Monday, September 12, 2022

आवाज, आकडे, आणि अंदाज

  

अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच तर त्यात थोडा विचारही आहे.   

दि. ११ सप्टेंबर २०२२ च्या लोकसत्तात ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाबाबत काही आकडेवारी होती. त्यातली अधिक लक्षवेधक आणि तितकीच निष्फळ आकडेवारी म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीत आवाजाने गाठलेल्या पातळीबाबतची. फेसबुकवरही अनेकजण ह्या आवाजाबाबत तीव्र मते व्यक्त करताना आढळले. अर्थात ही मते प्रातिनिधिक नाहीत, कारण फेसबुक एको चेंबर आहे.

फेसबुकवरील प्रतिक्रियांच्याबाबत दोन निरीक्षणे. गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांत पुण्यातील लोक जास्त आहेत. आणि आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणारे लोक हे उजवीकडे झुकलेले असण्याची शक्यता कमी आहे. पण ह्या उजव्या कालच्या लोकांच्याही (पुण्यातील) आवाजाबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. ह्या दुसऱ्या निरीक्षणाबाबत मी जास्त काही बोलणार नाही. त्यातून मला एवढंच कळलं कि गोंगाट खरंच असावा.

पहिले निरीक्षण आश्चर्यकारक आहे कारण मुंबईतही विसर्जन मिरवणुकीत दणादणाट नोंदवला गेला आहे पण मुंबईतील मिरवणुकीतील आवाजाबाबत त्रस्त प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत नाहीत. ही बाब ध्वनीप्रदूषणापेक्षा दोन्ही शहरातील फरकावर अधिक आधारित असावी असं वाटतं. मुंबईचे ‘चलता है स्पिरिट मुंबईकरांना गोंगाटाला आपलेसे करायला मदत करते का? का मुंबईत अन्य दिवसांतही इतका आवाज असतो कि गणेशोत्सवात त्यात होणारी वाढ विशेष त्रासदायक ठरत नाही? का मुंबईकरांनी मी बरा माझे टीचभर स्क्वेअर फीट बरे हेच जीवितध्येय मानल्याने ते उगाच जिथे आपल्या मताचा काडीमात्र उपयोग नाही तिथे ते द्यायला जात नाहीत? का ते प्रवासात एवढे व्यस्त आहेत कि त्यांना फेसबुकवर ‘व्यक्त व्हायला वेळच मिळत नाही? ध्वनीप्रदूषणाचा त्रास विसरायला लावेल असा हा शहरांच्या तौलनिक अभ्यासाचा मुद्दा आहे. हा विचार करतच मी अनंतचतुर्दशीचा डॉल्बी सहन केला आहे.

मजेचा भाग सोडला तर गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाज हे आपल्या सामाजिक निवडीचे कोडे आहे. त्याबाबत एलिट राग आहे आणि मासेसची मिरवणूक आहे. आवाजाने त्रस्त लोक हे कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवात कार्यरत असण्याची शक्यता नसते. (अर्थात पूर्वी ते होते असं होऊ शकतं.) कारण आपण ज्यांत सहभागी आहोत त्याचे परिणाम आणि आपल्याला त्याचा जाणवणारा उपद्रव हा पेच.

सार्वजनिक कामातील समंजस कार्यकर्त्यांची अवस्था वस्त्रहरणाच्या वेळच्या भीष्म-द्रोणासारखी असते. आपण कार्यकर्तापण स्वीकारले आहे तर आपल्याला आपण ज्यांना कामाला लावतो त्यांच्या पाशवी आनंदाच्या मागण्या मान्य कराव्या लागतील आणि त्यांचे समर्थन, किंवा गेला बाजार त्यांच्यातील उणिवांच्या बाबतीत आपलेच दात आपलेच मौन असा पवित्रा तरी घ्यावा लागेल हा विवेक (का निब्बरपणा?) समंजस कार्यकर्त्यांना असावा लागतो. किंवा मग त्यांना एक्स-कार्यकर्ते होऊन चिंतन (आणि मौन किंवा दुर्लक्ष) स्वीकारावे लागते.

गोंगाटाने त्रस्त एलिट असा प्रश्न विचारत नाहीत कि शेकडो लोक हा गोंगाट एन्जॉय कसा करतात. विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण नसते असा माझा मुद्दा नाही. ते आहेच. कळीचा मुद्दा हा आहे कि त्याबद्दल प्रतिकूल मत इतके तोकडे का आहे.

The key fact is not many regards loud sound as a nuisance. गणपती विसर्जन किंवा रोजमर्रा दिवस, ही बाब आपल्याला दिसून येते. म्हणजे एकतर गोंगाटाचा अभाव ज्यांना हवा आहे असे लोक हे कायमच एकूण लोकांत थोडे असतात. किंवा स्वच्छ हवेसारखी शांतता ही पण एक लक्झरी गुड आहे. पेडर रोडला ते उपलब्ध आहे, पण हमरस्त्यावर नाही. म्हणजे लोक पुरेसे धनिक झाले कि परिसरातील शांतता ही त्यांची राजकीय मागणी बनेल किंवा ते अशी शांतता manage करू शकतील. ह्याचा अर्थ (implication) असा कि कदाचित पुण्याचा सरासरी मराठीत व्यक्त होणारा फेसबुककर हा मुंबईच्या तश्याच फेसबुककरापेक्षा श्रीमंत आहे, म्हणून तो जास्त करवादतो आहे.

