Skip to main content

गवत्या


पीपल्स बुक शॉप मध्ये एकदम मला गवत्या दिसलं. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक, थोडं अपिलिंग कव्हर, आणि दोन दिवस पुरू शकेल असं जाडजूड पुस्तक. मी ते घेतलं. घेताना त्याची ३२५ रुपये किंमत लक्षात राहिली.
      याच्या आधी मी बोकीलांचं ‘समुद्र’ वाचलं होतं. आणि तेही अर्थात एका बुक स्टॉलवर. आणि त्याचा प्लॉट अगदी पहिल्यापासून उलगडलेला होता. मला बोकील, अर्थात माझ्यासाठी, थोडे प्रेडिक्टेबल, स्टिरीओटाईप होतायेत की असं वाटलं तेव्हा.
      गवत्याच्या पहिल्या काही पानातच समुद्र वाचल्यानंतर जे काही वाचलं होतं ते पार बाजूला जाऊन पडलं. ‘समुद्रापारचे समाज’ किंवा ‘जनांचे अनुभव पुसता’ या पुस्तकाच्या सुरुवातीला मिलिंद बोकिलांनी ते स्वतः सामाजिक स्वरूपाच्या कामाकडे कसे आले, संशोधनाकडे कसे वळले ते लिहिलं आहे. तीच प्रस्तावना कदाचित गवत्याच्या मुळाशी असावी. अर्थात गवत्या, हे अनुभव कथन किंवा आत्मनिवेदन नाही. ते फिक्शन आहे. फिक्शन म्हटलं तरी मुळात ते फिक्शन जन्माला येतं असा एकतर आपल्याच अनुभवाचा एक ढाचा असतो किंवा आपण मुळातच एक ढाचा कल्पतो. गवत्याच्या पाठी बोकिलांच्या कामाचा, आयुष्याचा, त्यांना भेटलेल्या माणसांचा ढाचा आहे असा माझा दाट अंदाज आहे. ‘गवत्या’ फार लोकांना आवडेल असं पुस्तक मला वाटत नाही. कारण तशी त्यात गोष्ट काही नाही. अनाकलनियता नाही, त्यामुळे आपोआप येणारी रंजकता नाही. इतिहास नाही की नोस्टाल्जिया नाही. ‘गवत्या’ मध्ये म्हटलं तर ‘गवत्या’ ही फारसा नाही. जसा समुद्र मध्ये ‘समुद्र’ आहे, किंवा ‘झेन गार्डन’ कथेत ‘झेन गार्डन’ आहे तसा एकूण कथेच्या, कथानायकाच्या मनोभूमिकेच्या पाठी गवत्या जेठा मारून बसला आहे. ‘ गवत्या’ क्लीशेड भाषेत म्हणायचं तर एक आत्मशोध आहे. आणि मला तो आवडलाय कारण माझेच दिवस कोणीतरी लिहून ठेवल्यासारखे मला त्यात एक एक करून मिळत गेले. जसे ते कोसला मध्ये होते तसे.
      मी काहीच करत नाही. म्हणजे मी पैसे कमवायला काहीतरी करतो. पण ती एक फसवणूक आहे. पण त्यावर माझी बिडी काडी आणि दवादारू चालते. पण ‘मी’ ‘माझं’ म्हणून काही करत नाही. असं आपण काही करत नाही याचं मध्ये मध्ये घुसमटवून टाकणारं वाईट वगैरे वाटतं मला. किंवा काहीवेळा रिकामं रिकामं वाटून मी झोपतो. पण अजून काही सापडलेलं नाही. चार-दोन प्रकार सापडण्याचे करून पाहिलेत. आई-बाप, लोक ह्यांना दाखवायला ‘ हा आहे बरं मी’ असा एक झेंडा मी पकडलेला पण आहे. पण तो मी दररोज फार कृत्रिमतेने उंचावून फडकवतो हे मला ठाऊक आहे. पूर्वी मी हे लोकांशी बोलत वगैरेही असे. पण आता मी अशा पोरवयाचा न राहिल्याने आणि खोटं वगैरे बोलण्यात सराईत झाल्याने काही म्हणत नाही. आपले दिवस, वेळ, तास, महिने सर्रास ढकलत राहिलो आहे.
