Thursday, September 30, 2010

काय झालंय तुम्हाला?

काय झालंय तुम्हाला?
कंटाळा आलाय..
मग? त्यात काय एवढा? मजा येईल असं करा काहीतरी...
पण मला माझाच कंटाळा आलाय....
म्हणजे?
म्हणजे मला 'मी' अशी एक काही कल्पना माझ्यावर लादता येत नाहीये. आता दुसरं काही बनून पाहावंसं वाटतंय.
काय बोलताय तुम्ही हे?
नाही म्हणजे, जाणवतं म्हणजे काय किंवा वाटतं म्हणजे नेमक काय वाटतं असे प्रश्न पडायला लागले आहेत....
तुम्ही पुस्तकं वाचता वाटतं आणि तीही नको ती....
म्हणजे?
तुम्हीच सांगा काय वाचता ते.... सध्या काय वाचताय?
मार्क्वेझचं 'हंड्रेड इअर्स ऑफ सोलीट्युड' .. पण याचा काय संदर्भ....
कळेल... पुढे सांगा...
तेच.... मला कळत नाहीये कि मी नेमका खरा केव्हा असतो....
आणि मध्ये मध्ये तुम्हाला तुम्ही वाचलेल्या पुस्तकातल्या पात्रांसारखा वाटत असेल किंवा तुम्ही लिहित असाल ते त्या पुस्तकातल्या शब्दांची किंवा त्यांच्या अर्थाची फेरमांडणी असेल... असं होतंय का?
हो... तुम्हाला कसं माहित?
राहू द्या... पुढे सांगा... नवे प्रश्न घेऊन उधारी वाढवू नका.
मध्ये मध्ये कानापाशी नुसती गुणगुण ऐकू येते आवाजांची... आणि कुठल्याच आवाजाचा अर्थबोध होत नाही.... आणि जे थोडाफार कळत ते आवाज मी जिथे बसलेलो असतो तिथले नसतातच... खूप आधी कोणी मारलेल्या हाका, कोणाशी मारलेल्या गप्पा...
हं..अजून
किंवा कोणी माझ्याशी बोलत असलं आणि मी त्या माणसाकडे बघितलं कि मला त्या माणसाचे आधी माहित असलेले सगळे संदर्भ मागे पार्श्वभूमीला दिसू लागतात, आणि एखादं विडीओ पाहिल्यासारखं वाटतं....
तुम्ही फ्रेंच वगैरे सिनेमे पण बघता वाटतं... असू दे.. पुढे...
आणि एखादा जुना फोटो बघत असलो कि आजूबाजूने कुठले कुठले धागे येऊन त्या फोटोच्या एक एक कडांना चिकटत जातात, आणि तो फोटो त्या काळाचा एक तुकडा बनून विरघळत जातो असं वाटत रहाता...
आणि?
आणि काही चूक-बरोबर असं पण वाटत नाही. जे वाटतं ते सगळं साहजिक असं वाटतं...
मग? यात काय वेगळं आहे?
नाही पण, आधी असं वाटत नसे.
पण, काही गोष्टी नंतर नंतर वाटण्याच्या बंदच होतात. आपण शिकत जातो...
पण शिकत जाणे म्हणजे चूक-बरोबर हा फरक कळणं ना. असं कशाचंच काही न वाटण्याच्या टोकाला पोचायचा तर मठ्ठ अंधार बरा ना...
तुम्ही लिहिता वगैरे सुद्धा असं दिसतंय...
का? राहिलं...उधारी नको....
पुढे...
पण मग आपल्याला जे वाटतं त्यातलं काय करायचं आणि काय नाही हे कसं ठरवणार... आणि ठरवलं नाही तर मी एकच जागी गोल गोल फिरून कंटाळणार ना...
मग?
अर्थात कुठे ना कुठे तोल ढळतो आणि तसा चालू लागतो मी. पण मग परत इथे येतोच...
इथे म्हणजे?
इथे, जिथे सगळंच चूक किंवा सगळंच बरोबर वाटतं अशा ठिकाणी...
हं.... अजून?
तरी ठीके... चूक-बरोबर नाही कळल्याने एवढा काही विशेष फरक नाही. बौद्धिक मनोरंजन नुसतं..
मग? संपला प्रश्न?
कुठला प्रश्न? मी तर नुसतंच सांगतोय आत्मवृत्तपर ..
बर..बर.. सांगा..
आणि काही वेळा बर्याच जगण्याची ओझी वेताळासारखी मानगुटीला जाणवतात...
कोणाच्या मानगुटीला?
जे काही मी त्या वेळी जगत असतो त्या वेळच्या जगण्याला...
हं...मग?
आणि बर्याचदा चुकीच्या स्टेजवर प्रवेश करून चुकीचे संवाद म्हणत असल्यासारखा वाटतं...
आणि?
आणि तरीही कोणी हाकलत नाही... किंबहुना बरेच जण वेगवेगळ्या नाटकातले संवाद आणि हातवारे करत असतात... आणि तरीही लोक टाळ्या देतात हो...
लोक?
हं... लोक...जे नाटक बघत असतात...
अहो, पण तुम्ही म्हणालात ना कि तुम्हाला नाटकात गेल्यासारखं वाटतं... खरे कुठे जाता?
पण खरा असतोच कुठे मी? नाटकात गेल्यासारखं वाटतं तसा टाळ्या पण वाटणार ना.... सोक्रेतीसाच्या नाटकात गुहेताल्याना कसं कडेशी प्रकाश दिसतो.... शेवटी असतं काय? वाटणं हेच असणं
बर..बर... टाळ्या मिळाल्यावर पुढे?
अहो त्रास होतो टाळ्यांचा... त्यात आपल्या टाळ्या कुठल्या आणि आपण सगळ्या गोंधळात आपलं गोंधळ मिसळला याची बिदागी कुठली हे कळत नाही हो...
अहो, पण तुम्हीच म्हणालात ना कि असं कळलं कशाला हवं....
अहो म्हटलं म्हणून असं असतं का लगेच... जसं चूक-बरोबर नाही, तसं खरं-खोटं तरी कुठे असणार....ज्याच्यावर विश्वास ते खरं असंच ना...
बर.बर....
कधी कधी मी संवाद म्हणताच नाही.. जे वाटतं तेच म्हणतो... अगदी तसंच...
आणि मग?
आणि तेव्हा लोक अजून टाळ्या देतात काय संवाद लिहिला आणि म्हटला म्हणून... त्यांना कळत नाही कि आता मी मटकन खाली पडेन, तर त्यांनी फक्त माझ्या उशाला बसायला हवं... तर ते टाळ्याच मारतात...
तुम्हाला कंटाळा आलाय कि सहानुभूती हवीये....
अनुभूती हवीये फक्त.... देता?
......
आणि एक, इथे तिथे कविता सुचतात...
मग?
आणि मग, एवढे सगळे शब्द नाही हो सांभाळता येत... एवढ्या सगळ्या न जाता आलेल्या गावांची चित्र टांगायला दिवाणखाना पुरतंच नाही हो... आणि मला जायचय घरी, गावाला... त्याचं नुसतं चित्र नाही काढायचं... कंटाळा आलाय...
.....
.....
.....
.....
आहात का? का हेही मीच माझ्याशी....

Wednesday, September 29, 2010

पारदर्शक एकटेपणात

कुणीच सोबतीला नसणाऱ्या
पारदर्शक एकटेपणात
माझा खरं असणंही माझ्यासाठी बनत जातंय
एक सोयीस्कर गृहीतक,
अगदीच हादरून जाऊ नये अस्तिवाचा ढाचा म्हणून

कुणाशी बोलताना मला जाणवत राहतो
मधला तरल पडदा,
आणि समोरचा माणूस बनतो माझ्या मनातल्या
प्रतिमांची नाचती गाती कठपुतली

माझ्या टीचभर कॅनव्हासावर
उमटलेली का निसटलेली रंगनक्षी
आणि मला दिसतात माझेच हात रंगवताना
माझा एक एक अवयव

मितींच्या मर्यादा, काळाचा कायदा
संभ्रमाच्या रेषेवर अर्थाचा वायदा

कुठलाही स्पर्श आता दिसतो आधी मला
आणि मग स्पर्शतो
माझ्या सैरभैर कवितांना दिलंय कल्पनेचं अस्तर
असं होतंय म्हणालो तर निघून जाईल तुमच्या
चेहेर्यावरची ओळ्ख

झोंबी झालाय माझा हसर्या चेहेर्याने फिरणारा
टक्क जाग्या रात्री सुरांच्या वाडग्यात पिणारा

तर्काच्या सुया आणि संदर्भांचे व्हेनटिलेटर
कितीवेळ जगवणार कंटाळ्याचा कोमा

वाजू लागलीये गिटार
आणि मोकळा झालाय रस्ता
आता मला अनोळखीची झूल पांघरुन
भेटायला जाता येईल मला

