Showing posts with label बकवास. Show all posts
Showing posts with label बकवास. Show all posts

Monday, April 26, 2021

आयपीएल झालीच पाहिजे

 आयपीएल आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीची द्वेष करण्याची बाब आहे. कधी राज्यात पाणी परिस्थिती गंभीर आहे म्हणून आयपीएल सामन्यांना बंदी अशी तद्दन बिनडोक मागणी केली गेली होती. म्हणजे राज्यात पाणी कमी म्हणून लोकांना एका दिवसाआड एक आंघोळ करा अशी मागणी कधीही कोणीही केल्याचे ऐकिवात नाही, पण राज्यातील एका मैदानावर मारल्या जाणाऱ्या पाण्याने राज्याचा पाणी प्रश्न सुटण्याची नैतिक जादू आपण काही वर्षांपूर्वी केली होती.

तर ह्या वर्षी देशात कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू असतान कशी काय आयपीएल खेळवली जाते ह्या प्रश्नाने आपल्याला आयपीएलला शिव्या घालायच्या आहेत. ह्यातला पहिला मुद्दा आहे कि कशी काय एवढ्या भीषण अवस्थेत आयपीएल आणि आयपीएलच खेळवली जाते.

 आयपीएलच का ह्या प्रश्नाचे उत्तर एकच आहे – पॉवर! सध्या BCCI हा आर्ष भारतीय संस्कृतीचा भाग आहे, किंबहुना ‘हा जय नावाचा इतिहास आहे हे वाक्य काही दिवसांनी BCCI च्या इतिहासाच्या सुरुवातीलाच लिहावे लागेल. त्यामुळे ज्यांचे कासोटे हे संस्कृतीउद्धारासाठी सदैव कसलेले असतात ते पुंगवही ‘तेढा है पर मेरा है’ प्रमाणे आयपीएलकडे नैतिक दुर्लक्ष करत असतात. ते आयपीएल बघतच नसल्याने त्यांना आयपीएलचा चीनी प्रायोजक दिसत नाही, पण त्यांना बाजारातील दिव्यांच्या माळा मात्र दिसतात. हा त्यांचा भोंदूपणा असे म्हणू नका, आपल्या पथावर सदैव कार्यरत राहण्यासाठी स्वतःतील विसंगती पचवायची क्षमता ही अंगी असावीच लागते. ज्याला स्वतःला फसवता येत नाही असा मनुष्य राजकारणाचे वारांगन कसे सांभाळेल. असो. तर आयपीएल हे थेट दैवी महापुरुषांचेच काम आहे आणि ते झालेच पाहिजे हे एकदा कळल्यावर आपला प्रश्न बराचसा सुटतोच.

पण आता आयपीएलमधील काही खेळाडूच ह्या वर्षीची स्पर्धा सोडून जाऊ लागलेले आहेत आणि त्यात नवल म्हणजे एका भारतीय खेळाडूनेही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा खेळाडू कोव्हीड-१९ च्या काळात स्वतःच्या परिवारासोबत राहण्यासाठी स्पर्धा सोडतो आहे. हा ‘आतला आवाज ऐकून स्पर्धा सोडायची सजा ह्या खेळाडूला मिळते का एवढी गुस्ताखी त्याला माफ होते हे बघायचं. बाकी पैशाला पासरी मिळणारे परदेशी खेळाडू ही आवृत्ती सोडून जातील आणि काही लाखाला पुढच्या वर्षी परत येतील किंवा दुसरे कोणी. भारतीय खेळाडू काहीही झाले तरी स्पर्धा सोडणार नाहीत. भारतीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय ते स्थानिक, एवढे कर्मयोगी आहे कि खेळाडू आपले कुटुंबीय मेले तरी सामन्यांतून मागे हटत नाहीत. केवळ, आणि तेही कधीतरी, जेव्हा विश्वात नवे जीवन आणण्याचा मुद्दा असतोच तेव्हाच ते कधी ब्रेक घेतात. भारतीय खेळाडूंच्या भावना एकमेकांशी एवढ्या जोडलेल्या आहेत कि त्यांची tweets सुद्धा एकसारखी असतात. एका राष्ट्राची (पोटफोड्या ‘ष आहे लक्षात घ्या!) अशी एकत्र अनुभूती येणे विरळच.

आयपीएल सुरू राहिलीच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात लंडनमध्ये बॉम्ब पडतानाही तिथे क्रिकेट सुरूच होते. मागच्या वर्षी लॉकडाऊन होता आणि लाखो माणसे गावी परतायच्या विवंचनेत होती तेव्हा आपण dalgona कॉफी, केक, आंबे चोपत होतो. मागच्या वर्षी काही हजार केसेस असताना केवळ भीरुता म्हणून आपण आयपीएल भारतात होऊ दिली नाही. ह्यावर्षी अशी कायरता नाही. आत्मा हा शाश्वत आहे आणि तो कपडे बदलावे तशी शरीरे बदलतो. मग अशा अशाश्वत शरीरांच्या नव्हे कपड्यांच्या ऑक्सिजनअभावी मरण्याने, किंवा होलसेल दहनाने आपण आत्म्याला रंजनाने तृप्त करणे सोडायचे आहे का? सारा आटापिटा मनोरंजन करायला असताना ट्वेंटी-ट्वेंटीसारखे निष्काम मनोरंजन सोडून कोव्हीडच्या आकड्यांसारखे गिधाडी मनोरंजन कोणी विकृतच निवडू शकतो.

