Sunday, March 19, 2017

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.
       म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेकांच्या कविता वाचत असतात, त्यात हा आपल्या कविता वाचतो.
       त्याच्या १४-१५ सेशन्सनंतर त्याला सल्ला मिळतो, कि त्याने त्याच्या कवितांबद्दल काही एक लिहावं, म्हणजे काय म्हणायचं त्याच्या कवितांना. तर तो म्हणतो, ‘पोएट्री ऑफ द सिटी’. मग एकदा शनिवार-रविवारच्या बिझनेस पेपरात त्याचा एक इंटरव्ह्यू पण येतो. त्यात त्याची कविता पण असते,त्यातल्या काही ओळी अशा असतात. 
       Among the skyscrapers,
             We lost the lanterns, we lost pots, and we lost toys
              And then we seek them in malls
       त्यानंतर त्याला त्याच्या स्टार्ट-अप मित्राचा फोन येतो. ‘बस ऐसेही इस विकेंड जा रहे है, मेरे और कुछ  दोस्त है, शायद तुझे उनकी कंपनी पसंद आ जाय’.
       टोटल ७ लोक येतात, स्टार्ट-अप, त्याची गर्लफ्रेंड, तिच्या दोन मैत्रिणी, स्टार्ट-अपची क्लोजफ्रेंड, तिचा बॉयफ्रेंड, जो वाईल्ड लाइफ फोटोग्राफर आहे आणि जस्ट गीरच्या असाइनमेंटवरून वापस आलेला आहे आणि नवा नवा कवी.
       हा खरा इतका नवा, नवा कवी नाही. त्याने आधी एड्थमध्ये असताना पहिल्यांदा पोएम लिहिलेली, डेथ ऑफ अ बटरफ्लाय म्हणून. मग त्याच्या कॉलेजात तो कविता लिहायचा, इनफॅक्ट त्याची एक सिनियर त्याला म्हटलेली कि कॉर्पोरेट कपडेमे कम्युनिस्ट हार्ट रखे हो आप. (ओह, ते अचूक सोनेरी प्रकाशात झळाळणारे भूतकाळाचे तुकडे.)
       गाडी नाशिक हायवेला लागते, माहुली (नव्या नव्या कवीला काही हे नाव माहिती नाही म्हणा, त्याला वाईल्ड लाइफ फोटोग्राफर सांगतो) पास होत असतो तेव्हा नव्या नव्या कवीला जाणवतं कि त्याच्या सोबत गाडीत असलेल्या दोघीपैकी एक जण कदाचित त्याच्यावर हिट करते आहे.
       पुढे ते सिगरेट प्यायला थांबतात तेव्हा ती नव्या नव्या कवीशी बोलायला लागते. तिने नव्या नव्या कवीच्या कविता वाचल्या आहेत. ती आधीपासून कविता वाचते. तिची मॉम इंग्लिशची प्रोफेसर आहे. नवा नवा कवी तिच्या शरीराकडे निरखून बघतो, अर्थात असे बघताना न बघण्याच्या सराईत, पाहणाऱ्यालाही पाहतो हे जाणवत नाही अशा सराईतपणे. आपले कपाळावर येणारे केस आवरत, चहाचा सिप घेत घेत ती एका कवितेबाबत बोलू लागते आणि नवा नवा कवी सावकाश इन करून मग धूर बाहेर सोडत असतो. तेव्हा वारा वाहात असतो, आणि सूर्य सावकाश आपला डेली एपिसोड पूर्ण करत आलेला असतो. नवा नवा कवी एकाचवेळी तिच्याशी बोलू लागतो, एकाचवेळी त्याला एका इंग्लिश सिनेमाचा शेवटचा एक सीन आठवू लागतो. नवा कवी आतून काहीतरी जाणवण्याच्या उन्मादाने थरथरू लागतो आणि समोरच्या मुलीचा तलम शर्ट फडफडत असतो.