Tuesday, September 28, 2010

Shadow Lines

भूतकाळ जसा आहे तसा कळतच नाही. जसा वर्तमान उलगडत जातो, तसे भूतकाळाच्या विस्तीर्ण पसरलेल्या आणि बर्याचश्या अनाकलनीय रानात बघण्याचे कवडसे मिळत राहतात. जेव्हा हा भूतकाळ एका माणसाचा नसतो, तर नात्यांच्या मृदू-कोरड्या धाग्यांच्या जाळ्यांचा असतो, तेव्हा तर एखाद्या साध्याश्या घटनेचा अन्वयही सोपा रहात नाही. आणि जर हा त्या आठवणींचा सारीपाट एखाद्या संवेदनाक्षम मनात साठला असेल, आणि आयुष्याच्या विस्तारत जाणार्या परिघात ते मन एखाद्या अबोध भावनेचा किंवा एखाद्या मनाला मुळापासून हादरवून गेलेल्या घटनेचा जेव्हा शोध घेतं, तेव्हा त्या शोधात काय सापडतं ह्या पेक्षा ते शोधत राहणंच गुंतवून टाकते. अमिताव घोष ह्यांची 'Shadow Lines' हा असाच एक शोध, खरतर पाहणार्याच्या स्वतःच्या, आणि त्याने मनाशी अलगद जपलेल्या संवादातून उलगडणारी गोष्ट. केवळ कोलाकात्तात वाढलेल्या आणि मग लंडनच्या रस्तांवर आणि रुंद-अरुंद वळणांवर चालणाऱ्या एकाची नाही, तिला कोलाकात्तामधल्या भद्र बेंगाली आणि ब्रिटीश यांच्या मैत्रीची, ढाका आणि कोलकत्ता या अंतराने जवळ पण इतिहासाने दुरावलेल्या शहरांची, परंपरा आणि स्वातंत्र्य यांच्या ताणात राहणाऱ्या नव्या आयुष्याची तरल पण न पुसता येणारी पार्श्वभूमी आहे. कथेच्या नायकाला, किंवा कथा ज्याच्या माध्यमाने उलगडते त्याला नावच नाही, आणि तसंच असणार ना, कारण हि गोष्ट त्याच्या एकाची करणं म्हणजे काळाच्या ओघात, इतिहासाच्या आणि भूगोलाच्या घुसळणीत हरवून गेलेल्या अनेक कथांना त्या नाहीच असं समजणं. अशा अनेक असू शकणार्या पण सत्य मानण्यासाठी पुरेसे संदर्भ नसलेल्या कथांवर, किंवा त्यांच्यात असणाऱ्या माणसांच्या, त्यांच्या संबंधांच्या खोल डोहावर पडलेला प्रकाश, आणि त्या सावल्यांचा हा नाजूक खेळ, Shadow Lines.
Shadow Lines अमिताव घोष यांची १९८९ ची कलाकृती आहे. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अमिताव घोष यांच्या Wikipedia नोंदीमध्ये त्यांच्या लिखाणाला Indo-nostalgic असं म्हणण्यात आलेला आहे. Shadow Lines मध्ये हा nostalgia तितका दुखरा नाही. लेखकाच्या स्वतःच्या बालपणाची आणि त्यात त्याने मिसळलेल्या संदर्भांची संदिग्ध कहाणी म्हणजे Shadow Lines. Going Away आणि Coming Home अशा दोन वरकरणी विरोधी दिशांना जाणार्या भागांमध्ये गोष्ट उलगडते. पहिल्या भागात नायक, त्याच्या बालपणापासून, त्यावेळच्या नात्यांपासून, अबोध पण मनाशी पक्क्या जपलेल्या भावनांपासून लांब जातो आहे. दुसर्या भागात, नायक जो लंडनमध्ये शिकणारा तरुण विद्यार्थी आहे, तो त्याच्या लहानपणी घडलेल्या एका प्रसंगाला उलगडतो. त्या आधी अर्धवट उमजलेल्या किंवा त्यावेळी मन बधीर झाल्याने उमजूच न शकलेल्या प्रसंगाला समजून घेताना तो केवळ स्वतःच्या बालपणात, त्यातल्या ठसा उमटवून गेलेल्या आठवणीत, त्याच्या व्यक्तित्वाला तासानार्या माणसातून परत एकदा जात नाही; तर त्याच्या भूतकाळाला वेढून असलेल्या, आणि त्याच्या आयुष्यातला घटनांशी अगदी जवळचे पण संदिग्धतेच्या छायेतले संबंध असणाऱ्या इतिहासाला, भूगोलाला, रस्त्यांना, इमारतींना समजूनही घेतो. आणि त्याचं हे समजणं हा त्याने त्याच्याशी लावलेला अन्वयार्थ आहे. त्यात विसंगती आहे, पण त्याच्या आयुष्यात आलेल्या, आणि त्याच्या भाषेत, त्याच्या असण्याचा एक एक भाग व्यापून राहिलेल्या माणसांच्या एकमेकांशी असणर्या संबंधांशी ही विसंगती सुसंगत आहे.
अमिताव घोष यांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य (अर्थात माझा त्यांच्या लिखाणाशी परिचय Shadow Lines आणि The Hungry Tide एवढाच आहे) म्हणजे ते करत असलेली जवळपास सार्या व्यक्तिरेखांची समतल मांडणी. Shadow Lines मध्ये जी काही माणसे आहेत ती सारी, किंवा त्यांच्या सांगणार्याच्या वर उमटलेल्या सावल्या ह्यात एक तोल आहे. प्रत्येकाचे सांगणार्याशी जुळलेले आणि त्याला खुपलेले, दुखावून गेलेले कोपरे खुबीने मांडले आहेत. त्याच्या आठवणींच्या डोहात असलेल्या प्रतीबिम्बांच्या खोलीशी अनुरूप प्रत्येकाचा त्या गोष्टीत वाटा आहे. साहजिक त्यात त्याला आजूबाजूच्या जगाकडे बघायची दृष्टी देणारा त्याचा भाऊ, त्याची मैत्रीण आणि नेमकं काही न होऊ शकलेली चुलत बहिण, त्याचं एकुलता एक असणं जपलेली त्याची आजी, आई, बाबा, आणि तशी त्याची कोणी नसलेली पण त्याच्या आतल्या सावल्यांच्या असम्बद्धतेला प्रत्यक्षाची साक्ष बनणारी एक यांचे तरंग जास्त आहेत. पण माणसा-माणसातल्या गुंतवणार्या, थकवणाऱ्या, फुलवणाऱ्या, निशब्द करणाऱ्या नात्यांनाजसा लेखक स्पर्श करतो तितकाच परस्पर संबंधांच्या दुनियेला प्रत्यक्षाची मिती देणाऱ्या भोवतालालाही त्या जिवंतपणाचा एक भाग बनवतो. कोलकाता, लंडन आणि काहीसं ढाका या तीन शहरांचे रस्ते, गल्ल्या, इमारती, पुतळे, मौसम आणि इतिहास ह्यांच्या प्रसंगी गडद -विरळ छायेतच गोष्ट विणली जाते.
गोष्ट सांगणं म्हणजे आपल्याला हवं ते सांगणं नाही, काय घडला ते सांगणं असही नाही. गोष्ट सांगणं म्हणजे एक tranquil संध्याकाळ उभी करणं. एकदम आलेला काळिमा, आकाशावर आलेली विलक्षण उदासी, गोठून अडकलेला मंद प्रकाश आणि अडकलेली वेळ. आर्त, स्तब्ध होत घरंगळत जाणारी संध्याकाळ. रंगांच्या क्षणभंगुर छटा डोळ्यांच्या दारातून स्मरणांचा तवंग बनत जाव्यात तशीच गोष्ट असते. ज्याची त्याची ज्याला त्याला समजणारी. त्यातला सारखेपणा हा तुमची माझी आयुष्ये ज्या एकच मांजरपाट किंवा मलमलीने बनली आहेत त्यांच्या पोताचा आहे. आणि त्यातलं वेगळेपण हे सांगणार्याचा आहे. जे घडू शकत नाही, घडलं नाही त्याचीच गोष्ट बनते. पण तिचं प्रत्याक्षापासूनचे अंतर जितके कमी, तितकी तिची सावली अधिक खरी. तिचं खरं नसणं तितकं अधिक टोचणारा आणि अशी गोष्ट आपल्या संदर्भात नसण्याचा किंवा त्या गोष्टीतला एक धागा आपला नसण्याचा दाह जास्त. Shadow Lines वाचताना हे आणि याहीपेक्षा अधिक जाणवत रहाते. माणसांच्या अलगद उमलणार्या भावना, आणि त्यांचं कोमेजत जाण, भीती, निषिद्ध आहे त्याला स्पर्शण्याची असोशी, मग येणाऱ्या कल्पिताला सामोरं जाण, गुंतणं, आणि मग तुटण्याच्या हादर्यापासून सावरायला गुंतलो हेच विसरायचा प्रयत्न करणं... आपल्याच सावलीचा माग, आपल्याच रस्त्याचा पाठलाग....
एका रात्री हातात घेतली shadow Lines, एका secondhand बुकस्टाल वर मिळालेली, आणि मग पुढच्या काही रात्री सावल्यांच्या या अबोध- क्वचित परिचित वळणात, रस्त्यात आणि व्याकूळ आसमंतात हरवून गेल्या. काही जागी तर एखाद्या सेपिया डार्क दुनियेत जाऊन पोचते गोष्ट, अलगद छेडलेल्या तारांवर भरून टाकणारे सूर, खरे नसणारे आणि तरीही स्पष्ट ऐकू येणारे.... काही ठिकाणी वास्तवाची अनाकलनीय भयावहता

That particular fear has a texture you can neither forget nor describe.It is like the fear of the victims of an earthquake who have lost faith in the stillness of the earth. And yet it is not the same. It is without analogy, for it is not comparable to the fear of nature, which is the most universal of human fears, nor to the fear of the violence of the state, which is the commonest of modern fears.It is a fear that comes of the knowledge that normalcy is uttterly contingent, that the spaces that surround one, the streets that one inhabits, can become, suddenly and without warning, as hostile as a desert in a flash flood. It is this that sets apart the thousand million people who inhabit the subcontinent from the rest of the world -- not language, not food, not music -- it is the special quality of loneliness that grows out of the fear of the war between oneself andone's image in the mirror

काय सांगणार पुढे. ज्याला त्याला ज्याची त्याची गोष्ट... इतकेवेळा सांगितलेली आणि तरीही पुरती न समजलेली....
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

Monday, September 27, 2010

समोरच्या बाकावर

समोरच्या बाकावर एक भिरभिर डोळ्यांची अल्लड मुलगी
बापाला विचारणारी प्रश्न दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूशी जोडलेला
खिडकीतून बाहेर बघणारी, धावत्या इमारतींच्या लुकलुक दिव्यांना

तिच्या बाजूला मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमलेली तरुणी
शरीराची वळणे जाणीवपूर्वक जपलेली
समोरच्या मित्राच्या डोळ्यात पहात खोडकर हसणारी
त्याच्या स्पर्शाचा शहारा क्षणभरात दडवणारी

तिच्याही बाजूला खिडकीवर कलंडून झोपलेली बाई
स्वस्त साडीच्या झिरझिरीत लपवलेले व्रण
रापल्या चेहेर्याच्या कडांवर थोपावलेल्या चिंता
क्वचित मिळालेल्या एकुलत्या एक खिडकीच्या
अलगद वार्यावर मिटून घेतलेले डोळे

न सापडलेल्या जगण्याचे दंश

अवेळी जन्मलेल्या बालकासारखा सुरु होणारा
प्रत्येक दिवस, आणि जागं होण्याच्या पहिल्या क्षणावर
उमटलेले डंख, कुस्करलेल्या स्वप्नांचे
मग त्यानंतर निसटत जाणारा दिवस, स्वतःच्या प्रतिमांच्या
लंपट पाठलागात
स्पष्टीकरणे आणि गनिमी कावे यांनी उभारलेली सोयीस्कर तटबंदी