अजून एक शक्यता अशी कि ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम अजून पुरेसे स्पष्ट नाहीत. वर्तमानपत्रे कोण्या एखाद्या नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांचा बाईट छापून आणतात ज्यांत संभाव्य दुष्परिणामांची जंत्री असते. पण जर शास्त्रीय शोधनिबंधांची एक प्राथमिक छाननी केली तर असं दिसतं कि ध्वनीप्रदूषणाचे शारीरिक दुष्परिणाम हे धूम्रपानाच्या दुष्परिणामांसारखे जोरदार सिद्ध झालेले नाहीत. लोक आवाजाशी जुळवून घेऊ शकतात (adopt) ही दुष्परिणाम फिके करण्यातली मोठी बाब असावी. धूम्रपानाबाबत उत्पन्नपातळीवर अवलंबून नसलेले प्रतिकूल जनमत आहे आणि त्यामुळे धूम्रपान हे सामाजिक स्पेसमधून झपाट्याने हद्दपार झाले आहे, होत आहे. पण गोंगाटाबाबत अशी व्यापक जनप्रतिकूलता नाही.

मी आवाजाशी कसा जुळवून घेऊ लागलो ह्याचा अनुभव सांगतो. (त्यानेच हा लेख पुरेसा अवैचारिक होतो आहे.) मागची अनेक वर्षे गणेशोत्सवाचा काळ तसेच उन्हाळ्यातील लग्नसराईचा काळ मी अत्यंत ताणाखाली घालवतो. रात्री उशिरापर्यंत चालणारे वाद्य-संगीत ह्यामुळे मला हा ताण सहन करावा लागतो. असा आवाज निर्माण करणाऱ्या आणि त्याचा आनंद घेणाऱ्या लोकांना विकृत ठरवावे, त्यांना वाईट परिणाम सहन करायला लागावेत अशी मनोकामना करावी अशा प्रतिक्रिया माझ्या मनात ह्या आवाजाने झोप न आल्याने चिडचिड होऊन उमटत असतात. पण ह्यावर्षी गणपती विसर्जनाच्या प्रमुख दिवसांत मी बाहेरून असे आवाज येत असतानाही गाढ झोपून गेलो. कारण त्या आवाजाची पर्वा करता येणार नाही इतका जास्त मी थकलेलो होतो. (हे लेख लिहितानाची अवस्थाही थोडी तशीच होती. बाहेर डॉल्बीचा थरथराट सुरु होता, त्याने मला डिस्टर्ब होत होते, पण लिहिताना मला आवाज तेवढा जाणवला नाही. अर्थात पुरेसा जास्त आवाज असेल तर माझी ही स्युडो-शांती टिकली नसती हे आलेच, पण तो मुद्दा नाही.) माझ्या १५ महिन्याच्या अपत्याला हा आवाज कसा झेपेल ह्याबद्दल मी साशंक  होतो. पण अपत्य हा गोंगाट जणू अस्तित्वातच नाही अशा प्रकारे आहे. पंधरा वर्षापूर्वी माझी हृदयरोगग्रस्त आजीही ह्या विसर्जन दिवसात तिचा टीव्ही पहात असायची, जो खरं तर तिला त्या आवाजात तितका ऐकूही यायचा नाही. तिच्या घराच्या भिंती, पलंग आवाजाने हादरत असायचा. पण ती म्हणायची आपण रागावून काय होईल. आपण आपलं काम सुरु ठेवावं.उपद्रवाला तोंड देण्याचा हा प्रतिसाद मला तेव्हा अत्यंत दुबळा वाटला होता. पण आज मला तिच्या approach चं नीट appreciation करता येतं आहे. I am too turning oblivious to the noise that I have despised so much. The trick about nuisance you cannot change is to not mind it अशी माझी स्थिती होते आहे.

In some sense, it is an essential self-delusion that we all do with ourselves so as not to live an unhappy life. (अर्थात आपलेच नाही तर इतरांचेही असमाधान आपल्यावर ओढवून घेत सगळ्यांनीच त्या असमाधानासाठी क्लेश घेऊन आत्मशुद्धि करावी असे वाटणारे काही अपवाद सोडून.) पण हा सिनिकल पवित्रा बाजूला ठेवून विचार केला तर जाणवणारी गोष्ट ही कि गणपती विसर्जनातील आवाज ह्याविरुद्ध जनमत बनत नाही कारण अनेकांना, बहुतेकांना ह्या आवाजाचा त्रास होतच नाही. काही थोड्यांना तो होतो. अनेकांना त्याची जाणीवच होत नाही किंवा तसे ते राहू शकतात. आणि काही थोड्यांना त्यातून सुखच मिळते.