       पुढे ते फार्म हाउसला पोचतात, बीअर पितात, जॉईंट रोल करतात, गावरान चिकन खातात, देसी दारू पितात, फार्म हाउसवर कामाला असलेल्या माणसाला चिक्कार टीप देतात, आणि केव्हातरी पहाटे पहाटे झोपतात. नवा नवा कवी झोपत नाही, तो सिगरेट पीत पीत टेरेसवर उभा असतो तेव्हा काळोख फिक्का व्हायला लागलेला असतो आणि आई प्रोफेसर असलेली मुलगी, किंवा एच.आर. कन्सल्टन्सीमध्ये हेड  अॅनॅलीस्ट असलेली मुलगी किंवा पृथ्वीला खूप सारी नाटकं बघणारी मुलगी त्याच्या सोबत उभी असते. ते आधी इतकं इतकं बोललेले असतात, त्यात खूप सारं नुसतंच आकर्षण असल्याने येत जाणारं कसलंच मूळ नसलेलं एकाने एकाशी बोलून वाढत जाणारं असतं. मग दोघेही थकतात, जड पापण्या घेऊन उभे राहतात तिथेच, पुढे केव्हातरी झोपतात.
       नव्या नव्या कवीला जाग येते तेव्हा निकिता खिडकीपाशी कॉफी पीत उभी असते. (नक्कीच त्याला तिचं नाव कळलं होतं.  मध्ये केव्हातरी, किंवा सुरुवातीला जेव्हा त्याच्या स्टार्ट-अप मित्रानेएक्स, धिस इज वायअशी सर्वांची ओळख करून दिली तेव्हा. नव्या नव्या कवीला हे फार आठवत नाही, तपशीलापेक्षा काही वेगळंच तो धुंडत असतो असं त्याच्या क्रिटीकने म्हटलं होतं.) त्याने बेडवर कूस बदलत पाहिलं, तेव्हा खिडकीतून उष्ण प्रकाश आत येत होता आणि बाकी कसलेही आवाज नसल्याचा, अभावाचा आवाज.
गुड मॉर्निंग. कॉफी?’ निकिता त्याला म्हणाली.
नवा नवा कवी कॉफी घेत खिडकीतून समोरच्या डोंगराकडे बघत उभा राहिला. खिडकीबाहेर दिवस अजून अजून तापत जात होता. समोर एक डोंगर होता. डोंगरावरचा हिरवा रंग भाजून भाजून वैराण राखाडी व्हायला सुरुवात झालेली. तो काही काळ नुसताच समोर बघत उभा राहिला. मग एकदम आपल्या वर्तमानकाळाची जाणीव व्हावी तसं त्याने निकिताला विचारलं, ‘बाकी सगळे कुठेत?’
       निकिताने सांगितलं कि स्टार्ट-अप मित्राच्या घरी काही इमर्जन्सी आली होती आणि वाईल्ड-लाइफ फोटोग्राफर तसाही आज संध्याकाळी निघणार होता. मग ते सगळेच निघाले सकाळी.
       मला का उठवलं नाही, कळवलं नाही असे प्रश्न कवीच्या चेहऱ्यावर येत होते, पण तेव्हाच एकदम थेट वाऱ्याची झुळूक निकिताच्या चेहऱ्यावर आली.
‘तुझी मैत्रीण?’
‘ती पण गेली त्यांच्यासोबत.’
तू माझ्यासाठी थांबली आहेस असा त्याचा चेहरा होत असताना निकिता हसली. मग त्याने काही विचारलं नाही.
‘उद्या सकाळी निघालो आपण तर चालेल तुला?’ निकिताने विचारलं.
त्याने मान उडवली आणि बेडपाशी पडलेलं सिगरेटचं पाकीट घ्यायला तो वळला.
