंग

        बघ्याचा एक मित्र बघ्याला सांगत होता, अरे, अनेक पंचांगकर्त्यांनी येऊन लोकांना आवाहन केलं आहे की प्रतीकात्मक होळी खेळा. केवळ टीळा लावा वगैरे. पुढे बघ्याच्या मित्राला आत्यंतिक धार्मिक आनंद झालेला की बघ आपला धर्म कसा युगानुकूल आहे वगैरे. बघ्याने आपल्या मित्राकडे नीट बघितलं आणि तो एकूणातच आपल्यापेक्षा च्युत्या आहे हे ठरवलं. मग तो दार्शनिक वगैरे अविर्भाव आणून म्हणाला की अरे युगानुकूल वगैरे नाही, तर केवळ ह्यावर्षी पाण्याची टंचाई असल्याने पैसे वाचवण्याचा हा गतानुगतिक मध्यममार्ग आहे. ह्यावर्षी मान्सून नीट होतो तर पुढच्यावर्षी छान सार्वजनिक होळी खेळली जाईल.
       बघ्याने आपल्या मित्राकडे बघितलं तेव्हा त्यांच्यात एवढंतरी होतं का, चमत्कारावर लिहिलेला अग्रलेख गायब होण्याचा चमत्कार असे सगळे प्रश्न आपल्या मित्राच्या जिभेवर ओथंबलेले पाहून बघ्याने पळ काढला. आणि पळता पळता कुठल्याही सार्वजनिक चर्चेत आपले मत न नोंदवण्याचे मत अधिक ठाम केले.
       पळत पळत आपल्या उपजीविकेच्या दैवताच्या नित्य नियमाच्या पाट्या किंवा प्रदक्षिणा उरकून बघ्या आपल्या बिळाकडे आला. तर तिथे लोकांचे घोळके २-३-४ च्या पुंजक्यात उभे असून चेहऱ्यावर हसणे येणार नाही ह्याची दक्षता घेऊन अनुक्रमे मृत माणूस आणि त्याचे कुटुंबीय, मग वाढती उष्णता, मग नोकरी, मग आप्तेष्ट, मग खरेदी-गुंतवणूक अशा विषयांवर चर्चा करीत उभे होते. बघ्यानेही चेहऱ्यावर सचिंत भाव आणत नेमके कोण मेले ह्याची माहिती घेतली आणि मग समाजहितार्थ तो ही माहिती पसरवू लागला. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या एका पुंजक्याकडून त्याने मृत इसमाच्या मरणाबद्दल तपशील मिळवले.
       त्यानंतर तेथील अन्य सह-शोक प्रदर्शकांसोबत शिळोपा करण्यापेक्षा अंत्यविधीसाठी प्रेत आणि अन्य घटक तयार करणे ह्या कामाला बघ्या लागला. एकूणातच आय.टी., फायनान्स, ह्युमन रिसोर्स अशा स्कीलमध्ये पारंगत लोक धार्मिक रूढीने प्रेत जाळणे ह्या स्कीलकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि त्यामुळे बघ्यासारखे लोक अत्यंत फायद्याचे ठरतात, जे पोटतीडीकीने प्रेताची शेवटची गरज, जसे जाळून घेण्यासाठी तयार होणे ह्यावर काम करीत रहातात. हजारो वर्षाच्या धर्मामुळे प्रेताला जाळणे ही क्रियाही सोपी राहिलेली नाही. पीठ, मीठ, दगड, ब्लेड, बांबू, काथ्या, मडके, काही किलो लाकडे आणि ती इकडून तिकडे पोहचवणे, मृत व्यक्ती मृत आहे ह्याची विविध जिवंत प्रमाणपत्रे, पंचे, फुले-हार, चंदन, बुक्का, अबीर आणि हे सर्व दबत्या कुजबुजत प्रकारात करणे ह्या आणि अशा अनेकविध गोष्टींचा अंतर्भाव ह्या सगळ्यात आहे. बघ्याच्या मनात हे सगळे शाब्दिक प्रवाह उमटून असताना वरकरणी त्याने घट्टपणे दोरीने प्रेत तिरडीला बांधले. त्यांनतर नातेसंबंधांच्या उतरंडीप्रमाणे लोक खांदे देऊ लागले तसा आपले कपडे झटकत झटकत बघ्या बाजूला झाला.
       बघ्याच्या बाजूला त्याच्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि गुरखा होते. सेक्रेटरी गुरख्याला उद्या पाणी कसे सोडणार हे समजावून सांगत होता. त्यावर गुराख्याने ह्यावर्षी टँकर नाही का असे विचारताच एकदम ब्लास्फेमीचे भाव आणून बघ्याकडे आणि मग सात्विक संतापाने गुराख्याकडे बघत सेक्रेटरीने टाकीचा कॉमन नळही बंद ठेवण्याची सूचना केली. बच्चोंको खेलने दो और डी.जे. भी उस साईड बजाव असं ठरवून सेक्रेटरी आणि बघ्या अंत्ययात्रेत मार्गस्थ झाले.
--
       बघ्याला ह्या नॅचुरल एक्सपिरिमेंटसाठी उत्सुक होऊन राहिला होता. आज ही एक व्यक्ती मेली आहे. ह्या व्यक्तीची इच्छा, जी बघ्याने मृत इसमाकडूनच ऐकली होती ती म्हणजे त्याच्या मुलाचे लग्न ती बाकी आहे. त्यात मरणाअगोदर फसक्या शस्त्रक्रियेवर आणि रुग्णालयात राहणे नि तपासणी अशावर ३ एक लाख रुपये उडालेले आहेत. पाठी एक काल तुळतुळीत गोटा केलेला मुलगा, जो बाकीवेळ अन्य गोटा केलेले लोक आणि पितर किंवा देव ह्यांच्यामध्ये एजंट म्हणून काम पाहतो, एक ३५० स्क्वेअरफीट ब्लॉक, एक अर्धांगवायूने त्रस्त बायको, एक अद्याप अपग्रेड न झालेला टी.व्ही. ज्यावर मृत इसम बातम्या आणि सिरीयल बघत असे, आणि थोडे पेन्शन, आणि अन्य घटक ज् बघ्याच्या सिनिकल फिटमध्ये सापडलेले नाहीत असे शिल्लक आहे. पण आजूबाजूच्या लोकांना काय आहे?
       आजूबाजूचे लोक जसे एक कुटुंब जे मियां, बीबी आणि एक मुलगा आहे, अजून एक कुटुंब जे थोडे गरीब मियां-बीबी आणि एक मुलगी आणि मुलगा आहेत, अजून एक कुटुंब जे एक आजी-आजोबा, आणि दोन जोडपी मुलगा-सून आणि प्रत्येकी एक अपत्य असे आहेत. आणि वरील वर्गीकरणात मोडणारी बाकी कुटुंबे आणि बघ्या. म्हणजे एकूणात भारत हा तरुणांचा देश असल्याने, आणि ह्या तरुण-तरुणींचे एकमेकांशी विवाह होऊन अनेकानेक अपत्ये निर्माण झाल्याने अपत्यांचाही देश आहे. आणि त्यात परत अनेक तरुण-तरुणी त्यांचेच आई—बाप अजून तेजतर्रार असल्याने काहीच पर्याय नसल्याने मजा करीत आहेत पण त्याचवेळी ते पालक बनून गेल्याने त्यांना आता संस्कार वगैरे पण करावयाचे आहेत.
       म्हणजे हे सगळे संस्कारोत्सुक आई-बाप आपल्या मुलांना उद्या सहज सांगू शकतात की ह्यावेळी होळी नाही कारण
