Friday, February 28, 2014

शिळी कढी आणि रिकामचोट टाहो

      टाहो फोडणं हा आपला आवडीचा उद्योग आहे, किंबहुना जन्मजात जोपासलेली सवय. आणि एकाने फोडला की त्याला जोड देणारे टाहो किंवा त्याचा कसा फोल असा टाहो फोडणं हा पण. आणि असे टाहो फोडून जीव सुकला की त्याला अभिमान किंवा तत्सम थोर गोष्टींची कलमे लावणे. तर अशा आपल्या रुढीला अनुसरून आपण आज मराठी भाषेविषयी टाहो फोडूया आणि सरतेशेवटी अभिमान वगैरे व्यक्त करून आपापल्या वाटेला लागुया.
       तर काल रात्री मराठी भाषा माझ्या स्वप्नात आली. मी उशाशी किंडल ठेवून झोपतो. आणि त्यात एक इंग्लिश पुस्तक वाचत झोपलो होतो. तिने आधी मला थोबाडीत मारली आणि मग तिने टाहो फोडला. सकाळी उठून पाहतो तर ह्या दृष्टान्ताशी जुळणारे काही पेपरात, फेसबूकात.  
       मग तर मी अख्खा थरकापलो. म्हणजे एवढं आध्यात्मिक वगैरे पोटेन्शिअल असलेली भाषा आणि ती अशी दुःखी. अरं, रं, रं. आणि का तर म्हणे ती मृतप्राय होत आहे, इंग्लिश का इंग्रजी का आंग्ल भाषा तिच्यावर चहू बाजूने आक्रमण करून राहिली. लहान-लहान मुले इंग्रजी माध्यमात जाऊन राहिली. आणि ही लहान मुले पुढे मराठी कशी बोलतील ह्या विवंचनेने ही भाषा आज मरू लागली. टाहो, टाहो, थोर टाहो.
       छोट्या छोट्या शहरात इंग्लिश स्पिकिंग येऊन राहिलं. बीजगणित-भूमिती जाऊन अल्जिब्रा- जॉमेट्री आलं. आता कसं ह्या भाषेत संशोधन होणार? अमृताशी पैजा घेणारी ही भाषा, आता सोलकढी आणि मसाला ताकावर तरी पैजा घेईल का? टाहो, टाहो.
       एवढे सगळे टाहो अंगावर घेऊन मी बेभान इतस्ततः पळू लागलो. आणि रस्त्यावर आलो. तिथे रिक्षावाले हिंदी बोलून राहिले, भाजीवाले हिंदी बोलून राहिले, ऑफिसात इंग्रजी. मराठी कुठे, मराठी कुठे?
       मराठी दुबईत, मराठी कॅलिफोर्नियामध्ये, मराठी विले-पार्ले मध्ये, मराठी सदाशिव पेठेत. अशी कशी आकुंचन पावली ही बहुप्रसवा, प्रसरणशील भाषा. अशी कशी लोपू लागली ही संस्कृतोद्भव आणि प्राकृतोत्सव प्राचीन भाषा?
       आता तर माझी पुरती सटकली आणि मी नंगा होऊन सरकार समोर उभा राहिलो. अरे भिकारड्या, का तू अशी तुझ्या आईची दैना करतो असा आक्रस्ताळा आक्रोश करू लागलो. सरकार शरमिंदे होऊ लागले, त्याचा जीव कासावीस झाला, अरे इथे पाणी पुरेना, वीज टिकेना, शेती होईना, उद्योग चालेना, आणि हे तू कुठे नवे गाऱ्हाणे आणतो राजा.
       कुठे जायचं आता? मायबाप सरकारने असे बोलून लाथ मारली. आता कुठे, आता कुठे?
       तेवढयात कोणीतरी माझ्या अंगावर घोंगडी टाकली आणि मला बलदंड उचलून, माझा श्वास कोंडेस्तोवर उचलून एक कोपऱ्यात आणून टाकले. मी बेशुद्ध होतात्से शेवटचा चेहरा पाहिला तर तो मराठी चित्रपट निर्माता वाटू लागला. बेहोश.
---
       माझी बायको मला गदागदा हलवून उठवत होती. तिचा भयचकित चेहरा पाहिला आणि मग आजूबाजूला पाहिलं तर मी रातोरात टेबलावर येऊन हे सगळं वरचं खरडून ठेवलेलं. तिने पाणी आणलं. मला शब्द फुटेना, माझी मराठी भाषा माझ्या तोंडातून वदली जाईना. बायकोने लिहिलेलं सगळं वाचलं आणि फाडून फेकून दिलं. मग म्हणाली, दूध आण, कॉफी करू.
