Showing posts with label शहर. Show all posts
Showing posts with label शहर. Show all posts

Thursday, December 19, 2024

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर.

खरंतर हा डिसेंबर आहे,

जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात

विसरू शकतो.

पण ह्या गार रात्री आणि हे उष्ण दिवस एकमेकांसोबत रहात आहेत,

अनोळखी माणसांनी राहावं एकाच घरात, एकमेकांना फटकून तसे.

आपल्याला माहित असलेली मायाळू थंडी गेली कुठे?

कुठे गेले जीवाला बिलगणाऱ्या उन्हाचे दिवस?

निरुद्देश भटकणारे लोक गेले कुठे?

कुठे गेले दिवास्वप्नांना निवांत चालू देणारे रस्ते?

शक्यतांच्या अगणित तंतूना अचानक तोडत अलविदा म्हणावं,

तसा गायब होतो गारठा,

आणि पाल चुकचुकते येणाऱ्या उन्हाळ्याची.

बेलगाम गरमीच्या लोटांत जेव्हा आपण मिटत जाऊ,

तेव्हा आठवतील का तुला आदल्या हिवाळ्यात आपण मागे सोडलेल्या कविता?  

    

मूळ कविता - 


A shadow of loss hangs over the city,

Even when it is December, 

The time when we should dip the year of losses in 

Illusion of good times. 

But the cold nights and warm days, 

Stand so apart from each others,

Like strangers sharing the same room. 

And, one wonders where is the winter that we all know. 

Where are the days of kind light?

Where are the days of aimless strolls?

Where are the roads wide enough for our dreams? 

Like an incomplete conversation that promised so much and 

Melted in adieu,

The chill in the air disperses and lurks the summer

Of blinding premonitions.

When we die under the unbearable sun, dear,

Will you remember the poems which we left back in the last winter?

(https://kiranlimaye.blogspot.com/2024/12/poems-of-lost-winter.html)

Tuesday, September 5, 2017

अवशेषांची मुक्ती

ह्या नव्या शहरातही अवशेष आहेत
ह्या हरदम साजऱ्या आनंदांत अदृश्य  
कधीकाळी, जेव्हा दिवसाचा सारा उन्मनी ओसर सरून
पिवळ्या प्रकाशांत थबथबत्या रात्री जेव्हा रस्त्यांवर नसते कोणी
तेव्हा हे सारे अवशेष येऊन बसतात फूटपाथांवर
आणि आपापले भूतकाळ शिलगावतात
ह्या शहराखाली गाडली गेली आहेत अनेक शहरे
त्या शहरांच्या उत्सवांचे निर्माल्य
त्या शहरांच्या थडग्यांची माती
त्या शहरांतले निष्प्राण मंत्र
अजून आहेत ह्या अवशेषांत घोटाळून
केव्हातरी, जेव्हा ह्या धरतीच्या, ह्या मिलियन मिलियन पायांच्या
दबावाने बाटलीत भरलेला त्रस्त रिक्लेम्ड समंध बाटलीला धडका मारतो
त्या दिवशी हे अवशेष हसतात
त्या दिवशी, हे अवशेष घेतात कराल बळी  

आणि रक्ताच्या रेषांच्या रस्त्याने मुक्तीला जातात 

Wednesday, November 23, 2016

बिफोर द फ्लड

चलनबदली किंवा लोकसत्ताच्या शब्दांत ‘निश्चलनीकरण’ च्या चर्चा चालू असताना एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ‘बिफोर द फ्लड’ बद्दल वाचायला मिळालं. लिओनार्डो डी कॅप्रिओ असल्याने आणि क्लायमेट चेंजसारख्या विषयावर (जो केवळ हॉक्स आहे असं म्हणणारे, कुठल्याही प्रकारच्या सांख्यिकी पुराव्याशिवाय काहीही छातीठोक म्हणू शकणारे शहाणे आता भारतातही उदयाला आलेले आहेत. दिवाळीच्या वेळेस धुरामुळे होणारे प्रदूषण, किंबहुना दिवाळीच्या धुरामुळे प्रदूषण होते असं म्हणणंच हा कसा हॉक्स आहे हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहेच.) असलेली, काही गंभीर अर्ग्युमेंट करणारी डॉक्युमेंटरी असा थोडा गवगवा ऐकिवात आल्याने मी ती पाहिली.
       माझ्या लक्षात आलेले अमेरिकन मिडिया प्रॉडक्टचे काही ठराविक गुणधर्म: त्यातले हे ढोबळ दोन गट: एक म्हणजे सिनिसिझम+सेक्स+हिंसा किंवा टोकाची देखणी प्रतिकूलता+आशावादी उपायांचा उदय+सोबत भावनिक वगैरे गुदगुल्या किंवा रगडा. ही डॉक्युमेंटरी दुसऱ्या प्रकारात आहे.
       लिओनार्डो अर्ग्युमेंट जरूर करतो: आपण आपली जीवनशैली बदलायला हवी, निवडी अधिक काळजीपूर्वक करायला हव्यात असं. तो कॉन्सपिरसी मांडतो (ऑईल कंपन्या आणि त्यांच्या राजकीय लॉब्या, पाम तेल आणि त्याला निगडीत जगभरचे खाद्य उद्योग), कसे छोटे बदल केल्याने आपण मोठा फरक आणू हे दाखवतो (बीफ विरूद्धचे अर्ग्युमेंट, जे इथल्या इन्टरनेट गो-रक्षकांनी उचललेले आहे पण ते एकूण त्यांच्या अस्मिताधारी आरड्या-ओरड्यापेक्षा फारच जास्त बौद्धिक आहे. लिओनार्डो लंडन मधील कुठल्या संस्कृतीसोहळ्याला येणार आहे असंही काही मी मध्ये वाचलं होतं. पण इथे हे अर्ग्युमेंट आहे ते ‘बीफ उत्पादनात म्हणजे गाईंच्या पालनपोषणात अधिक कार्बन इमिशन होते. त्यापेक्षा कोंबडी पाळा आणि खा असे आहे. म्हणजे गोरक्षा करा, पण त्यांचे संतती नियमन पहिले करा असं.), पोप-अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्यांची सूज्ञ मते आणतो, धुरकट बीजिंग आणि त्याच्या तुलनेत फारच स्वच्छ वाटणारी दिल्ली आणतो, तुम्ही अमेरिकन पहिले स्वतःला सुधारा असं आवेशाने सांगणारी सुनिता नारायण आणतो, एरीअल शॉटस, व्होईसओव्हर आणि त्याला साजेसे पण न घडलेल्या घटना प्रतीत करू इच्छिणारे व्हिज्युअल्स आणतो, कर्करोगाने काही दिवसांत मरण्याची दाट शक्यता असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञाचे कूल सिम्युलेशन्स आणि मानवी स्वभावातील बदलाच्या शक्यतेवर विश्वास ठेवणारे आशावादी झालरीचे भाकीत आणतो. एक प्रपोगंडा, वैयक्तिक हित किंवा कळपाच्या दबावाचा दर्प नसलेला, जगाच्या कल्याणाचा प्रपोगंडा म्हणून ‘बिफोर द फ्लड’ मध्ये सर्व आहे. माझ्या स्वतःच्या मते आवश्यकतेपेक्षा जास्त भावनिक मामला झालेला आहे, पण तीच मुख्य सेलिंग स्ट्रॅटेजी असण्याची शक्यता जास्त आहे. एकूणात क्लायमेट चेंज काय आहे ह्याची कोणाला पहिल्यांदा ओळख करून द्यायला ही चांगली फिल्म आहे.
       क्लायमेट चेंजबद्दल एकदम टोकाची निराशावादी, उशीर झाला आहे पण आपण अंत लांबवू शकू अशी, उशीर व्हायच्या आधी संकटांची चाहूल घेऊन पावले उचलूया अशी आणि वेळीच काही केलं तर क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे परतवताही येईल अशा सगळ्या भूमिका ह्यात आहेत. वेगवेगळी अर्ग्युमेंट मांडायला व्हिज्युअल्स तगडी आहेत.
       एलॉन मस्क आणि पिअर्स सेलर्स ह्यांच्या मुलाखती मला सर्वात जास्त आवडल्या आहेत. अर्थतज्ञ मॅनक्यू (Mankiw) ह्यांनी कार्बन कर आणि लोकांची डिमांड बदलणे हे राजकीय भूमिका आणि एकूण उपभोग बदलायला कसे प्रभावशाली अस्त्र असू शकते हे थोडे पुस्तकी पण अचूक मांडले आहे.
       आपले बालपण, त्यातले पाळण्यावरचे (बायाबलिक रेफरन्स असलेले) चित्र, आपले वेगळेपणा असणारे पालक, मग माझे पर्यावरणीय जीवन ह्या सगळ्या लिओनार्डोच्या वापरातून अनेकदा फोकस गंडलेला वाटतो. लिओनार्डोची क्लायमेट चेंजला प्रतिसाद जनरेट करायची क्वेस्ट अशीच एकूण मांडणी होते. विशेषतः पोपला भेटणे, त्याच्या हाताचे चुंबन आणि पोपने क्लायमेट चेंजबाबत जनतेला आवाहन करणे कसे थोर हे सगळं केवळ आपल्या प्रमुख उपभोक्त्यांना खूष करायला का काय असं मला वाटलं का कडवट औषध साखरेच्या (अफूच्या म्हणा!) वेष्टनात द्यायचा प्रकार?
--
       डॉक्युमेंटरी बघताना मला मध्ये मध्ये दर्दभरे उसासे सोडणाऱ्या सत्यमेव जयते’ च्या आमीर खानची आठवण आली. सध्या सत्य जे अजिंक्य होऊन राज्य करतच असल्याने शोची गरजच राहिलेली नाही का धोबीपछाड मिळाल्याने पाणी पाणी होऊन शो करायची अवस्थाच राहिलेली नाही हे आता लवकर कळेलच.
--
       मी स्वतः ‘क्लायमेट चेंज’ बाबत कुठल्याही टोकाला नाही. असेलच तर पर्यावरण अन-प्रेडीक्टेबल होतं आहे आणि माणसाने निसर्गाच्या काही संरचना उद्ध्वस्त केल्या आहेत इतपत मी कललेलो आहे. पण घरात बेसिनला, अंघोळीला आणि मल-मूत्र विसर्जनाला पुरेसं पाणी असावं आणि वर्षभरात कधीही भयावह उकडू नये ह्याच माझ्या पर्यावरणाकडे मागण्या असतात. माझी कार्बन फूटप्रिंट मला वाटते तेवढी थोडकी नसून फारच जास्त असेल ह्याची मला जाणीव आहे. पण माझे सारे संभाव्य उपभोग टाळून मी पर्यावरणीय संन्यासी होईन हे तर मी बिलकूल करणार नाही. पूर्वी मी असा होतो. शॉवरने अंघोळ केल्यास फार पाणी वाया जाईल आणि पृथ्वीला उजाड केल्याचे पातक माथी येईल म्हणून मी बादलीत मर्यादित पाणी घेऊन अंघोळ करीत असे. आता मी आली लहर केला शॉवर (अर्थात जल-नियमन नसेल तर!) असा राहतो. सांभाळण्याची कटकट जास्त आणि चालवायला रस्ते नाहीत म्हणून माझ्याकडे चारचाकी नाही. माझे उपद्रव मूल्य वधारले की मी सांड गाडी घेईन एखादी ही आपली कामना आहे. ए.सी. च्या बाबतीत मी डायसी आहे. पण एलॉन मस्क म्हटलंय डॉक्युमेंटरीमध्ये की अनेक लोक लँडलाईन न वापरता मोबाईल वापरू लागले तशा अर्थाने जर मला माझे उपभोग न काटता पर्यावरण स्नेही उर्जास्त्रोत वापरायची संधी मिळाली तर मी ती नक्की घेईन. म्हणजे आचरणाने मी पर्यावरणाच्या tragedy of commons मधला एक हपापलेला मेंबर आहे, पण मी क्लायमेट चेंज हॉक्स आहे असं म्हणत नाही.
--
       पर्यावरण म्हटलं कि मला दिलीप कुलकर्णी आठवतात. त्यांच्या ‘निसर्गायण’ मध्ये आनंद म्हणजे काय ह्यावर एक प्रकरण आहे. उपभोग, आनंद आणि उपभोगाची अविरत भूक ह्याचं लॉजिक कळायला मला त्याने मदत झालेली.
       जवळपास वर्षभरापूर्वी दिलीप कुलकर्णी ह्यांचं एक भाषण मी ऐकलं. अपारंपरिक उर्जास्त्रोत हेही सरतेशेवटी पर्यावरणस्नेही नाहीत ह्याची entropy च्या आधारे, तात्विक वाटावी अशी मांडणी त्यांनी केली होती. उपभोगांना आळा घालणं, शहरांची वाढ थांबवणं अन्यथा सर्वनाश अशी त्यांची एकूण बैठक आहे. आणि आपल्या विचारांना जोडलेलं टोकाचं आयुष्य ते जगतात.
---
       माझ्या मते ‘पर्यावरण वगैरेची जाणीव’ हे एक लक्झरी गुड आहे. उत्पनाच्या वरच्या पातळ्यांवर ते हवंहवसं वाटू लागतं, जसं परदेशातले हॉलिडेज, आयफोन, सेकंड होम्स, गेटटुगेदर हेही वेगवेगळ्या वरच्या पातळ्यांना हवंहवं वाटू लागतं. लिओनार्डो आणि अमेरिका, विकसित देश ह्यांना जाणीव आहे ह्याचं कारण त्यांची उत्पन्न पातळी आहे.
भारताला ती उत्पन्नाची पातळी आली कि जाणीवही येईल. आधी पोटभर खायला मिळेल, मग ओरबाडून घेतलं तरी उरेल इतकी सुबत्ता येईल आणि मग आपण ओरबाडतो आहोत ह्याची जाणीव येईल. फार ब्रॉड ब्रश मॉडेल आहे हे.
       पण हे ठीक आहे जर क्लायमेट चेंज सावकाश होणार असेल. पुढच्या काही दशकांत काही भाग उजाड होणार असतील, काही भाग पाण्याखाली जाणार असतील, पुरेसं अन्नही पिकणार नाही असं होणार असेल (म्हणजे असं होणार आहे ह्याचे ठाम पुरावे किंवा तशी मनोभूमिका बनेल) तर काय हा मोठा प्रश्न आहे.
--
       अमिताव घोष ह्यांचं ‘द ग्रेट डीरेंजमेंट’ वाचायचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मला पर्यावरणीय संकटाचे रीफ्युजी, त्यांचे नुकसान, संभाव्यता जवळून अभ्यासायच्या आहेत.
       आपले उपभोग घटवून, बेअर मिनिमममध्ये राहण्याची stoic शक्यता मला खुणावते अधून-मधून, पण त्यात पर्यावरण वगैरेपेक्षा स्वतःच्या आसक्त थुलथुलीतपणाची चीड असते.
       ह्या शहराने दूर-दूर पर्यंत आपले बुभिक्षित ठसे मारून स्वतःला हरवायचे सारे निवांत, सिमेंटच्या प्रवाहात न आलेले कोपरे हद्दपार केले आहेत. आय हेट इट.
       उद्या प्रचंड दुष्काळ पडला, लोक, मी, माझे सगे-सोयरे अन्नाला मोताद झाले किंवा पुरात सापडले तर, ह्यावर मी विचार करतो. असा अनुभव नाही ही कमतरता का? का माझ्या पूर्वजांचे लकी स्ट्रोक्स? का असे अनुभव कमीत-कमी लोकांना असणं ही आत्ताच्या काळाची स्वाभाविकता? 
       क्लायमेट चेंज हे भिंतीवर दिसणाऱ्या भयावह आकृत्यांसारखं विक्राळ आहे. पण त्या नेमक्या कशाच्या सावल्या आहेत? आपले खेळ आहेत कि काळाचे पडघम?

