Thursday, December 13, 2012

महागुहा


|ऑरवेल साहेब आणि बाकी जे साहेब अशा सगळ्यांना|

मागचे चार दिवस जंगल चिडीचूप होतं. नेहमी सारखी झाडे सळसळत नव्हती. नेहमीसारखी कुरणे गजबजलेली नव्हती. अगदी रात्रीही तळ्याच्या काठी पाणी प्यायल्या येणाऱ्यांचे डोळे लुकलुकत नव्हते. वाळली पाने आवाज न करता पडत होती. साप फुत्कारत नव्हते. माकडे झाडांवरून उड्या मारत नव्हती. गच्च दाबून भरलेली शांतता तेव्हढी सगळीकडे. त्या शांततेचा माग काढला तर तो एका अक्राळ-विक्राळ दाराशी पोचून थांबत होता. पण तिथून पुढे नाही. त्या अक्राळ-विक्राळ दाराच्या समोर क्रूर सुळे असणाऱ्या लांडग्यांची झुंड निश्चल उभी होती. त्यांच्या डोळ्यात भूक होती. पण त्यांचे टवकारलेले कान त्या अक्राळ-विक्राळ दाराच्या आडून काय आवाज येतो याचा सुगावा काढण्यात लागले होते. अधून-मधून त्यांच्यातला, तोंडातून लाळेचा ओघ गळणारा एखादा लांडगा दाराच्या आतल्या अंधारात डोकावून पहायचा. त्याच्या डोकावण्यासोबत जपून पाहिलं तर एक खूप दबल्या आवाजातली चर्चा ऐकू आली असती.
       आत चार कोल्हे एकमेकांकडे तोंडे करून बसले होते. त्यातला एक तरुण होता, एक मध्यमवयीन, एक म्हातारा, तर एक जख्ख म्हातारा. पण सारेच मागचे दोन पाय मुडपून, पुढचे दोन सरळ ठेवून अनिमिष डोळ्यांनी, त्या अंधारात एकमेकांच्या चकाकत्या डोळ्यांकडे पहात बसले होते.
काय करायचं?’ तरुण कोल्हा, त्याच्या वयाला जुळेल अशा आवाजात म्हणाला. पण बाकीचे तीन काहीच म्हटले नाहीत. तरुण कोल्हा थोडावेळ गप्प बसला. मग त्याने मध्यमवयीन कोल्ह्याच्या कानाशी लागून म्हटलं, ‘ असं किती दिवस जंगल सुनसान राहणार?आणि मग सगळ्यांना जे काय आहे ते कळलं तर? आणि मागचा अदृश तह विसरून परत सगळे जंगलासारखे राहू लागले तर? काही व्हायच्या आधी आपल्याला हालचाली करायला हव्यात.
त्यांच्या कानगोष्टी भेदून निघतील अशा नेमदार आवाजात जख्ख कोल्हा म्हणाला, ‘हे जंगलच आहे. अदृश तहाच्या आधीसुद्धा आणि नंतरही.मग तो परत अंधारात पाहू लागला. जख्ख कोल्ह्याच्या अशा टोकदार बोलण्याने ते परत शांत झाले. पण मध्यमवयीन कोल्हा जागेवरून थोडा पुढे सरकला. त्याची हालचाल म्हाताऱ्याने हेरली. पण म्हातारा काही बोलला नाही.
--
                कावळ्यांची सभा महागुहेच्या जवळच्या वडाच्या प्रचंड झाडावर, फांद्या-फांद्यांत दडून बसली होती. कावळ्यांच्याकडे जंगलातील बरी-बुरी सारी बातमी प्रत्येक कोपऱ्यांत पोचवायचं काम होतं. त्याबदल्यात त्या बऱ्या-बुऱ्या गोष्टीतला एक भाग कावळ्यांच्या मेजवानीसाठी राखून ठेवला जायचा. पौर्णिमेला चारच दिवस राहिले होते. आणि त्या दिवशी जंगलाचा महाउत्सव बदामी तळ्याच्या काठी साजरा होणार होता. महागुहेत राहणाऱ्या वनपालाच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव दरवर्षी व्हायचा. खरंतर त्या उत्सवाची तयारी एव्हाना जंगलात जय्यत सुरु व्हायला हवी होती. सांबारानी आपली शिंगे घासून पुसून त्याला डौलदार नक्षी करायची, हरणांच्या शावकांनी त्यांचे झिनी नृत्य करायचे. माकडांच्या कळपाने वनपाल आणि रक्त्या वाघ ह्यांच्या रोमहर्षक लढतीचे नाट्य रुपांतर सादर करायचे. हत्तींच्या कळपाचा जल क्रीडेचा सामना, त्यानंतर रानकुत्रे आणि लांडगे ह्यांच्या नायकांची झुंज. सगळ्यात कळस म्हणजे घारी आणि गिधाडे ह्याचे आकाश खेळ. त्यानंतर गरुडाच्या अचूक मत्स्य पकडीने शेवट. मग वनपालाचे भाषण, त्यानंतर पुख्ता मेजवानी जी जंगलाच्या बाहेरची माणसे तयार करून द्यायची. दरवर्षी पौर्णिमेच्या आठवडाभर आधी कावळे जंगलभर उत्सवाची वर्दी द्यायचे. तयारीची प्रसिद्धी करायचे. लांडग्यांच्या आणि रान कुत्र्यांच्या नायकांच्या सुळ्यांचे वर्णन सांगायचे. पण या वेळी त्यांची सारी काव-काव थंडावली होती. दोन दिवस अगोदर म्हाताऱ्या कोल्ह्याने त्यांना बोलावून संपूर्ण गोपनीयतेची शपथ दिली होती. आणि त्या बदल्यात, माणसाचे वाटणारे दोन दिवस शिळे मांस त्यांना बक्षीस दिले होते.कावळे दोन दिवस चूप होते. पण महागुहेत काही होते आहे. कदाचित वनपाल.. साऱ्या शक्यता त्यांच्या तकाकात्या काळ्या-राखाडी रंगात त्यांना जाणवत होत्या. त्यांच्या चोची त्या शक्यतांचे काव काव करायला आतुर होत्या.
       ‘हरणांचा कळप मागचे दोन दिवस पार टोकाच्या कुरणात बसून आहे. कदाचित महागुहेकडून येणाऱ्या वाऱ्यात त्यांना काही समजलं असावं.वडाच्या शेंड्याकडे बसलेला कावळा म्हणाला.
हत्तींचा कळपही ते सराव करतात त्या राखी तळ्याकडे गेलेला नाही. त्यांनी केशरी तळ्याच्या काठी मुक्काम केला आहे.ढोलीकडचा कावळा म्हणाला.
आज सकाळी गोरीला कुटुंब आपापसात हीच चर्चा करत होते.वडाच्या मध्यात बसलेला, गळ्याभोवती तांबडा पट्टा असलेला कावळा म्हणाला. त्याच्या खोल आवाजाने बाकीचे थोडे शांत झाले.
मागचे २ आठवडे वनपाल त्याच्या नेहमीच्या रापेती साथी बाहेर पडलेला नाही. ना त्याला भेटायला कोणी गुहेत गेला आहे.तिरप्या चोचीचा कावळा बोलला. त्याच्या बोलण्यासरशी तो जे बोलला त्याची पुढची न बोललेली अनुमाने साऱ्यांच्या मनात येऊन गेली. 
वनपाल मेला असला तर? किंवा आज-उद्यात मेला तर?’ थोड्या वेळाने टोकदार चोचीचा डोमकावळा बोलून गेला. आणि मग एकदम शांततेचा घोर घाव पडावा तसे बाकीचे झाले.
आपल्याला तयारी सुरु केली पाहिजे. मी जाऊन म्हाताऱ्या कोल्ह्याशी बोलतो. तुम्ही गटा-गटाने जाऊन बाकी भागांवर लक्ष ठेवून असा. आपण उद्या दुपारचे इथेच जमू. आणि थव्याने उडू नका. दोन-तीन असे खालच्या उंचीवरून उडाअसं म्हणून दबल्या उंचीने तांबड्या पट्ट्याचा कावळा उडाला. त्याच्या निर्णायक बोलण्याने, त्याने सांगितल्याप्रमाणे बाकीचे कावळेही पांगले.
--
केशरी तळ्याकाठी आळसावून बसलेल्या गजसमूहाकडे पहात गजेंद्र विचार करत होता. खरं म्हणजे त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण येत होती. वनपालाने जेव्हा पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी सभा बोलावली होती तेव्हा तिथे काय होणार हे पाहायला जमलेल्या उत्सुक प्राणी समूहात तरुण गजेन्द्रही होता. खरंतर त्याच्या वडलांनी तिथे असूच नये असं त्याला वाटत होतं. दाढी वाढलेला, भेदक डोळ्यांचा वनपाल, धूर्त नजरेचा कोल्हा, ज्याला आज जख्ख कोल्हा म्हणतात आणि त्याचे वडील असे तळ्याच्या काठाच्या वडाच्या झाडाशी जमले होते. बाकी सारे प्राणी, हत्ती, हरणे, सांबारे, काळविटे, ससे, लांडगे, रानगवे, रानडुकरे, उदमांजरे, तरस सारेच तिथे जमून उत्सुक, किंचित घाबरल्या अस्वस्थेतेने जे चाललंय ते समजू पहात होते. गजेंद्र वडाच्या झाडाच्या सगळ्यात निकट, त्याचे तरुण निडर दात, त्याची लवलवती सोंड मिरवत बाकीच्या प्राण्यांना अदृश्य धाक देत उभा होता. पण त्याचे कान त्याच्या बाबांच्या, जख्ख कोल्ह्याच्या, आणि वनपालाच्या चर्चेकडे होते. कालच बदामी तळ्याच्या काठी, निव्वळ टोकदार भाल्याने वनपालाने रक्त्या वाघाला मारले होते, रक्त्याच्या बेभान डरकाळ्या, त्याचे थकले जखमी आवाज, आणि रक्त्याला घातक जखमा दिल्यानंतर त्याला संपवताना वन पालाच्या चिडल्या देहातून निघणारे सलग संतप्त श्वास. आणि हे सगळे मागे निर्विकारपणे पाहणारा जख्ख कोल्हा. रक्त्या मेला याचा गजेन्द्राला आनंदही होता. कारण त्याच्या काकाला, गजमोक्षाला रक्त्याने भर दुपारचा गंडस्थळ फोडून मारला होता. त्याच्या कळपाच्या मते उन्हाच्या तीरेपेने आंधळ्या गजमोक्षाच्या गंडस्थळावर उडी घेणे ही भ्याड कृती होती. गजेंद्र त्याच्या काकाचे सुळे देहापासून विलग होण्याच्या आधी जाऊन त्याच्या साथी हत्तींसह रक्त्याला वेढणार, चेचणार होता. पण त्याच्या वडलांनी त्याला थांबवले होते. त्याच्या वडलांच्या मते जे घडलं ते जंगलाला अनुसरून होतं. आणि केवळ सूड म्हणून रक्त्याला संपवण्यात काहीच अर्थ नव्हता. सूड हा माणसांचा खेळ आहे असे बाबा म्हणालेले. त्यानंतर ते काही दिवस सारा कळप पर्णी वृक्षांच्या, गोल तळ्यांच्या जंगलात घेऊन गेले. तिथल्या पाण्यात खेळता, खेळता, मदमस्त होत एक एक हस्तिनी खेळवता खेळवता कसे दिवस गेले. पण एक दिवस करड्या कपाळाचा डोमकावळा उडत उडत आला आणि त्याने घाईने बाबांना परत जंगलात यायला सांगितले. होईल तसा जलद कळप परत नेता नेता आपण बदामी तळ्याच्या काठी पोचलो तोवर रक्त्या आणि वनपाल एकमेकांना भिडले होते. आणि आज इथे ही बैठक.
       बाबा केवळ हत्तींसाठी बोलत नव्हते. खरंतर ते फार बोलतच नव्हते. पण जेव्हा जेव्हा जख्ख कुठलाही नवा प्रस्ताव मांडायचा, तेव्हा बहुतेकदा ते कान हलवून नकार द्यायचे. मग जख्ख नव्याने काहीतरी सांगायचा, मध्येच वनपाल खूप खूप बोलायचा, मग परत जख्ख वनपालाचे शब्द फिरून फिरून मांडायचा. मग बाबा कधीतरी सोंड उंचावून होकार द्यायचे. मुळात पहिलाच प्रस्ताव गजेन्द्राला मान्य नव्हता. तो होता की यापुढे जंगल बळावर न चालता प्राणीशाहीने चालेल. हत्तींनी असल्या ठरवाशी देणे-घेणे ठेवायची गरज काय असे गजेन्द्राला वाटत होते. आपल्याला आपली तळी आहेत, झाडे आहेत, हवे तसे खावे, खेळावे, जुगावे, गंमतीने झुंजावे. पण बाबा गंभीरपणे हा विषय घेत होते. आणि जेव्हा जेव्हा कोल्ह्याच्या सश्यांवरच्या हक्काविषयी, किंवा माकडांना गुलाम ठेवण्याच्या निकडीविषयी विषय निघायचा तेव्हा बाबा जख्ख कोल्ह्याला विरोध करत होते. बाबांच्या संथ पण खोल युक्तिवादाने वनपालाला कोल्ह्याचा सशांची नवजात पिल्ले मारण्याचा हक्क काढून घ्यावा लागला आणि माकडांना पिढीजात गुलाम ठेवता येणार नाही असेही वनपालाला जाहीर करावे लागले. वनपालाने ही घोषणा केल्यावर माकडे झाड झाड गदगदवून चीत्कारू लागली होती. आणि तेवढयात, जख्खने खूण केली म्हणून का आपसूक असा रानडुकरांचा कळप वडाच्या झाडाच्या दिशेने येऊ लागला. ती हालचाल पाहून गजेंद्र कळपाच्या तरुण पथकासह पुढे सरसावला होता. पण बाबांनी एका गजांत हुंकाराने सगळी हालचाल थांबवली. आणि जख्खच्या मानेवर आपली सोंड ठेवून त्याला रानडुकरांच्या नायकाला बोलवायला लावले.