कोणी म्हणेल कि शेकडो लोक आरोग्यसुविधेच्या अभावाने तडफडत असताना तुम्ही खेळू कसे शकता? तुम्ही सुपर ओव्हर कशी एन्जॉय करू शकता? ह्या प्रश्नाला कायमचे ऐतिहासिक उत्तर देण्याची संधी आपल्याकडे आहे.  स्वतःच्या, परक्यांच्या दुःखांचा धिंडोरा वाजवणे ह्या आधुनिक मूल्याला, ज्यामुळे आपण सारे सदैव हा ना त्या सामूहिक रुदनाचा भाग बनलेलो असतो त्याला ठोस पर्याय म्हणून, अत्यंत stoic असा अत्यंत दारुण सामूहिक दुःखाच्या काळातही मनोरंजनाला अग्रक्रम देण्याचा मार्ग आपण चोखाळला पाहिजे. केवळ आयपीएल नव्हे तर बायो-बबल सांभाळून करता येतील अशा अनेक रंजक गोष्टी आपण सुरू केल्या पाहिजेत आणि त्या टीव्हीवरून थेट प्रक्षेपित केल्या पाहिजेत. आयपीएल थांबवा नाही, तर आम्हालाही रिझवू द्या लोकांना अशी मागणी वेगवेगळ्या गटांनी करायला हवी. उदाहरणार्थ एखाद्या बिलेनिअरने सारे वऱ्हाड बायोबबलमध्ये ठेवावे आणि नंतर लग्नाची सारी रस्मे telecast करावीत, जेणेकरून हम आपके है कौन च्या आफ्टरइफेक्टमध्ये जन्माला आलेल्या पिढीला त्यांचा हम आपके है आयसोलेटेड कौन हा नवा मार्ग मिळेल.

आपण आपले मनोरंजन करण्यासाठी ह्या जगात आहोत हे सत्य जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ तेवढे आपण बऱ्याच गुंत्यांतून मोकळे होऊ. एकमेवाद्वितीय विश्वगुरु म्हणून आपले हे कर्तव्य आहे कि अशाश्वत ते सोडा आणि शाश्वत जे मनोरंजन ते धरा हे सत्य आपण जगाला दोन्ही हात उभारून सांगू. जसे रस्ते कोणतेही असोत सत्य एकच असते तसे टीम्स कोणत्याही असोत, ट्वेंटी-ट्वेंटी ही रंजक होतेच. एवढा तीव्र सत्यानुभव, ज्यांत प्रेक्षक नसतानाही दुमदुमलेल्या मैदानाची अनुभूती आहे, त्यापासून करोडो लोकांना वंचित करण्याचे पाप करू नका.

Wednesday, January 20, 2021

तांडव म्हैसूर मसाला

मुंबईत म्हैसूर मसाला नावाचा प्रकार डोश्यांच्या विक्रेत्यांकडे मिळतो. खाद्यगृहांपेक्षा तो रस्त्यावर चांगला मिळतो. बहुतेक ठिकाणी म्हैसूर मसाला म्हणजे डोसेवाल्याकडे असणाऱ्या अनेक गोष्टी, ज्या डोश्यावर शिजवल्या जाण्याजोग्या आणि खाण्याजोग्या असू शकतात अशांचे एक मिश्रण आणि त्यावर बटर-चीज-पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे किमतीच्या औकातीनुसार फवरण आणि आवरण असा प्रकार असतो. म्हैसूर मसाला बनताना बघायला फार गंमतीचे वाटते. म्हैसूर मसाला खाताना तेवढी गम्मत वाटत नाही, कारण काही घासानंतर घशाला लागलेल्या स्निग्ध पदार्थावरून सारे सहज पोटात घसरत आहे असेच वाटू लागते. आणि ह्या डोश्याला म्हैसूर मसाला का म्हणतात (ज्याला मयसूर असे पुकारले जाते) हे आपल्याला आपल्या खायच्या अनुभवावरून फारसे कळत नाही. ‘तांडव’ नावाचा प्रकार Amazon Prime वर बघताना मला म्हैसूर मसाल्याची आठवण येत राहिली.

ह्यातही ‘तांडव का म्हटलं आहे हे फार कळत नाही. अगदीच मयसूर डोसा होऊ नये म्हणून शेवटला तांडव नावाची एक पार्टी उत्पन्न होते. पण ‘तांडव च्या ऐवजी ‘X XX’ किंवा ‘मांडव किंवा ‘(स्मार्टफोनला) बोट लावेन तसा मुडदा असं काहीही नाव चाललं असतं. फक्त ही सगळी गोष्ट एका काल्पनिक देशांत चालली आहे असं दाखवलं जायला हवं होतं. मला खरंच हे कळत नाही कि भारताच्या पंतप्रधान पदाच्या भोवती कौटुंबिक कारस्थान आणि ईर्ष्या ह्यांची गोष्ट का दाखवायची? त्याने जे बनवलं आहे त्याच्या गुणवत्तेत काय भर पडली?

विवादास्पद विधाने, प्रसंग हा मसाला अगदी व्यवस्थित मुद्दामून भरलेला आहे. भावना दुखावल्याचे सावज अडकावे म्हणून लावलेला आणि किंचितही न लपवलेला तो सापळा आहे. फक्त हुशारी ही आहे कि विविध दुखावल्या भावनांची सावजे एकत्र येतील, म्हणजे देवता-जात-राजकीय पक्षांचा भूतकाळ, अशी छान म्हैसूर मसाला चलाखी दाखवलेली आहे. पण सांस्कृतिक भुवया आणि खालच्या अवघड जागा ह्यांना न झेपणारा सेक्स टाळलेला आहे. अमुक एका पालकासोबत संभोग किंवा गुदद्वाराशी वेदनादायी शारीरिक क्रिया ह्यांबद्दलच्या धमक्या, विविध प्रकाराने दाखवता येऊ शकणारा रक्तपात, नाकातून सेवन करायचे घातक पदार्थ, कर्करोगास कारण धूम्रपान आणि बौद्धिक संतुलनाला धोकादायक मद्यपान हे चालेल, पण सेक्स हा केवळ फोरप्ले आणि त्यातूनच समाधी असा अध्यात्मिकच आला पाहिजे हे आता आपल्या सिरीजचे नवे सत्व आहे.

