Showing posts with label मळमळ. Show all posts
Showing posts with label मळमळ. Show all posts

Monday, September 12, 2022

आवाज, आकडे, आणि अंदाज

  

अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच तर त्यात थोडा विचारही आहे.   

दि. ११ सप्टेंबर २०२२ च्या लोकसत्तात ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाबाबत काही आकडेवारी होती. त्यातली अधिक लक्षवेधक आणि तितकीच निष्फळ आकडेवारी म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीत आवाजाने गाठलेल्या पातळीबाबतची. फेसबुकवरही अनेकजण ह्या आवाजाबाबत तीव्र मते व्यक्त करताना आढळले. अर्थात ही मते प्रातिनिधिक नाहीत, कारण फेसबुक एको चेंबर आहे.

फेसबुकवरील प्रतिक्रियांच्याबाबत दोन निरीक्षणे. गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांत पुण्यातील लोक जास्त आहेत. आणि आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणारे लोक हे उजवीकडे झुकलेले असण्याची शक्यता कमी आहे. पण ह्या उजव्या कालच्या लोकांच्याही (पुण्यातील) आवाजाबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. ह्या दुसऱ्या निरीक्षणाबाबत मी जास्त काही बोलणार नाही. त्यातून मला एवढंच कळलं कि गोंगाट खरंच असावा.

पहिले निरीक्षण आश्चर्यकारक आहे कारण मुंबईतही विसर्जन मिरवणुकीत दणादणाट नोंदवला गेला आहे पण मुंबईतील मिरवणुकीतील आवाजाबाबत त्रस्त प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत नाहीत. ही बाब ध्वनीप्रदूषणापेक्षा दोन्ही शहरातील फरकावर अधिक आधारित असावी असं वाटतं. मुंबईचे ‘चलता है स्पिरिट मुंबईकरांना गोंगाटाला आपलेसे करायला मदत करते का? का मुंबईत अन्य दिवसांतही इतका आवाज असतो कि गणेशोत्सवात त्यात होणारी वाढ विशेष त्रासदायक ठरत नाही? का मुंबईकरांनी मी बरा माझे टीचभर स्क्वेअर फीट बरे हेच जीवितध्येय मानल्याने ते उगाच जिथे आपल्या मताचा काडीमात्र उपयोग नाही तिथे ते द्यायला जात नाहीत? का ते प्रवासात एवढे व्यस्त आहेत कि त्यांना फेसबुकवर ‘व्यक्त व्हायला वेळच मिळत नाही? ध्वनीप्रदूषणाचा त्रास विसरायला लावेल असा हा शहरांच्या तौलनिक अभ्यासाचा मुद्दा आहे. हा विचार करतच मी अनंतचतुर्दशीचा डॉल्बी सहन केला आहे.

मजेचा भाग सोडला तर गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाज हे आपल्या सामाजिक निवडीचे कोडे आहे. त्याबाबत एलिट राग आहे आणि मासेसची मिरवणूक आहे. आवाजाने त्रस्त लोक हे कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवात कार्यरत असण्याची शक्यता नसते. (अर्थात पूर्वी ते होते असं होऊ शकतं.) कारण आपण ज्यांत सहभागी आहोत त्याचे परिणाम आणि आपल्याला त्याचा जाणवणारा उपद्रव हा पेच.

सार्वजनिक कामातील समंजस कार्यकर्त्यांची अवस्था वस्त्रहरणाच्या वेळच्या भीष्म-द्रोणासारखी असते. आपण कार्यकर्तापण स्वीकारले आहे तर आपल्याला आपण ज्यांना कामाला लावतो त्यांच्या पाशवी आनंदाच्या मागण्या मान्य कराव्या लागतील आणि त्यांचे समर्थन, किंवा गेला बाजार त्यांच्यातील उणिवांच्या बाबतीत आपलेच दात आपलेच मौन असा पवित्रा तरी घ्यावा लागेल हा विवेक (का निब्बरपणा?) समंजस कार्यकर्त्यांना असावा लागतो. किंवा मग त्यांना एक्स-कार्यकर्ते होऊन चिंतन (आणि मौन किंवा दुर्लक्ष) स्वीकारावे लागते.

गोंगाटाने त्रस्त एलिट असा प्रश्न विचारत नाहीत कि शेकडो लोक हा गोंगाट एन्जॉय कसा करतात. विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण नसते असा माझा मुद्दा नाही. ते आहेच. कळीचा मुद्दा हा आहे कि त्याबद्दल प्रतिकूल मत इतके तोकडे का आहे.

The key fact is not many regards loud sound as a nuisance. गणपती विसर्जन किंवा रोजमर्रा दिवस, ही बाब आपल्याला दिसून येते. म्हणजे एकतर गोंगाटाचा अभाव ज्यांना हवा आहे असे लोक हे कायमच एकूण लोकांत थोडे असतात. किंवा स्वच्छ हवेसारखी शांतता ही पण एक लक्झरी गुड आहे. पेडर रोडला ते उपलब्ध आहे, पण हमरस्त्यावर नाही. म्हणजे लोक पुरेसे धनिक झाले कि परिसरातील शांतता ही त्यांची राजकीय मागणी बनेल किंवा ते अशी शांतता manage करू शकतील. ह्याचा अर्थ (implication) असा कि कदाचित पुण्याचा सरासरी मराठीत व्यक्त होणारा फेसबुककर हा मुंबईच्या तश्याच फेसबुककरापेक्षा श्रीमंत आहे, म्हणून तो जास्त करवादतो आहे.

अजून एक शक्यता अशी कि ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम अजून पुरेसे स्पष्ट नाहीत. वर्तमानपत्रे कोण्या एखाद्या नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांचा बाईट छापून आणतात ज्यांत संभाव्य दुष्परिणामांची जंत्री असते. पण जर शास्त्रीय शोधनिबंधांची एक प्राथमिक छाननी केली तर असं दिसतं कि ध्वनीप्रदूषणाचे शारीरिक दुष्परिणाम हे धूम्रपानाच्या दुष्परिणामांसारखे जोरदार सिद्ध झालेले नाहीत. लोक आवाजाशी जुळवून घेऊ शकतात (adopt) ही दुष्परिणाम फिके करण्यातली मोठी बाब असावी. धूम्रपानाबाबत उत्पन्नपातळीवर अवलंबून नसलेले प्रतिकूल जनमत आहे आणि त्यामुळे धूम्रपान हे सामाजिक स्पेसमधून झपाट्याने हद्दपार झाले आहे, होत आहे. पण गोंगाटाबाबत अशी व्यापक जनप्रतिकूलता नाही.