                       

Wednesday, September 14, 2016

आळोखा

कोणी उकिडवा बसून वाट पाहू लागतो साठलेला साका बाहेर यायची
कोणी घोळतो पेस्ट आणि ब्रश दातांत निरखत झोपाळू आरसा
कॉफी वाफाळते मगात  
कुठे दुधवाला गिनतो उरलेल्या थैल्या
रिक्षावाला सोडतो वाट पाहणारी जांभई
वॉचमन तारवटून पाहतो ए टी एम च्या दाराकडे
शटर करकरत जाते वर
शिलगते सिगारेट चहाच्या मिठ्या उबेत
फुटपाथवर गुरफटतो कोणी चादरीत पुन्हा
इडलीवाला देतो सांबार, चटणी
व्हॉटस अॅपवर दिल्या जातात गुड मॉर्निंगच्या सुवचनी पुड्या
मित्र म्हणतो हे तर पक्कं येणार टेस्टला आज
स्टिरिओ धनकतो एफ.एम.
रात्रीने मऊसूत झालेले रस्ते आणि निवलेले लोक
कुत्र्यासारखा ताणून आळोखा देतो दिवस
आणि मग एक पाय वर करून खांबावर मुतून जातो    

Thursday, February 11, 2016

स्मार्ट सिटी आणि च्युत्या बघ्या

बघ्या सकाळी आपल्या झोपेच्या आणि भयंकर दृकश्राव्य स्वप्नांच्या झांगड्गुत्त्यात असताना बेल वाजली. तसं आपल्या चड्डी-बनियानमध्ये बघ्याने किलकिलं दार उघडलं. तेव्हा वॉचमन म्हटला, आज पानी नही.
       बोचा.
       काल सकाळी वॉचमन असेच शब्द बोलला होता. थोडे आशावादी, २ घंटा पानी आयेगा असे.
       बघ्याने तपासणी केली तर पाण्याची अर्धी बाटली, एक टमरेल आणि १ पिंप. ह्यात दात घासायचे, हगायचं, कॉफीचं भांडं धुवून मग धुवून कॉफी करायची, अंघोळ करायची. बघ्याने सुरू होताच गांड लागलेला दिवस अशी काल्पनिक फुली मारून अशा अनेक दिवसांच्या सुकलेल्या चळतीत हाही दिवस टाकला. मग उपजिविकेस जाण्याच्या क्रिया उरकून अपरिहार्य ताजातवाना होत धुरके आणि थेंबभर विरका हिवाळा ह्यातून तो रस्त्याला लागला.
       रस्त्याच्या कोपऱ्याला रिक्षा दाटल्या होत्या. त्यांचा स्टँड सोडून त्यांनी इकडे दाटी का केली ह्याचं कारण एकदम वाजू लागलं. भक्तीपर गीतांच्या आवाजाने बघ्याच तोंड वळलं तिकडे भंडाऱ्याचा मांडव पडलेला होता. बाया-बापड्या पाया पडायला येत होत्या. रस्त्याच्या समोरच्या बाजूला हार-फुले विकायला आलेल्या कुटुंबांनी बस्तान मांडलं होतं. बाया-पोरी फटाफट हार बनवत होत्या. बापे बिडी पीत मांडणी करत होते. काही पोरं आईला लुचत होती, बाकीची झोपली होती. लोकही जमेल तसे विविध भावमुद्रा आणि योगमुद्रा, जसे छातीला उजवा हात टेकवून मान तुकवणे, उजव्या हाताचे बोट दोनदा तोंडासमोर हलवणे आणि मग छातीला लावणे, काही क्लासिक नमस्कार, काही सुपर चपला काढून देवळाच्या बाहेरून नमस्कार असे आपापल्या श्रद्धेची नोंद करत होते. नावाला जागून बघ्याने हे पाहून घेतलं. मग नुकत्याच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत टपरी हरवलेल्या आणि त्यामुळे सरतेशेवटी एकदम रस्त्यावर आलेल्या चहावाल्याकडे चहा पीत तो समोरील मंदिराकडे पाहू लागला.
       एक भव्य कमान, त्यावर एक पूर्ण पुरुष, बाकी शुभेच्छुक मुंडकी. जवळ कार्यक्रम पत्रिका. त्यात संध्याकाळी याग. आणि बाजूला भंडारा.
       म्हणजे संध्याकाळी ह्या चौकात ट्राफिकचा राडा अशीही नोंद बघ्याने केली. तेवढयात भडजी लोकांचा जथ्थ्या तिथे आला. आपापल्या दुचाक्या पार्क करून, तिथेच पुढे मांडवाच्या कडेला, आपापल्या पिशव्या घेत ते मांडवात प्रवेश करते झाले.
       आपल्यालाही असंच लोकल काम असतं तर कित्ती मज्जा असं दैनंदिन हळहळत बघ्या रस्त्याला लागला.
       पुढे रिकामी भांडी, बादल्या, बुधले, पिंप असं घेऊन बाया, बुढया, घरात उरलेली पोरं असे सगळे लाईन लावून उभे होते. मागच्या दुकानांचे रखवालदार त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत होते.
       वाट पाहणं आणि आणि मग लाईन लावून त्या वाट पाहण्याची मेरिटोक्रसी बनवणं हे ह्या शहरात कायम घडतं. मग कोणीतरी स्मार्ट येतं, रांगेच्या बाजूने. रांगवाले आपल्या च्युत्येपणाची उघड-वाघड सिद्धता बघत राहतात. आपल्या ह्या मूलभूत स्टेटस अपडेटवर बघ्याला बरं वाटू लागलं. 
       पुढे फ्लेक्स होता. स्मार्ट सिटीबद्दल निबंध आणि लोगो स्पर्धा.
--
       लोकल ट्रेनमध्ये हातातले पुस्तक, बाकीच्यांच्या मोबाईलवरील पिक्चर आणि चर्चेचे उष्टे तुकडे ह्या सगळ्यांत बघ्या यथेच्छ डुंबत होता. जमेल तश्या पुढच्या मागच्याला ढुश्या देत होता. आणि आपली अच्छी सीट कधी येणार ह्याकडे काटेकोर लक्ष ठेवून होता.
       बायका आणि सेक्स ह्यांबद्दलचे नियमित जोक झाल्यावर कोणीतरी म्हटलं, आमच्याकडे पाण्याची बोंब आज.
       द्या अजून कमळाला मतं.
       आता पाऊस काय कमळ पाडतं का? काय बोलता..
       मग तू टॉवेल आणि चड्डी घेऊन ऑफिसमध्ये अंघोळ करणार का? हागतो तर रोज तिथेच. ह्यावर न राहवून बघ्यापण हसला.
       नाही रे. पण अजून चार महिने जायचे आहेत. कसं होणार?
       स्टोअर करा. मी दुसरी टाकी लावली आहे घरात.
       अरे पण धरणात पाणी नको का? तू टाकी लावून काय फायदा?
       त्यात एक अनेक वर्षाचे अनुभवी सरकारी नोकर, घरी चार एसी आणि १६००० महिना इलेक्ट्रीसिटी बिल असलेले म्हटले, अहो पाणी आहे. आणि तुम्ही सोसायटीवाले मिळून सगळे नगरसेवकाला घ्या कोपऱ्यात. देईल तो टँकर. निवडणुका होत्या म्हणून आधी भरपूर पाणी दिलं. आता टँकर देईल.
       पुढे एकदम स्टेशन आलं. परत गर्दी हिंदकळली. परत थोडे सेक्सचे, थोडे दारूचे, थोडे आज न आलेल्या माणसांचे जोक्स झाले. मग परत लोक आपापल्या मोबाईलमध्ये बुडून गेले.
       बघ्या विचार करत राहिला, धरणात नेमकं पाणी किती शिल्लक आहे? आणि हा मान्सूनपण वाईट गेला तर? म्हणजे एल निनो तर उष्ण आहे, प्रेडिक्शन आहे तसं भयंकर उन्हाळा आणि...
       बघ्या कासावीस झाला. च्युत्या..
--
       बाकी ऑफिसात ए सी होता. बघ्याचे प्रश्न निवले. त्याचा बॉस म्हटला की अरे स्मार्ट सिटीच्या फंक्शनमध्ये एक सेमिनार आहे मुंबईवर. तुझ्याकडे आहेत का काही पॉइंट्स.
       बॉस साला जुहू मध्ये राहतो. बॉस मुळातच स्मार्ट आहे.
       ह्या टॉवरमधले लोक स्मार्ट आहेत. क्रेडिटकार्डधारी फॉर्मल. एम.बी.ए. आणि तद्भव किंवा तत्सम अशा डिग्र्यानी परिपूर्ण. ह्यांनाच ह्या शहरात रहायचा हक्क आहे. ह्यांनाच पाणी मिळायला हवे. चोवीस तास. स्वीमिंग पूल. डीस्ट्रेस व्हायला शॉवर.
       माझ्याकडे पॉइंट आहे बॉस. प्राईज रॅशनलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा. वापरेल तो पैसे देईल आणि पैसे देईल तो वापरेल.
       बॉस सखुश हसला. बघ्या म्हटला मनात, पगार वाढतो तर काय घेऊ?
       मग बाकी दिवस गेला सैल सैल. बाया-पोरी, त्यांच्याकडे बघणारे बापे, झुंडीने सिगरेट पिणारे पुरुष आणि थोडक्या बाया, इडली-सांबार किंवा हाफ मिल.
--
       मग परतीच्या वाटेवर, दिवसाचे थोडे तास उरले ते तरी आपले आपले जगू ह्या शीळपट उत्साहाने बघ्या नेमकी लोकल बघून त्यात दमदार चढाई करून टेचाने बसला. मग त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं. तसे परत सगळे मोबाईलला जुगलेले किंवा माना पाडून झोपी गेलेले.
आपल्या सराईत मिडीऑकर होण्याचं बघ्याला एकदम भडभडून आलं.
बघ्याने आपलं अपरिहार्य वाढत गेलेलं वय परत एकदा खुंट्याला लावलं. वापरायच्या आधीच कापायची घाई केलेल्या साऱ्या दोरांना श्रद्धांजली वाहिली. मग त्याने हेडफोन काढले. बर्फ पडणाऱ्या, भला मोठा एच.डी.आय. असलेल्या देशातला मानवी नातेसंबंधांचे तरल वगैरे पेच दाखवणारा एक मूव्ही सिलेक्ट केला. आणि प्रतिमांच्या भिरभिर नशेवर, डौलदार बिल्डिंग आणि मोकळ्या रस्त्यांच्या आयुष्यांना सहा इंची स्क्रीनवर पहात पहात तो आपल्या बिळाकडे निघाला.
--
       चौकात यागाचा धूर झालेला. बाया हार विकायला बसलेल्या, पोरं परत लुचलेली किंवा झोपलेली, बापे बिड्या पीत मागे निर्विकार.
       तेवढयात एका वाहनाने स्मार्ट पद्धतीने वाहन वळवलं. त्याची बायको उतरली. तिने हार घेतले. मग दोघेही गाडीतून उतरून यागाच्या रांगेत उभे राहिले.
       एक आजोबा हळहळले, राँग साईड, पार्किंग काही नाही असं. मग त्यानंतर टाकायचा तो नेमस्त सुस्कारा टाकून त्यांनी हातातला पुडका हार विकणाऱ्या बायांना दिला. चॅरिटीच्या हलक्या आनंदाने त्यांनी देवाला हात जोडले.
       हार विकणाऱ्या बाईच्या पोऱ्याने बिस्किटं खायला सुरुवात केली.
       रांगेतले स्मार्ट जोडपे दर्शनाच्या चरम सीमेला पोचले. कळकट शर्ट आणि अदृश्य चड्डी घातलेल्या अधाशी पोराच्या आईने बनवलेले हार त्यांनी पुजाऱ्याला दिले. मग ते क्षण-दोन क्षण हात जोडून उभे राहिले.
--
       बघ्याला वॉचमन दिसला आणि त्याच्या पोटात गोळा आला. एकदा गांड आणि एकदा तोंड धुता येईल एवढंच पाणी बाकी आहे.
       ‘साब, पानी छोडा था दो घंटा पहिले. आप थे नही.’
       आता उद्या सकाळची वाट पाहणं आलं.
       बघ्याने बिसलेरीच्या दोन बाटल्या विकत घेतल्या. स्मॉल टॉक करताना दुकानदार त्याला राजस्थान किती भयंकर हे सांगू लागला.
       आपल्या काडेपेटीकडे बघ्या जात असताना नेबरने बघ्याला छान स्माईल दिलं. आणि मगासचच वॉचमनने सांगितलेलं मर्फी लॉचं सत्यही.
       बघ्याला दुहेरी वाईट वाटलं, आपल्याकडे पाणी नाही आणि शेजारच्याकडे आहे.
       आपले डेली एक्झिस्टेन्शिअल ओझे आणि सोबत दूध, ब्रेड, अंडी, केक घेऊन बघ्या घरी परतला. बिळात आल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याने झपाट्याने नळ फिरवले. त्यातून थोडे थेंब पडले.
       उद्या, पुढचे चार महिने, राज्यातला दुष्काळ, एल निनो, मान्सून, हांडे, पिंपे घेऊन वाट पाहणारे लोक हे सगळं पाहून बघ्याला एकच वाटलं, जे नेहमीच वाटतं. च्युत्ये आहोत आपण.
       ह्या प्रश्नांना बगल देऊन निघून जा आणि निखळ वैचारिक सहानुभूतीदार व्हा. किंवा सारं काही विकत घेण्याचे पॅकेज मिळवा. स्टोअर करा. स्टोअर करा.

       आपल्याला होणाऱ्या सत्याच्या विलक्षण पण सवयींच्या साक्षात्कारात बघ्या झोपून जाईल. उद्या नळातून सवयीच्या घूरघुरीची पाण्याची धार येईल आणि त्यात सारे साक्षात्कार वाहून सराईत मिडीऑक्रीटी तेवढी तवंग बनून राहील.                      