--
       पुढे संध्याकाळी निकिता त्याला जवळच्या एका डॅमवर घेऊन गेली होती. तिनेच गाडी चालवली, आणि डॅमजवळच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या आधी तिने गाडी पार्क केली. मग नेमका रस्ता नाही, आणि नेमकी पायवाट नाही असंही नाही अशा रस्त्याने ती त्याला तलावाच्या काठी घेऊन गेली.
मध्ये एकदा तिच्या सराईतपणाचं त्याला नवल वाटलं, पण तोवर ती गुडघ्यांना हाताचा विळखा घालून निवांत समोरच्या पक्ष्यांच्या थव्याकडे पहात बसूनसुद्धा गेली होती. तोही बसला.
       तिने त्याच्याकडे बघितलं नाही. त्याने तिच्याकडे बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यांच्या चमकत्या कडा तेवढ्या त्याला दिसल्या. त्याला फैज आठवत होतां आणि त्याने मनात म्हटलं तरी तिला त्या ओळी तश्याच्या तशाच ऐकू जातील असंही त्याला वाटत होतं. असं वाटणं, असे तलाव, असे स्वप्नवत रोमान्स हे प्युअर एलिट आहेत असंही त्याच्या मनात मध्ये चमकून गेलं. पण डावीकडे किंवा उजवीकडे कुठेच न कलता नंतर अंधार होईस्तोवर तो नुसताच तरल होत गेला, एखाद्या उंची व्हिस्कीसारखा.
--
       डीड ही फक्ड हर? डीड हि नॉट? ह्याला काही अर्थ नाही. किल द बॉय, जॉन स्नो, किल द बॉय.
--
       रात्री ती त्याला एवढंच म्हणाली, ‘उद्या आपल्याला ट्रेनने परत जावं लागेल.’ त्याने मान हलवली. हाऊ डझ इट मॅटर?
       हे खरं फार विचित्र वाटेल, पण मुंबईत राहूनही लोकल ट्रेन हा एक अजुबाच राहिला आहे अशा लोकांचं प्रमाण वाढतं आहे. केल युनिव्हर्सिटीचे मानव-अधिवासतज्ञ डॉ. केलर ह्यांच्या मते एक वेळ अशी येईल कि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणारे हेच खरे मुंबईचे भूमिपुत्र आहेत अशी मागणी येईल आणि महिना २० तासाचा पब्लिक ट्रान्सपोर्ट ही मुंबईत राहण्याची पूर्वअट होईल. जसे डावे, अतिडावे, उजवे, अतिउजवे अशा छटा असतात तसे मेट्रोवाले आणि लोकलवाले अशा पब्लिक ट्रान्सपोर्ट गटाच्याही मवाळ आणि जहाल छटा होतील असे डॉ. केलर ह्यांनी ९५% कॉंफिडन्सने सांगितलं आहे. हे एवढं त्यांच्या ह्या वर्षाच्या ३५ कॉलम्समध्ये आलं आहे. ‘पुढचे स्टेशन...भविष्य’ नावाच्या त्यांच्या सदरचे १७ भाग अजून येणार आहेत. हे पण इथे नमूद केलं पाहिजे कि फेसबुक प्रोफाइल्स आणि वर्तमानपत्रातील सदरे ह्यांनाच सामाजिक संशोधन मानावे अशी तरतूद जगभरात लागू झालेली आहे. त्यामुळे रिसर्च जर्नल्स झपाट्याने बंद होऊन पिअर रिव्ह्यूड, पिअर एडीटेड आणि पीअर फ्रेंडली अशा तीन निकषांवर (किंवा टीकाकारांच्या मते एकाच निकषावर) आधारित संशोधन प्रणाली उदयाला आलेली आहे.
हे तसं परत डायव्हर्शन आहे, पण तेही आहे, जसं ही एक वस्तुस्थिती आहे कि नवा नवा कवी हा अत्यंत फुटकळ वेळेला लोकल ट्रेनचा प्रवास केलेला आहे. इट सिम्पली डझंट काउंट.

