Showing posts with label संध्याकाळ. Show all posts
Showing posts with label संध्याकाळ. Show all posts

Saturday, June 27, 2015

किल्ला

दोन दिवसांत दोनदा बघितला मी पिक्चर. कशासाठी? चिन्मय आणि त्याचे मित्र ह्यांच्या सीन्स साठी, त्या सीन्सपाठच्या म्युझिकसाठी, आणि आपल्या मानेमागे हात ठेवून रेलून शब्द नसलेले क्षण आपल्या मनात निनादण्याचे, त्यांच्या येण्याने निर्माण होणाऱ्या बिंब-प्रतिबिंबाच्या साखळीचे सुख अनुभवण्यासाठी.
       माझ्यासाठी काही हा नॉस्टॅल्जिया नाही. मी अशा शाळेत, अशा गावात कधीच नव्हतो. मला असे मित्रही कधी नव्हते आणि मी किंवा त्यांच्यातला कोणी बाकीच्यांना सोडून जाण्याबद्दल सुद्धा मला काही अनुभव नाही.
       मला माझी शाळा आठवते तेव्हा काय आठवतं? स्पर्धा, अगदी तीव्र स्पर्धा, माझ्या मनातली, माझ्या पालकांच्या, आजूबाजूच्या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली, त्यांच्या अॅम्बिशन्स. मग आठवते ती कळप म्हणून असण्याची क्रूरता. फुलपाखरू, गोगलगाय, चतुर, गांडूळ अशा आपल्यापेक्षा कःपदार्थ गोष्टींना संपवण्याची. आणि मग आपल्यातल्या दुबळ्या, नेभळ्या मित्रावर फोकस होणारी. मग सेक्स, थेट नाही, पण मनातला, सगळीकडे भरलेला.
       पण मला त्याचं फार वैषम्य वाटत नाही. आणि असंही नाही की मी ती फेज एन्जॉय केलेली नाही. क्रिकेट नावाची एक गोष्ट आणि त्या गोष्टीने वेडावलेले मित्र ह्यामुळे कायमच त्या साऱ्या दिवसांना मजा होती.   शाळा म्हटली की माझ्या मनासमोर दुपार येते. निवांत जडावून पसरलेली दुपार. फार रखरखीत नाही, पण चकचकीत. वर्गात फिरणारे पंखे, आणि मागच्या बाकांपैकी एका बाकावर बसून कधी खिडकीकडे, कधी वर्गातल्या बाकीच्यांकडे बघणारा एक मुलगा, आणि गोठून गेल्यासारखी वेळ.
       स्वतःबद्दल बोलावसं वाटणं हे न संपणारं व्यसन. त्याला फिक्शनमध्ये टाकून सामाजिक ग्राह्यता मिळवता येते.
--
       कधी कधी वाटतं की आपल्या भोवती एका शिस्तशीर कुरूपता भरत चालली आहे. आणि कोणालाच ह्या शिस्तशीर, पठडीबाज कुरुपतेने आपली स्पेस व्यापली जाण्याची पडलेली नाही. आपण बोलावून बोलावून सांगतो आहोत की हे कुरण, हा नदीकाठ, हा डोंगर, हा बाजूला चार बाकं टाकलेला शांत अरुंद रस्ता, इथे तुम्ही घरं बांधा उंच उंच सिमेंटच्या काडेपेट्यांची. आणि आम्ही त्यातल्या कशाकशाने तरी घासून पेटणा-या काड्या बनू. आम्ही भाषेने पेटू, आम्ही देशाने पेटू, आम्ही जातीने पेटू, आम्ही वर्गकलहाने पेटू. पण आमच्या भोवतीची ही शांतता भरून टाका. कारण त्यात आम्हाला काही सुचत नाही. आम्हाला आमच्या शांततेचे मालकी हक्क द्या आणि टूरिस्टि तुकडे द्या. पण बाकी वेळ आवाजाने, जाहिरातीने, पुढे कसं होईल माझं, माझ्या पुढच्याचं, माझ्या मागच्यांचं ह्या भीतीने, विकत घेण्याच्या पाशवी भुकेने भरा. आम्हाला शांतता नको. येऊ दे, येऊ दे, निळ्या काचांची कॉंक्रिटी स्काय्स्क्रेपर कुरूपता येऊ दे. येऊ दे, येऊ दे, फ्लायओव्हर्सची, मेट्रो आणि मॉलची भरधाव कुरूपता येऊ दे. आमची गर्दी, आमची वखवख साऱ्याला सामावून घेईल.