Sunday, May 4, 2014

गोंगाटचिंतन

       माझ्या एका मित्राचा मला आज सकाळी फोन आला. आदल्या रात्री १२.३० वाजता त्याने पोलिसांना फोन करून त्याच्या बिल्डिंगजवळ चालू असलेल्या डी.जे. बद्दल सांगून तो आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वेळाने फोन उचलला गेला आणि नंतर फोन उचलणेच बंद झाले. मी हा अनुभव अगोदर घेतलेला आहे.
       पोलिसांना असे किती फोन गेले होते ह्याचा काही डेटा नाही. आणि अर्थात पोलिसांनी काही केलेले नाही हे स्पष्ट आहे. कारण १२.३० पर्यंत डी.जे. चालू होता ही घटनाच ते दर्शवते. माझ्या मित्राचा प्रश्न साधा आहे की जर पोलिसांनीच अशा पद्धतीने फाट्यावर मारले तर मग काय करायचे?
       काय करायचे ह्याचे पर्याय नाहीत असे नाही. आपल्यात खाज असेल तर आपण कायदेशीर मार्ग वगैरे वापरू शकतो. पण स्वाभाविकपणे त्यात अनेक मर्यादा आहेत. म्हणजे त्या असा मार्ग वापरू शकणाऱ्या माणसाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक मर्यादा आहेत. कायद्याचे हात तर लांब कितीही होऊ शकतात, पण ते इतके खेचायची क्षमता आहे का हा खरा प्रश्न आहे.
       मुळात असा गोंगाट होतो आहे हे पोलिसांना माहित नाही असं नाही. पोलिसांचे पथक रात्री रस्त्यावर फिरत असते आणि त्यांना किमान रस्त्यालगत असणाऱ्या भागांत काय काय चालू आहे ह्याची माहिती असते. ह्यातून काही निष्कर्ष संभवतात. पाहिला म्हणजे गोंगाट करणाऱ्याचे आणि पोलिसांचे सूतगूत. दुसरा म्हणजे पोलिसांनी तक्रार यायची वाट पाहिली आणि कोणी १२.३० पर्यंत ती केली नाही. अर्थात हा प्रश्न उरतोच की १२.३० वाजता पोलिसांनी का दखल घेतली नाही. त्यामुळे असे मानायला वाव आहे की वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून गोंगाट चालू ठेवायला पोलिसांनी हातभार लावलाच.
       मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाहीये. व्यक्तिशः मला पोलिसांच्या मदतीचे चांगले अनुभव आहेत. पण ह्या अनुभवांचे निष्कर्ष काढले तर काय दिसतं की मला व्यक्ती म्हणून मदत केली गेली नाही. एका अनुभवात स्त्रियांच्या छेडछाडीचा प्रसंग होता तर दुसऱ्या प्रसंगात मी अमुक एका इन्स्टिट्यूटमधला आहे ह्यावरून मला मिळालेली वागणून आणि सल्ला ठरला. मी जेव्हा गोंगाट/आवाज थांबवण्यासाठी फोन केला तेव्हा माझ्या मित्राला आलेल्या अनुभवाच्यासारखाच अनुभव मला आलेला आहे.
       पण मी असेही प्रसंग अनुभवले आहेत जिथे मी गोंगाट निर्माण करणाऱ्या गटात होतो आणि साडेदहा वाजता पोलीस येऊन म्हटले की आम्हाला आसपासहून फोन येत आहेत की दहा वाजून गेले तरी गोंगाट होतो आहे. आवाज होत होता तो फेअरवेल पार्टीच्या आवाजाचा आणि फोन केला होता आमच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या एका प्रोफेसरने.
       म्हणजे ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाचे मुद्दे दोन आहेत. एक आवाज निर्माण करणारे एक नगण्य प्रकारचे लोक हवेत आणि आवाजाचा त्रास होणारा हा आर्थिक, सामाजिक, संस्थात्मक बाजूने दांडगा माणूस हवा.
       काहीजण असे म्हणू शकतील की वरचे दोन मुद्दे हे ध्वनिप्रदूषण नव्हे तर साऱ्याच कायद्यांना लागू आहेत. मी म्हणेन की अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे राजकोय उपद्रवमूल्याचा. ध्वनी प्रदूषण ह्या मुद्द्याला काहीही राजकीय उपद्रवमूल्य नाही. गोंगाटाच्या तक्रारीने राज्य किंवा केंद्रशासनाची प्रतिमा डागाळणार नाही, वर्तमानपत्रे एखादा कॉलम किंवा एखादा प्रक्षुब्ध लेख ह्यापलीकडे ध्वनीप्रदूषणाला कव्हर करणार नाहीत.
       परत, मला मिडीयालासुद्धा काही शिव्या द्यायच्या नाहीत. कारण मुळात मलाही हे जाणवतं की गोंगाट, आवाज ह्यांनी होणारा त्रास ह्याचे उपद्रवमूल्य वेगळया प्रकारचे आहे. गोंगाट चालू असताना त्याच्या आजूबाजूच्या सर्वांनाच सारख्या प्रमाणात त्रास जाणवेल असेही नाही आणि जाणवेलच असेही नाही. दुसरी बाब सवयीची की समजा मला होतोय आज त्रास, पण सतत त्या आवाजात राहून मला त्याचं काहीच वाटेनासं होईल. गोंगाटाचे शारीरिक, मानसिक परिणाम ह्याबाबत भयावह वाटणारी आकडेवारी आहे. पण तो केवळ गोंगाटाचा परिणाम आहे का गोंगाट, जीवनशैली, आहार ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ह्याबद्दल किती तर्कशुद्धपणे आकडेवारी वापरता येईल ह्यात मला शंका आहे. त्यामुळे आवाजाचा, गोंगाटाचा त्रास हा वेगळा ठरतो.
--
       मी स्वतः एका महामार्गाच्या बाजूच्या घरात वाढलो. आमच्या घरी येणारे पाहुणे कायम त्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या आवाजाबद्दल बोलायचे, तर आम्ही सांगायचो की इथून रिक्षा फार सहज मिळतात. आमच्या आजूबाजूला फार आवाज आहे ही गोष्ट मला जाणवली नव्हती कारण आजूबाजूला शांतता असलेल्या भागात राहणं म्हणजे काय हे मला ठाऊक नव्हतं. माझ्या पालकांनाही जाणीव नव्हती कारण त्यांच्यासाठी आवाजाची पातळी एकदम वाढली नव्हती. ती हळूहळू वाढत गेल्याने तिची धक्का पोचवायची क्षमताच संपली होती कदाचित. जी गोष्ट आवाजाची, तीच स्वतःच्या स्पेसची. टी.व्ही. चालू असताना अभ्यास करणं, आजूबाजूला कोणी झोपले असताना कॉम्प्युटरवर काम करणं ह्या गोष्टी सवयीच्या होत्या.
       मी नंतर स्वतःची खोली असलेल्या, आजूबाजूला शांतता, झाडे वगैरे असलेल्या एका होस्टेलवर राहू लागलो. आणि त्यानंतर मला आवाज, स्वतःची स्पेस ह्या गोष्टी जाणवू लागल्या. आणि आता मला परत आधी मला ज्या सवयी होत्या त्या परत मिळवणं जवळपास अशक्य वाटतं.
       पण असं ज्यांचं झालेलं नाही त्यांना जर आवाज, छोट्याश्या जागेत दाटीवाटीने राहणं ह्याची तक्रार वाटत नसेल तर नवल काय? मुंबईतल्या स्लमस् मध्ये सर्व्हे करताना मला असं दिसलं की आम्ही जिथे राहतो आहोत ते वाईट आहे असं तेच लोक म्हणतात ज्यांना झोपडीपेक्षा वेगळया जागेत रहायचा अनुभव आहे. बांद्र्याच्या बेहरामपाडा मध्ये आता अशी कुटुंबे आहेत ज्यांची तिसरी पिढी तिथेच वाढते आहे. ते लोक तक्रार करत नाहीत, तर सांगतात की इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, सरकारी स्कूल जवळ आहे, सब सहुलीयत है.
       कदाचित ह्यात थोडा सिलेक्शन बायस आहे. असे लोक असणार झोपडीत राहणारेसुद्धा ज्यांना तिथे रहायचं नाही. पण मग ते तक्रार करत तिथे राहणार नाहीत. ते जे काही करून बाहेर पडायचं तसे बाहेर पडतील. जे राहतील ते सारी सहुलीयत असणारेच. सगळ्याची सवय पडलेले, स्थितीशील.
--
       पण दादरला झालाय की सायलेन्स झोन का काय ते! आणि त्याची स्पष्टीकरणे पण सोपी आहेत. मुंबईच्या आर्थिक व्यापाला खेटून वाढणाऱ्या एका धर्मशाळा शहराला (जिथे लोक आठवड्याचे पाच-सहा दिवस रात्री झोपायला असतात असे शहर) शिवाजी पार्कची वैशिष्ट्ये असणार नाहीत. इथे राहणाऱ्यांना अपरिहार्यतेची विलक्षण जाणीव आहे. आणि फारच झालं, तर ते आपला त्रास कमी करून घेण्यापेक्षा ते अशा त्रासात उडी घेणं पसंत करतात. म्हणजे रस्त्याची गर्दी, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रिक्षा नको ना, मग गाडी घे असं. त्रास होणाऱ्यांचा हतबल भाग होण्यापेक्षा त्रास देणाऱ्यांचा निब्बर भाग होणं कधीही बेटर आहे.
       परत एकदा, ह्यात कसलाही क्लास कॉन्शसनेस वगैरे नाही. मला हे सगळं घडतं ते प्रचंड नैसर्गिक वाटतं. म्हणजे पोलिसांनी माझा, माझ्या मित्राचा फोन न घेणं, मिडीयाने गोंगाट कव्हर न करणं, रस्त्यावर वाहनांची दाटी वाढतानाही आजच्या पादचाऱ्यांना, रिक्षा-बस प्रवाश्यांना दुचाकी, चारचाकी घ्यावाशी वाटणं. प्रत्येकजण त्याच्या समोरच्या इंसेंटिव्हना प्रतिसाद देतो आहे. कायदा पाळून, माझ्या तक्रारीची दखल घेतल्याने मिळणारं आत्मिक वगैरे समाधान जाणवणारे पोलीस कथा-कादंबऱ्यांत असतात. प्रत्यक्षात गोंगाट घालणारा  स्थानिक बाहुबली जे देऊ शकेल त्याचं भौतिक मोल जास्त महत्वाचं असतं. मिडीया तर प्रॉफीट मॅक्सिमाइझ करणारा व्यवसाय आहे. आणि ध्वनी प्रदूषणाच्या स्थानिक स्वरूपाच्या तक्रारीने मिळणारा फायदा आणि त्याच जागेत अन्य काही छापून, किंवा न छापून मिळणारा फायदा ह्याचं गणित ते करत असतील. आठवड्याला पाच-सहा दिवसांची नोकरी करणारा माणूस भौतिक समृद्धीचा, बाकीच्याच्या भौतिक उपभोगाशी गती मिळती राखण्याच्या प्रयत्न करेल.
       पण मला तर होतो आहे आवाजाचा त्रास. मग मी काय करायचं?
१.       आपल्या गांडीत कुठवर खाज आहे हे बघून कायद्याने लढायचं.
२.       आपण काही ना काही एक मार्गाने स्थानिक बाहुबली बनायचं, आणि मग आपल्या एका फोन सरशी पोलीस येतील किंवा येणार नाहीत.
३.       निघून जायचं शांततेच्या शोधात.
४.       ह्यापैकी काहीही नाही. स्थितीशील, सवयशील होत सहुलीयत घेत रहायची.
वेळ चिकार आहे, उद्या, आज ज्यांच्याकडे हलदी असेल त्यांचा डी.जे. अजून वाजू लागलेला नाही. निवडणुकांचे निकाल लागलेले नाहीत, गणेशोत्सव, दिवाळी यायची आहे. ह्यांच्या अध्ये-मध्ये माझ्याकडे असलेल्या शांततेच्या फाटक्या चादरीवर उडत उडत मला पर्याय ठरवायचा आहे.     


