Thursday, October 27, 2011

एक एक्स संध्याकाळ



शुक्रवार संध्याकाळ. ऑफीसमधले बरेच जण लवकर निघाले होते. त्याने घड्याळाकडे पाहिले. ६.३० वाजले होते. त्याने समोरच्या कम्प्युटरची स्क्रीन बंद केली. गाण्यांचा आवाजही एकदम कमी केला. आणि हात डोक्यामागे बांधून खुर्चीतच तो मागे झुकला. पुढच्या एका तासात, उद्या-परवाच्या दोन सुट्ट्यांत, मग येणार्‍या अटळ नव्या आठवड्यात काय करायचे ह्यासाठीचे काहीही त्याच्या डोक्यात येत नव्हते. एखादा ट्रेक वगैरे ठरवायला हवा होता. पण लगेच त्याला जाणवलं की त्याला अशी शांतता वगैरे काही नकोय. त्याला असे ठरवायचेच नाहीये काय हवेय ते, फक्त जे हवे आहे ते घडत जावे. एकदम तो जरा मागे जास्त झुकला अन त्याच्या मानेला झटका बसत तो जागा झाला. त्याने एक मोठी जांभई दिली. तो खुर्चीतून उठला. बेसिनपाशी त्याने तोंडावर थोडे पाणी मारले. चेहर्‍यावरून रुमाल फिरवला. आणि ए.सी.च्या थंड हवेत हळूहळू सुकत जाणारा चेहर्‍यावरचा ओलावा घेऊन तो कॉफी मशीनपाशी आला. एक कप नोझलखाली ठेवून त्याने कॉफीचे बटण दाबले. तोच नेहमीचा झर-सर आवाज करत दाट चॉकलेटी रंगाची कॉफी कपात आली. त्याने कपाला हात लावला. कोमट कॉफी. त्याने झटझट दोन-तीन घोट घेतले. आणि मग उरलेला कप तसाच कचर्‍याच्या डब्यात फेकून तो परत खुर्चीपाशी आला.

त्याने कम्प्युटरची स्क्रीन सुरू केली. समोरची एक्सेल शीट मिनिमाइज केली. एकदा मेल पाहिले. न्यूज पाहिल्या. गाण्यांची लिस्ट पाहिली. आणि हीही विंडो मिनिमाइज केली. आता समोर विंडोजचा हिरव्यागार कुरणाचे तद्दन बनावटी चित्र असलेला डेस्कटॉप होता. त्याला असे वाटले की एक गुद्दा मारून ही स्क्रीन फोडून द्यावी. मग ही खुर्ची उचलून मॉनिटरवर  मारावी. मग त्या फुटक्या कम्प्युटरमध्ये जोरजोराने गाणी लावावीत आणि पार कोसळेपर्यंत बेभान नाचावे. त्याच्या नकळत त्याच्या हाताच्या मुठी वळल्या, चेहरा आक्रसला. मान खाली गेली.

हे, नो प्लान फॉर फ्रायडे नाईट? रिया त्याच्या चेयरच्या मागे उभी होती. तिच्याकडे वळून पाहायला तो मागे रेलला, तेव्हा त्याच्या पाठीला तिच्या बोटांचा, तिच्या कोरीव नखांच्या टोकांचा स्पर्श झाला. त्याने उगाच चेहरा हलवला, हो किंवा नाही असे दोन्ही किंवा काहीही न सांगणारा.

”काय? इथेच बसून राहणारेस का मग आज?

त्याला वाटले की हिला ओढावे त्या फुटक्या कम्प्युटरमधल्या ढणाण वाजणार्‍या गाण्यांच्या नाचात. तिचे कोरीव नखांची बोटे असलेले हात पकडून तिला गरगर फिरवावी.

”बोल ना. असं काय बघतोयेस? काय विचार करतोयेस?

तिचा ’बोल ना’ त्याला ऐकू आला. आणि मग इतक्या वर्षांनी आलेल्या बाईकडे बघण्याच्या सराईतपणे त्याने तिला बघितले. तिचे तिच्या काळ्या केसांशी जुळून येईल असा कलर केलेले केस, त्यांचा पद्धतशीर अस्ताव्यस्तपणा. तिच्या शरीराच्या रेषांना चिकटून असणारा तिचा फॉर्मल शर्ट, शुक्रवार म्हणून घातलेली जीन्स, त्याच्याखालच्या हिल्स, त्या फॉर्मल शर्टाच्या  वरच्या बटणातून ती वाकल्यावर दिसणारे क्लीवेज, तिच्या जीन्सची गोलाई, तिचे फारसे न सुटलेले पोट.

तिचे हात, कोरीव नखे अजून तिथेच होते. अशीच तिला ओढावी. तिच्या ओठांना शोषून घ्यावे. तिचा शर्ट टराटर फाडावा आणि एखाद्या माजखोर प्राण्यासारखी तिला...

त्याचे खांदे गदागदा हलवत ती म्हणाली, "एन.सी.पी.ए.च्या शोची दोन तिकिटं आहेत. विनीत येणार होता. पण त्याला उद्या दिल्लीला घरी काम आहे, सो तो दुपारी फ्लाईट पकडून गेला."

म्हणजे आता मी रिकामी जागा भरू. आणि मग तुला घरी सोडू. तू मला सांग की, तो कसा बाकी पोरींशी फ्लर्ट करतो, किंवा तुझ्या आई-बापाचे दिखाऊ दु:खी प्रॉब्लेम मला सांग. आणि हे सगळे झाले की मी माझ्या घरी जातो. आणि झोपतो.

"बोल ना फिलॉसॉफर."

"कोणता प्ले आहे?"

"डिनर विथ फ्रेंड्स. अडल्ट कॉमेडी."

"स्टेजवर सेक्स?"

"शट अप. दे माईट कीस. इट्स प्ले. नॉट सम पॉर्न मूव्ही यू वॉच एव्हरी वीकेंड."

अरे जवानी तो बित गयी. अब पॉर्न का साथ और... त्याने पुढचे वाक्य आवरले.

"ओह्ह, यू मेन आर जस्ट लुकिंग टू लाय डाऊन विथ एव्हरी वुमन..."

"रॉंग. विथ एव्हरी ब्युटीफुल वुमन. आणि यू विमेन आर लुकिंग फॉर वन हू कॅन कम विथ यू फोर प्ले."

"हा. हा. सो फनी. मग येतोयेस का?"  

"चलो. वैसे तिकीट तो खरीदना नही है."   

***

"आवडलं? इट वॉज कूल." ती एन.सी.पी.ए.च्या गेटमधून बाहेर पडताना बोलली. पण तिच्या बोलण्यातून शोला जाण्याआधी असलेली सगळी एक्साईटमेंट निघून गेली होती. 

"हं." तो तिथून बाहेर पडणारी माणसे निरखत होता. आलेल्या एकेक गाड्या गेटमधून बाहेर पडत होत्या. त्यातली माणसे, जी मगाशी नाटकातल्या अडल्ट विनोदाने हसत होती, त्यातली कपल्स, जी आल्यापासून एकमेकांना बिलगून चालत होती, थोडे एकटे-दुकटे जीव, आणि त्यांच्यासारखे काही जण शुक्रवार संध्याकाळ म्हणून प्ले बघायला आलेले.

"नाटकाचा कंटेक्स्ट इथला वाटत नाही. आणि सेक्सचे एवढे एक्सप्लिसीट रेफरन्स," तो चालता चालता म्हणाला.

"कम ऑन. इथे आलेली माणसे पाहिलीस ना? ह्यांच्या घरात होत असेल हे सगळं." ती एकदम, थोडी चिडल्यासारखी म्हणाली.