मी जेव्हा ‘किल्ला’ बघतो, आणि जेव्हा त्यातले समुद्राच्या पार्श्वभूमीचे, तंतुवाद्याच्या स्वरांनी तोललेले क्षण पाहतो तेव्हा मला असं काही वाटत नाही. मी कुरुपतेच्या व्यापत्या जाणीवेला गुंगारा देतो.
सुख. असण्याचे, असू शकण्याच्या अलवार शक्यतांचे सहन न होणारे हळवे, हलके सुख.
--
       आपण खरोखर जेव्हा ८-९-१० वर्षाचे असतो तेव्हा निरागस असतो, म्हणजे निरागस क्रूर, निरागस कुतूहल असलेले, निरागस चिडके, निरागस दुखावले जाणारे, निरागस भित्रे. आपण कसं असावं ह्याचं काहीच आपण आपल्यावर पांघरलेलं नसतं. पण हळूहळू आपल्याला कळतं की आपण कोणता मुखवटा निवडायचा. ज्याला लवकर कळतं तो लवकर शहाणा होतो. किंवा येऊन बसतोच एखादा मुखवटा आपल्यावर, आपण काढून दुसरा काही लावेपर्यंत. आपण त्याला मोठं होणं का म्हणतो, खोटं होणं का म्हणत नाही?
--
       ‘लंपन’ मोठा झाला असता तर तसाच राहिला असता का? का जगानं त्याची घे घे मजा घेऊन त्याला वेगळाच करून सोडला असता? माझ्यातला सिनिक म्हणतो की लंपन मोठा होऊन गेला असता परदेशात, आणि त्याला कायमच नॉस्टॅल्जियाग्रस्त राहायची मुभा राहती. शेवटी नोस्टॅल्जिया म्हणजे काय, स्पेस किंवा टाईम बदलला की बाकी राहणाऱ्या इमेजेस.
--
       शाळेत एक धडा होता, ललितलेख असं त्याचं वर्गीकरण होतं. त्यात एका कवीची शेवटची इच्छा होती, त्याच्या बागेतल्या झाडांखाली झोपून मरण येण्याची.
       मला वाटतं कधीकधी की वयाच्या अशा एका टोकाला येऊन लटकलो आहे की माझ्याकडे सेल्फडील्यूजन करण्याची ताकद नाही, माझ्याकडे गर्दीच्या प्रवाहात स्वतःला सोडण्याची हिंमत नाही आणि कुठल्याही मॅडनेसचा बबल नाही. मी गुदमरत जातो आणि कुठल्याही निवडीची दोरी न मिळाल्याने कोसळतही. मला काहीतरी निवडलं पाहिजे किंवा सगळ्या निवडी संपवण्याची निवड. इट्स सो फक्ड अप.
       दहावीला ‘कोसला’ होता, कादंबरीचा तुकडा असलेला एक धडा. घिरट्या घालत येणारे दुःख आणि झोपलेला बुद्ध, अजंठा मधला. आणि मर्ढेकर, घोटभर उरणाऱ्या गोड हिवाळ्याचे.
       मी माझ्या घराच्या सिलिंगकडे बघत विचार करतो, मरणाचा. अ फिलोसॉफीकल पर्स्पेक्टिव. मरण म्हणजे कशाची भीती वाटते नेमकी? बहुतेक सारं, त्याच परिघात, त्याच आवर्तनात सुरू राहील आपल्यामागे. आपण सुटलो काय, आपण असलो काय.
       पण आपल्याशी उरून राहिलेले केवढे क्षण आहेत, उबदार प्रकाशाचे, मंद, आश्वस्त. आणि त्यांच्यापाठी एक म्युझिकपण, आपले आपल्यालाच ऐकू येणारे.
--
       ‘विहीर’ पहिल्यावर, ‘लिटील प्रिन्स’, पाडस’ वाचल्यावर मला वाटलेलं की आपण आपल्या आतल्या हरवून गेलेल्या, कदाचित आपल्या कल्पनेचाच खेळ असलेल्या एका स्पेसला स्पर्शत आहोत. शक्य असतं तर त्या बबलमध्येच आपण राहिलो असतो.
       पण बबल जातो, फुटत नाही, बस त्यातली स्पेस सवयीच्या, हव्यासाच्या शिस्तबद्ध कुरुपतेने भरून जातो. आणि मग त्याच जड नशेत आपण घरंगळत राहतो.
       कुठेतरी थांबतो, आणि आपल्याशी बेवफाई न करणाऱ्या वेळचा तुकडा पांघरून निवांत होतो, असोशी आणि सुखाच्या हद-अनहद मध्ये.  

       ‘किल्ला’ साठी.                              