-    आपल्या शेजारील मृत इसम आणि त्याच्या घराचे अद्याप ताजे फडफडते दुःख
-    आपल्या जवळील धरणांत नसलेले पाणी, जे पर्यायाने सोसायटीच्या टाक्यांत कमी येत आहे. (पण तू घाबरू नकोस, आपण सिंटेक्स लावली आहे. – दमलेला बाबा आणि आईही)
-    दुष्काळात होरपळणारे शेतकरी (जसे भेगा पडलेल्या जमिनींचे फोटो, असे नाना आवाहन करणारे कलाकार वगैरे)
-    काश्मीरप्रश्न आणि .....
(वरील कारणे एखाद्या क्रमाने दिसल्यास तो योगायोग समजावा!)
त्याचवेळी हे सगळं न सांगण्याचीही सबळ कारणे आहेत.
-    हे सांगण्यासाठी आपल्याला काही माहित/वाटत असणे हेच होत नसणे.
-    सोसायटीमधील इतर व्यक्तींना रंग लावण्याचा पूर्ण बिनडोक आनंद
-    लहान मुलांना मुलांशी, वयात येणाऱ्या मुला-मुलींना अन्य वयात येणाऱ्या मुली-मुलांशी, तरुण-तरुणींना तशा अन्य तरुण तरुणींशी रंग बरसे करण्याचा मौका मौका
-    रस्त्यावर घोळक्यात फिरणे, एखाद्याच्या घरी टोळधाड करणे, भांग आदी नशा करून तर्र आनंद अनुभवणे अशी पाशवी सुखे मिळवणे
-    माझी उपजीविका, माझे कुटुंब, माझे पैसे, माझे सुख वगैरे वगैरे कर्तुत्ववान असणे.
होळीच्या दिवशी बघ्या सकाळी बाहेर पडतो तो त्याला मुलांचे आनंदी चीत्कार ऐकू येऊ लागतात. त्यांनतर तळ-मजल्याचासारा भाग रंगीत झालेला दिसू लागतो. पुढे मुलांचे-मुलींचे टोळके सोसायटीत ज्याला त्याला रंगवत असते. मागच्या वर्षी ह्या प्रचारकी टोळक्याकडे असलेल्या बादल्या आणि पिशव्या ह्यावर्षी नसतात. ती मुले बघ्यालाही आपल्या घोळात घेतात आणि त्याचा चेहरा रंगवून टाकतात.
पुढे सोसायटीमध्ये डी.जे. चालू झालेला असून तिथे शांताबाई वगैरे तत्कालीन सांस्कृतिक गाणी सुरु आहेत. त्यात मुळातच रंगात दंग झालेले ५-६ बापे नाचत असून बाकी लोक हळूहळू आपण आणि आपण ज्यांच्यावर नजर ठेवून आहोत असे बाकी कोणी हे सगळेच नाचू अशा आशावादाने आजूबाजूला रंगून घेत उभे आहेत. बघ्या सोसायटीमधून बाहेर पडताना फलकावर पाहतो – आपल्या सोसायटीतील जुने रहिवासी...
--
       रस्त्यावर लोकांचे रंगीन जथ्थे चालत होते. कोपऱ्या-कोपऱ्यांवर लोक सेल्फी काढत होते. त्यात एकाने बघ्याला ओळखले आणि त्याला रंगवायला सुरुवात केली.
       ते झाल्यावर बघ्याने पाहिलं तर ह्याच इसमाच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर काल पाणी वाचवायचा संदेश फिरत होता.
       त्या संदेशाप्रमाणे हा इसम आणि त्याचे साथी हे ड्राय होळी खेळत होते.
       त्यांचा अंगा-कपड्यांचा रंग, त्यांनी रंगवलेली वाहने आणि कंपाऊड हे सगळे थेट पावसाळ्यात धुतले जाणार आहे. आजची होळी ही ड्राय होळी.
       बघ्या बघत निघाला तो त्याला सगळीकडे असेच सांस्कृतिक वातावरण पसरलेले दिसले. म्हणजे-
-    लोक पंचांग वाचत नसावेत.
-    लोकांना होळीची गंमत हवी आहे, म्हणजे हवी आहे.
-    पाणी नसल्याने लोक ड्राय होळी खेळत आहेत. म्हणजेच त्यांना समज आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी पाणी असेल तर लोक पाणी, चिखल, फुगे अशा सगळ्याने होळी खेळातील. रेन डान्स करतील. म्हणजेच पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्हज. आहा, शाश्वत सत्य!!   
म्हणजे आपण लोकांबद्दल काय म्हणू शकतो?
बघ्या काहीच म्हटला नाही. तो स्वतःलाच म्हणाला, च्युत्या!!
बघ्याला आठवलं की मध्ये एके ठिकाणी त्याने एक बोर्ड वाचलेला की अमुक एका स्त्रीला स्थानिक महिला मंडळातर्फे आयोजित खेळांमध्ये पहिले बक्षीस. त्या नावाने बघ्याला आठवलं की ह्या महिलेची मुलगी वयाच्या २८व्या वर्षी डेंग्यूने मेली, सुमारे वर्षभरापूर्वी. ह्या बाई खेळायला लागल्या.
   ही त्यांची जगण्याची जिद्द की काळापरिणीत अपरिहार्य निब्बरपणा?
   तसे हे रंग खेळणारे लोक. आपल्या शेजाऱ्यांचे दुःख आपले नाही, असे असेल. पण मग कोणाचे दुःख आपले आहे? आणि कोणाला खरेच दुःख आहे? ज्याचा बाप गेला तोही परवा-तेरवा आपापले सुख पाहिलच.
   मग हे संस्कार काय आहेत, जर आपण त्यात संवेदनशीलता शिकवत नाही?
   आपल्याला पडलेल्या प्रश्नाच्या नैतिक टोनने बघ्या एकदम गडबडून जातो.
--
       एकदम आलेल्या नैतिक पावित्र्याला शह द्यावा म्हणून बघ्या एक निकोटीन कांडी शिलागवतो आणि पुढे होणाऱ्या लंग कॅन्सरची नेमकी प्रोबॅबिलिटी काढत हळूहळू हलका होऊ लागतो.
       त्याच्या काही सोशल मिडिया फ्रेंडनी सगळ्या आवाहनाला डीच मारून लोकांनी केलेल्या सणाने त्रस्त कमेंट्स टाकल्या आहेत. बाकीचे सामाजिक बदलकर्ते लॉंग विकेंड पकडून बाहेर गेले आहेत. आपापल्या लोकेशन्सचे फोटो ते टाकत आहेत.
       होळी खेळलेले आपापले सेल्फी टाकत आहेत.
       बघ्या समोर हुल्लड करणाऱ्या जथ्यांकडे बघत सावकाश धूर बाहेर सोडत राहतो.
       त्याला जाणवतं की ह्याच मुलांत उद्याचे पालक, उद्याचे फेसबुक युजर्स, उद्याचे सोसायटी सेक्रेटरी, उद्याचे स्थानिक नगरसेवक, उद्याचे एन.आर.इन्व्हेस्टर्स, उद्याचे गुंड, उद्याचे च्युत्ये, उद्याचे शेती-जवान-देश-संस्कृती कैवारी, उद्याचे भांग पिणारे, उद्याचे पाणी वाचवणारे, उद्याचे मरणारे, उद्याचे खांदा देणारे, उद्याचे पितर, उद्याची भुते आणि उद्याचे बघे..
       बघ्या थोटूक चिरडतो, नेमस्तपणे उचलून कचऱ्यात टाकतो.
       लोक होळी खेळत राहतात.       

