Tuesday, November 1, 2016

मानलेल्या भाऊबीजेचा फराळ

    आपल्या मानलेल्या बहिणीकडे, जिची आई पूर्वी दोघांच्या घरी धुणी-भांडी करायची अशा बहिणीकडे, पुण्याच्या डावीकडच्या पडक्या भूत बंगल्यात अजून त्वेषाने राहणारा, पिढीजात सातवा मालक असा भाऊ आणि पूर्वी त्यांच्याच बाजूला केवळ ग्रंथ-पठण आणि ज्योतिष्य करून राहणारा, पण एकदम नागपूरला जाऊन नशीब काढणारा कर्तबगार भाऊ असे दोघी भाऊबीजेला आलेले होते. त्याच्यासमोर परंपरागत फराळ आणि नवऱ्याला दर दिवाळीला मिळणारा हलकासा सुकामेवा ठेवून बहीण स्वयंपाक घरात काम करत होती.
“मग? कधी काढताय वाडा? किती दिवस पडक्या वाड्यात राहणार? सगळे पूर्वज तुमचे विस्मृतीत गेले, तुम्ही कुठला अजून पीळ भरताय जळल्या मिश्यांना?” असं म्हणून नागपूरकर धाडधाड हसू लागले.
‘हसा. हसा. इथे लेकहो, लोकांना संस्कृतीच्या चिथावण्या द्या आणि तुम्ही लावा घरात कमोड. मान्य का करत नाही कि गरज हीच संस्कृतीची जननी आहे. बाकी सब झूट.’
‘अहो किती दिवस तुम्ही तात्विक सुसंगती घेऊन बसणार आहात. प्रेमात आणि युद्धात सारं क्षम्य असतं आणि रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यामुळे कधीही काहीही करणं योग्यच असतं.’
‘नाही. नाही. क्षम्य असलं तरी ते योग्य नाही. योग्य असेल तर क्षमा मागायची वेळच येत नाही. ‘ असं म्हणून पुणेकर थोडे खाकरले.
“तुम्ही अशा चिकित्सा करत बसा. जग किती पुढे जाऊन राहिलं आणि तुम्हाला वाड्याबाहेर पडता येईना राव”
“अहो, मी वाड्याबाहेर पडलो नसेन एकवेळ, पण लोकांना खड्ड्यात ढकलून त्यावर स्कायस्क्रेपर तर नाही बांधले.”
“कुठे अशा उपमा आणि उत्प्रेक्षात बोलता भाऊ. सिधी सिधी बात बोला कि. घ्या, थोडे अनारसे घ्या. काय जाळी पडली आहे ताई बाकी. व्यवसाय का करत नाहीस तू दिवाळी फराळाचा. आम्हाला लागतात आमच्या क्लायंटना द्यायला. “
चिवड्याची चिमूट पटकन तोंडात ढकलून पुणेकर म्हटले, “तुमचे क्लायंट म्हणजे तेच बीजिंगवाले ना, आणि दुबईवाले पण. आणि इथे लोकांना मारे सांगा चायनीज मालावर बंदी म्हणून. “
“अहो, उगाच वड्याचं तेल वांग्यावर काहून काढून राहिले भाऊ तुम्ही. मी तर कोणाला म्हटलं नाही घेऊ नका चायनीज माल म्हणून. “
“पण चूक आहे हे तरी कुठे म्हटलात. “
“काही न म्हणणं असंही काही असतं का नाही.”
“असतं ना. पण केवळ तुम्हालाच असतं असं ना. बाकी कोणी असं म्हटलं, कि अगर तुम हमारे साथ नाही, तो पाकिस्तान के साथ असं ना!”
“वाड्याच्या कोनाड्यासारखे तुम्ही पुराणे पुराणे किस्से धुंडून राहिले भाऊ. अहो, वर्तमानात या.” असं म्हणून नागपुरी भाऊंनी वर्तमान पत्राच्या अनेकाविध पानांपैकी एक पुणेकरांना दाखवलं.