--
       कॉफी प्यायली, नाश्ता केला आणि भाषेच्या सखोल विवंचनेत बाहेर पडलो. मध्ये एक मित्र भेटला, फिजिक्स पी एच. डी. ,आत्ताच लघुरुद्र आटपून आलो घरी, चल चहा घेऊ.
       मी त्याला माझे स्वप्न सांगितले, तर म्हटला अरे मलाही काल असेच स्वप्न पडले. पण त्यात मराठी भाषा येऊन म्हटली की उद्या तुला तुझा रड्या मित्र भेटेल, लक्ष देऊ नको, त्यापेक्षा मॉलमध्ये जा, मराठी पिक्चर बघ.
       टू मच. थट्टा करू नकोस.
       चल मी निघतो. शो आहे ११.३० चा.
--
       मी दिग्मूढ तिथेच थांबलो. तो अजून एक मित्र आला. हा मराठी सिरीयलची कामं करतो. तो म्हणाला दोन नव्या असाइनमेन्ट आहेत, बीटा मराठी नावाचा चॅनेल येतोय, आणि ते दोन नव्या अतिमालिका आणतायेत. अतिमालिका, काय हे? हो अरे, दर अर्ध्या तासाने भाग. आणि मधल्या अर्ध्या तासात? म्हणून तर दोन आहेत ना अतिमालिका, च्युत्या आहे रे तू, म्हणून तो परत हसला.
----
         नाही, नाही, असं भरसट उपयोगाचं नाही. थोडं चिंतनपर झालं पाहिजे. उत्तरे नसलेले खोल प्रश्न खेळवले पाहिजेत.
       सरकार मराठी भाषेसाठी काय करतं किंवा करत नाही? त्या खालचा प्रश्न, सरकारने भाषेसाठी वगैरे काही करायचं असतं का?
       हे सगळं कोण म्हणत असतं? ह्या विवंचना कोणाच्या? ते जे कोण लिहिणारे असतात ते किंवा रिकामचोट पेन्शनर. कदाचित ते लिहून फार श्रीमंत होत नाहीत ह्याची खुजली ते भाषेसाठी रडं मांडून करत असावेत. खवचट झालं थोडं, नव्हे पूर्णच. पण ह्यातले बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांत किंवा सरकारी पैशाने चालणाऱ्या उपजीविकेत का असतात? जसा मी. गर्दुले, हॉटेल चालवणारे, पार्टटाईम नोकऱ्या करून लिहिणारे, गुंडाई करणारे मराठीत पुस्तकं छापत असतील ती कुठे मिळतात?
       भाषा आणि साहित्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध? भाषा आणि लिपी ह्यांचा? भाषा आणि एक्स्प्रेशन्स ह्यांचा? माणसांनी एकमेकांशी बोलणं, सांगणं, भौतिक आणि मानसिक समाधान मिळवणं ह्यापलीकडे भाषेचं पर्पज काय? आणि मग ह्या समाधानाची साधने कमी-जास्त प्रमाणात कालबाह्य होतात, जसे हातपंखे, मेणबत्या, बोरूची लेखणी, भूर्जपत्रे, दगडी हत्यारे, मण्यांची पाटी, चाळी, वाडे तर भाषा का नाही? भाषेला आयडेन्टिटी म्हणून बघणं आणि त्याचवेळी अशा आयडेंटिटीच्या, म्हणजे जात, धर्म, देश अशा प्रकारांकडे साहित्यातून नकारात्मक बघणं हा दुटप्पीपणा नाही का? एकीकडे लिहिण्याला कमोडिटीजचे नियम लावायला धडपड करायची, त्याचं मार्केट हवं असं म्हणायचं आणि त्याचवेळी सरकारने ह्या कमोडीटीच्या उत्पादकांना गोंजारत राहावं असं गाऱ्हाणं करायचं, पण असं मागू किंवा करू पाहणाऱ्या बाकी जगाकडे कुत्सित तात्विक हिनतेचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नजरिया ठेवायचा हा दुटप्पीपणा नाही का? का हे स्वातंत्र्य? मग भाषेला मारायचं किंवा हवं तसं तिचा वापर करायचं किंवा न करायचं हजारो-लाखो लोकांचं स्वातंत्र्य आहे ते?
