‘कशामुळे विद्यार्थी शालेय अवस्थेत आणि
त्यानंतर, ज्याला आपण ढोबळ सामाजिक अर्थाने ‘यशस्वी’ म्हणतो तसे होतात?’ ह्यावर
चर्चा चालू असताना माझ्या विद्यार्थ्याने मला ‘आउटलायर्स’ ह्या Malcolm Gladwell ह्यांच्या
पुस्तकाबद्दल सांगितलं.
पुस्तक वाचून झाल्यावर मी निश्चितपणे असं
सांगू शकतो कि आपल्या दृष्टीकोनात बदल घडवून आणायची शक्ती असलेल्या पुस्तकांत मी ‘आउटलायर्स’
चा समावेश करेन. माझी अशा पुस्तकांची यादी तरी काय आहे असं कोणी विचारलं तर मी
त्याला त्या यादीतील काही पुस्तकांचीच नावे सांगेन: जसं ‘Zen and the art of motorcycle maintenance’, डॉ. अतुल गावंडे
ह्यांचं Being Mortal, युवल हरारी ह्यांचं Sapiens, Abhijeet Banerjee ह्यांचं Poor Economics असं. माझ्या स्वतःच्या
काही प्रश्नांच्या दृष्टीने पुस्तके वाचणारा वाचक ही माझी अवस्था तशी नुकतीच आलेली
आहे, त्यामुळे ही यादी छोटी आहे.
‘आउटलायर्स’ ची मध्यवर्ती थीम काय आहे? ‘आउटलायर्स’
म्हणजे एखाद्या क्षेत्रात टोकाचे यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या ‘यशाच्या’ कारणांची
चिकित्सा. वानगीदाखल ह्यात बिल गेट्स आहे. पण त्यामुळे ह्या व्यक्तींवर हार-फुले
उधळून त्यांचं दैवतीकरण करण्याच्या खाशा परंपरेच्या अगदी विरुद्ध टोकाशी हे पुस्तक
आहे. काही नशिबाने उपलब्ध झालेल्या संधी, पालक आणि कम्युनिटी ह्या स्तरांवर असलेला
वारसा आणि काही सामाजिक रचना ह्यांच्यामुळे क्षमता असलेल्या काही व्यक्ती ह्या
आपल्याला ‘आउटलायर्स’ अशा यशस्वी झालेल्या दिसतात. पण खरंतर त्यांच्यासारख्याच क्षमतेच्या
अनेक व्यक्ती वरील तीन पैकी एका किंवा अनेक घटकांच्या अभावाने मागे फेकल्या
गेलेल्या असतात. ह्या सामाजिक रचना म्हणजे जातीनिहाय विषमता किंवा आर्थिक विषमता
नाही, तर शालेय प्रवेशासाठी लागणारे किमान वय अशा अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या
गोष्टीही विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या जीवनावर परिणाम करतात आणि नंतर हा परिणाम
न भरून येणारे अंतर बनतो.
Malcolm Gladwell ह्यांची उदाहरणे, ज्याच्या अनुषंगाने त्यांनी
मांडणी केली आहे, ती प्रामुख्याने अमेरिकन आहेत. पण त्यांची चिकित्सा ही भारतात
लागू ठरणार नाहीत असं अजिबात नाही. किंबहुना पालक आणि अधिक रुंद असे
नातेवाईक-जातीविशिष्ठ कम्युनिटी ह्यांचे वर्तुळ ह्यामुळे मिळणारे default फायदे ही बाब भारताला व्यवस्थित लागू
पडेल.
Malcolm Gladwell ह्यांच्या मांडणीत आढळलेली एक बाब म्हणजे ‘यशस्वी’
म्हणजे कोण ह्याबाबतीतल्या व्याख्येत त्यांनी केलेला उपलब्ध निकषांचा स्वीकार. हे
जे उपलब्ध निकष असतात ते प्रामुख्याने भौतिक समृद्धी, उत्पन्न आणि प्रसिद्धी ह्या
तीन घटकांवर आधारित असतात. Malcolm Gladwell त्यावर खल करत नाहीत. पर्यायी व्याख्या, पर्यायी
जीवनपद्धती अशी टीचभर त्रिज्येत लागू असणारी ‘थेरे’ करण्यापेक्षा लोक म्हणून जे
काही असतात त्या विस्तृत मैदानात मानल्या जाणाऱ्या चलनांवर Malcolm Gladwell काम करतात. ही बाब
मला महत्वाची वाटते. आपल्याला जर संधींपासून वंचित, भौतिक जीवनाच्या किमान
पातळीच्या खाली असलेल्या कुटुंबांना ही तफावत मिटवण्यासाठी मदत करायची असेल तर
त्यांना नेमकं काय उपलब्ध करून द्यायचं आहे ह्याबाबत स्पष्टता हवी. सुदैवाने
खेड्यातच खरा भारत आहे[1], उत्तम शेती-मध्यम व्यापार-कनिष्ठ
नोकरी अशा धादांत काल्पनिक फुग्यांतून भारतातले विचार करणारे बाहेर पडतायेत असं
दिसतंय. शैक्षणिक प्रयोग वगैरे करणारेही अनेकदा चुकीच्या सैद्धांतिक फ्रेमवर्कमुळे
यशस्वी होऊ शकत नाहीत, किंवा त्यांची मूळ उद्दिष्टे भरकटून ‘वेगळे काही करणारे’
असं प्रसिद्ध होणं एवढाच भाग उरू शकतो. ‘शिक्षण’ ह्याबाबतीत तर जे तथाकथित
विचारवंत[2] आहेत त्यांची मांडणी आणि
समाजातील लक्षावधी लोक त्यांच्या निर्णयांतून मांडतायेत ती भूमिका ह्या अत्यंत
विसंगत असतात. उदाहरणार्थ: शिक्षणासाठी कोणती भाषा माध्यम म्हणून असावी हा विख्यात
प्रश्न. ह्या भाषेबद्दलही एक इंटरेस्टिंग प्रकरण ‘आउटलायर्स’ मध्ये आहे.
