हा प्रकार एंटरटेनमेन्टसाठी नाहीच. हा खूप सिरीयस अटेम्प्ट आहे एका
भयंकर गोष्टीविषयी सांगायचा. अशा बाळबोध शब्दांत बोलाण्यावाचून आपली ‘जात’ या
प्रकारातल्या कुठल्याही एक्स्प्रेशनबद्द्दल बोलायची औकात आहे माझी असं मला वाटत नाही.
पण दिग्दर्शकाने शेवटला
भिरकावलेला दगड नेमका कोणालाच न लागता एका कोरड्या बनू लागलेल्या होलमध्ये पडून
राहील का काय असं वाटतं. असलं भरताड काही वाटण्याची संधी दिल्याबद्दल खरंतर माझ्या
सहप्रेक्षकांचा मी आभारी आहे.
माझ्या शेजारी तीन मित्र
सिनेमा बघायला बसले होते. त्यातले माझ्या बाजूचे गुटखा खाऊन बसल्या सीटसमोर थुंकत
होते. मी एकदा त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी मला टाळी मागायला हात पुढे केला.
त्यांच्या बाजूला सिनेमाचा रिअल टाइम आणि लाउड समीक्षक बसला होता. आणि त्याच्या
बाजूला ह्या तिघांमधला जास्तीत जास्त इम्बरेस झालेला मित्र.
पिक्चर सुरू झाल्यापासून
५व्या मिनिटाला समीक्षक सुरू झाले. गुटखापंत त्यांची री ओढू लागले. ते दोघे अनावर
झाले की तिसरा त्यांना थोडा हटकायचा. प्रत्येक समीक्षेच्या आधी आई किंवा बहिण
किंवा शरीराचे अवयव ह्यांची याद स्मरून समीक्षा केली जायची. मी गुटखावाल्याला
ह्याचं कारण विचारलं.
शाळा, टाइमपास ह्यांचा
पुढचा भाग वाटावा अशी लव स्टोरी पहायला आलो आम्ही. पण इथे नुसती सकाळ,
दुपार,संध्याकाळ, हागणं आणि मुतणं. कसला पिक्चर आहे हा.
बाकी थेटरातले बोलत नसले
तरी इंटरव्हलला कुजबुज सुरू झाली. कसला पिक्चर आहे हा, कुठली लव स्टोरी, कोण गलपटत
नाही, ‘नया है वह’ नाही, काय आहे हे, गाणं कुठंय, ११० रुपयाचं (तिकीटाची किंमत)
गाणंच आहे, ह्यापेक्षा गुंडे पाहिला असता, असं.
दुसराही गट होता, ज्याला
दिग्दर्शक काय दाखवायला बघतोय हे उमजत होतं, पण ते दिग्दर्शकाच्या डिस्क्रिट
धाटणीने थोडे त्रस्त झाले असावेत. स्टोरी इंटरव्हलपर्यंत कसलाही अदमास देत नाही,
कसली ग्रीप पकडत नाही.
--
कोणकोणत्या प्रकारचे लोक
हा किंवा कुठलाही सिरीयस काही बोलू इच्छिणारा चित्रपट बघत असतील? मुळात सिरीयस
काही सांगू पाहणाऱ्या सिनेमाला ह्या चित्रपटाला मिळालं तेवढं वाईड रिलीज मिळतं का
हाही भाग आहे. जसं ‘देऊळ’ हा सिरीयसली काही सांगू पाहणारा प्रकार होता, पण लोकांना
त्यात निवड होती. म्हणजे तो विनोद, सटायरच्या अंगाने जाणारा असल्याने एकतर तेवढंच
घ्यायचं किंवा मग अजून सखोल, सटल काही बघण्याचा प्रयत्न करायचा. तसं काही इथे घडत
नाही. असो. मूळ प्रश्नाला येऊ. कोण कोण बघत असतील? टिश्यू पेपर अप्रोचवाले,
स्वतःची सिरीयस प्रेक्षक अशी इमेज ठेवू पाहणारे (म्हणजे जसा मी) आणि अजून काही,
म्हणजे अजून नेमके कशात आहेत हे डीफाइन न करता येण्याजोगे. हा शेवटचा गट जरा
इंटरेस्टिंग आहे.