       मला दिसतं की माझ्या लेखी शब्द, भाषेचे नियम हे केवळ माध्यम आणि साधन आहे, मला जे सांगायचं आहे त्या एंडसाठी. त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर आणि मला सांगून काय करायचं आहे त्याच्यावर माझं माध्यम आणि साधन ह्यांचा वापर अवलंबून राहील. माध्यम-साधन जपावं असा भावनिक च्युत्यापा हा सगळ्यांनी करावा ह्या टाहो फोडण्याला काय म्हणणार? का दुर्लक्ष करणार?
--
       मला स्वतःला इंग्लिश आणि मराठी ही इनकॉम्पॅटिबल निवड वाटते, म्हणजे मला एक्सप्रेस करण्याच्या दृष्टीने. मी जेव्हा सतत मराठीत लिहितो, तेव्हा स्वाभाविक माझ्या डोक्यातला त्याबद्दलचा विचार, त्यातल्या प्रतिमांमध्ये वापरली जाणारी भाषा ही मराठीच राहते. पण गणित, इकोनॉमिक्स ह्या विषयांच्या बाबतीत माझे विचारच मुळात इंग्लिशमध्ये होतात, ते मराठीतून मी करूच शकत नाही, जरी शाळेत मी हे विषय मुळात मराठीत शिकलो आहे. मुद्दा असा आहे की आपले मेंटल रीसोर्स मर्यादित आहेत, आणि मग ते कुठे द्यावेत ह्याची निवड आपण केली पाहिजे. आणि जर ते आपण कमी भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकू इच्छित असू, तर त्यासाठी लागणारी तयारी ही डिसिजन घेणाऱ्या माणसांत हवी. आणि ज्यांत ती नसेल, ते आपले रीसोर्स स्वाभाविकपणे अधिक भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकणार, ही एक रॅशनल निवड आहे. हे सगळं रीझनिंग अर्धवट झालं आहे, पण मला कोणी विचारलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू मुलाला का मराठी तर मी इंग्रजी सांगेन.
       मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असलेले विद्यार्थी मराठी उरत नाहीत हा हायपोथिसिसच एक जोक आहे. आई-वडील घरात काय करतात, बोलतात, वाचतात ह्यावरून मुलाच्या भाषिक आवडी-निवडी ठरतात असं मला वाटतं. शाळेची निवड ही भाषा, आत्म्याचा विकास, मूल्यशिक्षण, संस्कृती अशा जड ओझ्यांनी न करता उपजीविकेचे उत्तम प्रशिक्षण एवढ्या एकाच उद्देशाने करावी, उपजीविका उत्तम असली की बाकी साऱ्या दगडांना शेंदूर लावता येतो, नुसते दगड कोणालाच पावत नाहीत.
       मराठीचा टाहो फोडताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर शरसंधान करणारे लोक काही दिवसांनी ‘भाषिक लव्ह जिहाद’ बद्दलही बोलतील. मग, तेही आपण दुर्लक्षून घेऊ.
--
       मराठीत सारस्वत किंवा साहित्यिक वर्तुळात (खाजखुजली वर्तुळ म्हणावं असं मला वाटतंय, पण त्यात माझा केवळ द्वेषाचा भाग असेल) नामवंत होऊ घातलेल्या एका माणसाशी बोलताना त्याने अशी सांख्यिक तुलना केली की मराठी भाषिक अमुक एक करोड आहेत, त्यात वाचनालयांचे सभासद किती, त्यातून एका पुस्तकाच्या किती प्रति विकल्या जाऊ शकतात असा सगळा अंदाज बांधला होता. हा प्रश्न माझ्या डोक्यात राहिला, की करोडो लोक कशी-बशी किंवा चांगली जी भाषा बोलतात त्यात वाचणारे किती, कोण.