सिनिसिझम सोडा, It could have been decent thriller, पण मागच्या दोन वर्षांत वृत्तपत्रात आलेल्या प्रत्येक बातमीचा एक भाग गोष्टीत पाहिजेच अशा अट्टाहासाने माती झालेली आहे. मला आवडलेला भाग आहे ते एका नेत्याच्या स्वीय सचिवाचे पात्र. तुला आपल्या कामामुळे अनेक अनैतिक गोष्टी कराव्या लागतात त्याची तुला खंत वाटत नाही का असे विचारल्यावर तो जे उत्तर देतो ते खास आहे. तेवढ्यासाठी मला सारे एपिसोड बघितल्याचे वाईट वाटणे एकदम संपलेले आहे. मनुष्यात आपण केलेल्या कोणत्याही कृत्याच्या खेदापासून मोकळे होण्याची स्वाभाविक वृत्ती असते, आपल्या अनैतिक कृत्यांची टोचणी लागून मकबूल होणारी माणसे हे आपल्यातल्या काही हुशार लोकांनी बाकीच्यांना दाखवलेले बुजगावणे आहे असं मला वाटतं. अशा आशयाची लाईन पकडणारे काही बघायला मिळाले मजा वाटली. मयसूर मसाला डोसा खाताना बीटरूट खाऊ शकलो असा आनंद मला वाटतो तसाच हा आनंद आहे.

स्त्रोत: इन्टरनेट 


Tuesday, December 8, 2020

कोव्हीड-१९ च्या संदर्भाने काही स्फुट लिखाण

 

मी हे लिहितो आहे तेव्हा रात्रीचे ११ वाजत आले आहेत. माझ्या घराजवळ हलदीचा किंवा कोणतातरी कार्यक्रम चालू आहे जिथे चालू असलेल्या गाण्या-बजावण्याचा आवाज मला बंद खिडक्यांतून स्पष्ट ऐकू येतो आहे. लग्नसराईच्या मौसमात दरवर्षी येतो.

मला मार्च-एप्रिल महिन्यांत कोव्हीड-१९ नंतरचे जग कसे बदललेले असेल असे काही बोलणाऱ्या लोकांची, त्यांच्या लेखांची आठवण येते आहे. त्यांनी आपापले स्वप्नरंजन आपापल्या योग्य ठिकाणी सांभाळून ठेवावे असे म्हणायची अनावर इच्छा होते आहे! पॉज आणि बदल ह्यातला फरक न कळणारे लोक मला ह्या निमित्ताने ओळखता आले. ह्यातले काही फेमस प्रकार इथे यादीत आणण्याचा मोह आवारत नाही.

1.     कोव्हीड-१९ नंतर लोक आरोग्यावर अधिक खर्च करू लागतील कारण ते आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग होतील. तुम्ही मास्क लावण्याच्या बाबतीत लोकांचे गांभीर्य पाहिले तरी ह्या क्लेममधील बालिशपणा लक्षात येऊ शकतो. काहीजण नक्कीच अधिक घाबरट होतील. इंग्रजीत अत्यंत व्याकूळ एस्से लिहिणाऱ्या एक बाई त्यांच्या Twitter वर शंका प्रकट करत असतात. आजच त्यांनी विचारले आहे कि स्विमिंगपूलमध्ये जायला काही हरकत आहे का. त्यांना मुंबई-पुण्याजवळील विकेंड स्पॉट दाखवावेत का?

2.     अनेक नोकऱ्या वर्क फ्रॉम होम होतील. मोठ्या शहरांचे महत्व उरणार नाही वगैरे वगैरे. जश्या जश्या केसेस कमी होत आहेत आपल्यातल्या बहुतेकांचा ऑफिसला जायचा दिवस जवळ येत आहे. आणि केवळ employer नाही तर employee नाही ऑफिसला जायचे आहे. प्रौढ स्त्री पुरुषांना आपापले व्यक्तिगत आयुष्य जगता यावे ही मोठी बाब ऑफिसेस आणि शाळा साध्य करतात. अनेक पालक पाल्यांना शाळेत पाठवायला उत्सुक आहेत आणि अनेक कर्मचारी ऑफिसेसला जायला, अर्थात कम्युट परवडत असेल तरच! मोठ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीने वागण्याची खात्री नाही आणि अनेकजण एकाचवेळी आजारी पडले तर त्यांचेच नुकसान आहे ह्यापायी त्यांनी ऑफिसेस अजून सुरू केलेली नाहीत. जशी लस ही भीती घालवेल ऑफिसेस परत सुरू होतील. डिसेंबर २०२१ ला आपण वर्क फ्रॉम होमच्या सुरम्य आठवणीत रमलेले असू आणि गेले ते दिवस (आणि हजारो कोव्हीड-१९ रुग्ण) असे सुस्कारे टाकत असू अशीच शक्यता आहे.

3.     गावाकडे परतलेले लोक धास्तीने परत शहरांत येणार नाहीत. असे परतलेले स्थलांतरित हे रिसोर्स ठरतील आणि त्यांना वापरून आपापल्या राज्यांचा विकास करू अशा योजनाही कुठे कुठे बनल्या होत्या.

मला स्वतःला कोव्हीड-१९ हा आपली जगण्याची पद्धती बदलून टाकणारा प्रकार ठरणार आहे असं कधीच वाटलं नाही. जेव्हा आपल्याला एखादा अनुभव अंतहीन वाटतो तेव्हा आपण त्या अनुभवाशी जुळवून स्वतःत बदल करतो. एखादा अनुभव हा मर्यादित काळासाठी आहे ह्याची जाणीव आपल्याला असते तेव्हा आपण फारसे बदलत नाही. कोव्हीड-१९ च्या साथीच्या सुरुवातीपासूनच ह्या संकटाचा एक शेवट आहे हे आपण सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं. लस हा तो शेवट असेल असं बहुतेकांचं म्हणणं आहे. पावसामुळे क्रिकेट सामन्यात व्यत्यय यावा, पण काही वेळाने तेवढ्याच ओव्हर्सचा सामना खेळवला जावा तसं.