मी आवाजाशी कसा जुळवून घेऊ लागलो ह्याचा अनुभव सांगतो. (त्यानेच हा लेख पुरेसा अवैचारिक होतो आहे.) मागची अनेक वर्षे गणेशोत्सवाचा काळ तसेच उन्हाळ्यातील लग्नसराईचा काळ मी अत्यंत ताणाखाली घालवतो. रात्री उशिरापर्यंत चालणारे वाद्य-संगीत ह्यामुळे मला हा ताण सहन करावा लागतो. असा आवाज निर्माण करणाऱ्या आणि त्याचा आनंद घेणाऱ्या लोकांना विकृत ठरवावे, त्यांना वाईट परिणाम सहन करायला लागावेत अशी मनोकामना करावी अशा प्रतिक्रिया माझ्या मनात ह्या आवाजाने झोप न आल्याने चिडचिड होऊन उमटत असतात. पण ह्यावर्षी गणपती विसर्जनाच्या प्रमुख दिवसांत मी बाहेरून असे आवाज येत असतानाही गाढ झोपून गेलो. कारण त्या आवाजाची पर्वा करता येणार नाही इतका जास्त मी थकलेलो होतो. (हे लेख लिहितानाची अवस्थाही थोडी तशीच होती. बाहेर डॉल्बीचा थरथराट सुरु होता, त्याने मला डिस्टर्ब होत होते, पण लिहिताना मला आवाज तेवढा जाणवला नाही. अर्थात पुरेसा जास्त आवाज असेल तर माझी ही स्युडो-शांती टिकली नसती हे आलेच, पण तो मुद्दा नाही.) माझ्या १५ महिन्याच्या अपत्याला हा आवाज कसा झेपेल ह्याबद्दल मी साशंक  होतो. पण अपत्य हा गोंगाट जणू अस्तित्वातच नाही अशा प्रकारे आहे. पंधरा वर्षापूर्वी माझी हृदयरोगग्रस्त आजीही ह्या विसर्जन दिवसात तिचा टीव्ही पहात असायची, जो खरं तर तिला त्या आवाजात तितका ऐकूही यायचा नाही. तिच्या घराच्या भिंती, पलंग आवाजाने हादरत असायचा. पण ती म्हणायची आपण रागावून काय होईल. आपण आपलं काम सुरु ठेवावं.



उपद्रवाला तोंड देण्याचा हा प्रतिसाद मला तेव्हा अत्यंत दुबळा वाटला होता. पण आज मला तिच्या approach चं नीट appreciation करता येतं आहे. I am too turning oblivious to the noise that I have despised so much. The trick about nuisance you cannot change is to not mind it अशी माझी स्थिती होते आहे.

In some sense, it is an essential self-delusion that we all do with ourselves so as not to live an unhappy life. (अर्थात आपलेच नाही तर इतरांचेही असमाधान आपल्यावर ओढवून घेत सगळ्यांनीच त्या असमाधानासाठी क्लेश घेऊन आत्मशुद्धि करावी असे वाटणारे काही अपवाद सोडून.) पण हा सिनिकल पवित्रा बाजूला ठेवून विचार केला तर जाणवणारी गोष्ट ही कि गणपती विसर्जनातील आवाज ह्याविरुद्ध जनमत बनत नाही कारण अनेकांना, बहुतेकांना ह्या आवाजाचा त्रास होतच नाही. काही थोड्यांना तो होतो. अनेकांना त्याची जाणीवच होत नाही किंवा तसे ते राहू शकतात. आणि काही थोड्यांना त्यातून सुखच मिळते.

गोंगाटाच्या बाबतीत प्रतिकूल भूमिका असलेल्यांनी गोंगाट किंवा जास्त आवाज (आपापले मत!) हा तुम्ही त्रास माना किंवा नाही पण तुमची हानी होते आहे हे सिद्ध करणारा पुरावा गोळा केला पाहिजे. Onus is on us! आणि तसा पुरावा गोळा करायला लागणारा प्रयोग गणेशोत्सव आहेच. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आणि आणि ह्या मार्गांच्या लगतचे पण मिरवणूक जात नसलेले रस्ते येथील बालके, विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध ह्यांच्या तौलनिक अभ्यासाने गोंगाट का गोंगाट और परंपरा कि परंपरा सुट्टे करायला मदत होईल. (सध्या ते न निस्तरणारे झांगडे झाले आहे आणि त्यात काही बहाद्दर कार्यकर्ते ‘हा करतो आवाज, कोलला तुम्हाला, आम्हीच धावून येतो वेळप्रसंगी, करा आमचा कल्ला सहन असे वीरश्रीयुक्त आणि समजमुक्त जम्बुरकेही सोडू लागले आहेत.) अर्थात असा तौलानिक अभ्यास सरकार फंड करेल अशी जर कांक्षा असेल तर तो फंड वारला असेच समजावे लागेल.

लोकांचे पुरेसे प्रतिकूल मत निर्माण होत नाही तोवर विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे सामाजिक निवड असेच बघावे लागेल. आपण जसे आपण मत न दिलेल्या सरकारला ‘हे माझे सरकार नाही असे म्हणू शकत नाही (असे म्हणणारे, निवडणूक म्हणजे काय ह्याची समज नसलेले ‘जागृत लोक असतात!) तसेच विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे बघावे/ऐकावे लागेल. शेवटी रस्ता हा सामाजिक रिसोर्स आहे आणि बहुमताची दंडेली हा त्याच्या वापराचा किमान चुकीचा आधार असू शकतो. असो. ह्यावर्षीच्या आवाजाला इथेच निरोप देऊया.

