Friday, December 28, 2018

अजिंठा, कोसला आणि सेल्फी

पांडुरंग सांगवीकरला दिसलेलं अजिंठा ही माझी अजिंठाशी पहिली ओळख. टुरिस्ट म्हणून वेगवेगळ्या जागी का जावं हा प्रश्न मला सुटलेला नाही. त्यामुळे बेत ठरवून अजिंठाला जावं असं नोकरीला लागायच्या आधी कधी झालं नाही. पण नोकरीला लागल्यावर रुटीनपेक्षा काहीही चेंज चालेल म्हणून मीही टुरिस्ट असण्याची सुरुवात केली, आणि मग बेत करण्याचे स्कील नीट वापरून हजारो स्कीमर्सच्या गर्दीतला एक होऊन अजिंठाला पोचलो.
       ‘अजिंठा. एक प्रचंड दगडी अर्धवर्तुळ.’ ह्या पांडुरंग सांगवीकरच्या अजिंठाच्या वर्णनातल्या सुरुवातीच्या ओळी. कोसलामधला अजिंठाचा भाग, विशेषतः त्यातली भाषा ही बाकीच्या कोसलामधल्या भाषेहून वेगळी आहे असं मला वाटतं. ‘दुःख प्यायलाही दुःखाची ओंजळ लागते’ अशा भाषेची कल्पना कोसलात करता येत नाही. ‘तिच्याबरोबरच तिचं इवलसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’ हा थंड, सिनिकल बघेपणा कोसलाचा आहे. पण अजिंठाच्या दोन पानांच्या भागात सांगवीकर वेगळा आहे. त्याच्या वैयक्तिक शोकातून तो अजिंठा बघतो आहे. त्याच्यासाठी अजिंठा दुःखाच्या जाणीवेचा, त्याच्याशी झगडलेल्या आणि त्याच्यापार पोचलेल्या बुद्धाच्या आविष्काराचा भाग बनून येतो. अजिंठाची विकलता सांगवीकरला उचलून नेते आणि सोडून देते.
       क्षणाक्षणाला सेल्फी काढणाऱ्या गर्दीत, बुद्धा इज गॉड, विष्णूचा अवतार असं आपल्या पाल्याला सांगणाऱ्या पालकांच्या गर्दीत, जस्ट इमॅजिन, कसं केलं असेल त्यांनी हे हजारो वर्षांपूर्वी’ असं म्हणणाऱ्या, संस्कृतीभक्षक सुजाणांच्या गर्दीत विकलता नाही, दुःख नाही. केवळ आत्ममग्नतेचा उत्सव आहे.
मीही वेगळा नाही. मला वाटतं आहे कि माझी एक झ्याटभर क्वेस्ट घेऊन इथे आलो आहे. माझी बुभुक्षित शहरी पिपासा, त्यातून आलेली अविरत रिकामी भावना घेऊन मी महाभारतातल्या मुंगुसासारखा इथे-तिथे लोळू पाहतो आहे, कुठे काही निवांत होईल का म्हणून. पण ह्या निवांत होण्यासाठी मला माझ्या आयुष्याची मूस बदलावी लागेल. तसं होत नाही तोवर मीही एक रंगबदलू टुरिस्ट आहे. अजिंठातील चित्रांचे रंग उडलेले आहेत, गुहेच्या केंद्रस्थानी असलेल्या बुद्धमूर्तींची झीज झालेली आहे. पण त्या भव्य दगडी मूर्तींत हजारो वर्षे गोठून राहिलेली दगडी शांतता झिरपते आहे. किंवा असं वाटणं ही आंबट द्राक्षे मी माझं मला देणं गरजेचं आहे.
अजिंठाच्या बुद्धमूर्ती माझ्याकडे, सेल्फी काढणाऱ्या गर्दीकडे, निषिद्ध असलेल्या कॅमे-याच्या फ्लॅशने तसू-तसू संपणाऱ्या रंगांकडे पहातही नाहीत. साठवण्याची, पूर्ण करण्याची तहान लागलेल्या शेकडो माणसांकडे बुद्ध बघत नाही. त्यांच्यावर तो हसतही नाही, त्यांच्यावर तो रागावत नाही. त्याने दगडी अलिप्ततेची वाट पकडली आहे, डोळे मिटून,झुकवून तो त्यात मग्न आहे.
आणि आत्ममग्न भोगण्याच्या उत्सवालाही बुद्धाचे काही नाही. आज अजिंठा, उद्या वेरूळ, परवा अजून काही असा हा उत्सव पसरतो आहे. ह्या उत्सवाच्या स्मरणाचे काजवे भोगण्याची आच पुढच्यांना देत आहेत. नवे नवे रस्ते बनत आहेत, त्यातून ही आच सावकाश सर्वदूर पसरते आहे.
नवा नवा भोग हे अविरत तृष्णेचे उत्तर हे आपले आजचे तत्वज्ञान आहे. तृष्णा नाकारणं, तिच्या मुळाशी जाणं हे आपण बसलो आहोत त्याच फांदीवर आघात करण्यासारखं आहे.