आपण किती दुःखी होऊ शकतो हे आपण overestimate करतो. आपण खरे सुखशोधक भिरभिरे फुलपाखरू आहोत. अगदी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यूसुद्धा आपल्याला बदलत नाही, आपल्यावर कायम राहणारे व्रण पाडत नाही. मृत्यूपेक्षा त्या मृत्यूपूर्वीची प्रोसेस जर लांबलचक आणि अंतहीन (म्हणजे नेमकी केव्हा संपणार हे न कळणारी असेल) तर आपल्यावर आपल्या नकळत घाव साचत जात असावेत. पण तेही मिटू शकतात, जर आपण त्यांना नंतर गिरवत बसलो नाहीतर.

आपण ह्या पृथ्वीतलावर आहोत ते आपल्या पुढची पिढी पृथ्वीतलावर असेल हे आपल्या प्रजननातून नक्की करायला. हे प्रजनन आपल्या सुखाच्या शोधातून घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे सुखाच्या शोधाची अनिर्वचनीय तहान आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्या आजुबाजूच्यांचे मरण किंवा वेदना ह्यांपासून आवश्यक निब्बर असण्याची क्षमताही आपल्यातील बहुतेकांना दिलेली आहे. आणि ह्यात काही सिनिसिझम नाही. आपण जर दुसऱ्याच्या वेदनांनी कोलमडत असतो तर आपण त्याला मदतही करू शकलो नसतो. आपण दुसऱ्याला मदत करण्याकडेही एक काम म्हणून बारकाईने पाहू शकतो, पाहण्याचे शिकू शकतो ते ह्या निसर्गदत्त अलिप्त जाणीवेनेच.

कोव्हीड-१९ हा आपल्या जगण्याच्या पद्धतीत, आपल्या सुखशोधांच्या प्रवासात फारसे बदल घडवणार नाही असं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे ह्या आधीच्या भयानक रोगसाथींचे कोणते परिणाम आपल्याला आजवर आपल्यावर दिसतात असं विचारल्यावर दिसणारा अभाव. १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अनेकजण मुंबई सोडून आपापल्या गावी परत गेले होते, प्लेगच्या साथीमुळे. पुढच्या वर्षी परत आले. परत फ्ल्यूच्या साथीत गेले असतील, परत आले. ह्यावेळचा मृत्यूदर आणि दळणवळण तर ह्या साथींच्या काळाहून चांगले आहे.

मला स्वतःला वाटतं कि माणसांच्या वर्तनात मूलभूत बदल झालेलेच नाहीत. बदल वाटतो तो संधीचा अभाव आहे. जश्या संधी आल्या आहेत तसे आपण आपल्या सुखलोलुपतेकडे परत गेलो आहोत. किंवा बदल असेल तर एकच आहे. आपल्यातील काही जण, जे एक क्रिटीकल गट आहेत, ते मानवी समूहाच्या साऱ्या समस्यांकडे एक कोडे म्हणून बघतात आणि त्याच्या उकलीच्या पाठी लागतात. ही जाणीव सुरुवातीपासून नसावी असं वाटतं. आपण आपल्या समस्येकडे उकल असलेले पण शोधावी लागणारे कोडे म्हणून पाहू लागलो कि आपली वर्तन बदलाची शक्यता अजून कमी होते. आपण केवळ पॉज म्हणून काही बदल करतो, जे सोडायला आपण कायम अधीर असतो.

कोव्हीड-१९ मुळे आपल्यांत काहीही मूलभूत बदल झालेला नाही असं वाटायचं अजून एक कारण म्हणजे कोव्हीड-१९ मुळे जे बदल होतील असं काहीजण म्हणत होते त्यातल्या अनेक गोष्टी कोव्हीड-१९ पूर्वीही शक्य होत्या, जसे वर्क फ्रॉम होम. जर वर्क फ्रॉम होम ऑफिसमध्ये काम करण्याहून किफायतशीर असेल तर कंपन्या ते अगोदरच करत्या. त्यांना कोव्हीड-१९ साठी थांबण्याची गरज नाही. आणि त्या करत नव्हत्या ह्याचा अर्थ असे करणे ही बेस्ट निवड नाही.

--

मी बदलणार नाही, बदलणार नाही असं जे म्हणतो आहे त्याचा अर्थ मानवी वर्तन बदलतच नाही असे नाही. मानवी वर्तन बदलायची एक स्वाभाविक दिशा आहे, जीवन अधिक सुखी होण्याकडे, सोपे होण्याकडे आपण येतो. धोतराकडून pant कडे आलो ती दिशा, पत्र टाकण्यापासून स्मार्टफोनपर्यंत आलो ती दिशा. कोव्हीड-१९ च्या साथीत अशा बदलांचे काही पोटेन्शियल होते असे मला वाटत नाही.

अर्थात बौद्धिकदृष्ट्या जे म्हटलं जातं ते टोकाचं असतं, approximation असतं. प्रत्यक्षात छोटा पण पक्का अपवाद दिसून येते, जो तथ्याला अधोरेखित करतो.

कोव्हीड-१९ मुळे मानवाच्या आयुष्याच्या दोन टोकांवर मोठा परिणाम झाला असं मला वाटतं, एक म्हणजे लहान मुले आणि दुसरे म्हणजे वृद्ध. हे परिणाम लगेच दिसत असतील असे नाही. पण हे परिणाम झाले असावेत.

अनेक लहान मुलांचे घराबाहेरील खेळणे-बागडणे सुमारे ६-७ महिने बंद होते, काही जणांचे आजही बंद असेल. मला असं वाटतं कि अजून काही वर्षांनी, म्हणजे अजून १४-२० वर्षांनी आपल्याला अधिक एकारलेल्या प्रौढ व्यक्ती मिळतील का? आणि भारतात आज उभरती असलेली आक्रमक धार्मिक राष्ट्रवादाची कमान उतरती होण्याची किंवा अजून तीव्र होण्याची सुरुवात ह्या कोव्हीड-१९ च्या काळांतल्या एकारल्या प्रौढांनी होईल का?