       भाल्या, रान डुकरांचा नायक. भाल्याला काही सांगताही येत नव्हते. तो बोलायचा, आणि मध्येच खुरांनी माती उकरायला लागायचा. मग जख्ख म्हणाला की नव्या गवताच्या कुरणावर रानडुकरांचा हक्क आहे असे भाल्या म्हणतो आहे. आणि जर तो मिळणार नसेल, तर तो रानडुकरांचा जथ्था घेऊन जंगल भर धुडगूस घालेल. पण जर त्याला नव्या गवताचे कुरण, हत्तींना केशरी तळ्याचा प्रदेश, आणि हरीण-ससे यांना ओल्या गवताचे जंगल दिले तर भाल्या त्याचा जथ्था सांभाळून राहील.
       ही धमकावणी आहे असे म्हणून गजेंद्र पुढे सरणार तसे बाबांनी त्याला थांबवले. मग बाबा जख्खला म्हणाले की नव्या गवताच्या कुरणाला लागून माणसांची शेते आहेत. शेतांना उपद्रव झाला तर माणसे जंगलात शिरतील. हत्तींना दातासाठी, साम्बराना शिंगासाठी, हरणाला कातड्यासाठी, उदमांजरला केसांसाठी, अस्वलाला पकडण्यासाठी मारू पाहतील.
माणसे इथे येणार नाहीत. मी माझे शिकारी लांडगे घेऊन माणसांना नव्या गवताच्या कुरणाशी थांबवून ठेवेन.’  वनपाल त्याचा टोकदार भाला उंचावून बोलला.
आणि ते लांडगे आवरले नाहीत तर?’ बाबांनी प्रश्न केला. वनपाल चिडला. तुम्हाला सारे जंगल मोकाट हवे आहे. म्हणजे ज्याला होईल तो दुसऱ्याला मारेल. खाईल. जशी ती माणसे करतात. मी, हा जख्ख हे जंगल ज्याला त्याला त्यांच्या न्याय्यहक्का प्रमाणे देऊन प्रत्येकाला सुख-समाधानाने जगण्याची संधी देतो आहोत. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शंका आहे. गजनायक, विशाल, स्थिर बुद्धीचे तुम्ही, असे नव्या स्वप्नांना घाबरणारे असाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला हे जंगल असेच भरलेले नको आहे का? तुम्हाला बळी तो कान पिळी असे करून साऱ्यांना संपवायचे आहे का? लक्षात घ्या, हा रानडुकरांचा जथ्था हैदोस घालेल तर कोणालाच काही शिल्लक राहणार नाही. गजवीर, सांगा, मी करतोय ते चुकीचे आहे का? आपल्या मन-मर्जीने वाटेल त्याला मारणाऱ्या रक्त्याला मी संपवले ते कशासाठी? मी या जंगलाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून आहे. आणि तुम्ही, प्रशाल दातांचे शक्तिमान गजराज, तुम्ही एवढ्या शंका घेता?’
       वनपालाच्या भावूक बोलण्याने सारेच प्राणी बुचकळ्यात पडले. भाल्या परत खुराने माती उकरू लागला. त्याचे साथी आवाज निर्माण करणारे उच्छ्वास टाकू लागले. तशी हरणे-ससे गजेन्द्राकडे, त्याच्या बाबांकडे आशेने बघू लागले. १०० ठिपक्यांचे डौलदार हरीण गजेन्द्राला खुणावू लागले की त्यांना ओल्या गवताचे कुरण निर्भयतेने मिळाले तर त्यांना ही नवी रचना मान्य आहे. त्याने अशीच खूण जख्ख कोल्ह्यालाही केली. कुजबुज वाढली. आणि सारे तळे, तिथली पुराण भव्य झाडे भीतीने, शंकेने भरू लागले.
       ‘ठीकम्हणून बाबांनी सोंड वर केली. पण हत्तींना नव्या गवताच्या आणि ओल्या कुरणाच्या सीमारेषेवर दर अष्टमीला क्रीडा करता यावी. बाकीचा वेळ आम्हाला केशरी तळे पुरेसे आहे.
होय. होय. हत्तींचा दुमदुमी चीत्कार उठला.तो थांबल्यावर जख्ख बोलू लागला. त्याचे बोलणे चर्चेपेक्षा भाषणासारखे होते. पण त्याच्या चतुर, अभेद्य शब्द रचनेने त्याने साऱ्या चर्चेचा शेवट केला.
माझ्या प्राणी मित्रानोजख्ख भाल्याकडे, बाबांकडे, हरणांकडे, सशांकडे, वडाच्या झाडावर बसलेल्या करड्या कपाळाच्या डोमकावळ्याकडे नजर टाकत म्हणाला, ‘ आणि आपल्या प्राण्यांच्या, या जंगलाच्या प्राचीन अभेद्य ताकदीला दैवी दुजोरा देणाऱ्या, पूर्व जन्मीच्या प्राणी राजा असणारा वनपाल, रक्त्याचा मृत्यू हा जंगलातल्या हिंस्त्र, स्वैर भावनेचा मृत्यू आहे. रक्त्याच्या राजवटित प्रत्येकाला भूक आणि भीती याशिवाय काही एक जगणे नव्हते. त्याच्या नियमहीन ताकदीने मरणाची-जगण्याची झुंज एवढाच जंगलाचा अर्थ ठेवला. पण आज ही आतंकी रात्र संपली आहे. यापुढे आपण या जंगलात स्वच्छंद बागडू शकू. हवे ते करू शकू. ही माकडे केवळ झाडांवर फळे न खाता, त्यांनी पूर्वी जशी आपली नगरी उभारली तसे त्यांचे जग वसवू शकतील. हे ससे त्यांचे गोजिरवाणे खेळ खेळू शकतील. हरणांना त्यांच्या प्रेमळ कथा रचता येतील. आणि एकमेकांची भीती नसलेले आपण हळूहळू हे सारे जंगल वाढवत नेवू. आपले पुरातन जंगल राज्य परत उभे राहील. ह्या स्वार्थी मानवी आक्रमणाचा मुकाबला करायचा तर रानडुकरांच्या शक्तीला हत्तींच्या अभेद्य बचावाची, कावळ्यांच्या बिनचूक संदेश वहनाची, हरणांच्या चपळतेची, माकडांच्या निरन्तर हालचालींची गरज आहे. आणि ह्या चिरंजीव महागरुडाचा अवतार असणाऱ्या वनपालाच्या नेतृत्वाची. ही पृथ्वी आपली आहे. ही झाडे, ही जमीन, ही तळी आपली आहेत. ही मानवजात आपल्या भटकलेल्या वंशाची आहे. आपण आद्य, अजेय, शुद्ध आहोत. आज ह्या बदामी तळ्याकाठच्या अदृश तहाने आपण सारे एक नवे जंगल जीवन सुरु करू.हा पराक्रमी वन राज आपला नायक, ही महागुहा आपले केंद्र, गजराज आपले कार्य नायक, भाल्या आपला सेनापती आणि आपल्या साऱ्यांचे सारखे हे जंगल.’  असे म्हणून त्याने, तोवर वर आलेल्या पौर्णिमेच्या चंद्राकडे बघून एक सम्पूर्ण कुई दिली. त्या तीक्ष्ण पण जोमदार आवाजाने किंवा त्याच्या बोलण्याने किंवा त्याच्या बोलण्याने आलेल्या अद्भूत अशा की काय कशाने पुढे कोणीच काही बोलले नाही. वनपाल आपला भाला उंचावून त्याच्या गुहेकडे चालता झाला. बाबा मात्र पापणी न लावता जख्खकडे, समोरच्या कुईमुग्ध प्राणी समुदायाकडे पहात होते. मग तेही उठले आणि त्यांच्या आवडत्या केशरी तळ्याच्या टोकाशी असलेल्या ओलसर पाणथळीशी जाऊन बसले. गजेन्द्राला त्यांनी शेपटाने नको येऊ अशी खूण केली. त्या रात्रभर त्या पाणथळीत बाबांनी काय विचार केला हे कोणालाच कळले नाही. पण त्यानंतर त्यांनी समूहाची जास्तीत जास्त कामे आपल्याकडे आणि त्यांच्या भावाकडे, म्हणजे लघूगजाकडे सोपवली. त्यांच्या विरक्तपणाला एकदाच तडा गेला. जेव्हा आपण नव्या गवताच्या आणि ओल्या कुरणाच्या सीमारेषेत क्रीडा करण्याची जबाबदारी लघुगजाला दिली. तेव्हा त्यांना आपण निर्णय बदलावा असे वाटत होते. पण आपल्याला बाबांच्या सोबत केशरी तळ्याशी रहायचे होते.
       गजेंद्र आठवणीत बुडून सावकाश चालत पाणथळीपाशी आला होता. आणि आता आठवणी सोडून तो महागुहेत काय होत असावं, आणि आता नव्या रचनेचं काय होईल, त्यात आपण काय भूमिका घ्यावी असा विचार करू लागला. पण त्याला काही गोष्टी उमजत नव्हत्या. त्यातली एक म्हणजे गुहेच्या तोंडाशी असलेली लांडग्यांची झुंड. दुसरी म्हणजे जख्ख आणि त्याच्या इतर तीन कोल्ह्यांची भूमिका. म्हटलं तर जख्खच्या बुद्धीनेच नवी रचना उभी राहिली होती. हत्ती निर्भयतेने, त्यांच्या भव्य आनंदात मश्गुल राहू शकत होते. जख्खने बाबांच्या मृत्युनंतर त्यांचे दातही आठवण म्हणून नेले होते. जख्ख त्याच्या एका अरुंद गुहेत एकटा रहायचा. त्याने म्हाताऱ्याला जन्म दिला. म्हाताऱ्याने मध्यमला आणि मध्यमने तरुणला. तरुण थोडा उतावळा आहे. पण जख्ख बरोबर सगळ्यांना सांभाळून आहे. पण जख्ख हे सगळं का करतोय? आणि बाबा जख्खबाबत एवढे शंकित का होते?
       गजेंद्र असा विचार करत असताना त्याचे पाणथळीतील गढूळ प्रतिबिंब डुचमळल्यासारखे झाले. गजेंद्र सावध झाला. पण तिथे हळूहळू हालचाल करत आलेले दिर्घी कासव पाहून त्याने सावध पवित्र सोडला.
                सावकाश हालचाल करत दिर्घी कासव गजेंद्र उभा होता तिथपर्यंत आले. दिर्घी कासव किती वर्षाचे होते हे फक्त तेच सांगू शकत होते. आणि दिर्घी कासवाला हे विचारू शकणे ही कोणाला जमणार नव्हते. कारण तुम्ही विचारल्यावर दिर्घी त्याला प्रतिसाद देईल असं नाही. ते कवचात मान घालेल, सारे पाय आत ओढून घेईल आणि दगडगत होऊन पडून राहिल. तुमचा प्रश्न त्याच्या टणक, गुळगुळीत कवचावरून घसरून पाणथळीत बुडून जाईल.
       ‘तुला सारी गोष्ट ठाऊक नाही गजेंद्रा.दिर्घीचा चिरका आवाज गजेन्द्राला ऐकू आला.
सारी गोष्ट खरी तर कोणालाच ठाऊक नाही. पण तिचा एक सलग मोठा तुकडा माझ्या या थरथरत्या, तरंगत्या चार पायांना लागला. मला तो कळलाही नव्हता. मी तो तुझ्या बाबांना दाखवला. त्याच दिवशी जेव्हा ते बदामी तळ्याच्या अदृश्य तहानंतर इथे येऊन बसले होते. त्यानंतर समोरच्या ह्या भुत्या पिंपळाच्या ढोलीत राहणाऱ्या वेत्या घुबडाने मला अजून एक तुकडा दिला. तो मी तुला दाखवतो.
दिर्घीच्या या बोलण्याने गजेंद्र फक्त उत्सुक झाला होता. पण त्याला ठाऊक होते की तो दिर्घीशी बोलतो आहे. म्हणजे खरंतर तो फक्त दिर्घीचे ऐकतो आहे. तो दिर्घीच्या पुढच्या बोलण्याची वाट पाहू लागला.
