Tuesday, June 3, 2014

सिटीलाईट्स: (थोडा/माझा) गंडलेला फोकस

       एकच गोष्ट सांगणारा चित्रपट दोन भाषांत पाहणं ह्यात म्हटलं तर तोचतोचपणा आहे. नवा शॉक काही नाही, नवी किक नाही. पण समजा ती गोष्ट नव्या संदर्भाने सांगायचा प्रयत्न असेल तर मग त्यात उत्सुकता आहे. कारण कुठल्याही गोष्टीत एक असतं घडणं आणि एक असतं तिचे संदर्भ. म्हणजे ‘द गुड, द बॅड अँड ड अगली’ हा चित्रपट पाहिला तर त्याची स्टोरी आहे आणि ती घडते त्या भूगोलाचे, तिथल्या राजकारणाचे, तिथल्या लोकांच्या वागण्यात काही ठाशीव पॅटर्न असतील त्याचे संदर्भ आहेत. जेव्हा केव्हा एखादी स्टोरी दुसऱ्या भाषेत आणि दुसऱ्या संदर्भांत बनवायचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिला नवे संदर्भ कसे दिले जातात हे इंटरेस्टिंग असते. काही वेळा निव्वळ भाषा बदलली जाते. (केवळ भाषा बदलून पण सेम संदर्भात चित्रपट म्हणजे ‘द गर्ल विथ द द ड्रॅगन टॅटू’. पण त्याच्या इंग्लिश व्हर्जन पेक्षा स्वीडिश मूळचा चित्रपट जाम भारी आहे.)
       मध्ये मी असंच ठरवलं की अमेरिकन मूव्ही उगाच काहीतरी ठोकळेबाज स्टोरी आपल्याला दाखवत चालले आहेत. त्यामुळे थ्रिलर असेल, त्यात काहीतरी अनपेक्षित घडण्याची किक असेल तर पहायचं. उगाच त्यांची श्रीमंत पर्सनल दुःख, किंवा आशावादी स्ट्रगल असले ठोकळे पहायचे नाहीत. पण नंतर मला असं जाणवलं की मी ज्या वेब साईट वरून चित्रपटांबद्दल माहिती मिळवत होतो त्याचा केंद्रबिन्दूच अमेरिका असावं असं दिसतंय. ऑस्कर वगैरे पण खरे देशी, केवळ मजा येईल एवढा विदेशी तडका दिलेले प्रकार असं मला वाटू लागलं. माझे गेस खरे आहेत का नाहीत ह्यावर संशोधनपर होण्यापेक्षा मी गुगल सर्च बॉक्स मध्ये कोणत्याही एका देशाचे नाव आणि बेस्ट मुव्हीज असं शोधायला सुरुवात केली. आधी ठळक आठवणाऱ्या देशांची नावे झाल्यावर मग रोमानिया, युक्रेन, चिली अशी नावं करता करता मला अनेक चित्रपट मिळाले. पण गुगल वर चित्रपट कसा असेल ह्याबद्दल रिलाय करणं काही वेळा फसवतं. मग मला आठवलं की माझ्या एका मूव्ही ब्लफ वाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या (पण आता जीवनमानाच्या रेट्याने तसे न उरलेल्या) मित्राने सांगितलेली साईट आठवली, सनडान्स फिल्म फेस्टिवल. आणि तिथे एक नाव मिळालं, आणि थोडकं वर्णन, मेट्रो मनिला.
       इंटरनेटवर (अर्थात कॉपीराईटची मारून) सिनेमा आणि त्याबद्दल सारं काही असेल.