गुरफटून घेणं स्वतःला एखाद्या बिनडोक चादरीत
आणि आढ्याकडे बघून प्रोजेक्ट करत राहणं नकोनकोसा भूतकाळ
हव्याहव्याश्या उद्यामध्ये
स्वतःभोवती आखत राहणं मिस्टिक वर्तुळे आणि झाकत राहणं आतला
फाटका कारभार
शब्दांच्या ढीगभर उदबत्त्यांच्या धुरात
शब्दांच्या वळत जाणार्या हारात
दररोज निरोप देणं स्वतःला, आणि नंतर स्वतःच्याच मानगुटीला बसणं
त्रस्त समन्धासारखे

दररोज घेणं वर्तमानपत्री दैनिक उत्तेजक
आणि पळवू पाहणं आपला घोडा भरधाव
शाबित करू पाहणं आपलं त्यांच्यातलं एक असणं
त्यांच्या स्पर्शाचा विटाळ जपत बसताना

अर्थहीन वारुळांच्या गावात बीळ करून राहणं
उपमा-उत्प्रेक्ष्यांच्या काल्पनिक जगात फणा उभारणं,
वास्तवाच्या विस्तवावर पोळलेली कातडी कात म्हणून टाकत

चिंचोळ्या खिंडीवर पहारा देत राहणं
रसद देत राहणं स्वतःला जगत असण्याच्या हमीची

खुरट्या वेदनांच्या लंगड्या कल्लोळात
ओरबाडून घेणं स्वतःला
आणि उसने घेणं बाकीच्यांचे घाव
न सापडलेल्या जगण्याचा दंश होत नाही म्हणून

Sunday, September 26, 2010

यार...

इथे आलो तेव्हा संध्याकाळ कधीच ढळून गेलेली. मित्रांसोबत गप्पात रंगलो तेव्हासुद्धा एका कोपर्यात कधीही वेडसर होणारा एकटेपण ढुश्या मारत होतं. अर्थात आपलं पैसा जात नव्हता खाण्या-पिण्यात, बस मित्राची बडबड ऐकून घ्यावी लागत होती. आणि तेही बरोबर आहे म्हणा, ते माझी वटवट सहन करतात, मला पार्टी देतात, या सगळ्याचा कृतज्ञ म्हणून ऐकलच पाहिजे. किंवा तिथे आहोत असं भासवून आपल्या भोवती न दिसणाऱ्या तंतूंचा एक जग विणत राहिलं पाहिजे, मध्ये मध्ये हसून, एखादी कोटी करून असणं निभावून नेलं पाहिजे. समोरच्याची स्वप्नं पुरी होत असल्याच्या जल्लोषाची मैफिल आहे ही दोस्त, तिथे आपण एक रिकामी जागा भरली पाहिजे, दोन पेग रक्तात मिसळल्यानंतरच्या उष्ण सुखद धुंदीत आपणही एखाद्या अप्रप्याला स्पर्श करून पाहिलं पाहिजे. उद्या जग येईल तेव्हा जे जाणवेल ते जाणवेल, आत्ता तरी आपल्या आतली रिकामी जागा स्वप्नाच्या क्षणिक फुलोर्याने विसरली पाहिजे. आणि मग मित्र निघून गेल्यावर विरळ माणसांची एक लोकल पकडून इथे समुद्रापाशी येऊन बसला पाहिजे. इथल्या वाळूत उरलेल्या रेघात आधी असणारी जिवंत सळसळती बोटे, ओल्या वार्यावर उडणार्या केसांना सावरणारे हात, दूरच्या दिवांच्या तलम धगीवर शिजत आलेले संवाद या साऱ्यांपासून सांभाळून बसलं पाहिजे एका अस्पर्श कोपर्यात... एकही आठवण आठवायला नको या आधी इथे आल्याची....आणि आली तरी केवळ तोंडओळख असलेल्या माणसाकडे फक्त हसून पाहून आपण आपला रस्ता धरतो तसं पुढे जाता आलं पाहिजे....
पोकळ आहे यार जगणं आतून... हे असे पुस्तकांचे, सिनेमांचे, कवितांचे, जगाबद्दलच्या बाष्कळ शुष्क कुतूहलांचे त्यावर चढलेले पापुद्रे...ही समृद्धी नाही यार... हे एखाद्या जीर्ण घरात डागडुजी करून रहावं तसं आहे...घर सोडून बेघर होता येत नाही म्हणून...आपल्या अगदी जवळच्या माणसाचाही सारांश काढता नाही येणार आपल्याला, त्याच्या अशा चार छटा राहतात ज्या आपल्याला पटत, समजत, उमजत नाहीत. मग आपण ज्यांच्या आयुष्यातला एक नेमका दिवसही नाही आहोत अशा असंख्य आयुष्यांचा काय अर्थ लावणार? एखादा प्रश्न जेव्हा सुटत नाही ना खूप दिवस, तेव्हा एक तर तो प्रश्न तितका थोर कठीण असतोच किंवा त्याला आपल्या अर्थाच्या जाळीत सापडणारे उत्तर नसतंच.... ही माणसे अशी का वागतात, पिसाळतात, पाळीव बनतात, लाचार बनतात, स्वार्थाच्या टोकांना जातात, स्वतःला फेकून देतात, आपल्या पुरतंच कुंपण उभारतात, दुसर्याच्या जगण्यात बदल करायच्या ईर्ष्येने झपाटतात, स्वतःला लांघू पाहतात, जगण्याच्या फडताळातला अंधार स्पष्ट करू पाहणारी तत्वज्ञाने उभारतात, आणि मग त्यांचीच तोकडी चादर जिकडे तिकडे ओढू पाहतात. का? याचं उत्तर आज नाही, मागच्या हजारो वर्षाच्या प्रयत्नांना नाही, मग? नसेल उत्तर असं मानलं तर? एक ना एक दिवस येईल उत्तर म्हणून आपण आजच्या अपुर्णतेवर समाधान मानतो, जुगार खेळतो उद्या उद्याच्या अनिश्चिततेवर...आणि हळूहळू पोकळ होत जातो आपल्या केंद्राशी, समोरच्या अपार कंटाळ्याला ढकलायला किडूक-मिडूक धास्त्या आणि त्यांचे किडूक-मिडूक आनंद बनवतो, स्वतःला बेमालूम फसवायला शिकतो आणि झिजत जातो आतमधून...
स्वप्न हवं यार... आणि एका कोवळ्या क्षणी ते सहज पापण्यांवर उतरून जावं... त्याच्या आतुर बोलावण्यावर आयुष्य ओघळून जावं...स्वप्न शोधत नसतात यार...ते रुजून यावा लागतं शिंपल्यात येणाऱ्या मोत्यासारखा....आपल्या शिंपल्यात तो स्वातीचा थेंब अलगद यायला तेवढी एक जागा हवी....
शोधून सापडेल आपलं स्वप्न एवढा दम धरवत नाही आता... अशा शोधानार्यांचीही एवढी गर्दी इथे आणि नंतर त्यांच्या अंदाजे जगण्याचे वरवर कलाबुती पण आतून भयाण कोपरे... असं एक नको यार... त्यापेक्षा खिशात एखादी कविता ठेवून रस्त्यावरचं बेवारस प्रेत होण्यात जास्त मस्ती आहे दोस्त.... हे दुसर्याच्या आयुष्याचे, त्यांच्या नजरेला गवसलेल्या बिलोरी क्षणांचे लोलक लावून मला नाही सजवायचं आपलं आयुष्य,,,अशाने येणार्याला दिपवून टाकता येतं, संदर्भांच्या आतषबाजीने थोडावेळ उजळूनही निघता येतं, पण आपल्या गाभ्याशी असणारा अंधार आपणच जळत उजळायला लागतो.... ती ठिणगी कुठून आणणार? दुसर्यांच्या दुखांच्या शेकोट्या उब देतील एकटेपणाला, पण त्याने आपलं दुख पेट नाही घेत....
चल सोड, बस इथे... ही पश्मिनी रात्र सारं कवेत घेते, हा लाटांचा आवाज सार्या गाण्यांना छेडून उरलेल्या शांततेचा... ह्या वार्यातला स्पर्श, आपल्या माणसाच्या सारं जाणणाऱ्या स्पर्शासारखा... किती वेळ ह्या अपूर्ण शब्दांच्या असंबद्ध दुनियेत धडपडणार दोस्त... किती वेळ...

Friday, September 24, 2010

नको पाठवू असे कितीदा

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

कवयित्री - इंदिरा संत


एकदम हे पत्र वगैरे का आठवलं मला ते आठवत नाहीये, कदाचित तेच जी.ए. -सुनीताबाई वाचत बसण्याचं व्यसन असावं... पण ही कविता वेगळी आहे.... विशेषतः ३ रे कडवे 'शब्दामधूनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन , नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण' आणि शेवट.... वाचायचे राहून जाते....


आपल्याला दुसरं माणूस काय म्हणून माहित असेल ह्याचं उत्तर बदलत चाल्लय... म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो असे कित्येक जण माझ्यासाठी फोन नंबर किंवा मेल आयडी एवढेच आहेत... प्रत्यक्षात भेटले तर कदाचित मी अडकेनच बोलायला... माध्यम समोरच्याकडे बघायचा नजरिया देतं कदाचित... किंवा ते माध्यमच एकूण त्या संवादाची identity बनून जातं

मला समोरासमोर बोलायचय लोकांशी... बोलताना त्यांचे डोळे, नाक, खांदे, बोटं पाहायचेत... कानात त्यांचे वेगवेगळ्या पोताचे आवाज ऐकायचेत... त्यांच्या खांद्यावर थाप मारायची आहे... किंवा आपल्या जगण्याचा सल सांगताना ओलावलेले डोळे पाहायचेत...

उद्यावर विश्वास नाही माझं... आजची तहान आज भागवावी ना... उद्याच्या पावसाने आजची तडफड कशी शमेल... निब्बर व्रण उरेल तिचा... उपहासाची एकटी धार असलेला...

माझ्या शब्दातला काल्पनिक माणूस नाही व्हायचं मला... किवा माझ्या शब्दांची सपाट सावलीही...

.