अदृश्य तहाच्या नंतर एका रात्री वेत्या घुबड काही खायच्या शोधात उडत होते. ते जेव्हा नव्या गवताच्या कुरणाशी पोचले तेव्हा भाल्या आणि जख्ख बातचीत करत होते. वेत्या एका फांदीशी लपून त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करत होता. पण जख्ख सावध होता. ते काय बोलले हे वेत्याला समजले नाही. पण त्यानंतर भाल्याने त्याची झुंड एकत्र केली. आणि ते नव्या गवताचे कुरण ओलांडून शेताडीत घुसले.
पुढल्या दिवशी सकाळी माणसांचे हाकारे साऱ्या जंगलाने एकले. तुम्ही आणि भाल्याच्या जथ्थ्याने माणसांना नव्या गवताच्या कुरणाशी रोखले. त्या रात्री परत वेत्या घुबड उडत नव्या गवताच्या कुरणाशी गेले होते. तेव्हा जख्ख करड्या कपाळाच्या डोमकावळ्याशी बोलत होता. वेत्याने करड्याचा पाठलाग केला. करड्या उडून शेताडीच्या मालकाच्या हरभाषी पोपटाच्या पिंजऱ्याजवळ गेला. तिथे त्याने एक निरोप शीटला. वेत्याला तो निरोपही वाचता आला नाही. दुसऱ्या दिवशी माणसांचा दूत महागुहेपाशी आला. तो चार पायांवर रांगत आल्याच्या खुणेने तो शरणागत आलाय हे साऱ्यांनाच कळले. त्यानंतर गुहेत काय घडले हे वनपाल, जख्ख आणि तुझे बाबा यापलीकडे नेमके कोणालाच ठाऊक नाही. पण तिथून शेताडीतून पौर्णिमेच्या मेजवानीला आणि दर हफ्त्याला लागणारे मासांहारी प्राण्यांचे मांस येऊ लागले. हे मांस येऊ लागल्यानेच शाकाहारी प्राण्यांना अभयहस्त दिला गेला. त्या बदल्यात तुझ्या बाबांना लांडग्यांना हरणांना आणि वानरांना कामाला ठेवण्याचा हक्क द्यावा लागला. दिर्घी थांबला. त्याची निमुळती मान त्याने पाण्याच्या दिशेने वळवली. पण त्याने परत जाण्याचे अर्धगोल वळण घेतले नव्हते.
       गजेन्द्राला यातले काही ऐकून माहित होते. पण रानडुकरांची अशी झुंड शेताडीत गेली होती किंवा करड्या कपाळाच्या डोमकावळ्याने हरभाषी पोपटाला शिटून असा काही निरोप दिला होता हे त्याला ठाऊक नव्हते. जशी जशी दिर्घीची माहिती त्याच्या समजेत सावकाश जिरू लागली तशी प्रश्नांची एक सलग रांग, टोचणारी, कुरतडणारी, आपल्या मस्तकापासून आपल्या कानांपर्यंत बनते आहे असं त्याला वाटू लागलं. जख्ख करवतोय हे सगळं? पण तो एक क्षुद्र कोल्हा आहे. आयत्या मांसावर बहुतेक वेळ जगणारा. त्याचं तर बहुतेक आयुष्य आता संपून गेलंय. पण त्याने हे सगळं का रचलंय? आत्ता तो त्याच्या तीन वंशजांसह महागुहेत तळ ठोकून का आहे? माणसे मांसाहारी प्राण्यांचे मांस का देऊ लागली? शाकाहारी प्राण्यांना अभयहस्त का दिला गेला? त्यांनी अभयहस्त मिळाला म्हणून चाकरी पत्करली?’ गजेन्द्राला स्मरण खोल होते पण त्याचे आकलन सावकाश होते. पण प्रश्नांचा त्याच्या डोक्यात उडालेला कल्लोळ त्याला अस्वस्थ करू लागला. त्याची सोंड त्याच्या नकळत वेगवान हेलकावे घेऊ लागली. मध्ये-मध्ये आपण हे सारे असहाय्यपणे बघतो आहोत ह्याच्या चीडीचा दंश त्याला होऊ लागला. जख्खला, त्याच्या वंशावळीला फेकावे, तुडवावे, लांडग्यांची झुंड अंगावर घेत एकेकला रोंदून काढावे. त्याच्या गंडस्थळाला पाझर होऊ लागला. आणि त्याची पावले पाणथळ ओलांडून महागुहेचा रस्ता पकडणार तेवढयात दिर्घीचा आवाज परत येऊ लागला.
गजेंद्रा, तुझ्या या संतापाचा काही उपयोग नाही तुला. असलाच तर तो फक्त त्यांना आहे. त्यांना म्हणजे ह्या रचनेपाठी, ह्या अदृश्य तहापाठी जे आहेत त्यांना. तू असा उद्रेक केलास की तुम्हा हत्तींना वाटाघाटीतून काढून टाकता येईल. मग लांडग्याचे, रानडुकरांचे राज्य आहे.
दिर्घीने आपल्या मनातले सारे ओळखले कसे याचा गजेन्द्राला विस्मय वाटला. आणि त्याचा विस्मय अजून वाढला कारण दिर्घी म्हणाला, ‘मी कसं जाणतो हे सगळं असंच ना? तुला म्हटलं ना मी गजेंद्रा की तुला सारी गोष्ट माहित नाही. तुला माझी गोष्ट माहित नाहीत. तुला जख्खची गोष्ट माहित नाही. तुला वनपालाची गोष्ट माहित नाहीत. तुला तुझ्या बाबाची गोष्टही माहित नाही. ऐक आता.
       मी विशांत महासागरातल्या एका बेटावरचा आहे. मला आता माझ्या जन्म किनाऱ्याचे काही काही आठवत नाही. माझ्या आई-बापाने माझे अंडे किनाऱ्याच्या कुशीत वाळूच्या एका खोबणीत ठेवले होते, बाकीच्या १० अंड्यांसह. पण मी घरंगळून, का कसा त्या खोबणीतून बाहेर पडलो, अंड्यातून बाहेर पडलो तेव्हा मी विशांत महासागरात पोहणारा नगण्य कासव होतो. तिथल्या अजस्त्र दातांपासून, राक्षसी मुखांपासून मी वाचत राहिलो. आणि आपण कधीही आपल्याहून मोठ्या ताकदीचा घास बनू शकतो ही भीती मला शिकवत गेली. माझ्या या दगडी कवचाला डोळे फुटल्यासारखे झाले. मला प्रतिबिंबे वाचता येऊ लागली. मला श्वास-उच्छ्वासाच्या गंधाला उलगडता येऊ लागले. आणि माझ्या भीतीने माझे कवच अजून अजून टणक होत गेले. माझे आयुष्य, माझे हे जवळपास शेकडो वर्षांचे आयुष्य हा भीतीचा, आणि भीतीपोटी बाळगलेल्या सावधानीचा थर आहे. विशांत महासागराच्या पूर्व टोकाला मी असाच एका अणकुचीदार परीक्षेतून वाचलो. तिथून निसटताना मी प्रवासी माश्यांच्या झुंडीत अलगद तरंगत राहिलो. मला रस्ता आठवत नाही. मी तिथून मी काफ्रीलाच्या किनाऱ्यांवर राहिलो. तिथे प्रवासी माश्यांचा पुढचा ताफा पकडला. तो थांबला तेव्हा मी एका लहानश्या नदीत होतो. तिच्या पाणवाटांचा माग काढत, जिथे मला माझे माझे राहता येईल अशा ठिकाणाचा मी शोध घेत घेत बदामी तळ्याशी पोचलो. पण इथे मला आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या भीतीचा सामना करावा लागला. मी कुठे कुठे दडलो. दगड बनून पडलो. पण खुन्या मगराचा जबडा ह्या तळ्यात आ वासून होता. आणि तो फक्त माझ्यासाठी नाही. इथे येणारा प्रत्येक प्राणी खुन्या मगराच्या जबड्याला घाबरत होता. भीती. बदामी तळ्याच्या पाण्यावर तरंगणारी भीती. पण तहान आणि भीती यांची टक्कर होऊ लागली की प्रत्येक जण हळूहळू भीतीला आशेचे खोटे पापुद्रे जोडून हिय्या करून तळ्याशी यायचा. त्यातले काही परतही जाऊ शकायचे. त्यांच्या यशाने का खुन्याच्या आळसाने हुरळून पुढचे कोणी इथे यायचे. आणि त्यावेळी खुन्याचा जबडा चुकायचा नाही. हळूहळू मला एक खेळ समजला. ज्यावेळी मला तळ्याच्या तळाचे प्लव खाण्यासाठी तळ्यात जायचे असायचे तेव्हा मी अगोदर तळ्याच्या काठाशी जायचो. तिथे कोणी पाणी प्यायला आले की मी सावध, सावकाशपणे खुन्याच्या दिशेने जाऊ लागायचो. माझी हालचाल पाहून खुन्या माझ्याकडे येऊ लागायचा, त्यावेळी मी हळूच त्याला तिथे पाणी पिणारा प्राणी दाखवायचो. खुन्याची निवड सोपी असायची. माझे थोडके शरीर का तिथला बेसावध, आशेवर जगणारा चार पायाचा अख्खा प्राणी? मला सोडून खुन्या पुढचे दोन पाय पकडायला झेपावायाचा आणि त्याच्या थोडावेळ निवलेल्या भुकेचा फायदा घेऊन मी माझी भूक भागवायचो. खुन्या वाचलेले शरीराचे तुकडे तळ्याच्या तळाशी टाकायचा. त्याने तिथले प्लवही छान वाढत होते. माझ्या खुणावणीमुळे खुन्यालाही तळाशी पडून हालचाल दबावून राहता येत होते. त्यामुळे तळे शांत वाटून तहानलेल्या प्राण्याची आशा अजून वाढायची. आमच्या गरजा जुळल्या होत्या.     
       पण तुझ्या बाबांनी खुन्या मगराला चेचून मारला. तेव्हाही मी चौकोनी ठिपक्यांच्या हरणाला सापळ्यात फसवला होता. पण पकडले गेल्यावर चौकोनी ठिपक्यांचे हरीण आकांत करू लागले. त्यावेळी तुझा बाप तिथून जात होता. तरुण, मत्त. आणि त्याच्या काफ्रिली कुळाचा प्रचंडपणा. त्याने सोंडेच्या फटकाऱ्याने हरणाला सोडवले आणि त्यानंतर शिताफीने चवताळलेल्या खुन्याला स्वतःचा पाय पकडू न देता त्याच्यावर पदाघात करत राहिला. शेवटी दमलेल्या खुन्याने जेव्हा शेवटची चाल केली तेव्हा थेट त्याच्या वासलेल्या जबड्याच्या मागे, त्याच्या मानेवर शेवटचा प्राणांतिक पदाघात झाला. त्यानंतर प्रचंड चीत्कार करीत तुझ्या बापाने त्या रक्त-रंजीत पाण्याचे कारंजे उडवले. तो खेळत असेपर्यंत गिधाडे, घारी सारे समोरच्या झाडांवर चिडीचूप बसून होते. आपले रक्तस्नात सुळे घेऊन जेव्हा तो परत गेला तेव्हा खुन्याच्या शरीरावर गिधाडे झेपावली. मी पाणथळीतून तो रौद्र सामना पहात होतो. आणि तळ्याच्या दुसऱ्या टोकाच्या झाडीतून रक्तांश वाघ.
       रक्तांश वाघाची हकीकत ही सगळ्यात वेगळी गोष्ट. तो असा कसा झाला हे कोणाला ठाऊक नाही. पण त्याला त्याच्या भेदक सुळ्यांच्याइतकी भेदक बुद्धी आणि भेदक वाणीही मिळाली होती. तुझ्या बापाने खुन्या मगराला मारलेले त्याने पहिले. त्यानंतर आपल्या विजयात मश्गुल अशा रक्तस्नात हत्तीच्या तो समोर जाऊन उभा राहिला. तुझ्या बापाच्या उगारलेल्या सोन्डेकडे अनिमिष बघत त्याने तुझ्या बापाला त्याची जन्मकथा सांगितली.
       तुझा आजा काफ्रिली वंशाचा, काफ्रीलीच्या घनघोर अरण्यात बिनघोर राज्य करणाऱ्या प्रचंड सुळ्यांच्या गजवंशातला. पण एक दिवस उसाच्या एका शेताडीकडे येताना त्याला माणसांच्या गटाने एका पिंजऱ्यात अडकवला. आणि मग त्यांच्या राजाला विकण्यासाठी, ३५०० मैलांचा प्रवास त्यांनी सुरु केला. तुझा आजा असा अडकून राहणं शक्य नव्हतं. तो दररोज त्या पिंजऱ्याच्या दातेरी सीमांना धडका देऊन रक्तबंबाळ व्हायचा. चीत्कारायचा. त्या काफिल्याच्या नायकाचा छोटा मुलगा त्यांच्या बरोबर प्रवास करत होता. तो दररोज तुझ्या आज्याचा संघर्ष पहायचा, बापाला तो असं का करतो म्हणून विचारायचा. एक दिवस त्यांचा काफिला या जंगलाच्या जवळून जात असताना त्या मुलाने काफिल्याच्या नायाकाकडून पिंजऱ्याची किल्ली चोरली आणि तुझ्या आज्याला बंधमुक्त केले. तुझा आजा बाहेर आल्यावर त्याने त्या मुलाला पाठंगुळी मारले आणि ते जंगलात पळून आले. मग तो मुलगा जंगलाजवळच्या गावाकडे गेला आणि तुझा आजा या जंगलात. त्याच्या भव्य अस्तित्वाने, त्याच्या वक्राकार चकचकीत सुळ्यांनी तो लवकरच हत्तींच्या कळपाचा नायक झाला. पण त्याने हत्तींच्या स्वभावधर्माहून नवी गोष्ट सुरु केली. त्याच्या समोर कोणताही प्राणी दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मारू, पकडू शकत नव्हता. तो असं करणाऱ्याला पळवून लावे.