"काय झालं यार? कूल. नाटक होतं."

"या. बट देन असं काही होऊ शकत नाही असं नाही. आणि एस्पेशली त्यांची भांडणे, मग त्यांची जस्टिफिकेशन्स... असं होतं." ती ठामपणे, जशी काही तीच त्या नाटकातल्या जोड्यांपैकी एक होती अशा ठामपणे, म्हणाली.

"हं. एनीवे, कुठे जायचंय आता? भूक लागलीये?"

"एवढी नाही."

"मग?"

थोडा वेळ ते दोघे तिथेच उभे राहिले. ऑफिसेस बंद झाल्याने फुटपाथ मोकळे होते. मध्येच कोणीतरी उंच उंच इमारतीतून बाहेर पडायचा. समोर गाडी किंवा टॅक्सी यायची आणि त्याला घेऊन वेगाने पुढे जायची. त्याला समुद्रावरून येणारी वा-याची एक झुळूक जाणवली. त्याने तिच्याकडे पाहिले. तिलापण कदाचित तेच जाणवत होते.

"जाऊ या?" त्याने विचारले.

"हं." तिने चालायला सुरुवातपण केली होती.

काहीच न बोलता चालत ते समुद्रापाशी आले. वारा वाढला होता. पिवळ्या उजेडात पसरलेला रस्ता, वेगात जाणा-या गाड्या, आणि दूरच्या किना-यावर दिसणारे शहराचे दिवे. प्रकाशाचे असंख्य चौकोन, इमारतींचे साईनबोर्ड्स आणि ह्या सगळ्या दिसण्यापाठी उमटत असलेला लाटांचा संथ पण सतत आवाज. इथे येऊन एखाद्याला वाटेल की या शहरातले आयुष्यही या रस्त्यासारखे उलगडून पसरलेले आहे, इथल्या माणसांना त्या दूरवरच्या आकर्षक प्रकाशाच्या ठिपक्यांची स्वप्ने पडताहेत आणि त्यांच्या जगण्याच्या लाटांचा आवाज, संथ पण सतत... पण अंग सैलावणारा हा वारा ह्या एवढ्याच जागेत आहे. बाकी कुठे गेले की दरडावणारी, दाबू पाहणारी गर्दी आहे. पुढे पुढे जाऊ पाहणार्‍या आणि त्यासाठी बाकीच्यांना मागे टाकू पाहणार्‍या गाड्यांचे हॉर्न आहेत. पळत पळत रिक्षा, बस, लोकल, नोकरी पकडणारी माणसे आहेत. आणि त्यांच्या जगण्याची लाट सगळ्यावर धडक मारते आहे. सगळे निवांत क्षण त्या कोलाहलाने विस्कटून निपटून टाकले आहेत. हा आत्ता इथे फक्त थोडा वेळ असा आहे, काळजाशी उरून राहणारा.

"किती वेगळं वाटतं ना?" ती बाकीच्या लोकांपासून थोड्या दूर एका जागी थांबत म्हणाली. "बसू या इथे?"

"हं," त्याने हाताने थोडी जागा साफ केली आणि हात गुडघ्यांभोवती गुंफून तो समोर पाहत बसला. ती काही बोलायची तो वाट पाहत होता, पण त्याच वेळी तिने काहीच बोलू नये असे त्याला वाटत होते. बस्स, इथे बसून मनावर जमलेले सारे काही या लाटांच्या अंधारात, त्यांच्यावर तरंगणार्‍या प्रकाशाच्या आभासात सोडून द्यावे आणि मोकळे मोकळे होत जावे असे त्याला वाटले. ती काही बोलली नाही. त्याला स्वतःभोवती एक स्तब्ध आवरण बनते आहे असे जाणवले आणि संध्याकाळपासून आलेली दिशाहीन जाणीव जाऊन एखाद्या संथ सुरावटीसारखे त्याला वाटू लागले. ही अशी वेळ, एखादी वेळ अशी येते ना, जिथे सारे असणे एकमेकाशी जुळून आल्यासारखे वाटते. जसे काही, जे घडत होते ते इथे या कशांत मिटून जाण्यासाठीच. जिथे पोचायचे त्या जागेशी पोचल्याचे फसवे सुख वाटू लागते. ज्या निवांत जाणिवेसाठी सारा खटाटोप, सारी काहिली सुरू आहे ती जाणीव आता आपल्याभोवती पसरली आहे. तिच्यात विरघळत जावे, तिच्यात मिसळून जावे.

त्याने तिच्याकडे पाहिले. तीपण समोर कुठेतरी बघत बसलेली. त्याला वाटले की तिच्या खांद्यावर डोके टेकवावे, तिने अल्लद केसांतून हात फिरवावा, मग हा मागचा मंद प्रकाश जवळ जवळ येत जावा आणि सारे त्यात संपून जावे.

त्याला वाटले की ठेवावेच तिच्या खांद्यावर डोके. ती कोण आहे, तो कोण आहे याचा इथे काहीही संबंध नाही. पुढे तिच्या शरीराशीही त्याला घेणेदेणे नाही. हा फक्त इथल्या क्षणांचा हिशेब आहे. ह्यात कुठला वायदा नाही.

पण तिला हे समजेल कशावरून? कदाचित ती एकदम उठून निघून जाईल. तिच्या लेखी याचा अर्थ काहीही होऊ शकेल.
नाही तर मग ती काय झालं हे विचारात बसेल. ती उगाच समजावायला वगैरे लागेल. आणि तिला समजावताना ज्या नितळ संवेदनेसाठी ती आत्ता हवीहवीशी वाटते आहे ती सारी एकदम अदृश्य होऊन जाईल.

तो नुसताच बसून राहिला आणि तीही, तिच्यातच हरवून गेलेली. तिच्या केसांच्या बटा उडत होत्या आणि तिच्या पापण्यांच्या कडांशी ओलसर प्रकाश चमचमत असलेला. काहीही बोलून तिथला मौनाचा तोल तोडावा असे त्याला वाटेना.

थोड्या वेळाने एक कपल त्यांच्या जवळ तसे जवळच येऊन बसले. कॉलेजमधले किंवा नुकतेच कॉलेज संपवलेले असावेत. त्याचा हात तिच्या खांद्यावर होता. आणि तिने मान टेकवलेली त्याच्या खांद्यावर. त्याचा हात तिच्या खांद्यावर हलकेच फिरत होता, मध्येच तो तिला अजून जवळ ओढत होता. तो त्यांच्याकडे बघतोय हे तिलाही जाणवले आणि तिनेपण त्यांच्याकडे पाहि्ले. मग ती त्याच्याकडे बघून हसली. तोही हसला.

"तूही ब-याचदा आला असशील ना इथे?"

"हो. पण असं नाही."

"अरे, एकदम इतका डिफेन्सीव का होतोयेस? चिल."

"मी येतो जेव्हापण, तेव्हा चौपाटीला बसतो. पण आता ब-याच दिवसात गेलो नाहीये. वीकेंड्सना जावसं वाटत नाही. इतकी गर्दी... आणि असे पी.डी.ए. करणारे."

"तू नाही केलंयस कधी तुझ्या गर्लफ्रेंडला असं किस?" ती त्यांच्या बाजूच्या कपलकडे बघत म्हणाली. ते दोघे किस करत होते. त्याचे हात तिला आवेगाने जवळ ओढत होते आणि तिचेही हात त्याच्या पाठीवर. पण एकमेकांच्या बाजूला बसलेले असल्याने त्यांना ते अडचणीचे होत होते. मध्येच तो मुलगा एखादी चोरटी नजर जवळपास टाकायचा. आणि मग परत तिच्या ओठात गुंतून जायचा.
"बोल ना."