Friday, March 14, 2014

बघ्या: प्रोलॉग आणि झवती गाढवं

      बघ्या त्रस्त आहे, म्हणजे दर काही दिवसांनी त्याला असं वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक प्रकारचं झवतं गाढव पाठी लावून घ्यायची हौस आहे. किंबहुना थोडा थेरॉटिकल दृष्टीकोन घेतला तर बघ्या हा आपल्याला जे केलं पाहिजे ते न करणं, त्याऐवजी भलभलत्या गोष्टींकडे असं नाही तर तसं असं बघणं आणि मग त्या पाहण्याला उगाच काहीही प्रश्न विचारणं ह्या स्थिर अवस्थेत स्वतःला कायम ठेवायचा प्रयत्न करून असतो.
      दिवसभर बघ्या त्याच्या वैयक्तिक स्पेसमध्ये सिगारेटी फुंकत, कॉफ्या किंवा चहा पीत, जमेल तसे जेवत, सिनेमे किंवा सिटकॉम बघत स्वतःला कसलीतरी फंडामेंटल प्रेरणा यायची वाट बघत असतो. बघ्यासाठी हे एक जेन्युइन पाउल पुढे जावं म्हणून अनेक पावलं चालायची टाळणं आहे, म्हणजे स्वतःबद्दल मजेशीर वाटण्याच्या अवस्थेत त्याला असं वाटतं. ही अवस्था नसते तेव्हा बघ्याला बहुतेकदा जीव द्यावासा किंवा दारू प्यावीशी वाटत असते.
      ह्याशिवाय बघ्या मांजरी पाळतो आणि त्याच्या घरच्यांकडून पाळला जातो. मांजरी बघ्याच्या मांडीवर निवांत झोपतात, त्याच्या गादीत तो नसताना हागतात आणि तरी त्या त्याच्या पावलाला मान घासायला लागल्या कि बघ्या त्यांना काहीही करून दूर लोटू शकत नाही. म्हणजे तो तसं करू शकतो, पण त्याने उगा तसं नाही करायचं असं ठरवलं आहे. नाहीतरी कामू म्हटला होता, माणसं देवावर विश्वास ठेवतात, लग्न करतात किंवा प्राणी पाळतात.
      बघ्याची चाळ त्याच्या आजीसारखी ८० वर्षाची आणि तशीच जर्जर आहे. दोघींचं कंबरडं मोडलं आहे, दोघी अंथरुणाला खिळून आहेत, आणि दोघी जबरी मौल्यवान आहेत.
      बघ्याची आजी २३००० पेन्शन घेणारी खडूस म्हातारी म्हणून बॅंकेत फेमस आहे. बघ्याची चाळ मोक्याची जागची भरपूर भाव येईल अशी जागा म्हणून. दोघी अजून असण्याचं मुख्य कारण सरकार आहे, चाळीला रेंट कंट्रोल आणि आजीला पे कमिशन देऊन.
      बघ्याला दोघीही मरतील ह्या भीतीचे पोपडे काढण्याचा गंमतीचा खेळ खेळतो. आजी मेली तर आपल्या भूतकाळाचा मोठा तुकडा कापला जाऊन आपण एकदम वर्तमानकाळात फेकले जाऊ असं बघ्याला वाटतं. तो आजीची बडबड तासंतास ऐकतो, उगाच मानसोपचारतज्ज्ञ कशाला म्हणून बाकीचेही काही म्हणत नाहीत. चाळ मेली तर मांजरी कुठे जातील ही बघ्याची भीती आहे. चाळ आणि बिल्डींग ह्यांच्यातले काही फरक बघ्याने हेरले आहेत, त्यातला एक मुख्य म्हणजे चाळीला विद्रूप असण्याची साहजिक गरज असते तशी बिल्डींगला देखणं असण्याची. बिल्डींगचा अजून एक मुख्य गुणधर्म म्हणजे ती त्यातल्या प्रत्येकाला आपापला घाण, ओंगळ, विसविशीत आणि नागडा भाग झाकण्याची मुभा देते. त्याचा फायदा उन्मुक्त होऊ घातलेल्या कामजीवनास किंवा असहाय्य होऊ चाललेल्या म्हातारपणास होतो. पण ह्या मुभेची दुसरी बाजू म्हणजे बिल्डींग मधील जिना, पार्किंग, कंपाऊंड अशा सर्व गोष्टींना सार्वजनिक महत्व प्राप्त होते, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचे नैतिक दडपण सर्वांस घ्यावे लागते. ह्या नैतिक आणि आर्थिक उन्नत अवस्थेचा स्वाभाविक परिणाम म्हणून केवळ पाळीव माणसे आणि कुत्रे किंवा पाळीव माणसे आणि पाळीव कुत्रे अशांनाच बिल्डींग हा स्टेट्स प्राप्त होतो.
      जेलस बघ्या! आंबट द्राक्ष्यांच्या बागेचा रखवालदार बघ्या!!
      सिरीयसनेस अपार्ट, मांजरी ह्या स्वतंत्र असतात, आणि एकाच वेळी निष्पाप आणि संधिसाधू होण्याचे नाजूक आणि पारदर्शक कसब त्या ठेवू शकतात. किंबहुना हा निष्पापपणाचा आपोआप येणारा भाग आहे कि निष्पाप असणाऱ्या गोष्टींमध्ये जीवघेणा त्रास द्यायची प्रचंड क्षमता असते. त्याचमुळे शाळा, स्पर्धा, संस्कार अशा यंत्रांमधून निरागसपणाला व्यवहारकुशल निब्बरपणात बदलायचे कारखाने चालवले जातात.
      मांजरी नसणं हा आपला का नेमका लॉस आहे ह्याचा विचार बघ्या करतो. १. सवय मोडण्याचे दुःख २. त्यांचे आग्रही म्यांव म्यांव न ऐकता येणे ३. नेमके ज्या दिवशी बघ्या त्याचे घर सोडेल नेमके त्या दिवशी मांजरी काय करतील हा इमोशनल ताण, म्हणजे समजा त्याच्या मांजरींचा ताफा दरवाज्याशी आला, लोळला, पाय ताणून आळोखे पिळोखे देऊन ओरडू लागला, मान पुढच्या पायांवर ठेवून, मध्ये मध्ये कूस बदलून बदलून झोपला आणि तरीही कोणी दार उघडले नाही तर? ४. तसे बघ्या अनुभवातून शिकला आहे कि माणसासारखा तद्दन पाळीव प्राणीसुद्धा कितीही सवयी तुटल्या, सोबत संपली तरी आपोआप परत नव्याने पाळीव होतो आणि सरासरी जगात जातो तिथे मांजरे जगणार नाहीत काय! पण तरीही बघ्याला एक गोष्ट टोचत टोचत जाते, जशी काफ्का ऑन द शोअर मधल्या नकाटाला टोचते, कि सुरक्षित अवस्थेतून एखाद्याला परत व्हल्नरेबल अवस्थेत ढकलणं ह्यात काहीतरी चूक आहे, आणि तेही मांजरींना ज्यांना आपण सांगू पण शकत नाही पुरेशे अगोदर कि अमुचा रामराम घ्यावा. ५. आणि समजा जेव्हा जिथे मांजरी निवांत हुंदडल्या, सावलीत झोपल्या, अंधारात जुगल्या, कोपऱ्यांत व्यायल्या, कोवळ्या वयांत मेल्या तेव्हा झाडांखाली पुरल्या गेल्या, चोरट्या आणि रतीबाच्या दुधावर सुस्तावल्या तो चाळीचा आकार कोसळून मलबा बनेल तेव्हा मांजरी तिथे काही शोधतील का, का त्या नुसत्याच ओरडतील, मूक बघत बसतील, आणि एका क्षणाला पाठ फिरवून, शेपूट वर करून जातील, जसा बघ्या आणि बाकीचे करत आले.
--
      हा बघ्याचा सेन्स ऑफ लॉस. एवढंच बघ्याचं होऊ घातलेलं विस्थापन. बघ्या ज्या छटाकभर शहरात वाढला त्याचं गर्दीने तट्ट फुगून गेल्याने जिकडे तिकडे गर्दीच्या साचलेपणाआड येणारा शांततेच्या, निवांत रस्त्यांवर चालत गेल्याने येणाऱ्या स्तब्ध अवस्थेच्या अकाली मृत्यूचा सडेल वास आणि त्याने होणारी बघ्याची घुसमट एवढीच बघ्याची डेव्हलपमेंटबद्दल तक्रार.
--
      तरी बघ्या विचार करतो कि डेव्हलपमेंट मॉडेलचं आपण नेमकं काय करायचं, आपल्या कोणकोणत्या गरजा छाटायच्या का आपणच इथून दुसरीकडे कलम व्हायचं. मग बघ्या बिन इस्त्रीचे कपडे घालतो, महिनाभर एक जीन्स घालतो, बादलीतून अंघोळ करतो, हाताने कपडे धुतो. ह्या झ्याटू डिसीजन्स.
      बघ्या ठरवतो कि गर्दी नको. दररोज माणसांच्या एका गतिमान गोळ्याला चिकटून घ्या, सुट्टे व्हा, काही तास आपल्यासारख्या माणसांच्या महत्वाकांक्षा आणि समस्या ह्यांच्या गॉसिपात घालवून मध्ये मध्ये आपला ज्याच्याशी संबंध नाही अशा काही गोष्टी करा, परत माणसांच्या थकलेल्या, चिडचिड्या गोळ्याला डकवून घ्या, एक गोळा संपला कि दुसरा पकडा आणि मग परत तंतू तंतूमय अलग होत आपल्या काडेपेटीत हुकमी काडी बनून कधीही पेटात्से झोपा, ७०-७५% दिवस असं करा आणि उरलेल्या वेळात आहार, निद्रा, भय, मैथुन, प्रजनन, प्रतिक्षिप्त क्रिया, बाल संगोपन, मतदान, देशभक्ती, निसर्गरम्य स्थळी मानवेल अशी गर्दी करून आनंदी फोटोग्राफ्स आणि वारसा मागे ठेवून अहेव इच्छांसह मरण. बघ्या त्याच्या अॅबस्ट्रॅक्शनने थरथरतो. सही काळ,वेळ,मित्र असते, बघ्या प्रतिथयश असता. परत द्वेषमूलक बघ्या, खुसपट्या बघ्या!!
      बघ्याचा निश्चय पाहून शहर खदखदून हसतं. आणि आपल्या लक्झरी आणि नेसेसिटी नावाच्या दोन शुडांनी उचलून त्याला गरगर फिरवतं.
--
      बघ्याचा मित्र आणि बघ्या फुफ्फुसात टार भरायला बसतात, तेव्हा मित्र त्याचा टाय काळजीपूर्वक काढून ठेवतो. परवा हेड ऑफिसला जायचंय, तेव्हा लागेल म्हणून.
      त्यांच्या बाजूच्या टेबलावर ३ बाया आणि ४.५ पोरांचा कळप येतो, आणि टोटल ६ कटिंग मागतो. ०.५ मुलगी अर्धा चहा आणि स्वतः सांडते तेव्हा जेष्ठ बाई म्हणते, जीयेगी या मारेगी रांड. अब येहीच जिंदगी अपनी.
      बघ्या मोबाईलवर ताज्या बातम्या आणि नित्य नियमित पौष्टिक लेख बघतो.
      निर्भया खटल्यात चौघांची फाशी हायकोर्टात कायम. सत्यमेव जयते. क्लीशेड, क्लीशेड..
      मित्र म्हणतो, कोण आपल्याकडून, अर्धे का मुर्धे? बघ्या म्हणतो १५ मारले नक्षलवाद्यांनी, मित्र म्हणतो छपन्न इंच येईल तोच काहीतरी देईल करारा जबाब.
      बघ्या ह्याला मानवतावादी ऑब्जेक्शन घेऊ शकतो, बघ्या वाद टाळतो, होळीला करू म्हणतो
.
      बघ्याचं स्मार्टफोन, बघ्याचं वाढदिवसाचं गिफ्ट, त्याने मार्क केलेला लेख दाखवतं. लेख खुळचट विकासवादाच्या केविलवाण्या बळींबाबत बोलतो.
      बघ्याने फावल्या वेळेत वाचून ठेवलंय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आणि सहृदय होत तो म्हणू चाहतो कि शहरीकरण आणि कामगार कायदे बदलणे ह्यांना पर्याय नाही, हिंसेने काही सुटणार नाही. बघ्या ह्यावर रेफरन्स देऊ शकतो.
      बघ्या संपूर्ण शहरी बनावटीचा आहे. त्याला शेत, सावकार, भूमिहीन शेतमजूर, प्रकल्प, विस्थापन आणि पुनर्वसन ह्या सगळ्याबाबत काय करायचं हे कधी कधी उमगत नाही, मग तो आपत्कालीन एक्झीट शोधतो, ती उघडतो तेव्हा माहितीचा लोट येतो आणि बघ्याला लांब घेऊन जातो.
      दर सकाळी बघ्या हिरीरीने बसतो त्याच्या प्रश्नांचा साकल्य आणि नाविन्य अशा तेजस्वी तरीक्याने सुलझाव करायला. मग तो लिटरेचरच्या ढोलक्याचा दोन्ही बाजूंनी आनंद घेतो, ढोलकं थांबतं तेव्हा बघ्या नव्याने दिग्मूढ होतो.       
--
      बघ्या बघतो तेव्हा त्याच्या इमारतीच्या कळपातले नव म्हातारे-म्हाताऱ्या त्यांच्या नव नातवांना शाळेत सोडतात-आणतात. येताना मुले पेप्सी मागतात, मोठी मुले डेरी मिल्क, त्याहून मोठी एक छोटा.
      म्हातारे मध्ये मध्ये कट्ट्यावर बसतात, रेल्वे, राजकारण, पेन्शन, महागाई अशी चर्चा करतात. त्यावेळी ते समोरून जाणाऱ्या भिन्नलिंगीय तरण्या प्रजातीस न्याहाळतात.
      त्यांचे नातू संध्याकाळी त्या कट्ट्यावर बसतात तेव्हा त्यांच्या वर्गातल्या मुलीला ते चिडवतात. ती सलज्ज हसते आणि जाते. त्यावेळी मुलांच्या आया, आज्या आणि उरलेले ‘होणार सून मी ह्या घरची’ बघतात. त्याचवेळी भारतात काही एक सांख्यिकी वेगाने स्त्रियांवर अत्याचार होतात.
      बघ्या आपल्या फुफ्फुसात टार भरत त्या मुलांना पुढच्या टाइममध्ये प्रोजेक्ट करतो. त्यातला एक होतो नगरसेवक, एक चाईल्ड मॉलेस्टर, एक सरकारी नोकर, एक आय टी वर्कर, एक सी.ए. आणि एक बेवडा. सलज्ज हसणारी मुलगी अमेरिकेत निघून जाते.
--
      बघ्या घाबरून आपल्या सिगारेट कडे बघतो, गांजा तर नाही ना? तेव्हा नेपाळी गुरखा त्याला सलाम करतो.
--
      दोन बीअर आणि वर एक कॅन मध्ये, सोबत काही दर्दभऱ्या गाण्यांसह बघ्या आपले चिंधी दिवस आंबवत ठेवतो. त्यावर भरघोस दिलदार टीप देऊन, साऱ्या ओरिसीअन वेटर्सचे अदबी सलाम घेत बघ्या पिवळ्या सुस्त रस्त्याला येतो.
      चायनीजवाल्याने कचरा कुंडीपाशी फेकलेल्या हाडांना कुत्री आशेने न्याहाळतात, कुत्र्यांना एकमात्र छुपा बोका मत्सरयुक्त भीतीने. पोलिसांच्या थांबलेल्या गाडीला मघाच्या गुराख्याचा चुलत भाऊ सलाम करतो आणि त्याचा मुलगा चटपटीत पणे एक आर.सी. आणि स्टार्टरचे पार्सल गाडीत आणून ठेवतो. गाडी छू.
      बघ्याचा स्मार्ट फोन म्हणतो ‘चिन्मया सकलहृदया’. बघ्याच्या आईने परवा टी.व्ही.वर ऐकलान आणि बघ्याला शोधायला लावलान.

