Sunday, November 16, 2014

छान!

       शाळेत मराठी शिकवायला ज्या मॅडम (चांगल्या यशस्वी मराठी शाळांत 'बाई' म्हणतात बहुदा!!) होत्या त्या अनेकदा, त्यांच्या पेट मुलांनी घाऊक भावूकतेने आणि क्लीशांनी भरलेले निबंध वाचून झाले की त्यांचा प्रमाणभाषा आणि प्रमाण शिक्षकागत दिसणारा चेहरा डोलावून आणि गोलावून ‘छान’ असं म्हणायच्या. आत्ता विचार करताना ही गोष्ट जेवढी मुंडेन आणि विनोदी वाटते तेव्हा काही तशी वाटत नसे. ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहिल्यावर मला असं सारखं ‘छान’ वाटतं आहे.
       आता आपला निरुद्योगी सिनिकलपणा डीपरूटेड आहे. त्याला चेचून तिथे बहुगुणी आणि अल्पमोली अशी लागवड करण्याचा मी मध्ये मध्ये प्रयत्न करतो. तर आधी तसं करू.
       इट इज अ फाईन स्टोरी-टेलिंग. चित्रपट लांबत नाही, थांबत नाही. कास्टिंगमध्ये उघड उघड तर उणं काही सापडत नाही. ज्ञानेश, झेंडू, गण्या आणि बाकी मुलांचे अनुभव कॅडबरी डेरीमिल्क सारखे प्रेडिक्टेबल हिट आहेत. पण वनमाला किणीकर आणि विशेषतः नंदिता धुरी जबरदस्त. छाया कदम ह्यांच्या ‘फँड्री’ मधल्या आईच्या भूमिकेनंतर ही नंदिता धुरी ह्यांची भूमिका. नंदिता धुरी ह्यांना आधी मी ‘आयदान’ च्या नाट्य रूपांतरात पाहिलं होतं. त्यात शेवटी त्यांचा मुलाच्या मृत्यूनंतर आक्रोश करतानाचा प्रसंग आहे, मला तो लक्षात होता. सुलभा देशपांडे ह्यांनी तो प्रयोग दिग्दर्शित केला होता.
       म्हणजे खरंतर एकदम लिनिअर स्टोरी आहे. आधी एक चांगुलभरी सुरुवात, मग टर्न आणणारा मध्य आणि ‘जो जे वांछील’ शेवट. पण हे सांगताना त्या स्टोरीसोबत बाकी जे काही येतं चित्रपट म्हणून ते मजा आणणारं आहे. दगड-दगड-सूर्य-दगड, आई ज्ञानेशला शोधत निघते तेव्हा येणारं पार्श्वसंगीत, गल्ल्या-बोळ, ज्याचं-त्यांचं माउली माउली, फुकणीच्या आणि ढोकरीच्या. ज्ञानेशचं घर, त्याचे कपडे, त्याच्या आईचं दिसणं आणि राहणं, शेवटी १०-१० रुपये करत वेगवेगळया नावाने एकच काही विकणारा विक्रेता, पेढे आणि अन्य काही पदार्थ बनवतानाच्या, नोटा आणि चिल्लर मोजतानाच्या दृश्याचा वापर. अनेक गोष्टी थेट स्टोरीत काही आणत नाहीत, पण त्या नसत्या तर चित्रपट म्हणून स्टोरी-टेलिंग झालं नसतं, त्यात एवढी मजा आली नसती.
       आता मूळ स्वभाव.
१.       स्टोरीत कोणी वाईट नाही, गेला बाजार ग्रेपण नाही, किंचित तडका द्यावा तेवढा तो सुरुवातीचा शाळेतल्या बाईंचा ‘ब्लडटेस्ट केलीस का’ विचारणारा प्रसंग आहे आणि वर कसुरी मेथी टाकावी तसे ते स्वेटरचे पैसे न देणारे काका. बाकी सगळे सहृदयी तर आहेतच.
२.       व्हॉट इज द चान्स की ज्ञानेशसारखा मुलगा असेल? वन इन थाउजंड का वन इन टेन थाउजंड का वन इन मिलियन. आणि सहावी-सातवीतल्या वाटणाऱ्या मुलाला न्यूटन आणि आईनस्टाइन माहित असण्याचे, म्हणजे ते काय म्हणतात हे माहित असण्याचे चान्सेस किती? मी इथे सरकॅस्टिक पण नाहीये. पण माझी अशी उगाच एक समजूत आहे की जे जिनियस असतात सायन्स मधले वगैरे, जे शाळेनंतर पुढे त्या एका मार्गावरून पुढे जात जात ‘त्या’ एका ठिकाणी (देश आणि ज्ञान अशा दोन्ही अर्थाने हे एका ठराविक प्रकारच्या घरांत, ठराविक प्रकारच्या पालाकांत, ठराविक प्रकारच्या शाळांत असतात. बाकीचा निखळ उंदीरचाळा. अर्थात महाराष्ट्रातील निम-शहरी, कम-शहरी आणि ग्रामीण भागातील डेटा मिळवून आपलेच दात घशात घालून घ्यायला मी उत्सुक आहे. पण मी डेटा शोधतो आणि मिळतात अॅनेकडॉटल्स.
३.       ज्ञानेशचं आडनाव आणि पुढे अनुषंगाने जी जात नाही अशी ओळख काय?
हे वरचे सारे छिद्रान्वेषी प्रकार म्हणजे आनंदाचा विचका करणं आहे एक प्रकारे. चित्रपट बघायला आजूबाजूच्या सीटांवर असलेल्या प्रातिनिधिक बाई जशा उद्गारल्या तसं ‘छान आहे चित्रपट. काही मारामारी, कट-कारस्थाने नाहीत.’ (अधिक माहितीने असे कळते की कुण्या एका प्रमोशनल कार्यक्रमात चित्रपटाची समदी मंडळी अवतरली होती आणि त्यामुळे द्वेष, असूया, मत्सर, दैवी आणि अमर प्रेम, आरसा वापरून साईन होणारे स्काईप, सतत सेल्फ-हेल्प टाइप बोलणारे सिनियर सिटीझन अशा डेली चरस-गांज्यावर धुत्त अनेक गृहिणी एलिझाबेथ एकादशी चित्रपट बघायला आल्या होत्या.)