सार्त्र म्हटलाय एके ठिकाणी 'live your passions before you analyze them' .तुला असं वाटतं का कि एका अर्थाने आपण आपल्या आयुष्यातली माणसंही जगून टाकत असतो...किंवा जगत असतो.. समोरचा माणूस analyze करण्याजोगा झाला कि मला काहीतरी संपल्यासारखा वाटतं... समोरच्यात जितके न समजणारे आणि तरीही बोलावणारे कोपरे राहतात तितके गुंतून राहतो आपण त्या माणसात...आणि इतकी खोल माणसे काही ढीगभर मिळत नाहीत...खरतर आपल्या आयुष्यातले बहुतेक जण रंगीत घोटीव कागदांसारखे काही घड्यात उलगडतात म्हणा, पण नंतर सवयीने आपण त्याच त्याच घड्या बदलून , दुमडून नवं काही शोधू पाहतो...मग तसं काही नाही म्हणून कंटाळतो, चांगले राहायच्या ओझ्याने गिरवत राहतो ओळख... असं माणूस निघून गेला कि दुखावते ती सवय,मिळायचं, सापडायचं सगळं, जवळपास सगळं संपलेलच असतं...


मला सगळंच सांगायचं नाहीये तुला... एखादं पुस्तक कसं संपावं अस वाटत नसतं, मग ते पुरवून पुरवून वाचतो ना आपण... तसं मला आता पुरवत राहिलं पाहिजे आपलं बोलणं. मला लोकांना हात हलवून कोरड्या चेहऱ्याने निरोप द्यायचा ना जाम कंटाळा आलाय... पण तू जर माझी पूर्वीची पानं चाळलीस तर तुला माझं माझ्यांतर्गत होणारं विस्थापन जाणवेल...


Ignorance is bliss म्हणतात ते एकदमच खरय. कळलं कि कंटाळाही येऊ लागतो. कळायला सुरुवात झाली कि हे सगळं संपणार हेही कळतच.. ठाम रोवून ठेवलेल्याखूणेसारखा..


शेवटी मी कोणाशीही बोलतो ते एखादा गर्दुल्ला नशा विकत घ्यायला तडफडतो तसंच... बोलत राहण्याची सवय, मग व्यसन असं झालंय... अगदी स्वतः स्वतःला सांगतानाही मी शब्द वापरतो...दुकानदाराने घरातले किराणा सामान दुकानातून विकत घ्यावे, पावतीसकट तसं...

पत्रही तेच... मला सलग बोलायला एक स्पेस उभी करणं, आणि मग त्या स्पेस मध्ये असण्या-नसण्याची एक आभासी दुनिया विणत जाणे, .... त्या पत्रात गहिरं काही नाही, लीपिरेषांची जाळी नाही, अक्षरांचा ढीग, त्यावर वाढलेले खुरटे गवत.... वाचणारा म्हणजे अगदी आपलं प्रतिबिंब असावा असं समजून लिहित जाण्यात काय होत असेल? वाचणार्याला कळतच नाही, हे कोणाला लिहिलंय नेमका, का चुकीच्या पत्यावर आलंय...

स्वतःच्या दुखाचे अक्षांश-रेखांश बदलले म्हणजे लेखक होता येतं... आणि स्वतःचं सांगणं कोण एकाला न सांगता कागदावरून किवा कसंही करून अंतराळात प्रसारित केलं कि ते वाचता येतं... कारण मग त्या दुखाशी जोडून घ्यायची, त्याला प्रतिसाद द्यायची सक्ती उरात नाही... काय सोय आहे असं लेखक होण्यात... किंवा वाचक होण्यात... पण पत्र वगैरे लिहू नये... किंवा बोलायला जाऊ नये कोणाशी... आपल्या दुबळ्या सांध्यांना आधार द्यायला इतरांच्या असण्याच्या कुबड्या का हो...


सोकावत जातो ना आपण जसे जसे संपलेल्या अनेक संवादांचे सांगाडे आपण स्मरणाच्या काळोख्या दरीत ढकलून देतो... मग नव्या माणसाशी बोलताना आपण अदमास घेत राहतो... लांबवू पाहतो कंटाळा किंवा संपूर्ण उलगडणं...अनेक धागे ठेवतो अस्पष्ट लोंबकळत ... आणि अनेक नाद उमटणार नाहीत याची दक्षता घेतो... निरोप देत नाही पण बोलवतही नाही कुणाला...

तुटण्याच्या वेदनांना इतके घाबरतो आपण... जोडले जाण्याचं विष भिनूच देत नाही पुरते...

Monday, September 20, 2010

Grapes of Wrath

Grapes of Wrath ही जॉन स्टीनबेकची masterpiece मानली जाणारी कलाकृती. अर्थात जॉन स्टीनबेकला असं One piece wonder समजणं चुकीचं आहे. असो. नेहेमीप्रमाणे हा पुस्तक परीक्षण किंवा समीक्षेचा प्रयत्न नाही. मध्ये नुकत्याच मराठीत आलेल्या एका चर्चित कादंबरीवरची मत-मतांतरे वाचत होतो. त्यावर विचार करतानाजाणवलं कि समीक्षा म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या संगड्याची, तिच्या मासांची मीमांसा नव्हे. वीट वीट सुट्टी केल्याने, किंवा प्रत्येक मनोर्याची अलग चिकित्सा केल्याने एखाद्या महालाचे सौंदर्य सापडणार नाही. एखाद्या गोष्टीच्या सौंदर्याची अनुभूती ही तिच्या मनात पडणाऱ्या प्रतीबिम्बावर, पर्यायाने मनाच्या नितळ-गढूळपणावरही अवलंबून असते. आणि जगात खात्रीने बोलायला सर्वात कठीण किंवा अशक्यच गोष्ट कुठली तर दुसर्या माणसाच्या, विशेषतः मनाचे अनेक स्तर असणर्या लेखाकसादृष्य माणसाच्या मनाचं अनुभूती काय असते हे समजणं. त्यामुळे काही वस्तुनिष्ठ मापदंड लावून सौंदर्य अजमावता येईल किंवा त्याची तुलना करता येईल हा निव्वळ कल्पनाविलास. एखाद्या कलाकृतीने भाषेला काय दिलं हे सांगू पाहणं म्हणजे सिंहगड बांधल्याने महाराष्ट्राचा काय फायदा झाला असं काही विचार करण्यासारखे आहे. असो. मला धुळवड खेळायची नाही. पण सौंदर्य हे त्याला पूरक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं कितीही सुंदर असलं तरी ते विवाहात वाजवत नाहीत. सांगायचं उद्देश हा कि जे लिहितोय ते सौंदर्याची चिकित्सा नाही, तर त्यातली मजा घ्यायला मदत करणारी पार्श्वभूमी मांडायचा प्रयत्न आहे.
Grapes of Wrath ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत शेतकरी कुटुंबांची जी massive स्थलांतरे झाली त्याची लाक्षणिक आणि तरीही खूप मोठा आवाका असलेली गोष्ट. लेखकाने कादंबरीची रचना एका गुम्फणीने केली आहे. जणू अमेरिकेच्या वेगवेगळ्या टोकांपासून कालीफोर्नियाकडे जाणार्या कुटुंबांच्या तांड्यावर आकाशातून कोणी बघतो आहे. मग त्यांचे तांडे, रात्रीच्या त्यांच्या वस्त्या, त्यांचा दाटीवाटीने राहणं, त्यात उमटणारे त्यांचे हेवे-दावे, हळूहळू एका मोठ्या दुखाशी जुळत जाणारी त्यांची छोटी-छोटी सुख-दुखे, त्यांचा क्षोभ, त्यांचा तुटत जाणे आणि एका क्षणी त्यांच्यातल्या काही जणांनी या अनावर अगतिकतेला त्यांच्या त्यांच्या परीने तोंड फोडणं. एका आड एक प्रकरणात लेखक हा macro view मांडतो. त्याच्या मधल्या प्रकरणात उमटत रहाते जोड कुटुंबियांची गोष्ट. ही गोष्ट प्रातिनिधिक आहे, पण त्याचवेळी पडझडीच्या कोसळक्षणी सुद्धा जिवंत राहणाऱ्या मानवी आशेची, एकमेकांना सांभाळत जगू पाहणाऱ्या साध्य पण पक्क्या माणसांची exceptional कहाणीही आहे. काही ओळीत सांगता यावं इतक्या सोपी आवाक्याची गोष्टच नाहीये ही. जी.ए. कुलकर्णी म्हणतात, तसे ह्यात लावलेले स्टेक्स इतके भव्य आहेत कि ते पाहूनच छाती दडपून जावी. मग ह्या स्टेक्स मधून काय निघतंय हे पाहणं अजून वेगळी गोष्ट. स्टीनबेकने कहाणीचे कोपरे खुबीने उभे केले आहेत. मोठी-मोठी वाक्ये, शब्दांची आतिषबाजी ही त्याची शैली नाही. सुरुवातीच्या प्रकरणात, एक संपूर्ण प्रकरण रस्त्यावरून चालणाऱ्या कासवाच्या वर्णनात आहे. त्याची एक एक हालचाल त्याने शब्दबद्ध केली आहे. आणि नंतर हीच अचूकता त्याने माणसांच्या हालचाली, भावना पकडताना ठेवली आहे.
माणसाचे 'मी' आणि 'आम्ही' आहे दोन स्तर असतात. ते नेमके कुठे आणि किती घट्ट एकमेकांशी जोडलेले असतात हे सांगणं कठीण आहे. Aristotle ने म्हटल्याप्रमाणे It is difficult to be a man and a citizen at the same time. शेवटी कुठलीही भव्य कलाकृती ही अशा अनेक 'मी' आणि 'आम्ही' ह्यांच्यातला संघर्ष असते. माणसाचे अंतिम साफल्य पूर्णपणे 'मी' होण्यात आहे का अंतिमतः तो 'मी' एका 'आम्ही' चा अंश आहे याची जाणीव होण्यात आहे, ह्याचा धांडोळा कुठलाही खरा लेखक घेऊ पाहतो. समाजाचा विचार करणारी अनेक माणसे 'आम्ही' च्या कृत्रिम रचना उभ्या करू पाहतात. आणि अंतिमतः त्या रचना स्वार्थाच्या म्हणजे 'मी' च्या गोंधळाने कोसळतात. Cannery Rows, In Dubious Battle यामध्येही स्टीनबेकने याच 'मी' आणि 'आम्ही' चा शोध घेतला आहे. आणि या शोधात शेवटी एक सत्य नाही, तर एक परस्परविरोधी, वेदनादायी पण सुंदर अशी जाणीव गवसणार आहे याची त्याला जाणीव आहे. हा 'मी' आणि 'आम्ही' चा खेळ दाखवायला इथे लेखकाने Tom Jode आणि त्याची आई, कथेत 'मा' ही दोन पात्रे वापरली आहेत. Tom चार वर्षे तुरुंगवास भोगून घरी येतो तेव्हा बाकी कुटुंबीय सामान-सुमान बांधून कालीफोर्नियाला जाण्याची तयारी करत असतात. Tom त्यांच्या बरोबर जायला निघतो. इथवर त्याच्यात 'आम्ही' कुठेच नाहीये. पण रस्त्यात त्याला त्यांच्यासारखी हजारो कुटुंबे पोटापाण्यासाठी आणि सुखी आयुष्याच्या स्वप्नासाठी हजारो मैलांचा प्रवास करताना, कोलामाडताना, पिचताना, आणि तरीही चिवटपणे जगताना दिसतात. तिथे त्याच्या आतला 'मी' हळूहळू विचार करू लागतो. गोष्टीच्या शेवटी अशा कुटुंबाना संघटीत करून लढा द्यावा अशा वेडाने तो कुटुंब सोडून जातो. 'मा' मधला 'मी' सुरुवातीला कुठेच उमटत नाही, एक अलवार क्षण सोडून, जेव्हा ती घर सोडण्याआधी माहेरून आणलेली एक पेटी बघते. पण मग ती ती पेटी तिथेच सोडते आणि परत 'मा' बनते. रस्त्यात तीच सार्या कुटुंबाला एक धरून ठेवते, खरंतर ह्याच प्रवासात हे कुटुंब हळू-हळू विखरत जातं. आधी तिचे सासरे, मग सासू मरतात. एक वेडसर मुलगा मी नदिकीनार्यालाच राहणार असं ठरवून निघून जातो. जावई गर्भार बायकोला सोडून पळून जातो. नवरा खचतो. दीर वेडसर होतो. Al, Tom चा धाकटा भाऊ होऊ घातलेल्या बायकोच्या कुटुंबाबरोबर रहायचे ठरवतो, आणि शेवटी Tom ही निघून जातो. उरते ती मृत मुलाला जन्म दिलेली मुलगी, खचलेला नवरा, वेडसर दीर, संपलेले पैसे, संपलेलं अन्न, आणि पुराच्या तडाख्यात वाहून गेलेला रोजगार. आणि तरीही 'मा' 'मा'च राहते. कादंबरीचा शेवट विलक्षण आहे, इतक्या टोकाच्या क्षणीही माणसातली माणूसपणाची जाणीव टिकू शकते, आणि 'मा' सारखी खरंतर एक सामान्य गृहिणी अशा जाणीवेने कृती करू शकते हे सगळंच मनावर उमटून जातं...
कथेच्या ह्या प्रवासाएवढेच मध्ये मध्ये स्टीनबेक जे milestone देतो तेही लक्षात राहून जातात. ह्या गोष्टीत जेव्हा जेव्हा आनंद उमटतो, तेव्हा हा क्षणभंगुर आहे ही जाणीवही उमटते. ती हजारो पिचली माणसे सुखाचे काही क्षण जगू पाहतात. वाड-वडील जिथे वर्षानुवर्षे जगले तिथून आपण निखळलो, दोन वेळचा पोटभर जेवण मिळत नाही, मुलांना हवं ते खेळणे घेऊन देता येत नाही, बायकोला मिठी मारण्याइतकीही मोकळी जागा स्वतःची नाही, गळणारं पाणी थांबवता येत नाही आणि कोरड्या जागेचं घर नाही अशी सगळी माणसे. पण आपण राबू, काहीतरी शिकू, मुले शाळेत जातील, मग केव्हा ना केव्हा परत एक छोटं घर उभं करू, एकत्र राहू, we are fambly ही त्याची स्वप्ने मरत नाहीत. मिळेल तिथे ते गातात, नाचतात, खचानार्याना सावरतात, आणि एका क्षणी स्वतः कोलमडतात. तरी परत उठतात, ४० सेंट तर ४० सेंट, नाहीतर ३० नाहीतर २० अशा कुठल्याही मजुरीवर काम करतात, बटाटे उकडून खातात, पीठ तळून खातात, आणि दरवेळी डोळ्यात चिमुकली आशा ठेवून राहतात कि एक दिवस हे आयुष्य असं असेल कि त्याची घृणा येणार नाही, तेसाजरं असेल, जगावंसं वाटेल...
माझा आवडता एक परिच्छेद देऊन मी थांबतो...
and always, if he could have little money, a man could get drunk. The hard edges gone and the warmth. then there was no loneliness, for a man could people his brain with friends, and he could find his enemies and destroy them. sitting in a ditch, the earth grow soft under him. Failure dulled and there was no threat. And hunger did not skulk about, but the world was soft and easy, and a man could reach a place he started for. The star came down wonderfully close and the sky was soft. Death was a friend, and sleep was death's brother. The old times came back, a girl with pretty feet, who danced one time at home- a horse- a long time ago. A horse and a saddle. And the leather was carved. When was that? Ought to find a girl to talk to. that's nice. Might lay her with too. But warm here. And stars down so close, a sadness and pleasure so closed together, really the same thing. Like to stay drunk all the time. Who says its bad? Who dares says its bad? Preachers- but they got their own kinda drunkenness. Thin, barren woman, they are too miserable to know. Reformers- but they don't hit deep into the living to know. no-the stars are close and dear and I have joined the brotherhood of the worlds. And everything is holy-everything, even me.