त्याने नाही अशी मान हलवली आणि एकदम मान खाली घालत चेहर्‍यावरचे ओशाळवाणे होकारार्थी हसणे लपवले.

***    

रजनीबरोबर आलोय आपण इथे. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षातली गोष्ट. म्हणजे तेव्हा सहजच तिच्याबरोबर बोलणे, फिरणे वाढले होते. खरेतर त्यांचा ग्रुपच होता. पण त्याला त्या सगळ्यांनी सगळे मिळून करण्याचा कंटाळा यायचा आणि मग त्याला कुठेही न्यायचे असेल तर रजनी पुढाकार घ्यायची.

आता तिचा चेहराही आठवत नाही इतका नीट, आठवते ते फक्त तिचे सडपातळ शरीर आणि तिचा आवाज. तेव्हा आपल्या वाढदिवसाला तिने सी.डी गिफ्ट केलेली एक अन्‌ सोबत एक पत्र. काही सांगणारे आणि बाकी बरेच काही न सांगता समजून घे असे.

काय समजणार होतो आपण तिला. त्या वेळी गर्लफ्रेंड म्हणजे काय हे कळतही नव्हते. पण एकदा तिचा प्रपोज एक्सेप्ट केल्यावर तिच्या शरीराला स्पर्शण्याचा हक्क आहे एवढे कळले होतं. ते पाहतच होतो आपण आसपास.

आणि इथेच पहिल्यांदा तिला कीस केले...हा...हा...कीस... तिच्या ओठांवर घाबरत ठेवलेले ओठ. आणि तिच्या ओठात काहीच नाही, फक्त मूक सहमती. एखाद्या चामडी बाहुलीसारखी ती काही न नाकारता बसलेली सोबत, आणि आपण तिथे होईल तेवढे तिला चाचपडू पाहणारे.

त्याला एकदम आपणच तो शेजारचा मुलगा आहोत असे वाटले आणि आजूबाजूच्या कित्येक नजरा पाहताहेत आपल्याला. आणि आपण तिचे गाल, ओठ, छाती मिळेल त्या सगळ्याला ओरबाडतोय.

तो त्या आठवणींना ढकलू लागला. आणि त्या आठवणी ढकलताना त्याला एकदम सरिता आठवली. तसा क्रमच आहे. रजनी... आणि सरिता.

सरिता नसती तर आपण रजनीलाच लोंबकळत राहिलो असतो. सरितामुळे कळले की रजनी का नकोय आपल्याला. आणि मग एक दिवस आपण तोडून टाकले सगळे. तेव्हा कॉलेजही संपत आलेले. त्यामुळे सोपे झाले सगळे. पण मग सरिता आत्ता का नाही? ‘आय वॉन्ट यू फॉर द वे यू टच माय ब्रेस्ट्स’ म्हणणारी सरिता. आणि मग एकदम एक दिवस ‘तुला फक्त शरीर हवंय माझं. माय ब्रेस्ट्स, माय वजायना. यू नेवर सी ए वुमन बिहाईंड इट असं म्हणून परकी होत गेलेली. आपल्याला ती परकी होत गेल्याचे तेव्हा काही वाटलेच नाही. तसेही तिच्या शरीरात अनाकलनीय डंख उरलेच नव्हते.

या. इट वॉज सो प्लेन ऍण्ड स्ट्रेट. सेक्सने सुरू होणारे नाते टिकणारच नाही. शरीराचे गूढ दडवून ठेवणे हाच नाते लांबवायचा हमखास उपाय आहे. आणि ते गूढ उकलण्याआधी लग्न करा. म्हणजे नंतर शरीरांच्या इतकीच एकमेकांच्या असण्याची, बोलण्याची, वावरण्याची सवय पाडून घ्या. आणि नवीन काही घडणे अशक्य करा.

परत सरिता. तिचे त्याला खेचणारे हात. तिचे सित्कारणारे ओठ. तिच्या अर्धवट उघड्या डोळ्यातली नशा, आणि मग त्या नशेचे शरीरभर पसरत जाणारे गारूड.

सरिताच्या आठवणीने त्याला अंगावर एखादी तर्रार नशा यावी तसे झाले. शरीरातल्या वाढत्या धगीची खूण लपवायला त्याने पायांची हालचाल केली. मग एकदम त्याला जाणवले की सरिताची आठवण यायच्या आधी तो अंगात सळसळणा-या त्या बेलगाम धगीलाच निपटू पाहत होता. आणि सरिताची आठवण येताक्षणी आता फक्त तिच्या अंगात आपल्या अंगातली आग जिरवत जावी असे वाटतेय.

"चलू या?" रियाच्या आवाजाने त्याने तिच्याकडे बघितलं. ती उठून उभी राहत होती. तोपण झटकन उभा राहिला.

"कसला विचार करत होतास? का मिस करतोयस कोणाला?" रिया म्हणाली.

"नाही. बस. असंच. तू तरी कुठे काय बोलत होतीस? आपल्यातच हरवून बसलेलीस."

"हं. त्या नाटकाने उगाच काही काही आठवत राहिलं." ती बोलली आणि मग एकदम हे न ठरवता बोललो असा तिचा चेहरा.

"यू हॅड वेरी पेनफुल ब्रेक‍प?" त्याने विचारलं आणि मग एकदम त्याला वाटलं की उगाच विचारलं. असं काहीसं असणार हे उघडच होतं.

"हम्म. आणि जवळपास अशीच स्टोरी. फक्त त्याच्या बाजूने."

"हं."

"आणि मग भांडणं. आणि इतकी सवय झालेली मला त्याची की त्याच्यामुळे मला हर्ट होतंय हे कळूनही मी बरं वाटायला त्याच्याकडेच जायची."

"मग त्याने कधी असं म्हटलं नाही तुला की, आता काही नाही तरी का येतेस? का तुम्ही ’वी विल रिमेन गुड फ्रेंड्स’ असलं काही ठरवलं होतं?' त्याने खोचून विचारलं.

एकदम काही जिव्हारी लागावं तसा तिचा चेहरा झाला. "माझीच चूक होती ना. पण मी अ‍ॅडीक्ट होते यार जशी काही. एखादा तास जरी त्याचा फोन-मेसेज आला नाही की मी एकदम त्याला शोधायला लागायचे. कदाचित ते फार सफोकेटींग झालं का त्याला? आणि ठाऊक आहे, मी त्याला नेहमी म्हणायचे की असं कोणी तुटून पडत नाही. आपण बरोबर चालायला लागतो. आणि तो म्हणायचा की नाही. काही जण नाही जात पुढे. ते घडून गेलेल्याच्या सावलीत अडकून पडतात. त्याच गडद-अंधार्‍या रंगांची त्यांना सवय होते आणि त्यांना नवं कोणी दिसतच नाही. आणि बघ काय झालं? तो निघून गेला आणि मी तशीच अडकून पडलीये. एवढ्या-तेवढ्याने तो आठवतो. आज तिथे नाटकात आपल्यापुढे एक कपल बसलेलं. आणि जेव्हा-केव्हा ते बोलायचे तेव्हा तो सहज तिच्या केसात हात फिरवत रहायचा. बस. तेवढ्याने सगळं ट्रिगर झालं. आणि मग नाटकातला एक एक संवाद मला मी आधी रीहर्स केल्यासारखा वाटला. आणि ब्रेक-अपनंतर तो इतका नॉर्मल झाला. मला समजवायचा. आणि मग मी रडायला लागले की जवळ घ्यायचा. आणि मग..."