वृद्धांच्या बाबतीत घरातील त्यांची घटलेली स्पेस (३ वा २ पिढ्या असणाऱ्या घरातील वर्क फ्रॉम होम अवस्था) किंवा त्यांचे अधिक अधोरेखित एकटेपण (एकटी राहणरी वृद्ध जोडपी किंवा व्यक्ती) ह्या गोष्टी त्यांच्या जीवनेच्छेवर किंवा त्यांच्या स्वतःच्या उतारवयातील अपेक्षांवर परिणाम करतील का? एरवीही मला स्वतःला वृद्धत्व ही फारच कोड्यात टाकणारी बाब वाटते. एकतर बहुतेकांसाठी आयुष्याची ही वर्षे म्हणजे समुद्रातून भरावाने जमीन बनवावी असा कृत्रिमच प्रकार असतो. एक समाज म्हणून आपण समाजाच्या वृद्धत्वाची मोठी किंमत मोजतो. त्यांत भारतासारख्या देशांत, जिथे वृद्ध त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र व्यवस्थांमध्ये राहण्याची शक्यता फारच कमी असते तिथे वृद्ध हे विषमतेचे वाहक बनतात. ज्या कुटुंबाना स्वस्थ वृद्ध सदस्य मिळतात त्यांची बालसंगोपन आणि शिक्षण ह्यांची अवस्था सुधारू शकते. बाकी कुटुंबाना हा फायदा मिळत नाही.

मी कायम एक चमत्कारिक विचार करतो. समजा भारतातून ६५ वर्षावरील वृद्ध नष्ट झाले तर उरलेल्या भारतीयांवर त्याचा काय परिणाम होईल? एक गोष्ट निर्विवाद आहे कि उरलेल्या समाजाची भौतिक समृद्धी जास्त असेल. मला तर असंही वाटतं कि आपली आयुर्मर्यादा घटली तर आपण अधिक जबाबदार होऊ. आपलं लांबलचक आयुष्य हे आपल्याला ‘आहे रे अजून वेळ अशीही जाणीव देतं आणि नंतर सुस्कारे टाकून आंबट द्राक्षांशी खेळायलाही खूप वेळ देतं.

माझं स्ट्रेंज भाकीत असं आहे कि कदाचित ७० च्या आसपासच्या वयोगटातील मृत्यूदर कोव्हीड-१९ नंतरही जास्त असेल आणि त्याचं कारण मानसिक असेल. किंवा भारतातील वृद्ध अधिक एकारलेली जीवनशैली अंगिकारतील.

--

लॉकडाऊननंतर जेव्हा बार परत सुरू झाले तेव्हा उत्सुकता म्हणून मी खायचे पार्सल आणायला एका बारमध्ये गेलो. (मला स्वतःला अजून बाहेर जाऊन गटात काही खाण्या-पिण्याचे धाडस झालेले नाही.) आणि तो बार शिगोशिग भरलेला होता. मद्यधुंद लोकांचे उंचावलेल्या स्वरातील बोलणे, ग्लास आणि प्लेट्सचे आवाज हे तसेच होते जसे लॉकडाऊनच्या आधी. टेबलांवर एकमेकांच्या जवळबसून, मास्क गळ्याशी उतरवून किंवा अजिबातच लांब ठेवून लोक गप्पा मारत होते, खात होते, दारू पीत होते. लोक कसे निर्णय घेतात ह्याची एक चांगली झलक मला मिळाली.

कदाचित आपण आपल्या सुखाच्या शोधासाठी अधिक कमिटेडच होऊन जावू. आणि अधिक एकारलेले, अधिक अलिप्त. कदाचित आपण नाही, पण आपली अपत्ये तशी होतील. आपण एकमेकांच्या खूपच जवळ आल्याने आता परत आपापल्याकडे परत जावे अशीच अनेकांची अवस्था झाली आहे का? व्यक्ती म्हणून आपली जाणीव टोकदार होत जाण्याचा जो प्रवास अखंड चालू आहे तो अधिक वेगवान होईल का? मला स्वतःला तरी स्वतःबद्दल असं वाटतं. पण कदाचित ही एक केवळ निसटती जाणीव असावी.

कारण लॉकडाऊनचा काळ, त्यातील कमी वर्दळीची अवस्था, शांत रात्री, सारेच जण घरात अडकून असल्याने आणि एकाच प्रश्नाकडे पाहत असल्याने निवलेली तौलनिक जेलसी, शमलेली चुरस हे सारे आता निसटून चालले आहे.

माझे वृद्ध आई-वडील सुमारे ६ महिने घराबाहेर पडले नव्हते. मला त्यांना आता थांबवून ठेवता येत नाही. असं वाटतं कि होऊन होऊन काय होईल? काहीही होण्याच्या साऱ्या शक्यतांकडे मी थोड्या शांततेने पाहू शकतो.

मे-जून महिन्यांत मास्कशिवाय कसे काय लोक वावरतात ह्या जाणीवेने मला सिरीयल आणि सिनेमेही पाहता येत नव्हते. आता तसं वाटत नाही. नाकाखाली घसरलेला मास्क लावून चालणारी, वाट पाहणारी, एकमेकांशी बोलणारी माणसे मला मानवी अस्तित्वाची सरासरी वाहक वाटतात. ‘नाश के दुख से कभी मिटता नही निर्माण का सुख ह्या रोमांचक वाटणाऱ्या ओळी ह्या अशा नाकाखाली, हनुवटीखाली मास्क घेऊन वावरणाऱ्या लोकांसाठी आहेत असं वाटतं.