      आणि मग आपल्या अल्कोहोलिक उमाळ्याचे आरपार अश्रू बघ्या पुसतो, तेव्हा चुलत गुरखा नेपाळी गाण्यावर मान डोलावतो, मुलगा कोंबड्यांना उचलून आत ठेवतो, एक कलकलते. 

Tuesday, February 11, 2014

झलकतो चंद्र

झलकतो चंद्र हायवेवरच्या विदीर्ण आकाशात
आणि रस्तावरचे कुत्रे भुंकतात सरावाच्या असूयेने
मालकाच्या लोभसवाण्या पुष्ट कुत्र्यांकडे पहात

आपला आत्मा तसू तसू वाटला आहे असा या भटक्या किंवा बांधलेल्या कुत्र्यांत,
निमिषार्धात गायब होणाऱ्या स्वार्थी हरहुन्नरी मांजरांत
आणि उशिरा रस्त्यावर असणाऱ्या भरधाव निवांत गाड्यांत
आणि तरीही राहत फतेह आली खान म्हणतो
‘साजिश मे सामील सारा जहॉं है’

एका क्वार्टरला एवढी अनुभूती
खंबा मारतो तर ह्या कुत्र्यांसोबत मीही भिडवली असती माझी हाक  
निऑन दिव्यांच्या या भासमान अवकाशात

कॅपिटलिस्ट दिवसाने चिणलेली टीचभर रात्र देते घाबरट ढेकर
त्या वेळेला ह्या रस्त्यांच्या कडेने कुसा बदलतात
कामोत्सुक जीव, कोरी करकरीत बालके आणि रिकामे वृद्ध
आणि तरीही जाते वेळ सरकत
सगळ्यांवर आपली चिंधी फिरवत
गतानुगतिक फिलोसॉफर तेव्हा उसासा देतो  
इन द लोंग रन वी ऑल आर डेड  

    

Tuesday, April 26, 2011

विसरले जाणारे एक साधे आयुष्य

सदू, चार भावांतला तो तिसरा आणि तिन्ही भावांपेक्षा वेगळा. सदू चार वर्षाचा असताना त्याची आई गेली. त्यांनतर वडिलांनी एका हळव्या जागेसारखा सदूला जपला. सदूचे वडील एका वाड्याचे, त्याच्यापुढच्या निवांत पसरलेल्या अंगणाचे, मागच्या निगा राखलेल्या बागेचे एकुलते एक मालक. खरंतर त्यांच्या चारही मुलांना बायका-पोरांसह पुरून उरेल एवढी जागा वाड्यात. पण सदूचा सगळ्यात मोठा भाऊ अकाली गेला, दुसर्याने कुठल्या एका झटक्यात भ्रमंती आणि ब्रह्मचर्य पत्करले, तिसरा सदू....त्यामुळे चौथ्या भावाच्या बायकोकडे वाड्याची सूत्रे गेली. अर्थात सदूच्या गोष्टीतला हा नगण्य भाग.
  तर सदू चौथीपर्यंत शाळेत गेला. किंवा मास्तर ओळखीचे म्हणून चौथीपर्यंत पुढे ढकलला गेला. वडिलांची आशा होती कि एक दिवस नशिबाचा फासा पालटेल. सदू चार-चौघांइतका, किमान ढोबळ आकार असलेला माणूस होईल. एक दिवस सदू शाळेतून घरी आला नाही. वाटेत कुठेतरी त्याचे दप्तर सापडले. त्याच्याबरोबर वर्गात असलेल्या मुलांना विचारले तर त्यांनी सदूला शाळेतून बाहेर पडताना पाहिल्याचे सांगितले. उरलेला आख्खा दिवस वडील आणि दोन भाऊ त्याला शोधत राहिले. रात्रभर सगळे जागे होते. दुसर्या दिवशी पोलिसात तक्रार झाली. दुपारपर्यंत हा लोकांना चर्चेचा विषय झालेला. शाळा सुटल्याची वेळ झाली आणि सदू घरी आला. चेहरा, कपडे मळलेले...पण कुठे ओरखडा नाही. चेहेर्यावर मधला एक दिवस दिवसांच्या माळेतून सुटल्याचा मागमूसही नाही. सगळ्यांनी त्याला खोदून खोदून विचारून पाहीले. पण ते सगळे प्रश्न निरर्थक असल्यासारखं सदू त्याच्या कोर्या, किंचित हसर्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत राहीला. शेवटी भाऊ त्याच्या या गप्प बसण्यावर चिडून त्याला मारायला धावला तेव्हा सदू घरातून बाहेर पळत आला. घराबाहेर असलेल्या आणि त्या दुपारी निवांत पहुडलेल्या अंगणात आपल्या फांद्यांचा कुटुंब-कबिला सांभाळत वयाने म्हातारे असे एक झाड होते. सदू त्या झाडाला पाठ टेकवून बसला. भाऊ तिथे पोचायच्या अगोदर वडिलांनी भावाला समजावले. मग त्यांनी शेजार-पाजारच्याना पांगवले. ते झोपाळ्यावर येऊन बसले. सदू झाडाला टेकून बसला होता. अपराधीपणाची झाक नाही, ना आल्यावर बापाला बिलगला नाही. ओलसर डोळ्यांनी वडील सदूला त्याच्या आईच्या आठवणी सांगू लागले. झोपाळा हलकेच हलत होता. समोरच्या झाडाच्या सावलीत  सदू बसला होता, कोरे, किंचित हसरे डोळे घेऊन.
   सदू त्यानंतर शाळेत गेला नाही. वडिलांनी त्याला बागेत काम करायला शिकवले. सदूच्या हातात फार कसब होते असे नाही, पण सदूला बागेची सवय झाली. अर्धी विजार आणि वर पांढरा सुती शर्ट हा त्याचा नेहमीचा वेश बनला. एकट्याने वडिलांनाही बाग पाहणे अपुरे व्हायचे. सदूबरोबर तेही बागेत रमायचे. दिवसभरात केव्हातरी झाडाखाली बसलेला सदू आणि समोर झोपाळ्यावर हलकेच झोके घेत बसलेले वडील दिसायचे. कधी वडील बोलत असायचे, कधी झोपाळा नुसताच झुलत असायचा. आणि समजणं- न समजणं ह्याच्या पलीकडे असलेलं एक हसणं घेऊन सदू तिथे बसलेला असायचा.
    सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न झाला आणि वडिलांच्या म्हातारपणाला उतरती कळा आली. घरात वहिनी आल्यावर सदू रात्रीचा घरात झोपायचा बंद झाला. रात्री दहाच्या सुमारास सदू वळकटी आणून अंगणात टाकायचा आणि झोपून जायचा. कधीतरी भटक्या भाऊ घरी असेल तर तोही सदूशेजारी झोपायचा. सकाळी वडिलांची हाक ऐकली कि सदूचा दिवस सुरु व्हायचा. सदूच्या सोबतची माणसे कुठेतरी पुढेमागे सरकत होती. पण एखाद्या जुन्या घडाळ्याने ठरल्यासारखे ठण-ठण टोले न चुकता द्यावेत तसे सदूचे दिवस होते.
    पण त्याचे दिवस एकसारखे एक असले तरी सगळ्यांचे नसतात. सदूच्या वडिलांचे नव्हते, वाड्यासमोरच्या अंगणाचे नव्हते. आणि सदूशी सावलीचे नाते जोडून असलेल्या झाडाचेही नव्हते. वाढत जाणार्या शहरात वाड्याचा विस्तार मावणार नव्हता. शहरातल्या वाढू पाहणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्याला अंगणातल्या फांद्यांच्या जाळ्याची अडचण होती. एक दिवस सरकारी हात वाड्यासमोरचे अंगण, झाडे साफ करू लागले. त्यात सदू ज्या झाडाखाली बसून कोर्या, किंचित हसर्या डोळ्यांनी वडिलांकडे पहात रहायचा ते झाडही होते. ते झाड तोडायला सुरुवात झाली आणि सदू ओरडत झाडाजवळ गेला. त्याचा कोरा चेहेरा कुठल्यातरी हरवण्याच्या जाणीवेने धुमसत होता. आधी तो झाडाखाली बसून राहीला, आणि जसे त्याचे भाऊ त्याला खेचू लागले तशी त्याने भावांना हिसडा देऊन झाडाला गच्च मिठी मारली. त्याच्या रागाचे, किंवा उद्रेकाचे आवर्त ओसरले कि मिठी सैल व्हायची आणि तो नुसता बिलगून असायचा. पण कोणी झाडाकडे जाऊ लागला कि तो परत खवळायचा  . शेवटी वडिलांनी सरकारी लोकांना तात्पुरते अंगणातून बाहेर जायला सांगितले. भावांना त्यांनी अंगणाबाहेर तयार रहायला सांगितले. मग ते झोपाळ्यावर बसले. थोड्या वेळाने सदू झाड सोडन झाडाखाली सावलीत बसला. वडील सदूला काही सांगू लागले. सदूचा चेहेरा परत कोरा, किंचित हसरा होत गेला. नंतर एकदम काही उमजल्यासारखा सदू उठला आणि वडिलांच्या जवळ उभा राहीला. त्याला घेऊन, झाडाकडे वळून बघत बघत वडील अंगणाबाहेर गेले. मग सदूचा एक भाऊ, वडील आणि सदू रिक्षातून दूर कुठेतरी गेले. सरकारी माणसे कामाला लागली. त्यानंतर झोपाळा हलत राहीला, पण सावली मात्र संपली होती.