       राजकुमार राव मला आवडला होता तो ‘शैतान’ मधला करप्ट इन्स्पेक्टर आणि ‘गॅंगस् ऑफ वासेपूर’ मधल्या त्याच्या रोलमुळेही. आर्थिक शिस्तीचे प्रयोग आणि वाईट पायरेटेड कॉपी ह्यामुळे त्याचा ‘शाहीद’  बघायचा राहिला. एकदा दररोजचा न्यूजचा ब्रेकफास्ट घेताना मला दिसलं की ‘सिटीलाईट्स’ रिलीज होतो आहे, आणि म्हटलं आहे की शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ वर आधारित आणि मुंबईत घडणारी गोष्ट. चित्रपटाचा ट्रेलर बघून मला वाटलं की कदाचित बऱ्यापैकी फ्रेम टू फ्रेम मेट्रो मनिला उचलला आहे का. परिणाम: मी ‘सिटीलाईट्स’ बघताना सुरुवातीपासून क्रिटीकल होतो.
       चित्रपट आवडला का नाही असा निष्कर्ष न काढता समीक्षकी होण्याचा (आणि मग वैचारिक उत्सर्जन आणि त्यातून निष्कर्ष करण्याचा) चष्मा मला लागलेला आहे. आणि त्या चष्म्यातून, म्हणजे जो पूर्णतः माझा आणि बऱ्यापैकी मी बनवलेला चष्मा आहे त्यातून मला सिनेमा गंडला आहे असं वाटलं. अगदी एक वाक्यात म्हणजे एका महानगरात एका माणसाची गोष्ट असं असणारा मेट्रो मनिला इथे आर्थिक विषमता आणि मुंबईचे स्टिरिओटाईप चित्रीकरण ह्यात जातो. राजकुमार रावला वापरायचा आणि दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्याने त्याला न्यायही दिलेला आहे. पण काहीवेळा तपशिलांच्या मला वाटलेल्या गलत्या इंटेन्सिटी कमी करतात. जसे गावाहून केवळ दोन मिडीयम साईज बॅगांमध्ये कपड्यांचा प्रचंड साठा, भांडी आणि कोरलेल्या भुवया घेउन आलेली बायको, सैन्यात नोकरी केला आहे ह्याबद्दल एक फोटो दाखवला तर बाकी काही विश्वसनीय नसलेला हिरो, १५ हजाराच्या पगारात डान्सबार मध्ये मनसोक्त पिणारे लोक(आपलं असं करायचं राहून गेलं हंसल भाय!), जात आणि सोशल नेटवर्क ह्यांना अनुक्रमे शून्य आणि चुटपुटता केलेला स्पर्श, एका पात्राचे घर दाखवताना दोन वेगळया प्रसंगात दोन वेगळी घरं वापरली गेली अशी माझी वैयक्तिक आशंका, एक वगळलेली उपगोष्ट, हिंदी चित्रपट म्हणजे असलेच पाहिजे अशा सांस्कृतिक बाण्याचे पार्श्वसंगीत आणि मूळ कथेत शेवटी जो हलवू शकेल असा धक्का आहे त्याची केलेली मिळमिळीत अवस्था. असो. उत्तेजनार्थ शाबासकी देता येईल, पण तपशील आणि कथेच्या साच्याबद्दल आणि त्यातून बघणाऱ्याला मिळू शकणाऱ्या रंजकतेच्या परिणामाबद्दल काटेकोरपणा ही बेसिक अट हवी. अर्थात माझ्या निष्कर्षांत मी अगोदर मूळ चित्रपट पाहिला असल्याचे भरपूर मीठ आहे. (आणि तशी एक शंका पण आहे की ‘मेट्रो मनिला’ आणि ‘सिटीलाईट्स’ ज्या प्रकारचा सेक्युरीटी बिझनेस दाखवला आहे तसं मुंबईत करायला मान्यता आहे का? त्यापेक्षा ए.टी.एम. साठी कॅश घेऊन फिरणारे गार्ड्स दाखवता आले असते का?))