--     
                     सकाळी निकिता फार्म हाउसवर असणाऱ्या माणसाला नजदिकच्या रेल्वे स्टेशनवर सोडायला सांगते. फार्म हाउस ते रेल्वे स्टेशन हा प्रवास करताना नवा नवा कवी खिडकीतून बाहेर पाहत बसतो, तेव्हा रस्ता शेता-शेताच्या परिघातून धावत स्टेशनाच्या टपऱ्या-टपऱ्याच्या गर्दीत नेऊन सोडतो. फार्म हाउसचा माणूस त्यांना तिकिटं आणून देतो.  
       निकिता त्याला म्हणते कि त्यांनी वेगवेगळा, म्हणजे कवीने जनरल किंवा पुरुषांच्या डब्यातून आणि तिने स्त्रियांसाठी राखीव डब्यातून प्रवास करायचा आहे. हे सांगत असताना कवी हेही पाहतो कि निकिता आत्ता थेट ऑफिसला जाण्यासाठीच्या वेशात आहे आणि नुसता वेश नाही तर ही स्त्री आपल्याला मागचे दोन दिवस भेटलेल्या स्त्रीहून वेगळी आहे. तिच्यातले विखुरल्यागत वाटणारे तुकडे एकत्र होऊन ही एक नवी व्यक्ती बनलेली आहे. आणि ह्या एकसंध जोडणीतून कर्तव्याचा तटस्थ सेन्स झिरपतो आहे. कवी हे नोंदवतो, कुठे ते ठाऊक नाही आणि निकिता त्याच्यापासून अलग होऊन ते येणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहू लागतात.
       हळूहळू असे अनेक वाट पाहणारे त्या फलाटावर एकत्र येतात. हे सगळे लोक रविवारातून सोमवारात आले आहेत आणि काळाचे दोन अलग तुकडे, केवळ वारांनी नाही तर वृत्तीनेही वेगळे पडलेले, जोडून घेण्याचा प्रयत्न ही सगळी वाटबघी गर्दी करते आहे. अशी जाणिवांची दाटी होत असतानाच लोकल ट्रेन फलाटावर आल्याचा दाब कवीवर येऊ लागतो. त्याच्या नकळत एका लोंढ्याचा भाग बनून लोकल ट्रेनचे दार येईल अशा एका फोकल बिंदूकडे तो खेचला जाऊ लागतो. ह्या दाबात खेचला जात असतानाचा तो वळून पाहतो कि निकिता काय करते आहे. निकीतही त्याच्याकडे पहात असते, लोंढ्यात सरकत असते, ती त्याला हातानेच आत जा अशी खूण करते, त्यानंतर कवी फार काही निरखू शकत नाही, त्याचं मनगट आणि घड्याळ कशावर तरी आपटतं, तो आत झोकला जातो, लोटला जातो आणि प्रतिक्षिप्त क्रियेने हाताच्या वर लागणारे हूक पकडून उभा राहतो. त्याच्या नवशिक्या फाफललेपणाने त्याला काही प्रतिक्रिया मिळतात, त्या इतक्या झपाट्याने येतात आणि जातात, कवी काही पुटपुटतो, दरवाज्याकडे सरकून दाराशी उभा राहतो. त्याचे डोळे स्टेशनचा आसपास निरखत राहतात, घड्याळाची काच तुटल्याचं त्याच्या लक्षात येतं, मोबाईल चाचापल्यावर तो जागच्या जागी असतो.
       स्वतःबद्दल असुरक्षित वाटण्याचा हा भाग कवीने कित्येक दिवसांत अनुभवलेला नाही. आपल्या मेमरीत त्याला दूरपर्यंत असं काही आठवत नाही. त्याला माहित नसलेलं वाटण्याचं ओझं तो झटकून टाकतो. ते त्याच्या बाजूच्यावर जातं आणि बाजूचा उभा असलेला आपले खिसे चपापू लागतो.
