Monday, April 26, 2021

आयपीएल झालीच पाहिजे

 आयपीएल आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीची द्वेष करण्याची बाब आहे. कधी राज्यात पाणी परिस्थिती गंभीर आहे म्हणून आयपीएल सामन्यांना बंदी अशी तद्दन बिनडोक मागणी केली गेली होती. म्हणजे राज्यात पाणी कमी म्हणून लोकांना एका दिवसाआड एक आंघोळ करा अशी मागणी कधीही कोणीही केल्याचे ऐकिवात नाही, पण राज्यातील एका मैदानावर मारल्या जाणाऱ्या पाण्याने राज्याचा पाणी प्रश्न सुटण्याची नैतिक जादू आपण काही वर्षांपूर्वी केली होती.

तर ह्या वर्षी देशात कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू असतान कशी काय आयपीएल खेळवली जाते ह्या प्रश्नाने आपल्याला आयपीएलला शिव्या घालायच्या आहेत. ह्यातला पहिला मुद्दा आहे कि कशी काय एवढ्या भीषण अवस्थेत आयपीएल आणि आयपीएलच खेळवली जाते.

 आयपीएलच का ह्या प्रश्नाचे उत्तर एकच आहे – पॉवर! सध्या BCCI हा आर्ष भारतीय संस्कृतीचा भाग आहे, किंबहुना ‘हा जय नावाचा इतिहास आहे हे वाक्य काही दिवसांनी BCCI च्या इतिहासाच्या सुरुवातीलाच लिहावे लागेल. त्यामुळे ज्यांचे कासोटे हे संस्कृतीउद्धारासाठी सदैव कसलेले असतात ते पुंगवही ‘तेढा है पर मेरा है’ प्रमाणे आयपीएलकडे नैतिक दुर्लक्ष करत असतात. ते आयपीएल बघतच नसल्याने त्यांना आयपीएलचा चीनी प्रायोजक दिसत नाही, पण त्यांना बाजारातील दिव्यांच्या माळा मात्र दिसतात. हा त्यांचा भोंदूपणा असे म्हणू नका, आपल्या पथावर सदैव कार्यरत राहण्यासाठी स्वतःतील विसंगती पचवायची क्षमता ही अंगी असावीच लागते. ज्याला स्वतःला फसवता येत नाही असा मनुष्य राजकारणाचे वारांगन कसे सांभाळेल. असो. तर आयपीएल हे थेट दैवी महापुरुषांचेच काम आहे आणि ते झालेच पाहिजे हे एकदा कळल्यावर आपला प्रश्न बराचसा सुटतोच.

पण आता आयपीएलमधील काही खेळाडूच ह्या वर्षीची स्पर्धा सोडून जाऊ लागलेले आहेत आणि त्यात नवल म्हणजे एका भारतीय खेळाडूनेही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा खेळाडू कोव्हीड-१९ च्या काळात स्वतःच्या परिवारासोबत राहण्यासाठी स्पर्धा सोडतो आहे. हा ‘आतला आवाज ऐकून स्पर्धा सोडायची सजा ह्या खेळाडूला मिळते का एवढी गुस्ताखी त्याला माफ होते हे बघायचं. बाकी पैशाला पासरी मिळणारे परदेशी खेळाडू ही आवृत्ती सोडून जातील आणि काही लाखाला पुढच्या वर्षी परत येतील किंवा दुसरे कोणी. भारतीय खेळाडू काहीही झाले तरी स्पर्धा सोडणार नाहीत. भारतीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय ते स्थानिक, एवढे कर्मयोगी आहे कि खेळाडू आपले कुटुंबीय मेले तरी सामन्यांतून मागे हटत नाहीत. केवळ, आणि तेही कधीतरी, जेव्हा विश्वात नवे जीवन आणण्याचा मुद्दा असतोच तेव्हाच ते कधी ब्रेक घेतात. भारतीय खेळाडूंच्या भावना एकमेकांशी एवढ्या जोडलेल्या आहेत कि त्यांची tweets सुद्धा एकसारखी असतात. एका राष्ट्राची (पोटफोड्या ‘ष आहे लक्षात घ्या!) अशी एकत्र अनुभूती येणे विरळच.