--
       माझ्या डोक्यात नंतर एक विचार आला. ‘मेट्रो मनिला’ पाहिल्यावर हे मनिलामध्ये राहणाऱ्या गरीब, व्हल्नरेबल लोकांची प्रातिनिधिक कथा आहे असं मी एकदम गृहीतच धरलं होतं कदाचित. आणि ‘सिटीलाईट्स’ बघताना मी अशा कुरापती काढण्याचा प्रयत्न करत होतो की अरे ही काही प्रातिनिधिक वगैरे स्टोरी नाही. लोक तर ह्यापेक्षा खूप वेगळं जगत आहेत. कदाचित मी चुकतो आहे. मला मनिला बद्दल काही माहिती नाही. कदाचित मूळ चित्रपट ही सुद्धा एक वन ऑफ स्टोरी असेल.
       हे प्रातिनिधिक असण्याचे विचार ही मला माझ्या एैदू शैक्षणिक वाचनाने दिलेली देन आहे. त्याला काही अर्थ नसावा. पण असं वाटतंच मला की खरंच किती लोकांच्या सुखी किंवा भौतिक दृष्ट्या सुखी आयुष्यांत अशी काही गोष्ट असते. फारच कमी. बहुतेक ठिकाणी एक साचा असतोच जगायचा, आणि थोडाफार फरक करता सगळे तेच साचे रेटत नेतात. गोष्ट कुठे असते तर जिथे कोणीतरी एका गतानुगातिक साच्यातून दुसऱ्या साच्यात जायला बघतो, खरचटतो, पोचतो किंवा संपतो. पण असे किती?
       ‘सिटीलाईट्स’ वर एक ऑब्जेक्शन तर मी नक्की घेईल की त्यात गटारे आणि पाईपलाईन, चिंचोळ्या कचऱ्याने भरलेल्या गल्ल्या, १० बाय २० ची घरे आणि त्यांचे पोटमाळे, सार्वजनिक संडास आणि गटार, रस्ता अशा कुठल्याही कडा, कुपोषित प्रकाशात चाललेल्या स्वैंपाक आणि रात्री संबंधित अन्य घडामोडी हे सारं कुठे येत नाही. कुरुपतेचा, माणसाला चिणून त्याचा एका बटबटीत व्यवस्थेतील एक नियमित थडथडणारा प्रत्यय कुठे येत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’ किंवा कॅथरीन बू चे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स’ ह्यात तो आहे, पुस्तकात तर जबरी आहे. आणि तो नसेल तर मुंबईच्या तिसऱ्या स्तराच्या स्लमची गोष्ट, कधी प्रातिनिधिक किंवा जड शब्द घ्यायचा तर वास्तववादी होणर नाही असं मला वाटत राहतं. ‘सिटीलाईट्स’ राजकुमार राववर गोष्टीपेक्षा जास्त प्रमाणात फोकस करते, त्यांचे गावातल्या घरातले, मुंबईमधले आनंद स्लोमोशनमध्ये खास संगीतासह बघताना मला एकदा असंही वाटलं की एवढे आनंदी होते गावांत, स्वतःच्या अंगण, गच्ची असलेल्या घरात मिया-बीबी-मुलगी एवढेच राहणारे कुटुंब, सैन्यात ड्रायव्हर म्हणून नोकरी केलेला (आणि सोडलेला, आणि आधीच्या नोकरीचे काही पर्क्स मिळतायेत असं काही नसलेला) नवरा, मग खरंच कशाला आले मुंबईत? धंद्यात खोट येऊन कर्जात बुडायचा एक प्रसंग थेट शहरात धाडतो का? असं असतं का ह्या थाटाचे एवढे प्रश्न का विचारावेत असंही आहे. ‘चक्रव्यूह’ नावाचा प्रकाश झाचा सामाजिक जाणीवेची शेव पेरलेला भेलपुरी प्रकार पाहून लोक माओवादाबद्दल जाणीवेच्या ढेकर देताना मी पाहिलं आहे. आणि कळला बरं आपल्याला नक्षलवाद अश्या उथळ जी.के. ढेकरांचा मला नंतर त्या ऐकून ऐकून जाम त्रास झाला. त्यामुळे अगोदरच माहितीपूर्ण सामाजिक कायम चूर्णाच्या फैरी मी झाडून ठेवत आहे. होऊ दे साफ..