       ही हकीकत तुझ्या बापाला सांगून रक्तांश वाघ म्हणाला की तू तुझ्या बापाचे वागणे उचललेस. आणि अधिक ठळक केलेस. तू आता पकडू पाहणाऱ्याला, मारू पाहणाऱ्याला मारून टाकतोस. त्याने तुला वाटते की तू जो वाचणारा आहे त्याला कायमचा वाचवतोस. तुलाही अशी दिवास्वप्ने पडू लागली तर. शेवटी काही वेड्या माणसांचा खेळ आता यशस्वी होणार तर? तुझा बाप प्रश्नांकित होऊन रक्तांशाकडे पहात होता. रक्तांश त्याला पुढे सांगू लागला.
       तुझ्या आज्याला माणसाने सोडवला म्हणून तुझ्या आज्याने अशा संकटात असलेल्या कोणलाही मदत करणे ही आपली पध्दत बनवली. पण जंगलाची अशी कोणतीही पद्धत नाही. इथे भूक, भीती आणि पिलावळ एवढ्याच पध्दती आहेत. आणि त्या आहेत म्हणून जंगल नांदते आहेत. भूकेमुळे काही झाडे मरतात, आणि नवी झाडे उगवतात. काही प्राणी मरतात, काही जगतात. काही वाचतात ते अधिक प्रबळ पिलावळ बनवतात. अशी प्रबळ पिलावळ अधिक सशक्त सुळे जन्माला घालते. झाडे या सर्वांच्या विष्ठेवर, मल-मूत्रावर, कुजाणाऱ्या हाडा-मांसावर वाढतात. इथे कोणी कोणाला मदत करत नाही आणि गंमतीखातर पकडतही नाही. आपल्याला कसे जगायचे हे आपोआप ठाऊक आहे. त्यासाठी मदत, सूड, समाज, प्रगती, आनंद असले काही आपल्याला लागत नाही. पण आपले असे जगणे माणसांना बघवत नाही. तू नीट पाहशील तर समाज, प्रगती, मानवता अशा साऱ्या मानवी खुळचटपणाखाली त्यांनी बळी तो कान पिळीहाच नियम चालवला आहे. पण ज्यांना इतरांना मारायचं आहे, त्यांच्यावर जगायचं आहे त्यांच्यासाठी जे मरणार आहेत त्यांना भीतीपोटी सजग ठेवण्यापेक्षा विश्वासाच्या बेसावधपणात ठेवणे सोपे असते. एकदा का त्यांच्या जगण्यातली भीती आणि भूक काढून टाकली की ते एकमेकांशी स्पर्धा सुरु करतात. कारण भूक आणि भीती आहे तोवर त्यांना कसं जगायचं हे शोधायची, त्यासाठी कोंकडे पाहायची गरज नाही. भूक लागली की आपोआप अन्न शोधावे लागेल, आणि प्राणाची भीती आली की आपोआप पळावे लागेल. एकाची भीती ही दुसऱ्याची भूक. जगत राहणं एवढं सोपं जगायचं उद्दिष्ट आहे. पण ते या माणसांना मानवलं नाही. मग त्यांच्यातल्या काही जणांनी बहुतेकांची भीती आणि भूक वापरून एक इमला उभा केला आहे. आणि तो इमला उभा करण्याची योजना सोपी आहे. भूक आणि भीती यांवर जगणाऱ्याची भूक भागवायची हमी द्या आणि त्याच्या भीती पासून त्याला अभय द्या. मग तो तुमचा गुलाम आहे. त्याला हक्क असल्याचा दिखावा असू द्या, आणि त्यांची झुंड बनवा. ही झुंड जगायचं कसं हे विसरलेली आहे. कारण त्यांना आता टाकलेले घासच लागतात. ही झुंड पळायचं, लपायचं विसरली आहे. थोडे दिवस हे गुलाबी जग चालेल. पण मग दिला तुकडा, दिला कोपरा पुरणार नाही. मग ही झुंड आपोआप कोणाचे बळी द्यायचे हे ठरवेल. पहा गजराज, माणसांना पहा. एकत्र राहण्याच्या नावाखाली ते एकमेकांत अजून गट बनवतात. ते एवढे अमर्याद वाढतात की मग त्यांना त्यांच्यातले काही जण मेले तरी चालतील असं वाटू लागतं, नाही त्यांना असं हवंच असतं. आणि मग ते स्वतःहून त्यांना अभय देणाऱ्या बलवन्ताला निमंत्रण धाडतात. आता होणारी शिकार हा ताकद असणाऱ्याचा अधिकार बनतो. त्या शिकारीतून वाचलेले शिकाऱ्याचा जयजयकार करतात. अधिक जोराने, कारण त्यांना आता त्यांच्या मनात परत निर्माण होऊ लागलेली भीती डाचत असते. ते शिकाऱ्याला सांगू इच्छितात की बघ मी जोराने ओरडतो आहे, मला मारू नकोस. त्यांच्या जगण्यातली भूक आणि भीती निघून गेल्याने ह्या दोघांशी कसं झगडावं हे त्यांना कळत नसतं. शिकाऱ्याचा जयजयकार, त्याची गुलामी ह्यामुळेच ते आता त्यांची भूक निश्चित भागवत ठेवू शकतात. आणि भीती लांबवत ठेवतात. त्यांना भीती आणि भूक यांच्याशिवाय राहण्याची सवय लावायची फक्त काही दिवस, आणि मग ते स्वतःहून भीती, भय आणि गुलामी स्वीकारतात. खूप लोक स्वप्नाळू मुर्ख असतात. आणि त्यांच्या मूर्खपणाच्या दगडावर शिकारी आपले सुळे परजत असतात.
       रक्तांशाच्या बोलण्याने तुझा बाप दिग्मूढ झाला होता. रक्तांश त्याच्या भेदक आवाजात बोलत गेला.
       आपल्या शेजारी हे गाव आल्यापासून प्राण्यांना सवयलागू लागली आहे. आणि हेच माणसांना हवे आहे. बघ, प्राणी कधी कोणाला पाळत नाहीत. पण ही माणसे पाळतात. त्यांना हे जंगल नियम, समाज, निर्भयता अशी स्वप्ने दाखवून पाळीव बनवायचे आहे. माझा भाऊ, रक्त्या, त्याला आता गंमत म्हणून प्राण्यांना मारायचे आहे. कारण गावातल्या पोरांना त्याने गंमत म्हणून मासे मारताना, पक्षी मारताना, अगदी एकमेकांना मारताना पाहिले. पण रक्त्यापेक्षा वेगळे दुसरेच संकट आहे. काही दिवसापूर्वी जंगलातले काही कोल्हे माणसाच्या झोपडीबाहेरच्या कोंबड्या पकडायला गेले होते. तेव्हा त्यांच्यातला एका कोल्हा पकडला गेला. माणसांनी त्या कोल्ह्याच्या त्यांच्या पाळीव कुत्रीसोबत संकर करवला. त्यातून जन्माला आलेला कोल्हा आता या जंगलात आला आहे.
       रक्तांश, त्याचा बाप, कोल्ह्याचा कुत्रीशी संकर, हा सगळ्याने गजेंद्र गोंधळून गेला होता. दिर्घीने थोडावेळ थांबून त्याला सारे काही समजायला वाव दिला. थोडेफार समजल्याचा भाव गजेन्द्राच्या चर्येवर आला तसा दिर्घी पुढे  बोलू लागला.
       रक्तांश जे बोलला ते तुझ्या बापाला फारसे पटले नाही. पण तुझ्या बापाने कान-डोळे उघडे ठेवून रक्तांशचे बोलणे ताडून पाहायचे ठरवले. त्याने जख्खला लघुगजाशी मैत्री करताना पाहिले. त्याने जख्खला भाल्या रानडुकराशी घसट वाढवताना पाहिले. त्याची रक्तांशाच्या बोलण्याबद्दलची खात्री पटली जेव्हा त्याने रक्त्या वाघ आणि जख्ख ह्यांना एकत्र फिरताना पाहिले. त्याच्या आजवरच्या जंगलाच्या अनुभवांच्या विपरीत जाणाऱ्या ह्या गोष्टी होत्या. खरंतर एवीतेवी त्याला हे दिसलं असतं तर त्याने कदाचित त्याकडे लक्षही दिलं नव्हतं. पण एका कोल्ह्याने एखादा हत्ती, रानडुक्कर, वाघ ह्यांच्या सोबत का राहावं? वाघ त्याला मांसाचे उरले-सुरले तुकडे टाकेल, किंवा एखाद्या छोट्या शिकारीत तो कोल्ह्याला वापरेल. पण हत्ती, रानडुक्कर? रक्तांशाचा धोक्याचा इशारा त्याच्या कानाशी किणकीणत होता. आणि आपल्या भोवती, आपल्या मुक्त रानटीपणाभोवती एखाद्या कारस्थानाचं जाळं विणलं जातंय हे त्याला स्वीकारत नव्हतं. त्याने परत एकदा रक्तांशाला भेटायचं ठरवलं.
       त्याची उलाघाल त्याने रक्तांशाला सांगितली. जख्खच्या डोक्यात काहीतरी आहे. किंवा जख्खपण एक मोहरा आहे. तुझ्या बापाने रक्तांशाला विचारले की आपण जख्खला मारले तर?त्याने पुढचे सगळेच टळेल. पण रक्तांश हे जाणून होता की तुझा बाप जख्खला मारू शकणार नाही. एकतर जख्ख त्याच्या पायात येणार नाही किंवा जख्ख त्याला कुठलेच कारण मिळू देणार नाही. आणि रक्तांश जर जख्खला  कारणावाचून मारेल तर त्याला रक्त्याला रोखता येणार नाही. आज तो जंगलाच्या जगण्या-मरणाच्या उतरंडीचा नैसर्गिक टोकदार अग्रभाग आहे तसा राहणार नाही. जख्खला संपवायचे तर ते रक्त्याच करू शकेल, किंवा भाल्या. कारण त्यांना केवळ ताकदीची जाणीव आहे, त्या ताकदीच्या नशेवर त्यांना कुठलेच नियंत्रण मंजूर नाही. आणि म्हणून जख्ख त्यांना आपल्या बाजूला ठेवतो आहे. त्याला हे ठाऊक आहे की तू किंवा मी पुरेश्या कारणावाचून जख्खला मरणार नाही. आणि तेच जख्ख वापरतो आहे.
       ‘पण मग लघुगजाशी जख्ख का बोलतो आहे?’ तुझ्या बापाने रक्तांशाला विचारले. रक्तांशाला त्याचे नेमके कारण ठाऊक नव्हते. पण लवकरच ते कळेल असे तो म्हणाला. त्याने तुझ्या बापाला जंगलभर लक्ष ठेवायला सांगितले. दोघांच्याही बोलण्यात एक उदासीन छटा आली होती. त्यांना फार पुढे बघता येत नव्हते. आणि त्यांना जेवढे कळत होते ते त्यांना काही नेमके करायला पुरेसे नव्हते. आपल्या ताकदीचा अंदाज आणि त्याचवेळी त्यावर बुद्धीने पडणारी मर्यादा, आणि त्यांच्या आसपास हळूहळू जमत जाणारे एक मोठे जाळे ह्याची जाणीव त्यांना होत होती. जाण्याअगोदर रक्तांश तुझ्या बापाच्या सोंडेला त्याच्या पंजाचा स्पर्श करत म्हाणाला की त्यांना निवड करावी लागेल आणि ती सोपी नाही.
       गजेन्द्राला रक्तांश का हे सगळं बोलतो आहे हे उमजणारी घटना लवकरच घडली. एकदा लघूगज आणि त्याच्या सोबत अरण्यक्रीडेसाठी गेलेल्या तीन तरुण हत्तींपैकी फक्त लघुगज परत आला. तोही रक्ताने माखलेला. त्याने जे सांगितलं ते थरकाप उडवणारं होतं. बाकीच्या ३ तिन्ही हत्तींना माणसांनी मारलं होतं आणि लघु गजाने तिथून पळून येताना जे पाहिलं ते त्यांचे सुळे उपटून उडणारे रक्ताचे फवारे. गजेन्द्राला ही घटना ठाऊक होती. त्यावेळी संतापाने चाल करून निघालेला गजेंद्र आणि त्याच्या तीन हत्तींचा कळप, आणि त्यांना अडवणारे बाबा. गजेन्द्राला परत प्रश्न डाचू लागला की बाबांनी आपल्याला का अडवलं, स्वतःला का अडवलं? त्यावेळीही बाबांनी लघुगजाला त्या जागी ठेवून कळपाची जागा बदलली. त्यानंतर काळविटांचा एक कळप मारला गेला. त्या नन्तर नीलगायींची टोळी. सारं जंगल अनाम दहशतीच्या सावलीत जगू लागलं. आणि जख्ख अधिक उघडपणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या नायकांना भेटू लागला.