मी कॉलेजात असताना
एन.सी.पी.ए. ला फुकटात सत्यजित रेंची ‘अपू त्रयी’ दाखवली जाणार होती. पहिल्या
दिवशी श्याम बेनेगल बोलले, सत्यजित रे ह्यांच्या दिग्दर्शनाबाबतची एक फिल्म दाखवली
गेली आणि मग मुख्य फिचर. त्या आधी वेगळा असा कोणता चित्रपट पाहिला होता तर तो
म्हणजे ‘ब्लॅक’. बाकी रामगोपाल वर्मा, लगान आणि बाकी. म्हणजे तेव्हा मी वर ज्याला
इंटरेस्टिंग म्हटलंय त्या गटात होतो. आणि आता मी थोडं स्वतःला एकीकडे सरकवलं आहे.
पण असं सरकण्यात वेगवेगळया चित्रपटांचा, पुस्तकांचा वाटा आहे.
त्यामुळे सिरीयस सांगू
पाहणाऱ्या चित्रपटाचं एक चांगलं मोजमाप म्हणजे तो अशा किती लोकांना इकडून तिकडे
सरकावू शकतो. हे सरकणं दोन गोष्टींवर अवलंबून आहे असं मला वाटतं, मुळात सरकायचा
वाव किती आहे आणि कलाकृतीची क्षमता किती आहे. ह्या दोन्ही गोष्टी काही एकदम
काटेकोर मोजता येण्याजोग्या नाहीत. पण आपण त्यांच्याबद्दल काही ना काही अंदाज ठेवू
शकतो.
एक उदाहरण पाहू. ‘रंग दे
बसंती’ हा असं सरकवायची क्षमता असलेला चित्रपट आहे असं म्हणता येईल, म्हणजे मला
वाटतं, मी अनुभवलं म्हणून. त्यातले देशभक्तीचे धडे किंवा जे काय ते नेमकं काय आहे,
किती ठोकळेबाज आहे किंवा खरंच असं व्हावं का ह्याचा खल करण्यापेक्षा तो हे प्रश्न पाडतो
तिथेच तो वेगळा आहे. आता ह्या चित्रपटाचा शो संपल्यावर, इमोशनली चार्ज अवस्थेत
असताना असा डायलॉग ऐकू आला तर, ‘क्या एक एक जॅकेटस् पेहने थे अमीर खानने!’ तर? असं
ज्याला म्हणायचं आहे तो कसा चूक-बरोबर किंवा जस्टीफाईड आहे असं काही आपलं म्हणणं
नाही. पण ह्या उदाहरणातून दिसू शकतं की प्रोसेस दोन्ही बाजूंनी चालते.
मला प्रोसेसच्या
कलाकृतीकडे बघण्याच्या एंडला काय आहे ह्यात स्वारस्य आहे. माझ्या आवडत्या
पेसिमिस्टीक कोनातून बघणारे गाढव होत चाल्लेत, त्यांना कशाची पडलेली नाही, इतक्या
संवेदनशील विषयावर चित्रपट असेल तर त्यांची समजायची लायकी नाही असं हुंदके द्यायला
खरं मला आवडेल. पण असं नाहीये, आणि मला असं वाटत असेल तर तो माझ्या बघण्याच्या
रोखाचा इश्यू आहे.
मी कल्याणमध्ये चित्रपट
पाहिला, तो गोरेगावात पाहिला असता तर, किंवा कोल्हापुरात, किंवा पुण्यात किंवा
अमेरिकेत, तर मला आजूबाजूचे आवाज कसे कसे ऐकू आले असते?
मी अमुक एक जातीत
जन्माला आलो, मी त्याशिवाय वेगळया जातीत, त्यातही गावांत, त्यातही जात-पात
मानणाऱ्या आणि पाळणाऱ्या गावांत वाढलो असतो तर मला काय वाटतं, किंवा दिसतं?
भले मी जात मानत नसेन,
म्हणजे असं मानणं न मानणं ह्याला काही अर्थ आहे असं नाही, पण मी त्याचे
प्रीव्हीलेजेस तर उपभोगतोच आहे. ह्याचं काय, त्याचं काय एवढी खाजवाखाजवी करायला
मिळणारी स्पेस हाच मोठा प्रिव्हिलेज आहे. आणि त्यात कुठेतरी मी ज्या गोष्टीला न
मानण्याचा प्रयत्न करतोय त्याचा वाटा आहेच. सो थोडे जड निकष लावले तर मी या
सगळ्यावर बोलायला इलिजिबल नाहीच.