डेसिबलच्या आकडेवारीशिवाय अजून एक इंटरेस्टिंग आकडेवारी म्हणजे २०१९च्या तुलनेत २०२२ मध्ये जवळपास १६% (सहातील एक) कमी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले. तसं ह्यात आश्चर्य काही नाही. सार्वजनिक गणेशोत्सव हा काही आता वर्गणीने साजरा होणारा हिशेबी सामाजिक कार्यक्रम नाही. तो राजकारण्यांनी फंड केलेला राजकीय कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाला लागणारा किमान खर्चही वाढता आहे. त्यामुळे जरी फंड करू शकणारे इच्छुक राजकारणी बरेच असले तरी ते ही गुंतवणूक परताव्याच्या प्रमाणात योग्य ठिकाणीच करत असतात. दुसरं, ज्या सार्वजनिक गणेशोत्सवांना वलय आहे तिथे प्रायोजक, वर्गणी हे केंद्रित होतात आणि ह्या वलयाच्या स्पर्धेत मागे पडलेल्या मंडळांना तेवढे रिसोर्स उरत नाहीत. तसंच हा उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ता गटही घटत जातो आहे. अनेक जुन्या निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांत अशा कार्यक्रमांना आवश्यक मनुष्यबळ शिल्लक नाही. आणि वर सरकलेल्या एक्स-मध्यमवर्गाला (जो स्वतःला चाणाक्षपणे आजही ‘मध्यमवर्ग म्हणवतो) सार्वजनिक होण्यात विशेष रस नाही. त्यांची संस्कृती आहे ती आपापल्या इन्स्टावर.      

म्हणजे पुरेसे पुढे, म्हणजे जिथे भारताचा demographic dividend संपला आहे अशा अवस्थेत, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव कदाचित नसतील. असतील त्यांचेही स्वरूप बदलेलेले असेल. आपल्याला वाटतं त्यापेक्षा आधी आणि त्यापेक्षा नंतर हा बदल येईल. तेव्हा डॉल्बी वाजेल का? झिंगाट, बोटीने फिरवणारा नाखवा तेव्हा असेल का? तेव्हा गणेशोत्सव पावसाळ्यात असेल का उन्हाळ्यात? आपण असू का? (आणि ती श्रेष्ठ कादंबरी तोवर तरी आलेली असेल का?)

हं. एवढे मनोरंजन सध्या पुरे आहे.

 

Tuesday, January 18, 2022

Chinua Achebe ह्यांची Things Fall Apart

 नुकतीच मी Chinua Achebe ह्यांची Things Fall Apart ही कादंबरी वाचून संपवली. १९५८ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आफ्रिकन इंग्रजी साहित्यातील महत्वाची कादंबरी मानली जाते.

नायजेरियातील Igbo लोकसमूहाचे जीवन, त्यांच्या श्रद्धा आणि मूल्ये, आणि युरोपियन वसाहतवादातून येणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या दबावाने ह्या श्रद्धा आणि मूल्यांत होणारे बदल – प्रामुख्याने त्यांचे ढासळत जाणे ह्याचं चित्रण कादंबरीत आहे.

प्रतिमा - इथे 

For all the fame of the novel, it is a very straightforward and compact read. पेपरबॅक आवृत्तीत कादंबरी १५२ पानांची आहे. गोष्ट अगदी मोजक्या पण अचूक तपशीलांतून आपल्यासमोर येते. अनेक Igbo संज्ञा आणि नावे असूनही त्याचा वाचताना फार त्रास होत नाही. Igbo म्हणी/वाक्प्रचार चपखलपणे जागोजाग येतात. It is a beautiful quick read that can lead to some deep reflections, if it reaches to one.

--

मला पुस्तक वाचताना आठवलेली अन्य पुस्तके/सिनेमे म्हणजे महाबळेश्वर सैल ह्यांची तांडव, द लास्ट समुराई (सिनेमा) आणि अनिल बर्वे ह्यांचं डोंगर म्हातारा झाला. तांडवला Things Fall Apart सारखीच वसाहतवादी धर्मांतरणाची पार्श्वभूमी आहे. पण तांडवमध्ये प्रचंड आक्रोश आहे. Things Fall Apart is in that sense is a creation of higher order. त्यांत क्रोध आहे, पण तो धुमसणारा नाही. क्रोधाचे, त्यातून येणाऱ्या कृतीच्या प्रेरणेचे, आणि आपली कृती किती थिटी, किती य:कश्चित, जे चाललं आहे त्याला तसूभरही न बदलणारी आहे ह्या जाणीवेतून येणाऱ्या कडवट शांततेचे चित्रण प्रचंड निर्विकारपणे केलेले आहे. ह्या निर्विकार चित्रणाला शेवटी एका अचूक फटकारा तेवढा दिलेला आहे. तांडव – त्या तुलनेत बंबाळ आहे, आणि वाचताना हा प्रश्नच पडतो कि हे लोक एवढे रडत राहिले, तेव्हा लढले का नाहीत? आपल्याला मोलाचे आपल्याकडून हिरावले जात असताना त्या बदलाचा हुंदके देत स्वीकार करणं ही निवड बुचकळ्यात पाडते. There is no fight.

द लास्ट समुराई किंवा डोंगर म्हातारा झाला मध्ये ही फाईट आहे. आपल्या कृतीने आपले वांछित ध्येय गाठायला काहीही मदत होणार नाही किंवा परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही हे दिसत असतानाही आपण जे करू शकतो ते झोकून देऊन करण्याची irrational but spectacular निवड ही फारच striking गोष्ट आहे.

--

आपल्या आधुनिक व्यक्तिवादी मूल्यांत अशा वेडेपणाला फार जागा नाही. The concept of standing one’s ground for one’s beliefs is lost to us. हवंतर जे हरवणार, संपणार आहे त्याचा शोक करावा, अगदी अशा शोकाची नशा करावी, पण आपल्या आयुष्यात तसूभर फरक न पडू द्यावा असे आता आपण जगतो.

आपल्याभोवती जे चाललं आहे त्याचं वर्णन करणारी जी मॉडेल्स असतात त्यातलं एक मॉडेल आहे ते म्हणजे – anywhere आणि somewhere चं. आपली आधुनिक मूल्ये ही anywhere वाल्यांची आहेत. खूप औपचारिक शिक्षण घ्या, खूप वाचा किंवा पहा, आपल्याला जे हवं ते करण्यासाठी – जे आपणच ठरवायचं आहे – जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण कुठलेही होऊ नका, कायम fluid अशी नैतिकता ठेवा, कशाला कमिट होऊ नका, कारण आपण बुडत्या बाजूला असू तर आपलेच नुकसान असे हे anywhere लोक. ह्या निखळ स्वनिर्धारित मूल्यवस्थेत मी कोणत्याच बाह्य गोष्टीला अनुसरून जगत नाही. त्यांची प्रसंगोपात नैतिक भूमिका हीही त्यांच्या करिअरचा एक भाग असते, it is just an act they choose to play and can abandon if there are enough incentives.

--

ज्या William Yeats च्या कवितेतून Chinua Achebe ने आपल्या कादंबरीचे नाव दिले आहे, त्या कवितेत हा हरवण्याचा सूर जबरी आहे. Chinua Achebe ने आपली कादंबरी इंग्रजीत लिहिली, प्रादेशिक भाषेत नाही, just a point to note.

