चलनबदली
किंवा लोकसत्ताच्या शब्दांत ‘निश्चलनीकरण’ च्या चर्चा चालू असताना एका मित्राच्या
फेसबुक वॉलवर मला ‘बिफोर
द फ्लड’ बद्दल वाचायला मिळालं. लिओनार्डो डी कॅप्रिओ असल्याने आणि क्लायमेट
चेंजसारख्या विषयावर (जो केवळ हॉक्स आहे असं म्हणणारे, कुठल्याही प्रकारच्या सांख्यिकी
पुराव्याशिवाय काहीही छातीठोक म्हणू शकणारे शहाणे आता भारतातही उदयाला आलेले आहेत.
दिवाळीच्या वेळेस धुरामुळे होणारे प्रदूषण, किंबहुना दिवाळीच्या धुरामुळे प्रदूषण
होते असं म्हणणंच हा कसा हॉक्स आहे हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहेच.)
असलेली, काही गंभीर अर्ग्युमेंट करणारी डॉक्युमेंटरी असा थोडा गवगवा ऐकिवात
आल्याने मी ती पाहिली.
माझ्या लक्षात आलेले अमेरिकन मिडिया
प्रॉडक्टचे काही ठराविक गुणधर्म: त्यातले हे ढोबळ दोन गट: एक म्हणजे सिनिसिझम+सेक्स+हिंसा
किंवा टोकाची देखणी प्रतिकूलता+आशावादी उपायांचा उदय+सोबत भावनिक वगैरे गुदगुल्या
किंवा रगडा. ही
डॉक्युमेंटरी दुसऱ्या प्रकारात आहे.
लिओनार्डो अर्ग्युमेंट जरूर करतो: आपण आपली
जीवनशैली बदलायला हवी, निवडी अधिक काळजीपूर्वक करायला हव्यात असं. तो कॉन्सपिरसी
मांडतो (ऑईल कंपन्या आणि त्यांच्या राजकीय लॉब्या, पाम तेल आणि त्याला निगडीत
जगभरचे खाद्य उद्योग), कसे छोटे बदल केल्याने आपण मोठा फरक आणू हे दाखवतो (बीफ
विरूद्धचे अर्ग्युमेंट, जे इथल्या इन्टरनेट गो-रक्षकांनी उचललेले आहे पण ते एकूण
त्यांच्या अस्मिताधारी आरड्या-ओरड्यापेक्षा फारच जास्त बौद्धिक आहे. लिओनार्डो
लंडन मधील कुठल्या संस्कृतीसोहळ्याला
येणार आहे असंही काही मी मध्ये वाचलं होतं. पण इथे हे अर्ग्युमेंट आहे ते ‘बीफ
उत्पादनात म्हणजे गाईंच्या पालनपोषणात अधिक कार्बन इमिशन होते. त्यापेक्षा कोंबडी
पाळा आणि खा असे आहे. म्हणजे गोरक्षा करा, पण त्यांचे संतती नियमन पहिले करा असं.),
पोप-अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्यांची सूज्ञ मते आणतो, धुरकट बीजिंग आणि त्याच्या
तुलनेत फारच स्वच्छ वाटणारी दिल्ली आणतो, तुम्ही अमेरिकन पहिले स्वतःला सुधारा असं
आवेशाने सांगणारी सुनिता नारायण आणतो, एरीअल शॉटस, व्होईसओव्हर आणि त्याला साजेसे
पण न घडलेल्या घटना प्रतीत करू इच्छिणारे व्हिज्युअल्स आणतो, कर्करोगाने काही
दिवसांत मरण्याची दाट शक्यता असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञाचे कूल सिम्युलेशन्स आणि
मानवी स्वभावातील बदलाच्या शक्यतेवर विश्वास ठेवणारे आशावादी झालरीचे भाकीत आणतो.
एक प्रपोगंडा, वैयक्तिक हित किंवा कळपाच्या दबावाचा दर्प नसलेला, जगाच्या
कल्याणाचा प्रपोगंडा म्हणून ‘बिफोर द फ्लड’ मध्ये सर्व आहे. माझ्या स्वतःच्या मते
आवश्यकतेपेक्षा जास्त भावनिक मामला झालेला आहे, पण तीच मुख्य सेलिंग स्ट्रॅटेजी
असण्याची शक्यता जास्त आहे. एकूणात क्लायमेट चेंज काय आहे ह्याची कोणाला
पहिल्यांदा ओळख करून द्यायला ही चांगली फिल्म आहे.
