मंद झरावा मृत्यू
शब्दांचा प्रहर मिटावा
शोकाच्या उष्ण सुरांनी
जगण्याचा हात सुटावा
शहराच्या मरणासाठी
काळाची वेडी साद
स्मरणांच्या गाभाऱ्याला
प्रतिमांचा खोल निनाद
रस्त्यांच्या कल्लोळाला
ध्येयांची थडगे हसती
कबरीवरती सुकलेली
फुले, फुलांची माती
दृष्टीच्या आडोश्याला
शरीरांचा क्लांत धुराळा
सारी गुपिते लपलेला
हा गर्भगूढ हिवाळा
ह्या स्तब्ध जगाच्या मागे
ही कुठे धुमसते आग
कोणाच्या डोळ्यावरती
ही न सरणारी जाग