       दिर्घीने थोडावेळ थांबून गजेन्द्राला परत स्थिर होऊ दिलं. गजेंद्र आठवणी सोडून परत इथे आला आहे हे कळल्यावर दिर्घी बोलू लागला.
तुलाही माहित असलेली ती भीषण घटना त्यानंतर घडली. पण त्या अगोदर जख्ख आणि त्यासोबत एक मनुष्य, ते इथे या तळ्याशी आले होते. तो माणूस वनमहिष शिकाऱ्याचा भाऊ अहिमहिष होता. त्याने जख्खला काफ्रिली हस्तीदन्ताची आणि वाघाच्या कातड्याची मागणी सांगितली. जख्ख विचारत पडला. थोड्याने वेळाने जख्खने त्याला होकार दिला. आणि दोन दिवसांनी बदामी तळ्याच्या काठी तयारीने येण्यास सांगितले.
       दिर्घीच्या या हकिकतीनंतर गजेंद्रला तिथे थांबणं अशक्य होऊ लागलं. स्वतःला शांत करायला पाण्याचे फवारेच्या फवारे तो आपल्या तापल्या गंडस्थळावर सोडू लागला. त्या एक एक फवायानिशी ती भयंकर घटना त्याला नीट आठवू लागली.
       शिकाऱ्यांच्या टोळीचा बंदोबस्त करायला जंगलाने एक झालं पाहिजे अशी मागणी घेऊन जख्ख बाबांना भेटायला आला. बाबा त्याला नाकारणार तेवढयात ठिपक्या हरीण त्याची मागणी घेऊन बाबांकडे आलं. त्याने बाबांकडे संरक्षण मागितलं होतं. ठिपक्यापाठोपाठ टोकदार कानांचा ससा, सर्पिल शिंगाचे सांबर सारेच आले. बाबा एवढ्या सगळ्यांना नाही म्हणू शकत नव्हते. शेवटी बाबा, रक्तांश आणि जख्ख ह्यांनी बदामी तळ्याशी भेटावे असे ठरले. ह्या बैठकीची सारी वार्ता गुप्त ठेवायची असल्याने तिथे सारा कळप घेऊन येवू नये असेही ठरले. जख्ख निघून गेल्यावर बाबांनी आपल्याला बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावर तयारीत राह्यला सांगितले. आपण महागज, अरुगज आणि वरूगज ह्यांना ही सोबत घेतले. बाकीचा कळप लघुगज सांभाळणार होता.
       आपण बैठकीच्या ठिकाणी धाव घेतली ती बाबांच्या प्रचंड चित्कारानन्तर. आपण तिथे पोचलो तेव्हा वडाच्या झाडावरून वनमहिष बाबांच्या गंड स्थळावर झेपावण्यास तयार होता. त्याचा एक साथी बाबांच्या पायाखाली चिरडला गेला होता तर दुसरा रक्तांशाच्या पंजाची शिकार झाला होता. पण वन महिष बाबांच्यानजरे आड होता. भाला सरसावून त्याने बाबांवर झेप घेतली. पण त्या भाल्याच्या टोकाचा स्पर्श बाबांना व्हायच्या आत रक्तांश बाबांचे सुळे आणि वन महिषाचा भाला ह्याच्यामध्ये झेपावला. रक्तांशाचे रक्त चहू बाजूना उसळले. आता रक्तांशाचा अर्धमेला देह एक बाजूने बाबांच्या सुळ्यांत अडकला होता तर दुसऱ्या बाजूने वनमहिषाचा भाला त्याच्या देहात फसला होता. बाबांनी सोंड उंचावून रक्तांश, आणि त्याच्या शरीरात भाला फसल्याने अडकलेला वनमहिष ह्यांना वरच्यावर तोलले. आणि वेगाने धावत त्यांनी जेष्ठवटाच्या प्रचंड बुंध्याला धडक दिली. जेष्ठवट हादरला. त्यावरचे पक्षी भयावह आवाज काढत उडाले. भाल्याचे मागचे टोक आणि झाड यांच्यात वनमहिष चिरडला गेला. रक्तांशच्या शरीरातून अजून रक्त उडाले. बाबांच्या उजव्या सुळ्याचे टोक तुटले. तशीच आपली मान गदागदा हलवून त्यांनी रक्तांश आणि वनमहिष ह्यांना जमिनीवर पडले. सोंडेने रक्तांशच्या शरीरातून भाला बाहेर काढला आणि वनमहिषाच्या मानेवर आपला उजवा पाय रोवत सोंड उंचावून एक भयानक चीत्कार दिला. त्यात राग होता, मित्राच्या मरणाचं दुख होतं आणि येणाऱ्या दिवसांना दिलेलं असहाय्य अगतिक आव्हान. बाबांची, आपली नजर जख्खला शोधत  होती. पण तो तिथे नव्हताच. बाबा तिथून निघून गेले, आपल्याकडे एक नजर टाकून. आणि आपण समोरच्या रक्तांशाच्या आणि वनमहिषाच्या प्रेतांकडे बघत राहिलो त्यांच्यावर गिधाडे उतरेपर्यंत.
       गजेंद्र भानावर आला तेव्हा दिर्घी निघून गेला होता. संध्याकाळ होत आली होती. महागुहेचा डोंगर, आणि त्यावर घिरट्या घालणारी घारी आणि गिधाडे अस्पष्ट दिसत होती. आपल्या मर्यादित समजेच्या, आणि करावे की न करावे या  अनिर्णयाने गुंतलेल्या ताकदीचा घाव सांभाळत गजेंद्र तिथून निघून गेला.
--
       तांबड्या पट्ट्याच्या कावळ्याने साहूल गिधाड, वेत्या घुबड, करवती पंखांची घार आणि बाकदार चोचीच्या डोमकावळ्याचा परिसंवाद वडाच्या प्रचंड झाडावर बोलावला होता. दोन दिवस अगोदर जेव्हा त्याने बाकी कावळ्यांना पांगवले होते त्यानंतर त्याने दोन महत्वाच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातली एक होती जख्ख आणि म्हाताऱ्या कोल्ह्याची आणि दुसरी हरभाषी पोपटाची. जख्खने त्याला वनपाल अजून जिवंत असल्याचा भरोसा दिला होता. म्हाताऱ्या कोल्ह्याने त्याला पुढच्या दोन दिवसांत करायची कामे समजावली होती. त्यातले एक होते की वनपाल मरणार आणि त्यासोबत माणसे जंगलावर आक्रमण करणार अशी शक्यता आहे हे साऱ्या जंगलभर पसरवायचे. आणि दुसरे म्हणजे शेताडीच्या पलीकडे निरोप पोचवायचा. तो निरोप पौर्णिमेच्या आदल्या रात्री अरीकपाल शिकाऱ्याला भेटीसाठी बोलवायचा. ठरल्याप्रमाणे तांबड्या पट्ट्याच्या कावळ्याने हरभाषी पोपटाला निरोप दिला होता. आणि आज त्याने हा परिसंवाद भरवला होता. त्याने दोन्ही कामे झाल्याचा निरोप दिला तेव्हा मध्यम कोल्ह्याने दोन बोटे त्याच्याकडे फेकली. त्यांचा फडशा पडून तो आता वडाच्या झाडाकडे उडत होता.
       साहूल गिधाड, करवती घार, वेत्या आणि डोमकावळा आपापल्या जागी बसले होते. ढोलीमध्ये बसलेला कावळा सूत्रसंचालन करणार होता. आजूबाजूंच्या झाडावर बाकी सारे पक्षी होईल तसे दडून, लपून कान देऊन ऐकत होते. ससे, उदमांजरे, काही हरणे ही वडाच्या खाली जमली होती. बाकीची त्यांच्या त्यांच्या जागी होती. जे घडेल, ठरेल ते समजलेच अशा भरोश्याने.
       ढोली टाळ्या कावळ्याने मागच्या तीन दिवसातल्या परिस्थितीची कल्पना दिली. वन पालाला साधेसे दुखणे झाल्याने तो विश्रांती घेत आहे. पण घाबरण्याची काही गरज नाही. अदृश तहाची आणि नंतरच्या बदलांची सारी कलमे लागू आहेत हे त्याने सांगितले. त्याचबरोबर वनपालाने विशेष सल्लागार म्हणून मध्यम कोल्ह्याची आणि प्रवक्ता म्हणून म्हाताऱ्या कोल्ह्याची नेमणूक केल्याचेही त्याने जाहीर केले.
मला वाटतं की वनपालाने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आहे.डोम कावळ्याने परिसंवादाला तोंड फोडले.
जख्ख कोल्हा आणि त्याचे हे वंशज ह्यांची भूमिका कायमच संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे आपण अशा नियुक्तीला विरोध करायला हवा.डोम कावळ्याने जोरदार मुद्दा मांडला. खाली बसलेल्या हरणांनी, सशांनी आपले कान, पाय उंचावून त्याला प्रतिसाद दिला.
नाही.साहूल गिधाड त्याच्या घाबरवणाऱ्या आवाजात म्हणाले. त्याने एकदम शांतता पसरली.
वनपालाने कुठलाही दुरुपयोग केलेला नाही. पण शेताडीच्या भागातून काही आकस्मिक संकट यायची शक्यता असल्याने, ज्याची बातमी लांडग्यांनी वेळीच दिली आहे, हे विशेष उपाय योजण्यात आले आहेत.
होय. शेताडी पलीकडे माणसांमध्ये वारंवार दंगे माजत आहेत. अधिक अन्न, जमीन यासाठी ते जंगलाकडे सरकू शकतात. त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. पण त्याचवेळी आपण अदृश्य तहाची प्राणी सहीची सर्वाना निर्णयात सामावून घेण्याची कलमे विसरून चालणार नाही. करवती घार म्हणाली. साहूल गिधाड आणि ताबंद्या पट्ट्याच्या डोम कावळा हे ती जरा जास्तच बोलली की काय असे तिच्याकडे पाहू लागले.
पूर्ण रात्र झाल्याची खात्री करून वेत्या घुबड म्हणाले, ‘हा तह, किंवा ही प्राणी शाही हा सगळा कांगावा आहे. वनपाल आज किंवा उद्या मरेल. आणि त्याबरोबर सारे मांसाहारी प्राणी जंगल ताब्यात घेतील.वेत्याच्या ह्या तडक-फडक बोलण्याने समोरचे ससे-हरणे पळण्याची तयारी करू लागले. बाकी झाडांच्या फांद्यातही कलकलाट सुरु झाला. तेवढयात वडाच्या बुंध्याखालून आलेल्या आवाजाने सारे थोडावेळ शांत झाले. तरुण कोल्हा तिथे उभा होता. सगळे आपल्यकडे बघत आहेत ह्याची खातरजमा झाल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.
तुम्हा सगळ्यांच्या शंका रास्त आहेत. आणि प्राणीशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत ठेवण्याचा हक्क आहेच. मला कुठलेही मत मांडायचे नाही. पण मी तुम्हाला काही गोष्टी दाखवू इच्छितो. तुम्ही माझ्यासोबत येऊन त्या बघा. असे म्हणून तो ओल्या गवताच्या कुरणाकडे जाऊ लागला.
--                                             
       ओल्या गवताच्या कुरणात गोरीला माकडाचे एक कुटुंब रहायला आले होते. ते आले तेव्हा ते सम्पूर्ण भेदरलेले होते. ओल्या गवताच्या कुरणात राहणाऱ्या हरणांनी, आणि सशांनी ताबडतोब ही बातमी लघुगज, आणि रक्षक लांडगे ह्यांना दिली होती. त्याच रात्री त्यांचा खातमा करण्यासाठी भाल्या आणि लांडगे आले होते. पण ऐनवेळी तिथे गजेंद्र आला. आणि त्याने ह्या माकडांनी अजून काही कुरापत केली नसल्याने आणि ती निशस्त्र असल्याने त्यांच्यावर हल्ला चढवण्यापासून त्यांना रोखले होते. त्याने लघुगजासोबत तिथे अरूगजालाही गस्त ठेवण्यास सांगितले होते.