क्लायमेट चेंजबद्दल एकदम टोकाची
निराशावादी, उशीर झाला आहे पण आपण अंत लांबवू शकू अशी, उशीर व्हायच्या आधी संकटांची
चाहूल घेऊन पावले उचलूया अशी आणि वेळीच काही केलं तर क्लायमेट चेंज आणि ग्लोबल
वॉर्मिंग हे परतवताही येईल अशा सगळ्या भूमिका ह्यात आहेत. वेगवेगळी अर्ग्युमेंट मांडायला
व्हिज्युअल्स तगडी आहेत.
एलॉन मस्क आणि पिअर्स सेलर्स ह्यांच्या
मुलाखती मला सर्वात जास्त आवडल्या आहेत. अर्थतज्ञ मॅनक्यू (Mankiw) ह्यांनी कार्बन कर आणि लोकांची डिमांड
बदलणे हे राजकीय भूमिका आणि एकूण उपभोग बदलायला कसे प्रभावशाली अस्त्र असू शकते हे
थोडे पुस्तकी पण अचूक मांडले आहे.
आपले बालपण, त्यातले पाळण्यावरचे (बायाबलिक
रेफरन्स असलेले) चित्र, आपले वेगळेपणा असणारे पालक, मग माझे पर्यावरणीय जीवन ह्या
सगळ्या लिओनार्डोच्या वापरातून अनेकदा फोकस गंडलेला वाटतो. लिओनार्डोची क्लायमेट
चेंजला प्रतिसाद जनरेट करायची क्वेस्ट अशीच एकूण मांडणी होते. विशेषतः पोपला
भेटणे, त्याच्या हाताचे चुंबन आणि पोपने क्लायमेट चेंजबाबत जनतेला आवाहन करणे कसे थोर
हे सगळं केवळ आपल्या प्रमुख उपभोक्त्यांना खूष करायला का काय असं मला वाटलं का
कडवट औषध साखरेच्या (अफूच्या म्हणा!) वेष्टनात द्यायचा प्रकार?
--
डॉक्युमेंटरी बघताना मला मध्ये मध्ये दर्दभरे
उसासे सोडणाऱ्या ‘सत्यमेव जयते’ च्या
आमीर खानची आठवण आली. सध्या सत्य जे अजिंक्य होऊन राज्य करतच असल्याने शोची गरजच
राहिलेली नाही का धोबीपछाड मिळाल्याने पाणी पाणी होऊन शो करायची अवस्थाच राहिलेली
नाही हे आता लवकर कळेलच.
--
मी स्वतः ‘क्लायमेट चेंज’ बाबत कुठल्याही
टोकाला नाही. असेलच तर पर्यावरण अन-प्रेडीक्टेबल होतं आहे आणि माणसाने निसर्गाच्या
काही संरचना उद्ध्वस्त केल्या आहेत इतपत मी कललेलो आहे. पण घरात बेसिनला, अंघोळीला
आणि मल-मूत्र विसर्जनाला पुरेसं पाणी असावं आणि वर्षभरात कधीही भयावह उकडू नये ह्याच
माझ्या पर्यावरणाकडे मागण्या असतात. माझी कार्बन फूटप्रिंट मला वाटते तेवढी थोडकी
नसून फारच जास्त असेल ह्याची मला जाणीव आहे. पण माझे सारे संभाव्य उपभोग टाळून मी
पर्यावरणीय संन्यासी होईन हे तर मी बिलकूल करणार नाही. पूर्वी मी असा होतो. शॉवरने
अंघोळ केल्यास फार पाणी वाया जाईल आणि पृथ्वीला उजाड केल्याचे पातक माथी येईल
म्हणून मी बादलीत मर्यादित पाणी घेऊन अंघोळ करीत असे. आता मी आली लहर केला शॉवर (अर्थात
जल-नियमन नसेल तर!) असा राहतो. सांभाळण्याची कटकट जास्त आणि चालवायला रस्ते नाहीत
म्हणून माझ्याकडे चारचाकी नाही. माझे उपद्रव मूल्य वधारले की मी सांड गाडी घेईन
एखादी ही आपली कामना आहे. ए.सी. च्या बाबतीत मी डायसी आहे. पण एलॉन मस्क म्हटलंय
डॉक्युमेंटरीमध्ये की अनेक लोक लँडलाईन न वापरता मोबाईल वापरू लागले तशा अर्थाने
जर मला माझे उपभोग न काटता पर्यावरण स्नेही उर्जास्त्रोत वापरायची संधी मिळाली तर
मी ती नक्की घेईन. म्हणजे आचरणाने मी पर्यावरणाच्या tragedy of commons मधला एक हपापलेला मेंबर आहे, पण मी
क्लायमेट चेंज हॉक्स आहे असं म्हणत नाही.