Saturday, December 4, 2010

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो...
हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण डॉक्टर.... (थोडक्यात गरिबी हे मरण्याचे कारण बाद) ह्याचे एका परधर्मीय मुलीवर प्रेम होते आणि ह्याच्या आईचा लग्नाला विरोध होतं... (ऐकल्यासारखी वाटते ना गोष्ट) मागची तीन वर्षे ह्याचे आईबरोबर झगडे होत होते आणि तो नोकरीनिम्मित दुसर्या शहरात रहात होतं. मरण्यागोदर त्याचं आई आणि प्रेयसी दोघांबरोबर भांडण झालेलं. आणि मग....
त्याने गळफास लावला...खाली खुर्ची नव्हती.... आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते.... हा जेव्हा मेलेला सापडला तेव्हा त्याचे गुडघे दुमडलेले होते.... आणि शरीर निळे पडलेले ....
माझ्या मित्राच्या मते हे मरण्याचे झ्याटू कारण आहे.... त्या मुलीशी लग्न करून भांडत भांडत आईला समजावता आला असतं....
माझ्या मते आत्महत्या करणारे कायमच बरोबर असतात.... फक्त तर्काच्या दोर्या वापरून त्यांच्या बरोबर असण्याच्या मुळाशी पोचता येत नाही.... its on altogether different plain... आणि त्यांना भित्रे वगैरे म्हणणे म्हणजे जगत रहाणार्यांनी आपल्या भोंदू गांडूपणाला जोडलेली शौर्याची बेगडी शेपटी आहे.... त्यांना मरावासा वाटलं ते मेले.... जे हवं होतं ते मिळत नव्हतं हे मरण्याचं सबळ कारण आहे.... ते कधी ना कधी मिळेल किंवा त्यापेक्षा बरं मिळेल किंवा ते दुखच संपून जाईल अशा तथाकथित 'आशावादाला' चिकटून जगत राहणं कि खरंच चांगली निवड आहे का.... आता मी अजून जिवंत आहे आणि तरी असे म्हणतो आहे... मग मी मरत का नाहीये.... बरोबर आहे तुमचा प्रश्न.... त्याबद्दल नंतर कधीतरी.... आता विषय वेगळं आहे.... (सोयीस्कर!)
आता हा इसम मेल्यावर त्याच्या आईचा आणि प्रेयसीचा काय.... त्याच्या प्रेयसीने पण आत्महत्येचा प्रयत्न केला अशी ऐकीव बातमी.... पण आईचं काय....
एखादा माणूस,,, अगदी निराशावादी माणूसही आपल्यामुळे मेला आहे हे जाणवत राहून जगत राहणं हा काय प्रकार आहे....
आता कदाचित ह्या इसमाचे लग्न झाल्यावर त्याने एक वर्षात घटस्फोट घेतला असतं... किंवा त्याच्या बायकोने आत्महत्या केली असती.... किंवा ह्या माणसाला मुळाशीच काही पोकळपणा असणार... म्हणून त्याने आई-बाई अशा शुल्लक प्रकाराने आत्महत्या केली.... किंवा प्रेमात पडल्याने आणि उभं न रहाता आल्याने....
आम्ही दोघं त्या मृत इसमाचे सहानुभूतीदार आहोत का तटस्थ निरीक्षक.... जे एकूणच ह्या मृत्युच्या तात्विक पार्श्वभूमीचे विश्लेषण करत आहेत....
त्याला मरण्याच्या शेवटाच्या काही क्षणात काय वाटलं असेल.... कारण खुर्ची वापरून गळफास हा तुलनेने मरण्याचा कमी त्रासदायक प्रकार आहे... मणका तुटतो... आणि खल्लास... (मित्राकडून आलेली माहिती) ...आता इथे हा लटकत होता... प्रयत्नपूर्वक गुडघे दुमडत असणार.... पण मग तो आधी बेशुद्ध झाला आणि हळूहळू ... का मरेपर्यंत त्याने गुडघे टेकलेच नाहीत...मरणासमोर.... का काळा-निळा पडण्याच्या शेवटच्या क्षणात जगण्याच्या इच्छेचा डोंब उसळून आला आणि तिथे कोणी नव्हतंच.... त्या मुलीला कधी कळलं नाही कि हा असा टोकाला जाऊ शकतो.... का असे टोकाला जाऊ शकतो वाटणारे कुठे जाणारे नसतातच....जे जातात ते असे झटकन....
त्याला हे का कळलं नाही कि प्रेम ही भावना हळूहळू विरत जाईल आणि सोयीस्कर तडजोडीने तो समाधानाचा घरगुती अंगरखा पांघरू शकेल....
शक्यतांच्या जाळ्यात न येणारी घटना एवढंच म्हणून हा 'इवेन्ट' सोडून द्यावा लागेल का.... मेळघाटात माणसे जगतात, हजारो किलोमीटर अंतर तोडत जगण्याची नवी मुळे पकडतात, बकाल दारिद्र्यात जगतात, एकवेळचे जेवण खाऊन जगतात.... म्हणजे ऑन एवेरेज माणसाच्या जगण्याचा आशेचा तंतू प्रबळ असताना हा असा का..... किंवा बाकीचे असे का..... अख्या भारतात मागच्या वर्षी असे ३७००० आहेत.... कोट्यावधींच्या जगण्यात, जे दरवर्षी ९%ने समृद्ध (!) होते आहे त्यात हे उदास जीव का....
जे हवं आणि जे आहे यांच्या मधलं अंतर कधी कधी इतकं न संपणारं का असतं....
त्याच्या आणि त्यांच्या आत्महत्येनंतर माझे हे वांझोटे प्रश्न....