--
पण मलाही कुठेतरी हा
भिरकावलेला दगड लागलेला आहे. कुठे लागलाय नेमका? का मी बघितलं तेव्हा थेटराच्या
अंधारात कोणाचंच तो दगड लागल्याचं विव्हळणं मला जाणवलं नाही हे मला लागलंय? का मला
लागलं नाहीये, तर बरं वाटतंय की असं काही लिहून मी माझी जपवून वाढवलेली एक
आयडेन्टिटी शाबित करू शकतो.
काही महिन्यांपूर्वी मला
जात प्रकाराबद्दल लिहायचं होतं. ८-९ पानांच्या पुढे मला काही लिहिता आलं नाही. न
लिहिता येण्यामागे दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे या विषयावर जे काही फंडामेंटल
लिखाण आहे ते मी फारसं वाचलेलं नाही, आणि दुसरं म्हणजे ह्या विषयाने येणारे कोणतेच
चटके मी भोगलेले नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की मी जात ह्या विषयावर काही
बोलायला, लिहायला पाहणं म्हणजे अनेकांच्या भोगलेल्या अनुभवांच्या टाळूचं लोणी
फुकटात खायचा प्रकार. मी न बोलता अपराधी भाव मनात जपणं हेच जास्त बरोबर.
काही अनुभव नाहीत हेही
बरोबर नाही, आणि माझ्या परीने माझ्या आजूबाजूंच्या जातीय वर्तनाला मी तोडू
पाहिलेलं नाही हेही खरं नाही. पण जे आहे ते अगदी निरुपयोगी तोकडं आहे.
n ---
हा मी अगोदर केव्हातरी
लिहून ठेवलेला भाग.
मला मी अमुक एक
जातीचा आहे असं साधारण ७-८व्या वर्षी कळू लागलं. म्हणजे मला घरातून कोणी मुद्दामून
जात वगैरे काय असतं हे सांगितलं असा भाग नसावा. माझी शाळा, मी राहतो तो शहराचा भाग
यांतून मला कळलं असावं की माझी अमुक एक जात आहे. किंवा कदाचित कोणाच्यातरी लग्नाची
वगैरे हकीकत ऐकताना मला कळलं असावं. मला आठवतं की शाळेत एकदा वर्गातल्या सगळ्या
मुला-मुलींच्या जाती-पोटजाती काय हे विचारायचाही मुला-मुलींचाच (अर्थात अनौपचारिक) कार्यक्रम झाला होता.
त्यातल्या काही जणांना ठाऊक होत्या-काही जणांना नाही. शाळेत कॅटलॉगवर प्रत्येकाच्या
नावासमोर हिंदू आणि जात असं लिहिलेलं असायचं.
ह्या तशा फार मागच्या
किंवा अफार काही सिरीयस नसलेल्या गोष्टी झाल्या. मी माझ्या जाती बाबतचं , आणि माझं
मी अमुक एक जातीचा आहे याबाबतचं, जातीव्यवस्थे बाबतचं असं माझं एक मत आणि त्याला
अनुरूप वागणं बनवलं पाहिजे असं मला फार नंतर वाटायला लागलं. पहिले मी थोड्या
अशा-तशा इकड-तिकडच्या गोष्टीच सांगणार आहे. मग मला हळूहळू मला नेमकं काय म्हणायचंय
किंवा मला नेमकं काय म्हणता येत नाहीये हे नेमकं सांगता येईल.
मी थोड्या दिवसांपूर्वी
‘शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ बघायला गेलो होतो. मी आधी ते नाटक
मुंबईत, कफ परेडला, एन.सी.पी.ए. च्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात पाहिलं. किंवा कदाचित
तिथल्या प्रेषक वर्गात नाटकात सातत्याने डोकावणाऱ्या जातीयतेवरच्या टीकेचा फारसा
प्रतिसाद उमटत नव्हता. मग मी तेच नाटक कल्याणमध्ये पाहिलं. तिथे नाटकाला एक गट
आला होता. तो नाटकात एका ठराविक जातीवरच्या
टीकेचा भाग आला की जोरदार आवाज करायचा.
