Friday, December 18, 2020

नुकतेच वाचलेले काही

मागच्या महिन्याभरात मी ३ इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या. ह्या तिघांतील सामाईक दुवा म्हणजे कादंबऱ्यांचे कथानक भारतात घडते. ह्या तीन कादंबऱ्या म्हणजे अवनी दोशी ह्यांची ‘Burnt Sugar’ (जी Girl in white cotton ह्या दुसऱ्या नावानेही प्रसिद्ध झाली होती), हरीश एस. ह्यांच्या ‘मिश्या ह्या मल्याळम कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ‘Moustache’ आणि Deepa Anappara  ह्यांची Djinn Patrol on the Purple Line’.

अवनी दोशी ह्यांची Burnt Sugar ही २०२० च्या बुकर पारितोषिकाच्या short-list मध्ये होती. कादंबरीच्या कथेत सुरुवातीपासूनच वेदनेची जाणीव आहे, जी कथेत कमी-जास्त तीव्र होत जाते. मला स्वतःला सुरुवातीला कादंबरी वाचणं जड गेलं, कारण कथेचा स्लो पेस आणि दुखःदायक अनुभवाचे तपशीलवार विवरण.

ह्या कादंबरीमुळे आठवणाऱ्या दोन अजून कादंबऱ्या म्हणजे जेरी पिंटो ह्यांची  Em and the Big Hoom’ आणि Jhumpa Lahiri ह्यांची ‘The Lowlands’. जेरी पिंटो ह्यांची कादंबरी आठवण्याचे कारण कथांमधील समान दुवा, coming of age among a disturbed family, आहे. लाहिरी ह्यांची कादंबरी आठवण्याचे कारण म्हणजे भारतातून अमेरिकेत गेलेल्या भारतीयांच्या पाल्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असा गट केला तर त्यात Burnt Sugar आणि The Lowlands येतील. ह्या कादंबऱ्या म्हणजे आपल्या पालकांकडून, नातेवाइकांकडून आलेल्या गोष्टींची, अनुभवांची आणि स्वतःच्या upbringing ची उजळणी आणि फेरमांडणी आहे का हे माझे कुतूहल आहे. म्हणजे काही प्रमाणात असं घडणं बहुतेक लेखकांसाठी अपरिहार्य आहे, पण भारतीय इंग्रजी लेखकांच्या बाबतीत असा भूतकाळ+आत्मशोध प्रकार जास्त असावा असा माझा कयास आहे.

हरीश एस. ह्यांच्या ‘Moustache’ बद्दल, म्हणजे त्याच्या इंग्रजी अनुवादाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल पेपरात वाचल्यानंतर मी ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरीची सुरुवात प्रचंड भौगोलिक तपशिलांनी होते, पण ह्या तपशिलांचे आकलन गोष्ट एन्जॉय करायला बंधनकारक नाही. आत्ता आहे त्याच्या २/३ आकारातही गोष्ट संपली असती, पण लेखकाने multiple endings चा पर्याय निवडला आहे, तो थोडा अनाकलनीय आहे. कादंबरीत येणारे जातींचे, स्त्री-पुरुष आकर्षणाचे उल्लेख तसे raw आहेत, पण अश्लील नाहीत. अशा काही उल्लेखांनी मूळ मल्याळम लिखाणाबद्दल गदारोळ माजला होता. थोडा सिनिकल आणि थोडा lamenting about past असा टोन गोष्टीच्या पार्श्वभूमीला आहे, त्यामुळे वाचायला मजा येते.