 

The second coming by William Yeats (इथून घेतली आहे – लिंक) – पुढे दोन कडव्यांपैकी पहिले आहे.

 

Turning and turning in the widening gyre  

The falcon cannot hear the falconer;

Things fall apart; the centre cannot hold;

Mere anarchy is loosed upon the world,

The blood-dimmed tide is loosed, and everywhere  

The ceremony of innocence is drowned;

The best lack all conviction, while the worst  

Are full of passionate intensity.

Saturday, May 1, 2021

The Disciple नंतर

‘प्रेस्टीज’ च्या सुरुवातीला आपल्याला कळतं कि कोणत्याही जादूच्या प्रयोगाचे तीन भाग असतात, the pledge, the turn and the prestige. एक दाखवलं जातं, मग त्याला अनपेक्षित कलाटणी मिळते आणि मग अपेक्षित आणि अनपेक्षित जुळून येतं. ‘The Disciple’ हा तसा प्रयोग आहे, फक्त जादूचा नाही, तर माणसाने आपली औकात समजून घेण्याच्या चिरंतन प्रश्नाचा. त्यासोबत ‘कला नावाचा प्रकार आणि मार्केटशाहीच्या युगात त्याची peer reviewed system पासून मतदान/लाईक्स सिस्टीम पर्यंत होणारी वाटचाल ह्यावर चित्रपट बकुबी भाष्य करतो. हे भाष्य subtle आहे, आणि त्यामुळे प्रभावी आहे. पण ह्या subtle approach मुळे हा चित्रपट एका मर्यादित वर्तुळाचा असणार आहे. Netflix वर रिलीज करून त्यांनी ह्या दृष्टीने अचूक काम केलेलं आहे.   

चित्रपटात जोशी नावाच्या माणसाचे काही मिनिटाचे संवाद आहेत तो चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही हे ‘सांगणं हे मला गरज आहे हे सांगणंच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे. राजकीय नेते जेव्हा होणार नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ शक्यता आहे असा असतो, शक्य आहे म्हणजे करायला सुरुवात केली आहे असा असतो आणि जे करणार आहेत ते सांगतंच नाहीत, कारण अनपेक्षित असणं हेच प्रतिस्पर्ध्याला चकवायला महत्वाचं असतं तसं ‘मला नकोय अमुक अमुक हे सांगण्यात मला हवंय हाच सिग्नल असतो. ज्याला अशी गरज नाही तो सांगायला म्हणून तरी कोणाला का शोधेल? कलाकाराची आत्ममग्नता हा त्याच्या परफॉर्मन्सचाच भाग असतो आणि तो परफॉर्मन्स हा दुसऱ्या कोणासाठीच असतो. कलेच्या व्याख्येतच ती निर्माण करणारा आणि तिचा आनंद घेणारा अशी दोन टोके आहेत.

पण ह्यातल्या एका टोकाला वाटतं कि ते स्वायत्त आहे. त्यांचा असा गंड सांभाळणारे लोकही असतात, जे खरं दुसरं टोक असतात, पण ते स्वतःला अदृश्य करतात. त्यांना पहिल्या टोकाकडून मिळणारं मनोरंजन पुरेसं असतं.

संगीताच्या बाबतीत सोशल मिडियामुळे कोण कलाकार ह्याची व्याख्याच बदलली आहे. आधी तुम्ही पुरेसे कलाकार आहात का नाही ह्यावर तुमच्या जेष्ठ peers चा बराच प्रभाव होता. मुळात शिष्याचे कौशल्य आणि कारागिरी ही शिक्षकांच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून होती. आणि त्यांच्या हाती असलेल्या ह्या पॉवरमुळे ह्या जेष्ठांचा आदर ही आवश्यक नीती होती. तुम्हाला सुरुवातीला मिळणारा रिलीज हा ह्या रेफेरीजच्या तुमच्या बद्दलच्या मतांवर, feedback वर अवलंबून होता. तुम्ही कलाकार आहात का नाही हे तेच ठरवणार होते. दुसरा पर्याय काय होता? लोकांनी वाहवा दिली असती, पण उपजीविका?

आज तर मी ‘कलाकार आहे का नाही हा स्वतःच ठरवायचा मामला आहे. मला वाटत असेल मी अमुक अमुक करू शकतो तर मी तो आहे असं आपण म्हणतोच. आणि एखाद्याला तू तसा नाहीस हे सांगणं म्हणजे हिंसाच हेही नवे मूल्य आपण आणलेले आहे. क्रिटीकल, मन दुखावणारा feedback देणं हे आपण सुजाण व्हायच्या नादात थांबवलेलं आहे. आणि कोणी दिलाच असा feedback तर आपण दुसऱ्या कोणाला तरी गाठू शकतो. फी दिली कि मला हो म्हणणारा कोणीतरी असेलच. आणि कोणी हवा कशाला, मी थेट स्वतःला रिलीज करून लोकांच्या लाईक्सचा सर्वोच्च निकष थेटच ताडून पाहू शकतो.

शिक्षकांची, जेष्ठ peers ची सद्दी ही अनेक क्षेत्रांत संपुष्टात येते आहे. तुम्ही स्वतःला स्पर्धेत थेट सहभागी करू शकता. कोणीतरी तुम्हाला निवडायची गरज नाही. अर्थात काही क्षेत्रांत अजूनही निवडीच्या शुक्राचार्यांना वाव जास्त आहे (खेळ, academia इत्यादी.)

लोकांच्या रिंगणात थेट उतरताना कौशल्य आणि रंजकता ह्याचं मिश्रण तुमच्याकडे असायला लागतं. पण दर्दी लोकांच्या खाजगी रिंगणात रंजकतेला फारशी किंमत नाही. लोकप्रिय आणि उत्कृष्ट ह्यांचे नाते असे विचित्र आहे. एखादी गोष्ट उत्कृष्ट आहे कि नाही हे ठरवायला तिला मोठा ट्रायल पिरीयड लागू शकतो. पण लोकप्रियतेच्या बेभान स्टेडीयमला एवढा वेळ नाही. जिंकण्या-हरण्याच्या स्पर्धेची प्रत्येक आवृत्ती थोडाच वेळ आहे आणि तुम्हाला मर्यादित attempts आहेत. आणि परत जे उत्कृष्ट असेल ते रंजक असेल असे नाही.