            

Thursday, February 11, 2016

स्मार्ट सिटी आणि च्युत्या बघ्या

बघ्या सकाळी आपल्या झोपेच्या आणि भयंकर दृकश्राव्य स्वप्नांच्या झांगड्गुत्त्यात असताना बेल वाजली. तसं आपल्या चड्डी-बनियानमध्ये बघ्याने किलकिलं दार उघडलं. तेव्हा वॉचमन म्हटला, आज पानी नही.
       बोचा.
       काल सकाळी वॉचमन असेच शब्द बोलला होता. थोडे आशावादी, २ घंटा पानी आयेगा असे.
       बघ्याने तपासणी केली तर पाण्याची अर्धी बाटली, एक टमरेल आणि १ पिंप. ह्यात दात घासायचे, हगायचं, कॉफीचं भांडं धुवून मग धुवून कॉफी करायची, अंघोळ करायची. बघ्याने सुरू होताच गांड लागलेला दिवस अशी काल्पनिक फुली मारून अशा अनेक दिवसांच्या सुकलेल्या चळतीत हाही दिवस टाकला. मग उपजिविकेस जाण्याच्या क्रिया उरकून अपरिहार्य ताजातवाना होत धुरके आणि थेंबभर विरका हिवाळा ह्यातून तो रस्त्याला लागला.
       रस्त्याच्या कोपऱ्याला रिक्षा दाटल्या होत्या. त्यांचा स्टँड सोडून त्यांनी इकडे दाटी का केली ह्याचं कारण एकदम वाजू लागलं. भक्तीपर गीतांच्या आवाजाने बघ्याच तोंड वळलं तिकडे भंडाऱ्याचा मांडव पडलेला होता. बाया-बापड्या पाया पडायला येत होत्या. रस्त्याच्या समोरच्या बाजूला हार-फुले विकायला आलेल्या कुटुंबांनी बस्तान मांडलं होतं. बाया-पोरी फटाफट हार बनवत होत्या. बापे बिडी पीत मांडणी करत होते. काही पोरं आईला लुचत होती, बाकीची झोपली होती. लोकही जमेल तसे विविध भावमुद्रा आणि योगमुद्रा, जसे छातीला उजवा हात टेकवून मान तुकवणे, उजव्या हाताचे बोट दोनदा तोंडासमोर हलवणे आणि मग छातीला लावणे, काही क्लासिक नमस्कार, काही सुपर चपला काढून देवळाच्या बाहेरून नमस्कार असे आपापल्या श्रद्धेची नोंद करत होते. नावाला जागून बघ्याने हे पाहून घेतलं. मग नुकत्याच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत टपरी हरवलेल्या आणि त्यामुळे सरतेशेवटी एकदम रस्त्यावर आलेल्या चहावाल्याकडे चहा पीत तो समोरील मंदिराकडे पाहू लागला.
       एक भव्य कमान, त्यावर एक पूर्ण पुरुष, बाकी शुभेच्छुक मुंडकी. जवळ कार्यक्रम पत्रिका. त्यात संध्याकाळी याग. आणि बाजूला भंडारा.
       म्हणजे संध्याकाळी ह्या चौकात ट्राफिकचा राडा अशीही नोंद बघ्याने केली. तेवढयात भडजी लोकांचा जथ्थ्या तिथे आला. आपापल्या दुचाक्या पार्क करून, तिथेच पुढे मांडवाच्या कडेला, आपापल्या पिशव्या घेत ते मांडवात प्रवेश करते झाले.
       आपल्यालाही असंच लोकल काम असतं तर कित्ती मज्जा असं दैनंदिन हळहळत बघ्या रस्त्याला लागला.
       पुढे रिकामी भांडी, बादल्या, बुधले, पिंप असं घेऊन बाया, बुढया, घरात उरलेली पोरं असे सगळे लाईन लावून उभे होते. मागच्या दुकानांचे रखवालदार त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत होते.
       वाट पाहणं आणि आणि मग लाईन लावून त्या वाट पाहण्याची मेरिटोक्रसी बनवणं हे ह्या शहरात कायम घडतं. मग कोणीतरी स्मार्ट येतं, रांगेच्या बाजूने. रांगवाले आपल्या च्युत्येपणाची उघड-वाघड सिद्धता बघत राहतात. आपल्या ह्या मूलभूत स्टेटस अपडेटवर बघ्याला बरं वाटू लागलं. 
       पुढे फ्लेक्स होता. स्मार्ट सिटीबद्दल निबंध आणि लोगो स्पर्धा.
--
       लोकल ट्रेनमध्ये हातातले पुस्तक, बाकीच्यांच्या मोबाईलवरील पिक्चर आणि चर्चेचे उष्टे तुकडे ह्या सगळ्यांत बघ्या यथेच्छ डुंबत होता. जमेल तश्या पुढच्या मागच्याला ढुश्या देत होता. आणि आपली अच्छी सीट कधी येणार ह्याकडे काटेकोर लक्ष ठेवून होता.
       बायका आणि सेक्स ह्यांबद्दलचे नियमित जोक झाल्यावर कोणीतरी म्हटलं, आमच्याकडे पाण्याची बोंब आज.
       द्या अजून कमळाला मतं.
       आता पाऊस काय कमळ पाडतं का? काय बोलता..
       मग तू टॉवेल आणि चड्डी घेऊन ऑफिसमध्ये अंघोळ करणार का? हागतो तर रोज तिथेच. ह्यावर न राहवून बघ्यापण हसला.
       नाही रे. पण अजून चार महिने जायचे आहेत. कसं होणार?
       स्टोअर करा. मी दुसरी टाकी लावली आहे घरात.
       अरे पण धरणात पाणी नको का? तू टाकी लावून काय फायदा?
       त्यात एक अनेक वर्षाचे अनुभवी सरकारी नोकर, घरी चार एसी आणि १६००० महिना इलेक्ट्रीसिटी बिल असलेले म्हटले, अहो पाणी आहे. आणि तुम्ही सोसायटीवाले मिळून सगळे नगरसेवकाला घ्या कोपऱ्यात. देईल तो टँकर. निवडणुका होत्या म्हणून आधी भरपूर पाणी दिलं. आता टँकर देईल.
       पुढे एकदम स्टेशन आलं. परत गर्दी हिंदकळली. परत थोडे सेक्सचे, थोडे दारूचे, थोडे आज न आलेल्या माणसांचे जोक्स झाले. मग परत लोक आपापल्या मोबाईलमध्ये बुडून गेले.
       बघ्या विचार करत राहिला, धरणात नेमकं पाणी किती शिल्लक आहे? आणि हा मान्सूनपण वाईट गेला तर? म्हणजे एल निनो तर उष्ण आहे, प्रेडिक्शन आहे तसं भयंकर उन्हाळा आणि...
       बघ्या कासावीस झाला. च्युत्या..
--
       बाकी ऑफिसात ए सी होता. बघ्याचे प्रश्न निवले. त्याचा बॉस म्हटला की अरे स्मार्ट सिटीच्या फंक्शनमध्ये एक सेमिनार आहे मुंबईवर. तुझ्याकडे आहेत का काही पॉइंट्स.
       बॉस साला जुहू मध्ये राहतो. बॉस मुळातच स्मार्ट आहे.
       ह्या टॉवरमधले लोक स्मार्ट आहेत. क्रेडिटकार्डधारी फॉर्मल. एम.बी.ए. आणि तद्भव किंवा तत्सम अशा डिग्र्यानी परिपूर्ण. ह्यांनाच ह्या शहरात रहायचा हक्क आहे. ह्यांनाच पाणी मिळायला हवे. चोवीस तास. स्वीमिंग पूल. डीस्ट्रेस व्हायला शॉवर.
       माझ्याकडे पॉइंट आहे बॉस. प्राईज रॅशनलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा. वापरेल तो पैसे देईल आणि पैसे देईल तो वापरेल.
       बॉस सखुश हसला. बघ्या म्हटला मनात, पगार वाढतो तर काय घेऊ?
       मग बाकी दिवस गेला सैल सैल. बाया-पोरी, त्यांच्याकडे बघणारे बापे, झुंडीने सिगरेट पिणारे पुरुष आणि थोडक्या बाया, इडली-सांबार किंवा हाफ मिल.
--
       मग परतीच्या वाटेवर, दिवसाचे थोडे तास उरले ते तरी आपले आपले जगू ह्या शीळपट उत्साहाने बघ्या नेमकी लोकल बघून त्यात दमदार चढाई करून टेचाने बसला. मग त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं. तसे परत सगळे मोबाईलला जुगलेले किंवा माना पाडून झोपी गेलेले.
आपल्या सराईत मिडीऑकर होण्याचं बघ्याला एकदम भडभडून आलं.
बघ्याने आपलं अपरिहार्य वाढत गेलेलं वय परत एकदा खुंट्याला लावलं. वापरायच्या आधीच कापायची घाई केलेल्या साऱ्या दोरांना श्रद्धांजली वाहिली. मग त्याने हेडफोन काढले. बर्फ पडणाऱ्या, भला मोठा एच.डी.आय. असलेल्या देशातला मानवी नातेसंबंधांचे तरल वगैरे पेच दाखवणारा एक मूव्ही सिलेक्ट केला. आणि प्रतिमांच्या भिरभिर नशेवर, डौलदार बिल्डिंग आणि मोकळ्या रस्त्यांच्या आयुष्यांना सहा इंची स्क्रीनवर पहात पहात तो आपल्या बिळाकडे निघाला.
--
       चौकात यागाचा धूर झालेला. बाया हार विकायला बसलेल्या, पोरं परत लुचलेली किंवा झोपलेली, बापे बिड्या पीत मागे निर्विकार.
       तेवढयात एका वाहनाने स्मार्ट पद्धतीने वाहन वळवलं. त्याची बायको उतरली. तिने हार घेतले. मग दोघेही गाडीतून उतरून यागाच्या रांगेत उभे राहिले.
       एक आजोबा हळहळले, राँग साईड, पार्किंग काही नाही असं. मग त्यानंतर टाकायचा तो नेमस्त सुस्कारा टाकून त्यांनी हातातला पुडका हार विकणाऱ्या बायांना दिला. चॅरिटीच्या हलक्या आनंदाने त्यांनी देवाला हात जोडले.
       हार विकणाऱ्या बाईच्या पोऱ्याने बिस्किटं खायला सुरुवात केली.
       रांगेतले स्मार्ट जोडपे दर्शनाच्या चरम सीमेला पोचले. कळकट शर्ट आणि अदृश्य चड्डी घातलेल्या अधाशी पोराच्या आईने बनवलेले हार त्यांनी पुजाऱ्याला दिले. मग ते क्षण-दोन क्षण हात जोडून उभे राहिले.
--
       बघ्याला वॉचमन दिसला आणि त्याच्या पोटात गोळा आला. एकदा गांड आणि एकदा तोंड धुता येईल एवढंच पाणी बाकी आहे.
       ‘साब, पानी छोडा था दो घंटा पहिले. आप थे नही.’
       आता उद्या सकाळची वाट पाहणं आलं.
       बघ्याने बिसलेरीच्या दोन बाटल्या विकत घेतल्या. स्मॉल टॉक करताना दुकानदार त्याला राजस्थान किती भयंकर हे सांगू लागला.
       आपल्या काडेपेटीकडे बघ्या जात असताना नेबरने बघ्याला छान स्माईल दिलं. आणि मगासचच वॉचमनने सांगितलेलं मर्फी लॉचं सत्यही.
       बघ्याला दुहेरी वाईट वाटलं, आपल्याकडे पाणी नाही आणि शेजारच्याकडे आहे.
       आपले डेली एक्झिस्टेन्शिअल ओझे आणि सोबत दूध, ब्रेड, अंडी, केक घेऊन बघ्या घरी परतला. बिळात आल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याने झपाट्याने नळ फिरवले. त्यातून थोडे थेंब पडले.
       उद्या, पुढचे चार महिने, राज्यातला दुष्काळ, एल निनो, मान्सून, हांडे, पिंपे घेऊन वाट पाहणारे लोक हे सगळं पाहून बघ्याला एकच वाटलं, जे नेहमीच वाटतं. च्युत्ये आहोत आपण.
       ह्या प्रश्नांना बगल देऊन निघून जा आणि निखळ वैचारिक सहानुभूतीदार व्हा. किंवा सारं काही विकत घेण्याचे पॅकेज मिळवा. स्टोअर करा. स्टोअर करा.

       आपल्याला होणाऱ्या सत्याच्या विलक्षण पण सवयींच्या साक्षात्कारात बघ्या झोपून जाईल. उद्या नळातून सवयीच्या घूरघुरीची पाण्याची धार येईल आणि त्यात सारे साक्षात्कार वाहून सराईत मिडीऑक्रीटी तेवढी तवंग बनून राहील.                      

