दिवाळी अंकांच्या किंमती
माझ्या क्रयशक्तीच्या बाहेर असल्याने पण त्याचवेळी दिवाळी अंक वाचण्याची कांक्षा
(!) असल्याने मी ‘सार्वजनिक वाचनालय’ इथे दिवाळी अंकासाठी असणारे ४ महिन्याचे सभासदत्व
घेतले. एकूणच दिवाळीत प्रकाशित होणारे अंक पुढे शिमग्यापर्यंत वाचायला देणे हीच गोष्ट
मला एकदम भारी वाटते. जानेवारी महिन्यांत दिवाळीच्या शुभेच्छा आणि फटाके किंवा
दिव्यांच्या पार्श्वभूमीवर असलेले एखादे अभिनेत्रीचे मुखपृष्ठ असलेला दिवाळी अंक
बाकड्यावर लोळत वाचणे अशी एक मेमरी माझ्यात आहे. त्या मेमरीचा प्रभाव आणि
सद्यकालीन क्रयशक्ती अभावाचा परिणाम म्हणून २५० रुपये फी+२०० रुपये अनामत रक्कम+५
रुपये=४५५ रुपये देऊन मी सभासद झालो. मुळात २५० रुपये एकाच अंकाची किंमत असल्याने
१-२ अंकातच पैसे वसूल होतील असा हिशेब करून मी माझ्या पाठीवर नार्सिसिस्ट थाप
मारून मोकळा झालो. त्या सभासद कालाचा हा तपशील
१.
धनंजय
हा अंक रहस्य कथांचा अंक
आहे. पण ह्या अंकात इतक्या कथा आहेत, इतक्या कथा आहेत कि बास. पण थ्रिलर, detective अशा सिरीयल किंवा पिक्चर पाहणं होत
असल्याने अनेक कथा अपील झाल्या नाहीत. कारण अगदी सुरुवातीपासूनच त्या भाकीतशक्य(!)
होतात. बाळ फोंडके ह्यांची आणि अल्हाद महाबळ ह्यांची कथा (ही कथा त्यांत आहे हे एक
कारणही ‘धनंजय’ हा दिवाळी अंक घेण्यामागे होतं.) ह्या वेगळ्या आहेत.
काही
कथा ‘विज्ञानकथा’ बाजाच्या आहेत. त्या एकदम आटोपण्यापेक्षा थोड्या दीर्घ असत्या तर
मजा आली असती. एक रोबोट, ज्याला तो रोबोट आहे हे माहित नाही अशी कथा आहे ती लक्षात
राहिली आहे.
२. साधना
माझ्यासाठी
‘नाव मोठं लक्षण खोटं’ असा प्रकार झाला. सुरुवातीच्या दलवाई ह्यांच्या कथेनंतर अंक
उतरत्या क्रमालाच लागतो असं वाटतं. द्वादशीवार ह्यांचा लेख हा उगाच पसरट आणि अचूक
आणि सिद्धतापूर्ण विधाने करण्यापेक्षा प्रचारकी पाल्हाळ लावणारा वाटतो. मिलिंद
बोकील ह्यांच्या येऊ घातलेल्या पुस्तकातला अंश उत्कंठा वाढवणारा आहे, पण तो
अंकासाठीचे ओरिजिनल लिखाण होत नाही. जाहिराती फारच आहे आणि अनेकदा ते अंक आहे का प्रायोजक
स्मरणिका हेच कळत नाही.
हर्डीकर
ह्यांच्या लेख मी-मी ने भरलेला आहे, पण तरीही त्यांत काही मुद्दे चांगले मांडलेले
आहेत. हे मुळातले भाषण आहे ह्यांतच सर्व आलं. (भाषणाला intellectual किंवा सामाजिक product न मानता मनोरंजन मानू ती महत्वाची
पायरी असेल असं माझं मत आहे. विचार करू शकणाऱ्या/करू इच्छिणाऱ्या माणसाने भाषणे
ऐकणे-देणे आणि निर्मितीच्या दृष्टीने म्हातारे होण्याआधीच नियमित कॉलम लिहिणे
टाळायला हवे असे एक मतही मी इथे व्यक्त करतो. पूर्णतः expert नसलेल्या आणि माहितीपूर्ण मते
असलेल्या व्यक्तींचे कॉलम हे प्रचारकी गळ ठरतात/असतात. असो, digression झालं.)
गोविंद
तळवलकर ह्यांच्या मुलींचे लेख तर भयानक! तळवलकर ह्यांच्या व्यक्तिगत जीवनातील
लक्षात राहिलेल्या बाबींचे कलेक्शन एवढेच हे लेख आहेत. ते हे करत, ते ते करत,
त्यांना हे आवडे, त्यांनी आम्हाला इकडे नेलं, तिकडे नेलं. आपण एका व्यासंगी
संपादकाबद्दल वाचतो आहोत का कला-साहित्य-रसिक संस्थानिकाबद्दल हेच कळत नाही.
तळवलकर ह्यांच्या भूमिका, व्यासंग आणि त्यासाठीच्या सवयी हे ह्याबद्दल काही न कळता
एक एलिट अभिरुची असलेला मनुष्य एवढीच मांडणी होते. असतील, ते एक मनुष्य-बाप म्हणून
चांगले असतील, पण असे अनेक आहेत, पण लेखक-संपादक गोविंद तळवलकर असलेले थोडे आहेत.