गोंगाटाच्या बाबतीत प्रतिकूल भूमिका असलेल्यांनी गोंगाट किंवा जास्त आवाज (आपापले मत!) हा तुम्ही त्रास माना किंवा नाही पण तुमची हानी होते आहे हे सिद्ध करणारा पुरावा गोळा केला पाहिजे. Onus is on us! आणि तसा पुरावा गोळा करायला लागणारा प्रयोग गणेशोत्सव आहेच. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आणि आणि ह्या मार्गांच्या लगतचे पण मिरवणूक जात नसलेले रस्ते येथील बालके, विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध ह्यांच्या तौलनिक अभ्यासाने गोंगाट का गोंगाट और परंपरा कि परंपरा सुट्टे करायला मदत होईल. (सध्या ते न निस्तरणारे झांगडे झाले आहे आणि त्यात काही बहाद्दर कार्यकर्ते ‘हा करतो आवाज, कोलला तुम्हाला, आम्हीच धावून येतो वेळप्रसंगी, करा आमचा कल्ला सहन असे वीरश्रीयुक्त आणि समजमुक्त जम्बुरकेही सोडू लागले आहेत.) अर्थात असा तौलानिक अभ्यास सरकार फंड करेल अशी जर कांक्षा असेल तर तो फंड वारला असेच समजावे लागेल.

लोकांचे पुरेसे प्रतिकूल मत निर्माण होत नाही तोवर विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे सामाजिक निवड असेच बघावे लागेल. आपण जसे आपण मत न दिलेल्या सरकारला ‘हे माझे सरकार नाही असे म्हणू शकत नाही (असे म्हणणारे, निवडणूक म्हणजे काय ह्याची समज नसलेले ‘जागृत लोक असतात!) तसेच विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे बघावे/ऐकावे लागेल. शेवटी रस्ता हा सामाजिक रिसोर्स आहे आणि बहुमताची दंडेली हा त्याच्या वापराचा किमान चुकीचा आधार असू शकतो. असो. ह्यावर्षीच्या आवाजाला इथेच निरोप देऊया.

डेसिबलच्या आकडेवारीशिवाय अजून एक इंटरेस्टिंग आकडेवारी म्हणजे २०१९च्या तुलनेत २०२२ मध्ये जवळपास १६% (सहातील एक) कमी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले. तसं ह्यात आश्चर्य काही नाही. सार्वजनिक गणेशोत्सव हा काही आता वर्गणीने साजरा होणारा हिशेबी सामाजिक कार्यक्रम नाही. तो राजकारण्यांनी फंड केलेला राजकीय कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाला लागणारा किमान खर्चही वाढता आहे. त्यामुळे जरी फंड करू शकणारे इच्छुक राजकारणी बरेच असले तरी ते ही गुंतवणूक परताव्याच्या प्रमाणात योग्य ठिकाणीच करत असतात. दुसरं, ज्या सार्वजनिक गणेशोत्सवांना वलय आहे तिथे प्रायोजक, वर्गणी हे केंद्रित होतात आणि ह्या वलयाच्या स्पर्धेत मागे पडलेल्या मंडळांना तेवढे रिसोर्स उरत नाहीत. तसंच हा उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ता गटही घटत जातो आहे. अनेक जुन्या निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांत अशा कार्यक्रमांना आवश्यक मनुष्यबळ शिल्लक नाही. आणि वर सरकलेल्या एक्स-मध्यमवर्गाला (जो स्वतःला चाणाक्षपणे आजही ‘मध्यमवर्ग म्हणवतो) सार्वजनिक होण्यात विशेष रस नाही. त्यांची संस्कृती आहे ती आपापल्या इन्स्टावर.      

म्हणजे पुरेसे पुढे, म्हणजे जिथे भारताचा demographic dividend संपला आहे अशा अवस्थेत, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव कदाचित नसतील. असतील त्यांचेही स्वरूप बदलेलेले असेल. आपल्याला वाटतं त्यापेक्षा आधी आणि त्यापेक्षा नंतर हा बदल येईल. तेव्हा डॉल्बी वाजेल का? झिंगाट, बोटीने फिरवणारा नाखवा तेव्हा असेल का? तेव्हा गणेशोत्सव पावसाळ्यात असेल का उन्हाळ्यात? आपण असू का? (आणि ती श्रेष्ठ कादंबरी तोवर तरी आलेली असेल का?)

हं. एवढे मनोरंजन सध्या पुरे आहे.

 

वाटाड्या

तिथे जे डोंगर आहेत तिथे आपल्याला जायचं आहे,  ते डोंगर, ज्यांच्या अस्तित्वाच्या रेषा दिसतायेत धुकट धुकट, तिथे. तू.सोबत चाल किंवा एकटा आपापला ...