मुंबईत म्हैसूर मसाला नावाचा प्रकार डोश्यांच्या विक्रेत्यांकडे मिळतो. खाद्यगृहांपेक्षा तो रस्त्यावर चांगला मिळतो. बहुतेक ठिकाणी म्हैसूर मसाला म्हणजे डोसेवाल्याकडे असणाऱ्या अनेक गोष्टी, ज्या डोश्यावर शिजवल्या जाण्याजोग्या आणि खाण्याजोग्या असू शकतात अशांचे एक मिश्रण आणि त्यावर बटर-चीज-पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे किमतीच्या औकातीनुसार फवरण आणि आवरण असा प्रकार असतो. म्हैसूर मसाला बनताना बघायला फार गंमतीचे वाटते. म्हैसूर मसाला खाताना तेवढी गम्मत वाटत नाही, कारण काही घासानंतर घशाला लागलेल्या स्निग्ध पदार्थावरून सारे सहज पोटात घसरत आहे असेच वाटू लागते. आणि ह्या डोश्याला म्हैसूर मसाला का म्हणतात (ज्याला मयसूर असे पुकारले जाते) हे आपल्याला आपल्या खायच्या अनुभवावरून फारसे कळत नाही. ‘तांडव’ नावाचा प्रकार Amazon Prime वर बघताना मला म्हैसूर मसाल्याची आठवण येत राहिली.
ह्यातही ‘तांडव’ का म्हटलं आहे हे फार कळत नाही. अगदीच मयसूर
डोसा होऊ नये म्हणून शेवटला तांडव नावाची एक पार्टी उत्पन्न होते. पण ‘तांडव’ च्या
ऐवजी ‘X XX’ किंवा ‘मांडव’ किंवा ‘(स्मार्टफोनला)
बोट लावेन तसा मुडदा’ असं काहीही नाव चाललं असतं. फक्त ही सगळी गोष्ट एका काल्पनिक देशांत
चालली आहे असं दाखवलं जायला हवं होतं. मला खरंच हे कळत नाही कि भारताच्या
पंतप्रधान पदाच्या भोवती कौटुंबिक कारस्थान आणि ईर्ष्या ह्यांची गोष्ट का दाखवायची? त्याने
जे बनवलं आहे त्याच्या गुणवत्तेत काय भर पडली?
विवादास्पद विधाने, प्रसंग हा मसाला अगदी व्यवस्थित मुद्दामून
भरलेला आहे. भावना दुखावल्याचे सावज अडकावे म्हणून लावलेला आणि किंचितही न लपवलेला
तो सापळा आहे. फक्त हुशारी ही आहे कि विविध दुखावल्या भावनांची सावजे एकत्र येतील, म्हणजे
देवता-जात-राजकीय पक्षांचा भूतकाळ, अशी छान म्हैसूर मसाला चलाखी दाखवलेली आहे. पण
सांस्कृतिक भुवया आणि खालच्या अवघड जागा ह्यांना न झेपणारा सेक्स टाळलेला आहे. अमुक
एका पालकासोबत संभोग किंवा गुदद्वाराशी वेदनादायी शारीरिक क्रिया ह्यांबद्दलच्या
धमक्या, विविध
प्रकाराने दाखवता येऊ शकणारा रक्तपात, नाकातून सेवन करायचे घातक पदार्थ,
कर्करोगास कारण धूम्रपान आणि बौद्धिक संतुलनाला धोकादायक मद्यपान हे चालेल, पण सेक्स
हा केवळ फोरप्ले आणि त्यातूनच समाधी असा अध्यात्मिकच आला पाहिजे हे आता आपल्या
सिरीजचे नवे सत्व आहे.
सिनिसिझम सोडा, It could have been
decent thriller, पण मागच्या दोन वर्षांत वृत्तपत्रात आलेल्या
प्रत्येक बातमीचा एक भाग गोष्टीत पाहिजेच अशा अट्टाहासाने माती झालेली आहे. मला
आवडलेला भाग आहे ते एका नेत्याच्या स्वीय सचिवाचे पात्र. तुला आपल्या कामामुळे
अनेक अनैतिक गोष्टी कराव्या लागतात त्याची तुला खंत वाटत नाही का असे विचारल्यावर
तो जे उत्तर देतो ते खास आहे. तेवढ्यासाठी मला सारे एपिसोड बघितल्याचे वाईट वाटणे
एकदम संपलेले आहे. मनुष्यात आपण केलेल्या कोणत्याही कृत्याच्या खेदापासून मोकळे
होण्याची स्वाभाविक वृत्ती असते, आपल्या अनैतिक कृत्यांची टोचणी लागून मकबूल
होणारी माणसे हे आपल्यातल्या काही हुशार लोकांनी बाकीच्यांना दाखवलेले बुजगावणे
आहे असं मला वाटतं. अशा आशयाची लाईन पकडणारे काही बघायला मिळाले मजा वाटली. मयसूर
मसाला डोसा खाताना बीटरूट खाऊ शकलो असा आनंद मला वाटतो तसाच हा आनंद आहे.
स्त्रोत: इन्टरनेट