Saturday, June 7, 2014

तीन मरणांच्या बातम्या

      बघ्या सकाळी उठतो. उठल्या उठल्या तो घड्याळ बघतो. बघ्याला असं उगाच एक वाटतं की समजा आपण एका ठराविक वेळेच्या आधी उठू शकलो तर आपण वेळेची जी निर्दय गती आहे तिला फसवून दिवसभर हवं ते करत राहू शकतो. पण समजा आपण अशा कुठल्या एका वेळेच्या नंतर उठलो तर गेला आपला दिवस. बघ्याची दिवस असतात कुठे आणि जातात कुठे असे प्रश्न त्याने फार वर येणार नाहीत ह्याची काळजी घेतलेली आहे. बहुतेकवेळा घड्याळ बघितल्या बघितल्या जगाच्या गर्दीभरल्या चक्राचा एक एक आरा आपल्यापासून निसटून चालला आहे आणि आपण आता दिवसभर त्यांच्यापाठी कसेबसे धावत असणार आहोत अशी जाणीवेची खप्पड थोबाडीत बघ्याला बसते. आजही बसली. त्या अदृश्य फटक्याचा मार जिरवत जिरवत बघ्या जागे व्हायच्या लहानपणापासून शिकवलेल्या एक एक प्रक्रिया पर पाडत जाऊ लागला. त्या उरकून खुर्चीत कॉफी पीत बसत बातम्यांच्या वर्षावात भिजायला आतुर बघ्याला मोबाईल वर मित्रांनी फार काही मेसेजेस टाकले आहेत असं दिसलं. आणि तिथे बघ्याला पहिली मरणाची बातमी मिळाली.
       ह्या बातमीत मेलेल्या मनुष्याचा बघ्याच्या अमुक एक प्रकारच्या जातीय, अमुक एक प्रकारच्या विचारसरणीय, आणि अमुक एक प्रकारचे लोक आसपास असण्याच्या प्रकाराशी बादरायण संबंध आहे. असं आहे की काही एक दैवी योगांचा भाग किंवा लहान मुलांची अत्यंत सजग अनुसरणक्षमता ह्यामुळे आपल्या अख्खी सकाळ खुर्चीवर बसून पेपरवाचन करणाऱ्या आजोबांना बघून बघ्याही लवकरच बातम्या वाचण्यास शिकला. आणि पुढचा दैवी योग म्हणजे बघ्याचे हे स्वाभाविक सहजशिक्षण घडत असताना देशात एक इमारत पाडली जात होती. बघ्याची आजोबा ह्या इमारत पाडण्याच्या प्रकाराचे खुर्चीवर असलेले प्रखर समर्थक होते. बघ्याच्या आजूबाजूच्या कुटुंबातही अशा कार्याबद्दलची कदर होती. आपण (गांडू असल्याने, अर्थात बघ्याला हे पुढे जाऊन कळले) अशा पाडापाडीत्मक विधायक कार्यात जाऊ शकलो नाही, पण आपण अशा कार्याच्या आदराचा फैलाव तर करू अशा भावनेने एक व्हिडीओ सुद्धा बघ्याच्या शेजार-पाजारच्या कुटुंबांनी मिळून बघितला. बघ्या काहीतरी खात खात मध्येच झोपून गेला, पण त्याच्या लक्षात राहिले ते मोठया फळ्यासदृश्य ढाली घेतलेले सैनिक, त्यांच्या लाठ्या आणि घोषणा देत त्यांच्या कडे येणारे लोक आणि सैनिक काठ्या चालवू लागले की पळापळ करणारे लोक.
       तिसरा दैवी योग म्हणजे बघ्याची आजोबा हे ज्वलंत स्वरूपाची वृत्तपत्रे वाचत. आणि त्यानंतर त्या वृत्तपत्रांची आजूबाजूच्या घरांशी अदलाबदली करताना कसले जबरी लिखाण आहे किंवा कसे मारले भोसडीच्याना अशा प्रतिक्रियाही दिल्या जात. बघ्या एकदा घरात ‘भोसडीच्या’ असे म्हटल्यावर त्यास संस्कारक्षम मार मिळाल्याने त्याने असे शब्दप्रयोग केवळ शाळेत करायचे असतात हे समजून घेतले.
       तर अशा ह्या बालपणीच्या सुखावह काळात, जिथे बाकी मुले नव्याने लागू लागलेले केबल चॅनेल, डब्ल्यू.डब्ल्यू.एफच्या कुस्त्या, हिंदी सिनेमातील गाण्यातून शारीरिक शिक्षण अशी बोधप्रद गाणी अशा गोष्टीत व्यस्त असताना बघ्याला हे समजले होते की हा देश आपला आहे आणि काही लोक इथे परके आहेत. ज्वलंत लिखाण करणारे हे बरोबर आहेत आणि ते ज्यांना शिव्या देतात ते चूक आहेत. परदेशातून येणारा एक प्रकल्प समुद्रात बुडवायचा आहे. दुबईतील एक गुंड हा विमानाने आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत फिरतो. आणि एक माणूस आहे जो सहजी हा प्रकल्प समुद्रात बुडवू शकतो आणि त्या गुंडाला पकडून आणू शकतो.
       बघ्याला अशा माणसाबद्दल तेव्हा नवल वाटत असे, आणि त्याने बरोबर मार्गावर असलेल्या ज्वलंत लोकांबरोबर युती केली आहे ह्याचेही बघ्याला नैतिक समाधान असे.
       त्या बालपणानंतर पुढे बघ्या हा शाळेतील मुली, शाळेतील स्पर्धक आणि संध्याकाळचे क्रिकेट ह्यांत जास्त रमू लागला. त्याने भारतीय क्रिकेट टीम आणि सैनिक ह्यांवर देशभक्ती सोपवून दिली. त्याच्या वयाला झेपणारी आणि तापणारी अशी सारी पुस्तके त्याने वाचली. त्यात ह्या माणसाबद्दल फार काही वाटायचे राहून गेले.
       खरे आत्ताही त्याला असे काही वाटायची गरज नाही. एकाद्या माणसाबद्दल भले-बुरे काही वाटलेच पाहिजे अशा कुठल्या भाबड्या नैतिक कवचात बघ्या नाही. बघ्याला खरे ह्या एका मृत्यूच्या घटनेचे काही वाटतही नाही. त्याला गंमत वाटते आहे ती त्या मरणावर उठणाऱ्या सार्वजनिक हुंदक्यांची आणि ज्यांचे हुंदके झाले त्यांच्या अन्य उमटण्याची. बघ्याला आठवतं की सार्वजनिक नैतिकतेच्या डूज अँड डोन्टस् मध्ये ‘मरणान्ति वैराणी’ असं पण असतं. मरेपर्यंत चालवावं असं वैर बघ्याचं अद्याप कोणाशी नाही आणि जर ‘मेरे झिंदगी का एक्के मक्सद है, बदला’ असं झालं आणि त्यात कोणी एक मेला तर पुढे काय नेमकं व्हावं ह्याचं मेमेल्याला काय पडलं असेल असं बघ्याला वाटतं. पण बातम्यांची वेबसाइट, त्याच्या सोशल मिडीयाच्या भिंती ओल्या होतात, ज्यांच्या जास्त ओल्या झाल्यात ते कारस्थान-कारस्थान असं ओरडू लागतात, आणि ज्यांना असं ओरडायचं नाही ते कोण नाही रडलं बरं, चला घेऊ त्याची असं करू लागतात. ज्यांना एवढं सकळिक काम करायचं नसतं ते रिपरिप करू लागतात. बघ्या बघबघ करू लागतो.
       मध्ये एकदा, म्हणजे नाश्त्याची प्लेट घेऊन जे चाललंय त्यावर सावकाश रवंथ करताना बघ्या असा विचार करतो ‘मरणान्ति वैराणी किया मरणान्ति अतिशयोक्तिनि?’ पण बघ्याला अशा कुठल्या थोर व्यक्तीचे वैयक्तिक अनुभव नाहीत. तो त्याच्या स्थानिक नगरसेवकाला ओळखतो. पण उद्या हा नगरसेवक अपघातात मेला तर बघ्या त्याच्या अंत्ययात्रेला जाईल असे नाही.
       बघ्या एकदा कॉलेजात एक खूप प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवात गाण्याचा कार्यक्रम ऐकत असताना असेच एक स्थानिक नेते गेले म्हणून कार्यकम आध्यात्मिक गाणे गाऊन बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्या नेत्याच्या आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल जाळले. मग बघ्याला एक मित्र म्हटलेला की हा काही अपघात नव्हता, त्यांना मारलं होतं. इट्स ऑल पोलिटीक्स.
       मध्ये बघ्याचा मित्र त्याच्याशी चॅट करताना म्हणतो की आता त्यांच्या घरातच तिकीट मिळेल कोणालातरी. पुढे एका न्यूजमध्ये पण तो असंच काही वाचतो एका तज्ञाने लिहिलेलं.
       बघ्याला असं कोणालाच विचारत नाही की ते इतके ग्रेट होते तर त्यांचा जिवंतपणीचा परफॉर्मन्स त्यांच्या श्रद्धांजली लेखांहून छोटा का वाटतो. पण बघ्याला ठाऊक आहे की बघ्याच्या एक भौगोलिक, आर्थिक, जातीक, शैक्षणिक कोपऱ्यातून त्याला जे कळतं आणि जे कळत नाही ते एकमेकांशी जुळतंच असं नाही. बघ्या गुमान आपला प्रश्न दुमडून, दडपून ठेवतो आणि परत गंमत बघू लागतो.
--
       त्याच्या बघण्यात त्याला परत एक बातमीचा छटाकभर कोपरा दिसतो ज्यांत एक ऐंशीहून अधिक वर्षाच्या, प्राध्यापकी सोडून संपादकी वगैरे करणाऱ्या माणसाच्या मृत्यूबाबत असतं. बघ्यासाठी हा मृत्यू त्याच्या जवळच्या पेरीफरीत आलेला आहे. कधीकाळी, जेव्हा वेगवेगळया माणसांना भेटून बोलल्याने काही होतं असं बघ्याला वाटत असे अश्या अशा कोवळ्या च्युत्या काळात त्याने केव्हातरी ह्या माणसाला भेटायचा बेत आखलेला होता. त्याच्या एका मित्राच्या ओळखीने तो भेटायला जाणार होता. पण असं काही झालेलं नाही. परत एकदा बघ्या थोर माणसांच्या वैयक्तिक ओळखीपासून पारखा राहिला आणि त्याची ज्यांच्याशी ओळख आहे ती माणसे थोर होण्यापासून.