Wednesday, December 15, 2021

डिसेंबरातल्या सकाळी

 डिसेंबरातल्या सकाळी 

मुंबईचे ऊन जीवाला सुखाने बिलगते 

आणि माणसांची गर्दी असते उबदार 

तेव्हा मला वाटतं हे तुला सांगायला हवं 


तुला सांगायला हवं मी कसा 

पक्का बदमाश होत आलोय ते 

मी एक अनेक छोटे छोटे कप्पे असलेलं 

कपाट बनलो आहे

आणि त्याला देखणं दारही आहे 


आतल्या प्रत्येक कप्प्यात एक एक करून 

माझी सोंगे आहेत 

त्यांची बडबड अहर्निश चालू आहे 

आणि प्रत्येक कप्प्यात मिनिएचर पोकळी आहे 

तुझ्या सहानुभूतीदार अस्तित्वाची 


दररोज मी कोणत्याही एका कप्प्यात  असतो 

त्या कप्प्यातून बाहेर पडायच्या विवंचनेत

मला कसंही करून जायचं असतं  

माझी वाट पाहणाऱ्या दुसऱ्या कप्प्यात 

जिथे तू अगोदरपासूनच आहेस 


पण, एक दिवस ही सोंगे थांबणार जानेमन

हे मुखवट्यांचे निगोशिएशन केव्हातरी 

सपशेल गंडणार 

आणि मग प्रत्येक कप्प्यात निर्विकार शांत कलेवर 

हा देखणा दरवाजा सताड उघडा 

तेव्हा तुला ऐकू येईल माझा मितिहीन आवाज 

का असण्याच्या काचातून सुटून

 तू विरघळलेली असशील 

ह्या चोरट्या दिलखेच डिसेंबरसारखी  

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...