जातीयतेच्या विरुद्ध
असणारा, मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळींत हिरीरीने सहभागी असलेला माझा एक मित्र
आणि मी एकदा आंतरजातीय विवाहाबद्दल बोलत होतो. मुद्दा हा निघाला की प्रेमविवाह
असेल तर तो जातीय निकषावर ठरला आहे का नाही हा मुद्दा बाद ठरतो. दोन व्यक्ती
प्रेमात पडल्या आहेत. त्या जात वगैरे बघून कशा काय प्रेमात पडल्या असतील बरं अशी
माझी प्रश्नचिन्हांकित बाजू होती. (अर्थात माझी बाजू सुरुवातीपासून लंगडी आहे. मला
माझ्यावर ज्या एका जातीचा शिक्का आहे त्याच जातीतले अनेक सजातीय प्रेमविवाह ठाऊक
आहेत. आणि तिथे प्रेमात ‘पडायच्या’ आधी कोणत्या जातीच्या व्यक्तीच्या प्रेमात
‘पडावे’ हे आधीच ठरले असावे असा दाट संशय मला आहे. किंवा सजातीय व्यक्तीच्या शिवाय
बाकी कोणाकडे ‘झुकणे’ झाले तरी ‘पडणे’ टाळले गेले असावे. )त्यावर माझ्या मित्राचा
मुद्दा असा होता की आपल्या सबकॉन्शस मध्येच जातीय बायस असतात. आणि हे सबकॉन्शस
आपल्या प्रेमात पडण्याच्या क्रियेत कार्यरत असते. त्यामुळे प्रेमविवाह हेही
जातीयतेच्या निकषावर पहिले पाहिजेत. आपल्या जातीत प्रेमविवाह ही जातीय वागणूकच
एकप्रकारे. मी माझ्या मुद्द्याचा बचाव करताना म्हटलं की म्हणजे मी माझ्या सबकॉन्शसला
न वापरता ‘जाणीवपूर्वक’ प्रेमात ‘पडलो’ तर कदाचित एकूणच वर्तणुकीत खोटेपणा येईल
किंवा आपण जाणीवपूर्वक थोर सामाजिक काही करत आहोत असं. हे माझ्या जोडीदाराला
त्रासदायक होऊन लग्न न टिकण्याचा, त्याचा दोघांना त्रास व्हायचा चान्स जास्त आहे.
मी माझ्या मुद्द्याचा बचाव केला तरी
मित्राचा मुद्दा मला टोचत राहिला आहे. विधवा पुनर्विवाहाचा विचार केला तर पूर्वी
काहीजणांनी मुद्दामून असं केल म्हणून आज विधवा झालेल्या योग्य वयातील बाईसाठीचे
जोखड थोडे हलके झाले असेही असेल. मग मुद्दामून केलेले आंतरजातीय विवाहही
कालांतराने असेच फळ देतील. मग?
आंतरजातीय विवाहांची
संख्या वाढत असावी. पण एकूण होणाऱ्या लग्नांच्या प्रमाणात त्यांचे प्रमाण घटतच
असावे. नव्या, नव्या वेबसाईट, अन्तरशहरिय विवाह मंडळे, फेसबुक वगैरे आल्यापासून
सजातीय ‘जुळवणे’ किंवा ‘पडणे’ जास्त सोपे झाले आहे. आणि समाजातला वागण्याचा
ट्रेण्ड बदलायला संख्येपेक्षा प्रमाण जास्त महत्वाचे आहे. प्रमाण वाढले की संख्या
(बहुतेकवेळा) वाढलेलीच असते, पण संख्या वाढून प्रमाण घटते आहे असं होत असेल बदल
काहीच होत नाही.
माझ्या एका मैत्रिणीने
प्रेमविवाह केला. लग्नानंतर एकदा बोलताना ती म्हणाली की आता एक बरं आहे. माझ्या
मुलांना माझ्या सारखा त्रास नाही होणार. कारण तिच्या नवऱ्याची जात आरक्षणाचा फायदा
मिळण्यासारखी आहे. नन्तर मी महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय वाचला. ज्यानुसार आंतरजातीय
विवाहात अपत्याला आईची जात मिळणार आहे. असं खरंच जर होणार असेल तर मग आता माझी
मैत्रीण काय म्हणेल? त्याधीची गोष्ट म्हणजे १२ वीच्या परीक्षेनंतर ह्या मैत्रिणीने
आरक्षण आणि त्यातून होणारे ‘अन्याय’ ह्यावर एक नाटक वगैरे लिहिलं होतं.