लोकल सुरू होते, तो डब्यातून मोठा सामूहिक घोष होतो, ढोलकीवर (अर्थात कवी त्याला ढोलक म्हणतो) थाप पडते आणि लोक भजन गाऊ लागतात. कवी दारातून थोडा झुकत हवा घेत निवांत होऊ लागतो, वस्ती विरळ होते, मग तर नाहीशीच होते आणि नुसत्या प्राकृतिक भूगोलाच्या नकाशासारख्या बाजू दोन्हीकडे ठेवत ट्रेन पुढच्या स्टेशनाला जाऊ लागते.
       पुढचं स्टेशन येतं तेव्हा फलाटावरचा एक माणूस त्याला आत जा, आत जा अशा अर्थाच्या खुणा करतोय असं त्याला वाटतं, पण ह्या खुणांचा अर्थ त्याने नीट सोडवायच्या आत एका खांद्याचा मोमेंटम त्याला आत ढकलतो, त्याचा चेहरा कशावर तरी आपटतो, त्याच्या पुढच्या क्षणी त्याच्या पाठीवर, खांद्यावर दाब पडतो, काही क्षणात तो दाब निसटतो आणि तो एकदम मोकळा झाल्यासारखा होतो. त्याच्या बाजूचा माणूस मोबाईल चेक करत छद्मी हसला असं त्याला वाटतं. त्याची दरवाज्याची जागा आता २-३ प्रवाश्यांनी घेतलेली असते. तो दाराच्या फटीत चेचला गेलेला असतो. कवी तिथून बाहेर पडतो, बसायची जागा उरलेली नसते, तो असाच डब्याच्या मध्ये उभा राहतो. त्याच्या मागचा त्याला सांगतो, त्याला शब्द कळत नाहीत, पण तो डब्यात आतमध्ये सरकतो, ‘ए भोळ्या शंकरा..शंकरा’ ही धून तीव्र होते. गाडी पुढच्या स्टेशनकडे जाते.
              ह्याच्यानंतर काय घडलं ते अंशतः मिथ आणि अंशतः सत्य किंवा अंशतः पुराव्यावर आधारित क्लेम असं म्हणता येईल. कवीच्या मनात ज्या काही धूसर नोंदी सापडलेल्या आहेत किंवा त्याच्याबद्दल अद्याप न लिहिल्या गेलेल्या ओबिच्युअरीमध्ये ज्या नोंदी आलेल्या आहेत त्यानुसार खर्डी ते घाटकोपर हा जो प्रवास नव्या नव्या कवीने केला तो त्याच्या आयुष्यात मूलभूत किंवा अन्य गंभीर विशेषणांनी दाखवता येईल असा ठरला. त्याच्या पुढच्या साहित्यिक आयुष्याचा आढावा घेणाऱ्या एक विस्तृत लेखात, जो ही अजून यायचा आहे, म्हटल्याप्रमाणे जगण्याच्या तरल छटांचा कवी त्या गर्दीत चेंगरून, चिरडून संपला आणि एक विषण्ण पण संवेदनशील, ज्याच्या कविता एकाचवेळी जगणे आणि जगण्याचे समीक्षण आहेत असा एक मेटाकवी उरला. जसं अन्य वेळी होतं तसं हा क्लेम खरा नाही असेही क्लेम आहेत, पण दॅटस नॉट द पॉईंट.