       एका राष्ट्रीय इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना, सायन्स, एम,बी,ए. नाही, तर इकोनॉमिक्स, मी एकटाच होतो जो १०वी पर्यंत पूर्णपणे प्रादेशिक माध्यमात शिकला आहे (व्हर्नाक्युलर). मला माझ्या इंग्रजीवर पूर्ण कमांड नसल्याचा त्रास दोनदा झाला, एकदा आय.आय.एम. चे जी.डी. देताना (आता ते बंद झालेत L) आणि नंतर अॅनॅलिटिक्स मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे इंटरव्ह्यू देताना जेव्हा थोडे सेल्फ एक्स्प्रेशन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. माझ्याकडे शब्द असले तरी उच्चार आणि युसेज ह्या दोन गोष्टीत इंग्रजीमध्ये मी कच्चा आहे. आणि मला वाटतं ह्याचं कारण माझी निवड आहे. मी इंग्रजीवर फोकस करेन, तर मी मराठीवरची ग्रीप सोडेन आणि जर मला मराठीत लवचिकपणे, हवं तसं लिहायचं आहे तर आपोआप माझा फोकस इंग्रजी वरून हटेल. मला दुसरी भाषा कळणार नाही असं नाही, पण माझी एक्स्प्रेशनची भाषा एकावेळी एकच राहू शकते, जरी चालून जाण्याइतपत कोणी कितीही भाषा बोलू शकेल. कदाचित ही माझी लिमिटेशन आहे. पण मला कायम हा कमांडचा इश्यू जाणवला आहे. माझे काही बंगाली मित्र आहेत, ते बंगाली व्यवस्थित बोलतात, पण त्यांची बेस्ट एक्स्प्रेशन्स ते इंग्लिश मध्येच देऊ शकतात. कदाचित त्यांचा नजरिया डेव्हलप होण्यात मुख्य आधार इंग्लिश पुस्तके, सिनेमे, वृत्तपत्रे, शिक्षक हा असेल, म्हणून असं असेल. अमर्त्य सेन ह्यांचं संशोधन ते बंगाली किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये करू शकले असते असं मला वाटत नाही. कदाचित हे सगळं एकदम वैयक्तिक आणि चूकच असेल. पण मला भाषा हा प्रकार सिरीयसली महत्वाचा वाटतो, एस्पेशली त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी स्वतःची एक्स्प्रेशन्स, वैचारिक-भावनिक हा जगण्याचा आणि उपजीविकेचाही मुख्य आधार आहे.
       परत त्या वरच्या साहित्यिक प्रश्नाकडे. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मला जाणवलं की सारेच उच्चडिग्रीत प्रोफेसर्स हे काही चांगले रीडर्स नाहीत. काहीजण काहीच वाचत नाहीत, काहीजण प्रसिद्ध आणि रंजक लिखाण वाचतात, काहीजण काहीही वाचतात, तर काहीजण सिरीयस, निवडीने वाचणारे आहेत. विद्यार्थ्यामध्येही असंच डिस्ट्रिब्यूशन आहे.
       पण भाषेच्या बाबतीत डिस्ट्रिब्यूशन वेगळं आहे. जे यशस्वी, क्वांटीटी आणि क्वालिटी दोन्हीपैकी कोणत्याही एका निकषावर, आहेत त्यांची भाषेवर कमांड आहे. ते त्यांना हवं ते एकदम नीट सांगू शकतात. कदाचित हा सोशल सायन्स रिसर्च आणि टिचिंगचा एक भाग असेल, पण भाषा इथे एक मुख्य घटक आहे, जरी प्रोग्रामिंग हा वेगाने मुख्य घटक बनत असला तरी.
       मुद्दा असा की वाचन, वाचनाचे प्रकार आणि भाषेची कमांड आणि तिचा वापर हे फार काही निगडीत घटक नाहीत. वाचल्याचे भौतिक फायदे किंवा भाषेवर ग्रीप यायला होणारे फायदेही फार सिद्ध करता येण्याजोगे नाहीत. भाषा ही मूलतः विचारांशी निगडीत आहे, आणि जो नीट विचार करू शकेल तो आपोआपच नीट बोलू शकेल, तो वाचक वगैरे असणं अजिबात जरुरीचं नाही. अगदी लंगोटाला हात घालून म्हणायचं झालं तर मृत्युंजय वाचणारा, कोसला वाचणारा आणि केवळ व्हॉटस् अॅप करणारा ह्यातल्या कोणाची मराठी भाषा (व्यक्त होणं ह्या निकषावर) चांगली असेल हे काही सांगता येणार नाही.
       वाचणारे मनोरंजनासाठी, आपला तळीराम शांत करायला वाचतात, लिहिणारे त्यासाठीच लिहितात. बाकी सारी नंतर लावलेली भरजरी ठिगळं.
       पण ह्या मनोरंजनात बौद्धिक रीसोर्स गुंतवावे लागतात, थोडा फोकस लागतो, आणि बौद्धिक स्वरुपाची किक यावी लागते. माझ्या मते हे सर्वांना नसतं, जसं प्रत्येकाला फुटबॉल एन्जॉय करता येणार नाही, कबड्डी, गोल्फ, क्रिकेटही नाही, तसं.