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्यासाठी हा मृत्यू जवळच्या पेरीफरीमध्ये आहे कारण बघ्याने ह्या माणसाने लिहिलेलं एक पुस्तक वाचलेलं आहे. आणि तेही अशा दिवसांत, जेव्हा कधीकाळी हमखास भावूक होऊन टिपे गाळू शकणारा बघ्या हमखास कोडगा होऊन राहिला होता. आणि तरीही त्या पुस्तकाच्या शेवटानंतर बघ्याला एक आतल्याआत खेचत जाणारी अवस्था आली, जशी त्याला ‘लिटल प्रिन्स’ नंतर आली होती आणि तेव्हा बघ्याला जाणवलं की आपण जगत जातो त्याचा एक निष्कर्ष असा असतो की आपण सुरुवात करतो तेव्हा आपण नाव ना देता अनेक गोष्टींना आपले मानत जातो, पण पुढे पुढे ह्या एक एक गोष्टी संपून, हरवून जायच्या अनुभवांनी, किंवा नुसत्या भीतीने, किंवा पोट आणि अन्य अवयव भरायच्या धबडग्याने आपण असे होतो की आपल्याभोवती असतं बरंच काही आणि आपण कशाचेही नसतो. आपल्या आत असलेले निरागस भाबडेपण आपणच मध्ये मध्ये निर्दय ठेचत जातो आणि असे करावेच लागेल अशी एवढी समजूत आपण आपली घालतो की मोजमाप करून छाटून नीट बनवलेल्या आयुष्यापलीकडे जे काही दिसेल त्याला आपण खोटे समजू लागतो. किंवा असे शब्दांत काही कन्क्ल्युजन नाही. पुस्तक संपल्यावर आपण आपल्याशी थोडे फार दाटलो तेवढा वेळेचा तुकडा खरा. बाकी शब्द नुसते दिखावा.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्याला आठवलं की लहानपणी त्याच्या एक उनाड आयुष्य जगलेल्या रीश्तेदाराने त्याला एक मांजराचं पिल्लू भेट दिलेलं. बघ्याने त्या पिल्लाला त्या पिल्लाला न कळणारं पण बघ्याला कळणारं एक नाव दिलेलं. असं तर झालं नाही की ते पिल्लू बघ्याच्या कुशीत येऊन झोपत असे की बघ्याच्या मागेमागे फिरत असे. जे होतं ते बघ्याचं इमॅजिनेशन आणि त्या इमॅजिनेशनमध्ये एक आपल्याला हवं तेव्हा म्यांव म्यांव करणाऱ्या आणि आपल्याला नको तेव्हा शेपूट वर करून निघून जाणाऱ्या, झोपल्यावर मांडीवर मावणाऱ्या मांजराच्या पिल्लाला एक खास राखीव जागा होती. पण बघ्याच्या घराच्या रिअॅलिटीमध्ये त्या पिल्लाच्या हगण्याचा वास आणि घाण होती, दूध सांडणं-लवंडणं होतं, आणि रात्री-बेरात्री त्या पिल्लाने घरात ओरडणं हा प्रचंड न्यूसंस होता. बघ्याच्या ऑब्जेक्शनला दूर सारत पिल्लाला रात्री घराबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. दुसऱ्या दिवशी कचरेवाल्या बाईने त्या कोणीतरी मारलेल्या पिल्लाला शेपटाने पकडून घरातील भाज्या, कागद, प्लास्टिक, बल्ब ह्यांच्या कचऱ्यावर भिरकावलं. आणि शाळेतून दुपारी घरी येऊन पिल्लाला नावाने हाक मरत रडवेल्या झालेल्या बघ्याला त्याच्या आईने असं सांगितलं. रात्री मध्येच केव्हातरी बघ्याला जाग आली, त्याला असं वाटलं की ते पिल्लू त्याच्या उशीपाशी बसलेलं आहे आणि मग एकदम त्याला आठवलं आणि बघ्या आवाज न करता उशीवर तोंड दाबून रडत केव्हातरी झोपला.
       कदाचित बघ्याच्या चौकटबंद आयुष्यातील ह्या छटाकभर अनुभवाची आणि ‘ज्योडी’ च्या गोष्टीची बघ्याने आपल्यापुरती गाठ मारून घेतली. आणि मग अपरिहार्य नोस्टॅल्जियाच्या नशेत बघ्या व्याकुळ होऊन गेला.
       बघ्याला आठवतं की पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या क्वार्टरभर अॅनॅलिसिसमध्ये बघ्याला असं वाटलं होतं की आपल्या आयुष्यात आपले शारीरिक वय आणि मानिसिक वय ह्याच्या मध्ये एक मोठ्ठा खड्डा आहे. त्या खड्यात आपल्याला खेचून तळाशी नेऊन गुदमरवून टाकेल असा नोस्टॅल्जिया आणि फुकाचे प्रश्न आहेत. आणि आपण त्या खड्ड्याच्या अत्यंत धोकादायक जवळून चालत आहोत. आणि समजा आपण अशी कोणतीही पुस्तके वाचत राहिलो तर केव्हातरी आपण ह्या खड्ड्याच्या तळाशी जाऊ. आपण जबाबदारी नावाचा एक दोर स्वतःला बांधून घेतला पाहिजे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडण्यापासून वाचले जाऊ, म्हणजे कोण न कोण आपल्याला दोराने ओढेल. आणि मग जमेल तशी ह्या खड्ड्यातील, आसपासची सुपीक माती वापरून आपण त्यांत कविता, लेख, कथा अशी फुलझाडे लावू. ती फुलझाडे बाल्कनीत लावू. आणि आरामखुर्चीवर निवांत रेलून त्यांना न्याहाळू.
       तेव्हापासून बघ्या त्याचा संबंधही येत नाही अशा देशांबद्दलची किंवा इतिहासाची पुस्तके वाचतो. तरीही केव्हातरी बघ्याला वाटतंच की असा कुठला ना कुठला खड्डा बघ्याला ओढणारच. इंजिनिअर किंवा एम.बी.ए. न होऊन त्याने प्रगतीचा रस्ता सोडला तिथेच त्याचे खड्ड्यात जाणे अटळ होते असा तो आपल्या अल्कोहोलिक रिअलायझेशनचा शुद्धीतला अर्थ काढतो. पण जेव्हा तो अल्कोहोलिक होतो तेव्हा सारे अर्थ त्याला एक मोठया दरीकडे जाणाऱ्या साईनबोर्ड सारखे वाटतात.
--
       वर उद्धृत केलेल्या आशयाची स्वप्ने आणि भास असणाऱ्या झोपेतून बघ्या उठतो आणि परत आपल्या सोशल प्रोफाईलला जुगतो. त्याला एक तरुण मुलाची प्रोफाईल दिसते. तिथे त्याच्या मित्रांनी लिहिलेलं असतं, आणि कोणी थेट लिहिलेलं नसलं तरी बघ्याला अर्थ जाणवतो.
       बघ्याला इथे एक सूक्ष्म हादरा बसतो. बघ्या ह्या तरुण मुलाला ओळखतो, त्याच्या घरच्यांना ओळखतो. बघ्याला वाटतं की शिक्षण पूर्ण केलेल्या, नोकरी करू लागलेल्या ह्या मुलाने आत्महत्या तर केली नाही ना. पण त्याच्या मित्रांच्या शोकसंदेशांत असलेली अटळता बघ्याला अशा निष्कर्षांपासून मागे आणते. बघ्या कोणालातरी विचारतो आणि मग कळतं की ब्लड कँन्सर.
       एक बाजूने बघ्या स्तब्ध कोडगेपणाने हळहळ व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला तो विचार करतो की त्याच्या कुटुंबात कोणाला कँन्सर झाला तर तो काय काय करेल. तिसऱ्या बाजूला तो त्याच्या शेजारच्या एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या आजींचा विचार करतो ज्या मरतील तर सुटतील असे सहानुभूतीदार मत आसपास बनलेले आहे. चौथ्या बाजूला तो प्रश्न टाकतो की आयुष्याची कसलीही धड चव न घेता हा मुलगा मेला ह्या घटनेला काय एक्स्प्लेन करणार. मग बघ्या आपल्या वर्तुळातले कोणी न मेल्याने जमू शकणारी स्थिरचित्त मुंडी हलवतो.
--
       बघ्या क्रमाक्रमाने विचार करतो की तो मेला तर बाकीच्यांना असतात.काय काय वाटेल. समजा बघ्या दैवी कृपेने थोर झालाच तर त्याच्या पश्चात कशा प्रकारचे हुंदके येतील. आणि नाही झाला तर किस तरीके की मौत बघ्या मारेल. मग बघ्या पलटून विचार करतो आणि त्याच्या आजूबाजूच्या एकेकाला मारून त्याला काय वाटेल ह्याचा विचार करतो. म्हणजे बघ्याची आजोबा, आई, बाबा, बायको, काका, मित्र, वीस वर्षे राहिलेले घर. बघ्याला आठवतं की त्याची नळ्या-नळ्या खुपसलेली आजी मेली हाच त्याचा क्लोजेस्ट अनुभव आहे. आणि तेव्हा ती मरावी अशीच प्रार्थना नास्तिकतेच्या वाटेवर असलेल्या बघ्याने आपल्या रेअर मागणीत केली होती. तिच्या प्रेताला जाळून झाल्यावर बघ्या घरी येऊन चहा प्यायला होता आणि तिसऱ्या दिवशी कोलेजला पण गेला. पुढे केव्हातरी मध्येच घरात रिकामी खुर्ची दिसली तेव्हा बघ्या भडभडून रडला. बघ्याच्या आत्ताच्या इमॅजिनरी इक्सरसाईज मध्ये त्याच्या आवडत्या स्थितप्रज्ञपणे तो एक एक मृत्यू निभावून नेतो. प्रत्येकाला तो शब्दांमध्ये नीट समराइज करतो आणि त्याच्या एक एक कप्प्यांत ठेवून देतो.
--
       बघ्याला दरी दिसते, तळ न दिसणारी, काळीशार, थंड हवेचे झोत वर सोडणारी दरी. त्याच्या आजूबाजूला कोणी तिथे जाऊ नये म्हणून लावलेले एक एक साईनबोर्ड्स. बघ्या एक एक साईनबोर्ड वाचत वाचत जातो. सर्वांत शेवटी एक साईनबोर्ड असतो ज्यांवर लिहिलेलं असतं ही काही खरी दरी नाही, ही काल्पनिक आहे. तरी कृपया इथे जाऊ नका.
       बघ्या दरीकडे पाहतो. तिथे एक मुलगा त्याला बोलवत असतो. बघ्या साईनबोर्ड ओलांडत पुढे जातो तेव्हा त्याला साईन बोर्ड्सच्या मागच्या बाजू दिसतात. त्यांना त्याच्या ओळखीच्या माणसांचे चेहरे असतात. दरीकडे चालणाऱ्या बघ्याला पाहून ते चेहरे माना फिरवतात, टिपे गाळतात, हाका मरतात. बघ्या बिचकतो.
       तो मुलगा बघ्याला त्याचे हात वर करून दाखवतो. त्याच्या हातात बघ्याच्या घराच्या कचऱ्यात मेलेलं मांजरीचं पिल्लू असतं, त्या मुलाच्या हाताला मान घासत. मग त्या मुलाच्या पाठून, दरीच्या काठाने बसलेली एक म्हातारी बाई तिच्या हातातलं पुस्तक मिटत बघ्याकडे पाहते. मुलगा पुढे येऊन बघ्याचा हात पकडतो, पिल्लू त्याच्या हातांत ठेवतो. बघ्या त्या पिल्लाला साशंक कुरवाळतो तशी तो मुलगा त्याच्या कोपऱ्याला ओढत दरीकडे नेतो. बघ्या दरीच्या काठाला पोचतो. ती म्हातारी म्हणते ऐका मी तुम्हाला ह्या दरीच्या तळाला काय ह्याची गोष्ट सांगते. बघ्या त्या मुलाच्या आणि म्हातारीच्या मधे बसतो. ते पिल्लू त्याच्या पायाच्या बोटांना आपली मान घासत पुढे-मागे फिरत राहते.    
     