--

माझ्या आसपासच्या रस्त्यावर पुस्तकांचे दुकान असलेले, अनेकांचे परिचित असे एक काका होते. ते कोव्हीड-१९ ने गेले. परवा रस्त्यात चालता चालता अचानक ते दिसल्याचा, हसल्याचा मला भास झाला. कोव्हीड-१९ नसता तर कदाचित मी त्यांना अजून वृद्ध होताना पाहू शकलो असतो, जाता-येता त्यांना हात करू शकलो असतो, काही बोलू शकलो असतो.

Daniel Kahneman च्या TED talk मध्ये तो म्हणतो कि आपल्यात दोन स्व असतात: कि अनुभवणारा आणि एक ते अनुभव आठवणारा. मला तो मनुष्य दिसला असे वाटणारा मी तिथेच उभा आहे, आपले काही आनंददायी आपल्या नकळत हरपल्याची टोकदार वेदना घेऊन. आणि हे आठवणारा मी पुढे जाऊन कांदे-बटाटे विकत घेतो, घरी येऊन ऐकू येणाऱ्या गोंगाटाने चिडून, थोडा निवून लिहितो. लिहिणं पूर्ण झाल्यावर येणाऱ्या रिक्त जाणीवेत कोव्हीड-१९ ची सावली हळूहळू माझ्याकडे सरकते असं मला दिसतं.

कोरोना व्हायरस कदाचित माझ्या शरीरातून एखादा प्रवास करून गेला असेल, पण तो हळूहळू माझ्या जवळजवळ येतो आहे अशी जाणीव मला कधीकधी होते. काम्यूच्या The Plague मध्ये मंदावत जाणाऱ्या प्लेगच्या शेवटच्या लाटेत Tarrou अचानक सापडतो, किंवा कोसळत्या Balrog च्या शेवटच्या तडाख्याने Gandalf पडावा तसे आपले होईल का असं मला वाटतं. मग सांख्यिकी मला धीर देते, कोव्हीडची सावली अगदी फिकट करून सोडते.

दिवसभर प्रवास करून एखाद्या नव्या शहराकडे जाताना उशिरा रात्री, त्या नव्या शहरातील निर्मनुष्य रस्त्यांवर पत्ता सापडू नये असं तर होणार नाही ना आपलं?          

Friday, December 28, 2018

अजिंठा, कोसला आणि सेल्फी

पांडुरंग सांगवीकरला दिसलेलं अजिंठा ही माझी अजिंठाशी पहिली ओळख. टुरिस्ट म्हणून वेगवेगळ्या जागी का जावं हा प्रश्न मला सुटलेला नाही. त्यामुळे बेत ठरवून अजिंठाला जावं असं नोकरीला लागायच्या आधी कधी झालं नाही. पण नोकरीला लागल्यावर रुटीनपेक्षा काहीही चेंज चालेल म्हणून मीही टुरिस्ट असण्याची सुरुवात केली, आणि मग बेत करण्याचे स्कील नीट वापरून हजारो स्कीमर्सच्या गर्दीतला एक होऊन अजिंठाला पोचलो.
       ‘अजिंठा. एक प्रचंड दगडी अर्धवर्तुळ.’ ह्या पांडुरंग सांगवीकरच्या अजिंठाच्या वर्णनातल्या सुरुवातीच्या ओळी. कोसलामधला अजिंठाचा भाग, विशेषतः त्यातली भाषा ही बाकीच्या कोसलामधल्या भाषेहून वेगळी आहे असं मला वाटतं. ‘दुःख प्यायलाही दुःखाची ओंजळ लागते’ अशा भाषेची कल्पना कोसलात करता येत नाही. ‘तिच्याबरोबरच तिचं इवलसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’ हा थंड, सिनिकल बघेपणा कोसलाचा आहे. पण अजिंठाच्या दोन पानांच्या भागात सांगवीकर वेगळा आहे. त्याच्या वैयक्तिक शोकातून तो अजिंठा बघतो आहे. त्याच्यासाठी अजिंठा दुःखाच्या जाणीवेचा, त्याच्याशी झगडलेल्या आणि त्याच्यापार पोचलेल्या बुद्धाच्या आविष्काराचा भाग बनून येतो. अजिंठाची विकलता सांगवीकरला उचलून नेते आणि सोडून देते.
       क्षणाक्षणाला सेल्फी काढणाऱ्या गर्दीत, बुद्धा इज गॉड, विष्णूचा अवतार असं आपल्या पाल्याला सांगणाऱ्या पालकांच्या गर्दीत, जस्ट इमॅजिन, कसं केलं असेल त्यांनी हे हजारो वर्षांपूर्वी’ असं म्हणणाऱ्या, संस्कृतीभक्षक सुजाणांच्या गर्दीत विकलता नाही, दुःख नाही. केवळ आत्ममग्नतेचा उत्सव आहे.
मीही वेगळा नाही. मला वाटतं आहे कि माझी एक झ्याटभर क्वेस्ट घेऊन इथे आलो आहे. माझी बुभुक्षित शहरी पिपासा, त्यातून आलेली अविरत रिकामी भावना घेऊन मी महाभारतातल्या मुंगुसासारखा इथे-तिथे लोळू पाहतो आहे, कुठे काही निवांत होईल का म्हणून. पण ह्या निवांत होण्यासाठी मला माझ्या आयुष्याची मूस बदलावी लागेल. तसं होत नाही तोवर मीही एक रंगबदलू टुरिस्ट आहे. अजिंठातील चित्रांचे रंग उडलेले आहेत, गुहेच्या केंद्रस्थानी असलेल्या बुद्धमूर्तींची झीज झालेली आहे. पण त्या भव्य दगडी मूर्तींत हजारो वर्षे गोठून राहिलेली दगडी शांतता झिरपते आहे. किंवा असं वाटणं ही आंबट द्राक्षे मी माझं मला देणं गरजेचं आहे.
अजिंठाच्या बुद्धमूर्ती माझ्याकडे, सेल्फी काढणाऱ्या गर्दीकडे, निषिद्ध असलेल्या कॅमे-याच्या फ्लॅशने तसू-तसू संपणाऱ्या रंगांकडे पहातही नाहीत. साठवण्याची, पूर्ण करण्याची तहान लागलेल्या शेकडो माणसांकडे बुद्ध बघत नाही. त्यांच्यावर तो हसतही नाही, त्यांच्यावर तो रागावत नाही. त्याने दगडी अलिप्ततेची वाट पकडली आहे, डोळे मिटून,झुकवून तो त्यात मग्न आहे.
आणि आत्ममग्न भोगण्याच्या उत्सवालाही बुद्धाचे काही नाही. आज अजिंठा, उद्या वेरूळ, परवा अजून काही असा हा उत्सव पसरतो आहे. ह्या उत्सवाच्या स्मरणाचे काजवे भोगण्याची आच पुढच्यांना देत आहेत. नवे नवे रस्ते बनत आहेत, त्यातून ही आच सावकाश सर्वदूर पसरते आहे.
नवा नवा भोग हे अविरत तृष्णेचे उत्तर हे आपले आजचे तत्वज्ञान आहे. तृष्णा नाकारणं, तिच्या मुळाशी जाणं हे आपण बसलो आहोत त्याच फांदीवर आघात करण्यासारखं आहे.