Sunday, September 19, 2010

वेळी- अवेळी

अजून का कोसळती धारा
अजून का हा उसळे वारा
अजून का आकाशावरती
मेघांचा करडा पहारा

जेष्ठ ओला, आषाढ कोसळे
रुजला श्रावण होऊन हिरवा
कोमट झाली उष्ण पिपासा
मृदगंध आता ना तितका हळवा

तरीही का ही धुंद असोशी
अतृप्तीचा शाप चिरंतन
चिंब खगांच्या पंखांवरती
नव्या भीतीचे जुनेच किंतन

अजून का ह्या सरी सांगाती
अजून का ढगातून साद
नसशी जेव्हा डंख ताजा
जेव्हा प्राणातून आकुल निनाद

कवेत घेना, मिसळूनी जाना
तोड असे हे मौन अधांतर
उरो न कुठला व्रण स्मरणाचा
जेव्हा करशील तू देशांतर

Saturday, September 18, 2010

बा पावसा

बा पावसा,
किती रात्रीं तू अशी सोबत करणार माझी
किती संध्याकाल तुझ्या कृष्णमेघी चौकटीत दडून राहणार
किती कवितांची अनाम बीजे तू मनाच्या इवलाश्या गर्भाशयात रुजवणार
आलास, वेड लावणारा दूर देशीच जादूगार बनून
राहिलास, घरात, वळचणीत. नाल्या-गटारांत,
खड्ड्यांत, डबक्यात, शहरात, शेतात,
माणूस बनून, चिखल बनून
जा ता, तृप्तीचा निसंग फकीर बनून
उरशील, हजारो वर्षांच्या सुपीक गाळाचा ताजा थर बनून
डोंगर उतारांची अप्लाय फुलून मिटणारी हजारो लाळ जांभळी फुले बनून
गाई-गुरांच्या पोटातला वाळलाचार, माणसांच्या हालचालींचे इंधन बनून
कविता बनून, गाणी बनून, डोळ्यातून वाहणारं पाणी बनून

जा आता,
या गच्च शहरात चिखल बनून वाळण्यापेक्षा
बरसून जा अजून बाकी असीम वैरण वाळवंटात
तिथे बनून जा नदीचा इवलासा पण जिवंत प्रवाह
मग परत तुझ्या तीराने वसतील माणसे, राबतील हात-पाय
नव्याने गिरवतील अस्तिवाची मुळाक्षरे
फुलारून येतील जगण्याचे ताजे टवटवीत संदर्भ
या घुसमट शहरातल्या काहीही न उगवणाऱ्या सिमेंटात तडे होऊन उरण्यापेक्षा
कातळ फोड, माती भिजव
कवेत घे तुझ्या अजून तहानलेले करोडो कोपरे
त्यांच्या पापण्यात, देहांत आयुष्य बनून पालवून ये

जा आता,
तुझ्या थेम्बांतून स्फुरलेल्या नद्यांतून वाहिलेला आणि साचलेला
संस्कृतीचा संपृक्त गाळ आम्ही धरणात अडवून ठेवला आहे
तुझ्या अस्तिवावर उभारलेल्या मानवी आकांक्षांची हाडे
आम्ही बांधून ठेवली आहे पुस्तकात
तुझ्या धारातून पोसलेल्या जंगलात उमटलेले आदिम मानवी हुंकार
आम्ही रूढी-परंपरांच्या तालात थिजवले आहेत
ओलसर पानांत आणि भिजल्या देठांत सापडणारे स्वर
चौकटींच्या लगद्यात कुजवले आहेत

जा तिथे
जिथे अजून धरतीची तृषा वाळू बनून वाट पाहते आहे
एका आश्वस्त उद्याची
डोंगरांची सन्यस्त रांग ढगांच्या वादळी आव्हानाची
ललकार ऐकायला कधीची थांबली आहे
तिथे पोच, तिथे नाच,
वाहून कोसळून धरतीच्या रोमा-रोमात साच
आणि उगवून येणाऱ्या अगणित आयुष्यांसाठी
आशेची नवी कविता वाच