आम्ही काही मित्र
मिळून पुस्तक प्रदर्शन लावतो. म्हणजे आमच्या कुवतीनुसार पुस्तके विकतो. तसं हे
प्रदर्शन चालू असताना एक मुलगा तिथे आला. त्याने शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एखादा
पुस्तक आहे का याची चौकशी केली. आमच्याकडे नव्हतं. मग त्याने बाकीची पुस्तकं
चालली. त्यात अजून काही नेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांची, ह्यांच्या,
त्यांच्याबद्दलची पुस्तके होती. मग तो मुलगा म्हणाला, ही बाकीची पुस्तके आहेत.
अण्णाभाऊ साठ्यांचाही पुस्तक ठेवलं पाहिजे ना. त्याने का ठेवलं नाहीत असा प्रश्नही
विचारला नाही. किंवा आम्ही जातीय वागत असल्याचा आरोपही केला नाही. पण विचार
केल्यावर कळतं की जे झालं होतं ते जातीयच होतं. आम्ही जिथे राहतो त्या तिथल्या
स्थानिक पुस्तक विक्रेत्याची मदत घेऊन आम्ही प्रदर्शन लावतो. हा पुस्तक विक्रेता
प्रथितयश प्रकाशनांची पुस्तके विकतो. ही प्रकाशने काय छापतात, काय नाहीत हे ते
वाचकांचा अंदाज घेऊन ठरवत असणार. आणि अण्णाभाऊ साठ्यांची पुस्तके या प्रथितयश
प्रकाशानांकडे नाहीत. म्हणजे? वाचणाऱ्या लोकांनी, छापणाऱ्या लोकांनी काही निवडी,
ज्याला डिस्क्रिमिनेशन म्हणता येईल अशा करूनच ठेवल्या आहेत का?
सांगली तालुक्यात
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका गावात मी आणि माझा मित्र गेलो होतो.
आम्हाला माहिती सांगणाऱ्याने गावाबद्दलची एक जुनी गोष्ट सांगितली. त्यात गावातला
एक शूर सरदार आणि पेशवे यांचा भाग सांगताना पेशव्यांची जात आणि त्याबद्दल सरदाराला
वाटणारी साशंकता हा भाग त्यांनी सांगितला. मग गावाची, दुष्काळाची माहिती दिली. मग
आमची नावं विचारली. मग जात. शहरात असं
फारसं घडत नाही. कुठचे विचारतात. जात पटकन विचारत नाहीत. मला स्वतःला जात काय हे
विचारणे प्रचंड अवघड वाटतं. सर्व्हे करताना सुरुवातीच्या प्रश्नातच जात विचारावी
लागते. सांगणारा अनेकदा सहज सांगतो. मला थेट विचारता येत नाही.
काही काही वेळा मला ह्या
इतक्या बारीक बारीक गोष्टी माहित असल्याचे काही वाटत नाही. म्हणजे मी अमुक एका
शहरांत, राज्यात, किंवा अमुक एका आर्थिक परिस्थितीच्या आई-बापाच्या पोटी जन्माला
आल्याचे मला जितके काही वाटते तितके जातीचे वाटत नाही. अगदी देशाचा वगैरे विचार
केला तरी हळूहळू जातीयतेची तीव्रता जाईलच असंही वाटतं मला कधी. किंवा काहीवेळा मला
जातीयता चेहऱ्यावर असलेल्या एकाद्या पुळी सारखी वाटते. म्हणजे तिच्या
असण्या-नसण्याने शरीराच्या प्रमुख हालचालींना, विचार करण्याला काहीच आडकाठी नाही.
पण एखाद्याकडे बघताना बऱ्याच जणांना ती पुळी लक्षात राहू शकते. काहीही उपयोग
नसताना ती त्या माणसाची ओळख बनू शकते.