      पण मध्ये हे गवत्या आल्याने परत सारं ढवळून निघालं आहे. आणि आपलाच रिकामेपणा कोणीतरी शूट करून आपल्याला दाखवत न्यावा आणि त्याचवेळी त्यावर स्वतःच्या त्यातून जाण्याची, एम्पथीची हलकी उब धरत जावी तसं वाटतंय. म्हणजे आता नुसतंच बसून रहायला काही वाटत नाहीये. बघू आता असं किती दिवस होतं.
      तर परत गवत्यावर. त्यात एक कथानायक आहे. त्याचे नाव आहे. पण वय वगैरे ठाम काही नाही. त्याचे आडनावही नाही. आणि त्याला काय करायचं हे ठाऊक नाही. पण असं काहीतरी शोधायला हवं हा प्रश्न त्याला पडला आहे. आणि त्या प्रश्नाने जाम गांड धरल्याने तो हे सोड, ते सोड असं करत करत आत्ता एका गावात, कधी तिथल्या गुहेत, कधी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला असतो. कधी निवांत, कधी मनातल्या मनात प्रचंड सैरभैर. पण त्याच्या साऱ्या व्यथा-वेदनांना, प्रश्नांच्या कल्लोळाला पुरेल असा त्याचा एक माणूसही तिथे आहे. मग बाकीही काही माणसे आहेत. त्याचे रिकामेपण आहे, पण त्याची जी माणसा आहेत ती त्याच्या रिकामेपानाला हिणवत नाहीत की प्रश्नांचे छेद पाडत नाहीत, ते त्याला त्याचा वेळ, धीर, संधी सारं देतायेत, पण तो अजून अस्वस्थ आहेच. त्याचे प्रश्न आहेत, त्याच्या आठवणी, त्याचे जर-तर आहे, आणि त्याच्या अध्ये-मध्ये शांत सरकणारी गोष्ट. मी वाचली आहे ती.
      ती काय गोष्ट आहे हा काही प्रश्न नाहीये. म्हटलं तर ती गोष्ट मध्येच छाटलीच आहे. ती थोडी फिल्मीही आहे. म्हणजे काही वेळा ती थोडी सोयीस्कर वळते. किंवा तिला सोयीस्कर वळवणारे कोपरे लेखकाने खुबीने ठेवले आहेत. आणि त्यात सेक्सही आहे.
      बोकिलांच्या गोष्टीत सेक्स असतो. म्हणजे सगळ्याच नाही. पण स्त्री-पुरुषांचे संबंध, आणि मग त्यात सेक्स हा बोकिलांच्या काही कथांचा केंद्रीय भाग आहे. गवत्या मध्ये तो असा केंद्रीय भाग नाही. ती थोडी मूळ कथानकाशी न जुळलेली, पण एकदम फर्मास साईडस्टोरी आहे. त्यात चटकेदार, मसालेदार काही नाही. पण बोकिलांच्या मी वाचलेल्या लेखनात गवत्या मध्ये आलेला सेक्स सगळ्यात बोल्ड, आणि वास्तविकतेकडे जाणारा आहे. सेक्सच्या वर्णनाला विशेषणांचा उबाळ न जोडता तो थेट सांगण्याच्या बऱ्याच जागा गवत्या मध्ये आहेत. आणि तरीही तो मूळ जे काही सांगायचंय त्यावर हवी होत नाही.
      मुळात कथानायक ज्या वयाचा आहे त्या वयातच सेक्स असतो. अर्थात त्याचे नेमके वय कथेत मला पहिल्या वाचनात सापडलेले नाही. पण जो माझा अंदाज आहे त्यानुसार सेक्स असतो. काहीवेळा तर अगदी माणूस काट्यावर येईल एवढा असतो. आणि त्यात आपली सुशिक्षित मध्यम वर्गीयता (भीती+संधींचा अभाव+जागेची टंचाई) यामुळे सगळे काम कल्पनेच्या तीरावर तुंबलेले असते. असो. हा भलताच बाजूचा विषय होईल.
