संस्कृती आजींना दरदरून घाम फुटला होता. दरदरून, म्हणजे भरभरून. आणि
अजूनही ते स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. ते आलेले स्वप्नात, ते.. शेकडो
वर्षांतून एकदा येणारं स्वप्न. ती आवळलेली, उगारलेली मूठ, ती दाढी, ती छप्पन इंची,
मिलियन संकटे झेलून, परत त्यांच्याच देशी मेकच्या उर्फ स्वदेशी तीक्ष्ण गोळ्या
करून शत्रू गारद करेल अशी छाती.
ह्या आधी आजी कार्यरत
होत्या तेव्हा ते गेले, मग त्यांच्या सावलीत असलेले ते, ते आणि ते गेले. होन
संपले. धावत्या घोड्याची कणसे संपली. मग मोती, हिरे आणि अशर्फ्या संपल्या. प्रेरणा
विधवा झाली, परंपरा सती गेली, संस्कार परागंदा झाला, यवन बुडले, आंग्ल चढले.
त्यांच्या मेकॉले नावाच्या शिलेदाराने नोकरी नावाची तोफ डागली, तिच्या धुराळ्यात
संस्कृती आजी केव्हातरी बेशुद्ध पडल्या, त्या ह्या स्वप्नानेच जाग्या झाल्या.
आजी गुडघ्यावर हात ठेवून
उठल्या, तेव्हा त्यांचे गुडघे आर्ष करकरले. मग त्यांनी सिंधू नदीच्या साठवून
ठेवलेल्या पाण्याने तोंड धुतलं, गंगेच्या पाण्याने चुळा भरल्या, यमुनेच्या
पाण्याने शौच संमार्जन केलं आणि नर्मदेच्या पाण्याने नाश्त्याची भांडी धुवून
घेतली. दंडकारण्यमधील लाकडांची चूल पेटवली आणि ती लाल फुंकणीने चांगली भडकवली. अखंड,
अविरत आर्यावर्ताच्या नेमाड्यात, सॉरी कोनाड्यात ठेवलेले बत्तीस लक्षणी सतत
सुवासित बासमती तांदूळ घेतले. मग भीमा, कृष्णा, गोदावरी ह्यांच्या जमेल तश्या पाण्याने
त्यांचा भात करायला ठेवला. महानदीच्या काठच्या आणि सुदूर ईशान्येकडच्या कंद आणि
स्वच्छंद भाज्या उकडायला ठेवल्या. त्यावर अहोम देशाचे तेल शिंपडले, कलिंग आणि
आन्ध्र देशाचे मसाले छिडकले. बस्, चितळ्यांचे श्रीखंड राहिले.
मग काळाच्या खडबडीत आणि
कुठेकुठे माहितीच्या पेव्हर ब्लॉक्स मध्ये हरवलेल्या रस्त्यांवरून ‘एकं सत विप्रा
बहुदा वदन्ति’ असं सुरुवातीला म्हणत, तद्नंतर क्रमाक्रमाने मनुस्मृती, पुरुषसूक्त
घेत, सरतेशेवटी ‘पुरातन प्रभात’ चा अंक वाचत संस्कृती आजी चौकात पोचल्या.
आणि पर दिग्मूढ, कालमूढ झाल्या.
चुरालीया बिल्डर्स नावाच्या माणसाने प्रायोजित फ्लेक्स वर त्यांचा फोटो, तसाच, जसा
स्वप्नात दिसला. संस्कृती आजींना गदगदून आलं.
म्हातारी रडते पाहून एक
पोक्त गृहस्थ त्यांची चौकशी करू लागले. आजींना त्यांना विचारले, वत्सा, ह्या
साऱ्या कोलाहलाचे प्रयोजन काय? तेव्हा त्या पोक्त गृहस्थांस भोवळ आली. (त्या
गृहस्थांचे नाव बघ्या असे असून ते अतिशय उद्विग्न मनस्थितीत असत असे कळले.) तसे
त्यांच्यावर आपल्या जीर्ण परंतू तेज कायम राखलेल्या चीनांशुक वस्त्राचा अंगठीतूनही
जाईल असा तलम धागा फिरवून आजीने त्यांना उठते केले. आपल्या खडबडीत हाताने
त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, तसा नोस्टाल्जिया आणि सटायर ह्यांचा अंधेरा पडदा
विरतो आहे असे झाले.