डिसेंबर

अजून एक अर्धवट विझला दिवस मनात साठवत तो चालायला लागला. असा एकदम मानगूट पकडणारा कंटाळा त्याला आता सवयीचा झाला होता. कंटाळा म्हणजे एकच रंगाचा चष्मा लावण्यासारखं आहे, त्यातून सगळ्या गोष्टी अर्थहिनतेच्या गर्तेत जाताना दिसतात आणि आपण ते पहात राहण्यापलीकडे काही करू शकत नाही. संध्याकाळ होत आलेली, थंडीचे दिवस असल्याने उन्हाने लवकरच काढता पाय घेतला होता. पश्चिमेला लालसर सूर्यबिंब क्षण-दोन क्षण प्रत्येक बिंदूशी थांबत, प्रत्येक स्तब्ध क्षणात ढग आणि आकाश यांच्यातल्या मोकळ्या पडद्यावर रंगांचा व्याकूळ, निशब्द पट मांडत मावळत होते. ह्या वेळेला , इतक्या वेळा पाहूनही तेच तुटल्यासारखं का वाटतं? कोणीतरी अपार मायाळू ओळखीचा भेटावं, आणि अशा एखाद्या कुशीत हा भयकाल संपेपर्यंत, उरातले अस्थिरतेचे कंप मिटेपर्यंत चेहेरा लपवून पडून रहावं.... जाणारा प्रत्येक दिवस या कोलाहलाला माझ्यासाठी परका करून जातो आहे, दिवसेंदिवस एक अतृप्त कोरडेपण येते आहे सगळ्यावर.... कशाचा डंख लागत नाही, कशाने मन पालवून निघत नाही, आणि पाय घासत निघालेल्या निर्वासित कळपासारखा निरुद्देश रस्ता पसरला आहे समोर..... आता का? कुठे? कशासाठी ? अशा प्रश्नांचेही वादळ येत नाही..... बस,,,ही एक संध्याकाळ येते.... समोरच्या धूसर पडद्याडच्या इमारती, त्यात हजारो माणसे, त्यांचे एकमेकांशी संबंध..... ह्यात कशात कुठे आपण नाही.... आपली नोंद नाही त्यातल्या एका प्रकाशित चौकोनावर.... आत्ता वाट पाहणारही कोणी नाही म्हणून कुठे जायची घाईही नाही..... हा पत्करलेला का ओढवलेला एकटेपणा... आणि तरीही जीव जळत जाणारी तगमग कुठेच शमलेली नाही....
समोर एक फुगेवाला होता.... तसे आता फुगेवाले कमी दिसतात.... बासरीवालेही कमी दिसतात.... कल्हईवाल्यांची हाक ऐकू येत नाही.... ठीके.... आता फक्त फुगेवाला आहे समोर.....
तिला फुगा विकत घेतलेला आपण एकदा.... आधी तिला विचारलं तेव्हा तिला वाटलं मी गम्मत करतोय....म्हणून हो म्हणाली.... मग हातात एक भला मोठा गोल फुगा दिला तेव्हा गोंधळली....मग तसाच तो फुगा मिरवत चालायला लागली.... त्याच्या मागे ती लपून जायची.... मग कुणालातरी धक्का लागायचा.... मग ती फुग्यामागून डोकवायची...तिच्या चेहेर्यावर तिचं ते 'पोर' हसणं... समोरच्याला 'सॉरी ' म्हणायची.... आपणच कानकोंडे झालेलो तिच्या सोबत चालताना....मग एका हाताने आपला हात पकडून आणि दुसर्या हातात फुगा पकडून रस्ता पार केला.... मग कुठेतरी त्या फुग्याकडे बघणाऱ्या रस्त्यावरच्या मुलाला देऊन टाकला तो फुगा आम्ही.... आम्ही... का मी....का मी आणि ती....
ती नाहीये ह्याचीही सवय झालीये आता.... ती नाहीये म्हणजे....ती आहे.... एका अर्थाने तिने असायला हवंय तिथे आहे.... आणि ती नेहेमी सांगायची तशी डिसेंबर मध्ये आहे ती तिच्या आवडत्या शहरात....
डिसेंबर.....