ती बोललीच नाही मध्ये काही वेळ. आणि चालायची थांबून एका जागी उभी राहिली.

"का फक्त साला माझी मजा घेत होता? रिलेशनच्या नावाने दुसरी आणि मीपण... कुत्ते होते यार लडके बस." ती एकदम सगळ्यावर एक खिन्न हसली. त्याला वाटले की आपणही असेच एक कुत्ते. मिळेल ती, दिसेल ती बाई हुंगत जाणारे.

"एकदा अशीच त्याच्या घरी थांबलेले रात्री. सकाळी जाग आली. खिडकीतून प्रकाश येत होता. मी खिडकी उघडली. बाहेर नवा दिवस, फ्रेश दिसणारी दुनिया. मग मला जाणवलं की रेटा देऊन जायला हवं पुढे. मग तशीच त्याला काही न सांगता तिथून निघाले. त्याला फोन केला नाही आणि त्याचा फोन घेतलाही नाही. डीलीट मारलं. पण मध्येच कुठेतरी सगळं परत तिथेच जाऊन पोचतं यार. आय ऍम जस्ट स्टक. डॅम स्टक."

आणि ती एकदम त्याच्याकडे पाठ फिरवून चालायला लागली. ती रडतीये हे लक्षात आल्यावर तो झपाट्याने तिच्या पाठी गेला. त्याला काय बोलावे हे कळेना. मग तो उगाच हलकेच तिच्या खांद्यावर थोपटत राहिला. एकदम तिने त्याला मिठी मारली आणि ती मुसमुसून रडायला लागली. त्यानेही हलकेच तिच्या पाठीवरून खांद्यावर हात ठेवला आणि दुसर्‍या हाताने तिच्या डोक्याच्या मागे थोपटत राहिला.

तिच्या शरीराचे चढ-उतार आता त्याला स्पष्ट जाणवत होते. आणि तिच्या डीओचा वास त्याला लपेटून जात होता. त्याला त्याच्या शरीरात येणारी हलकी, मंद ऊब जाणवू लागली. तिच्या मानेची नितळ त्वचा, तिच्या पाठीवर असलेल्या हाताला जाणवणारी तिच्या ब्राची पट्टी, त्याच्या छातीशी तिचा उष्ण श्वास आणि तिच्या नाकाची सरळ रेष आणि शेंडा. त्याने नकळत तिला अजून थोडे जवळ ओढले.

थोड्याच वेळात ती शांत झाली. मग तिने अलगद त्याच्याभोवतीचे आपले हात काढून घेतले. पर्समधून टिश्यू पेपर काढून आपला चेहरा पुसला. थोडा वेळ ते तसेच चालत राहिले, मागचे क्षण भास वाटण्यासारखे होईपर्यंत.

"जेवायचा काय प्लान आहे?" तिने विचारले.

"तू सांग."

"माझ्या घरी ऑर्डर करू या काहीतरी. चालेल? तू अगदी लेट निघालास तरी तुला ऑटो मिळेल आणि रात्री तुला हार्डली वीस मिनिट्स लागतील घरी पोचायला."

"ठीके."

"आणि आत्ता घरी कसं जायचंय?"

"टॅक्सी करू या इथूनच."

"हं."

तिने हात करून टॅक्सी थांबवली. जवळपास १०.३० होत आलेले. समुद्राजवळ गर्दी तेवढीच होती, पण आता पोराबाळांसह आलेले लोक जास्त होते. त्यांच्या आवाजात, रडण्या-हसण्या-खिदळण्यात मागची संथ सतत लाट ऐकू येत नव्हती. त्याने टॅक्सीत बसण्याआधी सहज ते जिथे बसलेले तिथे पाहिले. त्यांच्या बाजूचे कपल तिथे नव्हते, पण त्यांच्या जरा बाजूला आता अजून एक कपल आले होते आणि तेही असेच एकमेकांत गुरफटले होते. तो स्वतःशीच हसला आणि त्याने टॅक्सीत बसत दार लावून घेतले.

***     

हळूहळू समुद्र, त्याच्याजवळ त्याला काही वेळ सापडलेले स्तब्धतेचे आवरण, हे सारे मागे पडत गेले. मग त्याने खिडकीतून बाहेर बघणे थांबवले. तिच्याकडे पाहिले तेव्हा ती गाणी ऐकत होती. रस्त्याच्या दिव्यांचा प्रकाश काचेतून कोन बदलत तिच्या चेहर्‍यावर येत होता. ती खिडकीवर डोके टेकवून, रेलून बसली होती आणि तिचे ओठ, कदाचित ती ऐकत होती ते, गाणे गुणगुणत होते. तिच्या शर्टाच्या बटणांच्या मधल्या कडांतून तिचे सपाटसे पोट दिसत होते. त्याची नजर आपसूक तिच्या छातीकडे गेली. मग त्याला एकदम वाटले की आपण एखाद्या रिफ्लेक्ससारखे असे कुठल्याही बाईकडे पाहतो, एखादे नवे पुस्तक पाठून-पुढून न्याहाळून बघावे तसे. पण तरीही त्याने तिच्या छातीवरची नजर काढली नाही. तिचा शर्ट तिथे जवळपास फिट बसला होता. मग त्याचे डोळे तिच्या छातीवरून तिच्या शर्टाची कड, तिच्या मांड्या असे फिरत गेले. मग त्याने परत तिच्या चेहर्‍याकडे बघितले.

"ती इतकी काही वाईट दिसत नाही."

त्याला त्याच्या आत एक उग्र कल्लोळ उठतो आहे असे जाणवू लागले. तिच्या आणि त्याच्यातले अंतर विरघळत जावे आणि तिच्या देहाच्या उभारांना स्पर्शावे... मगाशी कुठेतरी मागे पडलेली सरिताची आठवण त्याला परत बोचू लागली. तिच्या शरीराची, त्यांनी एकमेकांना केलेल्या ऊष्ण धुंद स्पर्शाची, तिच्या वेडावून जाणा-या किसिंगची, उन्मादाच्या क्षणी तिचे मिटले डोळे आणि उसासणार्‍या ओठांची चित्रे... आणि त्या क्षणाच्या जर्द-जांभळ्या कैफाची तहान त्याला परत जाणवली.

पहिल्यांदा केव्हा घडलं आपल्यात काही?  

***

त्या दिवशी सरिताच्या घरी. आपण नोट्स द्यायला गेलेलो आणि एका बेसावध क्षणी एकदम सरिताने ओठांवर टेकलेले ओठ. एकमेकांत भिनत जाणारे ओठ. आणि मग मिटले नशीले डोळे. आणि मग तिचे उलगडत जाणे, तिच्या शरीराची किंचितशाही स्पर्शाने होणारी थरथर. तिचे आपले डोके तिच्या छातीशी गच्च दाबून धरणे. आणि मग तिचे शेवटच्या क्षणापर्यंत एका लयीत उसासत राहणे.

त्याला जाणवले की आपले अंग आत्ताही तिथे असल्यासारखे पेटतेय. तिचे दात कानाच्या पाळीवर अजून... त्याने एकदम पाय अजून जवळ घेतले आणि दूर समुद्राकडे पाहून तो ह्या आठवणी दूर लोटायचा दुबळा प्रयत्न करू लागला. पण त्याला परत त्या लोटांमध्येच जायचे होते.

सरिता. आणि तिनेच कसलीही शाश्वती मागितली नव्हती. तिने त्याआधीही फक्त शरीराची गरज म्हणून रिलेशन ठेवले होते.