--
       अजिंठा बघताना मला खांडेकरांची ‘विजयस्तंभ’ ही रूपककथासुद्धा आठवते. पाश्चिमात्य उपयुक्ततावाद, लोकशाही, प्रबोधन ह्यावर उभारलेल्या आपल्या आधुनिक जीवनदृष्टीला वाटतं कि आपण किती पुढे आलो, आपल्या जाणीव, आकलन किती विस्तारले. पण खरंतर माहितीचा लोट वाढण्याच्या पलीकडे आपल्यांत आणि दोन हजार वर्षांपूर्वीच्या लोकांत काय फरक आहे.
       गुहांमधील चित्रे केवळ सौन्दार्याविष्कार नाही. ती गोष्ट आहे, एखाद्या कॉमिक्ससारखी. ह्या गुहा हे राजकारण आहे, पॉलिटीकल स्टेटमेंट आहे. राजसत्तेने धर्माशी जुळवलेला सांधा आहे, आपली लीगसी, छाप मागे सोडण्याची grandiose आकांक्षा आहे. ह्या आकांक्षेसाठी किती लोक राबले, किती जणांनी आपली कला पणाला लावली. ह्या विहारांतून किती भिक्खू वावरले, किती धर्मचर्चा झाली, किती सुटले, किती घरंगळले.
       हे चक्र चालूच आहे. वाकाटक विहार बांधून गेले, आज आपण विद्यापीठे बांधत आहोत. आपापल्या काळाचा अन्वय लावण्याची, त्यावर आपला ठसा सोडण्याची विजिगीषा राजकारण आणि विद्यार्जन ह्या दोन्हीत आहे. त्यांनी कायमच एकमेकांचे हात पकडून ठेवलेले आहेत. आणि ह्या दोन शक्ती हजारो, लाखो माणसांना इकडून तिकडे ढकलत आहेत. अशा शेकडो हातांकडून आधी त्यांनी विहारे, मंदिरे, राजवाडे, शहरे वसवली. मग लढाया करवल्या. विनाशाच्या दुःखातूनही निर्माणाची आकांक्षा थांबली नाही. ती पुढे सरकत राहिली.
       केव्हातरी ह्या पुढे सरकण्याला लोकशाहीचा लोंढा आला. तुम्ही ह्या निर्माण-विनाशाच्या लोंढ्यात या, आम्ही तुम्हाला सुखाच्या स्थिर रस्त्याची हमी देतो ह्या करारावर करोडो लोक ह्या चक्रात फिरत आहेत. जमेल, जमले तेवढे सुख साधून त्याच्या आठवणी बनवून त्यातून नवी तहान जन्माला घालत आहेत.

       काळाच्या प्रवाहात क्षरण झालेल्या बुद्धमूर्त्या मिटल्या डोळ्यांनी ह्या प्रवासाच्या साक्षी आहेत.  त्यांचे उरले-सुरले 
क्षरण आधुनिक सुखांचा आत्ममग्न प्रवाह करेल.