Thursday, September 16, 2010

घटकाभर गम्मत

'भले-बुरे काहीतरी बोलायला कुणी नाही' ... कोणाच्या नसण्याला शंब्द वापरून भरून काढायचं....बोलायला कोणी नाही म्हणून लिहायचं...कोण एका अज्ञात वाचकाला, गणितात 'क्ष' मानून गणित सोडवतात, तसं मला जे सांगायचं आहे ते त्याला कळेल, असं समजून लिहायचं. पण संध्याकाळी कोणासोबत चालत सहज होणार्या गप्पा संध्याकाळी कागद-पेन घेऊन बसलं तर लिहिता येतील? आधी वाचलेल्या गोष्टी, कविता हातात घेतो, परत वाचू पाहतो, त्यातही काही सापडत नाही. मला माझं आयुष्य भोगायचं आहे, जगायचं आहे, दुसर्या कोणाच्या कितीही खोल विचारांनी मी माझ्यातली असोशी भरून काढू शकत नाही. माझ्या अंगात उसळू पाहणाऱ्या जाणीवांना मी दृक-श्राव्य माध्यमे वापरून कितीकाळ थोपवू शकेन? आणि मग एक असेल असा उद्या जेव्हा अशी तगमग उरणार नाही, जेव्हा प्रत्येक कृतीमागे विषादाचा झाकोळ असणार नाही अशा आशेवर तरंगत रहायचं, हात-पाय मारत राहायचे. 'Every misery is in some sense deserved one'... हे म्हणजे कर्मविपाक प्रकारात झालं. आधी चूक म्हणून आत्ता चूक, आणि म्हणून याच्या पुढेही... मग स्वतःला संपवून का टाकायचा नाही... का जगावं याचं उत्तर मिळत नाही आणि का जगू नये याचंही नाही.....आणि नसणारच याचं उत्तर....हीच Camus ची Absurdity....कशाचंच उत्तर नाहीये.... म्हणजे असं प्रश्नांचा टळटळत घेऊन जगणं हेच प्राक्तन तर...म्हणून आधीपासूनच प्रश्न पडू नयेत, चाकोरीबाहेर जावसं वाटू नये....जसं आयुष्य येईल तसं वागावं, त्याला आकार द्यायचा प्रयत्न करू नये.... हा तर Fatalism. साला स्वतःच्या दुखला स्वतःचं नावही देता येऊ नये....सगळी नावं साली आधीच कोणीतरी वापरून टाकलेली.... आधी कोणी एक बुद्ध झालेला...आधी कोणी एक थोरो...एक कामू...एक मार्क्स....त्यांनी आयुष्याला तसू तसू सोलत सगळं सालं मांडून ठेवलं...आता नुसता त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायच्या....घोटभर उथळ आयुष्य, ते असं त्यांनी लिहून ठेवलेलं...आता दुखाला अजून डेप्थ नाही...त्याचा नवा आयाम नाही...बाजारात विकत ठेवलेल्या अनेक गोष्टी क्रमाक्रमाने घेत राहणं, त्यासाठी एका टप्प्यात स्वतःला विक्रीयोग्य बनवणं आणि कधीतरी ह्या चक्रनेमिक्रमाचा कंटाळा आला कि असं दिसेल तिथे ओकण. कुणी सापडला तर त्याला, कुणी नाही सापडला तर तर असं 'क्ष' मानून.... किंवा मग आठवणींच्या फडताळात उडी मारायची.. त्यातला बोचत राहिलेलं काही होईल तसं सांगून मोकळं होऊ पाहायचा....म्हणजे मग बाकीचे म्हणणर वा! वा!! आपण मोकळे होणार तर नाही.. वर आपल्या आतल्या सलाला लोकांनी वा वा म्हटल्याचं जखमेवर मीठ आहेच.... पण तरी बर...नुसत्या जखमेपेक्षा मिठासकट काय वाईट! चरचरेल, ओरडवासा वाटेल... कुठे ओरडणार....घाल आपल्याच गुडघ्यात डोके.... दाब कढ...दाबून ठेव..... हम्म अस्सं.... स्टेनबेक म्हणालेला ना anybody can break. It takes a man not to....आठव आठव अजून अशी उत्तेजक....जिवंत ठेव आशा भौ....आशेशिवाय तरणोपाय नाही... नाहीतर ह्या घुम्या एकटेपणालाच दोस्त मान आपला.... बस आपली आपल्या पावलापुरती दुनिया.... अशी जायची नाही ती कोणाबरोबर बोलायची उर्मी....तेवढंच तर करत आला तू.... स्वतःचं प्रश्नचिन्ह शोधलं पाहिजे भौ, म्हणजे मग कोणीतरी त्या सारं व्यापणाऱ्या, शोषणाऱ्या विराट प्राश्नाखालचा टिंब तरी होऊ शकतं. प्रश्न शोध, तूच तुझं... बाकी कोणाचे प्रश्न चालणार नाहीत.... हे पण आधी कोणी लिहिलंय म्हणतोस... लिही ना का...तू तुझाच शोध घेतोयेस ना भौ.... हे पण स्वप्नच... बरोबर आहे.... किंवा चूक... आहे ना.. असणं महत्वाचं....
गालिब याद कर भाऊ...
जिंदगी यूँ ही गुजर जाती थी
क्यों तेरा राहगुजर याद आया...
काही नाही भाऊ.... हे असं एकटाच आपलं आपलं आहे... आणि एक दिवस जायचाही... आरती प्रभूंच्या कवितेसारखा... 'तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार सोडूनी मी जाईन दूर गावा'.... कुठे जायचं हे ठाऊक नसतच कधी... काय सोडून जायचं एवढं मात्र आपल्याला सुरुवातीपासून ठाऊक असतं...आणि गम्मत म्हणजे तेच तेवढं हवं असतं आपल्याला... हे एवढंच दुख...
बराय भाऊ... मजा आली...घटकाभर गम्मत...

Tuesday, September 14, 2010

उसळून येणारे शब्द, फेसाळून येणारे बेभान ओघवते शब्द
संगीताच्या लहरींवर तरंगणारे धुंद शब्द
शरीराच्या भिंतींवर धडका देणारे उन्मत्त शब्द
ओरडत, दंगा करत झिंग आणणारे शब्द

जगून घे जगून घे
क्षण क्षण भोगून घे
उद्या उद्याच्या पोकळ स्वप्नांवर
आजचा सल तोलून घे

उचल पाय जमिनीला स्पर्श सुद्धा होऊ नये
स्वप्नांच्या कळ्यांना कधीच जाग येऊ नये
असे म्हण गाणे ज्याची लय हरवू नये
अर्थामागचा शब्द जन्माआधीच ठरवू नये

मी मलाच सांगितलेली एक कविता



समुद्रावर जाऊन उभं रहावसं वाटतंय...
आता कोणीच नसेल समुद्राजवळ... लाटा निवांत येऊन किनार्याच्या खांद्यावर आपलं मन मोकळं करत असतील
थंडगार वारा वाळूवर त्याने वाहून आणलेल्या कविता उमटवत असेल आणि एका वेडसर क्षणी सारं पुसूनही टाकत असेल..
चांदणं झिरपत असेल ओल्या वाळूत, परतणाऱ्या लाटांत, ओलसर झुळूकीत
मंत्रमुग्ध करणारा मंद हळवा प्रकाश...
मागच्या निर्मनुष्य रस्त्यावर एखादं क्षण येणारी अस्तिवाची खूण
नाहीतर सारंच तरल, नितळ, स्तब्ध आणि म्हणून शब्दांत न येणारं
मी आहे का नाही याचाही प्रत्यय न यावा...
पावलांना स्पर्शत जावं पाणी..चांदण्याच्या प्रतीबिम्बांचे भासस्पर्श
समोरच्या क्षितिजाच्या काजळरेषेवर थांबलेले काही प्रकाश...

ये धूप किनारा शाम ढले,
मिलते हैं दोनो वक़्त जहाँ,
जो रात ना दिन, जो आज ना कल,
पल भर को अमर, पल भर में धुआं

विरघळत जावं या आरस्पानी जाणीवेत....
अगदी आपणही आपल्याला काही सांगू शकणार नाही अशा शांततेत

स्वतःला उलगडणं एवढं सोपा नाहीये प्रश्न...माझा असणं म्हणजे माझ्या भोवतालच्या या लक्षावधी माणसांचा असणं
अस्तित्वाचा अर्थ लावायचा म्हणजे केवळ माझ्या एकेरी अस्तिवाचा नाही
क्षणी विस्मित करणारी, क्षणी गुदमरवून टाकणारी एकमेकांच्या असण्याची ही पिंजण
तिलाच उलगडायचं आहे...

कोणाच्याच मनात डोकावून बघता येत नाही...
उमटलेल्या कृती किंवा शब्दांतूनच अदमास घ्यावा लागतो...
दुसरं माणूस समजणं म्हणजे त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या मनावर उमटणा..एकाही हेलाकाव्याशिवाय
आणि अशा असंख्य प्रतीबिम्बातून काही गवसेल सांगता येत नाही...
कदाचित काहीच नाही...हे सारं का आहे कारण आहे म्हणून एवढंच एक गोल गोल उत्तर
कुत्रा, मांजर, चिमणी, पोपट, वाघ, बकरी, घार आणि माणूस
का माणूस, फक्त माणूस
तो, ती, ते, बाकीचे म्हणून मी का मी, फक्त मी
प्रश्नांचं वाढत जाणारा वारूळ...

का माणसे एवढं काही सांगत जातात एकमेकांना,
स्वतःच्या असण्याच्या एवढ्या खुणा निर्माण करतात
इतिहासाच्या पानांत वर्तमानाची कारणीमिमांसा करू पाहतात
भूगोलाच्या स्थिरतेवर आकांक्षांची नक्षी कोरु पाहतात
आणि मग हरप्पा बनून मातीत जातात...

एका कवी म्हणे कविता लिहायचा आणि ठेवून द्यायचा
तो मेल्यावर सापडल्या कविता...याचं अर्थ म्हणे त्याने केवळ स्वतःसाठी लिहिलं
स्वतःसाठी लिहिलं तर स्वतःच्या मनावरच का नाही लिहिलं
त्याच्यासोबत त्याच्या कविताही मिटल्या असत्या
एक खूण ठेवायची असते...एक संवाद साधायचा असतो...
माहित नसेल पण एक तीर गाठायचा असतो...

हे सारे शब्द, माहिती, संदेश, अर्थ, प्रतिमा, संकेत...
कशासाठी...
कोण कोणाला काय सांगतंय नेमकं
का सांगणारा शोधू पाहतोय स्वतःलाच
कारण स्वतःच्या आत त्याला बघतच येत नाहीये....

म्हणून ह्या गर्दीत पळतयेत का सगळे..
कि एक दिवस ते टोक गाठता येईल...