शिक्षणाचे माध्यम हा इथला विषय नाही, पण शिक्षणाचे
माध्यम हे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील व्यक्ती म्हणून असणाऱ्या जीवनावर दोन
प्रकारे परिणाम करते: एक परिणाम हा ‘पिअर ग्रुप’ मुळे येतो आणि तो खरंतर भाषेचा परिणाम
नाही. आजच्या घडीला इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे
व्हर्न्याक्युलर माध्यमातील पालकांपेक्षा माहिती, संधी आणि नेटवर्क ह्यांत चांगले
असतात आणि हाच फरक विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होतो. दुसरा परिणाम हा भाषेचा
आहे. कुठल्याही दोन भाषा ह्या माध्यमच असल्या तरी त्या perfect substitute नसतात. भाषा हे माध्यम एका सांस्कृतिक
अवकाशात विकसित होते. आणि त्यामुळे भिन्न सांस्कृतिक अवकाशात विकसित झालेली
माध्यमेही मूलभूतपणे वेगळी असतात जरी त्यांना ‘संवाद’ ह्या एकाच क्रियेचे माध्यम
म्हणून वापरले जाते. आपण कितीही नाकारलं तरी भौतिक सुखांच्या किंवा व्यक्तीने स्वतःसाठी निर्धारित केलेल्या
उद्दिष्टांच्या पाठलागावर आधारित व्यक्तिकेंद्री (व्यक्ती हे मूलभूत एकक मानणारी) स्पर्धा
हे वितरणाचे साधन मानणारी मूल्यव्यवस्था हीच आधुनिक जगाची मूल्यव्यवस्था आहे. ज्या
भाषेच्या आधाराने मूल जगाकडे बघू लागणार आहे त्या भाषांच्या मुळाशी हीच
मूल्यव्यवस्था असेल असे नाही. Gladwell ह्यांनी एक विलक्षण उदाहरण वापरून ही बाब
मांडली आहे.
सो, ‘आउटलायर्स’ हे एक नॉन-फिक्शन आहे. ते पुराव्यांवर आधारित मांडणी करतं आणि काही
टोकदार निष्कर्ष मांडतं. पण ते अवास्तव जड, गंभीर नाही.
[1]
खेड्यांना समस्या नाहीत असा ह्या वाक्याचा
अर्थ नाही. तर शहरीकरण ही काही कृत्रिम, रोगट अवस्था आहे, त्यातल्या समस्या ह्या
मुळात शहरीकरण ह्या समस्येनेच उद्भवल्या आहेत अशा स्वरूपाच्या भूमिकेबाबत हे वाक्य
आहे. भारतात आजमितीला जवळपास २/३ लोकसंख्या ग्रामीण आहे, त्यामुळे समस्यांतही मोठा
भाग ग्रामीण समस्यांचा असेल ह्यांत काही वादच नाही. पण शहरातील मनुष्य वर्तन आणि
ग्रामीण मनुष्य वर्तन ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत हे एक मिथ आहे. शहरी मनुष्य
वर्तन आणि ग्रामीण मनुष्य वर्तन ह्यापाठी एकाच मानवी स्वभावप्रक्रिया आहे असे
मांडायचे आहे.
[2]
भारतात 'विचारवंतांना' डेटा, पुरावे, पूर्वीचे
रिसर्च अशा क्षुल्लक गोष्टींची गरज नसते. ‘मेरे मनको भाया, मै थिअरी किंवा पॉलिसि बनाया’ असं अजूनही चालतं. मुळात माहितीवंतांना किंवा सोशल मिडीयावर प्रकट होणाऱ्यांना विचारवंत समजणं
ही एक गल्लत आपण करतोच. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ह्यापेक्षा ‘प्रकटला तो अभ्यास
केलेलाच’ असं उलटं मापन अनेकजण करतात. मांडणी करणारे आक्षेपांना तोंड द्यायला तयार
नसतात. ह्यार्थाने तथाकथित. ह्यापेक्षा वरची अवस्था असे काहीजण हे ‘प्रयोग’ केलेले
असतात. पण अनेकदा ह्या ‘प्रयोगांची’ काटेकोर मोजणी आणि यश-अपयशाचे मापन झालेले
नसते. सुदैवाने सी.एस.आर. च्या पौष्टिक प्रवाहाबरोबर मोजणीचा आग्रहही येऊ लागलेला
आहे.