---
मला दोन प्रकारच्या
किंवा तीन प्रकारच्या जातीयता दिसतात. म्हणजे तीन प्रकारची माणसे. एक जी उघड जातीय
आहेत. त्याच्या वागण्याच्या, दररोजच्या जगण्याचा, महत्वपूर्ण निर्णयांच्या मागे
त्यांचा स्वतःच्या जातीचा अभिनिवेश, अभिमान आणि काही प्रमाणत बाकी जातींचा द्वेष
आहे. दुसरा प्रकार म्हणजे जिथे द्वेष, अभिनिवेश फारसा नाही. पण जात मानली जाते.
लग्न जुळवायचा, दुसऱ्या माणसाबाबतचा तो एक महत्वाचा निष्कर्ष आहे. आणि तिसरे म्हणजे
ज्यांच्यासाठी जात ही त्यांच्यालेखी काही एक महत्व नसलेली संकल्पना आहे आणि
त्यांना कधीही ‘जात’ वापरून कोणतेही निर्णय घ्यावे लागणार नाही आहेत.
आपण आता हे तीन प्रकार
उदाहरणांसह पाहू.
खैरलांजी प्रकरणाची
निदर्शने चालू असताना एकदा कल्याण रेल्वे स्थानकाच्या आधी रेल्वे गाड्या थांबवल्या
गेल्या. अजूनही काही ठिकाणी दगडफेक झाल्याच्या वगैरे बातम्या टीव्हीवर येत होत्या.
मी घरी त्या बातम्या बघत असताना त्याच्या स्वतःच्या कामासाठी आलेला एक मनुष्य माझ्यासोबत
टीव्ही पहात होता. समोर चालू असलेल्या बातम्या पाहताना तो एकदम तुच्छतापूर्वक
काहीतरी म्हणाला. आणि परत हसत टीव्ही बघायला लागला. हे म्हणजे पहिल्या प्रकारचे
उदाहरण.
माझी एक नातेवाईक बहिण
एकदा आमच्या घरी आली होती. ती आठवीत आणि मी पाचवीत होतो. माझी आजी तिला शाळा कशी
चालू आहे असं काहीकाही विचारत होती. त्यावर ती बोलायला लागली की काही विषय नीट
शिकवले जात नाहीत. आणि तिच्यालेखी त्याचं कारण म्हणजे ते विषय शिकवणारे शिक्षक हे
गुणवत्तेनुसार भरले गेले नव्हते. तिच्या बोलण्यातलं लक्षात राहिलेलं उदाहरण म्हणजे
ते शिक्षक ‘आणि आणि पाणी’ हे दोन शब्द कसे बोलतात याचा तिने करून दाखवलेला उच्चार.
हे सुद्धा पहिल्या प्रकारचंच उदाहरण. कदाचित ती स्वतः तशी नसेलही. शाळेतल्या
शिक्षकांमध्ये चालणाऱ्या गटबाजी खेळात मुलांमध्ये असं मुद्दामून पसरवत असतील.
माझ्या शाळेतही असे प्रकार व्ह्यायचे. अशा गटबाजीला कंटाळून एका शिक्षिकेने
राजीनामाही दिला होता.
द्वेष किंवा स्वतःच्या
जातीशिवाय बाकी जातींच्या बाबतीत उणे काढण्याची भावना ह्यानेच पहिला प्रकार बनतो
असं नाही. माझ्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये असलेले काही लोक त्यांच्या
जातीसंबंधीची मंडळे, कम्युनिट्या चालवतात. ते काहीकाही अपडेट करत असतात. त्यात
त्यांच्या जातीची थोरवी, गर्व आहे मी अमुक असल्याचा, तमुक असल्याचा असे मजकूर
असतात. किंवा त्याच्या जातीच्या ऐतिहासिक थोर पुरुषाचे फोटोशॉपिक तेजस्वी, ओजस्वी
वगैरे (प्रसंगी सिक्स पॅक) फोटो टाकत असतात. ही पहिला प्रकारच.
दुसरा प्रकार म्हणजे
जातीबाबतची उघड एक्स्प्रेशन न देता असणारे लोक. त्यांच्या दैनंदिन जीवनात जात फार
डोकावतही नसते. पण ते जातीबाहेर लग्न करत नाहीत. जातीच्या रुढी-परंपरा पाळतात. ते
दुसऱ्या जातीला कमी-जास्त लेखायला जात नाहीत. पण योग्य ते अन्तर राखतात. आणि जर
त्यांच्या जातीतले पहिल्या प्रकारचे लोक त्यांना कधी एखाद्या मेळावा, कार्यक्रमाला
बोलवायला आले तर त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. ते अशा जाती संघटनांना
देणग्या देतात. त्याच्या यशाचे पावडे जर ह्या जाती संघटनांनी गायले, त्यांचे
उदाहरण जातीची महानता म्हणून वापरले तर ते त्यांना चालते.