जाऊ दे... गेला तो दिवस... सगळे निवांत झोपले आहेत...
येणाऱ्या उद्याच्या आशा-निराशांचे असंख्य तंतू
एकमेकांना द्यायच्या घ्यायच्या अगणित शब्द अन अर्थांच्या आधी
उरलेल्या या निवांत शांततेत पाहून घेऊ दे माझंच मला
आणि मग शब्दांच्या पार घेऊन जाणारी एक लाट
येऊ लागलीये चांदण्याने अधोरेखित क्षितिजापासून
तिच्यात सामावून जाऊ दे
अलवार जाणीवेच्या या क्षणांचे निर्माल्य
मी मलाच सांगितलेली एक कविता बनून

(
प्रतिमा सौजन्य http://www.panoramio.com/photo/१८१२४९५ )

Sunday, September 12, 2010

पुनरागमनाय च

समोर दीड दिवसाच्या गणपतीची उत्तरपूजा चालू आहे. मागची काही वर्ष मनातली श्रद्धा खुरटून सुकून गेली आहे. कुणा एका नावावर, मूर्तीवर, मंत्रावर श्रद्धा उरलेलीच नाही. तरीपण अजून पार बुडखा साफ झाला आहे असं वाटत नाही. श्रद्धा ओरबाडली गेली तरी विश्वास कोसळलेला नाही. 'हेची दान देगा देवा' ऐकताना हा देव आहे का नाही हा प्रश्न डाचत नाही, तर तो असेल किंवा नसेल त्याच्याकडे सारं काही सोडायचा अन सारं काही मागायचा आर्त विश्वास जाणवतो. पंढरपूरला जावसं वाटत नाही, पण त्या विठलापायी वेडावलेल्या संतांच्या भक्तीला, रूढार्थाने केवळ दुख मिळत असतानाही त्यालाही 'बरे झाले देवा' म्हणण्याच्या घट्ट रुजलेल्या विश्वासाचा नवल वाटतं. आता उत्तरपूजा संपेल, परडीतली फुले समोरच्या गणेशाच्या मूर्तीवर वाहिली जातील, आणि शब्द उमटतील, 'पुनरागमनाय च' ..... विसर्जित हो नाही, जा आत्ता पुरता, परत येण्यासाठी....
दुख थेट पत्करतच नाही आपण. लहान मुलाला घरात कोणाचा मृत्यू झाला कि त्या मृत्यूची आडवळणाने ओळख करून दिली जाते. देवाघरी म्हणजे कुठे तर खूप लांब, आकाशात, किंवा अशा ठिकाणी जिथे काही दिवसांनी सगळेच परत एकत्र येणारेत. घरातून बाहेर पडताना, आपल्या किंवा दुसर्याच्या, येतो म्हणावा, जातो नाही हे शिकवलं जातं. का? तर म्हणावं असं. जे एक अटळ सत्य आहे तेवढं टाळून बोलायचं. 'जगलो वाचलो तर भेटू' असं म्हणून जर सगळे एकमेकांचा निरोप घ्यायला लागले तर बघा कसं वाटेल. आशेचा गळ लावून ठेवला कि मृत्यूची थंडगार भीती जरा रोडावते. मृत्यू वगैरे तर बराच मोठा प्रकार झाला. समजा पाहुण्यांकडे गेलो आणि पहिल्या क्षणी असा विचार मनात आला कि दोन दिवस जातील खरे मजेत इथे, पण मग यांचा निरोप घ्यायचाच आहे, मग ते दोन दिवस तरी मजेत घालवता येतील का. संपण्याची जाणीव तीव्र आणि धारदार आहे, एकदा ती उमटली मनात कि जेवढा वेळ ती रहाते तेवढा वेळ सारं रिकामं करत जाते. थेट न बोलतं, चर्चा न करतासुद्धा आपण कायम मरणाची, स्वतःच्या किंवा आपल्या जिवलगांच्या, जाणीव जवळ बाळगून असतो. म्हणून तर आपण विमा उतरवतो, नोमिनीज देतो आणि कुठे कुठे हात जोडत राहतो.... जेव्हा केव्हा ते होईल तेव्हा ते होईल तेवढा सुसह्य व्हावं, किंवा त्याचा विचार न करता आपण सरकत जातो.... त्याच अटळ टोकाकडे
जर माणसाला आशा ठेवणं माहीतच नसतं तर शेवटाच्या जाणीवेने जाणवणारा कोसळलाच असता. आशावाद सारं संपणारं आहे, क्षणभंगुर नसेल पण नाशिवंत आहे ह्या स्वच्छ जानिवेतच जन्माला येतो. 'even this will pass' हे न समजत उमटणारी आशा ही फारसा भक्कम पाया न बांधता उभारलेल्या इमारतींसारखी आहे. एखादी वावटळ आणि मग आयुष्यभराची काजळी. पण एका क्षणी हे सगळं मिटेल हे जाणवूनही जेव्हा जगावंसं वाटतं तेव्हा 'कशासाठी जगायचं' जी असहाय्य व्यर्थता किंवा वैफल्य घेऊन जगताच येणार नाही. असं वैफल्य एका बेसावध क्षणी स्वतःच्या चिंधड्या उडवूनच संपेल. अर्थात वैफल्याच्या एवढ्या टकमक टोकालाही कोण जातात? अनेकांना अशी जाणीव होत नाही हे चांगलंच आहे, नाहीतर आयुष्यभर सुतक पालानार्यांची एक मोठी जमात जन्माला आली असती. अनेकांना हे जाणवत नाही ही त्यांची कमतरता नव्हे, तर देणगीच. म्हणून तर दीड दिवसासाठी का होईना लोकांनी मातीची एक मूर्ती घरात आणली नसती, तिच्यात प्राण उतरले अशी समजूत करून घेतली नसती, आणि मग डबडबल्या डोळ्यांनी तिला पाण्यात सोडताना 'पुनरागमनाय च' असं म्हटलंच नसतं.
पण हे सारं संपणार जरी असेल तरी एखादं धुंद क्षण असं असेल कि आयुष्य केवळ क्षणांचा गुंता किवा सरळ दोरा उरणार नाही. त्या आयुष्याची वाट करून त्याला उजळत संपवणारे एखादे बेभान वेड त्याला लागेल आणि मग हे सगळं असो किंवा नसो, त्या धुंदीत उरणं एवढा एक सरळ सोपा हिशोब राहील. मुळात काही संपेल ही जाणीव जास्त कुरतडते, त्रागा करायला लावते, पण तो कोसळीचा क्षण झाला कि तितका काटेरी वाटतच नाही. एक कोरडेपण तेवढं रहात. त्या कोरडेपनापेक्षा इतर सार्या जाणिवांच्या पार घेऊन जाणारे काही एक ना एक दिवस समजेल ही आशा का वाईट?
ती आशा आहे म्हणून ही लक्षावधी माणसे जेवढा वेळ आहेत तेवढा वेळ जगू पाहतायेत. स्वप्ने पाहतायेत, कोसळत, पडत-झडत चालत राहतात. ही दुर्दम्य आशा टिको, वाढो, आणि एखाद्या क्षणी ती संपली अशी वाटेल तर कोणीतरी पुन्हा म्हणो, 'पुनरागमनाय च' .

Tuesday, September 7, 2010

काय म्हणताय राव

या! या!! बरेच दिवसांनी दर्शन दिलात. साहजिक आहे म्हणा, आणि अशा प्रश्नाने सुरुवातीलाच तुम्हाला अडचणीत टाकले आहे मी. राहू द्या, लोकांना अडचणीत टाकणे आणि मग वळचणीत लपणे असं स्वभावच आहे माझा. बसा.
महाराज, दोन चहा घे रे. नको, गरम वगैरे काही म्हणू नका. तो सगळ्या नावानी मुळातला एकच चहा देण्याइतपत अध्यात्मिक आहे. त्यामुळे राहू दे.. सिगारेट पिणार? मग तुम्ही जाऊन आणा. आणि २ आणू नका, जरा जास्त आणा. एवढे दिवसांनी अवतरलात, २ उदबत्यांची ओवाळणी पुरेल का? हा. हि खरी. बाकी नुसते साले जळणारे कागद. हा खरा दम. नाही, बिडी खरी हे बरोबर आहे, पण समजा सिगारेट्स हाच सेट पकडला तर हीच खरी, दम पण भारी आणि जळण्याचा वेळही. गाणी बिनी लावा भाऊ. हि अशी आळशी सकाळ, हा असं कोमट चहा, आणि हे असे.... बरं जाऊ द्या. काय लावताय? 'सरकारच्या आईचा घो' ....अरे सोड ना. जी लढाई लढत नाही, तिचे विश्लेषण कशाला. काही दुखेल असे लाव, जरा हा दिवस अजून मागून सुरु होऊ दे. किंवा स्वप्नांच्या चार चकमक ठिणग्या उडतील असे काही ऐकव. नाही असं काही.... बर थांब. माझ्या मोबाईलमध्ये आहे. ऐक....
काय वाचलास? काहीच नाही? का रे, इतका बीजी होता का काय? लग्न वगैरे करतोयेस? नाही.
मग काय पिक्चर पाहिलेस कि काय? तेही नाही. मग, काय कासवासारखा सारे संवेदनांचे तंतू पार आत लपवून निव्वळ जगण्याचा वगैरे निखालस अध्यात्मिक प्रयोग करतोयेस कि काय?
कंटाळा!! कशाचा? पार सगळ्याचा? काय चावलं तुला? मजा नाही येते? कशात?
हं!! दुसर्या कोणाला सुखी बघून तुझं रिकामेपण जळतय का भाऊ?
तुला कसं काय ठाम माहित, कि अशी मजा असतेच म्हणून? existential विचारू नको म्हणतोस, पण तुला आलेला कंटाळाही existential च आहे ना भौ. मग त्याला उपायही त्याच जातीचा जालीम हवा ना.
वेड नाही लागते असं म्हणतोस? पण जोवर कळतंय तोवर वेड कसं लागणार ना भू!
कुठे दूर निघून जावं म्हणतोस.... हं हं.... वाचलीये मी तुझी कविता... पण काय आहे ना राव, हे असं सगळ्यांना सांगून का सुटेल तुझा प्रश्न? कोणी बरं म्हटल्याच्या क्षुल्लक आनंदाने तू कंटाळा भरू पाहतो का भौ. बहुत नाइंसाफी है रे. ...
मरायची भीती वाटते... आणि जगायचं कंटाळा....फंडामेंटल पराडोक्स वगैरे मांडतोय कि काय तू? अरे यार, ह्यात पण तुला ओरिजिनल काय मिळणार नाही. हे सगळं आधीच लिहून चुकले लोक. आता आपण फिरून फिरून तिथेच येतोय.
म्हंजे आता सध्या नवीन असं काहीच येत नाही असं म्हणतोस. तुला नवीन हवंय का तुझं असं हवंय. बघा राव, हे दोन निराळे प्रश्न होऊन राहिले आता. जे तुझं असं असेल ते कदाचित आधीच उमटलेलं असेल. मग लोक त्याला कॉपी केली असं म्हणतील. आता नवीन प्रश्न काढून राहीला ना तू भाऊ. कि लोक काय म्हणतील आणि त्यांनी काय म्हटले पाहिजे. अरे तुला तुझ्याशी काय बोलायचं ते समजत नसताना लोकांनी तुला काय म्हणावा तेही ठरवून ठेवायचं म्हणजे परत एक फंडामेंटल पराडोक्स आला ना रे भौ. असं कसं चालेल राव!
बर, मग फक्त तुझं असं काही मिळाल्याने तुझं तळीराम शांत होईल. मग शोध ना. आता वय झालं म्हणतोस. आणि आपण तसा अंगजात वेडेपण लाभण्याएवढे नशीबवान नाही असं म्हणतोस. मग दे कि जीव. अशा वाटण्याने जीव दिलेला तरी पहिलाच होशील बहुदा तू, आणि मग मेल्यावर लोक म्हणतील ना ओरिजिनल!
जगतानाच असं ऐकून घ्यायचय. बघ, परत प्रश्न बदलून राहीला तू भौ. तुझं असं काही शोधायला निघाला आणि दुसरीकडेच गेला...
हा लपवलेला आशावाद नको देऊ म्हणतोस. म्हणजे परत फंडा... कोसळतोय म्हणून आरडा हि करतोस, आणि पकडू गेलो तर पडू दे म्हणतोस....
अरे, अरे,,,,असं रडू नकोस.... तू काय एकटाच आहे वाटलं का तुला अशी बाधा झालेला.... असं आपण एकटेच दुर्दैवी असं वाटणं ह्यानेही बरं वाटतं ना तुला..खरा सांग.... पण तेही नाही नशिबी तुझ्या....
हे सगळं का म्हणतोस.... हे सगळं म्हणजे... म्हणजे पार हे जग अस्तिवातच का आला म्हणतोस.... का हे सगळं असं का चालू आहे आणि याचं अर्थ काय असं म्हणतोस.... अरे मी चिंधी माणूस, मी काय सांगणार राव.... पण एक कामू नावाचा लेखक म्हणून गेला भौ कि हि सगळी absurdity आहे म्हणून. absurdity म्हणजे काय? आता परत मी पडलो..... बर, मी देतो एक दोन दाखले.... मग त्याने जुळतंय का....
नाही आता माणसाचा स्वभाव मुळात चांगला का वैट? नाही सांगता येत,,,, पण समजा उत्तर द्यावाच असं फोर्सच केला तुझ्यावर तर? दोन्ही म्हणतोस....मग आता हे तुझं उत्तर का absurdity... म्हणजे एक असं उत्तर असेल असं धरून प्रश्न विचारला आणि हाती आला कि दोन्ही एकच वेळेस आहे....
विरोधाभासालाच अंतिम सत्य मानावे असं म्हणतोस.... मग absurd म्हटल्याने काय वेगळा अर्थ लागतो का भौ.... का उत्तर येणारच नाही असं स्वीकारायाना म्हणजे समस्त मानवजातीची वगैरे मन खाली घालणं आहे असं कि काय....
जातो म्हणतोस.... जा आता.... अजून कुणी येणारच इथे.....
मी असं का बसून आहे असं विचारतोस..... ऑफ ह्युमन बोन्डेज तर वाचलाच असशील तू.... नाही.... मग ये वाचून.... पुढच्यावेळी.... बघू म्हणतोस.... साहजिक आहे राव... तुम्ही बुवा बीजी माणसा.... बराय बराय....भेटू

