‘न्यूटन’ बद्दल मी वाचलेल्या प्रतिक्रियांना दोन
टोके होती. एक होत्या भारावलेल्या आणि दुसऱ्या होत्या ‘न्यूटन’ राष्ट्रद्रोही गटातला
आहे असा शिक्का त्यावर लावणाऱ्या. त्यामुळे सरकार, सैनिक हे चुकू शकतात अशा आशयाचं
काही विधान ‘न्यूटन’ मध्ये असणार एवढं तरी मला कळलं होतं. मी चित्रपट चित्रपटगृहात
जाऊन पाहिला नाही, कारण चित्रपट त्याच्या गोष्टीबाबत, अभिनयाबाबत बघायचा असल्याने हे
बघणं laptop च्या, मोबाईलच्या
स्क्रीनवरही होईल असा विचार मी केला. ‘न्यूटन’ amazon prime वर आहे, पण डाऊनलोडला अद्याप नाही.
एवढी बोटे का दाखवली आहेत हे चित्रपट बघून कळतं! स्त्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Newton_(film) |
‘न्यूटन’ ला राष्ट्रीय सांस्कृतिक सरदार का
नाके मुरडत आहेत हे कळणं कठीण नाही. राष्ट्रीय सांस्कृतिक सरदारांची जी पायाभूत
गृहीतके आहेत त्यांतले एक म्हणजे सैनिक चुकू शकत नाही आणि चुकला तरी त्याची चूक ही
क्षम्यच असते किंवा अपरिहार्य असते. आणि जो कोणी अशा चुकू न शकणाऱ्या गोष्टींच्या
चुका दाखवतो तो नक्कीच शत्रूचा हस्तक. ‘न्यूटन’ मध्ये अशा आशयाच्या कमेंट्स आहेत.
काही ठिकाणी तर मुद्द्दाम आदर्शवादी संवाद घालून कमेंट्स करायचा प्रयत्न आहे. इथे
पिक्चर गंडला आहे असं मला वाटतं. आणि नक्षलवादाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर
गोष्ट उलगडते ह्याचा एक परिणाम म्हणजे ही दाट पार्श्वभूमी हाच चित्रपट आहे असं
होण्याचा समज.
पण ‘न्यूटन’ काय आहे हे तर संजय मिश्रा आणि
राजकुमार राव ह्यांच्यावर चित्रित, चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या एका संवादात
आहे.
माझ्या प्रामाणिक असल्याने काय फरक पडतो हा विचार येणं म्हणजे तुम्हाला प्रामाणिक असण्यापेक्षा आपल्या इगोची अधिक पडली आहे. प्रामाणिक का असावं कारण आपल्याला तसं करावसं वाटतं म्हणून, तसं केल्याने तसं न करण्यापेक्षा आपल्याला अधिक बरं वाटेल म्हणून, युटीलिटेरीअन मामला! पण असं प्रामाणिक असण्यासाठी प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अध्यात्मिक प्रकार, निष्काम कर्मयोग. फळ मिळणं तर सोडा, पण इतरांचे उपहास, प्रसंगी तुमचं प्रामाणिक असणं, तुमचं नियम कर्तव्य बजावण्याची भूमिका हि इतरांच्या मार्गातील अडथळा आहे हे तुम्हाला बाकीच्यांकडून ऐकावं लागणं, आणि वाईट म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाने आमचं नुकसान झालं असं तुम्ही ज्यांना आपलं मानलं असे लोक म्हणणं. हा एकदम मूलभूत पेच आहे. ‘न्यूटन’ हा प्रश्नाची दास्तान आहे खरंतर, पण ह्या प्रश्नाच्या गाभ्याला तो सगळीकडून खोलवर पोचत नाही, केवळ एक अणकुचीदार नेमका टोचा तेवढा देतो.
https://www.youtube.com/watch?v=uF0q-EQw7AE |
माझ्या प्रामाणिक असल्याने काय फरक पडतो हा विचार येणं म्हणजे तुम्हाला प्रामाणिक असण्यापेक्षा आपल्या इगोची अधिक पडली आहे. प्रामाणिक का असावं कारण आपल्याला तसं करावसं वाटतं म्हणून, तसं केल्याने तसं न करण्यापेक्षा आपल्याला अधिक बरं वाटेल म्हणून, युटीलिटेरीअन मामला! पण असं प्रामाणिक असण्यासाठी प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अध्यात्मिक प्रकार, निष्काम कर्मयोग. फळ मिळणं तर सोडा, पण इतरांचे उपहास, प्रसंगी तुमचं प्रामाणिक असणं, तुमचं नियम कर्तव्य बजावण्याची भूमिका हि इतरांच्या मार्गातील अडथळा आहे हे तुम्हाला बाकीच्यांकडून ऐकावं लागणं, आणि वाईट म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाने आमचं नुकसान झालं असं तुम्ही ज्यांना आपलं मानलं असे लोक म्हणणं. हा एकदम मूलभूत पेच आहे. ‘न्यूटन’ हा प्रश्नाची दास्तान आहे खरंतर, पण ह्या प्रश्नाच्या गाभ्याला तो सगळीकडून खोलवर पोचत नाही, केवळ एक अणकुचीदार नेमका टोचा तेवढा देतो.
त्या पहिल्या संवादानंतर केवळ उलगडण्याची
उत्सुकता म्हणून मी ‘न्यूटन’ बघत होतो. पण एका बाजूने मला अनेक गोष्टी आठवत
चालल्या होत्या. मी घाबरूनच गेलो होतो खरंतर. वय वाढत जातं तसं आपण एकतर आपल्या
कामात बुडून जाऊ शकतो आणि कामाबाहेरच्या जगाला कोडगे होतो किंवा सिनिकल होऊ शकतो, पण
जर आपण पुस्तके-सिनेमे ह्यांनी अस्वस्थ होत असू तर आपल्यासारखा च्युत्या कोण नाही.