तिने पहिल्यांदा आपल्यातही सारे जागवले. का आपल्यात होतेच, फक्त आपल्याला ते व्यक्त करायचा धीर दिला.

त्याला सरिता आठवत राहिली, तिचे त्याच्या शरीरभर फिरणारे ओठ, तिची बोटे, तिची दंडात रुतत जाणारी नखे, तिच्या पायांची त्याच्या कमरेभोवतीची मिठी, त्याचे केस विस्कटून टाकणारे तिचे हात, तिच्या स्तनांना कुरवाळणारे, दाबणारे त्याचे हात, एखादा लाव्हा फुटावा तसा येणारा तो क्षण आणि मग तिचे एक पाय आपल्यावर टाकून नुसतेच पडून राहणे.

संध्याकाळी आलेली निरर्थकतेची वावटळ आता कुठेच नव्हती. सरिताच्या आठवणींनी त्याला शरीराला फुटणारे धुमारे जाणवत होते. पुढचे-मागचे क्षण कवटाळून बसण्याला काहीच अर्थ नसतो. आपल्या आत एक एक खरीखुरी जाणीव उमलत असते. तिला प्रतिसाद देत जाणे एवढेच करायचे आहे. जसे आत्ता आपण फक्त एक नर म्हणून शिल्लक उरलोय. आणि ती सारी धग प्रतिसाद देणार्‍या मादीत जिरवत जावी आणि कोसळणार्‍या सुखाच्या क्षणांवर सारे नेऊन ठेवावे. आपण आपल्याभोवती बनवून ठेवलेल्या आणि मग आपल्यालाच डाचणार्‍या सार्‍या जाळ्याला तोडणारी एवढी एकच अस्सल टोकदार जाणीव आहे आपल्याकडे. मनाच्या फसव्या वास्तवाला चिरडून चेचून उरणारे निखळ शारीर सुख. आपल्या अंगांगात असलेली आदिम पाशवी जाणीव, सुखाचे क्षण शोधत जाणारे जगणे आणि संवेदनांच्या तृप्तीच्या तलम आनंदाचे बहर भोगत येणार्‍या क्षणाला येणार्‍या क्षणांवर सोडत जाणे...
 
एकदम त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. अनयाचा फोन होता. तो व्हायब्रेट होणार्‍या फोनकडे बघत राहिला. आपली एक गर्लफ्रेंड आहे आणि असे ठिसूळ नियम आहेत की तिला वेळ दिला पाहिजे, तिचे हवे-नको पाहिले पाहिजे, तिचा फोन कधीही घेतला पाहिजे आणि ग्वाही देत राहिली पाहिजे आपल्या तीव्र भावनांची. तिच्यासाठी एक खोटे चकचकीत आवरण घालून ठेवले पाहिजे स्वतःवर आणि तिचे आवरण जपले पाहिजे. आणि कधीतरी नाव नसलेले पण जाणवणारे नाते आता फक्त एक शोपीस आहे हे तिने किंवा त्याने डोळे उघडून पाहणे टाळले पाहिजे.

मगाशी हवीहवीशी वाटणारी संवेदनांची जहरी तहान आता कुठेच नव्हती. आता फक्त आपण जे करायला हवे आहे त्यापासून भरकटतो आहोत आणि पुढे जाऊन एक निषिद्ध रेष ओलांडून गेल्याचा जुर्माना आपण भरणार आहोत. या सार्‍या मंद, सुखद वेळेचा सूड घेणारे बोचरे प्रश्न, आपण ज्यांना आपले मानून ठेवले आहे ती माणसे विचारणार आहेत आणि आपण अडकणार आहोत आपल्या क्षणिक सुखाशी राखलेल्या इमानात आणि नात्यांच्या दाट, सुरक्षित पण कंटाळवाण्या जगात.

त्याने फोन कट केला. मग झरझर आपण मिटिंगमध्ये बिझी असल्याचा मेसेज त्याने टाईप केला. मग एकदम त्याने फोन खिशात टाकला, एक लांब निश्वास टाकून तो अपराधी भावना मनात खोल कुठेतरी दडवत राहिला. आपण असेच बसलो तर कदाचित आपण हेच आठवत बसू म्हणून त्याने एकदम बघण्याचा कोन बदलून रियाकडे पाहिले. ती त्याच्याकडेच पाहत होती, आरपार सारे समजलेली नजर.

"का घेतला नाहीस फोन?"

"नव्हतं बोलायचं."

"मग हे सांगायचस तिला."

"तिला नसतं कळलं. उगाच प्रश्न विचारत राहिली असती." तो थोडा चिडचिडा होत म्हणाला.

"ओह..." तिची उपरोधिक शांतता. आणि त्या शांततेत त्याला जाणवणारे तिचे टोकदार प्रश्न. तिचे, अनयाचे, त्याचे स्वतःचेच.

तू असा कुठल्याही मुलीसोबत फिरू शकत नाहीस. यू हॅव गर्लफ्रेंड. तुझ्या बाईविषयक सार्‍या गरजांचे एकच उत्तर...

हट. तिला आहेत मित्र... 

पण ती अशी एकट्या मित्राबरोबर फिरत नसते.

शी इज जस्ट युअर गिल्ट. तुला स्वत:हून तिला सोडून जायचे नाहीये. तिला जे आहे ते कसे आहे ते सांगण्याची हिंमत नाही तुझ्यात. आणि तिची सवय तोडण्याचीही. तू फक्त लोंबकळतो आहेस आणि मध्येमध्ये तिच्या शरीराला, तिच्या सोबत असण्याला तुझ्या गरजेशी जोडतो आहेस. तुला तीच हवीये असे नाही.

"डू यू लव हर?" रियाने एकदम विचारले.

"नाही." त्याचे आपोआप आलेले उत्तर. "म्हणजे काहीच नाही असं नाही." आधीच्या उत्तराला त्याने जोडलेली सफाई.

"पण मग..."

"सवय झालीये मला तिची." तिचा प्रश्न अर्धवट ठेवत तो एकदम म्हणाला, "आणि मला ठाऊक नाही की मग परत एकटं राहणं मला जमेल का नाही. मग परत कोणीतरी शोधा. एकमेकांना ओळखण्याची नवलाई संपली की परत तोच सवयीचा बुरखा पांघरा. आय डोन्ट वॉन्ट टू गो थ्रू दॅट ऑल."

"आणि म्हणून तू प्रिटेंड करतोयेस."

"हो. पण ढोंग करणं जमतंय मला. तिला खरं सांगून तिला दुखावणं, स्वतःला झालेली तिची सवय मोडणं, नवीन काही जोडणं, तिला दुखावलं ह्याची गिल्ट हे नाही जमणार मला."

"पण ती तर नुसती खेळवली जातीये."

"वॉट डू यू मीन खेळवली जातीये?" दुखावल्या आवाजात तो म्हणाला. "आय डोन्ट लव हर डजन्ट मीन देअर आर नो इमोशन्स इन मी. शी इज फोकस्ड ऑन हर वर्क ऍन्ड शी नीड्स मी. ऍन्ड आय डू एवरीथिंग दॅट ए कमिटेड मॅन विल डू. खरं काय आहे हे जाणून घेणं तिची गरज नाहीये आणि म्हणून मी तिला सांगत नाहीये एवढंच."

रिया काहीच बोलली नाही. पण त्या ताणलेल्या रबरी शांततेत त्याला स्वतःचे उसने अवसान विरघळताना जाणवत होते.

