मागच्या
महिन्याभरात मी नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ आणि ‘एडी अँड रावण’* वाचली. ‘सात
सक्कं ..’ तशी माझ्यासाठी बरीच अवेटेड होती. ‘एडी अँड रावण’ वाचायचं खरं कारण
म्हणजे ‘सात सक्कं..’ नंतर हा लेखक आता इंग्लिशमध्ये कसा लिहितो आणि काय लिहितो ह्याचं
कुतूहल. म्हणजे दोन भाषांत लिहू शकणाऱ्या लेखकाबद्दल आणि त्याबद्दल रेकग्निशन
मिळवू शकणाऱ्या माणसाबद्दल प्रश्न पडणारच. म्हणजे दोन भाषा लिहिताना मुळात एकसंध
असं काही आहे का दोन्ही भाषांत सापडणारा लेखक हि दोन निरनिराळी माणसं आहेत असा
प्रश्न.
‘सात सक्कं..’ वाचताना आपण कोसलाच्या सावलीत
पण वेगळ्या उजेडाच्या छायेत आहोत असं मला सारखं वाटत होतं. दोन्हीत त्यांच्या
त्यांच्या पोताचा डार्क ह्युमर आहे. दोन्हीत आपल्या आजूबाजूच्या स्पेस-टाईमचं
थंडगार, निर्विकार होऊ घातलेलं पण शेवटाला दुखावलेलं निरीक्षण आहे. निरीक्षणाचा हा
थंडगारपणा कोडगा किंवा भयप्रद नाही. पण आपल्या कृती, भावना, नाती, वेदना ह्या
सगळ्यांच्या असण्यापाठी शोधू गेलं तर जाणवणाऱ्या आणि आपला कबजा घेणाऱ्या निरर्थकतेच्या
ओढीशी जोडलेला निरीक्षणाचा नजरिया आहे. पण तरीही ‘कोसला’ किंवा ‘सात सक्कं...’
ह्यांच्यामधला नशा हा व्हिस्कीच्या दोन ब्रांड सारखा नाही, त्यापेक्षा वेगळा आहे.
त्या फरकाला नाव देऊन टाचणं कठीण आहे.
पण हा झाला निष्पक्ष होण्याचा आवेश. मी ‘कोसला’
पहिल्यांदा वाचली आणि शेवटची वाचली ते वय आणि मी आत्ता ‘सात सक्कं..’ वाचतानां मी
ह्याच बदललेल्या गोष्टी आहेत. ‘सात सक्कं..’ वाचताना माझी सुरुवातीची एक
प्रतिक्रिया ‘हट भेन्च्योत, हे परत तसंच, गोष्ट नाही काही नाही, बस लिहिण्याचा
धुमारा आला अन लिहित गेला’ अशीच होती. ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ हे पुस्तक
मी वाचूच शकलो नव्हतो, इतकं मला त्यात पूर्वसुरींचा प्रभाव वाटत राहिला होता. ते
अख्खं लिखाण मला आधीच्या एका अशाच लिखाणाची, त्या लिखाणाच्या सांगायच्या पद्धतीची,
अगदी त्याच शहराची थोडी वेगळ्या तऱ्हेची रेसिपी वाटत राहिलं होतं. इट्स माय फॉल्ट.
पण असं वाटलं मला. म्हणजे इथे फर्स्ट मूव्हर्स अॅडव्हान्टेज आलेला आहे. मी जर ८-९
वर्षामागे ‘सात सक्कं..’ वाचलं असतं तर आज मी त्याचा कल्ट फॉलोअर असतो. आज असं
माझं होत नाही. पुस्तक डोक्यात जाऊन त्या तालात घुमत जायचं वय बाजूला सरून व्यसनाधीन
माणसाच्या वेळ जाण्यासाठी पाहिजेच अशा तडफेने मी पुस्तकं वाचतो ते ह्या वयात. मी ‘सात
सक्कं..’ ला दिलेला प्रतिसाद हा आता बेरकी आहे असं मला कळतं.
तरीही मराठी साहित्य असं जे काही असतं त्यात
‘सात सक्कं..’ मैलाचा दगड आहे वगैरे वगैरे आपल्या कळण्याच्या पलीकडे आहे. (असे
साहित्य-संस्कृती ह्यांचे साकल्याने सृजनात्मक समीक्षण करण्याचे ‘स’ माझ्या पदरात
फारसे आलेले नाहीत. हा, हा!!) हे मैल ज्यानं त्यानं आपल्याला हवे तसे मोजले आणि
दगड ठोकले. ज्यांचे आवाज आणि ओळखी जास्त होते त्यांचे दगड टिकले आणि बाकीच्यांना शेंदूर
लागले किंवा पुरले-हरवले गेले असं माझं कन्क्लूजन मी आता टेकवून देतो.
