http://marathistars.com/movies/hampi-2017-marathi-movie/ |
मी ट्रेलर न पाहताच हा पिक्चर बघायला गेलो.
भाडिपाचा ‘प्रवासी v/s भटके’ हा व्हिडीओ तेवढा पाहिला होता, पण त्यात
काहीच हिंट नाही हे मी आता सांगू शकतो.
मी परत बघेन का हा चित्रपट, तर हो. का? तर पार्श्वसंगीत
आणि त्यावेळी दिसणाऱ्या फ्रेम्स अशा काही १२-१५ मिनिटांसाठी परत बघेन. ह्या
तेवढ्या तुकड्यांसाठी ‘हंपी’ खिळवून ठेवतो. पार्श्वसंगीत, मागे येणारे कवितांचे
तुकडे बेफामच, विशेषतः कृष्णानी आणि सुरुवातीला येणारी बोरकरांची कविता (कोणाच्या
आवाजात, सुनिता देशपांडे?). सचिन कुंडलकरच्या ‘गंध’ मध्ये ‘कैक या वाड्यास दारे’
अशीच लक्षात राहिली आहे.
बाकीच्या १ तास ४५ मिनिटांबद्दल म्हणाल तर
एकमेकांना तात्पर्यग्रस्त ढाचे देण्याचा, त्यातही प्रेम, माणूस काय आहे अशाबद्दल
ढाचे देण्याचा प्रकार फार भयानक होतो. दोन अनोळखी माणसे एकमेकांना भेटली कि एकदम
अशी जीवनाची तात्पर्ये एकमेकांना देऊ लागतात आणि हे सोबत रोमान्स करताना? असं? असेलही,
माझे जीवन अशा अनुभवाला मुकले म्हणून सुस्कारा सोडायचा एवढंच! ‘बिफोर सनराईज’ ची ही
वाट चोखाळून झाली कि पिक्चर मध्येच थोडा ‘Vickey Christiana Barcelona’ कडे वळतो, बस वळतो. पण
त्याचे गुणसूत्र ‘प्रेमाची गोष्ट’ चेच आहे, प्रेम आणि त्याच्या अविरत असण्याच्या
जड जड संवादांचे, (पण पार्टनर बदलण्याच्या मार्खेजिअन मुभेचे!) बरं, सोनाली आहे म्हणून एक नाच पण आहे. तो तर
एकदमच कॉमेडी प्रकार होतो.
टुरिझमच्या पिक सिझनमध्ये केलेल्या शूटमध्ये
इतकी विरळ माणसे आहेत कि विश्वास न बसावा. भारतात फोटो न काढणारी माणसे नाहीत असे
स्पॉट आहेत असा विश्वास ठेवण्याइतका व्यापक किंवा एलिट असा माझा प्रवास नसल्याने
असं होत असेल. Anthropology
ची एक
विद्यार्थिनी, तिची magazines
मध्ये
लिहिणारी मैत्रीण आणि फोटोग्राफर+आर्किटेक्ट+मिस्टिक असणारा एकदम sorted out तरुण हे सगळे मराठी भाषिक असून ते बॅकपॅकर
स्टाईल फिरत असून त्यांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेपासून दूर हम्पीमध्ये मराठी
समजू शकणारा रिक्षावालाही भेटतो हे सगळंही संभाव्यतेला मिडिल फिंगर दिलेलं वाटतं.
त्यापेक्षा ‘काहे गये हम्पी’ असं करून एखादं पात्र अमराठी दाखवते तर अधिक इफेक्ट
साधला असता असं वाटून राहिलं आहे.
पण क्युरिअसली स्वतःच्या तात्पर्यपर संवादांवर
चित्रपटातच विनोद केलेला आहे. मुख्य पात्राची back story उगाच खेचलेली नाही आणि ह्या
सगळ्या ‘प्रेम म्हणजे...’ अशा थोर ढाचेगिरीला एकदम फ्रेंच टच देणारा शेवट ह्याने
चित्रपट अगदी बोजड होऊन कोसळत नाही.
एका सीनमध्ये स्त्री पात्र आणि पुरुष पात्रे
त्यांची अंतर्वस्त्रे वाळत घालताना दाखवतात तेव्हा अमूल माचो (ह्या नावावर आक्षेप
का नाही असा प्रश्न पडून राहिला आहे!) हे पार्टनर का आहेत हे कळतं.
तो एक अपरिहार्य नाच सोडला तर सोनालीची
भूमिका वेगळी आहे, प्राजक्ता माळी तिच्या नुकत्याच संपलेल्या सिरीयलमधून उचलून
आणल्यागत आहे आणि ललित प्रभाकरने भारी काम केलेलं आहे, पण I hate sorted out type cool guys (कारण आंबट द्राक्षे!), म्हणून मी त्याच्या भूमिकेवर फार काही
बोलणार नाही.
पार्श्वसंगीत आणि बोरकरांच्या कवितेच्या
ओळी... आणि अर्थात हंपीचे कालस्तब्ध अवशेष!