ही दोन पुस्तके आहेत: सेपिया
लीव्हज आणि रोल
ऑफ ऑनर. असं म्हणता येईल कि फिक्शनपेक्षा हि खरंतर मेमॉयर आहेत. म्हणजे जरी
त्यांचं क्लासिफिकेशन फिक्शन असं होत असलं तरी त्यातला गोष्टीला लिहिणाऱ्या
माणसाच्या अनुभवाचा पक्का वास आहे.
आणि हि पुस्तकं वाचणं हा पण तसा काही रंजक अनुभव नाही. कारण
नाट्यमयता वगळून एका यथोचित शेवटाकडे जाणारी गोष्ट. आणि तीसुद्धा स्वतःच स्वतःला
ओरबाडून काढणाऱ्या प्रश्नांची. आणि हि तडफड, काहीवेळा अगदी ढोबळ असे शब्द वापरून
सुद्धा संधू मांडतात. लिखाणाचे तांत्रिक आणि गुणवत्तेचे निकष लावले तर हि पुस्तके
फार काही नाहीत. काहीवेळा अगदी बोजड, ढिसाळ शब्दांचा वापर करून गोष्ट पुढे नेली
जाते. पण लिहिणाऱ्याचे जे लिहिले गेले ते घडत असताना जे पिळवटून जाणे आहे (का
कुणास ठाऊक, मला टी.व्ही. वर सतत दिसणारा एक चेहरा आठवतोय) त्यामुळे मी हि पुस्तकं
वाचून काढली.
का लिहिली जातात पुस्तकं हा माझा आवडता उंगली करण्याचा प्रश्न
आहे. आणि त्यातही स्वतःच्या त्रासदायक अनुभवांची पुस्तके बनवावीत आणि छापली जावीत
असं का करतात लोक? हे आहेच, कि असं करताना आशावादी कोंभ पेरले जातील ह्याची काळजी
घेतली जाते. आणि त्यामुळे पुढच्यास दुःख मागच्यास प्रेरणा ह्या न्यायाने आपण
युटीलिटी शाबित करू शकतो. पण वर मी म्हणतो ती पुस्तकं अशा प्रेरणेच्या फेरीवाल्यांची
नाहीत. इट्स अ स्टोरी टेलिंग: अशी गोष्ट जिसमे बतानेवालाभी ट्रबल्ड और सुननेवालाभी
ट्रबल्ड. का?
मला कुठलाही समीक्षेचा निकष उभा करायचा नाही. ज्याने त्याने
आपापला च्युतापा (वाचा: अभिव्यक्ती स्वातंत्र्य) करावे, अगदी डोळ्यास डोळा
न्यायाने करावा असे माझे सध्याचे मत आहे. त्यामुळे वर म्हटलेली स्टोरीटेलिंग चूक
का बरोबर, असावी का नसावी असा प्रश्न नाही.
राजकारण हा लबाडांचा शेवटचा अड्डा असतो असं म्हणत आले आहेत. (ही
म्हण पाश्चात्य असल्याने ती बदलून राजकारण हा विकासपुरुषांचा शेवटचा पाडाव असतो
अशी म्हण लागू करण्यात यावी अशी मागणी आलेली आहे!) त्याप्रमाणे लिखाण हा बाकी
भौतिक जगातील स्पर्धा, साठवण आणि पुढील पिढीत पाठवण हे नीट न करू शकलेल्या लोकांचा
शेवटचा अड्डा असतो काय? आणि समीक्षा हा स्पर्धेत उतरलेल्यांचा आणि पुढे-मागे कुठेच
न जाता येणाऱ्यांचा?
इट इज सिनिकल टू थिंक लाईक धिस.
मी सेपिया लीव्हज वाचलं कारण मी ‘एम अँड द बिग हूम’ वाचल्यावर ते
वाचा असं अॅमेझॉनने सुचवलं. मला मानसिक आजारांवरची पुस्तके वाचायची आहेत असं
बहुतेक अॅमेझॉनने ठरवलं असावं. कारण ‘सेपिया लीव्हज’ नंतर मला अशीच ४-५ पुस्तके
सुचवली गेली होती. ‘एम अँड द बिग हूम’ वाचताना आपल्या अंगावर फार काही येत नाही.
गोष्टीतील रंजकता न घालवता ती येते. बघायला गेलं तर ‘एम अँड द बिग हूम’ आणि ‘सेपिया
लीव्हज’ दोन्हीत मुलगा आपल्या मानसिक आजाराने त्रस्त आई, आणि ह्या संदर्भाने
वेढलेले मोठं होणं ह्याबद्दल बोलतो. आणि दोन्ही गोष्टी मरणाशी संपतात. पण त्यांचा
बाज एकदम वेगळा आहे. म्हणजे हि निवडच आहे कि माझा अनुभव स्वतःला विस्कटवून मांडणार
आहे. स्वतःला विखरायची, चिंध्या चिंध्या करत जायची ओपन एन्डेड अर्थहीनता. आपण एक
प्रकारे ती एन्जॉय करतो का?
‘रोल ऑफ ऑनर’ मी वाचलं ते त्याच्या प्लॉटच्या समरी वरून. ‘सेपिया
लीव्हज’ आणि ‘रोल ऑफ ऑनर’ हे एकाच माणसाच्या वेळेचे आणि त्या वेळेच्या घाव-व्रण-खाणा-खुणांचे
छोटे-मोठे तुकडे आहेत. अर्थात रोल ऑफ ऑनर अधिक गोष्ट आहे आणि सेपिया लीव्हज अधिक
जास्त मेमॉयर. ‘रोल ऑफ ऑनर’ ला पंजाब हिंसाचार, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधी
हत्या अशी तगडी पार्श्वभूमी आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर सैनिकी शाळेत शिकणाऱ्या
एका १५-१६ वर्षाच्या मुलाच्या शाळेतल्या शेवटच्या वर्षाची गोष्ट. इट्स बेटर रीड,
पण ते खिळवून ठेवतं म्हणून नाही. ते थोड्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोलतं म्हणून
बरचसं.
एक त्रास आणणारा प्रामाणिकपणा असतो. ‘नाही जमत मला, नाही बदलणार
मी स्वतःला, नाही स्वीकारणार मी काही एक पर्याय’ असा. तो नकारात्मक नसतो एक्झॅटली.
त्यात एक स्वीकार असतो, काहीही न निवडण्याच्या भूमिकेचा आणि आपसूक स्वतःकडे काहीही
नसण्याच्या रिकामेपणाचा. आणि हा रिकामेपणा दडवायचा काहीही प्रयत्न न करता येणारा
प्रामाणिकपणा. हा प्रामाणिकपणा एक प्रकारे आक्रोश असतो जगाच्या नियमांविरुद्ध, स्पर्धेच्या,
स्वतःचे हित बघण्याच्या, निब्बर होण्याच्या, बहुतेकांसारखे असण्याच्या. पण तो
आक्रोश सुद्धा केविलवाणा नाही, उर फोडणारा नाही, नुसताच एकटा उभा असलेला.
संधूंच्या दोन पुस्तकांबद्दल असं म्हणता येईल.