       गाव, तिथले लोक ह्यांच्याबद्दल एक फुकाचा आनंदी, हूळहूळणारा नॉस्टॅल्जिक दृष्टीकोन मी अगोदर मनात पाळून असे. जसं, जीवनाचं ध्येय काय असेल तर गावांत जाऊन काही सामाजिक स्वरूपाचं काम करणं, गाव खरं, शहर खोटं, खरा भारत खेड्यांत, खेड्यातले लोक कसे साधे, आनंदी, कोणालाही सामावून घेणारे. पुढे माझा च्युत्यापा माझ्यासाठी उघड झाला. त्यातले काही ज्ञानाचे फुगे म्हणजे:
१.       गावातले सगळ्यात गरीब हे काही मायग्रेट करीत नाहीत शहरांत. ते जवळपासच्या प्रदेशांत वर्तुळाकार मायग्रेशन करीत राहतात. गावातील मध्यम स्तरातले घरात थोडी बहुत शेती असलेले, शहरांत काही ना काही नेटवर्क असलेले लोक प्रामुख्याने मायग्रेट करतात. पोटासाठी किंवा स्वप्नांसाठी शहरात येणारे नाहीत असे नाहीत. पण एकूण मायग्रेशनच्या संख्येत ते काही एक अंकी पर्सेंट असतात. मुंबईत प्रत्येक उपनगरात, किंवा महत्वाच्या नाक्यांवर सकाळी हातात पिशवी, जुने शर्ट घेऊन उभे बाया-बापे दिसतात. कोणी साईबाबा किंवा तत्सम भक्त त्यांना सकाळी चहा वगैरे पाजत असतो. मग एक एक करून कोणी कोणी येऊन त्यांना, बहुतांश वेळा गटा-गटाने दिवसभराच्या मजुरीसाठी हायर करतो. ह्या गटात असे पोटासाठी आलेले आणि शहराच्या जवळपासच्या गावांतून ट्रक, टेम्पो मध्ये होलसेल बसून आलेले दोन्ही प्रकार असतात. जातीच्या हायरार्कीमध्ये तळाला असलेले लोक.
२.       ज्याला इनफॉर्मल सेक्टर म्हटलं जातं किंवा फॉर्मल सेक्टर मधली जी कॉंट्रॅक्चुअल नोकरी असते त्यात येणारे मायग्रंट हे ग्रामीण आर्थिक स्तरांमध्ये मध्ये कुठेतरी, अल्प किंवा मध्यम भू धारक, एक्स्टेंडेड  कुटुंबाचा थोडा बहुत आर्थिक आधार आणि शहरांत अपने जात का, अपने गाव का असे नोकरी/धंदा  लावून देण्याइतपत असलेला कोणी का कोणी असलेले असतात. थोडेफार कर्ज, त्याची सोयीस्कर परतफेड ह्या सवलती त्यांना मिळू शकतात.
३.       आनंदी होण्याचा चान्स असलेले लोक तर शेवटी तेच असतात ज्यांचे आई-बाप त्यांच्यासाठी पोटभर  मागे ठेवून जाण्याचा चान्स असलेले असतात. बाकीचे एकतर सतत रडत असतात किंवा अधून-मधून. किंवा आपल्याला काही रडायला नाही म्हणून बाहेरची रडणी उधार घेत असतात.
--
       ‘मेट्रो मनिला’ मध्ये बायको पेसो (फिलीपिन्स चे चलन) भरलेली बॅग घेऊन गावाकडे परतते, हातात नवऱ्याने दिलेलं काहीएक पकडून, मुसमुसत. कदाचित तिच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न सुटला असं एवढं तरी आपण म्हणू शकतो.