‘आजे, अद्यवासरे वर्षातील
त्यांची ‘एन’ वी जयंती असून त्याची मिरवणूक त्याजी चुकातून सुरू होऊन, त्याजी
चौकातून जाऊन त्याजी पुतळ्यापाशी संपणार आहे. सांप्रत आपण त्याजी चौकात उभे आहेत.
लौकरच मंगलवाद्य, घोषवाद्य, रणवाद्य, बासवाद्य ह्यांचा निनाद करत अविवाद्य अशी ‘बोला....’
अशी घोषणा देत मिरवणूक येईल.’
आजेने त्याच्याकडे पाहून
प्राकृतात अलाबला घेतली.
तेवढयात ‘ हे राजे, जी
जी’ असा त्रिलोक दुमदुमून टाकेल असा ध्वनी निर्माण झाला. त्यापाठोपाठ जसे
कुरुक्षेत्रावर एकामागोमाग एक शंख निनाद होऊन कौरवांचे धैर्य खच्ची झाले तसे ढोलपथकांचे
दुर्दम ध्वनी निर्माण होऊन जे कोणी शंकित, लिबरल, सेक्युलर, कम्युनिस्ट अशा नावाचे
शत्रू उपस्थित होते ते सारे गर्भगळीत झाले.
त्या पाठोपाठ
देशोदेशीच्या आयात तेलावर चालणारे मत्त ट्रक्स आले. त्यावर दहशतवाद आणि कोणताही
आपल्याला न पटणारा वाद असाच संपवायचा असतो ह्याची फ्लेक्स होती. ट्रक्सच्या बाजूंना
होऊ घातलेल्या धर्मयुद्धात आम्ही आमची शीरकमले अर्पण करण्यास सज्ज आहोत असे
दर्शवणारे फ्लेक्स होते. ट्रक्स च्या आजुबाजुला स्मार्ट फोन्स घेऊन या बाजूची गर्दी
त्या बाजूचे आणि त्या बाजूची गर्दी ह्या बाजूचे फोटो घेत होती.
‘हे तंत्रज्ञान जब्बू
ऋषींनी निर्माण केले. त्यांच्या समासंगपिट्ट ह्या ग्रंथात त्याच्या उत्पत्तीचे आणि
यंत्राधारित विराट उत्पादन प्रक्रियेचे वर्णन आहे.’ असे आजी म्हणाल्या. तेवढ्यात
कोणीतरी त्यांच्यावर फ्लॅश मारला. पुढे ‘त्यां’ना सुयश चिंतणारी अजाण वृद्धा अशा
नावाने त्यांचा पिक ट्रेण्डी बनला.
पाठोपाठ ‘पुरातन प्रभात’
ची औक्षोहीणी आली. त्यांनी ‘... की जय’ ही घोषणा कंठ दुमदुमवून दिल्याने पौरुष
ग्रंथी जागृत होऊन आणि विरश्रीयुक्त कंपने निर्माण होऊन कशी तेजस्वी संतती उत्पन्न
होऊ शकते ह्याची पत्रके वाटण्यास सुरुवात केली. ती भरभर संपली.
आणि मग एकच जयघोष ऐकू
येऊ लागला. ‘आले, आले, आले’ असे जनसमर्द कुजबुजू लागला. वाराणसीच्या दशाश्वमेध
घाटावर लागलेले सारे दिवे जसे आजींच्या डोळ्यात एकवटले.
अर्जुनाला जसे विश्वरूपदर्शन
साहवले नाही तसे बघ्यालाही नाही. तो निश्चेष्ट पडला. पण ह्यावेळी आजीचे
त्याच्याकडे लक्षही नव्हते.
खास ऐरावत फॉर्ममध्ये तयार
केलेल्या रथावर बसून ते आले. चौकातल्या त्यांच्या अश्वारूढ दूर क्षितिजाकडे
पाहणाऱ्या पुतळ्याला त्यांनी पुष्पमालिका (हार हा शब्द नाहीच आता) अर्पण केली. आणि
मग रथाच्या केशरी ध्वजाच्या जवळ येऊन ते बोलू लागले.
त्यांची एक एक ऋचा आजींच्या
कानात गुंजू लागली. भवभूतीने म्हटलेलं समानधर्मा आजींना हा हा समोर दिसू लागला.