       प्रत्येक लोकसंख्येत एका ठराविक प्रमाणात हे बौद्धिक मनोरंजन करून घेऊन शकणारे लोक असणार. मराठी भाषिक लोकसंख्येतही असणार. मग जर मराठी भाषिक करोडो आहेत, तर हा गटही मोठा असेल ना. असेल, नक्कीच.
       पण त्याच्या रिडरशिप बनण्याच्या वयात तो अशा ठिकाणी असतो जिथे त्याच्या वेळेवर प्रचंड ताण आहे, म्हणजे इंजिनिरिंग किंवा मेडिकल किंवा सी.ए. किंवा आर्किटेक्ट किंवा भरपेट पगार देणारी लाईन. तो आर्ट्स करायचे चान्स कमी. मी इथे स्पष्टपणे हा असं म्हणतो आहे की शाळेतील टक्केवारी ही एक वर्गवारीची  योग्य सिस्टीम आहे. त्यातून बौद्धिक रीसोर्स कसे वाटले गेले आहेत हे काही ना काही प्रमाणात दिसतंच. त्याचे अपवाद सिद्ध होऊ शकतात, पण ह्या ट्रेण्डला तोडणारा ट्रेण्ड सिद्ध होणार नाही. त्यामुळे ह्या टक्केवारीवर पुढे त्यांचे होणारे वर्गीकरण हे वाचनाच्या प्रमाणवर प्रचंड प्रभाव पाडते.
       माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मला प्रचंड मोकळा वेळ असे,पण तेच जर मी इंजिनीअर वा डॉक्टर होत असतो तर हा वेळ मला मिळाला नसता. माझं वाचन डेव्हलप करणं मला कठीण झालं असतं. त्याचवेळी माझ्या सोबतचे बहुतेकजण एवढं काही वाचत नसत. लायब्ररी तर होती, त्यांना वाचायचं नव्हतं.
       थोडक्यात वाचन हे सवय म्हणून डेव्हलप व्हायची क्षमता असलेले शिकायच्या वयात लोक अशा ठिकाणी जातात जिथे ही सवय डेव्हलप व्हायची मुभा कठीण असते. त्यामुळे एकदम गरम डेडीकेटेड गटच वाचतो, बाकी नाही.
       आणि त्यातही जे वाचू लागतात, त्यांना इंग्रजी नावाचा अफाट प्रकार खुला होतो.
       इथे एक फरक मला जाणवतो. गुजराथी पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं आणि जर्मन पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं ह्यात फरक आहे. गुजराती पुस्तक, जे गुजराती भूगोलाशी निगडीत आहे असं धरून चालू, त्या भूगोलाशी माझी स्वाभाविक जुळवणी होऊ शकते. पण तसं जर्मन पुस्तकाशी होणार नाही. पण तेच जर्मन पुस्तक इंग्रजीत वाचतांना हे अंतर बरंच घटतं. सगळ्या भाषा काही एकमेकांना जुळत नाहीत, सांबार इडलीबरोबर जुळतं आणि बिर्याणीबरोबर नाही तसं, ह्यात सवय किती आणि तथ्य किती!
       पण इंग्रजीमध्ये जी एन्टरटेनमेन्ट आहे ती मराठीत नाही, भाषांतराने आली तरी मग ती तोकडी उरणारच. आणि सिरीयस रीडिंग ग्रुप हा एन्टरटेनमेन्टशी जुळून येतो. इथे एन्टरटेनमेन्ट म्हणजे गॅंगस् ऑफ वासेपूर किंवा कहानी, बोलबच्चन नव्हे. म्हणजे आता मी हा जो एवढा बौद्धिक गांजा मारून राहिलो आहे त्यानुसार जेव्हा मराठी लिखाणाच्या एन्टरटेनमेन्टची कुवत आणि निर्मिती वाढेल तेव्हा त्याचा सिरीयस वाचक वर्गपण.    
---
       एवढी झोकली. आता गरगरू लागलं.
       ही एवढी इंग्रजीची सावली पडली, त्यांत उपजीविकेचा खंदा दणकट कुत्रा अंगावर सोडलेला, आणि मराठीचं मांजर असं म्यांव म्यांव करत सरकारी दूध शोधत हिंडतय, माझ्या पायाशी येतंय, मी उगाच कसनुसा होतोय आणि मग सगळे न बोलून शहाणे मजकडे  बघून किंवा न बघून म्हणतात, नया है वह.

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...