‘Djinn Patrol on the Purple line’ बरेच दिवसांपासून वाचायची होती, पण पैसे वाचवून वाचायला मिळत नव्हती! झोपडपट्टीमधील बेपत्ता होणाऱ्या मुलांचे संदर्भ आणि मध्ये मध्ये भुताळी पात्रांचा वापर ही कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. कथेत खूप शक्यता सामावलेल्या आहेत, पण लेखिकेने काही एक निवड करून गोष्ट आटोपती घेतलेली आहे. कथेत आणलेला धार्मिक राजकारणाचा संदर्भ लेखिकेने तिची भूमिका मांडायला आणलेला असावा असं कादंबरीच्या शेवटी असलेल्या acknowledgement मधून वाटतं. मला वाटतं कि ते टाळलं जायला हवं होतं. कादंबरी बेसिकली व्यक्तिगत तपशीलवार reportages एकत्रित करून गुंफलेली आहे आणि त्याला महानगर, गरिबी, राजकारण ह्यांचे टेकू दिलेले आहेत.

मला Kindle Unlimited वर अचानक Milk Teeth ही कादंबरी मिळाली. माटुंग्यातील रेंट कंट्रोल घरांत राहणारी कारवारी कुटुंबे, त्यांच्यातील शेजारीसंबंध, त्यातून येणारी प्रेमकथा आणि १९९० च्या दशकातील मुंबई अशी पार्श्वभूमी कादंबरीला आहे. अगदी hidden gem नाही, पण लक्षणीय आहे.


ह्या अचानक मिळण्यातून आठवली ते मध्यंतरी फेसबुक एका लोकप्रिय व्यक्तीच्या नावानी फिरणारी एक पुस्तकांचे दुकान जळाले म्हणून शोकव्हीवल उसासे आणि सामाजिक निष्कर्षांच्या पिंका टाकणारी पोस्ट. मी पुस्तकांच्या दुकानाचा connoisseur नाही. मी बहुतेक पुस्तके recommended प्रकारात विकत घेतो. मला वाटतं कि अशा प्रकारच्या पुस्तकांचा वाचक म्हणून माझी डिमांड व्यवस्थित भागत आहे. मला हवे ते पुस्तक वाचायला मिळवणे ह्यांत मला काहीही अडचण येत नाही. अहाहा, कशी ती सुंदर दुकाने आणि ते तिथले अनुभव असे एलिट शिडकावे माझ्याकडे नाहीत ह्याचं मला काही वाईट वाटत नाही. आपली गरीब द्राक्षे वाईनसाठी न बनून गंमत म्हणून केव्हातरी तोंडात टाकायला आहेत हे मला नीट अवगत झालेले आहे.

पण विचार करता मला हे लक्षात आलं कि recommended पुस्तके अशी अवस्था तेव्हाच बनू शकते जेव्हा काही जण वाटेल ते पुस्तक वाचू शकतील. आणि वाटेल ते पुस्तक वाचण्याची डिमांड ही पुस्तक दुकानात पुरी होऊ शकते. अनपेक्षित एखादे गुंतवणारे आणि लक्षात राहणारे पुस्तक मिळणे ह्यासारखी आनंदाची बाब नाही. अर्थात हे वाचनालयातही शक्य आहे, पण मग वाचनालय व्हेल माश्यासारखे बरेच काही जिन्नस आत घेणारे हवे, केवळ लोकप्रिय पुस्तके घेणारे नाही. Amazon वर येणाऱ्या book suggestions पाठचा algorithm अजून तसा कच्चा आहे, पण त्यातही अनेदा नवी पुस्तके गवसतात.

त्यामुळे मला त्या फेसबुक पोस्टमधील उसाश्यांबाबत थोडी सहानुभूती आहे. पुस्तकांच्या शेल्फसमोरून फिरताना compulsively होणारी पुस्तक खरेदी आणि नंतरचा आत्मझगड्याचा मनस्ताप टळावा म्हणून मी पुस्तकांच्या दुकानात जाणे सोडून दिलेले आहे. But I get it. यादी बनवून, मिळवून पुस्तक वाचत जाणे हे नियमाने पळायला जाण्यासारखे आहे. त्यांत एक सरावलेली, कमावलेली high आहे. पण काहीही पूर्वमाहिती नसलेले पुस्तक केवळ चाळून ९०% ‘ह्या आणि १०% मजेचा डाव लावण्याची मजा वेगळी.

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...