अशी सगळी सोंग फेकून दिली तर आतला रिकामा चेहरा माझा मलाही ओळखू येणार नाही. अशा कित्येक गोष्टी मी करतोय जिथे मी ढोंग करतोय. नोकरीत मजा येण्याचे ढोंग, आई-बापांवर खूप प्रेम असण्याचे ढोंग. खरेतर हे नाही केले तर काय ही भिती, किंवा न केल्याने दुसरे माणूस कोसळेल ही पोकळ भीती आणि अपराधी भावना म्हणून करतोय. ते फेकण्याची हिंमत नाही म्हणून नाही, तर फेकले तर पांघरायला आपले असे काहीच नाही म्हणून. हे ढोंग हे आपल्यात आपले असे काही नसण्याच्या रिकामेपणाची किंमत आहे.

आणि आत्ता इथे का आलो हे विचारशील तर आय एक्स्पेक्टेड दॅट आय विल गेट चान्स टू फक यू. मला एखाद्या मुलीबद्दल अगदी मुळाशी काय वाटते तर हेच. आणि हेच... बाकी सार्‍या नाजूक वेळांचा, जीवघेण्या ओढीचा शेवट ह्या एकाच जाणिवेत. आधी तिच्या आपल्या शब्दांशी जुळून येणार्‍या शब्दांत, मग तिच्या आपल्याभोवती हव्याहव्याशा वाटणार्‍या अस्तित्वात, आणि मग त्या अस्तित्वाच्या मुळाशी असणार्‍या तिच्या शरीरात. नाही... तिच्या शरीरात. तेवढेच... तेवढेच.

तो एकदम उठून खिडकीच्या ग्रीलवर डोके टेकवून उभा राहिला. त्याला रडायला येत नव्हते, पण ते आत साचून राहिलेले त्याच्या जाणिवेचे प्रतिबिंब कोणीतरी पाहावे, आणि त्या हिडीस प्रतिबिंबापाठी हरवलेले त्याचे तुकडे त्याला गोळा करून द्यावेत.

थोड्या वेळाने त्याला त्याच्या मनगटावर रियाच्या हाताची बोटे जाणवली, आणि त्याच्या दंडाशी तिचे केस. पण त्याच्या खाली झुकलेल्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून दिसणारी तिची कोरीव नखे, भुरभुरणारे केस, टोकदार लांबसडक बोटे यांपेक्षा तिची त्याच्या निरर्थाच्या पोकळीतल्या घुसमटीला असलेली मुकी साथ त्याला जाणवली. आणि एवढा वेळ थांबून राहिलेले पाणी एकदम त्याच्या डोळ्यांशी आले.

***

रियाने समोरच्या प्लेट्स, पिशव्या, चमचे सारे उचलून सिंकमध्ये नेऊन ठेवले.

"चांगलं होतं ना जेवण? ती ग्रेव्ही छान बनवतात ते." ती परत रुममध्ये येत म्हणाली. मगाशी खिडकीशी आलेले स्तब्ध हळवे क्षण, त्यांचे पुसट अस्तित्व त्याला अजून जाणवत होते. आणि आता तिच्यात आणि आपल्यात काहीतरी उमलते आहे, आणि न बोलताही आपण इथे आहोत ते त्या बांधून ठेवणार्‍या जाणिवेनेच.

"फोन नाही आला अनयाचा?"

"मेसेज आलाय. तिच्या ऑफीसमधल्या एका मैत्रिणीकडे हाउसवार्मिंगची पार्टी आहे. आणि उद्या सुट्टी आहे त्यामुळे ती तिथेच थांबणार आहे. सो वी कान्ट टॉक टुनाईट."

रिया काहीच बोलली नाही. आणि परत त्याला त्या शब्दहीन वेळेच्या आत जन्म घेणारे आकर्षण जाणवू लागले. भावनांची, नात्यांची कसलीही मुळे नसलेले, केवळ एकमेकांचे सोबती बनलेल्या स्त्रीपुरुषांचे आकर्षण. एकमेकांच्या एकटेपणाशी जुळून आलेले, आणि त्यामुळे पुढच्या कसल्याही आकाराची शाश्वती न मागणारे. तिच्या मगाशी अनुभवलेल्या स्पर्शात. त्याच्या शेजारी, निकट जाणवलेल्या तिच्या अस्तित्वात.

पण हेही काही नवीन नाही. थोडेफार तपशील सोडले तर ही तीच जुनीच गोष्ट आहे. आणि तुला पार माहीत असलेली. यू हॅव टू लीव नाऊ. शक्यतांची जाळी फेकून मग तूच त्यात अडकण्यापेक्षा तू चल आता इथून.

थांब.

चल.

थांब, काही होणार नाहीये तसं...

चल, तुला तेच हवंय...

थांब, चल, थांब... चल, चल...

"गाणी लावू?" त्याच्या लपलेल्या ओढताणीला छेदणारा तिचा प्रश्न.

"साडेबारा," आपल्या हरवलेपणातून बाहेर येत त्याने घड्याळाकडे बघत म्हटले.

"जाशील रे. रात्रभर मिळतात रिक्षा." तिचा खास लाडीक आवाज आणि तो तिथेच, जावे का न जावे ह्या द्वंद्वात शेवटी न जायच्या निर्णयावर पोचलेला, आधीच ठरल्यासारखा. 

"आय विल चेन्ज ऍन्ड कम." ती त्याचे तिथे थांबणे गृहित धरून गेली.

आता हे मधले रिकामे क्षण. आणि त्याच वेळी ’या वेळी आपण इथे असायला नको होतं’ ही बोच. पण मग कुठे असायला हवं होतं? हरवलेपण जिथे जाऊ तिथे आहेच. तो कोपरा तर गवसलेला नाहीच आपल्याला. जिथे जे आहे ते सारं हवं तसं आहे.

तरीपण इथे नको. ती का थांबवते आहे आपल्याला? तिला फक्त एक टेकू हवा असतो, आणि आपण तो दिला की ती परत तिच्या वाटेवर भिरभिरायला मोकळी. आपण तो काय द्यायचा? आणि अनयाचं काय? यू आर चीटींग ऑन हर.

इट्स नॉट चीटींग. अनलेस आय फक हर...

तू तरी उगाच का थांबला आहेस इथे? तुला शक्यतांची सारी भाकिते उधळून कधीतरी ती बोलावेल त्या वेड्या क्षणाची अपेक्षा आहेच ना?

आहे का नाही?
आहे का नाही?
आहे का नाही?

"कुठे हरवून जातोस रे एकदम?" ती खुर्चीवर बसत म्हणाली.

"हम्म. असंच." तो तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत म्हणाला. तिने शॉर्ट घातली होती. तिच्या गुळगुळीत मांड्या, किंचित मांसल पोटर्‍या, वर टी-शर्ट...

"सांग ना, काय ऐकायचं आहे?"

"काहीही. पण लाऊड नको."

"सो यू वॉन्ट समथिंग रोमँन्टिक" ती एकदम त्याच्याकडे वळून म्हणाली.

"नो. मीन्स आय डोन्ट वॉन्ट एनिथिंग लाऊड."

"ओके बाबा. जैसी आपकी मर्जी."

तिने गाणी लावली. "घन घम घम करे..."

गाणी लावून ती बेडवर येऊन बसली. काही वेळ दोघे फक्त ते गाणे ऐकत होते. ते गाणे संपून नवे लागण्याच्या मधल्या वेळेत ती म्हणाली, "थँक्स. आज संध्याकाळी माझा मूड खूप खराब होता. आय वुड हॅव गॉट मॅड इफ आय वुड हॅव रिमेन्ड अलोन."