        पुढे सरकत गेलेल्या दिवसात सदूच्या आयुष्याचे कोपरे तसेच राहिले. वडील थकले आणि त्यांचा वावर कमी झाला. सदू एकटाच बाग बघायचा. कधीतरी वडील सदूचा आधार घेत संध्याकाळचे झोपाळ्यावर बसायचे, सदू झोपाळ्याजवळ बसायचा. वडील फार काही बोलायचे नाहीत. संध्याकाळचा उदास प्रकाश निवत गेला कि ते उठून सदूचा आधार घेत घरात जायचे. एक दिवस असेच संध्याकाळचे घरात गेल्यानंतरच्या रात्री झोपेतच वडील गेले. सकाळी भावाने हाक मारून सदूला उठवले. त्यावेळी भटक्या भाऊ घरात होता. तो सदूला घेऊन बसून राहीला. सदू कोर्या चेहेर्याने, किंचित हसत वडिलांचे प्रेत तिरडीवर बांधण्यापासून ते त्यांना उचलेपर्यंत सारे काही बघत होता. नंतर भटक्या भावासोबत तो अंत्ययात्रेतही चालत गेला. त्याने त्याच कोर्या, किंचित हसर्या चेहेर्याने वडिलांना शेवटचा नमस्कार केला. सगळे लोक कोरड्या शोकाचे उमाळे आणत सदूकडे पहात होते. तो केव्हातरी त्याच्या अजाण शांततेतून बाहेर पडेल असे सर्वाना वाटत होते. पण सदू कुठे ओरडला नाही, रडला नाही. चितेने पेट घेतल्यावर भटक्या भावाबरोबर लांब उभा राहून तो चितेकडे पहात होता. त्याच्या दुनियेला दुखाचा, हे काय चाल्लय ह्या कुतूहलाचा तडा गेला नव्हता. कदाचित नात्यांच्या रेषा त्याच्या मनात उमटल्याच नव्हत्या किंवा मुळात स्वतःच्या असण्यापलीकडे दुसर्या कोणाचे असणे नसणे जाणवावे असे काही सदूला नव्हतेच. पण अंगणातल्या तुटणाऱ्या झाडाशी सदूचे काय जुळले होते? का सदूचे वेगळेपण हेच कि सावली देणारे झाड का बाप हे त्याला ओळखताच येत नव्हते. सदूच्या कोर्या, किंचित हसर्या चेहेर्याला ह्या त्रयस्थ प्रश्नाचे काही नाही.
    वडील गेल्यावर काही दिवस सदूच्या वाहिनीचे सदूच्या नावाने ओरडणे ऐकू आले. पण हळूहळू आता वाडा वडिलांचा नाही, तर वहिनीचा आहे हे सदूच्या चक्रात आले. वडिलांची पारख आणि पखर तो बागेला देऊ शकला नाही तरी त्याने बागेतल्या झाडांना पोरके सोडले नाही. घरातली थोडीफार कामे आणि बाग ह्यात त्याचा दिवस बांधलेला होता. दुपारी तो बागेपासच्या ओट्यापाशी जेवायचा. भावांना तो असं गड्यासारखा जेवतो हे कधी-मधी बोचायचे. पण वहिनीच्या जवळ एका अंतरापलीकडे जायचे नाही असा सदूचा काही नियम होता. सदूच्या एकावर एक जमत जाणार्या दिवसात अजून एक बदल झाला. पूर्वी वडील सदूला घेऊन न्हाव्याकडे जायचे. त्यानंतर भावाने जेव्हा त्याला न्हाव्याकडे सोबत न्यायचा प्रयत्न केला तेव्हा सदूच्या साच्यात न बसणारा माणूस सदूने स्वीकारलाच नाही. तो अडून बसला. आरडा-ओरडा नाही पण आलाच नाही. मग भावाने समोर बसून त्याची दाढी करू पहिली. आधी सदू घाबरला पण मग तो अगदी आरामशीर बसून दाढी करून घेऊ लागला. भावाने दाढीसोबत  केसांचा गोटाही केला. त्यानंतर  सदूच्या हातात ब्लेड द्यायची भीती वाटल्याने हाच शिरस्ता बनला. कधी-कधी सदूच्या डोक्यावर कापल्याच्या खुणा आणि वर लावलेली हळद दिसायची.
    सदूच्या धाकट्या भावाची मुलेही सदूला 'सदूच' म्हणायची. अर्थात ह्यावर सदू काहीच म्हणायचा नाही. तो तसंच कोरं, किंचित हसत विहिरीचे पाणी झाडांना द्यायचा. जमेल तशी ताण-उसकटे काढायचा. पेरू, कैर्या, नारळ पडले असतील तर आणून ओट्यावर ठेवायचा. मध्येच हुक्की आल्यासारखे खत द्यायचा, फांद्या कापायचा. त्याचा दिवस ह्या एक संथ पण शाश्वत गतीत फिरून रात्री दहाला उरल्या-सुरल्या अंगणाच्या तुकड्यातल्या त्याच्या वळकटीपाशी थांबायचा. अध्ये-मध्ये एखाद्या संध्याकाळी तो झोपाळ्यापाशी बसून झोपाळा हलकेच झुलवत रहायचा.
     जातात तशी महिने, वर्षे गेली. भावाची मुले मोठी झाली. बागेतली झाडे पडली, किडली, वठली, नवीन कोणी रुजली नाहीत. विहिरीला पंप आला. सदूही पिकत गेला. पण त्याच्या रापलेल्या, सुरुकुतू लागलेल्या चेहेर्यावरच्या अबोध कोर्या जाणीवेला वयाने गाठलेच नव्हते.
    मोठ्या झालेल्या भावांच्या मुलांना हवे ते वाडा देत नव्हतं. वाडा पडून तिथे इमारत बांधून कोट्याधीश व्हायचे ठरले. मग बाग गेली, वाड्याचे धूड कोसळायला काही दिवस लागले, झोपाळाही गेला. भाऊ, वाहिनी वाडा पडताना निखळल्यासारखे रडले. कामाला लावलेली माणसे झोपाळा उचलून नेत असताना सदू कशातही जीव न लावण्याचा धडा गिरवल्यासारखे सारे पहात होता. पहिले झाड, मग वडील आणि आता झोपाळा....पण संपत जाण्याच्या या साखळीचे बंध सदूला बोचत नव्हते. हरवण्यासारखे काही व्हायला मिळण्यासारखे काही त्याच्यापर्यंत पोचलेच नव्हते. किंवा एकूणच सदूच्या दुनियेचे कोरे, किंचित अर्थ वेगळे होते.
      सदू अजून आहे, साठी ओलांडलेला. तो भावाच्या घरात राहतो. नव्या इमारतीत भावाला, भावाच्या दोन्ही मुलांना ऐसपैस जागा मिळाली आहे. रस्ता दिसू शकेल अशी बाल्कनी भावाच्या घराला आहे. बाल्कनीला शेड लावून घेतली आहे. सदू आता बाल्कनीत झोपतो. त्या बाल्कानिखाली असणाऱ्या अंगणाच्या, झोपाळ्याच्या आठवणींचा स्पर्श त्याला होतो का हे कळायला वाव नाही. तो अजूनही तसेच कपडे घालतो, दाढीचा नियम तोच आहे. सदूच्या भावाची नातवंडेही त्याला सदू म्हणतात. बाहेरच्यांना तो आता फारसा दिसत नाही. पण कधी दिसला तर वयाच्या हिशोबाचे ओझे आणि चल-बिचल त्याला नाही एवढे दिसते. कधी एखाद्या संध्याकाळी रस्ता चौखूर उधळलेल्या वाहनांनी गुदमरत असताना, बाल्कनीच्या कडेशी सदू खुर्चीवर बसलेला असतो. बाल्कनीच्या भिंतीवर कोपर आणि हाताचा तळवा हनुवटीशी  टेकवून. आठवणींच्या झोपाळ्याला तो मंद झोके देत असेल? त्याचे दिवस एकमेकांपासून वेगळे काढता येत नसले तरी त्यांच्यावर उमटून गेलेली वडिलांची माया, बागेची सोबत ह्यांचे कातर संदर्भ त्याला कधीच सापडत नसतील? सगळ्यांना घाबरवणारी शेवटची सावली सदूला जाणवतही नसेल का? का सोडावेसे काही सदूने धरलेच नाही त्यामुळे सदू ह्यातून मोकळा आहे? दूर कुठेतरी बघणारा त्याचा अजूनही कोरा, किंचित हसरा चेहेरा या कशाचीच उत्तरे देत नाही. 