       हळूहळू हरणांना ही माकडे भव्य दिसली तरी ती काही करत नसल्याचे समजले होते. त्यांच्यातल्या मादीला काही दोन दिवसांपूर्वीच एक पिल्लू झाले होते. तिचे ओरडणे ऐकून अशाच ओल्या पिल्लाची आई असलेली सावळी हरणी तिच्याजवळ गेली होती. तिने माकडीणीच्या मानेला हुंगून तिला धीर दिला होता. थोड्याच वेळात माकडिणीने एका पिल्लाला जन्म दिला. सावळी हरीणीने आपल्या बछड्याला आणून ते पिल्लू दाखवले. तिच्या बछाड्याने ताबडतोब त्या  माकडीणीच्या पिल्लाशी दोस्ती केली. सावळी तिथे जाते, राहते हे पाहून बाकी हरणांचा धीर चेपला. राखाडी सश्याच्या कुटुंबानेही तिथेच तळ ठोकला. साम्बरांचा समूह ही तिथे बराच वेळ रमू लागला. नर माकड त्या सगळ्यांना पुरेल एवढे गावात, फळे, झुडपे, रोपटी तिथे आणायचा. अर्थात प्राणीशाहीच्या अधिकाऱ्यांच्या नजरेआड सुरु झालेले हे सहजीवन साऱ्याच हरणांनी स्वीकारले नव्हते. गीवा हरीण तर आपल्या नवजात बछाड्याला घेऊन ओल्या गवताच्या कुरणाच्या पार टोकाशी रहायला लागली होती. खरं तर सावळी तिची बहिण. तिच्या षटकोनी ठिपक्यांच्या बछाड्यावर गीवेचाही फार जीव होता. पण शेवटी तिला आपला बछाडा का सावलीचा ही निवड करायची होती. एका टोकाला असलेल्या गवताच्या एका छोट्या पण सुंदर तुकड्यावर गीवा आपल्या बछाद्यासह दाबून राहायची. तिथे लक्ष कुरणाच्या मध्यभागी असलेल्या प्राण्यांकडे होते. तिथले राहणे कितीही गोजिरवाणे असले तरी पुढे येणाऱ्या संकटाचा वारा गीवेला लागला होता. तिच्या तीक्ष्ण नाकपुड्या महागुहेकडून येणाऱ्या वाऱ्यातला कपटी गंध समजू लागल्या होत्या. आणि तिला स्वतःला आणि तिच्या बछड्याला ह्या सगळ्यापासून वाचवायचे होते.
--
       तरुण कोल्हा जेव्हा तिथे पोचला तेव्हा सावळी हरीण तिच्या आणि गोरीलाच्या पिल्लाला जंगलातल्या प्राण्यांची नावे सांगत होती. नावे सांगताना ती त्यांचे वर्णन करायची. तिच्या पर्यंत कोणाचाही गंध जाणार नाही अशा बेताने तरुण कोल्ह्याने साऱ्यांना उभे केले. सावळी जी यादी सांगत होती ती साऱ्यांना अस्पष्टपणे ऐकू येत होती. सावळी बोलायची थांबल्यावर तरुण कोल्हा परत सर्वाना वडाच्या झाडाकडे घेऊन गेला.
मित्रांनो, आत्ता तुम्ही ऐकलत ते काय होतं?’ तरुण कोल्ह्याने सहज विचारावा तसा प्रश्न सगळ्या प्राण्यांना विचारला.
ती जंगलातल्या प्राण्यांची यादी होती.वेत्या घुबड म्हणाले.
ते तर सर्वाना ठाऊक आहेच. पण सावळीला अशी यादी करण्याची गरजच काय?’ तरुण म्हणाला.
ती तिच्या बछाड्याला जंगलाची ओळख करून देत असेल. नाहीतरी हरिणे लहानपणापासूनच सावध असतात.डोम कावळा म्हणाला.
मान्य. बिलकूल मान्य. पण मग ही यादी त्या गोरीलाच्या पिल्लाला सांगण्याची काय गरज? किंवा राखाडी सश्याच्या कुटुंबाला?’ किंवा त्या सगळ्यांना एकत्र राहायची काय गरज पडली? का जंगलात आपण त्यांना त्यांची जागा दिलेली नाही? त्यांना पुरेसे अन्न मिळत नाही?’
तरुण कोल्ह्याच्या गंभीर आवाजातल्या प्रश्नाने सारेच गप्प झाले. तरुण कोल्हा पुढे म्हणाला.
हे षडयंत्र आहे. हा गोरीला माणसांचा हस्तक आहे. बघा, तो चालतो कसा, तो हात कसे वापरतो. जंगलातल्या शाकाहारी प्राण्यांची ढाल वापरून जंगलाचे वैभव असलेल्या पराक्रमी मांसाहारी प्राण्यांच्या पाठीत सुरा खुपसण्याचा हा मानवी डाव आहे. पण आपण आपले तीक्ष्ण सुळे, आपले टोकदार दात आणि त्याहून निमुळती बुद्धी वापरून हा डाव हाणून पाडणार आहोत. आणि शाकाहारी छोट्या प्राण्यांचे ही हित ह्यात आहे की ते या एकजुटीच्या मागे उभे राहतील. कारण त्यांचे संरक्षण करणरे, त्यांना अभयहस्त देणारे मांसाहारी बलशाली प्राणी संपवले की माणसे त्यांच्याकडेच मोर्चा वळवणार आहेत.असे म्हणून तरुण कोल्ह्याने आधीच ताणाखाली असलेल्या शांततेला भेदत जाणारी कुई दिली. त्या आवाजाने लांडगे, तरसे त्या वडाच्या झाडाभोवती जमा झाले.
या पौर्णिमेला आपण प्राण्यांच्या नव्या एकजुटीचे आव्हान जाहीर करू. पण त्या आधी जंगलाच्या काना-कोपऱ्यात माणसांच्या कटाची, त्यांच्या शाकाहारी हस्तकांची खबर पोचवा. आपले सुळे, आपल्या नख्या तयार ठेवा. संघर्ष जवळ आहे. एक व्हा, एक व्हाअसे म्हणून त्याने परत एक कुई दिली. त्यासरशी जंगलभर ही खबर शिटायला कावळे उडाले. बाकी पक्षीही आडत-दबकत एकमेकांना हे नवे संकट समजावू लागले. गोंधळात पडले ते समोरचे तुरळक ससे आणि हरिणे. त्यांच्यातला एक ससा तर प्राण्यांच्या एकजुटीचे, माणसांशी होणाऱ्या तुंबळ लढाईचे, त्यातल्या त्याच्या आवडत्या भाल्याच्या शौर्याचे स्वप्न पहात तिथेच बसला होता. एका लांडग्याच्या फटकेदार पंज्याने त्याचे स्वप्न संपले. स्वप्न पाहणारा त्याचा लहानसा मेंदू चोचीत पकडून करवती घार सहज उडून गेली. अभयहस्तक असल्याने निर्धास्त असलेले बाकीचे ससे- आणि  हरणे ही नवी घडामोड थोडी समजले, थोडी नाहीत. त्यांच्यातले कोणीही ही खबर द्यायला मागे जाणार नाहीत ह्याची दक्षता लांडग्यांनी आणि तरसांनी घेतली.
--
                महागुहेच्या आत, अगदी मिट्ट काळोखात एक आकृती कण्हत पडली होती. खरंतर ते कण्हणंही अगदी कान देउन ऐकावं तरच ऐकू आलं असतं. आणि तसंच अगदी लक्ष देऊन पाहिलं तर थोडीफार हालचालही दिसली असती. तिथून येणाऱ्या उग्र भपकारा झेपत जर थांबता आलं असतं तर हे कळलं असतं ती ती आकृती एका म्हाताऱ्या पुरुषाची आहे. त्या आकृतीच्या शरीराचा एक पाय तुटलेला आहे. दुसऱ्या पायाला किडे लागले आहेत, काही किडे घोंघावत आहेत. उजव्या हाताची बोटे छाटलेली आहेत. फासळ्या- फासळ्या झालेली छाती सावकाश धपापते आहे. श्वास सावकाश चालतो आहे. आणि वाळल्या दाढी-मिशांच्या आड केव्हातरी पापण्या उघडत आहेत.
       पण आता आपल्याकडे कोणी बघतंय, नाही याची खंत-खेद वनपालाला राहिलेली नाही. त्याचा भालाही काटक्या होऊन तिथेच कुठेतरी बाजूला पडला आहे. त्याच्या डोळ्यांच्या आड, त्याच्या क्षीण बुबुळांच्या अस्पष्ट हालचालीत तो मागचे दिवस सावकाश परत पाहतो आहे.त्याने काफ्रीलीच्या जंगलातला हत्ती मोकळा केल्यानंतर ते बरोबर इथपर्यंत आले ते दिवस, त्याचा बाबाने दूर देशाच्या बादशाहाला नजर करण्यासाठी पकडलेल्या प्राण्यांचे पिंजरे, आणि त्यांच्या काफिल्यावर लुटेरी धाड पडल्यानंतर बादशहाचा नजराणा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या बापाने लुटे-यांच्या सरदाराला नजर केलेली त्याची आई. आई सोडून जाताना तिला रोखावं म्हणून त्याने बाबाला घातलेली आर्जवं, आणि त्यानंतर त्याला खसक्कन ओढून काफ्रिली हत्तीच्या पिंजऱ्याशी बांधणारा बाबाचा एक साथीदार.
       माणूस असण्याची लाज. काफ्रिली हत्तीसारखा आपल्या मदात झुलणारा प्राणी न होता आल्याचं दुख. वनपालाला कुठेतरी हलके हलके ह्या वेदना जाणवल्या. पण मग त्या वेदनांवर हळुवार फिरणारा त्याच्या कुत्र्याचा, का कोल्ह्याचा स्पर्श. जंगलाच्या भयावह हिंसेला घाबरून आलेला जख्ख. त्याच्या आपल्याकडे पळून येण्यापाठोपाठ आलेले जंगलाचे हिंस्त्र हुंकार. साऱ्या गावाने जख्खला ओसरीही दिली नव्हती. कारण तो मुळातला पाळीव असून जंगलात गेला म्हणून तो ह्या माणसांचा राहिला नव्हता, आणि त्याने जंगलात जाऊन त्या प्राण्यांना त्यांचे निव्वळ रानटी आयुष्य सुधारणारे काही करू पाहिले म्हणून तो जंगलाचाही राहिला नव्हता. आपल्या रक्तात असणाऱ्या वागण्यापलीकडचे कोणालाच नको. या माणसांना तर नकोच नको.
       वनपालाच्या तुटक्या पायातून एक वेदना झणझणत गेली. ती विरेपर्यंत त्याच्या बुबुळांसमोर रक्ताचा पडदा होता. पडदा विरला तेव्हा त्याला आठवलं जेव्हा थंडीच्या एका रात्री तो आणि जख्ख एकमेकांना मिठी मारून झोपले होते आणि तेव्हा जख्खने आपल्या आनंदासाठी साऱ्या जंगलाला वेठीस धरणाऱ्या रक्त्याला मारून जंगलात प्राण्यांच्या स्वतःच्या राज्याचे, ज्यात भीतीला, हिंसेला, स्वार्थाला कुठलेही स्थान नाही अशा साऱ्यांच्या एक जंगलाचे स्वप्न दाखवले होते. तिथे माणसांचा स्वतः टिकून रहावे म्हणून बाकी कोणालाही मोहरा म्हणून वापरण्याचा सौदा नसेल आणि बळ आहे म्हणून कोणीही कोणाचा काळ बनणार नसेल. ते स्वप्न होतं, का जख्ख खरोखर तसं म्हणाला होता का आपल्या थकल्या चिडल्या मनाचे ते खेळ होते? वनपाल फार वेळ स्वतःला हा प्रश्न विचारू शकला नाही. ग्लानीने त्याच्यावर झडप घातली.
       परत त्याला तशीच धूसर चित्रे डोळ्यासमोर दिसू लागली. थंडीच्या कडाड रात्रीनंतरचा दिवस. जेव्हा तो आणि जख्ख समोरासमोर बसून आदल्या रात्रीची उजळणी करत होते. आणि रात्री, जख्खच्यासोबत असण्याची उब असताना जितकं काही सोपं वाटलं तितका दिवस आल्यावर त्या स्वप्नाला शंकाचे दडे बसू लागले. प्राण्यांचं राज्य, किंवा त्याची प्राणीशाही, किंवा सुळ्यांची चकाकती भूक असलेल्या प्राण्यांनी ,मउ कोवळ्या लुसलुशीत प्राण्यांना स्वतःहून सोडून देणे हे तर प्राण्यांना प्राणी नसणं बनवण्यासारखं आहे. किंवा त्यांना माणसांसारखे खेळ खेळायला लावणं जे सोयीच्या क्षणी एकदम सोडून कोणीतरी भक्ष्य बनेल आणि कोणीतरी भक्षक. त्याला जख्खचाही संशय आला होता. ही त्याला पाळणाऱ्या मालकाची चाल तर नाही ना? जिथे आपण एक सोयीची चाल आहोत, जसा आपल्या बापासाठी आपली आई होती, किंवा काफ्रिली हत्ती होता. त्याने त्याचा अणकुचीदार भाला जख्ख वर रोखला होता, तेव्हा त्याच्याकडे अनिमिष पहात जख्ख त्याच्या भाल्याच्या टोकाला स्पर्शून उभा राहिला. त्याचे डोळे तुडुंब भरले होते. त्याने आपल्या पायांना डोके घासले आणि तो परत भाल्याच्या टोकाशी येऊन उभा राहिला. मग आपण भाला टाकून त्याला परत कवटाळलं तेव्हा त्याचं स्वप्न आपलं झालंही होतं.