त्यामुळे ‘न्यूटन’ मला हिट करत होता तसं मी कात्रीत सापडत होतो.
(वय वाढत जाण्याच्या जाणीवेवर मी एक उपाय
शोधला आहे. पूर्वी लोक सरासरी कमी जगत, त्यामुळे त्यांना कमी वर्षे भारावून जायची,
अस्वस्थ व्हायची मुभा होती. आपलं सरासरी आयुर्मान वाढल्याने आपण अधिक काळ अशी फेज ठेवू शकतो. ह्या नव्या intuition ने मल थोडं बरं वाटतं.)
एकवेळ माझं एकदम फेवरीट पुस्तक असलेल्या ‘रारंगढांग’
मध्ये एक वाक्य आहे. विश्वनाथ मेहेंदळेचे वडील त्याला लिहितात त्या पत्रात. ‘ज्या
गोष्टी करायच्या हे आपण ठरवलं आहे त्या कोणत्याही परिस्थतीत पूर्ण करणे हेच आपले
कर्तव्य असते असे मला वाटते’ अशा आशयाचा त्याला शेवट आहे. हे वाक्य मला वेगवेगळ्या
अंगांनी कळत राहिलं आहे (किंवा हे माझे रिकामचोट चाळे आहेत!). ह्यांत एकतर तुम्ही
नेमकं काय करावं ह्याचं काही बंधन नाही, ते तुमच्यावर आहे. बरं हे वाक्यही पत्थर
कि लकीर असे सत्य नाही, त्याचा शेवट ‘असे मला वाटते’ असा आहे. आणि त्याचा मधला भाग
आहे तो एकदम चिवट आहे, डोक्याला चिकटून राहणारा आहे.
त्याच वयांत केव्हातरी जेव्हा केवळ आपण
इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवायची खाज प्रशस्त किंवा गर्दीचे धोपटमार्ग चालू देत
नव्हती आणि बाकीच्या रस्त्यांवर चालायला लागणारी ग्रीट (Grit) काय असते हे कळत नव्हतं तेव्हा असे रस्ते चालून
आलेल्या एका माणसाने मला एक वाक्य सांगितलेलं - सामाजिक काम म्हणजे समाधान असं नाही आणि करिअर
म्हणजे समाधान नाही, केवळ जगरहाटी असंही नाही.
‘न्यूटन’ पाहताना हे का आठवलं? कारण तो
पहिला संवादच. कदाचित माझ्या मनात जे उमटतं आहे तितकं त्या संवादात नसेलही. पण
चांगल्या वाक्यांची हीच मजा असते, त्यांना इतके कंगोरे असतात कि प्रत्येकाला त्यातून
जे दिसतं ते वेगवेगळं असू शकतं आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणी अशी वाक्ये केवळ चमकदार
उथळही वाटतात.
कदाचित असंही आहे कि आपल्या जगण्याची
पायाभूत चौकट ही आता आहे असं आहे ह्या कर्मठतेकडून rationality बेस्ड उपयुक्ततावादाची आहे. एखाद्यानं नियम
पाळावेत एवढं आता बरोबर वाटत नाही. हे नियम वागणाऱ्या माणसांच्या स्वहित
साधण्याच्या प्रेरणेला बाधा आणणारे नकोत आणि असे असतील तर माणसांत नाही, किंवा
केवळ माणसांत नाही, तर नियमांतही गफलत आहे असा विचार आपण आता करू शकतो.
जर आपल्या राँग साईड जाण्याने योग्य दिशेने
जाणाऱ्या एकही वाहनाला अडथळा होणार नसेल तर माझं रॉंग साईड वाहन चालवणं का चुकीचं
मानावं? दुसऱ्याची थेट हानी न करेपर्यंत मला माझं हित साधायची कितीही मुभा आहे
किंबहुना दुसरा जोवर हरकत घेत नाही तोवर त्याची हानी नाहीच असं मानून मला माझं हित
साधायची मुभा आहे हे आपलं नवं मूल्य आहे.
असो.
काही काही वाक्यं आपल्यावर पक्के व्रण करून
जातात. ‘न्यूटन’ चा संवादही तसाच होता. कदाचित आपल्याला कोसत राहण्याचं इंद्रिय सतत
जागं राहिलं तर अशी वाक्यं, अशा जाणीवा येत राहतील. पण एक असं लक्षात राहिलेलं
वाक्य हेही आहे कि प्रत्येक माणूस केव्हा न केव्हा तरी स्वतःला फसवतोच, तेव्हाच तो
सुखी होतो.
हे लिहिणं तरी इगोच आहे खरंतर. माझ्या
प्रामाणिकपणाची, नियत कर्तव्यांची, मी माझ्यासाठी योग्य-अयोग्य ह्याची जी रेषा
ठरवली आहे तिला ओलांडायचं किंवा नाही अशी to be or not to be वेळ येईल तेव्हा मी
नेमका काय ते मला कळू शकेल. ‘न्यूटन’ अशा रेषेवर गेलेल्या एका माणसाची गोष्ट आहे.
नक्षलवादाची किंवा सरकारी व्यवस्थेची वगैरे ही गोष्ट नाही. मला काही गोष्टी पूर्ण करायच्याच
आहेत, माझ्यासाठीच करायच्या आहेत आणि मी
त्या पूर्ण करेनच हा असामान्य चिवटपणा दाखवणाऱ्या एका साध्या माणसाची ही साधी
गोष्ट आहे.
'रारंगढांग' मधलं हे अजून एक वाक्य. |