       ज्या धूसर नोंदी सापडतात त्यानुसार कवीच्या आयुष्यात त्याने माणसाची जी एक सुट्टी, तरंगत्या नैतिकतेच्या (म्हणजे मी तुला त्रास देत नाही तोवर तू मला काही म्हणू शकत नाही) आधाराची कल्पना ठेवली होती ती कल्पना एका प्रचंड हिडीस आणि वखवखत्या गर्दीच्या गोळ्यात विलीन झाली. हेही खूप मेटाफिजिकल होत असेल किंवा कळतच नसेल तर असंही काहीजण म्हणू शकतात कि ही नेव्हर हॅड इट इन हिम. एक एक पाय जागा रोवण्यासाठीचा काही मिनिटे अस्तित्वात असलेला पाशवी झगडा ही गोष्ट कवीला निकम्मा करून गेली असे नंतर कोणीतरी अल्युमनी मीटमध्ये म्हटले ही एक तळटीप समजावी. मुद्दा असा आहे कि मुराकामीच्या कादंबऱ्यात जसं एका अयाचित/अवचित/किंवा अशा अन्य क्षणी जसं त्याच्या कथेचं जग आस बदलतं तसा नव्या नव्या कवीचा आस बदलला.  
       तपशील फारसे उपलब्ध नाहीत. कवीची तपशील नोंदवणारी यंत्रणा मधला काही काळ बधीर होती असंच आपण म्हणू शकतो. आणि तपशील नोंदवणारी यंत्रणा जरी नंतर कार्यान्वित झाली तरी तपशील इंटरप्रिट करण्याची कवीची सिस्टीम ही परत जुन्या सेटिंग्जवर जाऊ शकणार नाही इतकी बदलली.
       त्या महिन्याच्या पोएट्री रीडिंग सेशनमध्ये, सेशन हेड टिस्का म्हटली तसं, वन हू वॉज पोएट इज नाऊ अ क्रिटिक, दॅट्स व्हॉट लाइफ डझ टू अस.
--
       पुढे एक वर्षानंतर एका ऐसपैस पसरलेल्या युनिव्हर्सिटीच्या ‘इंटर डिसिप्लीनरी सेंटर फॉर कंटेंम्पररी अर्बन स्टडीज’ नवा नवा कवी संशोधक म्हणून लागला. जसं बरेचदा घडतं त्यानुसार त्याचा गाईड हा त्याच्याच इन्स्टिट्यूटचा सिनिअर होता. हा गाईड ‘कॅपॅबिलिटी अप्रोच टू पेरी-अर्बन डेव्हलपमेंट’ ह्या त्याच्या नव्या आणि पहिल्या पुस्तकाच्या यशात हरखत होता, आणि त्याच्यासोबत संशोधकाने ‘पाळला जाऊ शकणारा क्रूर पशू’ ह्या नावाचा प्रायमरी सर्व्हे डेटा बेस्ड अभ्यास करायला घेतला होता, ज्यात ‘स्वतःला हिंसक बनवायची क्षमता काही एक पातळीला असणं हे फायद्याचं आहे’ हा हायपोथिसिस बिहॅविअरल सायकोलॉजीच्या फ्रेमवर्कमध्ये तपासला जाणार होता.
       एकदा एका कॉन्फरन्सच्या डिनरनंतर निवांत गप्पा मारताना सैलावलेल्या गाईडने डेटा आणि हायपोथेसिस सोडून नव्या नव्या कवी/संशोधक विद्यार्थ्याला काही फंडामेंटल प्रश्न विचारायला घेतले; जसे तू इथे का आला आहेस आणि तिथे का नाहीस. पुढे पसरट झालेल्या चर्चेत नव्या नव्या कवी/संशोधकाने त्याला त्याच्या पिव्होटल म्हणतात अशा आपण वर पाहिलेल्या लोकल प्रवासाबद्दल सांगितलं, त्यावर गाईड काहीकाळ त्याच्याकडे केवळ बघत उभा राहिला, आणि मग एकदम खदखदून, म्हणजे त्याच्या नाकपुड्या फेंदारून त्याचा श्वास लागेपर्यंत हसून हसून त्याला म्हटला ,’त्या भोसडीच्यांनी मला कर्जतच्या फार्महाउसला नेलेला, एका पोरीने रात्रभर माझी बडबड ऐकली आणि सकाळी मला लोकलमध्ये चढवलेला’. मग तो परत हसत राहिला आणि नवा नवा कवी/संशोधक बघत राहिला.  
(क्रमशः)

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...