अर्थात त्यांच्या अशाही बाबतीत लोकांना कुतूहल असेल, पण मला ‘अडकित्त्यापेक्षा
कित्ता’ जाणण्यात स्वारस्य असल्याने माझी निराशा झाली.
३. अंतर्नाद
संग्राह्य
अंक. विकत घेऊन ठेवावा. ‘अंतर्नाद’ बंद होणार असेल तर खरंच वाईट गोष्ट आहे.
डॉ.
शंतनू अभ्यंकर ह्यांचा रिचर्ड डॉकिन्सबद्दलचा लेख ओघवता, नेमकी माहिती देणारा आणि
अधिक वाचायला प्रवृत्त करेल असा आहे.
ना.सी.
फडके ह्यांच्या मुलीचा लेख, व्यक्तिगत आयुष्य आणि लेखक आयुष्य ह्यांच्या तणावरेषेभोवती
विस्तारतो. मला आवडला, विशेषतः आधी आलेल्या अशाच आठवणींच्या यादीच्या वाईट
अनुभवानंतर.
हमीद
दाभोलकर ह्यांचा लेख ‘अंनिस’ च्या कामाबद्दल, विशेषतः नरेंद दाभोलकर ह्यांच्या
हत्येनंतरच्या कामाबद्दल आशा देतो. पण त्यांत नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या हत्येनंतर
कार्यकर्त्यांनी हिंसक प्रतिक्रिया दिली नाही, पण तोही एक पर्याय होता अशा आशयाचं
विधान करतात ते खटकतं.
प्रभाकर
देवधर ह्यांचा लेख भारतात प्रभाव पाडण्यासाठी योग्य ठिकाणी योग्य जागी असणं हेच
महत्वाचं आहे, बाकी स्पर्धा, क्षमता हे सगळे फोफले चोचले आहेत हेच दाखवून देणारा
वाटला. One needs to have an ear of person with nuisance value to make difference ही काही फार चांगली बाब नाही.
पुपुल
जयकरांच्या जे. कृष्णमुर्ती आणि इंदिरा गांधी ह्यांच्या संवादावरचा अनुवादित लेख
नेमका कसा पहावा हे मला कळत नाही. कारण कृष्णमुर्ती ह्यांच्या विचारांचे माझे आकलन
नाही आणि इतक्यांत त्याबद्दल मी काही वाचेन असंही नाही. पण एक असामान्य क्षमता आणि
जाणीव असलेला मिस्टिक आणि तशाच जाणीव असलेल्या इंदिरा गांधी अशी मांडणी ह्या लेखात
येते, ती मला थोडी खटकली आहे आणि थोडी बुचकळ्यात पाडणारी आहे.
४. मुक्त शब्द
संग्राह्य,
वाचनीय आणि पैसा वसूल!
मनस्विनी
लता रविंद्र, सतीश तांबे, वंदना भागवत, कृष्णात खोत (सर्वात जास्त आवडलेली)
ह्यांच्या कथा
विश्राम
गुप्ते ह्यांचा ‘हिंद स्वराज आणि आधुनिकता’ हा लेख. मूळ विषय, मूळ विषय
मांडणाऱ्याची भूमिका आणि लेखकही मांडणी अशी उत्कृष्ट रचना आणि अभिनिवेश किंवा
विरोधाचा ज्वर नसलेली पण नेमकी मांडणी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. शेवट थोडा
भावनाळू वाटला.
आसाराम
लोमटे ह्यांच्या येऊ घातलेल्या कादंबरीचा अंश आहे, तो उत्कंठा जागवतो. पण रमेश
इंगळे-उत्रादकर ह्यांच्या अशाच भागाबद्दल असं म्हणता येणार नाही.
हरिश्चंद्र
थोरातांचा दी------र्घ लेख आहे आस्दिवालच्या मिथक कथेवरचा जो Claude Levi
Strauss च्या लेखाचा अनुवाद
आहे. मी पूर्ण वाचला नाही, पण सुरुवातीच्या मिथक कथेचा भाग भारी आहे. ह्या लेखाचा
नेमका audience कोण
आहे आणि त्यांना काय वाटलं हे मला कळण्याची उत्सुकता आहे.
कविता
झेपल्या नाहीत.
‘भारतीय
लोकशाहीची स्थित्यंतरे’ हा काही लेखांचा भाग कमकुवत आहे. एकतर त्यांत नेहरू-इंदिरा
गांधी ह्यांचा भक्तीय डिफेन्स आहे आणि नवी मांडणी फार नाही. आनंद तेलतुंबडे
ह्यांनी सध्याचे सरकार बाकीचे सारेच पर्याय कसे मुळातच खुडू पहात आहे हा मुद्दा
योग्य पकडला आहे, पण अनेकदा त्यांना न पटणाऱ्या बाजूबाबत खूप मोघम गृहीतके धरून
सर्व मांडणी होते असं वाटतं.
(एक
गंमत म्हणजे माझ्या अगोदर ज्या सभासदाने ‘मुक्त शब्द’ अंक वाचायला नेला होता
त्याने वैचारिक लेखात विविध रंगाची अधोरेखने आणि प्रसंगी समासांत टिपण्या केल्या
आहेत. कोण आहे हा? आणि कुणीकडचा आहे?)
हाच तो रंगीबेरंगी पूर्वसुरी! (लोकल ट्रेनमध्ये काढलेल्या फोटोत खिडकीतून सरिअल असा प्रकाशही आलेला आहे.) |
अनुवादित
कथांमध्ये प्रचेत गुप्त ह्यांची कथा लक्षणीय आहे.
(क्रमशः)