कोणी उकिडवा बसून वाट पाहू
लागतो साठलेला साका बाहेर यायची
कोणी घोळतो पेस्ट आणि ब्रश
दातांत निरखत झोपाळू आरसा
कॉफी वाफाळते मगात
कुठे दुधवाला गिनतो उरलेल्या
थैल्या
रिक्षावाला सोडतो वाट
पाहणारी जांभई
वॉचमन तारवटून पाहतो ए टी
एम च्या दाराकडे
शटर करकरत जाते वर
शिलगते सिगारेट चहाच्या
मिठ्या उबेत
फुटपाथवर गुरफटतो कोणी
चादरीत पुन्हा
इडलीवाला देतो सांबार, चटणी
व्हॉटस अॅपवर दिल्या जातात
गुड मॉर्निंगच्या सुवचनी पुड्या
मित्र म्हणतो हे तर पक्कं
येणार टेस्टला आज
स्टिरिओ धनकतो एफ.एम.
रात्रीने मऊसूत झालेले
रस्ते आणि निवलेले लोक
कुत्र्यासारखा ताणून आळोखा
देतो दिवस
आणि मग एक पाय वर करून
खांबावर मुतून जातो