सगळ्या वर्षाच्या आठवणी ह्या एका महिन्यात येऊन कोलमडणार.... मग हळूहळू त्यांच्यात हरवायचं.... राहुल शर्माचा 'डिसेंबर' ऐकलेला अशा एक थंड होत गेलेल्या रात्री.... कॉफी...अंगावर मध्येच येणारं शहारा... कोणी काही बोलायचं नाही.... संतूरचे सूर त्यांच्या नाद-निनादांचे कोश विणत जायचे.... मग मध्येच ती सांगायची.... रजईत गुरफटून जायच्या आठवणी.... मग असंच कशा-कशावर बोलत जायचं.... आणि मग केव्हातरी ती निघून जायची.... आत्ताही ती निघून गेली आहे..... ही संध्याकाळ बाकी आहे, हा डिसेंबर बाकी आहे... तिची आठवण जागवणारे संदर्भ सोयीस्कररित्या विसरायला शिकलो आहे आता.... कॉफीचा मग वापरायचा नाही... काही गाणी ऐकायची नाहीत....काही जागी जायचा नाही.... आणि तरीही काहीवेळा एकदम तिचं कडवट होत निघून जाण असं एकदम ..... ते तेवढे क्षण जाळून गेल्यासारखे.... पार राख राख.... एखाद्याच्या निष्पाप असण्याला चरा पडणं यापलीकडे भेसूर काहीच नसतं.... गर्दीत एखाद्या मुलाचा हात आईच्या हातातून निसटला कि कसं कावरं-बावरं होतं ते पोर.... पुढे जाऊन कदाचित ते आईचा दुस्वास करेल....पण म्हणून आपण एकटे आहोत, एकटे होणार आहोत याची भयप्रद जाणीव करून देणारे ते क्षण माफ होत नाहीत.... तिच्या आतलं कुठलंही सोंग न घेता जगाकडे अनिमिष डोळ्यांनी पाहणार मुल कुठे गेला.... ते फुगा घेऊन रस्ताभर भटकणारे ... टाळ्या पिटून कुठेही हसणारं....कुठेही घरच्या आठवणीने चुरगाळून जाणारं....
कदाचित तिने इथे यायलाच नको होतं.... जर-तरचे हजारो फासे जरी टाकले तरी आज तिच्या कोडग्या मौनामागे दफन झालेलं तिच्यातला लहान मुल.... आणि त्याच्या अकाली संपण्यात तू सामील आहेस .... तूच सूत्रधार आहेस त्याचा.... तुझ्या शब्दांनी गळा घोटालय त्याचा.....
सभोवतालचे सारे जण पाहतायेत आपल्याकडे आणि जर मनात उमटणारे हे शब्द त्यांना दिसले तर....
सवयीने गुदमरवणारे हे क्षण थोपवून धरू आपण.... पण असे व्रण साठून साठून आता कुठलाही आनंद आपण कधीही पूर्णांशाने भोगू शकणार नाही.... अशा प्रत्येक क्षणी तिची आठवण येणार आहे.... संदिग्ध शब्दांचा आणि निर्माल्य होऊन गेलेल्या पण कधीतरी तीव्र असलेल्या भावनाचा एवढा पालापाचोळा आहे कि मी आता तिच्याकडे बघून साधा ओळखीचं हसूही शकणार नाहीये.... तिच्या आयुष्याला आता आपण स्पर्श करू शकत नाही हे बरं मानायचा आणि त्याचवेळी इतक्या आतवर रुतलेल्या माणसाला अनोळखी मानायचा अशक्य आटापिटा करत रहायचं...
ओरबाडत जाणार्या ह्या द्वन्द्वाकडे पहात तो आपल्याशीच हसला..... हे असं कोलमडतो आहोत एवढं तरी....
सारे विचार फेकून देत तो बाजूच्या बाकावर बसला..... समोर फुगेवाल्याकडे एक मुलगी फुगा विकत घेत होती.... सूर्य कधीच मावळला होता.... आणि आता त्याच्या भोवती एक मंद वार्याची झुळूक होती.... डिसेंबरमधली....

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...