हा क्वालिटीचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जास्त फंडामेंटल आहे. तो म्हणजे  How to make peace with one’s own mediocrity. You are good at something and maybe you touch the best at time, but not consistently to call yourself best. मग तो बेस्टचा पाठलाग करायचा का त्याला खुबसुरत मोड देकर सोडून द्यायचं? आपला आणि त्या विलक्षण क्षणांचा संबंध आपल्या आनंदापुरता ठेवायचा आणि स्पर्धेतून अलगद अदृश्य व्हायचे? का गिरवत रहायचे, अपयश हे यशाची पायरी असे अपयश दाबत दाबत वर सरकायचे? पण हा वर सरकायचा स्पीड पुरेसा नसेल तर? मग करायचं काय?

लोक साधना, सत्य वगैरे ढाचे देऊ शकतात, पण ही सगळी आंबट द्राक्षांची वाईन. त्याचीही मजा आहे, पण वाईन बनून टुन्न होईपर्यंत फार उलाघाल.

किंवा मग आपलं काही न झाल्याचा कडवटपणा मनात ठेवून आपल्या अस्तित्वात तो हळूहळू मुरू द्यायचा. तसं उघडपणे काही म्हणायचं नाही, पण होईल तसा जगावर सूड उगवायचा, जो/जे समोर असेल त्याच्यामार्फत.

संजय मांजरेकरचं आत्मचरित्र ह्याबाबतीत मला फार आवडलं. त्याने फार प्रामाणिकपणे त्याची असूया, असुरक्षितता मांडली आहे. आणि कडवट अस्तित्वाचे तो एक उत्तम उदाहरणही आहे कदाचित!

काहीही करून, आपल्याला आपल्या तोकड्या असण्याच्या जाणिवेचे काहीतरी करावेच लागेल. एकतर तोकडे नसण्याच्या किनाऱ्याला जायला, without rope वगैरे छलांग मारावी लागेल (जसं batman करतो, माई म्हणतात), किंवा खुबसुरत मोडवर मागे परतून आपल्यापुरते आनंदाचे वर्तुळ आखायला लागेल, किंवा कडवट, सिनिकल होत जाण्याचा स्वाभाविक मार्ग.

असं करूनही केव्हातरी आपल्याला ते खुणावतच राहील, what it could have been, how beautiful it can be.

Well done, चैतन्य ताम्हाणे. I will be looking forward to your next.    

Wednesday, January 20, 2021

तांडव म्हैसूर मसाला

मुंबईत म्हैसूर मसाला नावाचा प्रकार डोश्यांच्या विक्रेत्यांकडे मिळतो. खाद्यगृहांपेक्षा तो रस्त्यावर चांगला मिळतो. बहुतेक ठिकाणी म्हैसूर मसाला म्हणजे डोसेवाल्याकडे असणाऱ्या अनेक गोष्टी, ज्या डोश्यावर शिजवल्या जाण्याजोग्या आणि खाण्याजोग्या असू शकतात अशांचे एक मिश्रण आणि त्यावर बटर-चीज-पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे किमतीच्या औकातीनुसार फवरण आणि आवरण असा प्रकार असतो. म्हैसूर मसाला बनताना बघायला फार गंमतीचे वाटते. म्हैसूर मसाला खाताना तेवढी गम्मत वाटत नाही, कारण काही घासानंतर घशाला लागलेल्या स्निग्ध पदार्थावरून सारे सहज पोटात घसरत आहे असेच वाटू लागते. आणि ह्या डोश्याला म्हैसूर मसाला का म्हणतात (ज्याला मयसूर असे पुकारले जाते) हे आपल्याला आपल्या खायच्या अनुभवावरून फारसे कळत नाही. ‘तांडव’ नावाचा प्रकार Amazon Prime वर बघताना मला म्हैसूर मसाल्याची आठवण येत राहिली.

ह्यातही ‘तांडव का म्हटलं आहे हे फार कळत नाही. अगदीच मयसूर डोसा होऊ नये म्हणून शेवटला तांडव नावाची एक पार्टी उत्पन्न होते. पण ‘तांडव च्या ऐवजी ‘X XX’ किंवा ‘मांडव किंवा ‘(स्मार्टफोनला) बोट लावेन तसा मुडदा असं काहीही नाव चाललं असतं. फक्त ही सगळी गोष्ट एका काल्पनिक देशांत चालली आहे असं दाखवलं जायला हवं होतं. मला खरंच हे कळत नाही कि भारताच्या पंतप्रधान पदाच्या भोवती कौटुंबिक कारस्थान आणि ईर्ष्या ह्यांची गोष्ट का दाखवायची? त्याने जे बनवलं आहे त्याच्या गुणवत्तेत काय भर पडली?

विवादास्पद विधाने, प्रसंग हा मसाला अगदी व्यवस्थित मुद्दामून भरलेला आहे. भावना दुखावल्याचे सावज अडकावे म्हणून लावलेला आणि किंचितही न लपवलेला तो सापळा आहे. फक्त हुशारी ही आहे कि विविध दुखावल्या भावनांची सावजे एकत्र येतील, म्हणजे देवता-जात-राजकीय पक्षांचा भूतकाळ, अशी छान म्हैसूर मसाला चलाखी दाखवलेली आहे. पण सांस्कृतिक भुवया आणि खालच्या अवघड जागा ह्यांना न झेपणारा सेक्स टाळलेला आहे. अमुक एका पालकासोबत संभोग किंवा गुदद्वाराशी वेदनादायी शारीरिक क्रिया ह्यांबद्दलच्या धमक्या, विविध प्रकाराने दाखवता येऊ शकणारा रक्तपात, नाकातून सेवन करायचे घातक पदार्थ, कर्करोगास कारण धूम्रपान आणि बौद्धिक संतुलनाला धोकादायक मद्यपान हे चालेल, पण सेक्स हा केवळ फोरप्ले आणि त्यातूनच समाधी असा अध्यात्मिकच आला पाहिजे हे आता आपल्या सिरीजचे नवे सत्व आहे.

