सुमित्रा भावे ह्यांच्या निधनाच्या बातमीनंतर ‘दिठी’ चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झालेली, कितीही कोडगी वाटली तरी अशी बाब आहे. पण मला तो चित्रपट बघावासा वाटत होता तो चित्रपट ज्या कथेवर आधारित आहे त्या कथेमुळे. मला ही कथा पुरेशी आठवत नाही आणि सध्या माझ्याकडे ती वाचायलाही नाही. पण मला आठवत आहेत ते दिवस जेव्हा मी ही कथा वाचली होती. NBT ने दि.बा. मोकाशींची कथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली होती. १९९६-९७च्या सुमारास (मला ठाम आठवत नाही) मी ही कथा वाचली. त्या वेळेला माझी आपल्या खोल सवयीची माणसे गमवायच्या दुःखाशी, त्यातल्या प्रसंगी जायबंदी करू शकणाऱ्या शोकाशी काहीच ओळख नव्हती. त्यामुळे मला ती कथा तेव्हा काहीच कळली नसावी.
पण त्या कथेच्या उल्लेखाने जागे होणारे स्मृतीदृश्य आहे हे मला हवेहवेसे आहे. त्या कथेतले रामजीने पाण्यात पोटॅशियम टाकल्याचे, हाताला तेल लावल्याचे उल्लेख हा माझा आणि कथेचा संपर्कबिंदू आहे. हे उल्लेख, त्यांची दृश्यरूपे डोळ्यासमोर येतात आणि मला रात्री ८ च्या सुमारास एका खोलीत दिवाणावर पडून पुस्तक वाचणारा एक मुलगा दिसतो. दिवाणाच्या एका बाजूला त्याचे आजोबा खुर्चीवर बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकून त्याची आजी काही काम करते आहे. ह्या सारे चित्र एका वाताभेद्य पारदर्शी फुग्यात आहे. तो मुलगा कथेची पाने भराभरा वाचत जातो, कथेचे शीर्षक त्याला लक्षात राहते, आणि शेवटाची काही तर एकाला एक जुळल्याची भावना.
कितीही हवेहवेसे वाटले तरी ह्या वाताभेद्य फुग्यातल्या वेळेत परत जाता येणार नाही. पण त्यातल्या काही संदर्भांना स्पर्श करून, मग त्या संदर्भाचे मनाशी खेळ करून, वर्तमानाच्या घुसमटीला विसरायची पळवाट, एस्केप मिळवता येईल. म्हणून मला ‘दिठी’ बघायचा होता.
--
मला चित्रपट अगदी रुतून बसावा असा आवडला नाही. कथेला आवश्यक लांबीपेक्षा चित्रपट थोडा जास्त रेंगाळला, पसरला असं वाटत राहिलं. कादंबरीत तृतीयव्यक्ती येणारे शब्द चित्रपटात प्रथमव्यक्ती येतात तेव्हा ते बोजड वाटतात. रामजीचा अडलेले वासरू सोडवायचा प्रसंग, त्यात तो गायीशी बोलतो ते प्रसंग मला कृत्रिम वाटत गेले. मला कायम वाटत आलं आहे कि लोकांना असणारी intuitive जाणीव आणि ते बोलतात ते शब्द हे सारखे नसतात, शब्द बऱ्याचदा फारच बथ्थड असतात. त्यामुळे सिनेमातील पात्रे एखादे बथ्थड (raw) सत्य सांगतील तर ते अवास्तव वाटत नाही. पण ही पात्रे जर लेखक लिहितात तशी वाक्ये बोलू लागले तर ते कृत्रिम वाटू लागते. अर्थात ही मनाला आवडलेल्या गोष्टीत काढलेली उणी-दुणी आहेत. पण एवढं मला नक्की वाटतं कि रामजीच्या मनात दुःखाला हळूहळू सवयीचे करण्याची प्रोसेस सुरु होणं हे जितकं लिहून कन्व्हे करता येईल तितकं दाखवता येणार नाही ही चित्रपटाची मूलभूत मर्यादा ठरते.
‘हजार चौरासी कि मा’ हीही अशाच क्लोजर प्रोसेसची गोष्ट आहे. किंबहुना त्यात अशा प्रोसेसचे दोन रस्ते दाखवले आहेत, एक आहे ‘अपना अपना solitary सेलवाला – आपल्या आता दुःखाचे कडूशारपण जमू द्यायचा आणि तरीही घट्ट ओठ मिटून जे जगायचं आहे ते जगत रहायचा’ आणि दुसरा, मोकाशींच्या कथेसारखाच, करण्याच्या प्रयोजनाने, त्यासाठीच्या धडपडीने दुःखाने आपल्याभोवती केलेली पोकळी भरून परत नेहमीचा श्वास घ्यायचा. (मला अनिल बर्वेंच्या ‘डोंगर म्हातारा झाला’ मधला कामराद म्हाताराही आठवतो आहे, पण तिथे कथेचे प्रयोजन व्यक्तीच्या क्लोजर प्रोसेसचे नाही.)