"कम ऑन. इवन आय हॅड गुड टाईम. तू असं काही बोललीस की एम्बरेस व्हायला होतं. इट्स ओके." 

ती हसली. आणि मग परत गाणे. थोड्याच वेळात पुढचे गाणे लागले. त्याला शब्द अधून-मधून कळत होते. पण तो वेगाने ओढला जात होता तिच्या बाजूला असण्याने त्याच्या आत घुमू लागलेल्या धुनीत. तिच्या देहाने झंकारलेली त्याच्यातली देहधून. ती डोळे मिटून पडलेली बेडवर. तिच्या पायांची बोटे त्याच्या मांड्याना स्पर्शणारी. कळत किंवा नकळत.

त्याला एकदम वाटले की तिच्या त्या गोर्‍या, नितळ पोटर्‍यांवर हात फिरवावा. तिच्या मांड्यांच्या गोलाईवर थांबलेली तिची शॉर्ट. आणि तिच्या कडांच्या आत जाणवणारी, बोलावणारी हाक. 

आणि मग काय? अधांतराचे चार उन्मुक्त क्षण, आणि मग त्या क्षणांना चौकटीत बसवायची धडपड. किंवा जे घडलेय त्याला आपल्या अपरिहार्यतेचे परिमाण द्यायचा प्रयत्न. 

त्याला एकदम तिथून पळून जावेसे वाटले.

काय आहे या उघड्या पोटर्‍यांत, किंवा अगदी तिच्या मांसल मांड्यांत किवा तिच्या स्तनांच्या तरारलेल्या बोंडांत? तिच्या शरीराला अशी कोणती चव असणारेय जी कुठेच मिळणार नाही. आपण इथे थांबलो आहोत, तो आपल्यात मुरलेला वर्षानुवर्षे वाट पाहणारा अधाशी नर आहे. मादीच्या शरीराचा कवडसाही अधाशीपणे हुंगणारा. आपल्याला मादी हवी आहे फक्त. आणि आपल्याला तिला भोगून निघून जायचेय. तिच्या या मांड्या, सपाट पोटाच्यामध्ये दडलेली तिच्यातली मादी. हवीये ती आपल्याला. ह्या आत्ताच्या वेळेचा तोच एक शक्य शेवट आहे, ती बोलत नसली तरी ती आपल्यातले सारे तंतू छेडते आहे. स्पर्श न करताही मधले अंतर थरथरते आहे आणि आता न सावरणारी ही धून.

"शुड आय ऑफ द लाईट?" त्याने आपसूक विचारले.

तिने मिटल्या डोळ्यानेच हम्म म्हटले.

त्याने लाईट बंद केला.

तिच्या पायांची बोटे. आणि त्याच्या हातांची बोटे, जाणीवपूर्वक तिच्या पायाशी रेंगाळणारी. लॅपटॉपचा निळसर प्रकाश.

पण या क्षणांचा काय हिशेब ठेवणार आहोत? शरीरांच्या रंध्रारंध्रात घुमणार्‍या आवाजाच्या अटळ परिणतीचे क्षण की जाणीवपूर्वक स्वतःचा तोल पिपासेच्या दरीत ढकलण्याचे क्षण?

ऊठ. ऊठ इथून.

आपण खेळवलो जातोय का फक्त? म्हणजे तिला हे सगळेच कळतेय? आणि आपण चुकलो तरी तिला हवेय आणि नाही तर साळसूदपणे ती परत कधीतरी हा खेळ खेळेल. तिच्या शरीराच्या खुणांचा बोलावणारा रस्ता. आणि काहीच माहीत नसल्याचे सोंग पांघरलेली ती.

कदाचित तिच्या लेखी हे असे काहीच नसेल. ती फक्त गाणी ऐकतीये आणि तू तुझ्या वासनेची अपरिहार्यता तिच्या सहजपणाभोवती वेढू पाहतोयेस. आधीही हेच झालेय. सरिताच्या ओठांमागे, तिच्या कसलीही पर्वा नसणार्‍या बेभान मिठ्यांमागे असलेली ती तुला दिसलीच नव्हती. तुला तिच्या शरीरापलीकडे काहीच नको होते आणि तिला मात्र तुला त्या शरीराच्या पलीकडे न्यायचे होते. आणि दर वेळी हेच घडतेय. तुला मादी हवीये फक्त. ऊष्ण रसदार ओठांची, भरदार छातीची, तुझ्या तहानेला ओथंबून जाणारा प्रतिसाद देणारी. पण तिच्या पलीकडे तुला जायचे नाहीये.

ऊठ. ऊठ.

काय चुकणार आहे जर आपण आत्ता केवळ तिच्या शरीरासाठी इथे थांबलो? तिला नको असेल तर ती नाही म्हणेल. शी इज नॉट सम सिक्स्टीन यीअर्स ओल्ड गर्ल.

तुझी कारणे आहेत ही फक्त. तुला ती हवीये एवढेच आहे. आणि तू फक्त तिने ढळायचा क्षण पाहत थांबला आहेस.

मग? काय चूक आहे त्यात? का ओझी घेऊ मी भावनांची? उघड खुला हिशेब आहे हा शरीराच्या जळत्या तहानेचा. तिच्यावर अर्थाचे कातडे आपण बसवतो ताणून.

पण ही तहान असतेच असे कुठे आहे मुळात? हा तर तू आजवर पाहिलेल्या पॉर्न मूव्हीजचा, नकळत्या वयात तुझ्यात भिनलेल्या जाणिवांचा परिणाम आहे? तुला नरमादी ह्यांच्यात घडते काय हे ठाऊक आहेच कुठे? स्त्रीच्या शरीराचे आकर्षण आणि मग त्या आकर्षणाच्या तृप्तीचे साधन एवढीच कोणतीही बाई आहे तुझ्या अर्थी. ऊठ. जा.

पण तो तिथेच बसून होता. गीता दत्तचा आवाज... ‘मुझे जा ना कहो मेरी जान...’ आणि निळसर प्रकाशाच्या विरळ अस्तित्वाने अधोरेखित केलेला स्तब्ध, शांत अंधार. आणि त्या अंधाराच्या एका न दिसणार्‍या टोकाशी थांबून राहिलेले ते क्षण. आणि तोच खुणावणारा रस्ता - ये, ये, अरे ही मदहोशी तर आहे सारं काही. तू नाही पकडलेस हे तर कुठे ह्या क्षणाची स्मरणे तुझा पाठलाग करतील? ये, झोकून दे, त्या धुनेला झंकारू दे. तुझ्या बोटांना, स्पर्शांना, धगधगत्या लालसेला इथेच येऊन मिटायचे आहे. ये, ये... 
ही वासना नाही. ही तर आपल्या वारशात आलेली आदिम हाक आहे. ती आपल्याला तिच्या ओठांत, तिच्या त्वचेच्या रसरशीत तापल्या स्पर्शात पेरायची आहे. ह्यात गैर, वावगे काय? ह्या अंधाराच्या मंतरल्या क्षणाचा तो एक आणि एकच शेवट आहे. सार्‍या जाणिवांचा कल्लोळ आणि मग तो कल्लोळ विरत जाऊन उरणारी सुखाची जहरी लालस जाणीव.

त्याचे हात तिच्या पोटर्‍यांवर फिरले. तिच्या तोंडातून निघालेला उसासा. आणि मग तिने किंचित पुढे झुकून त्याला ओढले आपल्याकडे. तिच्या डोळ्यांत येणार्‍या अविश्वसनीय क्षणांची बेभान हाक. तिच्या बोटांच्या कडांवर उठणारे स्पर्शांचे बेलगाम वादळ. मग तिच्या ओलसर कोमट ओठांत झिणझिणणारे सुख. तिच्या अंगाच्या गंधात मुरत जाणारे श्वास. आणि तृप्तीच्या कडेलोट क्षणाकडे जाणारी वाट.