--
पर्यावरण म्हटलं कि मला दिलीप कुलकर्णी
आठवतात. त्यांच्या ‘निसर्गायण’ मध्ये आनंद म्हणजे काय ह्यावर एक प्रकरण आहे. उपभोग,
आनंद आणि उपभोगाची अविरत भूक ह्याचं लॉजिक कळायला मला त्याने मदत झालेली.
जवळपास वर्षभरापूर्वी दिलीप कुलकर्णी ह्यांचं
एक भाषण मी ऐकलं. अपारंपरिक उर्जास्त्रोत हेही सरतेशेवटी पर्यावरणस्नेही नाहीत ह्याची
entropy च्या आधारे, तात्विक
वाटावी अशी मांडणी त्यांनी केली होती. उपभोगांना आळा घालणं, शहरांची वाढ थांबवणं अन्यथा
सर्वनाश अशी त्यांची एकूण बैठक आहे. आणि आपल्या विचारांना जोडलेलं टोकाचं आयुष्य
ते जगतात.
---
माझ्या मते ‘पर्यावरण वगैरेची जाणीव’ हे एक
लक्झरी गुड आहे. उत्पनाच्या वरच्या पातळ्यांवर ते हवंहवसं वाटू लागतं, जसं
परदेशातले हॉलिडेज, आयफोन, सेकंड होम्स, गेटटुगेदर हेही वेगवेगळ्या वरच्या पातळ्यांना
हवंहवं वाटू लागतं. लिओनार्डो आणि अमेरिका, विकसित देश ह्यांना जाणीव आहे ह्याचं
कारण त्यांची उत्पन्न पातळी आहे.
भारताला
ती उत्पन्नाची पातळी आली कि जाणीवही येईल. आधी पोटभर खायला मिळेल, मग ओरबाडून
घेतलं तरी उरेल इतकी सुबत्ता येईल आणि मग आपण ओरबाडतो आहोत ह्याची जाणीव येईल. फार
ब्रॉड ब्रश मॉडेल आहे हे.
पण हे ठीक आहे जर क्लायमेट चेंज सावकाश
होणार असेल. पुढच्या काही दशकांत काही भाग उजाड होणार असतील, काही भाग पाण्याखाली
जाणार असतील, पुरेसं अन्नही पिकणार नाही असं होणार असेल (म्हणजे असं होणार आहे
ह्याचे ठाम पुरावे किंवा तशी मनोभूमिका बनेल) तर काय हा मोठा प्रश्न आहे.
--
अमिताव घोष ह्यांचं ‘द ग्रेट डीरेंजमेंट’
वाचायचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मला पर्यावरणीय संकटाचे रीफ्युजी, त्यांचे
नुकसान, संभाव्यता जवळून अभ्यासायच्या आहेत.
आपले उपभोग घटवून, बेअर मिनिमममध्ये
राहण्याची stoic शक्यता मला खुणावते
अधून-मधून, पण त्यात पर्यावरण वगैरेपेक्षा स्वतःच्या आसक्त थुलथुलीतपणाची चीड
असते.
ह्या शहराने दूर-दूर पर्यंत आपले बुभिक्षित
ठसे मारून स्वतःला हरवायचे सारे निवांत, सिमेंटच्या प्रवाहात न आलेले कोपरे हद्दपार
केले आहेत. आय हेट इट.
उद्या प्रचंड दुष्काळ पडला, लोक, मी, माझे
सगे-सोयरे अन्नाला मोताद झाले किंवा पुरात सापडले तर, ह्यावर मी विचार करतो. असा
अनुभव नाही ही कमतरता का? का माझ्या पूर्वजांचे लकी स्ट्रोक्स? का असे अनुभव कमीत-कमी लोकांना असणं ही आत्ताच्या काळाची
स्वाभाविकता?
क्लायमेट चेंज हे भिंतीवर दिसणाऱ्या भयावह आकृत्यांसारखं
विक्राळ आहे. पण त्या नेमक्या कशाच्या सावल्या आहेत? आपले खेळ आहेत कि काळाचे
पडघम?