          

Tuesday, March 18, 2014

बघ्या, जयंती आणि झीट

संस्कृती आजींना दरदरून घाम फुटला होता. दरदरून, म्हणजे भरभरून. आणि अजूनही ते स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. ते आलेले स्वप्नात, ते.. शेकडो वर्षांतून एकदा येणारं स्वप्न. ती आवळलेली, उगारलेली मूठ, ती दाढी, ती छप्पन इंची, मिलियन संकटे झेलून, परत त्यांच्याच देशी मेकच्या उर्फ स्वदेशी तीक्ष्ण गोळ्या करून शत्रू गारद करेल अशी छाती.
       ह्या आधी आजी कार्यरत होत्या तेव्हा ते गेले, मग त्यांच्या सावलीत असलेले ते, ते आणि ते गेले. होन संपले. धावत्या घोड्याची कणसे संपली. मग मोती, हिरे आणि अशर्फ्या संपल्या. प्रेरणा विधवा झाली, परंपरा सती गेली, संस्कार परागंदा झाला, यवन बुडले, आंग्ल चढले. त्यांच्या मेकॉले नावाच्या शिलेदाराने नोकरी नावाची तोफ डागली, तिच्या धुराळ्यात संस्कृती आजी केव्हातरी बेशुद्ध पडल्या, त्या ह्या स्वप्नानेच जाग्या झाल्या.
       आजी गुडघ्यावर हात ठेवून उठल्या, तेव्हा त्यांचे गुडघे आर्ष करकरले. मग त्यांनी सिंधू नदीच्या साठवून ठेवलेल्या पाण्याने तोंड धुतलं, गंगेच्या पाण्याने चुळा भरल्या, यमुनेच्या पाण्याने शौच संमार्जन केलं आणि नर्मदेच्या पाण्याने नाश्त्याची भांडी धुवून घेतली. दंडकारण्यमधील लाकडांची चूल पेटवली आणि ती लाल फुंकणीने चांगली भडकवली. अखंड, अविरत आर्यावर्ताच्या नेमाड्यात, सॉरी कोनाड्यात ठेवलेले बत्तीस लक्षणी सतत सुवासित बासमती तांदूळ घेतले. मग भीमा, कृष्णा, गोदावरी ह्यांच्या जमेल तश्या पाण्याने त्यांचा भात करायला ठेवला. महानदीच्या काठच्या आणि सुदूर ईशान्येकडच्या कंद आणि स्वच्छंद भाज्या उकडायला ठेवल्या. त्यावर अहोम देशाचे तेल शिंपडले, कलिंग आणि आन्ध्र देशाचे मसाले छिडकले. बस्, चितळ्यांचे श्रीखंड राहिले.
       मग काळाच्या खडबडीत आणि कुठेकुठे माहितीच्या पेव्हर ब्लॉक्स मध्ये हरवलेल्या रस्त्यांवरून ‘एकं सत विप्रा बहुदा वदन्ति’ असं सुरुवातीला म्हणत, तद्नंतर क्रमाक्रमाने मनुस्मृती, पुरुषसूक्त घेत, सरतेशेवटी ‘पुरातन प्रभात’ चा अंक वाचत संस्कृती आजी चौकात पोचल्या.
       आणि पर दिग्मूढ, कालमूढ झाल्या. चुरालीया बिल्डर्स नावाच्या माणसाने प्रायोजित फ्लेक्स वर त्यांचा फोटो, तसाच, जसा स्वप्नात दिसला. संस्कृती आजींना गदगदून आलं.
       म्हातारी रडते पाहून एक पोक्त गृहस्थ त्यांची चौकशी करू लागले. आजींना त्यांना विचारले, वत्सा, ह्या साऱ्या कोलाहलाचे प्रयोजन काय? तेव्हा त्या पोक्त गृहस्थांस भोवळ आली. (त्या गृहस्थांचे नाव बघ्या असे असून ते अतिशय उद्विग्न मनस्थितीत असत असे कळले.) तसे त्यांच्यावर आपल्या जीर्ण परंतू तेज कायम राखलेल्या चीनांशुक वस्त्राचा अंगठीतूनही जाईल असा तलम धागा फिरवून आजीने त्यांना उठते केले. आपल्या खडबडीत हाताने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, तसा नोस्टाल्जिया आणि सटायर ह्यांचा अंधेरा पडदा विरतो आहे असे झाले.
       ‘आजे, अद्यवासरे वर्षातील त्यांची ‘एन’ वी जयंती असून त्याची मिरवणूक त्याजी चुकातून सुरू होऊन, त्याजी चौकातून जाऊन त्याजी पुतळ्यापाशी संपणार आहे. सांप्रत आपण त्याजी चौकात उभे आहेत. लौकरच मंगलवाद्य, घोषवाद्य, रणवाद्य, बासवाद्य ह्यांचा निनाद करत अविवाद्य अशी ‘बोला....’ अशी घोषणा देत मिरवणूक येईल.’
       आजेने त्याच्याकडे पाहून प्राकृतात अलाबला घेतली.
       तेवढयात ‘ हे राजे, जी जी’ असा त्रिलोक दुमदुमून टाकेल असा ध्वनी निर्माण झाला. त्यापाठोपाठ जसे कुरुक्षेत्रावर एकामागोमाग एक शंख निनाद होऊन कौरवांचे धैर्य खच्ची झाले तसे ढोलपथकांचे दुर्दम ध्वनी निर्माण होऊन जे कोणी शंकित, लिबरल, सेक्युलर, कम्युनिस्ट अशा नावाचे शत्रू उपस्थित होते ते सारे गर्भगळीत झाले.
       त्या पाठोपाठ देशोदेशीच्या आयात तेलावर चालणारे मत्त ट्रक्स आले. त्यावर दहशतवाद आणि कोणताही आपल्याला न पटणारा वाद असाच संपवायचा असतो ह्याची फ्लेक्स होती. ट्रक्सच्या बाजूंना होऊ घातलेल्या धर्मयुद्धात आम्ही आमची शीरकमले अर्पण करण्यास सज्ज आहोत असे दर्शवणारे फ्लेक्स होते. ट्रक्स च्या आजुबाजुला स्मार्ट फोन्स घेऊन या बाजूची गर्दी त्या बाजूचे आणि त्या बाजूची गर्दी ह्या बाजूचे फोटो घेत होती.
       ‘हे तंत्रज्ञान जब्बू ऋषींनी निर्माण केले. त्यांच्या समासंगपिट्ट ह्या ग्रंथात त्याच्या उत्पत्तीचे आणि यंत्राधारित विराट उत्पादन प्रक्रियेचे वर्णन आहे.’ असे आजी म्हणाल्या. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्यावर फ्लॅश मारला. पुढे ‘त्यां’ना सुयश चिंतणारी अजाण वृद्धा अशा नावाने त्यांचा पिक ट्रेण्डी बनला.
       पाठोपाठ ‘पुरातन प्रभात’ ची औक्षोहीणी आली. त्यांनी ‘... की जय’ ही घोषणा कंठ दुमदुमवून दिल्याने पौरुष ग्रंथी जागृत होऊन आणि विरश्रीयुक्त कंपने निर्माण होऊन कशी तेजस्वी संतती उत्पन्न होऊ शकते ह्याची पत्रके वाटण्यास सुरुवात केली. ती भरभर संपली.
       आणि मग एकच जयघोष ऐकू येऊ लागला. ‘आले, आले, आले’ असे जनसमर्द कुजबुजू लागला. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर लागलेले सारे दिवे जसे आजींच्या डोळ्यात एकवटले.
       अर्जुनाला जसे विश्वरूपदर्शन साहवले नाही तसे बघ्यालाही नाही. तो निश्चेष्ट पडला. पण ह्यावेळी आजीचे त्याच्याकडे लक्षही नव्हते.
       खास ऐरावत फॉर्ममध्ये तयार केलेल्या रथावर बसून ते आले. चौकातल्या त्यांच्या अश्वारूढ दूर क्षितिजाकडे पाहणाऱ्या पुतळ्याला त्यांनी पुष्पमालिका (हार हा शब्द नाहीच आता) अर्पण केली. आणि मग रथाच्या केशरी ध्वजाच्या जवळ येऊन ते बोलू लागले.
       त्यांची एक एक ऋचा आजींच्या कानात गुंजू लागली. भवभूतीने म्हटलेलं समानधर्मा आजींना हा हा समोर दिसू लागला. मेरे सपूत म्हणून आजी धावू लागल्या. तसे रक्षक त्यांना अडवू लागले, त्यांचावरून मेटल डिटेक्टर फिरवू लागले, त्यातून एक एक सूक्ते उमटू लागली.
       संस्कृती आजींना असे धावत येतांना पाहून रथाच्या पश्चचक्राच्या आड असलेल्या प्रेरणा आणि परंपरा (म्हणजे तिचे पांढऱ्या साडीतील सात्विक असणारे प्रारूप) येऊन आपल्या आईला बिलगल्या. रथाचे सुकाणू सोडून आलेला संस्कार आईच्या पाया पडला.
       हे महन्मंगल मिलन घडते तोच रथ पुढे सरकू लागला. त्याची कमलपुष्पांनी बनलेली आणि उद्योग कुटुंबांच्या लगामांनी जोडलेली चाके रोरावू लागली. एकच धूळ उडली, अगदी काळाची गती कुंठीत करणारी. आत्ता कुठे एकत्र झालेले कुटुंब परत विखुरले, काळाच्या पेव्हर ब्लॉक्सवर नव्या नव्या रुपाने आले.
       संस्कार आलोक बनला. आधी त्याने परदेशात नोकरी केली. मग त्याने संस्कारक्षम संध्यामालिका बनवायची वाहिनी उघडली.
       प्रेरणेचे हजारो तुकडे झाले. नव्हे, पावडर झाली. ड्रग्स घ्यावेत तशी लोक ती जमेल तेव्हा, जमेल तिकडून घेवू लागले. परंपरेने पांढरे सोडून खाकी कपडे घेतले आणि तिने प्रेरणेचे डीलिंग सुरू केले.
       ‘पुरातन प्रभात’ च्या साठवले महाराजांनी संस्कृती आजींना आपल्या सोबत घेतले. त्यांचे जमेल तसे स्नॅप शॉटस् ते देऊ लागले.
       बघ्या बेशुद्धच राहिला.
--
       ह्याचवेळी स्वराज्यातील हजारो किल्ल्यांवर आय’टी. मावळे सज्ज होते. त्यांनी आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवर लॉग इन केले आणि प्रतिक्रियांच्या तोफा गर्जू लागला.
       बहिर्जीने फोटो शॉप सुरू केले आणि वेगवेगळी माणसे आणि वेगवेगळी वाक्ये, किंवा चित्रे ह्यांचे जम्बुरके तो टाकू लागला.
       शेअर मार्केटच्या भिंतीला दडून बसलेली बिनीची फौज सावध झाली. तिने अस्वलाचे सोंग टाकले. आणि बैलांच्या पलीत्यांना चूड बाधून त्यांना पुढे पाठवले. आता गनिमी कावा. काँग्रलखानाचा कोथळा आणि केजीरेखानाची सारी बोटे. मग लाल किल्ला मोकळा.
--
       राजांच्या पुतळ्याला जयंती निमित्त घातलेले सारे हार काढून पुतळा परत नीट नेटका करावा म्हणून सफाई कामगार घेऊन आलेले उजवेकर आणि पुतळा आणि महानगर पालिका ह्यांच्या मध्ये चुरालीया बिल्डर्स आणि राजकारणी ह्यांच्याविरोधात निदर्शने करायला आलेले डावेकर ह्या दोघांनाही तिथे बेहोश पडलेला बघ्या दिसला. उजवेकर वाकून सुंगले, पण काही वास नाही आला. डावेकर आले, खिसा-पाकीट पाहिलं, त्यात एक अॅन्हिलेशन ऑफ कास्ट आणि सारामागो. उजवेकर सफाई कामगारांना घेऊन पुतळा साफ करू लागले. निदर्शनाला आलेल्या लोकांनी बघ्याला उचलून कडेला ठेवला.
       तिथे गुरवार म्हणून साईबाबांच्या मंदिराजवळ सारे भिकारी आणि बिगारी कामगार जमले होते. त्यांनी बघ्याला जागा केला. त्याच्या पाकिटातले सुट्टे रुपये काढून घेतले, त्याच्या हातात चहाचा कप ठेवला.
       झिरक्या साडीवर फाटका शर्ट घातलेली एक निम वयस्कबाई त्याला काहीतरी म्हणाली, बघ्याला तो कालचाच प्रश्न ऐकू आला,..ह्या कोलाहलाचा अर्थ काय...