Saturday, January 22, 2011

शेवटचा प्रखर लख्ख प्रकाश

 'तो धावत होता, अंगावर एकही कपडा नसताना, आणि त्याच्या पाठी अजून कोणीतरी...जो कोणी पाठीमागून येत होता तो त्याला घट्ट मिठी मारू पहात होता. शिसारी आणणारी, गुदामरवणारी आणि तरीही अंग पेटवणारी मिठी... मग एकदम त्या मागच्या चेहेर्याचा चेहेरा बदलत होता, कधी ओळखीचा, स्त्रीचा, पुरुषाचा...आणि त्याचा  हात लालसेने ह्याच्या शरीरभर फिरत होता. मग एकदम एक जीवघेणा क्षण, असह्य ताण असलेला, कोसळणारा...' तो खाडकन जागा झाला. त्याने मोबाईलवर वेळ पहिली. रात्रीचे ८ वाजत आलेले. जवळपास दीड तास तो झोपलेला. आणि आता जाग आल्यावर अजून गळून गेल्यासारखं वाटत होतं. तो तसाच पडून राहीला. समोरच्या खिडकीतून समोरच्या बिल्डींगचे दिवे दिसत होते. खालच्या मजल्यावर कोणीतरी लावलेल्या गाण्याच्या ओळी, मागच्या बाजूच्या झाडांवरून येणारा कावळ्यांचा तीक्ष्ण आवाज, वरचा एका अशक्त मलूल लयीत फिरणारा पंखा, तटस्थ उभ्या टेबलावर अस्तव्यस्त पुस्तकं, अंगाभोवती अर्धवट लपेटली गेलेली चादर... तो कुशीवर वळला. त्याच्या नाकाची, ओठाची, गालाची एक बाजू उशीला टेकली. घामाचा, लाळेचा जुनाट वास जाणवायला लागला. किती दिवस ही उशी अशीच बिना अभ्र्याची वापरतोय...त्याने नजर तिरकी करून खुर्चीकडे, तिच्यावर निवांत पडून राहिलेल्या धुतलेल्या आणि न धुतलेल्या कपड्यांच्या ढिगाकडे पाहिलं. परत डोळे मिटले. खांद्यावर पंख्याच्या वार्याचा अस्पष्ट स्पर्श, नाकपुडीला जाणवणारा श्वास...काही क्षण तो शांत पडून राहिला, कुठलाच विचार न करता... मोबाईलवर कुठलाच मेसेज नव्हता, तिचाही नाही. कदाचित आज अजून कामात असेल..पुढच्या आठवड्यात ती भेटेल. इथेच बोलावू कदाचित तिला...त्याचे पाय ताणले गेलेले, तळवे घामेजलेले... झटक्यात तो उठून बसला...डोळ्यांच्या कडांशी बोटं लावून काही घाण जमलीये का हे पाहू लागला. हाताच्या तळव्याला त्याची खरखरीत दाढी जाणवत होती. त्याने परत मोबाईल पहिला. ८.१५ वाजत आलेले. 'जेवायला जायची वेळ झाली. आधी अंघोळ करून घ्यावी का का चहा प्यावा बनवून' विचार करत तो बेसिनपाशी पोचला. २-४ वेळा त्याने तोंडावर पाणी मारलं. पाणी ओघळत शर्टावर पोचलं. टॉवेल शोधत त्याने सावकाश चेहेरा पुसला. सवयीने तो आरशासमोर उभा होता. चेहेरा पुसून टॉवेल खाली नेताना त्याची नजर अपोआप आरशात गेली. केसांचा टोपलं झालेलं, डोळ्याखाली निम-गडद वर्तुळे, गाल सूज आल्यासारखे वर आलेले, पोट सुटलेलं... स्वतःशीच शरमून जावून त्याने पोट आत ओढून व्यवस्थित वाटायचा  प्रयत्न केला..केस नीट केले...तो परत आरशात बघू लागला. आता बाकी कुठे न बघता तो अनोळखी माणसाकडे पहाव तसं आपल्याच डोळ्यात नीट निरखून पाहू लागला. आपल्याला आपल्या बुबुळांचा रंगही माहित नाही. कदाचित असा माहित करून घेण्यासारखा विशेष रंग नाही म्हणून. पण या डोळ्यात काहीच नाही, असेल तर एक पळपुटा भाव, समोरच्याच्या नजरेपासून नजर चोरायची घाई... त्याने आपल्या प्रतीबिम्बापासून नजर काढून घेतली.
  टेबलापाशी जाऊन त्याने सिगारेटच पाकीट आणि माचीस घेतली. तो परत आरश्यासमोर आला. आरशाकडे बघत त्याने सिगरेट पेटवली. सिगारेटच्या पुढच्या टोकाचा निखारा त्याच्या श्वासाबरोबर भडकत होता आणि तयार होणार्या राखेखाली दबत होता...त्याने दोन लांब कश मारून धूर समोरच्या आरशावर सोडला. सिगारेटच वास आणि धूर आणि त्याच्यातून दिसणारा  त्याचा चेहेरा...
   कितीतरी कथात, सिनेमात आरशातला प्रतिबिंब मुळच्या बिम्बाशी बोलतं किंवा वेगळं वागतं. आत्ता समजा समोरच्या आरशात आपल्या प्रतिमेशिवाय अजून कोणी दिसत असेल तर...
   असा होतंच नाही. हे आयुष्य त्याच्या पिचक्या पायांवर फरफटत, त्याच्या सपक चवीनेच जगायचं आहे. संवेदनांना झटका देणारा, अगदी आतवर हाक मारणारा क्षण फक्त कुठेतरी वाचायचा किंवा पाहायचा. आपल्या आयुष्यात येणार ते आतून-बाहेरून सारं माहित असलेले खुले पोकळ दिवस. तीच अधू स्वप्ने पहात आणि साजर्या मनाने जगण्याच्या रेषा चालत जाणारी माणसे आपल्या भोवती नांदणार. त्यांच्या कोमट वादविवादात, वठलेल्या सामाजिक वगैरे जाणीवात, कुठलेही विष नसलेल्या फुत्कारात आपण एक... कदाचित आपण असे आहोत हे जाणवतंय एवढंच काय ते आपला असणं...चार कविता माहिती आहेत, शब्दांचे बुडबुडे उडवून त्यात रंग पहात येतात एवढंच..पण आयुष्याच्या सार्या कडा आपण फक्त कल्पनांवर तोलून पाहतो, त्यांच्या धारेवर जगत नाही, त्यांच्या स्पर्शाने सुखावत नाही किंवा रक्तबंबाळही होत नाही.
   खूप दूर जायला हवंय इथून, अगदी अंग झडझडून काम करत हा लेचापेचा प्रकार बदलून टाकायला हवं. डेरेदार, मजबूत झाडासारखा अविचल बनलं पाहिजे, सारं सोसून एकाही निशाणी न दाखवता अपार उभा रहाता आलं पाहिजे....
     कपडे घालून तो रस्त्याला आला... त्याच्या नेहेमीच्या जेवायच्या जागेपाशी तो काही काळ घुटमळला. इथे जेवलो तर पैसे वाचतील..अजून १७ दिवस बाकी आहेत महिन्याचे... पण तो पुढे चालत राहीला. सराईत पावलांनी बार मध्ये येऊन पोचला.