मेरे सपूत म्हणून आजी धावू लागल्या. तसे रक्षक त्यांना अडवू लागले, त्यांचावरून
मेटल डिटेक्टर फिरवू लागले, त्यातून एक एक सूक्ते उमटू लागली.
संस्कृती आजींना असे
धावत येतांना पाहून रथाच्या पश्चचक्राच्या आड असलेल्या प्रेरणा आणि परंपरा (म्हणजे
तिचे पांढऱ्या साडीतील सात्विक असणारे प्रारूप) येऊन आपल्या आईला बिलगल्या. रथाचे
सुकाणू सोडून आलेला संस्कार आईच्या पाया पडला.
हे महन्मंगल मिलन घडते
तोच रथ पुढे सरकू लागला. त्याची कमलपुष्पांनी बनलेली आणि उद्योग कुटुंबांच्या लगामांनी
जोडलेली चाके रोरावू लागली. एकच धूळ उडली, अगदी काळाची गती कुंठीत करणारी. आत्ता
कुठे एकत्र झालेले कुटुंब परत विखुरले, काळाच्या पेव्हर ब्लॉक्सवर नव्या नव्या
रुपाने आले.
संस्कार आलोक बनला. आधी
त्याने परदेशात नोकरी केली. मग त्याने संस्कारक्षम संध्यामालिका बनवायची वाहिनी
उघडली.
प्रेरणेचे हजारो तुकडे
झाले. नव्हे, पावडर झाली. ड्रग्स घ्यावेत तशी लोक ती जमेल तेव्हा, जमेल तिकडून
घेवू लागले. परंपरेने पांढरे सोडून खाकी कपडे घेतले आणि तिने प्रेरणेचे डीलिंग
सुरू केले.
‘पुरातन प्रभात’ च्या
साठवले महाराजांनी संस्कृती आजींना आपल्या सोबत घेतले. त्यांचे जमेल तसे स्नॅप शॉटस्
ते देऊ लागले.
बघ्या बेशुद्धच राहिला.
--
ह्याचवेळी स्वराज्यातील
हजारो किल्ल्यांवर आय’टी. मावळे सज्ज होते. त्यांनी आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवर
लॉग इन केले आणि प्रतिक्रियांच्या तोफा गर्जू लागला.
बहिर्जीने फोटो शॉप सुरू
केले आणि वेगवेगळी माणसे आणि वेगवेगळी वाक्ये, किंवा चित्रे ह्यांचे जम्बुरके तो
टाकू लागला.
शेअर मार्केटच्या भिंतीला
दडून बसलेली बिनीची फौज सावध झाली. तिने अस्वलाचे सोंग टाकले. आणि बैलांच्या पलीत्यांना
चूड बाधून त्यांना पुढे पाठवले. आता गनिमी कावा. काँग्रलखानाचा कोथळा आणि केजीरेखानाची
सारी बोटे. मग लाल किल्ला मोकळा.
--
राजांच्या पुतळ्याला
जयंती निमित्त घातलेले सारे हार काढून पुतळा परत नीट नेटका करावा म्हणून सफाई
कामगार घेऊन आलेले उजवेकर आणि पुतळा आणि महानगर पालिका ह्यांच्या मध्ये चुरालीया
बिल्डर्स आणि राजकारणी ह्यांच्याविरोधात निदर्शने करायला आलेले डावेकर ह्या
दोघांनाही तिथे बेहोश पडलेला बघ्या दिसला. उजवेकर वाकून सुंगले, पण काही वास नाही
आला. डावेकर आले, खिसा-पाकीट पाहिलं, त्यात एक अॅन्हिलेशन ऑफ कास्ट आणि सारामागो.
उजवेकर सफाई कामगारांना घेऊन पुतळा साफ करू लागले. निदर्शनाला आलेल्या लोकांनी
बघ्याला उचलून कडेला ठेवला.
तिथे गुरवार म्हणून साईबाबांच्या
मंदिराजवळ सारे भिकारी आणि बिगारी कामगार जमले होते. त्यांनी बघ्याला जागा केला.
त्याच्या पाकिटातले सुट्टे रुपये काढून घेतले, त्याच्या हातात चहाचा कप ठेवला.
झिरक्या साडीवर फाटका शर्ट
घातलेली एक निम वयस्कबाई त्याला काहीतरी म्हणाली, बघ्याला तो कालचाच प्रश्न ऐकू
आला,..ह्या कोलाहलाचा अर्थ काय...