सिनिसिझम सोडा, It could have been decent thriller, पण मागच्या दोन वर्षांत वृत्तपत्रात आलेल्या प्रत्येक बातमीचा एक भाग गोष्टीत पाहिजेच अशा अट्टाहासाने माती झालेली आहे. मला आवडलेला भाग आहे ते एका नेत्याच्या स्वीय सचिवाचे पात्र. तुला आपल्या कामामुळे अनेक अनैतिक गोष्टी कराव्या लागतात त्याची तुला खंत वाटत नाही का असे विचारल्यावर तो जे उत्तर देतो ते खास आहे. तेवढ्यासाठी मला सारे एपिसोड बघितल्याचे वाईट वाटणे एकदम संपलेले आहे. मनुष्यात आपण केलेल्या कोणत्याही कृत्याच्या खेदापासून मोकळे होण्याची स्वाभाविक वृत्ती असते, आपल्या अनैतिक कृत्यांची टोचणी लागून मकबूल होणारी माणसे हे आपल्यातल्या काही हुशार लोकांनी बाकीच्यांना दाखवलेले बुजगावणे आहे असं मला वाटतं. अशा आशयाची लाईन पकडणारे काही बघायला मिळाले मजा वाटली. मयसूर मसाला डोसा खाताना बीटरूट खाऊ शकलो असा आनंद मला वाटतो तसाच हा आनंद आहे.

स्त्रोत: इन्टरनेट 


Tuesday, December 8, 2020

कोव्हीड-१९ च्या संदर्भाने काही स्फुट लिखाण

 

मी हे लिहितो आहे तेव्हा रात्रीचे ११ वाजत आले आहेत. माझ्या घराजवळ हलदीचा किंवा कोणतातरी कार्यक्रम चालू आहे जिथे चालू असलेल्या गाण्या-बजावण्याचा आवाज मला बंद खिडक्यांतून स्पष्ट ऐकू येतो आहे. लग्नसराईच्या मौसमात दरवर्षी येतो.

मला मार्च-एप्रिल महिन्यांत कोव्हीड-१९ नंतरचे जग कसे बदललेले असेल असे काही बोलणाऱ्या लोकांची, त्यांच्या लेखांची आठवण येते आहे. त्यांनी आपापले स्वप्नरंजन आपापल्या योग्य ठिकाणी सांभाळून ठेवावे असे म्हणायची अनावर इच्छा होते आहे! पॉज आणि बदल ह्यातला फरक न कळणारे लोक मला ह्या निमित्ताने ओळखता आले. ह्यातले काही फेमस प्रकार इथे यादीत आणण्याचा मोह आवारत नाही.

1.     कोव्हीड-१९ नंतर लोक आरोग्यावर अधिक खर्च करू लागतील कारण ते आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग होतील. तुम्ही मास्क लावण्याच्या बाबतीत लोकांचे गांभीर्य पाहिले तरी ह्या क्लेममधील बालिशपणा लक्षात येऊ शकतो. काहीजण नक्कीच अधिक घाबरट होतील. इंग्रजीत अत्यंत व्याकूळ एस्से लिहिणाऱ्या एक बाई त्यांच्या Twitter वर शंका प्रकट करत असतात. आजच त्यांनी विचारले आहे कि स्विमिंगपूलमध्ये जायला काही हरकत आहे का. त्यांना मुंबई-पुण्याजवळील विकेंड स्पॉट दाखवावेत का?

2.     अनेक नोकऱ्या वर्क फ्रॉम होम होतील. मोठ्या शहरांचे महत्व उरणार नाही वगैरे वगैरे. जश्या जश्या केसेस कमी होत आहेत आपल्यातल्या बहुतेकांचा ऑफिसला जायचा दिवस जवळ येत आहे. आणि केवळ employer नाही तर employee नाही ऑफिसला जायचे आहे. प्रौढ स्त्री पुरुषांना आपापले व्यक्तिगत आयुष्य जगता यावे ही मोठी बाब ऑफिसेस आणि शाळा साध्य करतात. अनेक पालक पाल्यांना शाळेत पाठवायला उत्सुक आहेत आणि अनेक कर्मचारी ऑफिसेसला जायला, अर्थात कम्युट परवडत असेल तरच! मोठ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीने वागण्याची खात्री नाही आणि अनेकजण एकाचवेळी आजारी पडले तर त्यांचेच नुकसान आहे ह्यापायी त्यांनी ऑफिसेस अजून सुरू केलेली नाहीत. जशी लस ही भीती घालवेल ऑफिसेस परत सुरू होतील. डिसेंबर २०२१ ला आपण वर्क फ्रॉम होमच्या सुरम्य आठवणीत रमलेले असू आणि गेले ते दिवस (आणि हजारो कोव्हीड-१९ रुग्ण) असे सुस्कारे टाकत असू अशीच शक्यता आहे.

3.     गावाकडे परतलेले लोक धास्तीने परत शहरांत येणार नाहीत. असे परतलेले स्थलांतरित हे रिसोर्स ठरतील आणि त्यांना वापरून आपापल्या राज्यांचा विकास करू अशा योजनाही कुठे कुठे बनल्या होत्या.

मला स्वतःला कोव्हीड-१९ हा आपली जगण्याची पद्धती बदलून टाकणारा प्रकार ठरणार आहे असं कधीच वाटलं नाही. जेव्हा आपल्याला एखादा अनुभव अंतहीन वाटतो तेव्हा आपण त्या अनुभवाशी जुळवून स्वतःत बदल करतो. एखादा अनुभव हा मर्यादित काळासाठी आहे ह्याची जाणीव आपल्याला असते तेव्हा आपण फारसे बदलत नाही. कोव्हीड-१९ च्या साथीच्या सुरुवातीपासूनच ह्या संकटाचा एक शेवट आहे हे आपण सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं. लस हा तो शेवट असेल असं बहुतेकांचं म्हणणं आहे. पावसामुळे क्रिकेट सामन्यात व्यत्यय यावा, पण काही वेळाने तेवढ्याच ओव्हर्सचा सामना खेळवला जावा तसं.

आपण किती दुःखी होऊ शकतो हे आपण overestimate करतो. आपण खरे सुखशोधक भिरभिरे फुलपाखरू आहोत. अगदी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यूसुद्धा आपल्याला बदलत नाही, आपल्यावर कायम राहणारे व्रण पाडत नाही. मृत्यूपेक्षा त्या मृत्यूपूर्वीची प्रोसेस जर लांबलचक आणि अंतहीन (म्हणजे नेमकी केव्हा संपणार हे न कळणारी असेल) तर आपल्यावर आपल्या नकळत घाव साचत जात असावेत. पण तेही मिटू शकतात, जर आपण त्यांना नंतर गिरवत बसलो नाहीतर.