--
पण तरी नगरकरांना ‘सात सक्कं..’ मध्ये गोष्ट
का लिहिता आली नाही? का मुळात प्रेरक वगैरे इतिहासाचा, बनेल आशावाद आणि
अभिनिवेशाचा , त्यावेळच्या पश्चिमेकडे कान आणि तोंड आणि जमेल तसे पोटही केलेल्या लिहू
पाहणाऱ्या लोकांना नॉशिया आला होता. आणि मग ह्या नॉशियावर जालीम उपाय म्हणून त्यांनी
गोष्ट वगैरे सगळ्याला बाजूला सारत बस लिहायला सुरुवात केली आणि मग जे जसं येतं आहे
क्रम-क्रमाने त्याला तसं मनात चला गोष्ट वगैरे असं वाचणाऱ्यावर दिलं सोडून. इट
मस्ट हॅव बीन फॅसिनेटिंग अॅट दॅट टाइम. पण ह्या सगळ्या दाद देण्याच्या गोंधळामागे धडपणे
गोष्ट सांगणारे लोक हे बाजूला सारले गेले काय? धडपणे गोष्ट सांगणं ह्याला थोडा
कमीपणाचा शिक्का लागला का? धडपणे गोष्ट असण्यात काही वेगळं सांगता येत नाही असा
थोडा नाक वर केलेला समज बनला का? माझे समीक्षकी प्रश्न, माझा फावला वेळेचा खेळ.
--
मला ‘सिंहासन’ आणि अनिल बर्व्यांच्या
कादंबऱ्या आठवतात. त्यांच्यात गोष्ट आहे. बर्व्यांच्या कादंबऱ्यामध्ये काही न काही
प्रमाणात माणसांचे ठोकळे होतात आणि गोष्टीचा प्रपोगंडा. पण तरीही त्या गोष्टींना
त्यांची एक मस्ती आहे. ‘सिंहासन’ निरीक्षण आणि गोष्ट ह्यांचा अधिक चढता प्रकार
आहे. आजही मला ‘सिंहासन’ वाचायला मजा येते. त्यातही जाऊन-येऊन ह्या सगळ्या खेळाला ‘काय
रे बाबा तुझा अर्थ’ असं विचारणारा भेसूर आवाज आहे. पण तो सगळ्याला दाबत नाही. माझा
हा एक पर्सनल प्रेफरन्स बनलेला आहे, काही लिहायचं तर आधी काही एक सांगायला हवं आणि
ते एन्टरटेनिंग हवं. इट शुड बी अ राईड, पंचनामा किंवा कन्फेशन नको. मे बी आय अॅम
टर्निंग इन्टू अ फिल्थी रीडर.
--
‘एडी अँड रावण’ मधले नगरकर तसे वेगळे आहेत.
भाषेवर, आणि त्यातही त्या भाषेचे एलिमेंट असलेल्या शब्दांवर असलेली त्यांची हुकुमत
जबरी आहे. आणि भाषेच्या फरकांची, आणि भाषेच्या वारश्याने आणि वापराने भौतिक
आयुष्यांत उभ्या राहणाऱ्या फरकांची त्यांची मांडणीही. अनेकदा आजच्या दिवसांतही
भाषेच्या अनुषंगाने दिसणाऱ्या फरकांना ‘एडी अँड रावण’ रेझोनेट होते. त्यातला
बेदरकार होऊ जाणारा विनोद आणि विसंगतीच्या वाटेला जाऊ पाहणारं रिझनिंग अल्टी
वाटतं.
--
‘सात सक्कं..’ च्या सध्याच्या आवृत्तीत
नगरकरांची प्रस्तावना आहे. शेवटचा वैश्विक टाहो फोडणारा भाग सोडला तर ती मजेदार
आहे.
माझ्याकडे असलेल्या ‘एडी अँड रावण’ च्या
पायरेटेड आवृत्तीत गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असा उल्लेख आहे.
आय अॅम क्युरिअस.
--
बाकी सेक्स भारी हाताळतात नगरकर. ‘एडी अँड
रावण’ मध्ये तर भारीच.
--
मुंबईत घडणाऱ्या कादंबऱ्या घेतल्या तर आत्ता
मला तीन नावं आठवतायेत. ‘रोहिंग्टन मिस्त्री’ एस्पेशली ‘फॅमिली मॅटर्स’ आणि ‘टेल्स
फ्रॉम फिरोजशहा बाग’, विक्रम चंद्राची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि आता ‘एडी अँड रावण’.
अजून काय आहे? थ्रीटी उम्रीगरची ‘स्पेस बिटवीन अस’ एवढी काही मुंबई एक्स्प्लोअर
करत नाही. ‘लव्हाळे’ आहे, थोडीफार पेंढारकरांची ‘अरे संसार संसार’ आहे. ओह,
कॅथेरिन बू ची ‘बिहाइंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ तर आहेच.नॉन-फिक्शन मध्ये सुकेतू
मेहताचं ‘मॅक्सिमम सिटी’ आहे. मर्ढेकरांची ‘पितात सारे गोड हिवाळा’ आणि बाकीच्या
कविता. कोलटकर, ढसाळ आणि बाकीचे राहिलेले अजून माझ्या वाट्याला यायचे आहेत. एवढ्या
मोठ्या शहरात वेळ काढण्याचा सिसीफस खेळ खेळताना होपफुली तेही होऊन जाईल.
* मूळ पुस्तक 'रावण अँड एडी' आहे. मी लिहिण्याच्या भरात चुकलो आहे.