Friday, March 14, 2014

बघ्या: प्रोलॉग आणि झवती गाढवं

      बघ्या त्रस्त आहे, म्हणजे दर काही दिवसांनी त्याला असं वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक प्रकारचं झवतं गाढव पाठी लावून घ्यायची हौस आहे. किंबहुना थोडा थेरॉटिकल दृष्टीकोन घेतला तर बघ्या हा आपल्याला जे केलं पाहिजे ते न करणं, त्याऐवजी भलभलत्या गोष्टींकडे असं नाही तर तसं असं बघणं आणि मग त्या पाहण्याला उगाच काहीही प्रश्न विचारणं ह्या स्थिर अवस्थेत स्वतःला कायम ठेवायचा प्रयत्न करून असतो.
      दिवसभर बघ्या त्याच्या वैयक्तिक स्पेसमध्ये सिगारेटी फुंकत, कॉफ्या किंवा चहा पीत, जमेल तसे जेवत, सिनेमे किंवा सिटकॉम बघत स्वतःला कसलीतरी फंडामेंटल प्रेरणा यायची वाट बघत असतो. बघ्यासाठी हे एक जेन्युइन पाउल पुढे जावं म्हणून अनेक पावलं चालायची टाळणं आहे, म्हणजे स्वतःबद्दल मजेशीर वाटण्याच्या अवस्थेत त्याला असं वाटतं. ही अवस्था नसते तेव्हा बघ्याला बहुतेकदा जीव द्यावासा किंवा दारू प्यावीशी वाटत असते.
      ह्याशिवाय बघ्या मांजरी पाळतो आणि त्याच्या घरच्यांकडून पाळला जातो. मांजरी बघ्याच्या मांडीवर निवांत झोपतात, त्याच्या गादीत तो नसताना हागतात आणि तरी त्या त्याच्या पावलाला मान घासायला लागल्या कि बघ्या त्यांना काहीही करून दूर लोटू शकत नाही. म्हणजे तो तसं करू शकतो, पण त्याने उगा तसं नाही करायचं असं ठरवलं आहे. नाहीतरी कामू म्हटला होता, माणसं देवावर विश्वास ठेवतात, लग्न करतात किंवा प्राणी पाळतात.
      बघ्याची चाळ त्याच्या आजीसारखी ८० वर्षाची आणि तशीच जर्जर आहे. दोघींचं कंबरडं मोडलं आहे, दोघी अंथरुणाला खिळून आहेत, आणि दोघी जबरी मौल्यवान आहेत.
      बघ्याची आजी २३००० पेन्शन घेणारी खडूस म्हातारी म्हणून बॅंकेत फेमस आहे. बघ्याची चाळ मोक्याची जागची भरपूर भाव येईल अशी जागा म्हणून. दोघी अजून असण्याचं मुख्य कारण सरकार आहे, चाळीला रेंट कंट्रोल आणि आजीला पे कमिशन देऊन.
      बघ्याला दोघीही मरतील ह्या भीतीचे पोपडे काढण्याचा गंमतीचा खेळ खेळतो. आजी मेली तर आपल्या भूतकाळाचा मोठा तुकडा कापला जाऊन आपण एकदम वर्तमानकाळात फेकले जाऊ असं बघ्याला वाटतं. तो आजीची बडबड तासंतास ऐकतो, उगाच मानसोपचारतज्ज्ञ कशाला म्हणून बाकीचेही काही म्हणत नाहीत. चाळ मेली तर मांजरी कुठे जातील ही बघ्याची भीती आहे. चाळ आणि बिल्डींग ह्यांच्यातले काही फरक बघ्याने हेरले आहेत, त्यातला एक मुख्य म्हणजे चाळीला विद्रूप असण्याची साहजिक गरज असते तशी बिल्डींगला देखणं असण्याची. बिल्डींगचा अजून एक मुख्य गुणधर्म म्हणजे ती त्यातल्या प्रत्येकाला आपापला घाण, ओंगळ, विसविशीत आणि नागडा भाग झाकण्याची मुभा देते. त्याचा फायदा उन्मुक्त होऊ घातलेल्या कामजीवनास किंवा असहाय्य होऊ चाललेल्या म्हातारपणास होतो. पण ह्या मुभेची दुसरी बाजू म्हणजे बिल्डींग मधील जिना, पार्किंग, कंपाऊंड अशा सर्व गोष्टींना सार्वजनिक महत्व प्राप्त होते, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचे नैतिक दडपण सर्वांस घ्यावे लागते. ह्या नैतिक आणि आर्थिक उन्नत अवस्थेचा स्वाभाविक परिणाम म्हणून केवळ पाळीव माणसे आणि कुत्रे किंवा पाळीव माणसे आणि पाळीव कुत्रे अशांनाच बिल्डींग हा स्टेट्स प्राप्त होतो.
      जेलस बघ्या! आंबट द्राक्ष्यांच्या बागेचा रखवालदार बघ्या!!
      सिरीयसनेस अपार्ट, मांजरी ह्या स्वतंत्र असतात, आणि एकाच वेळी निष्पाप आणि संधिसाधू होण्याचे नाजूक आणि पारदर्शक कसब त्या ठेवू शकतात. किंबहुना हा निष्पापपणाचा आपोआप येणारा भाग आहे कि निष्पाप असणाऱ्या गोष्टींमध्ये जीवघेणा त्रास द्यायची प्रचंड क्षमता असते. त्याचमुळे शाळा, स्पर्धा, संस्कार अशा यंत्रांमधून निरागसपणाला व्यवहारकुशल निब्बरपणात बदलायचे कारखाने चालवले जातात.
      मांजरी नसणं हा आपला का नेमका लॉस आहे ह्याचा विचार बघ्या करतो. १. सवय मोडण्याचे दुःख २. त्यांचे आग्रही म्यांव म्यांव न ऐकता येणे ३. नेमके ज्या दिवशी बघ्या त्याचे घर सोडेल नेमके त्या दिवशी मांजरी काय करतील हा इमोशनल ताण, म्हणजे समजा त्याच्या मांजरींचा ताफा दरवाज्याशी आला, लोळला, पाय ताणून आळोखे पिळोखे देऊन ओरडू लागला, मान पुढच्या पायांवर ठेवून, मध्ये मध्ये कूस बदलून बदलून झोपला आणि तरीही कोणी दार उघडले नाही तर? ४. तसे बघ्या अनुभवातून शिकला आहे कि माणसासारखा तद्दन पाळीव प्राणीसुद्धा कितीही सवयी तुटल्या, सोबत संपली तरी आपोआप परत नव्याने पाळीव होतो आणि सरासरी जगात जातो तिथे मांजरे जगणार नाहीत काय! पण तरीही बघ्याला एक गोष्ट टोचत टोचत जाते, जशी काफ्का ऑन द शोअर मधल्या नकाटाला टोचते, कि सुरक्षित अवस्थेतून एखाद्याला परत व्हल्नरेबल अवस्थेत ढकलणं ह्यात काहीतरी चूक आहे, आणि तेही मांजरींना ज्यांना आपण सांगू पण शकत नाही पुरेशे अगोदर कि अमुचा रामराम घ्यावा. ५. आणि समजा जेव्हा जिथे मांजरी निवांत हुंदडल्या, सावलीत झोपल्या, अंधारात जुगल्या, कोपऱ्यांत व्यायल्या, कोवळ्या वयांत मेल्या तेव्हा झाडांखाली पुरल्या गेल्या, चोरट्या आणि रतीबाच्या दुधावर सुस्तावल्या तो चाळीचा आकार कोसळून मलबा बनेल तेव्हा मांजरी तिथे काही शोधतील का, का त्या नुसत्याच ओरडतील, मूक बघत बसतील, आणि एका क्षणाला पाठ फिरवून, शेपूट वर करून जातील, जसा बघ्या आणि बाकीचे करत आले.
--
      हा बघ्याचा सेन्स ऑफ लॉस. एवढंच बघ्याचं होऊ घातलेलं विस्थापन. बघ्या ज्या छटाकभर शहरात वाढला त्याचं गर्दीने तट्ट फुगून गेल्याने जिकडे तिकडे गर्दीच्या साचलेपणाआड येणारा शांततेच्या, निवांत रस्त्यांवर चालत गेल्याने येणाऱ्या स्तब्ध अवस्थेच्या अकाली मृत्यूचा सडेल वास आणि त्याने होणारी बघ्याची घुसमट एवढीच बघ्याची डेव्हलपमेंटबद्दल तक्रार.