       पण जसे जसे आपण जंगलात आत आत घुसत गेलो, रक्त्याच्या शोधात, तसा तसा जख्ख बदलत गेला का? वनपालाच्या जर्जर शरीराला इतका भेदक प्रश्न पेलवला नाही. आणि त्याच्या असंख्य उत्तरांचे खवले त्याला घासू लागले. त्याची तडफड सुरु झाली.
       साहूल गिधाडाने आंधळा केलेला रक्त्या, भावाच्या मृत्यूने चवताळलेला आणि जंगलाला भयाचे घर करणारा रक्त्या, त्याच्या समोर भाला घेऊन असताना अंगा-अंगात भिनणारी भीती, आणि मागे उभा असलेला जख्ख, निर्विकार, आणि त्याच्याही मागे अस्पष्ट दिसणारी लांडग्यांची धूसर रांग. समोर रक्त्या, आणि मागे ती रांग. आणि मध्ये आपल्याला लायलाय नाचवणारी भीती. आपले आपोआप हलणारे हात. आपण कोणासाठी रक्त्याला मारत होतो? जख्खच्या आणि आपल्या स्वप्नासाठी का आपल्या बापावरच्या रागासाठी का आपल्याला जगायचा एकच रस्ता उरला होता म्हणून? आणि तो आंधळा नसता तर?
       जख्ख म्हणालेला की मागे लांडग्यांची रांग होती म्हणून मी माझ्या भीतीच्या पुढे जाऊन वागलो होतो. जर रक्त्याने मला मारले असते तर त्या लांडग्यांनी रक्त्याला संपवलेच असते. पण त्या लांडग्यांना बघून असं वाटत नव्हतं. ते सगळ्या नियमांच्या पार असणाऱ्या झुंडीच्या भयकारी हिंसेचे सुळे घेऊन आले होते. पण जख्खने त्यांना जंगलाचे रक्षक बनवले आणि महागुहेचेही.
       त्या नावाने वनपालाला तसंही हसायला आलं. महागुहा का महापिंजरा? आपण वनपाल होतो का आपल्या नजरेआड, आपल्या नावाने चालू असलेल्या जंगलाचे कैदी. बदामी तहाच्या अदृश्य तहानंतर...
 वनपालाला हतबल,असहाय्य हसू यायला लागलं. आणि परत तो ग्लानीत गेला.
--
       पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात होता. झाडीमध्ये असलेल्या गोरीलाच्या कुटुंबाला धरून बाकीची हरणे-ससे झोपले होते. मध्येच सावळी हरिणीच्या पिल्लाला त्याच्या मागच्या झुडपात काही सुळे चकाकताना दिसले. त्याने घाबरून सावळीला उठवले. सावळीने त्याच्या समाधानाखातर थोडी मान उंचावून पाहिले. पोटभर खालेल्या गवताने खरंतर तिला झोप येत होती. त्यातच नक्की होणार असे ठरलेल्या पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी केलेल्या झिनी नृत्याच्या तालमीने ती थकली होती. तिला सुळे दिसले नाहीत, पण उग्र गंध जाणवला. तिला जाणवला तसा तो राखाडी सश्यालाही जाणवला. तोही कान उंचावून काही कळतंय का ते पहात होता.
       त्यांना जे दिसत नव्हतं ते गीवा हरिणीला दिसत होतं. लांडग्यांची आणि रानडुकरांची फळी गोरीलाच्या कुटुंबाभोवती जमते आहे ही तिने पाहिलं. तिने आपल्या पिल्लाला जागा केलं आणि त्याला अजिबात आवाज करू न देता, वाऱ्याचा मागोवा घेत ती कुरणाच्या दूरच्या टोकाकडे लपायला जाऊ लागली.
       लांडग्यांनी राखाडी ससा आणि सावळी ह्यांना एका झडपेत पकडले. तबाकीचे ससे-हरणे हबकून जागे झाले. पण त्यांच्या सवयीच्या गाढ झोपेतून उठून त्यांना नेमका अदमास घेता येईना. त्यांच्यातले काहीजण गोरीलाला उठवू लागले. काही जण मिळेल तसे सैरावैरा पळू लागले. त्यांची धाव रानडुकरांच्या भिंतीशी जाऊन कैद झाली. एव्हाना गोरीला जागा झाला होता. लांडग्याचे हिंस्त्र सुळे त्याच्या शरीराला चोहू बाजूंनी झोंबू लागले. एकेक्या लचक्यासरशी गोरीला हुंकारू लागला. हात-पाय झाडू लागला. त्याच्या वजनाच्या दाबाने काही लांडगे तिथेच चिरडले गेले. बाकीचे त्याच्या भोवती रींगण धरत त्याला, त्याच्या मादीला, त्याच्या पिल्लाला महागुहेकडे लोटू लागले. गोरीला आणि त्याचे कुटुंब थांबले की लांडगे परत त्यांना झोंबत आणि महागुहेकडे रेटा देत. गोरीलाच्या आवाजाने जंगल जागे होऊ लागले. आणि आवाज महागुहेकडे सरकतो आहे हे जाणवून सारेच काय घडतंय हे कळायला उत्सुक झाले.
       जख्खने म्हाताऱ्या कोल्ह्याला खूण केली. त्याने साहूल गिधाड आणि कावळे ह्यांना इशारा दिला. कावळे गंभीर काव-काव करत, उदय सकाळी महागुहेकडे यायचा निरोप देत जंगलभर पसरू लागले.साहूल गिधाडाला कोवळ्या मासांचा वास लागला होता. ते महागुहेकडे येणारा गोरीलाचे कुटुंब पहात ढोलीशी दडून बसले.
       जख्ख आणि मध्यम कोल्हा गुहेत शिरले. वनपालाच्या शरीराशी गेल्यावर मध्यम कोल्ह्याने वनपालाची नरडी फोडली आणि त्याचे उष्ण हृद्य तोंडात पकडले. वनपालाचे शरीर थोडावेळ तडफडले. त्याची तडफड थांबल्यावर जख्खने सावकाश त्याच्या पायाचा लांब लचका तोडला.
--
       पहाटे पहाटे सारे हत्ती केशरी तळ्याशी जमले होते. गजेंद्र आणि लघुगज एका बाजूला अरूगज काय सांगतो ते ऐकत होते. हत्तींच्या कळपातही  सावकाश चर्चा सुरु झाल्या होत्या. पण तरुण हत्तींचा एक कळप बेफिकरीने केशरी तळ्यात घुसला. त्यात गजेन्द्राचा मुलगा गजामिषही होता. प्रौढ हत्त्तींच्या गंभीर शांततेला न जुमानता तरुण हत्तींचा गट खेळू लागला.
       गजेन्द्राने लघुगजाला खूण करून तरुण हत्तींना आवरायला सांगितले. पण लघुगजाने त्याला नकार दिला.
मला वाटतं की हत्तींनी आत्ता जख्ख आणि लांडग्यांच्या बाजूने राहावं किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. त्यातच आपल्या कळपाची भलाई आहे.
पण काल नव्या गवताच्या, आणि कोवळ्या गवताच्या कुरणात लांडगे आणि रानडुकरांनी हल्ले केलेत. मी काल तिथे गस्तीला होतो. पण रानडुकरांची मजबूत फळी तोडणं शक्य झालं नाही.अरूगज खाली मान घालून म्हणाला.
असेल. पण मुळात गोरीला आणि वन पाल ह्यांनी मिळून काल कोल्हे आणि लांडगे ह्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना काल रातोरात हे जंगल ताब्यात घेऊन माणसांच्या हवाली करायचे होते. आणि हरे,सांबर, कळविते, ससे हे सारे त्यांच्या पाठीशी होते.लघु गज म्हणाला.
गजेंद्र हसला.
लघुगजा, ह्या पाठिंब्यावर कोणाला काय करता येणार आहे. मुळातच हे सारे मांसाहारी प्राण्यांचा अभयहस्त मिळाल्याने निर्धास्त आहेत. ते का अशी हातमिळवणी करतील?’
कारण त्यांना त्यांची कुरणे पुरत नाहीत. आणि त्यांना माणसांच्या पाळीव आयुष्याची ओढ वाटू लागली आहे. गोरीलाने त्यांचे कान भरले आहेत.
असं लघुगजा? आणि तुझे कान कोणी भरलेत म्हणून तू आणि तुझे साथी रानडुकरांच्या सोबत शेताडीत घुसता?’ अरूगज चिडून बोलला.
अरूगजा, आम्ही फक्त रानडुकरांना समजवायला त्यांच्या मागे गेलो होतो.
गजेन्द्राने त्या दोघांचा वाद थांबवला आणि तो साऱ्या कळपाला उद्देशून बोलू लागला.
मला वाटतं की आपण कळपात सार्वमत घ्यावं. एक बाजू असेल की आपण ससे, हरणे, सांबर, काळवीट अशा साऱ्या अभयहस्त प्राण्यांना घेऊन जंगलाची केशरी तळ्याकडची बाजू हिस्सा म्हणून मागावी. आणि दुसरं मत, लघुगज म्हणतो त्याप्रमाणे आपण तटस्थ भूमिका घ्यावी.
नाही. अशा दोन मतांची गरजच नाही. अभयहस्त असलेले सारे प्राणी या बाजूला आले की हत्तींना काय उरणार आहे. मुळातच कळप एवढा वाढला आहे की त्याला केशरी तळे पुरत नाही. आपण तटस्थ रहावे आणि आपल्यासाठी थोडा अजून भाग मागून घ्यावा. आणि हे लक्षात घ्यायला हवं की आजा जे प्राणी आपल्याला असहाय्य वगैरे वाटतात ते हत्तींच्या नेतृत्वाखाली तसेच राहतील हा भ्रम आहे. त्यांना लांदाग्यांकडून जीवाची भीती आहे म्हणून ते ताब्यात आहे. ती गेली की ते आपल्यालाच त्रासदायक होतील. त्यामुळे आज हत्तींचा निर्णय हा हत्तींची बाजू अधिक बळकट करणारा हवा.लघु गजाने आपले म्हणणे मांडले.
सार्वमताची गरज उरली नव्हती. अरूगज आणि गस्तीला असलेले त्याचे चार साथी हत्ती सोडले तर बाकी सारे हत्ती, अगदी गजामिषही लघुगजाच्या पाठी उभे होते.
ठीक. कळपाचा निर्णय मला मान्य आहे. अरूगज, तुही साऱ्यांसोबत रहावस. मी सभेला येणार नाही कारण मला हा निर्णय मान्य नाही. आणि कळपाचा निर्णय तोडण्याची शिक्षा म्हणून मी वेगळा राहीन.असे म्हणून गजेंद्र एकटाच दूरच्या टोकाकडे निघून गेला. तो दूर जातो आहे हे पाहून लघुगजाने बाकी कळपाला महागुहेकडे चालण्याची आज्ञा दिली.                                              
--
                पौर्णिमेच्या पुढच्या दिवशी महागुहेच्या समोर गोरीला नर आणि मादी यांची छिन्न शरीरे पडली होती. गुहेच्या समोर दबली गर्दी जमू लागली होती. गुहेच्या तोंडाशी लांडग्यांची रांग उभी होती. आणि त्या रांगेसमोर म्हातारा आणि तरुण कोल्हा निश्चल बसले होते. त्योड्या वेळाने लघु गज हत्तींचा कळप घेऊन आला. तरसे, रानडुकरे हत्तींच्या समोरच्या बाजूला, नीट पाहिला तर दिसणारा विजयी आवेश घेऊन आले होते. गुहेच्या समोरची गर्दी अभयहस्त मिळालेल्या शाकाहारी प्राण्यांची होती. माकडे त्याच शाकाहारी प्राण्यांच्या वरच्या फांद्यांत दाटी करून होती. गीवा हरिणी मात्र त्या गर्दीत नव्हती. काल रात्रीच्या अंधाऱ्या हल्ल्यानंतर तिला सभेचा उद्देश कळून चुकला होता. ती तिच्या पिल्लासह नव्य गवताच्या जंगलाच्या टोकाशी असलेल्या जुन्या दलदलीपाशी दडली होती. तिचे पिलू घाबरून तिच्या स्तनाला लागातले होते. त्याच्या काळजाची धडधड जोरात सुरु होती. गीवा त्याला जिभेने चाटत तीच भीती, आणि साशंकता त्याच्या मेंदूशी खोल रुजवायचा प्रयत्न करत होती.
       साहूल गिधाड, आणि कावळे महागुहेच्या वरच्या दात झाडीत येऊन बसल्यावर पाहिले भाल्याने जोरदार आवाज करत दबली चर्चा शांत केली. आणि मग तरुण कोल्हा बोलू लागला.
आपण ज्याला आपला मार्गदर्शक समजलो तो वनपाल, त्याने आज जंगलाच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्याच्या काही दिवसांच्या आजारपणात त्या क्षुद्र मनुष्याचे मानवीपण परत उफाळून आले. आणि आपल्या जंगलातल्या काही प्राण्यांचा वापर करून, आणि ह्या भयानक गोरीलाकरवी गुहेवर हल्ला करून वनपाल पळून गेला आहे. अशा कपटी माणसाला मदत करताना गोरीलाचा बळी गेला. आणि ह्या सगळ्या कटाची पाळेमुळे उखडून काढताना काही फितूर मारलेही गेले. पण त्यामुळे जे षडयंत्र समजले आहे ते भयानक आहे.