       नंतर मी ‘ब्रेकिंग बॅड’ बघून संपवली. आणि आता मला प्रश्न पडतो की समजा एकदम असे लाखो, करोडो रुपये, पेसो, डॉलर्स मिळाले तरी प्रश्न सुटत नाहीत. त्यांची अकाऊंटेबिलीटी हा प्रश्न उरतोच आहे. किंवा मग हे पैसे अगदी सावकाश, नजरेत भरणार नाहीत अशा मार्गाने वापरणं आलं. किंवा मग ते काळ्या अर्थव्यवस्थेत गुंतवणं. म्हणजे ‘सिटीलाईट्स’ मध्ये शेवटी गावी परतलेल्या राखीला पुढचे प्रश्न पडणार आहेत. कदाचित त्याच्याबद्दल काढलेला चित्रपट अस्सल भारतीय असेल आणि प्रातिनिधिकसुद्धा.
       ही एक चोरीची, कोणाला उघड सांगता येणार नाही अशा मार्गाने मिळवलेल्या पैशांची कोड्यात टाकणारी गंमत आहे. असा पैसा मिळवणं हे कठीण म्हणावं, तर त्याचा खरोखर वापर हे अजून कठीण. किंवा मग तो पैसा मिळण्याचा स्पीड एवढा नगण्य हवा की तो वापरताही येईल, आणि उघडकीस येणार नाही. पण मग काय फायदा?
       त्यामुळे मला असं कायम वाटतं की मोठे-मोठे दरोडे, चोऱ्या ह्या काही फक्त चोर करत नसणार. त्याच्यापाठी मिळालेलं घबाड चॅनेलाइज करणाऱ्यांची व्यवस्था असणार. (आठवा:शॉशॅंक रिडेम्प्शन) आणि चोर सापडले तरी ही व्यवस्था सापडणार नाही. ती नावं, जागा बदलत चालूच राहणार. चोरांना काय मिळत असेल अशा चोऱ्या, दरोड्यातून? ५०%, ४०%,३०%?
--
       हे बरंच भरकटून झालं.
       मुंबई, तिची विषम संधींची निर्दय किंवा अनप्रेडिक्टेबल दुनिया, तिच्यातल्या माणसांचं वागणं हा चित्रपटांचा, पुस्तकांचा आवडता विषय आहे. काही पुस्तकं मी वाचली आहेत, काही सिनेमे पहिले आहेत, काही सर्व्हे केले आहेत. मला प्रश्न पडतात:
मुंबईची (बेट आणि उपनगरे) लोकसंख्येची घनता आहे जवळपास २३००० प्रति चौरस किलोमीटर. अगदी मुंबई महानगर प्रदेश (MRR)  पकडलं तरी लोकसंख्येची घनता आहे १८०००. मुंबईची तुलना फार वेळा झाली आहे त्या शांघायची लोकसंख्या घनता आहे ३८००. शांघाय लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठं शहरी एकत्रीकरण (Urban Agglomeration) आहे. ढाकाची लोकसंख्या घनता आहे ४५००० आणि हे मुंबईहून छोटं शहर आहे. दिल्ली शहर एकत्रीकरणाची लोकसंख्या घनता आहे ७४०० आणि शहराची जवळपास ११०००. मेट्रो मनिलाची लोकसंख्या घनता आहे जवळपास १९०००. न्यूयॉर्कची लोकसंख्या घनता आहे १०७००. लंडनची लोकसंख्या घनता आहे ५३००. कलकत्ताची लोकसंख्या घनता आहे २४०००. टोकियोची लोकसंख्या घनता ६०००. (सर्व आकडे विकिपीडिया)
कशाला हे आकडे बघतोय मी? हे आकडे बघून मला केव्हा केव्हा वाटतं की आपण एक अशक्यतेचा पाठलाग करीत आहोत. शहराच्या विस्तारात किती माणसाना किती दर्जाचं आयुष्य देता येईल ह्याच्या काही सांख्यिक मर्यादा असतील. त्याच्यापलीकडे जाऊन जर माणसे शहरात असतील तर त्यांना आपण काय देऊ शकू?