Saturday, September 4, 2010

श्रद्धांजली

कोसळत्या धारा थांबल्यावर उरलेल्या कुंद आभाळाचे शब्द
माणूस मेल्यावर उरलेल्या शोकात्म शांततेचे शब्द
घामात भिजलेल्या दुपारचे थकले भागले शब्द
प्रश्नाच्या वावटळीत भिरकावलेले शब्द
कंटाळ्याचे तेच तेच निबर शब्द
जागल्या रात्रीचे जांभईग्रस्त आळशी शब्द
तात्विक वादांचे बिनबुडी पोचट शब्द
लाचार शब्द, ओशट केविलवाणे शब्द
भिक मागणारे बेजान शब्द
हरवलेल्या डोळ्यांचे म्हातारे एकाकी शब्द
आयुष्याला फुटलेल्या कोम्भांचे हिरवे कोवळे शब्द
आणि वठू गेलेल्या धुमारीचे निष्पर्ण वाळले शब्द

आपल्याच शब्दांची जीवाश्मे जुन्या वह्यांत सापडणारी
रस्त्यांच्या कोपर्यांवर अचानक भेटणारे जुने ओळखीचे शब्द

शब्दांचे कणखर कातळ, त्यांच्या आतले नितळ झरे
शब्दांचा नुसता चिखल, शब्दांची फसवी दलदल

शब्दांची कैद, मूठ भक्कम पोलादी
स्वतःशी बोलतानाही मधले भडवे शब्द
स्वतःला सोडून जाताना रस्त्याच्या कडेशी
स्वतःचेच न लिहिलेले निरागस शब्द

उठून गेलेल्या स्वप्नांच्या गावात
उरलेले उनाड बेवारस शब्द
आठवणींच्या विझल्या शेकोट्या
आणि पडक्या घरांशी पुरलेले शब्द

Wednesday, September 1, 2010

खूप दिवसानंतरचे उन्ह

पडताच होतं पाउस मागचे किती दिवस. म्हणजे फारसे दिवस नसावा. पण ढगांनी सारं आकाश ताब्यातच घेतलेला. आणि वेळ नुसती संथपणे घरंगळत होती एकापुढे एक. म्हणून वाटलं असं कि बरेच दिवस पडतंच होता पाउस. थेंब-थेंब सुरुवात झाली, पण सतत, न थांबता सतत येणारे थेंब. मग मध्येच त्यांची द्रुत लय, थडा-थडा वाजणाऱ्या खिडक्या, दारे, गळणाऱ्या पागोळ्यांच्या आवाजात प्रसरण पावणारा पाउस. मग कधी विजा,गडगडाट , मग छपराच्या उबदार संरक्षणात उभ्या माणसांच्या चेहेर्यावर प्रश्न, कुठे कोसळला असेल हा लोळ? मग परत एक संथ अनिवार लय, थेंबांचा रिप-रिप आवाज, मध्येच येणारा थंडगार वारा, ओलसर भिंती, न वाळलेले कपडे, केस कोरडे ठेवत निथळत्या छात्र्यामध्ये ओलावणारी माणसे, चहा, गप्पा, गाणी, आणि शेवटी या पावसाचा कंटाळा.
पाउस नुसतंच येत नाही, सोबत मळभ असतं एक. थोडं वेळ ते मळभ सुखावतही. सार्याच गोष्टी स्पष्ट दिसत असतील तर मग इकडे-तिकडे विचार कराच कशाला. सगळं एका आखलेल्या मार्गाने चालेल. पण फारकाळ हि विचारांची स्पष्टता पेलत नाही. मन स्वप्नांच्या धूसर-तलम जगात किंवा आठवणींच्या गूढ-गढूळ डोहात जायला उत्सुक असतंच. त्यात असं पाउस असेल, जिथे थेंबांच्या संदिग्ध पडद्याआड सारी स्पष्टता लपली आहे, तिथे मन उरतंच नाही आहे त्या क्षणात.
दिवसाचा अशक्त प्रकाश संपून रात्र, पण सार्या आकाशात ढगांचा कायम वेढा, कुठलीही फट नसणारा. कंटाळा आलेला गाणी ऐकून, कुठे बाहेर जावं तर भिजायचं ह्या विचारानेच होणारी सर्दी. आरोग्यास हानिकारक अशा गोष्टींच्या भडीमाराने दर्दावलेला घसा, आणि सारे विचारही सततच्या ओलाव्याने उबून गेलेले, त्यावर चढलेली तेच-तेच पणाची बुरशी. फुटलेले मोडही भूतकाळ आणि भविष्याच्या सांधणीत जपायचे राहून गेलेले. पाउस उन्हाळा आणि हिवाळा जोडत नाही, त्याची स्वतःची अशी निरंकुश सत्ता असते. तो माणसांच्या आयुष्याला यकश्चित करून वाहून नेवू शकतो, किंवा धान्याच्या दाणेदार दाण्यातून त्यांच्या पोटात शिरू शकतो. ढगाच्या पोटातला स्वैर, मुक्त भूतकाळ, वार्याच्या भूलावणीने केलेली उनाड भटकंती, आणि मग एखाद्या एकांड्या उंच शिलेदार्याच्या अंग-खांद्यावर झोकून देणं, मग जमिनीवर येताना जमिनीची तृप्ती बनणं, शेतात जाऊन एखाद्याची भूक बनणं, किंवा मुरत-साचत जाऊन शेवटी त्याच अथांगतेचा हिस्सा होणं जिथे मुळात आकाशाचा अंश व्हायचे स्वप्न उन्हाने शिकवले होते. उन्हाळा आणि हिवाळा जोडणारा पाउस म्हणजे खूप स्वप्न डोळ्यात घेऊन घर सोडणाऱ्या मुलाने जगात तावून सुलाखून परत आपल्याच मुळच्या घराच्या उंबर्याशी परतणे.
...पाउस थांबलाय. उन्ह तापलय. अजून घर आलेला दिसत नाही.
चिखल सुकत चाललाय, भिंतींवरचे ओघळ आता ओलसर खुणा तेवढ्या ठेवून आहेत. दूरवरच टेकाड आता गच्च हिरवा आहे. अजून चुकार काळे ढग जमू पाहतायेत, पण आता त्यांची मान्सूनी रसद तोकडी पडते आहे. रस्ता गजबजला आहे परत, कपड्यांच्या कोपर्यात घामही जमतो आहे.
कंटाळा आलेला काल रात्री पाउस ऐकताना. काही रुजून येणारही वाहून जाईल एवढं पाउस. ठेवलेल्या पावलाची खूणही उमटणार नाही इतका चिखल. निथळून जाणारे शब्द, गारठलेला अर्थ, शहरे आणणाऱ्या वार्यात निघून जाणार्या कोणाला शेवटचा हातही नाही दाखवता आला...
खिडकीतून उन्ह दिसतंय बाहेरचा, सकाळी सोनेरी, आणि आत्ता शुभ्र तडफदार. कालची रात्र खूप दूर गेल्यासारखी वाटतीये. हि नवी चमक, तजेलेदार शहर, मोकळा श्वास.....
पुन्हा ढग येण्याआधी, पुन्हा झाकोळ येण्याआधीचे हे उन्ह...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...