सरिता, रजनी, अनया... आणि अजून कितीतरी बायका ज्यांच्या शरीराला आपण फक्त कल्पनेत चितारले आहे. ही अजून एक. शरीराची बेगुमान लाट तुला नाचवतीये फक्त. आणि त्या पोकळ नशेची वेटोळी तू चढवून घेतोयेस स्वतःभोवती.

अनयाला काय सांगणार आहेस तू? का तिच्यापासून तू हे सगळे घडले नाही असे लपवू शकशील? ही रात्र स्मरणाचे डंख न ठेवता एखाद्या धुक्यासारखी विरत जाईल? का तू परत परत रियाच्या शरीरात दडलेली तुझी भूक शोधत येशील?

प्रश्नांच्या दरडीखाली त्याला एकदम गुदमरल्यासारखे झाले. रियाच्या भोवतीची मिठी सोडून तो एकदम बाजूला झाला.

"गिल्ट?" निळसर अंधारात रियाचा आवाज. पारदर्शी होत त्याच्या मनात डोकावणारा.

त्याचा एक अस्पष्ट हुंकार. आणि मग एकदम बेडवरून उठून शर्ट घालायची धडपड.

"का? डोन्ट यू वॉन्ट इट? मग का सुरुवात केलीस?"

त्याला आता येणारे तिचे पुढचे प्रश्न दिसत होते. मागच्या चार नशील्या क्षणावर तिला कारणांची झूल चढवायची होती. आणि तो काय सांगणार होता? एकमेकांना वेढत जाणारी ती भूक होती फक्त आपली. आपल्या नरमादी असण्याचा आदिम जुना संबंध. का असल्या कारणांच्या मागे असलेला त्याच्यातला बाईला त्याच्या निसटत्या, धुंदल्या सुखाच्या शोधाचे साधन मानणारा चेहरा? दर वेळी तोच खेळ. आधी चेहरा, मग बोलणं, मग केव्हातरी तिच्या असण्याची जडणारी सवय आणि मग केव्हातरी असाच काही वेडावल्या क्षणाचा साधलेला हिशेब. आणि मग आपण तिच्यातून मोकळे होत जाणे, तिच्या शरीराची लिपी उलगडत जाताना नव्या कोड्याची तहान. आपल्याला आजूबाजूला बाई हवी आहे फक्त. आणि तिच्या शरीराचे खुणावणारे, भुलवणारे आणि मग अलगद विरत जाणारे कोडे. आणि तिला ह्या जर्द शारीर फेसाळ सुखाला कैद करायचं आहे आयुष्यभराच्या सोबतीत. तिला एकमेकांना पुरे ओळखत नसताना स्पर्शाच्या, गंधाच्या, त्वचेच्या लालस चवीतून ओळखत जाण्याच्या वाटेला सवयीचा रस्ता करायचा आहे.

"तुला नको होतं तर थांबवलं का नाहीस?" त्याच्याही नकळत त्याचा प्रश्न. आणि मग तिचे नुसतेच पडून राहणे. तिच्या अंगावरची अस्ताव्यस्त चादर, चादरीतून दिसणार्‍या तिच्या स्तनाच्या उभाराच्या कडा, तिच्या गुळगुळीत काखा. त्याच्यात काहीही खळबळ नव्हती. मगाशी तिच्या कपड्यांच्या आड लपलेले सारे असे समोर असतानाही तो काही क्षण निर्विकार बघत राहिला तिच्याकडे. मगाशी त्याच्या आत सळसळणारी वेडी पिपासा आता एक दुबळा मचूळ प्रवाह होऊन कुठेतरी दडली होती.

निघून जावे ह्या सार्‍यातून. नितळ, पारदर्शी होत जावे. आपल्या अवयवांच्या, वासनांच्या पार उरलेल्या आपल्या शांत ऊबदार कोपर्‍यापाशी पोचावे. आणि मग ह्या अंगाशी रुजलेल्या तहानेचे काय? आज आत्ता हे रिकामे क्षण आहेत म्हणून हे सारे थंडपणे दिसत आहे. उद्या कोणाच्यातरी शरीराचा तुकडा दिसेल आणि मग तोच देहभुलीचा जहरी दंश. परत त्याच अंधार्‍या वळणात शोधलेली चतकोर पण उधळती तृप्ती आणि मग फिके फिके होत एका क्षणी भास वाटणारे सुख. तुझ्या शरीरात हे सारे रुजले आहे, तू जितका उपटशील तितके ते अजून फोफावणार आहे. तुला फक्त त्याच्यामागे जायचेय, तुला वाटतेय तेवढा तू नाहीच आहेस सुटा, मोकळा. तुझे असणे म्हणजे तुझ्या सवयींचा, कैफांचा जटिल पण अटळ हिशेब आहे.

आणि का गुंततो आहेस तू ह्या बरेवाईट ठरवायच्या हिशेबात? तुला फक्त धुंदी हवी आहे जगण्याची पोकळ अर्थहीनता विसरायला. आणि तिचे शरीर तुला देणारे ती. ती तेवढी घे, मिळेल तेवढी ही ऊब पांघर आणि संपली की चालू लाग. चालू लाग...

बधिर झाल्यासारखा तो तिथे बसून होता. मध्ये केव्हातरी गाणी संपली तेव्हा तो एकदम भानावर आला. ती चादर ओढून, कुशीवर वळून झोपून गेली होती. त्याने शर्ट घातला, लॅपटॉप  बंद केला आणि तो दार ओढून घेऊन, फ्लॅटच्या बाहेर आला. कोणीच नसलेल्या जिन्यांवरून उतरत तो रस्त्यावर आला.

शांत, सुनसान रस्ता. रस्त्याच्या मूक करडेपणाला सोबत करणारा पिवळा प्रकाश. इमारतीच्या सावल्या.

त्याला खूप शांत वाटत होते, पण त्याच वेळी त्या शांततेला कुठल्याही आशेची पालवी नव्हती. सारी फुले खुडून, पाने-फांद्या छाटून बोडके झाड मागे उरावे तशी शांतता. तो संध्याकाळपासूनचा वेळ, रिया, त्याच्या मनात येत गेलेली आणि एकमेकांना काटत ओसरत गेलेली वादळे, आठवणी सारे जसे एका अनोळखी माणसाच्या आयुष्यात पाहावे तसे पाहत होता. आणि त्याला सगळ्याला वेढून राहिलेली, ठसठशीत, देहभुलीची गडद रेषा स्पष्ट दिसत होती. आज त्या भुलीच्या पार त्याच्यासाठी रियाचा देह, किंवा अगदी कुठल्याही बाईचे शरीर, कसलाही हुंकार नसलेले अस्तित्व होते; पण जेव्हा ती गडद रेषा त्याच्या असण्याला व्यापणार होती, तेव्हा काही अलवार क्षणांनंतर रिकामे होऊन कोसळण्याची पर्वा न करता तो शरीराच्या नादांत, स्पर्शाच्या रेषांत, श्वासोच्छ्वासांच्या चढत्याउतरत्या बेभान लयीत परत हरवणार होता.

आत्ता मात्र त्या करड्या रस्त्यावरच्या पिवळसर प्रकाशातल्या सावल्यांचा एक हिस्सा होत तो चालत होता.

-पूर्वप्रकाशित रेषेवरची अक्षरे २०११  

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...