असं निराशावादी असणं चांगलं मानलं जात नाही आणि असा निराशावाद सिद्धही करता येत नाही. कदाचित अशी एक प्रचंड समृद्ध अवस्था असेलही की भौतिक गरजांच्या वस्तूंचं, कच्च्या मालाचं इतकं उत्पादन होईल की त्याची काही वानवा राहणार नाही. स्पर्धा करण्यासाठी जी टंचाई मुळाशी असावी लागते तीच संपून जाईल. पण असं होत नाही तोवर समृद्धीचं स्वप्न, आपल्यापुरता एक निवांत कोपरा बनवून राहण्याचं स्वप्न ह्यावर लाखो, करोडी लोक डाव लावत राहणार. आणि त्यांनी लावलेल्या डावावर राजकारण, साहित्य, चित्रपट, समाजसेवा अशा बाकी गोष्टींचे डाव लागणार. त्यामुळे नसलेल्यांनी असलेल्यांची स्वप्नं बघत राहणं ह्याला पर्याय नाही. ह्या स्वप्नांमधून, त्यांच्या पाठी धावण्याच्या, धडपडण्याच्या तडफडीमध्ये, त्यात येणाऱ्या वैफल्य, फसवणूक, आणि हाताला लागता लागता राहिलेले समाधान ह्यांच्या मधल्या स्पेसमध्ये आक्रंदणारी गोष्ट.
असं आहे का की ज्यांना कधी अशा तडफडीत जावं लागत नाही असा गट ह्या गोष्टींची चव घेण्यात जास्त मजा घेतो. फेसबुकवर माझ्या एका अतिउच्चशिक्षित,फिनान्स मध्ये वगैरे महिन्यास लाख रुपयांची नोकरी करून सध्या बाल संगोपनाचे लोभस फोटो अपलोड करणाऱ्या परिचिताने असा उसासा टाकला होता की हिरोपंतीला अधिक गर्दी होती, सिटीलाईट्स रिकामाच. असं होण्यात काही नैतिक चूक आहे का? असं होतं आहे ह्यांचं एक कारण कदाचित सिटीलाईट्स एका मूलभूत निष्कर्षावर माती खातो तो म्हणजे एन्टरटेनमेन्ट. ‘मेट्रो मनिला’ असं करत नाही. मनिलाच्या हाउसिंग इनइक्वॅलिटी किंवा आर्थिक विषमता ह्यांचे दृश्य किंवा मौखिक धडे देण्यापेक्षा ‘मेट्रो मनिला’ थंड, कोडगी गोष्ट सांगतो. तिचे तपशील साचेबद्ध बांधतो. ‘सिटीलाईट्स’ उगाच गरम अवस्थेत जातो (अर्थात भट्ट कॅम्प आहे म्हणा!) आणि जिथं खरी बीभत्स भीषणता आणता आली असती तिथे नुसतं चुकचुकल्यासारखे करून सोडतो. थोडा अजून रिसर्च, थोडी अजून प्रत्ययकारक ठिकाणी शूटिंग करण्याची निवड असं असतं तर ‘सिटीलाईट्स’चा पुणे-५२ झाला नसता.(हा हा)
समीक्षा (!) अपार्ट, पण तो प्रश्न राहतोच की भौतिक समृद्धीच्या, जीवनाच्या किमान पातळीच्या शाश्वतीच्या अभावात जगणाऱ्या माणसांचा अभाव नष्ट करता येईल असं खरंच शक्य आहे का? समजा असं मानलं की शक्य आहे जर आपण आपल्याला उपलब्ध संसाधने वापरू लागलो, प्रचंड उत्पादन करू लागलो, लोकांना मोठया मोठया कारखान्यात कामं मिळाली असं सगळं. पण मग प्रश्न दुसऱ्या बाजूला जातो, जे ओरबाडले जातील, जे ओरबाडलं जाईल त्याचं काय? आणि समजा कोणीही ओरबाडले न जाता बदल होतील अशी व्यवस्था बनेल असं मानलं तर मग कशाने सुरुवात करणार? आत्ता आहे तो संधींच्या दुर्मिळतेचा साचा बदलण्यासाठी कुठेतरी हातोडा मारावाच लागेल. तो कसा? अर्थात सध्या अवतारपुरुष आलेले असल्याने ह्या प्रश्नांना काही अर्थ नाही. पण आपण आपली धोब्याची भूमिका करू, ती स्वाभाविकपणे येते.
