आणि मग मी कवितेत तुझी वाट बघतो,
माझ्या इमॅजिनेशनची शेवाळी जमलेल्या झोपाळू रस्त्यावरून तू निवांत
चालत ये..
तू थांबवून ठेव ह्या अस्ताव्यास्त शहराचं वार्धक्य
आणि ताज्या ताज्या जन्मांचे निर्माल्य ठेवत जा पावला-पावलाखाली
तू कुठल्याही दिशेला बघ,
तुला दिसेल तिथे उपभोगाची तृप्त ढेकर,
त्या सुस्त सुखाच्या चरबीला जाळ, जाळ इतकी जाळ की
मला तुलाच हाडा-मासाने पचवून जावं एवढी तुझी भूक लागेल,
मग मी तुझी कवितेत वाट बघतो..
तू माझ्या डिझायरचे दोर काप,
तू मला जीर्ण-शीर्ण म्हातारा कर.
तू मला नाचव मरणाच्या भिकेत टाहो फोडत
आणि बघ तरी माझ्या त्वचेत किती उरेल तुझ्या प्राप्याचा अनावर दाह
मग मी तुझी कवितेत वाट बघतो..
तू मला झिंगून ठेव,
माझा मेंदू आंबवून ठेव,
तू मला तसू तसू करून चीलीमित भर,
तू मला सोड थेट रक्तातून मेंदूच्या कॉन्शसमध्ये
नशेच्या अवाढव्य जाळ्यात तू मला लाव सापळा म्हणून
आणि बघ होते शिकार कोणा-कोणची,
मग मी तुझी कवितेत वाट बघतो
तू हे सगळे दिवस लाव एकावर एक थेट
आणि रात्रीच्या कोरीव भुवयांना रंगवून ठेव
तू टाक घामट वाऱ्याच्या झ॒ळकिंचे कटाक्ष
तू देहाचा लोलक झुलवत ठेव
मग मी तुझी कवितेत वाट बघतो..
तू माझे शब्द शोषत जा,
मी तुझी लालस काया बोलत जातो
तू मी होऊन जावू नामानिराळा निरागस गोळा
तू मी सोडून जाऊ कणभर लळा
होऊन ये तू अशी जाळ जाळ कणखर ज्वाळा
मग मी तुझी कवितेत वाट बघतो..