दार बंद आहे तोवर मी आहे
सुट्टा, बेलाग
दार उघडावं तर ते सगळे आत घुसतील
बाप, नवरा, मुलगा, शिक्षक, जबाबदार नागरिक
आणि भोसडीचे धक्काबुक्की करतील
ही खोली व्यापून टाकायला.
आणि मी,
हताशपणे निसटून जाईन किलकिल्या दारातून
केव्हातरी परत येता येईल अशा संदिग्ध आशेने
--
उपनिषदात असत दोन पक्षी
एक बघणारा,
एक घुमणारा
--
जादूच्या प्रयोगात असतात दोन पक्षी
एक दिसणारा
एक मरणारा
--
बघणारा पक्षी कैद झाला
आगन्तुकांच्या झोलझपाट्यात
पिंजऱ्यातून तो बघतो आहे
किलकिल्या दाराने निसटून जाणाऱ्या मला