--
       मुंबईतील झोपडपट्ट्या (ज्यांना बहुतेक ठिकाणी चाळ म्हणतात! हा शब्द ऐकल्यावर मला माझ्या मराठी मध्यमवर्गीय सांस्कृतिक ठेव्याचा घोर अनादर केल्यागत झालं होतं. असो!), त्यातील अर्थव्यवस्था, त्यातील इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न्स ह्यांचा वापर विक्रम चंद्राचे ‘सेक्रेड गेम्स’ आणि कॅथरीन बू ह्यांचे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ ह्यांत आहे. सुकेतू मेहता ह्यांचे ‘मॅक्सिमम सिटी’ ह्यातही. माझ्या मते ‘बिहाईंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ सर्वात जबरी. (अर्थात विविध प्रकारच्या साहेबांबद्दल मनात सतत ठुसठुसणारा किंवा सुप्त आदर असलेल्याना पचावयास जड किंवा घातक लिखाण. आणि लोक असे साहेब, भाऊ, दादा का डोक्यावर घेऊ इच्छितात ह्याबद्दल ट्रिव्हिअल थिअरी असलेल्या हस्तीदंती लोकांस मोक्याच्या जागी गुदगुल्या करणारे लिखाण). थोडं अॅकॅडमिक व्हायचं असेल तर राजनारायण चंदावरकर ह्यांचे लिखाण आणि मीरा कोसंबी.
--
       असं होतं रस्त्यावर चालताना कधी, की एखादी चालणारं किंवा कडेला घेतलेलं मूल असलेली बाई, कधी कधी हातात आणि डोक्यावर बॅगा असलेला तिचा नवराही रस्त्यात हरवलेले असल्यागत सामोरे येतात. ‘गावाहून आलोय. काही खायला नाही.’,’गावी परत जायचं आहे, तिकिटाला पैसे नाही’,’वडापाव खायचा आहे’ असं काही ते म्हणत असतात. बहुतेक लोक, त्यांना विविध स्त्रोतातून मिळालेल्या माहितीमुळे असा पवित्रा घेतात की खोटारडे आहेत हे, अॅक्टिंग करतायेत. आणि पैसे देत नाहीत.
       एकदा माझ्या एका मित्राने अशा एका तिकिटासाठी पैसे मागणाऱ्या माणसाला अगदी बारीकसारीक तपशील विचारले, कुठे जायचंय, किती आहे तिकीटाची किंमत. आणि तो माणूस बरोबर सांगतोय हे कळल्यावर त्याला स्टेशनला जाऊन तिकीट काढून दिले.
       असे मागणारे खरे आहेत का खोटे असा विचार न करता मी दरवेळी पैसे देतो किंवा मी काही खात असेन तर खायला. आणि मग परत निवांत माझे एथिकल पझल्स चघळतो.
       ह्या शहरातल्या अशा मागणाऱ्या, गंडलेल्या, खऱ्या-खोट्या सगळ्या लोकांना...
--
(विशेष आभार: कॅफे अण्णा आणि अंतर्देशीय पत्रांच्या काळापासूनचे जुने मित्रवर्य)  

        

                   

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...