--
      तरी बघ्या विचार करतो कि डेव्हलपमेंट मॉडेलचं आपण नेमकं काय करायचं, आपल्या कोणकोणत्या गरजा छाटायच्या का आपणच इथून दुसरीकडे कलम व्हायचं. मग बघ्या बिन इस्त्रीचे कपडे घालतो, महिनाभर एक जीन्स घालतो, बादलीतून अंघोळ करतो, हाताने कपडे धुतो. ह्या झ्याटू डिसीजन्स.
      बघ्या ठरवतो कि गर्दी नको. दररोज माणसांच्या एका गतिमान गोळ्याला चिकटून घ्या, सुट्टे व्हा, काही तास आपल्यासारख्या माणसांच्या महत्वाकांक्षा आणि समस्या ह्यांच्या गॉसिपात घालवून मध्ये मध्ये आपला ज्याच्याशी संबंध नाही अशा काही गोष्टी करा, परत माणसांच्या थकलेल्या, चिडचिड्या गोळ्याला डकवून घ्या, एक गोळा संपला कि दुसरा पकडा आणि मग परत तंतू तंतूमय अलग होत आपल्या काडेपेटीत हुकमी काडी बनून कधीही पेटात्से झोपा, ७०-७५% दिवस असं करा आणि उरलेल्या वेळात आहार, निद्रा, भय, मैथुन, प्रजनन, प्रतिक्षिप्त क्रिया, बाल संगोपन, मतदान, देशभक्ती, निसर्गरम्य स्थळी मानवेल अशी गर्दी करून आनंदी फोटोग्राफ्स आणि वारसा मागे ठेवून अहेव इच्छांसह मरण. बघ्या त्याच्या अॅबस्ट्रॅक्शनने थरथरतो. सही काळ,वेळ,मित्र असते, बघ्या प्रतिथयश असता. परत द्वेषमूलक बघ्या, खुसपट्या बघ्या!!
      बघ्याचा निश्चय पाहून शहर खदखदून हसतं. आणि आपल्या लक्झरी आणि नेसेसिटी नावाच्या दोन शुडांनी उचलून त्याला गरगर फिरवतं.
--
      बघ्याचा मित्र आणि बघ्या फुफ्फुसात टार भरायला बसतात, तेव्हा मित्र त्याचा टाय काळजीपूर्वक काढून ठेवतो. परवा हेड ऑफिसला जायचंय, तेव्हा लागेल म्हणून.
      त्यांच्या बाजूच्या टेबलावर ३ बाया आणि ४.५ पोरांचा कळप येतो, आणि टोटल ६ कटिंग मागतो. ०.५ मुलगी अर्धा चहा आणि स्वतः सांडते तेव्हा जेष्ठ बाई म्हणते, जीयेगी या मारेगी रांड. अब येहीच जिंदगी अपनी.
      बघ्या मोबाईलवर ताज्या बातम्या आणि नित्य नियमित पौष्टिक लेख बघतो.
      निर्भया खटल्यात चौघांची फाशी हायकोर्टात कायम. सत्यमेव जयते. क्लीशेड, क्लीशेड..
      मित्र म्हणतो, कोण आपल्याकडून, अर्धे का मुर्धे? बघ्या म्हणतो १५ मारले नक्षलवाद्यांनी, मित्र म्हणतो छपन्न इंच येईल तोच काहीतरी देईल करारा जबाब.
      बघ्या ह्याला मानवतावादी ऑब्जेक्शन घेऊ शकतो, बघ्या वाद टाळतो, होळीला करू म्हणतो
.
      बघ्याचं स्मार्टफोन, बघ्याचं वाढदिवसाचं गिफ्ट, त्याने मार्क केलेला लेख दाखवतं. लेख खुळचट विकासवादाच्या केविलवाण्या बळींबाबत बोलतो.
      बघ्याने फावल्या वेळेत वाचून ठेवलंय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आणि सहृदय होत तो म्हणू चाहतो कि शहरीकरण आणि कामगार कायदे बदलणे ह्यांना पर्याय नाही, हिंसेने काही सुटणार नाही. बघ्या ह्यावर रेफरन्स देऊ शकतो.
      बघ्या संपूर्ण शहरी बनावटीचा आहे. त्याला शेत, सावकार, भूमिहीन शेतमजूर, प्रकल्प, विस्थापन आणि पुनर्वसन ह्या सगळ्याबाबत काय करायचं हे कधी कधी उमगत नाही, मग तो आपत्कालीन एक्झीट शोधतो, ती उघडतो तेव्हा माहितीचा लोट येतो आणि बघ्याला लांब घेऊन जातो.
      दर सकाळी बघ्या हिरीरीने बसतो त्याच्या प्रश्नांचा साकल्य आणि नाविन्य अशा तेजस्वी तरीक्याने सुलझाव करायला. मग तो लिटरेचरच्या ढोलक्याचा दोन्ही बाजूंनी आनंद घेतो, ढोलकं थांबतं तेव्हा बघ्या नव्याने दिग्मूढ होतो.       
--
      बघ्या बघतो तेव्हा त्याच्या इमारतीच्या कळपातले नव म्हातारे-म्हाताऱ्या त्यांच्या नव नातवांना शाळेत सोडतात-आणतात. येताना मुले पेप्सी मागतात, मोठी मुले डेरी मिल्क, त्याहून मोठी एक छोटा.
      म्हातारे मध्ये मध्ये कट्ट्यावर बसतात, रेल्वे, राजकारण, पेन्शन, महागाई अशी चर्चा करतात. त्यावेळी ते समोरून जाणाऱ्या भिन्नलिंगीय तरण्या प्रजातीस न्याहाळतात.
      त्यांचे नातू संध्याकाळी त्या कट्ट्यावर बसतात तेव्हा त्यांच्या वर्गातल्या मुलीला ते चिडवतात. ती सलज्ज हसते आणि जाते. त्यावेळी मुलांच्या आया, आज्या आणि उरलेले ‘होणार सून मी ह्या घरची’ बघतात. त्याचवेळी भारतात काही एक सांख्यिकी वेगाने स्त्रियांवर अत्याचार होतात.
      बघ्या आपल्या फुफ्फुसात टार भरत त्या मुलांना पुढच्या टाइममध्ये प्रोजेक्ट करतो. त्यातला एक होतो नगरसेवक, एक चाईल्ड मॉलेस्टर, एक सरकारी नोकर, एक आय टी वर्कर, एक सी.ए. आणि एक बेवडा. सलज्ज हसणारी मुलगी अमेरिकेत निघून जाते.
--
      बघ्या घाबरून आपल्या सिगारेट कडे बघतो, गांजा तर नाही ना? तेव्हा नेपाळी गुरखा त्याला सलाम करतो.
--
      दोन बीअर आणि वर एक कॅन मध्ये, सोबत काही दर्दभऱ्या गाण्यांसह बघ्या आपले चिंधी दिवस आंबवत ठेवतो. त्यावर भरघोस दिलदार टीप देऊन, साऱ्या ओरिसीअन वेटर्सचे अदबी सलाम घेत बघ्या पिवळ्या सुस्त रस्त्याला येतो.
      चायनीजवाल्याने कचरा कुंडीपाशी फेकलेल्या हाडांना कुत्री आशेने न्याहाळतात, कुत्र्यांना एकमात्र छुपा बोका मत्सरयुक्त भीतीने. पोलिसांच्या थांबलेल्या गाडीला मघाच्या गुराख्याचा चुलत भाऊ सलाम करतो आणि त्याचा मुलगा चटपटीत पणे एक आर.सी. आणि स्टार्टरचे पार्सल गाडीत आणून ठेवतो. गाडी छू.
      बघ्याचा स्मार्ट फोन म्हणतो ‘चिन्मया सकलहृदया’. बघ्याच्या आईने परवा टी.व्ही.वर ऐकलान आणि बघ्याला शोधायला लावलान.

      आणि मग आपल्या अल्कोहोलिक उमाळ्याचे आरपार अश्रू बघ्या पुसतो, तेव्हा चुलत गुरखा नेपाळी गाण्यावर मान डोलावतो, मुलगा कोंबड्यांना उचलून आत ठेवतो, एक कलकलते. 

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...