Wednesday, August 15, 2018

anywhere आणि somewhere


       मध्ये मी Divided: Why We’re living in age of wallsहे पुस्तक वाचलं. जनरली अशा पुस्तकांमध्ये एक इंटरेस्टिंग पार्ट असतो, ज्यात आपल्याला माहिती नसलेल्या, किंवा आपल्याला वाटत नसतं अशा प्रकारच्या काही गोष्टींबद्दल कळतं. पण ह्या इंटरेस्टिंग पार्ट सोबत एक बोरिंग पार्ट येतो तो म्हणजे कसं शांती-अमन असणं महत्वाचं आहे किंवा कसं युद्ध शेवटी वाईट वगैरे प्रकारच्या भंकसचा.
       मी दुसऱ्या भागाला भंकस म्हणतोय कारण आपल्यासमोर उघड पुरावा आहे कि बहुतेक लोकांना असं वाटत नाहीये आणि जे अशी मतं मांडतायेत त्यांचे कशातच स्टेक्स नाहीयेत. म्हणजे भारताने पाकिस्तानसोबत वैर करू नये, निदर्शकांवर गोळीबार करू नये, शेवटी दोन्हीकडे कसे प्रेमळ लोक आहेत असे जे लोक म्हणतात ते ना निदर्शक आहेत ना निर्णय ज्यांना घ्यायचा असे सत्ताधारी आहेत. (हे एक उदाहरण झालं.) तुम्ही जे ह्या जगात बहुसंख्य आहेत अशा लोकांना पाहिलंत तर तुम्हाला जाणवेल कि ते द्वेष, मत्सर, राग ह्यांनी मस्त आहेत. त्यांना खुंखार काही हवं आहे. पण हा एवढा मोठा पुरावा सोडून तुम्ही जर सगळे एकमेकांशी सलोख्याने नांदतील तर कसं जग सुंदर होईल अशी मांडणी करता आहात. पण मुळात ज्यांनी असा सलोखा ठेवावा अशी तुमची मांडणी आहे त्यांच्यात असा सलोखा ठेवायचा गुण असण्याची शक्यता कमी आहे हे दर्शवणारा सबळ पुरावा मात्र तुम्ही दुर्लक्षित करता आहात.
       तर ह्या divided’ पुस्तकात अनपेक्षितपणे अशी भंकस नव्हती. एक प्रकारचे लोक दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा द्वेष करतात ही बाब पाहून लेखक स्टेक्सरहित सात्विक संतापाने थरथरत नाही. तो ते असं करतात ह्याला मानूनच सुरुवात करतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये मुसलमान वाढत आहेत असं म्हणतात त्याला काही शुगरकोट करायला लागत नाही. इस्लाममध्ये बाकी धर्मांसारखी विवेकवादी लाट आलेली नाही हेही त्याला मांडता येतं. पण त्याचवेळी तो हाही पुरावा देतो कि लंडनमधले गैरमुस्लीम आणि मुस्लीम हे मुस्लिमांच्या प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा जास्त मानतात. आणि ह्या त्यांच्या मनात असलेल्या समजाचा त्यांच्या कृतींवर प्रभाव होतो. लेखक हे स्पष्ट म्हणतो कि सीमेवर सुरक्षित भिंती बांधल्याने दहशतवादी हल्ले घटतात, पण त्याचवेळी माणसे भिंती लांघण्याचा अनिवार यत्नही करत राहतात.  
       स्थलांतरितांना होणाऱ्या विरोधालासुद्धा लेखक वेगळ्या पद्धतीने पाहतो. तो म्हणतो कि देशादेशातील व्यापाराने, स्थलांतराने देशाचा फायदा होतो हे मत कोणाचं आहे, तर ते उच्चशिक्षण घेऊन विकसित देशांत राहणाऱ्या आणि आपल्या पेशाचा भाग म्हणून स्वाभाविक जगभर फिरणाऱ्या लोकांचं. पण शहराच्या निम्न-मध्यमवर्गीय भागांत राहणाऱ्या माणसाची नोकरी जाते, त्याचा शेजार बदलून जातो, एकदम वेगळ्या प्रथा-परंपरा त्याच्या शेजारात साजऱ्या होतात आणि तो जिथे जन्मला-वाढला त्याच परिसरात तो उपरा बनतो ही भावना तेवढीच खरी आहे जेवढी नानाविध देश फिरणाऱ्या, मित्र जोडणाऱ्या, स्वातंत्र्याची मते मांडणाऱ्या, उपभोगांच्या वरच्या पातळीवर जगणाऱ्या माणसाची खुल्या जगाची आकांक्षा. सगळ्यांनी बदल आवडूनच घ्यावेत हा एक नवा दुराग्रह आपण जन्माला घातला आहे हे लेखक जाणवून देतो.