असं म्हणता येईल की पहिला
प्रकार चुकीचा आहे. दुसरा प्रकार असेल तर त्यात काय चूक आहे. माझ्या स्वतःच्या मते
दुसरा प्रकारही चुकीचाच आहे.
--
बाकी तर
मी टापोटाप बघ सिनेमा आणि टाक रिव्ह्यू असं करतो. इथे मला एवढा वेळ का लागला? ‘जात’
एवढी सेंट्रल होती सिनेमात की बाकी चित्रण, डीटेल्स, अभिनय ह्या बाबत काहीच लिहिता
नसतं आलं. मला. माझ्यालेखी सगळ्यात महत्वाची
गोष्ट होती ती नायकाच्या मनातली त्रास देणारी, सतत तडफडवणारी जाणीव. इकीकडे त्याला
हिरोईक काही करायचं आहे, छाप मारायची आहे, त्याच्या मनात रुजलेला चेहरा, त्याच्या
अदा दररोज पहायच्या आहेत. पण तितकंच त्याला ठाऊक आहे की तो आहे त्या व्यवस्थेत
ह्या कशासाठीही एनटायटलड नाही. आणि ह्या विरोधाला पुसण्यासाठी तो काहीतरी तोडगा
शोधू पाहतो, त्याच्यावर भाबडा विश्वास ठेवतो आणि केव्हातरी त्याचा सगळा भाबडा इमला
कोसळतो. जिच्यासमोर त्याला हिरो बनायचे आहे तिच्यासमोर त्याची पूर्ण सार्वजनिक
अवहेलना होते आणि मग त्या अवहेलनेला प्रत्युत्तर देणारा दगड तो फेकतो, पुढच्या
परिणामांची पर्वाही न करता.
असं काहीसं लिहिता आलं
असतं. दॅट वुड हॅव सर्व्हड.
बहुतेकजण असं चुकचुक
करून सोडतात. काहीजण असं असेल तर बघूयाच नको म्हणतात. काहीजण हे असं सगळं नाहीच,
हा डाव आहे, षडयंत्र आहे असा कल्लोळ करून त्याखाली सगळंच झाकून टाकायला बघतात.
n
असं हळहळणं, आपल्याला
थोडी जास्त रुंद जाणीव आहे, कन्सर्न आहे असं काही करायला बघणं हे मला एकदम बेगडी
वाटतं काहीवेळेला. ह्या व्यवस्थेतून एक्झिट घेऊन जिथे माणसाला आपल्या एकटेपणात
निवांत रमता येऊ शकतं, हवं तेव्हा आपल्या कोशातून बाहेर पडायची आणि मग परत घुसायची
मुभा आहे अशा कुठल्यातरी अत्यंत कमी लोकसंख्येची घनता असलेल्या देशांत जावं. काय
करायला लागतं अशा ठिकाणी जायला, डिग्र्या, इंग्लिश आणि गणित. तेवढं जमलंही असतं.
मग कधीतरी नॉस्टॅल्जियाचा, किंवा भव्य मानवी प्रश्नांच्या कळवळ्याचा प्रकारही जमला
असता, व्हेन नथिंग इज अॅट स्टेक्स किंवा हे सगळं, जात, देश, धर्म, भाषा विसरून
जाऊन अजून कुठल्यातरी अॅबस्ट्रॅक्ट डोहात झिंगून बुडी मारता आली असती.
पण असं झालेलं नाही
अद्याप. आणि त्यामुळे बघ्याचा आव आणून इथल्या गर्दीच्या तरंगांकडे पहा, त्यावर
निष्कर्षांचे, अंदाजांचे दगड फेका हाच आपल्या आवडीचा खेळ आहे.
पण मध्येच कोणी असा दगड
फेकतो, आणि काही दिवस तो कुठे लागला आणि किती हे चाचपडण्यात जातात, परत नेहमीची
सुस्त निब्बरता किंवा पाळीव संवेदनशीलता येईस्तोवर.