“आहा, दिवाळी म्हणजे ह्याच्या-त्याच्यासाठी दीप लावा आणि जुन्या गोष्टी दानाच्या नावाखाली दडपून वाटून टाका. अहो, एवढा जर समाजाचा, युद्धाचा शोक झाला आहे तर लावूच नका फटाके, घेऊच नका नवे कपडे. उगाच संस्कृती संस्कृती म्हणत आपली कळप बनवून आनंदी व्हायची भूक भागवायची.”
“कसलं डावरं तर्कट हे! भगवंता, नरेंद्रा, देवेन्द्रा, कधी निघणार ही आमच्या डोळ्यावरची झापडे.”
“करा, खिल्ली उडवा. प्रतिवाद नसेल तर हाच तुमचा क्षम्य प्रतिसाद मनाला पाहिजे.”
“अहो, तुमच्या भाबड्या प्रश्नांना कसला आलाय प्रतिवाद. इथल्या हजारो लोकांनी पाद जरी सारला तरी तुम्ही गाडले जाल. पण विचारलंच आहात तर मी तुम्हाला उकल सांगतो. सण साजरा करणं ही सुद्धा संस्कृती आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करणं ही सुद्धा. फटाके, नवे कपडे आपण सण साजरा करायला घेतो. आणि त्यावेळी अनेकांप्रती कृतज्ञता, बांधिलकी व्यक्त करतो.”
“केवळ व्यक्त करून संपते का कृतज्ञता आणि बांधिलकी? तिच्याशी सुसंगत वागत नसू तर आपण दांभिक आहोत असं नाही वाटत तुम्हाला? केवळ प्रदर्शनीय दिखावा करण्यापेक्षा लष्करी सेवा सक्तीची करा. आणि जमिनींचे समान फेरवाटप करा सगळ्या शहर-गाव-जंगल वासियांना. बंधुभाव आहे, तर एकाला भरपेट आणि एक भुकेने मेलेला का? त्यापेक्षा जे आहे ते वाटाच कि दोघांत समान.” प्रचंड सात्विक संतापाने चकलीचा खुरमुरीत तुकडा तोडत पुणेकर म्हटले.
“आलातच कि नाही शेवटी तुमच्या मूळ मुद्द्यांवर. अहो, सगळे लोक सारखे नसतात.”
“आता, द्या स्मृतींचे दाखले. पण ‘बोले तैसा चाले’ हे बरंच अलीकडलं वाक्य काही तुम्हाला आठवणार नाही.
”अहो, आचरणाची सुसंगती ही फार पुढची पायरी आहे. पहिले लोकांच्या मनात तर यायला लागू दे. तिथेही किती अडसर असे”
“वा! वा!! तुम्हाला प्रश्न विचारणारा अडसर.”
“प्रश्न विचारून काय साधलंय का हो. उत्तरं द्यायला हवीत. प्रश्न तर असा फराळ, किंवा गांजा वगैरे मारून कोणीही विचारेल.” नागपूरकरांनी चिरोटा तोंडात दाबत म्हटलं.
“खरंय. प्रश्नही तुम्हीच ठरवावेत आणि उत्तरंही. लोकांनी फक्त तुमच्या पाठी यावं. आणि न येणाऱ्यांना तुम्ही हाकलून द्यावं. एवढ्यासाठी मात्र तुम्हाला खरं सांस्कृतिक म्हटलं पाहिजेच.”
“दादा, आता ब्रेक घ्या जरा. वहिनींचा फोन आलाय. त्या आल्यात स्टँडवर. घेऊन या जरा. “ आतून ताईचा आवाज आला.
नागपूरकरांनी ड्रायव्हरला फोन लावला. डावीकडच्या पडक्या वाड्याचे मालक संतापाने कसेनुसे होऊन खिडकीबाहेर लावलेल्या, तीन-चार वर्षापूर्वी घेतलेल्या चायनीज आकाशकंदिलाकडे बघत राहिले.   
  

      

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...