Monday, October 21, 2019

सातपाटील कुलवृत्तांत


कुळकथा हा छोटा पण प्रभावी जॉनरच मराठीत पकडला पाहिजे. तुंबाडचे खोत, मुखवटा, कारवारी माती अशी काही नावे आठवतात. ह्या यादीत लक्षणीय भर म्हणजे रंगनाथ पठारे ह्यांचे ‘सातपाटील कुलवृत्तांत’. एखाद्या पुस्तकाची नशा सावकाश पसरत जाणं हा वाचण्याच्या आनंदातला जबरी भाग असतो. तो अनुभव मला ‘सातपाटील कुलवृत्तांत वाचताना आला. दिलचस्प, भौगोलिकदृष्ट्या पसरट, अधिक गंभीर आणि कुळकथा सांगताना ऐतिहासिक तथ्ये, conjectures आणि मानवी जीवनाचे अपरिहार्य पडाव ह्या सगळ्यांना कवेत घेऊ पाहणारी महत्वाकांक्षी कादंबरी म्हणून ‘सातपाटील’ कडे बघावं लागेल.
स्त्रोत: बुकगंगा 

केवळ एक दिलचस्प फिक्शन लिहिणं हेच लेखकाला अभिप्रेत नाही हे कादंबरी वाचताना सतत जाणवतं. लेखक स्वतःला ज्या इतिहास, वंश, जात, परंपरा ह्यांचा भाग मानतो त्याबद्दल लिहिणं ही क्वेस्ट कथेच्या पार्श्वभूमीला सतत जाणवत राहते. पण कादंबरी हे आपल्या सामाजिक कमेंट्रीचे निमित्त असा भैराळ प्रकार त्यात होत नाही. कादंबरीतले भाग, विशेषतः जानराव, शंभुराव ह्यांचे भाग विलक्षण आहेत. कथेचे सुट्टे झालेले काळपदर एकमेकांना जुळून येणं हे कथेत वारंवार घडतं आणि हा तंत्राचा भाग असूनही त्यात कृत्रिमता नाही. कथेचा लेखकाच्या परिचित भूभागात (म्हणजे असा माझा कयास) घडणारा भाग अधिक ताकदवान वाटतो. (पु.शि.रेग्यांच्या ‘मातृका बाबत असं निरीक्षण सारंग ह्यांनी नोंदवलेलं मला आठवतं.)

‘सातपाटील’ ला नेमक्या कुठल्या कप्प्यात ठेवणं कठीण आहे. तिचे साधर्म्य अनेक कथांशी आहे. ज्या कुळाची कथा आहे त्या कुळाची उत्पत्ती विरोधाभासात असणं हे महाभारताशी साम्य आहे. अमिताव घोष ह्याच्या indo-nostalgic कादंबऱ्या, नेमाड्यांची हिंदू (त्यातला शेतकऱ्याचे घर आणि त्याचा रगाडा सांभाळायची कसरत ह्यांचा भाग), मार्खेजचे Hundred Years of Solitude मध्ये वर्तमानाच्या वर्णनांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची झलक जोडणे ह्या साऱ्यांची आठवण ‘सातपाटील वाचताना होते.

शेवटचे प्रकरण आधीच्या रसरशीत कथेला क्लोजर द्यायच्या प्रयत्नात रसभंग करून गेले. म्हणजे कथा म्हणून हे क्लोजर आवश्यक आहे. पण ते देताना कथेच्या प्रतलाहून भरकटून इतिहास आणि जात ह्या मराठी विचारविश्वाला विळखे देऊन राहिलेल्या गर्तांत ते घुसते. ते व्हायलाच हवे होते का?

निम्नमध्यमवर्गांत, शहरातील भाड्याच्या घरात वाढल्याने जात, जमीन, इतिहास, परंपरा ह्यांपेक्षा उपभोगउन्नतीची गर्ता ही माझ्या जास्त ओळखीची आहे. आपल्या घरांत दिसतात ती माणसे एवढेच आपले कुळ, आणि आहेराचे सूड ज्यांच्यासोबत साधले जातात ते नातेवाईक. इतिहास आणि जात ह्या दोन्ही गोष्टी मनुष्य निवडत नाही आणि त्या त्याला बदलताही येत नाहीत. ह्या दोघांचा आपल्या जीवनावर प्रभाव असला तरी त्या प्रभावाहून वेगळे आयुष्य जगण्याची मुभा अद्यापतरी आहे. ह्या गोष्टीना लगटणे ही आपली निवड असते, अपरिहार्यता नाही असं मला वाटतं. त्यामुळे ह्या गर्तांत फिरणाऱ्या लोकांबद्दल मला कुतूहल आहे.

ह्या गर्तांत रंजक, विचक्षण असे काही नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण रंजनापलीकडे आपल्या आजच्या जीवनाचा अर्थ किंवा अर्थहीनता ह्यांना समजू शकणारे त्या गर्तांत काही नाही.
लेखकही असं काही म्हणत नाही. पण तरीही जातीव्यवस्था, कोण लोक नेमके कुठचे, कोणता भूगोल नेमका कोणाचा ह्यावर कादंबरी खूप काही बोलते. ही लेखकाची संदर्भसिद्ध मते आहेत का कादंबरीच्या फिक्शनची गरज म्हणून वापरलेले प्रॉप्स हे कळलं तर मजा येईल.

मराठीतील फिक्शन ही एक मरू घातलेली प्रजाती आहे असा माझा हायपोथेसिस आहे. किक देऊ शकणारी पुस्तके अत्यंत सावकाश, म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीने येणं हे ह्या अंतपर्वाचे लक्षण आहे. २-३ महिन्यांत किंवा एकेकदा ६-१२ महिन्यांत असे एखादे पुस्तक हाताला लागते.

डिसेंबर २०१८ मध्ये मी ‘अवकाळी पावसाची गोष्ट वाचलं. मग मे २०१९ मध्ये ‘कारवारी माती. आता ‘सातपाटील कुलवृत्तांत. तिन्ही माझ्या लक्षात राहिलेल्या,राहतील अशा कादंबऱ्या. आता पुढची कधी?



हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...