       ह्या मांडणीची गरज आहेच. आणि ही मांडणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या, लोकशाहीच्या विरोधाची वगैरे नाही. व्यक्तीस्वातंत्र्याची मांडणी करणाऱ्या लोकांची एक गुलाबी अंधश्रद्धा ही आहे कि लोकांना असं स्वातंत्र्य दिलं की ते अहिंसक, टापटीप सुंदरच असेल. अजिबात नाही. हे ओंगळही असेल, हिंस्त्रही असेल किंवा केवळ गर्दीचा वखवखता गोंधळही असेल. लोकशाहीमध्ये लोक लोकशाही नकोच अशी मागणी करू शकतात आणि अंमलातही आणू शकतात आणि असं घडणं हेही लोकशाहीच मानावं लागेल. किंबहुना लोकांच्या वागण्याच्या विचार करणाऱ्या माणसाने लोक हे असे पाशवी, हिंसेची क्षमता असलेले आहेत असा विचार करून pessimistic मांडणी करणंच योग्य आहे. कारण ती चुकली तर फायद्यात असेल.
       पुस्तक असा अधिक तटस्थ किंवा प्रागतिक दृष्टीकोन घेतं.
--
              Anywhere आणि somewhere हे वर्गीकरण मला अजून एक दृष्टीने जाणवतं. कसं आयुष्य जगावं ह्याचे जे parameters आपण कळत-नकळत वापरतो आहोत त्यातले अनेक parameters हे anywhere लोकांचे आहेत. बौद्धिक आणि भावनिक सुखाचा शोध घेण्यासाठी कुठेही न गुंतलेलं राहणं हाच anywhere गटाचा मूलभूत स्वभाव आहे. आपल्या आई-वडिलांचे गाव/शहर सोडा, देश सोडा, रहायच्या जागा बदलत रहा, आपल्या मित्र-मैत्रिणींना, परिचितांना अनेकानेक वर्षे भेटू नका ही anywhere गटाची व्यवच्छेदक लक्षणं मानावी लागतील. हे ते का करतात? कारण त्यांच्या बुद्धिगम्य कामाचे सुख अशा साध्या सुखांपासून दूर खेचत असते. पण anywhere गटाचा हा बुद्धिगम्य कामांचा सोस त्यांची आर्थिक प्राप्ती आणि भौतिक सुखाची पातळीही उंचावतो. समाजाच्या सुखाच्या भुकेचे ते रोल मॉडेल्स बनतात, जरी ते बाकी समाजापासून वेगळे असतात. Somewhere हे बुद्धिगम्य सुखावर जगू शकत नाहीत, त्यांची सुखाची तहान अधिक जास्त कळपी असते. पण त्याचवेळी त्यांना भौतिक सुखाच्या चढत्या पायऱ्या, यश, हवं असतं जे anywhere होऊनच मिळू शकतं.
       अशावेळी एक नवा गट जन्माला येतो: मुळात somewhere पण पेशाने anywhere. रोममध्ये राहून रोमन न होता आलेले, पण आपल्या मुळांपासून सुटलेले, मागे बघणारे, आपलं belonging जोरकसपणे सिद्ध करणारे, पण त्याचवेळी समाजाच्या somewhere गर्दीपासून अलग सुट्टे तरंगण्याचा फायदा घेत राहणारे लोक, दोन्हीकडचे लोक, nowhere लोक.
--
       Anywhere आणि somewhere हे वर्गीकरण मला भावलं ह्याचं खरं कारण माझ्या आतल्या अनिश्चिततेलाही हा anywhere आणि somewhere चा दायमा आहे. माझ्या मनात आस आहे ती anywhere होण्याची, पण मी जे सर्वांत जास्त enjoy करतो ते सुख, लोकांशी गप्पा मारण्याचे सुख, हे somewhere आहे.
माझं शहर सोडून एकटं राहावं, केवळ बुद्धीच्या सुखाचा शोध घ्यावा हे कधीकधी फार आकर्षक वाटतं. कशाचीही आसक्ती नसलेला anywhere, अनिकेतः स्थिरमति, ही मुक्तीच.
       आपल्या मित्रांसोबत निवांत गप्पा व्हाव्यात, हसून-हसून, किस्से सांगून स्तब्धता यावी आणि मग एकटे चालून चालून यावे, खिडकीतून आपण चालत आलेले रस्ते पहावे आणि हातात पुस्तक घेऊन त्यात रात्र सरावी, जिथे वाटेत कुठेतरी ही मुक्ती यावी.    
       कधी एकांत करावा कधी लोकांताची रीत
       उभ्या जन्माला न मिळे ऐसे प्रारब्धाचे गीत
हा शोक अशाच उमजेच्या वेळेचा असावा.  

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...