आपण ह्या पृथ्वीतलावर आहोत ते आपल्या पुढची पिढी पृथ्वीतलावर असेल हे आपल्या प्रजननातून नक्की करायला. हे प्रजनन आपल्या सुखाच्या शोधातून घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे सुखाच्या शोधाची अनिर्वचनीय तहान आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्या आजुबाजूच्यांचे मरण किंवा वेदना ह्यांपासून आवश्यक निब्बर असण्याची क्षमताही आपल्यातील बहुतेकांना दिलेली आहे. आणि ह्यात काही सिनिसिझम नाही. आपण जर दुसऱ्याच्या वेदनांनी कोलमडत असतो तर आपण त्याला मदतही करू शकलो नसतो. आपण दुसऱ्याला मदत करण्याकडेही एक काम म्हणून बारकाईने पाहू शकतो, पाहण्याचे शिकू शकतो ते ह्या निसर्गदत्त अलिप्त जाणीवेनेच.

कोव्हीड-१९ हा आपल्या जगण्याच्या पद्धतीत, आपल्या सुखशोधांच्या प्रवासात फारसे बदल घडवणार नाही असं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे ह्या आधीच्या भयानक रोगसाथींचे कोणते परिणाम आपल्याला आजवर आपल्यावर दिसतात असं विचारल्यावर दिसणारा अभाव. १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अनेकजण मुंबई सोडून आपापल्या गावी परत गेले होते, प्लेगच्या साथीमुळे. पुढच्या वर्षी परत आले. परत फ्ल्यूच्या साथीत गेले असतील, परत आले. ह्यावेळचा मृत्यूदर आणि दळणवळण तर ह्या साथींच्या काळाहून चांगले आहे.

मला स्वतःला वाटतं कि माणसांच्या वर्तनात मूलभूत बदल झालेलेच नाहीत. बदल वाटतो तो संधीचा अभाव आहे. जश्या संधी आल्या आहेत तसे आपण आपल्या सुखलोलुपतेकडे परत गेलो आहोत. किंवा बदल असेल तर एकच आहे. आपल्यातील काही जण, जे एक क्रिटीकल गट आहेत, ते मानवी समूहाच्या साऱ्या समस्यांकडे एक कोडे म्हणून बघतात आणि त्याच्या उकलीच्या पाठी लागतात. ही जाणीव सुरुवातीपासून नसावी असं वाटतं. आपण आपल्या समस्येकडे उकल असलेले पण शोधावी लागणारे कोडे म्हणून पाहू लागलो कि आपली वर्तन बदलाची शक्यता अजून कमी होते. आपण केवळ पॉज म्हणून काही बदल करतो, जे सोडायला आपण कायम अधीर असतो.

कोव्हीड-१९ मुळे आपल्यांत काहीही मूलभूत बदल झालेला नाही असं वाटायचं अजून एक कारण म्हणजे कोव्हीड-१९ मुळे जे बदल होतील असं काहीजण म्हणत होते त्यातल्या अनेक गोष्टी कोव्हीड-१९ पूर्वीही शक्य होत्या, जसे वर्क फ्रॉम होम. जर वर्क फ्रॉम होम ऑफिसमध्ये काम करण्याहून किफायतशीर असेल तर कंपन्या ते अगोदरच करत्या. त्यांना कोव्हीड-१९ साठी थांबण्याची गरज नाही. आणि त्या करत नव्हत्या ह्याचा अर्थ असे करणे ही बेस्ट निवड नाही.

--

मी बदलणार नाही, बदलणार नाही असं जे म्हणतो आहे त्याचा अर्थ मानवी वर्तन बदलतच नाही असे नाही. मानवी वर्तन बदलायची एक स्वाभाविक दिशा आहे, जीवन अधिक सुखी होण्याकडे, सोपे होण्याकडे आपण येतो. धोतराकडून pant कडे आलो ती दिशा, पत्र टाकण्यापासून स्मार्टफोनपर्यंत आलो ती दिशा. कोव्हीड-१९ च्या साथीत अशा बदलांचे काही पोटेन्शियल होते असे मला वाटत नाही.

अर्थात बौद्धिकदृष्ट्या जे म्हटलं जातं ते टोकाचं असतं, approximation असतं. प्रत्यक्षात छोटा पण पक्का अपवाद दिसून येते, जो तथ्याला अधोरेखित करतो.

कोव्हीड-१९ मुळे मानवाच्या आयुष्याच्या दोन टोकांवर मोठा परिणाम झाला असं मला वाटतं, एक म्हणजे लहान मुले आणि दुसरे म्हणजे वृद्ध. हे परिणाम लगेच दिसत असतील असे नाही. पण हे परिणाम झाले असावेत.

अनेक लहान मुलांचे घराबाहेरील खेळणे-बागडणे सुमारे ६-७ महिने बंद होते, काही जणांचे आजही बंद असेल. मला असं वाटतं कि अजून काही वर्षांनी, म्हणजे अजून १४-२० वर्षांनी आपल्याला अधिक एकारलेल्या प्रौढ व्यक्ती मिळतील का? आणि भारतात आज उभरती असलेली आक्रमक धार्मिक राष्ट्रवादाची कमान उतरती होण्याची किंवा अजून तीव्र होण्याची सुरुवात ह्या कोव्हीड-१९ च्या काळांतल्या एकारल्या प्रौढांनी होईल का?

वृद्धांच्या बाबतीत घरातील त्यांची घटलेली स्पेस (३ वा २ पिढ्या असणाऱ्या घरातील वर्क फ्रॉम होम अवस्था) किंवा त्यांचे अधिक अधोरेखित एकटेपण (एकटी राहणरी वृद्ध जोडपी किंवा व्यक्ती) ह्या गोष्टी त्यांच्या जीवनेच्छेवर किंवा त्यांच्या स्वतःच्या उतारवयातील अपेक्षांवर परिणाम करतील का? एरवीही मला स्वतःला वृद्धत्व ही फारच कोड्यात टाकणारी बाब वाटते. एकतर बहुतेकांसाठी आयुष्याची ही वर्षे म्हणजे समुद्रातून भरावाने जमीन बनवावी असा कृत्रिमच प्रकार असतो. एक समाज म्हणून आपण समाजाच्या वृद्धत्वाची मोठी किंमत मोजतो. त्यांत भारतासारख्या देशांत, जिथे वृद्ध त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र व्यवस्थांमध्ये राहण्याची शक्यता फारच कमी असते तिथे वृद्ध हे विषमतेचे वाहक बनतात. ज्या कुटुंबाना स्वस्थ वृद्ध सदस्य मिळतात त्यांची बालसंगोपन आणि शिक्षण ह्यांची अवस्था सुधारू शकते. बाकी कुटुंबाना हा फायदा मिळत नाही.