मी गवत्या विकत घेतल्यानंतर बहुतेक भाग लोकल ट्रेन मध्ये वाचला. गवत्या मध्ये एक अनुभूतीचा, मनातल्या तीव्र इच्छेनंतर येणाऱ्या साक्षात्काराचा काही एक प्रसंग आहे. वाचता वाचता समोर येणारे शब्द, त्याने मनात उमटणारे चित्र आणि आपले स्वतःचे हरक्षण टोचत, भोसकट राहणारे रिकामेपण ह्याची काहीतरी एक जबरदस्त घुसळण झाल्यासारखी मला वाटलं. मग मला हलकं वाटलं. असं वाटलं की जसं कथेत कोणी एक माणूस कथानायकाला त्याच्या जीवाला अल्लाद देणारं काही सांगतो आहे तसं ही गोष्ट मला सांगते आहे. आणि ती मला कुठला रस्ता दाखवत नाहीये. पण आपल्याला काहीच ठाऊक नसलेल्या रस्त्यावर, आपण गोंधळून गेले असता तू बरोबर चालतोयेस रे असा धीर देणारं एखादा डेरेदार झाड यावं तसं मला वाटलं.
      मला एक गोष्ट आठवते. म्हणजे गोष्टीचा अर्थ आठवतो. जीविका आणि उपजीविका अशा अर्थाचे दोन शब्द आहेत. एकमेकांशी जोडलेले. उपजीविका म्हणजे जीविकेच्या जवळ जाणं. उपजीविका म्हणजे अन्ग्रेजीमध्ये लाईव्हलीहूड. आणि जीविका म्हणजे लाईफ. गोष्ट असं सांगते की आपल्याला उपजीविका असते ती आपल्या जीविकेच्या जवळ जाता यावं, जीविका करण्यासाठी जगता यावं म्हणून. पण आपल्याला जे करायचं असतं ती आपली जीविका. ते आपण शोधायचं.
      मग बरोबर चाललंय की. उपजीविका तर आहे. तगून तर राहू. बचेंगे, आणि बचेंगे तो लढेंगे ही लढेंगे. आणि मध्ये मध्ये हे गवत्या वगैरे येतं. कोणीतरी सांगता की भाऊ, एक तुम्ही नही तनहा. मग तर ठीकच आहे. आता थोडे दिवस तरी ही बिदागी पुरेल, पुढचं पुढे. होय की नाही गवत्या?
      भवभूती का भास कोणीतरी एक असं म्हणून गेला होता की आपल्याला जे सांगायचंय ते तसच्या तसं ज्याला काळात, किंवा कळेल असा समानधर्मा लेखक किंवा कलाकार शोधत असतो. म्हणजे तो जे लिहितो ते मुळात त्याला जे सांगायचंय त्याचा एक अपुरा, तोकडा प्रयत्न असतो. पण जितका तो लेखक खरा खरा होत जाईल तसा कदाचित त्याचा हा प्रयत्न अजून अजून प्रामाणिक प्रामाणिक होत जाईल. कडी कधी हे सगळं खूप आदर्शवत, खूप बनावटी, खूप बेगडी वाटतं. पण गवत्या वाचताना त्या लोकल ट्रेन मध्ये माझी जी काही अवस्था झाली होती, हलकी, आपल्या आपल्यात थरथरणारी, त्याने असं वाटतं की खरोखर असा काही निकष असेल. कदाचित मला जे वाटतं आहे ते मी उगाच जस्टी फाय करतोय मोठ-मोठी नावं वापरून असंही होत असेल. असे साक्षात्कार वगैरे आपणच आपल्याल अनुभवांना जोडलेले काल्पनिक तुरे असतील. पण निवांतपणा, शांतपणा तर खरा असतो. तो दिसतो पण कधी, कधी माझा मलाच जाणवतोही. गवत्या त्या शांतपणाला, काही नसताना फक्त मी असण्याच्या निवांतपणाला ओ देतो. सतत काहीतरी करण्याच्या, काहीतरी होण्याच्या धबडग्यात विसरलेल्या काही प्रश्नांना, आणि प्रश्नांच्या मागच्या जगण्याच्या प्रयत्नांना तो परत बोलावतो. आणि मग थोडे दिवस तरी ते आपल्यासमोर सतत असतात, जसा गवत्या असतो कथेत.     

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…