तिथे जे डोंगर आहेत तिथे आपल्याला जायचं आहे,
ते डोंगर, ज्यांच्या अस्तित्वाच्या रेषा दिसतायेत धुकट धुकट, तिथे.
तू.सोबत चाल किंवा एकटा आपापला
ह्या गल्ल्या आणि. बोळ सांभाळून
एकेकाळी इथे.बसायच्या इच्छामरणी वृद्ध विधवा, आपापल्या घरांची परसे राखत.
एकेकदा त्यांच्या हाका ऐकू येतात आणि पुढची वाट मागे वळते, निमुळती होत हरवत.
पुढे आलास की हे मैदान,
इथेच थांबले होते लोक आपापल्या बालबच्यांसोबत,
आणि इथेच खाक झाले जेव्हा त्यांच्या चारी बाजूनी आग लावली गेली,
एकेकदा त्यांची गाढ झोपेतच जळून गेलेली मुले इथे खेळत असतात
आता डोंगर जवळ आलेत,आहेस ना तू?
मध्ये एवढी नदी आता,
बोटभर खोल आणि वीतभर रुंद
हां, ओलांडलीस की तू आता.
आता मागे काही नाही,
ही हलकी चढण आहे,
आणि ते तिथे वरती जायचंय आपल्याला.
अरे, घाबरु नकोस. मी अगदीच तुझ्यासारख्याच होतो जेव्हा इथेच पुढे एका दरीत संपलो, भुकेला, एकटा, विकल. म्हणून चेहरा नाही मला,
पण बघ, आता तू पुढे जा माझ्या,
तुझ्या मोक्षात अडथळा नको माझा,
मी इथेच थांबतो, नवा कोणी येईल त्याला सोबत म्हणून.