Saturday, November 11, 2017

भाडिपाचा सिक्रेट स्टँडअप

      स्टँडअपबद्दल माझं थोडं साशंक मत आहे. माझ्यामते ‘विनोद’ हा माणसांच्या संवादातला अगदी पूर्वापार चालत आलेला फॉर्म असावा. नकला करणं, एखादे वैशिष्ट्य पकडून त्याला उलटं-पालटं करणं, भयानक अतिशयोक्ती, चुकीच्या दोन गोष्टींची सांगड घालणं, द्वयर्थी प्रयोग हे सगळे प्रकार माणसे संवादात पूर्वापार वापरत असावेत. कुठल्याही काही माणसांच्या कोंड्याळात हजरजबाबी विनोदी माणूस लक्षवेधी ठरतो, त्यामुळे विनोद ही पुरुषांची एव्होल्युशनरी क्रिया असावी असंही विनोदाने म्हणता येईल.
      आता एकूणच आपल्याला जे हवं ते इतरांना सांगणं सहज उपलब्ध असण्याच्या काळात ही लक्ष वेधून घ्यायची स्पर्धा अजून जास्त आहे आणि त्यामुळे विनोदांचा पुरवठाही असं मला वाटतं. आणि हा भरघोस पुरवठा साहजिकच एकसारखा एक बनतो आहे. प्रत्येक स्टँडअप कॉमेडीअनमध्ये टीचभर काही ओरिजिनल असेलही, पण ते बहुतेकदा सरावून कंटाळलेल्या आवरणात येतं आहे. हा स्टँडअपबद्दल फार बरं मत नसण्याचा एक मुद्दा.
      दुसरं म्हणजे जे सिरीयस कॉमेडीअन आहेत, म्हणजे जे मानवी स्वभावाच्या जनरल विसंगतीवर बोट ठेवू पाहतात किंवा कमेंट करायला विनोद निवडतात ते स्टँडअपमध्ये टिकू शकत नाहीत. त्यांना लिखाणासारखं थोडं अधिक सिरीयस मिडीयम घ्यावं लागणार. स्टँडअपमध्ये बोलणारा दिसतो ही गोष्ट सांगण्यावर ओव्हररायडींग होते. त्यामुळे हालचाली, अंगविक्षेप ह्यांना महत्व येतं. किंवा तुमच्याकडे खूपच जास्त सरस मटेरीअल असावं लागतं, पण हे कठीण आहे. सो एकतर सेक्स, राजकारण ह्यावर प्रसंगी सर्वसाधारण taboo असलेले शब्द किंवा प्रसंग वापरून कमेंट्स किंवा आयडेंटिटीचे इश्यू ह्यावरच्या कमेंट्स ह्यावर स्टँडअपस फिरत राहतात.
      अर्थात ही मर्यादा हेच बलस्थान आहे. माझ्यामते विनोद हा आपला एक डिफेन्सपण आहे, एक मोकळं होण्याचा रस्ता आहे. त्यामुळे जे बऱ्याचदा अर्वाच्य आहे, बोलायचं नाही आहे ते आपण वापरणार आहोत.
आपल्याला न आवडणाऱ्या सिस्टीमशी जुळवून राहताना अपरिहार्यपणे विनोद, सिनिसिझम आणि सरतेशेवटी निराशावाद अशा पायऱ्या आहेत का? Is joke simply a delayed or disguised cry of helplessness?
मी स्टँडअपचा चांगला प्रेक्षक होऊ शकणार नाही असंच मला वाटतं. कारण तिथे एवढं सिरीयस व्हायला कोण येतं?
तर भाडिपाचा सिक्रेट स्टँडअप! (हे भाडिपाचं Youtube पेज
---
Image result for भाडीपा
Youtube वरून 