--
अर्थात मला आता मूळ कथा थोडी कळली आहे. मला ती पूर्ण वाचता आली नाही, पण तिचे इंटरेस्टिंग तुकडे इथे आहेत - http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html.
गायीचे अडलेले वासरू सोडवताना ज्या अज्ञाताने रामजीचा मुलगा हिरावला आहे त्या अज्ञाताशी रामजी झुंज घेतो. पण ही झुंज अभिमानाची नाही, सूडाची नाही, तर जिव्हारी बसलेल्या घावाची आहे. आपण आधी मरणार, मग मुलगा अशी जगरहाटी असताना त्याच्या विपरीत आपल्यासोबत घडल्याचा घाव, आपल्या अपेक्षेच्या परिघाबाहेर असलेल्या निर्दय अनाकलनीयतेचा घाव, आपण स्वतःला जगाच्या उतार-चढावापासून अध्यात्माच्या सरावाने निर्लेप करण्याचा प्रयत्न करत असताना, जमेल आपल्याला काहीही झालं तरी आपल्या आतल्या शांततेत कायम राहणं असं वाटू लागत असताना घाव. हा वर्मी घाव, त्याची खोलवर पसरत जाणारी घनदाट वेदना, तिचं आवरण रामजीभोवती जमलं आहे. ह्या आवरणात रामजीला काही सुधरत नाही. माणसाच्या स्वाभाविक जीवनइच्छेने त्याला हे दुःख नको आहे, पण कशाचा दोर पकडून स्वतःला ह्या गर्तेतून बाहेर खेचावं? कशाने हा पडदा फाडावा? कशाने हे भणभणते, माणसाला स्मृती आणि कल्पनांच्या वावटळीत जखडून टाकणारे दुःख विरेल?
रामाजीची अज्ञाताशी झुंज आहे ती त्याच्या आयुष्याचा, जाणीवेच्या पूर्णतेचा प्रवाह रोधू पाहणाऱ्या दुःखाशी. त्याला ह्या दुःखाला प्रोसेस तर करायचं आहे, पण त्याआधी त्याने ह्या शून्य दृश्यमानतेच्या निर्वातातून बाहेर यावं. रामजीला अडलेल्या रामजीलाच फिरवतो आहे, त्याचं डोकं धरून त्याला ह्या निर्वातातून नेटाने ओढतो आहे. हे करण्याचं निमित्त आपसूक आलं रामजीवर. रामजीला जगावं तर लागेल, म्हणजे त्याला अनपेक्षिताशी दोन हात करावे तर लागतील, त्याला उमेद ठेवावी लागेल, त्याला हार पचवावी लागेल, आणि त्यासाठी रामजीने परत खेळात यायला हवं. ‘रामजीदा धाव’ ने रामजीभोवतीचा पडदा फोडायला सुरुवात केली आहे. रामजीला जिव्हारी बसलेला घाव आता तगमगणारी जखम आहे, त्याने रामजी तडफडेल-गडबडा लोळेल तसं तसं काळाचं मलम, रामजी एवढी वर्षे स्वतःत पेरत आला ती जाणीव सारं त्या जखमेला भरून आणू लागेल. आता रामजीचे दुःख आणि रामजीचे स्वाभाविक जीवनेच्छा असलेला माणूस असणे वेगळे नाही. त्याला जाणवणारे दुःखच आता त्याला हळूहळू मोकळे करत जाईल. आता मध्ये पडदा नाही, दुःख आणि दुःखातून मोकळे व्हायची स्वाभाविक जीवनेच्छा आता एक आहेत.
--
प्रियजनांच्या मरणाचे दुःख आणि त्यातून आपल्या जीवनेच्छेकडे, दुःखाच्या जाणिवेकडे परत येणं, त्यातूनच दुःख मिटायची हिलिंग प्रोसेस सुरु होणं हे घडतच आहे, घडत आले आहे. ह्याचा दुसरा अर्थ म्हणजे आपली इतरांच्या मृत्यूची दुःखे ही आपली कल्पनाच आहे. जशी-जशी ती कल्पना सवयीची होत जाते तिचे दुखरेपण थांबून तिचा व्रण बनत जातो. बहुतेकांचे होतेच असे, दुसऱ्याच्या मरणाचे दुःख त्यांना जायबंदी करत नाही, त्यांच्या जीवनाच्या मार्गाला अवरोध करत नाही, फक्त एक पॉज देते. माणूस दुःख व्यक्त करतो आहे म्हणजे तो बरा होतो आहे. जे तो आता एवढे असोशीने सांगतो आहे तेच काही दिवसांनी निरुपद्रवी तपशील बनून राहणार आहे.
इतरांच्या मृत्यूच्या दुःखाचा आपण एवढा गहजब उडवतो, तो आपण सर्वांनी
खेळलेला लुटुपुटूचा खेळच असतो. आपापल्या डावाला आपण हुंदके द्यायचे आणि बाकीच्यांच्या डावाला गंभीर राहायचे, जरी आपल्या आत ह्या दुःखाला मागे सारणारे प्लावी बल कायमच जागे आहे.