आयपीएल सुरू राहिलीच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात लंडनमध्ये बॉम्ब पडतानाही तिथे क्रिकेट सुरूच होते. मागच्या वर्षी लॉकडाऊन होता आणि लाखो माणसे गावी परतायच्या विवंचनेत होती तेव्हा आपण dalgona कॉफी, केक, आंबे चोपत होतो. मागच्या वर्षी काही हजार केसेस असताना केवळ भीरुता म्हणून आपण आयपीएल भारतात होऊ दिली नाही. ह्यावर्षी अशी कायरता नाही. आत्मा हा शाश्वत आहे आणि तो कपडे बदलावे तशी शरीरे बदलतो. मग अशा अशाश्वत शरीरांच्या नव्हे कपड्यांच्या ऑक्सिजनअभावी मरण्याने, किंवा होलसेल दहनाने आपण आत्म्याला रंजनाने तृप्त करणे सोडायचे आहे का? सारा आटापिटा मनोरंजन करायला असताना ट्वेंटी-ट्वेंटीसारखे निष्काम मनोरंजन सोडून कोव्हीडच्या आकड्यांसारखे गिधाडी मनोरंजन कोणी विकृतच निवडू शकतो.

कोणी म्हणेल कि शेकडो लोक आरोग्यसुविधेच्या अभावाने तडफडत असताना तुम्ही खेळू कसे शकता? तुम्ही सुपर ओव्हर कशी एन्जॉय करू शकता? ह्या प्रश्नाला कायमचे ऐतिहासिक उत्तर देण्याची संधी आपल्याकडे आहे.  स्वतःच्या, परक्यांच्या दुःखांचा धिंडोरा वाजवणे ह्या आधुनिक मूल्याला, ज्यामुळे आपण सारे सदैव हा ना त्या सामूहिक रुदनाचा भाग बनलेलो असतो त्याला ठोस पर्याय म्हणून, अत्यंत stoic असा अत्यंत दारुण सामूहिक दुःखाच्या काळातही मनोरंजनाला अग्रक्रम देण्याचा मार्ग आपण चोखाळला पाहिजे. केवळ आयपीएल नव्हे तर बायो-बबल सांभाळून करता येतील अशा अनेक रंजक गोष्टी आपण सुरू केल्या पाहिजेत आणि त्या टीव्हीवरून थेट प्रक्षेपित केल्या पाहिजेत. आयपीएल थांबवा नाही, तर आम्हालाही रिझवू द्या लोकांना अशी मागणी वेगवेगळ्या गटांनी करायला हवी. उदाहरणार्थ एखाद्या बिलेनिअरने सारे वऱ्हाड बायोबबलमध्ये ठेवावे आणि नंतर लग्नाची सारी रस्मे telecast करावीत, जेणेकरून हम आपके है कौन च्या आफ्टरइफेक्टमध्ये जन्माला आलेल्या पिढीला त्यांचा हम आपके है आयसोलेटेड कौन हा नवा मार्ग मिळेल.

आपण आपले मनोरंजन करण्यासाठी ह्या जगात आहोत हे सत्य जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ तेवढे आपण बऱ्याच गुंत्यांतून मोकळे होऊ. एकमेवाद्वितीय विश्वगुरु म्हणून आपले हे कर्तव्य आहे कि अशाश्वत ते सोडा आणि शाश्वत जे मनोरंजन ते धरा हे सत्य आपण जगाला दोन्ही हात उभारून सांगू. जसे रस्ते कोणतेही असोत सत्य एकच असते तसे टीम्स कोणत्याही असोत, ट्वेंटी-ट्वेंटी ही रंजक होतेच. एवढा तीव्र सत्यानुभव, ज्यांत प्रेक्षक नसतानाही दुमदुमलेल्या मैदानाची अनुभूती आहे, त्यापासून करोडो लोकांना वंचित करण्याचे पाप करू नका.

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...