३५० रुपये तिकीट (जे अंधेरी वेस्टच्या हिप स्टेटसच्या मानाने स्वस्तच आहे असं माझ्या लक्षात आलं) घेऊन मी तो पहिल्या रांकेत (दैवयोगाने) बसून पाहिला. भाडिपाचा  ‘जनरल अॅलर्ट’ मला जाम आवडला होता. बाकीचेही काही व्हिडीओ, जसं गणपतीच्या आधीचा, किंवा मिस मॅनर्सचा पहिला व्हिडीओ हे मला आवडले होते. आह, आणि भाडिपा म्युझिकल डायरीज, that is simply awesome. 
      सारंग साठे वॉज वे अहेड ऑफ द अदर गाईज. विनोदी कमेंट्स करणं हे खूपच जण करतात, पण त्याला निरीक्षण, वाचन आणि थोडा कमी सिनिकलपणा ह्यांनी अधिक पोटेंट करता येऊ शकतं. सारंग साठेला हे जमलं होतं. त्या खालोखाल आदित्य देसाई, पण स्टँडअप कॉमेडीला एक कोरडेपणा लागतो तो त्याच्यात थोडा मिसिंग वाटतो. तो अगदीच संवाद वगैरे साधायला लागतो. संग्राम गायकवाड, Max Magnet आणि चेतन घाटे इम्प्रेसिव्ह होते. बाकीचे त्यांचं पर्सनल फ्रस्टेशन अगदी उघडपणे ऐकणाऱ्याला विनोदाच्या पुडीत देतायेत असं वाटत होतं.
      माझ्यामते सेक्स वॉज ओव्हरयुज्ड. प्रसंगवर्णन हा प्रकार कमी जणांनी वापरला, गौरवने तो चांगला वापरला. राजकीय सटायर वॉज प्रेडीक्टेबल. आणि भौगोलिक identity बेस्ड जोक तर बासच बास. ‘मराठी’ म्हटलं कि identity बेस आलाच हे जरी खरं असलं तरी त्यातूनच सगळं पहावं असं कंपल्शन तर नाही ना?
      ११ नोव्हेंबरला पुण्यात मराठीचे आद्य(भाषणे देणं हा प्रकार पकडला तर स्टँडअप कॉमेडी महाराष्ट्रात आधीपासूनच होती म्हणायला लागेल) किंवा सर्वात यशस्वी स्टँडअप म्हणता येतील अशा पु.ल. देशपांडे ह्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात भाडिपाचा स्टँडअप होणार आहे. मी जे पाहिलं त्यापेक्षा तो वेगळा, मुद्दामून ट्रिब्यूट म्हणून केलेला असणार आहे, क्युरेटेड!
      कार्यक्रमाच्या अध्ये-मध्ये भाडिपाची rap सॉंग वाजतात ती भन्नाट आहेत.
--
      एक पेशावर शिक्षक म्हणून विनोदांच्या वापराबद्दल मी विचार करतो. विनोदी शिक्षक प्रसिद्ध असतात. त्यांची लेक्चर्स मुलं एन्जॉय करतात असं मानलं जातं. शिक्षकाला ही दाद हरखून टाकते, कारण बाकीवेळ आपण छू आहोत ही जाणीव त्याला बोचकारू शकते. आणि मग हे विनोद अति होतात. शिक्षकाचा जोकर होतो.
      रुक्ष, कोरड्या पण प्रश्न आणि संदर्भसंपृक्त संवादाचा स्वतःचा एक self-selection mechanism असतो. कमी एकाग्र, कमी सिरीयस ऐकणाऱ्याला तो आपोआप दूर सारतो.
      त्याउलट विनोद बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला एक पोकळ पण सहजसाध्य, वरवर जाणारी फिलिंग देऊ शकतो, जी एकदम विरून जाते.
      माझ्यामते एक छोटा, मजेशीर पण कुठेच न जाता गोलगोल फिरणारा रस्ता असं विनोदाचं होऊ शकतं. अर्थात ज्याचा त्याचा रस्ता हा ज्याचा त्याचा प्रश्न हे आहेच. 
    नव्या प्रयोगांसाठी, केवळ stand-up नाही तर अन्यही भाडिपाला शुभेच्छा.  


हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...