   त्याच्या ओळखीचे वेटर पुढे झाले. हा आजचा सलग तिसरा दिवस. त्यातल्या एकाने दाखवलेल्या टेबलावर तो बसला. थोड्याच वेळात वेटरने ग्लास, स्टरर आणि बर्फ आणून टेबलावर ठेवलं. त्याने ऑर्डर दिली, सोबत सिगारेटचे एक पाकीट आणायला पैसे दिले. वेटर गेल्यावर तो समोरचा टीव्ही आणि आजूबाजूच्या टेबलांकडे पहात बसला. बार जवळपास भरला होता. बहुतेक टेबलांवर २ जण, काहींवर ४ तर काही त्याच्यासारखे एकटे बसले होते. समोर टीव्ही चालू होता, जुनी गाणी..अल्कोहोल आणि निकोटीनबरोबर विरघळणारे परफेक्ट कॉम्बिनेशन. 'आखों मै क्या जी....किसीका आचल'.....  त्याने टीव्हीची नजर काढून समोर बनवलेल्या पेगकडे ठेवली. वेटरने सवयीने चकणाही आणून ठेवला होता. त्याने वेटरकडे  बघितलं, वेटरने अदबीने त्याची पसंतीची नजर उचलली. त्याने सिगरेट पेटवली, एक मोठा घोट घेतला, आणि डिशमधून काहीतरी तोंडात टाकले. हीच क्रिया त्याने सलग ४-५ वेळा केली. अर्ध्याहून अधिक ग्लास संपलेला. त्याला त्वचेखाली काही उबदार सरकवलय असं वाटू लागलं. त्याने एक जोरदार कश मारला आणि उरलेला पेग रिकामा केला. वेटरने लगेच दुसरा पेग बनवला. टीव्हीवरचा गाणं बदलून 'दो दिवाने शहर मे' लागलेलं.... गाण्याचे शब्द सावकाश त्याच्या कानाशी येऊन थांबतायेत, पण त्यातला अर्थ आणि आवाज विलग होऊन दोघे नेमके जागच्याजागी पोचातायेत असं त्याला वाटू लागलं...  हे नेमक्या ठिकाणी पोचणं खरं, अगदी नेमक्या...
   आता इथे समोर कोणीतरी बोलायला यावं, अगदी किमान तो काय सांगेल ते ऐकायला तरी.... किंवा कोणीतरी त्या गाण्याबरोबर त्या नेमक्या जागी जाऊन त्याला काय सांगायचय  ते शोषून घ्यावं, त्याला रितं, कोरडं आणि कोरं करून टाकावं ....
पण कोणीच नसणार इथे... असे ज्यांना नसतात कोणी तेच तर असे तीन किंवा अनेक दिवस सलग दारू पीत बसतात.... गाणी ऐकतात, आयुष्याला कुठलेही काटे नसलेल्या तलम दुलईत ठेवतात काहीवेळ...
 फार धूर्त होत चाल्लय शहर.... चुका करायची मुभाच नाही. सगळ्यांनी एक राजमार्गावरून चालायचं, तरच आणि तरच ते कोणीतरी आहेत.नाहीतर मग त्यांनी फक्त घरंगळत जायचं, कुठल्यतरी गल्लीच्या कधीही उपसल्या न जाणार्या गटारात किंवा एखाद्या टीचभर कोपर्यात पोतेरं बनून रहायचं,,,
  तोच समाज प्रगती करू शकतो जिथे माणसांच्या चुकांना किंमत असते'  वाक्य जिथे-तिथे रंगवून ठेवलं पाहिजे....
   नुसतंच धूर्त नाही होत आहे हे शहर, ते खुबीने माणसांच्या भुतकाळालाच भविष्य म्हणून विकत चाल्लय... तुमच्या बाप-आजाने जमवलेल्या पुंजीवरच तुमची ओळ्ख ठरणार, नाहीतर मग प्रगतीचा रथ ओढायचे सोनेरी जू खांद्यावर घ्यायचे आणि पौष्टिक कडबा खात सुस्त सुखात लोळायचे. एकसारख्या एक घरात राहायचे, एकसारखे एक कपडे घालायचे, एकसारखी एक बेगडी सुख-दुखे जमवायची आणि मग ती निसटली म्हणून एकसारखे एक सुस्कारे टाकायचे....
     तीन पेग संपलेले. त्याने वेटरला खूण करून अजून एक पेग मागितला, अजून एक सिगरेट पेटवली. पेटवून काडी विझलीच नाही, जळत जळत त्याच्या बोटाला चटका बसला तशी त्याने ती झटकन खाली फेकली. त्याच्या बाजूच्या टेबलावर एकटा बसलेला माणूस त्याच्याकडे बघून हसला, साधं, त्याचा चटका जाणवलेला हसणं...
     असंच असणार जग, असंच होतं... प्रश्न आपण कशासाठी इथे आहोत ह्याचा आहे... आपले दिवस अशी वखवख घेऊन का येतात... आपल्या हात-बोटांनी बनवलेलं आणि काळजाला जाणवणारं समाधान का नाही. फक्त मेंदू हा एकच अवयव वापरात घ्यावा असे का जगतोय आपण... एकाला एक जोडून बनणाऱ्या विचारांच्या साखळ्या बनवणं आणि त्यात माणसांच्या कृतींचा अर्थ कैद करणं.... पण जिथे माणूस काय हेच ठाऊक नाही तिथे नेहेमीच विचारांचे रिकामे पिंजरे आणि त्याच्या बाहेरचं आयुष्य असं प्रकार उरणार... पण मग तरीही इतकं विचारी, धूर्त, सजग असण्याचा अट्टाहास का लादतोय आपण...
   बस...हे शहर, वेडं-विद्रूप वाढणारा शहर ओरबाडून काढावं, सगळ्या जन्मलेल्या मुलांना त्यांच्या आई-बापापासून वेगळं काढून जंगलात सोडावं,,, त्यांना त्यांचे हात-पाय-दात-नखं वापरू द्यावेत. त्यांना एकमेकांना धरून रहायची किंमत कळू द्यावी. त्यांना आपला घास हिसकावून आणि वाटून खाता यायला हवं. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या झाड -पक्षी- प्राण्याच्या सुरात आपली भीती आणि आपलं गाणं शोधू द्यावं. ही मुलं इथे राहिली  तर त्यांच्यात गडद रेषा मारल्या जातील, त्यांना झापडं लावली जातील, त्यांना घाबरायला शिकवला जाईल आणि राजमार्गावरचा लोंढा अजून वाढवला जाईल....  ते एकमेकांचे मेंदू खाजवत प्रश्न बनवतील आणि मग संगणकाच्या पडद्यावर त्यांची उत्तरे शोधतील.... ते लोकांच्या भुकेल्या पोटांना मानवता शिकवू पाहतील आणि ऐदी साजूक आयुष्यांना अजून कोरत राहतील. ते कधीच आयुष्यभर जाळणारी स्वप्ने पाहणार नाहीत, ते कधीच एखाद्या चुकार रस्त्याला जाणार नाहीत, ते त्यांच्या आधी चाललेल्या आणि मागून येणाऱ्या मेंढरांचा इतिहास गात राहतील....
   त्याने उद्वेगाने हात झटकला.वेटर लगबगीने जवळ आला, त्याने अजून एक पेग आणि बिल आणायला सांगितले. 'अजीब दास्ताँ हैं ये'  समोरचा टीव्ही गात होता... त्याला जाणवलं कि आजही दारूत आपले प्रश्न सहज संपले, आणि कोड्याचे सगळे तुकडे जुळून आले... आता फक्त कोणीतरी कौतुकाने पहायला पाहिजे आपल्याकडे, आपल्याला जवळ घेऊन थोपटलं पाहिजे आणि मग हेच असंच वाटत राहिलं पाहिजे....
   पण उद्या ही धुंद जाणीव उतरणार... मग परत तिच्यात जाण्यासाठी तडफड.... एकमेकांना घासत एकमेकांच्या विरुद्ध जाणार्या दोन जाणीवा एवढाच शेवट आहे का सगळ्याचा.... आणि तसं असेल किंवा नसेल, तरी एकदा हे उलगडल्यावर दररोज हा खेळ का खेळायचा.....
   त्याने बिल भरलं, २-३ नोटा टीप म्हणून ठेवल्या...
  तो रस्त्यावर आला तेव्हा रहदारी निवळत आलेली. एक थंड झुळूक त्याला छेदून, त्याचा बोलण्याच्या तहानेला जागवून गेली. पण जे बोलायचं त्यासाठी एकटाच असलं पाहिजे आणि त्याचवेळी कोणाच्या तरी अस्तिवाने आपल्या जाणीवांवर खूण ठेवावी असंही वाटत राहणार ....तोच घासत जाणारा अटळ विरोधाभास....
   तो आपल्याशीच हसला... त्याने अजून एक सिगरेट पेटवली. त्याच्या उजवीकडून एक ट्रक वेगात येत होता, त्याचे प्रखर हेडलाईट....
   त्याने एक जोरदार कश मारला आणि एक पक्या जाणीवेने त्याची पावले त्या वेगाने येणाऱ्या प्रकाशाकडे चालू लागली.....   

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...