जर्द जर्द जर्द नशेचे गारूड
उतरते देहावर
अंगभर सोडत तल्लख हलका उबारा
आणि मग हे शहर, हा बेफाम कोलाहल, हे डिजीटल माहितीच्या विटांनी रचलेले
आयुष्य
सारे झंकारून आलेले
बर्फांवर तसू तसू ओघळणाऱ्या नशे,
तू माझ्या रक्तात भिनून जा
माझ्या अस्तित्वव्यापी हलकेपणाच्या जाणीवे
तू माझ्या संज्ञेचा ताबा घे
माझी मलाच नष्ट करीत ,
आपले विलाप मागे सोडीत,
अजरामर व्हायची इच्छा विरघळून जावो
ह्या अल्कोहोलिक प्रार्थनेच्या थेंबात
हे थेंब, जे रुजले तिथे थिजले
जे विझले
हे थेंब, ज्याकडे शहाणे बघत आले कुत्सित असूयेने
आणि वेड्यांनी पांघरले मायाळू गोधडीगत
हे चराचराची भिंत रचणाऱ्या बारमालका,
माझे बिल आज चुकते होईल.
तू उद्या उधार देशील काय?