मी कायम एक चमत्कारिक विचार करतो. समजा भारतातून ६५ वर्षावरील वृद्ध नष्ट झाले तर उरलेल्या भारतीयांवर त्याचा काय परिणाम होईल? एक गोष्ट निर्विवाद आहे कि उरलेल्या समाजाची भौतिक समृद्धी जास्त असेल. मला तर असंही वाटतं कि आपली आयुर्मर्यादा घटली तर आपण अधिक जबाबदार होऊ. आपलं लांबलचक आयुष्य हे आपल्याला ‘आहे रे अजून वेळ अशीही जाणीव देतं आणि नंतर सुस्कारे टाकून आंबट द्राक्षांशी खेळायलाही खूप वेळ देतं.

माझं स्ट्रेंज भाकीत असं आहे कि कदाचित ७० च्या आसपासच्या वयोगटातील मृत्यूदर कोव्हीड-१९ नंतरही जास्त असेल आणि त्याचं कारण मानसिक असेल. किंवा भारतातील वृद्ध अधिक एकारलेली जीवनशैली अंगिकारतील.

--

लॉकडाऊननंतर जेव्हा बार परत सुरू झाले तेव्हा उत्सुकता म्हणून मी खायचे पार्सल आणायला एका बारमध्ये गेलो. (मला स्वतःला अजून बाहेर जाऊन गटात काही खाण्या-पिण्याचे धाडस झालेले नाही.) आणि तो बार शिगोशिग भरलेला होता. मद्यधुंद लोकांचे उंचावलेल्या स्वरातील बोलणे, ग्लास आणि प्लेट्सचे आवाज हे तसेच होते जसे लॉकडाऊनच्या आधी. टेबलांवर एकमेकांच्या जवळबसून, मास्क गळ्याशी उतरवून किंवा अजिबातच लांब ठेवून लोक गप्पा मारत होते, खात होते, दारू पीत होते. लोक कसे निर्णय घेतात ह्याची एक चांगली झलक मला मिळाली.

कदाचित आपण आपल्या सुखाच्या शोधासाठी अधिक कमिटेडच होऊन जावू. आणि अधिक एकारलेले, अधिक अलिप्त. कदाचित आपण नाही, पण आपली अपत्ये तशी होतील. आपण एकमेकांच्या खूपच जवळ आल्याने आता परत आपापल्याकडे परत जावे अशीच अनेकांची अवस्था झाली आहे का? व्यक्ती म्हणून आपली जाणीव टोकदार होत जाण्याचा जो प्रवास अखंड चालू आहे तो अधिक वेगवान होईल का? मला स्वतःला तरी स्वतःबद्दल असं वाटतं. पण कदाचित ही एक केवळ निसटती जाणीव असावी.

कारण लॉकडाऊनचा काळ, त्यातील कमी वर्दळीची अवस्था, शांत रात्री, सारेच जण घरात अडकून असल्याने आणि एकाच प्रश्नाकडे पाहत असल्याने निवलेली तौलनिक जेलसी, शमलेली चुरस हे सारे आता निसटून चालले आहे.

माझे वृद्ध आई-वडील सुमारे ६ महिने घराबाहेर पडले नव्हते. मला त्यांना आता थांबवून ठेवता येत नाही. असं वाटतं कि होऊन होऊन काय होईल? काहीही होण्याच्या साऱ्या शक्यतांकडे मी थोड्या शांततेने पाहू शकतो.

मे-जून महिन्यांत मास्कशिवाय कसे काय लोक वावरतात ह्या जाणीवेने मला सिरीयल आणि सिनेमेही पाहता येत नव्हते. आता तसं वाटत नाही. नाकाखाली घसरलेला मास्क लावून चालणारी, वाट पाहणारी, एकमेकांशी बोलणारी माणसे मला मानवी अस्तित्वाची सरासरी वाहक वाटतात. ‘नाश के दुख से कभी मिटता नही निर्माण का सुख ह्या रोमांचक वाटणाऱ्या ओळी ह्या अशा नाकाखाली, हनुवटीखाली मास्क घेऊन वावरणाऱ्या लोकांसाठी आहेत असं वाटतं.

--

माझ्या आसपासच्या रस्त्यावर पुस्तकांचे दुकान असलेले, अनेकांचे परिचित असे एक काका होते. ते कोव्हीड-१९ ने गेले. परवा रस्त्यात चालता चालता अचानक ते दिसल्याचा, हसल्याचा मला भास झाला. कोव्हीड-१९ नसता तर कदाचित मी त्यांना अजून वृद्ध होताना पाहू शकलो असतो, जाता-येता त्यांना हात करू शकलो असतो, काही बोलू शकलो असतो.

Daniel Kahneman च्या TED talk मध्ये तो म्हणतो कि आपल्यात दोन स्व असतात: कि अनुभवणारा आणि एक ते अनुभव आठवणारा. मला तो मनुष्य दिसला असे वाटणारा मी तिथेच उभा आहे, आपले काही आनंददायी आपल्या नकळत हरपल्याची टोकदार वेदना घेऊन. आणि हे आठवणारा मी पुढे जाऊन कांदे-बटाटे विकत घेतो, घरी येऊन ऐकू येणाऱ्या गोंगाटाने चिडून, थोडा निवून लिहितो. लिहिणं पूर्ण झाल्यावर येणाऱ्या रिक्त जाणीवेत कोव्हीड-१९ ची सावली हळूहळू माझ्याकडे सरकते असं मला दिसतं.

कोरोना व्हायरस कदाचित माझ्या शरीरातून एखादा प्रवास करून गेला असेल, पण तो हळूहळू माझ्या जवळजवळ येतो आहे अशी जाणीव मला कधीकधी होते. काम्यूच्या The Plague मध्ये मंदावत जाणाऱ्या प्लेगच्या शेवटच्या लाटेत Tarrou अचानक सापडतो, किंवा कोसळत्या Balrog च्या शेवटच्या तडाख्याने Gandalf पडावा तसे आपले होईल का असं मला वाटतं. मग सांख्यिकी मला धीर देते, कोव्हीडची सावली अगदी फिकट करून सोडते.

दिवसभर प्रवास करून एखाद्या नव्या शहराकडे जाताना उशिरा रात्री, त्या नव्या शहरातील निर्मनुष्य रस्त्यांवर पत्ता सापडू नये असं तर होणार नाही ना आपलं?          

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...