Saturday, December 23, 2017

‘गच्ची’ आणि काही लोकल निरीक्षणे

  
      ह्या आधी दोन हातांच्या बोटावर मोजता येईल एवढ्या लोकांसोबत मी कधीही थेटरात सिनेमा पाहिला नव्हता. काल असा मौका मला मिळाला. मेट्रो आयनॉक्स ह्या ऐन मुंबई नगरीत असलेल्या थेटरात, उत्तम साउंडमध्ये ‘गच्ची’ पाहता आला. थीम, अभय महाजनचा अभिनय आणि संवाद ह्याचे अगदी पैकीच्या पैकी मार्क सिनेमाला द्यावे लागतील. सिन्स दाखवण्याची पद्धत आणि पार्श्वसंगीत हेही पूरक आहे. प्रत्यक्षातही काही तासांची गोष्ट सांगणारे, flashback किंवा गुंतागुंतीची backstory न वापरणारे पिक्चर असतात त्यात ‘गच्ची’ येईल. शेवतालाच चित्रपट आधी मेंटेन केलेलं प्रेशर सोडून एकदम सुट्टा, हलका होतो, पण ते चित्रपटाची मजा घालवण्याएवढं खुपत नाही.
Image result for gachchi abhay mahajan
      अभय महाजनच्या अभिनयाने मी इम्प्रेस झालेलो आहो. BhaDiPa च्या मराठी Sad-गृहस्थमध्येच मला तो आवडला होता.
      गोष्ट करूण किंवा थरार करण्यापेक्षा घडते तशी सांगत जाऊन एकप्रकारे विसंगत विनोदी करणं आणि तरीही अशा फॉर्मच्या वापराच्या प्रदर्शनात न जाता चित्रपट घडता ठेवणं हे दिग्दर्शकाला जमलेलं आहे.
     मला नेहमी पडतो तसा हे बघायला येणारे कितीजण असणार आहेत हा प्रश्न चित्रपटावर पैसे लावणाऱ्याला पडला असेल का हा प्रश्न मला कालही पडला. अर्थात ह्यांत कशाला काढता असलं काही असा उद्वेग नाही तर वेगळे प्रयोग करण्याचं आर्थिक गणित आणि आडाखे काय असतात ह्याचं कुतूहल आहे. चित्रपट बघायला आलेल्यांची तुरळक संख्या हे हा प्रश्न पडायचं एक कारण होतं.
      मुंबईच्या धडकत्या कोअरपासून दूर माझं जे धर्मशाळा उपनगर (Dormitory suburb- कारण दिवसभर लोक उपजीविका आणि कम्यूट करतात आणि रात्री झोपायला घरी येतात!) आहे तिथे ‘गच्ची’ चा पर थेटरी १ शो होता आणि तोही दुपारी १.३० किंवा २.३० चा. संध्याकाळचे किंवा रात्रीचे शोज सगळे ‘टायगर’ ला. मग मेट्रो आयनॉक्सला ६ चा शो आहे हे पाहून मला वाटलं कि त्यांना शोसाठी पब्लिक यायची थोडी ज्यादा खात्री असावी. पण आले होते ६ जण. मग जिथे दुपारचे शोज होते तिथे काय झालं असेल? J
 कदाचित काही दिवसांनी नेटफ्लिक्स किंवा Amazon वरच नवे प्रयोग करणारे चित्रपट येतील. That will be a good development and sound business model in my opinion.
--
                मोबाईलच्या मोठ्या स्क्रीनचा एक परिणाम म्हणजे लोक त्यांच्या मोबाईलवर काय करत आहेत हे दुसऱ्यालाही दिसू शकतं. हे वापरणाऱ्याला ठाऊक असतं. पण अनेकदा हे बेअरिंग जातं आणि मग मोबाईल स्क्रीन काय चाललं असेल वापरणाऱ्याच्या मनात/जगात ह्याचे इंटरेस्टिंग नमुने देऊ शकते. हे थोडं perversion आहे हे मला मान्य आहे. पण लोक काय करतात ह्याचा विचार करताना त्यांच्या वागण्याकडे निरखून बघणं ही सवयच मुळातली pervert असावी असा डिफेन्स मी देतो.
      तर एका गृहस्थाच्या स्क्रीनवर मला दिसला एक व्हॉटसअप मेसेज:
10 seats for the 11 am show for movie (नाव कळलं नाही, पण प्रादेशिक भाषेत). Can we have TZH for 11 am show till Monday? J
--
असा छान पिच्चर बघून, नीट पोटोबा करून ही सगळी मजा रिचवायला जणू छान पाचक व्हावे म्हणून लोकल ट्रेनने मी परत येत होतो.  
एक कम्युटर, गर्दीच्या धप्पाक लोंढ्याच्या अग्रब्भागी दादरला डब्यात आला. ट्रेन रात्री ९.४५ ची कर्जत फास्ट आणि डबा फर्स्टक्लासचा. सहा जण बसलेले आणि दोन जण उभे अशा एका खाचेत तो तिसरा उभा राहिला. ठाणे गेल्यावर उभ्या असलेल्या पैकी पहिला बसला. तिसऱ्याच्या आशा पालवल्या कारण आता ५ मध्ये २. पण पुढे काही हालचाल नाही. डोंबिवलीला जो उभ्या लोकांत दुसरा होता त्याने आशा सोडली आणि परित्यागी भावनेने तो खाचेतून बाहेर आला. आता तिसरा चांगलाच कावला होता. त्याला बदलापूरहून पुढे जायचं होतं. बसलेल्या लोकांपैकी ४ जण झोपले होते. २ कानांत घालून बसले होते. हा मनुष्य अजून कावत चालला. शेवटी रडतखडत लोकल कल्याणाच्या आधी आली तेव्हा एकजण बसा असं त्याला म्हणाला तेव्हा हा तिसरा तिरसटला. म्हटला, ‘नको. बसा. बसूनच रहा. कशाला कोणाला जागा द्या.’ जो जागा द्यायला चाललेला तो एकदम ओशाळला, पण परत बसला. मग परत उभा राहिला आणि मी कसा नेहमी मदत करतो, पण आज जरा बरं वाटत नाहीये म्हणून बसलो असं म्हणून आपली गिल्ट साफ करू लागला. वाफ निघालेला तिसरा आता बसला आणि म्हणू लागला ‘लोक तर काय सी.एस.टी. पासून बदलापूरपर्यंत बसतात, काही वाटत नाही. सहा लोकांत तीन उभे होते, तरी कल्याणपर्यंत मी उभा होतो. काय म्हणायचं’. मग त्याने आणि त्याला सीट दिलेल्यांनी खांदे पुरेसे हलवून जगाच्या वाईट असण्यावर खुंटा बळकट केला.
हे मी बघत उभा होतो, तसं माझ्यापुढे बसायच्या सोडतीत येउच न शकलेला आणि लोकल फारच वेळ दोन स्टेशनात उभी राहिल्याने आपण नेमके कुठे आहोत असा existential चिडीला आलेला एक कम्युटर पण होता. त्यांत त्याला उशीर होतोय ह्याने वैतागलेली एक व्यक्ती त्याला मेसेज करत होती. त्यामुळे त्याला तो बघत असलेला पिक्चर पॉज करून करून रिप्लाय करायचा होता. त्याचा एक रिप्लाय
Once our lives get on track, I swear we will never see these trains again.

मग गाडी हलली track वरून, पुढे गेली. मी उतरून घरी जाऊन झोपलो ‘गच्ची’ मधला टाऊनमधल्या चाळीत राहणारा ‘श्रीराम’ आठवत आठवत! परदुःख शीतल!!        😔

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...