हृषीकेश
गुप्त्यांची दोन पुस्तके मी आधी वाचली होती, ‘अंधारवारी’ आणि ‘दैत्यालय’. त्यातली ‘नशकाप्रमराश्री’
ही कथा मला आवडली होती. त्यामुळे प्रकाशित झालंय हे कळल्यापासूनच मी ह्या
कादंबरीसाठी उत्सुक होतो. पण ‘बुकगंगा’ वर मला कादंबरी मिळाली नाही. शेवटी काही
दिवसांनी ‘अमेझॉन’ वर मिळाली. ५०० रुपये किंमतीने माझं लक्ष वेधून घेतलं.
सौजन्य: अक्षरनामा |
पण इट्स वर्थ इट! कथावस्तूचा बाहेरून
जाणवणारा पोत आहे तो थोडा निषिद्ध वळणाचाच आहे. पण ‘दंशकाल’ भयकथा अशा सोप्या tag मध्ये मावणारी
नाही. ‘दंशकाल’ वाचताना त्यातल्या एका विस्तारित घराच्या पसाऱ्यामुळे अरुण साधूंची
‘मुखवटा’ आठवत राहिली. ‘मुखवटा’ नेही श्रद्धा, प्रसंगी तर्काने स्पष्ट न होणारे
व्यक्तीविलक्षण अनुभव ह्यांचा वापर केला आहे. पण ‘दंशकाल’ मध्ये हे मिक्स्चर एकदम
पोटेंट आहे. मुळात मध्यवर्ती पात्राला दिलेला आत्मनिवेदनपर सूर परफेक्ट आहे.
सांगणाऱ्याची त्रयस्थता आणि तरीही गोष्ट अगदी पंचनामा सदृश्य कोरडी न करणं हा तोल
कथनाला जमलेला आहे.
लेखकाच्या जगलेल्या आयुष्याचा भाग ह्यांत किती
असा प्रश्न मला वाचताना पडला. ‘दंशकाल’ हा थॉट एक्पिरीमेंट वाटत नाही आणि केवळ
अभ्यासाने उभं केलेलं कथात्म वास्तवही वाटत नाही. अर्थात ते तसं असेलही, पण मग ते
तसं वाटत नाही ह्या कसबाचे श्रेय लेखकाचे आहे.
‘दंशकाल’ मध्ये अनेक psychic अनुभव टोकदार आणि खोलवर आहेत. पण हे अनुभव
कथेवर जड होत नाहीत. कथन आहे ते मध्यवर्ती पात्राचे. जसे मुराकामीच्या गोष्टीत एक
अत्यंत अ-शक्य असा एकदम सेन्ट्रल असा भाग असतो, कदाचित तो गोष्टीचा आसच असतो. पण तरीही
केवळ रचनेचे कौतुक एवढेच मुराकामीचे होत नाही. ह्या वैशिष्टपूर्ण तुकड्यावर तितकीच
चोख कथेची मांडणी होते. ‘दंशकाल’ हे साधतं.
सामाजिक, वैश्विक उमाळे नसणं हे मला ‘दंशकाल’
चं मोठं वैशिष्ट्य वाटतं. अगदी मुद्दामून ‘बघा, कसा ह्रास होऊन राहिला’ असं चुकचुकणंही
नाही, पण दोन वाक्यं आहेत, वैश्विक पुरुषत्व आणि थोबाडीत मारणारे स्त्रीत्व अशा तऱ्हेची.
खुपल्यामुळे ती लक्षात राहिली.
मला मिळालेल्या प्रतीत पृष्ठ क्रमांक ३४५ वर
मुद्रणाची चूक आहे असं दिसतंय. ‘नंदाकाका’ च्या ऐवजी ‘भानुकाका’ असं २ ठिकाणी झालं
आहे. ४००+ पानांचे पुस्तक!
‘शोध’ नंतर मी ‘मुखवटा’ वाचलेली. तिच्या
मुखपृष्ठाने अगदी शाळेच्या दिवसापासून ती माझ्या लक्षात होती. त्या नंतर एका लयीत
वाचलं ते ‘दंशकाल’. भंजाळून सोडणाऱ्या रंजनामुळे, शब्दांच्या निवडीने, वर्णनाच्या
एकजिनसी प्रवाही शैलीने ‘दंशकाल’ मला अजून जास्त अपील झाली. मुखपृष्ठही तितकंच
विलक्षण आहे आणि कथेच्या गाभ्याला नेमकं पकडलेलं. शेवट तेवढा आधीच्या फ्लोपेक्षा
एकदम अचानक हात झटकलेला वाटला, पण तरीही सांधा न तुटलेला.
हृषीकेश गुप्त्यांची अजून
पुस्तके वाचायला मिळोत.