--
       अजिंठा बघताना मला खांडेकरांची ‘विजयस्तंभ’ ही रूपककथासुद्धा आठवते. पाश्चिमात्य उपयुक्ततावाद, लोकशाही, प्रबोधन ह्यावर उभारलेल्या आपल्या आधुनिक जीवनदृष्टीला वाटतं कि आपण किती पुढे आलो, आपल्या जाणीव, आकलन किती विस्तारले. पण खरंतर माहितीचा लोट वाढण्याच्या पलीकडे आपल्यांत आणि दोन हजार वर्षांपूर्वीच्या लोकांत काय फरक आहे.
       गुहांमधील चित्रे केवळ सौन्दार्याविष्कार नाही. ती गोष्ट आहे, एखाद्या कॉमिक्ससारखी. ह्या गुहा हे राजकारण आहे, पॉलिटीकल स्टेटमेंट आहे. राजसत्तेने धर्माशी जुळवलेला सांधा आहे, आपली लीगसी, छाप मागे सोडण्याची grandiose आकांक्षा आहे. ह्या आकांक्षेसाठी किती लोक राबले, किती जणांनी आपली कला पणाला लावली. ह्या विहारांतून किती भिक्खू वावरले, किती धर्मचर्चा झाली, किती सुटले, किती घरंगळले.
       हे चक्र चालूच आहे. वाकाटक विहार बांधून गेले, आज आपण विद्यापीठे बांधत आहोत. आपापल्या काळाचा अन्वय लावण्याची, त्यावर आपला ठसा सोडण्याची विजिगीषा राजकारण आणि विद्यार्जन ह्या दोन्हीत आहे. त्यांनी कायमच एकमेकांचे हात पकडून ठेवलेले आहेत. आणि ह्या दोन शक्ती हजारो, लाखो माणसांना इकडून तिकडे ढकलत आहेत. अशा शेकडो हातांकडून आधी त्यांनी विहारे, मंदिरे, राजवाडे, शहरे वसवली. मग लढाया करवल्या. विनाशाच्या दुःखातूनही निर्माणाची आकांक्षा थांबली नाही. ती पुढे सरकत राहिली.
       केव्हातरी ह्या पुढे सरकण्याला लोकशाहीचा लोंढा आला. तुम्ही ह्या निर्माण-विनाशाच्या लोंढ्यात या, आम्ही तुम्हाला सुखाच्या स्थिर रस्त्याची हमी देतो ह्या करारावर करोडो लोक ह्या चक्रात फिरत आहेत. जमेल, जमले तेवढे सुख साधून त्याच्या आठवणी बनवून त्यातून नवी तहान जन्माला घालत आहेत.

       काळाच्या प्रवाहात क्षरण झालेल्या बुद्धमूर्त्या मिटल्या डोळ्यांनी ह्या प्रवासाच्या साक्षी आहेत.  त्यांचे उरले-सुरले 
क्षरण आधुनिक सुखांचा आत्ममग्न प्रवाह करेल.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...