   बेसिकली फिक्शन आणि तिची वास्तवातली मुळे इथे मला कुतूहल आहे. जोवर तुम्ही ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ सारखं काही सांगत नाही तोवर कुठल्या वास्तवाने ही फिक्शन जन्माला घातली हा प्रश्न येतंच राहील. कदाचित ते वास्तव कोणाच्या भूतकाळातील असेल किंवा अनेकांच्या वर्तमानातील. पण जिवंत अनुभवांचा आधार नसलेली आणि फँटसीही नसलेली फिक्शन ही मला अशक्य वाटते किंवा कृत्रिम, बेगडी. त्यामुळे ‘एलिझाबेथ एकादशी’ च्या पाठचं वास्तव किती ह्याचं मला कुतूहल आहे. मला खरंच असं सिरीयसली समजून घ्यायचं आहे की माहितीचं, सधनता आणि सोशल नेटवर्क (सोशल मिडिया नाही) ह्यांचं भांडवल नसलेल्या मुलाचे आज काय चान्सेस आहेत. आणि माझा गेस अजिबात आशावादी नाही.
   असंही नाही की चित्रपट असा घाऊक आशावाद विकतोय. चित्रपटाचा शेवट बघताना, जेव्हा ज्ञानेशचा मित्र त्याला हाक मारत येतो, त्या मित्राची आई येते, चांगला धंदा झाल्याची बातमी कळते, मुलं नाचू लागतात तेव्हा एकदम वाटतं की इथेच दिग्दर्शकाने सोडून द्यावा पिक्चर. मला एकदम ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ ची आठवण झाली, शेवटी पाण्यात पाय सोडून बसलेली मुलं. तिथे थांबत नाही पिक्चर, थोडा पुढे जाऊन थांबतो, विज्ञान आणि अध्यात्म पेरलेला आशावादी शेवट.
   थोडा फुटकळ नॉस्टॅल्जिया. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ मी एका ओरिया आणि एका आसामी-बंगाली बरोबर बघितला होता. तेव्हा आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगरी असं अधिकृत नाव असलेल्या आणि फिल्मसिटी नावाने फेमस असलेल्या भागाच्या जवळ राहायचो. ह्या बादरायण संबंधावर ते दोघं, अर्थात त्यातल्याच एकाचा लॅपटॉप घेऊन. त्यांना सगळ्यात जास्त अपील झाला तो कवितेचा वापर. घरकाम करताना बायको ‘तुतारी’ कवितेच्या ओळी म्हणते. एलिझाबेथ..’ मध्येही गाडगे बाबांची कीर्तने, संत न्यूटन आहेत. बाकी घरातील वस्तू विकण्याचे प्रसंग मोकाशींचे फार फेव्हरीट आहेत काय?
   ‘लय भारी.. मधल्या अँड्रेनलीन पम्पिंग पंढरी आणि विठ्ठलानंतर ‘एलिझाबेथ..’. मराठी सिनेमाची रेंज किती विस्तारते आहे नाही!
   पूर्णतः खुसपटे. 
   बाकी संस्कृती रक्षकांचे सदैव जागरूक थवे ‘एलिझाबेथ एकादशी’ वर नोच मारणार का नाही ह्याची मला उत्सुकता आहे. कारणे पुढीलप्रमाणे:
१.       एलिझाबेथ!! कम ऑन. दॅटस् कम्प्लीट देशद्रोही, कोलोनिअल मॅन. अलकावती म्हणायचंत, लीलावती तरी.
२.       मुलांच्या दुकानाचं नुकसान होतं ते जादूटोणाविरोधी बिलाच्या विरोधी आलेल्या लोकांच्या आणि पोलिसांच्या हातापाईत. हेच कारण मिळालं!! हा अपमान आहे. वर ‘ह्यात कसला आलाय संतांचा अपमान’ अशासदृश्य साधारण बायकांच्या कमेंट्स वापरून देश आणि संस्कृतीवर येणाऱ्या संकटाला डाऊनप्ले करण्याचा प्रयत्न!! जसं कॅप्टन ओबेरॉय ह्यांनी ताबडतोब ‘हैदर’ ची चिरफाड केली तसं आत्ता कोणीतरी येणार का?                     
३.       संत न्यूटन, संत आईनस्टाइन!! एकतर त्यांनी सगळं इथलंच प्लेजीअराइज केलंय. तुम्ही आर्यभट्ट, भास्कराचार्य का नाही म्हणालात?   
अर्थात असं काही न होता चांगलेच रिव्ह्यू मिळतील अशी आशा आहेच किंवा असे होण्यास प्रॉडक्शन समर्थ आहेच?!

       एकदा झेंडू म्हणते चित्रपटात, ‘मी पण गणिका होणार’, मग आजूबाजूच्या मार्केटच्या धामधुमीत तिचा आवाज लोपतो. अशा गणल्या- न गणल्या जागांचं गणित परेश मोकाशी आणि टीमला जमलं आहे. जे उरलं आहे तेही केव्हातरी होऊन जाऊद्या माउली.  

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...