       प्राणी मित्रांनो, जंगलाच्या सभोवती माणसे चौखूर वाढत आहेत. त्यांचे शरीर आपल्यापेक्षा कमजोर असले तरी त्यांच्याकडे असे काही आहे ज्यामुळे ते आपल्याला वर चढ ठरू शकतात. दुर्दैवाने माणसांच्या अशा वर्चस्वाला तोंड देऊ शकणारे रक्त्या, रक्तांश, काफ्रिली कुळाचे हत्ती आज आपल्यात नाहीत. पण म्हणून आपण ह्या माणसांसमोर शेपूट घालू असे नाही. शेवटी आपले हिंस्त्र बळ आहेच. पण...
इथे तरुण कोल्हा थांबला. समोरच्या अभयहस्त प्राण्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट होता. कोल्ह्याच्या थांबण्याचा अवकाश वापरून रान डुकरे समोरच्या प्राण्यांच्या मागे सरकली.
आपल्याला जर जंगल असेच टिकवायचे, वाढवायचे असेल तर आपल्याला काही नवे बदल स्वीकारावे लागतील. अर्थात कोणावरही हे बदल लादले जाणार नाहीत. मी ह्या बदलांची यादी वाचतो आहे.
सर्वात मुख्य म्हणजे नव्या आणि ओल्या गवताच्या कुरणांची आणि जंगलाची जबाबदारी यापुढे पूर्णपणे रानडुकरे आणि लांडगे यांवर राहील. तेथील मानवी आक्रमणाला तोंड देण्यासाठी वेळ प्रसंगी काही आणीबाणीचे निर्णय घेण्याचीही मुभा त्यांना असेल, जसे तेथे काम करणाऱ्या आणि राहणाऱ्या अभयहस्त प्राण्यांवर काही निर्बंध, किंवा माणसांशी वाटाघाटी किंवा देवाणी-घेवाणीचे व्यापारी संबंध. अर्थात अशा कुठल्याही वाटाघाटी ह्या सर्वाना समजावून, सार्वमत घेऊन, आणि जंगलाचे हित वाढेल याच दृष्टीने व्हाव्यात असे बंधन त्यांच्यावर राहील.
नव्या परिस्थितीत हत्तींच्या सामर्थ्याची आणि बुद्धीची गरज ओळखून त्यांना केशरी तळ्याबरोबरच बदामी तळ्याचा भागही देण्यात येत आहे. आणि हत्तींच्या या राखीव भागात इतर शाकाहारी प्राण्यांना नियंत्रित प्रवेश राहील. बदामी तळ्याच्या भागातल्या साग झाडांच्या टेकडीची विशेष जबाबदारी साहूल गिधाड सांभाळेल.
हे दोन बदल आपण आत्ता सार्वमत घेऊन आजमावणार आहोत. १०० ठिपक्यांचे डौलदार हरीण, लघुगज, भाल्या आणि म्हातारा कोल्हा असे चार प्रतिनिधी मतदान करतील. मतांची बरोबरी झाल्यास बदल अमलात येणार नाहीत. तरी आता मते मांडावीत.
कोल्ह्याचे बोलणे संपते न संपते तोच बदल मान्य नसल्याचे मत हरिणे मांडू लागली. १०० ठिपक्यांच्या डौलदार हरिणाने तेच मत मांडले.
भाल्या काही न बोलता म्हातारा कोल्ह्याच्या बाजूला येऊन थांबला.
म्हाताऱ्या कोल्ह्याने आपले मत नव्या बदलांसाठी असल्याचे सांगितले.
आता साऱ्या नजरा लघुगजावर खिळल्या होत्या.
हत्तींना मतदान करायचे नाही. माणसांशी सख्य जोडू पाहणारा कुठलाही प्रस्ताव खरं तर मान्य होण्यासारखा नाही. पण त्याच वेळी हिंसेने काही मिळणार नाही हेही हत्त्ती जाणतात. त्यामुळे आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्यासाठी हत्ती मतदान करणार नाहीत.
लघुगजाच्या बोलण्याचा अर्थ समजला तसे अभयहस्त असलेले प्राणी पळायला पाहू लागले. पण नव्या बदलांनी त्यांचे अधिकारी ठरलेले रानडुकरे त्यांच्या पाठी भक्कम भिंतींनी होती. महागुहेच्या समोर लांडग्याचे सुळे ओलांडणे अशक्य होते. त्यामुळे तो सारा लोंढा हत्तींकडे वळला. तो लोंढा येतो आहे असे पाहून लघु गजाने हत्तींचा कळप अर्धा केशरी तळ्याकडे मागे, आणि अर्धा समोरच्या लोंढ्याला तोडून बदामी तळ्याकडे न्यायला सांगितलं. समोरून येणारे हत्ती पाहून लोंढ्या तले प्राणी चकित झाले. आणि मग जिथे वाट, पळवत, आडोसा दिसेल तिथे ते पळू लागले. एकमेकांत अडकू लागले. त्यांना सावरण्यासाठी लांडगे, रानडुकरे शिरली. आणि महागुहेसमोर एकाच कल्लोळ उडाला.
       म्हाताऱ्या कोल्ह्याने डोमकावळ्याला खूण केली. ठरला निरोप हरभाषी पोपटाकडे द्यायला तो निघाला.   
----
      .     सभेचा शेवट पाहून हताश, हतबल झालेला गजेंद्र तळ्याशी येऊन थांबला. त्याचे कान सावकाश पण सतत हलत होते. त्याच्या वृद्धत्वाकडे जाऊ लागलेल्या भव्य शरीरात चीड सळसळत होती. लघुगजाने कळपावर एवढा जम बसवला का लघुगजावर जख्खने? का आपणच आपल्या सामर्थ्याच्या स्वंयघोषित शांततेत निष्क्रीय झालो? गजेन्द्राला काहीच सापडत नव्हतं आणि जे समोर घडतंय ते पत्करतही नव्हतं. हा सगळा स्वार्थ आहे, का आंधळेपणा? का एवढे जातील प्रश्नच आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत? गजेंद्र अजून धुमसत धुमसत तळ्याच्या काठाच्या चिखलात फिरत होता. त्याची सोंड त्याच्या नकळत सर्पिल फेरे घेत हलत होती.
हे काय घडतंय त्याचा उलगडा करायचा आहे ना तुला गजेंद्रा?’ स्पष्ट पण अनोळखी आवाजाने गजेंद्र दचकला आणि मग संतापाची तिडीक त्याच्या अंगात उसळली. जख्ख त्याच्या पासून काही अंतरावर बसला होता. पण जख्ख कडे झेपावून त्याला हवेत गरागरा फिरवून त्याच्या कृत्यांचा जाब विचारण्यासाठी गजेंद्र हालचाल करणार तेवढयात जख्ख पुढे बोलू लागला.
ही सोय आहे गजेंद्रा, सोय. आधी केलेल्या गोष्टी आत्ता सोयीच्या राहल्या नव्हत्या म्हणून नव्याने केलेली सोय. तुला हवे आहेत तसे उदात्त, सोपे संबंध कधीच नसतात गजेंद्रा. आणि तुला, तुझ्या बापाला हे कधी उमजलं नाही. तुमच्या भव्यतेने तुम्हाला मिळणारे प्रेम, आदर त्यामुळे बुजबुजीत स्वार्थ असं काही नसतंच असं गोड स्वप्न तुम्हाला व्यापून राहता. पण एकदा तुम्ही, तुमच्या सारख्या हजारो आकारांच्या स्पर्धेत आलात की तुम्हाला जगायची सोय पहावीच लागते. कोणीही तुमच्यासाठी वाट सोडणार नसतं, तुमच्यासाठी घास सोडणार नसतं. तो तुम्हाला हिसकवायचा असतो, दृश्य किंवा अदृश्य पद्धतीने.
गजेंद्र संभ्रमात पडलेला. त्याला जख्खला उत्तर द्यायचं होतं, पण त्याला काहीच सापडत नव्हतं, पण शेवटी तो म्हणाला,
अशी सोयच असेल तर आधी होतं तसं जंगल काय वाईट होतं? ही एकी, शत्रू-मित्र अशी वाटणी ह्यानं काय झालं?’
काहीच झालं नाही गजेंद्रा. आणि त्या जंगल आहे तसच आहे, फक्त त्यातून एके काळी निघून गेलेला माणूस नावाचा प्राणी आता त्यात परत येऊ पाहतोय. म्हणून जंगलाची उतरंड बदलली एवढंच. तुला वाटतं की मी ती बदलली. पण मी फक्त एक नाव आहे, एक चित्र. मी नसतो तर आपसूक मिळणाऱ्या मांसासाठी, किंवा अजून कुठल्यातरी सोयीसाठी कोणीतरी अजून एखादा नाटक रचलच असतं. सोयींची उतरंड एवढंच जंगलातल्या प्राण्यांना ठाऊक असतं. भूकेची आणि भीतीची सोय. माणसांना सवय नावाची अजून एक गोष्ट ठाऊक असते, सवय, घट्ट जडणारी सवय, सोयीस्कर सवय. माझ्याकरवी माणसांनी जंगलात सवय घुसवली आणि तुला, तुझ्या बापाला, रक्तांश वाघाला ठाऊक असलेलं जंगल बदललं असं तुला वाटतं. पण सामर्थ्याची, भीतीची उतरंड आहे तशी आहेच. फक्त पूर्वी त्यात कोणी कोणाशी हातमिळवणी करत नव्हतं. भूक आणि भीती यापोटी प्रत्येक जण आपले अस्तित्व सांभाळत जगत होता. आता त्या भूक आणि भीतीची सोयीस्कर फेरमांडणी झाली एवढंच. गजेंद्रा. आणि त्यात तुम्हा हत्तींना तुमच्या भव्यतेचा फायदा मिळालाच आहे.
कसला फायदा? आणि कोणी दिला तो आम्हाला? तो तसाही आम्ही उपभोगतच होतो.गजेंद्र त्याच्या हताश निरुत्तर पणाला एकदम सूर सापडावा तसं म्हणाला.
असं गजेंद्रा? जर रक्त्या वाघाची एखादी अवलाद या जंगलात फिरत असती, किंवा वनमहिष शिकारी जिवंत असता तर तुला अशी तुझी निर्भय मालकी मिळाली असती? त्या दोघांच्या मरणाने तुमची आपसूक सोय लागली ना? आज लघु गजाने तटस्थ भूमिका पत्करली ती ह्या फायद्यांसाठीच. तू लढला असतास रक्त्याशी? किंवा वनमहिषाशी? तुला उपद्रव देणं माहित नाही गजेंद्रा, आणि उपद्रव दिल्याशिवाय कोणालाच सामर्थ्याची जाणीव होत नाही. तुमच्या ह्या भव्य देहामागे उपद्रव नाही, तर तुमच्या बलाढ्यतेचा पिद्यान-पिद्या जोपासलेला गंड आहे. आज तो जरासा कुरवाळला तर तू आणि तुझे जर जिवलग मित्र सोडले तर तुझा सारा कळप तुला परका झालाच होता.
टोकदार घाव बसावा तसा गजेंद्र गप्प झाला. त्याच्या सोंडेची सर्पिल वळणे एकमेकांना वेढू लागली.
इथे तू आणि मी बरोबर आहोत गजेंद्रा. तरुण कोल्हा एवढा उतावीळ होता काहीतरी घडवायला आणि माझे संथ वृध्दत्व त्याला सलतच होते. म्हाताऱ्या कोल्ह्याचा पडदा करून सारे बाण त्यानेच चालवले. मध्यम कोल्हा एवढा उतावीळ नाही हे बरं आहे. आज जी घडी बसली ती टिकेल थोडे दिवस.
मग तू इथे का आला आहेस जख्ख?’ गजेन्द्राने एकदम आश्चर्य दाखवत प्रश्न विचारला.
सोय. माझे आयुष्य सोय आहे फक्त. वनपाल पळून वगैरे गेलेला नाही. तो अर्धमेला निपचित पडला होता. त्याचे पाय-हात यांचे लचके मीच आधी तोडले होते. त्याच्या तुटक्या पायात त्याला बाधाही झाली होती. पण शरीर झडले म्हणून मरेल तो मनुष्य कसला? त्याच्या काळजात, त्याच्या दिशा हरवलेल्या डोक्यात काय चालू होतं कोणास ठाऊक? पण त्याचे काळीज धडधडत होते. शेवटी सभेच्या आधी मी आणि मध्यम कोल्ह्याने त्याचा फडशा पाडला. त्याचे धडधडते गरम काळीज मध्यम कोल्ह्याने खाल्ले तर त्याच्या बाधित पायाचा फशा मी पाडला. आणि माझ्या शरीराला तो पचलेला नाही.
म्हणजे तू ह्या तळ्याकाठी जीव देणार आहेस, का जीव जाईतो बसणार आहेस?’
तुझा आणि माझा दोघांचा जीव जाईपर्यंत.जख्ख थंडपणे म्हणाला.
माझा? तू मला मारणार आहेस?’ गजेंद्र पवित्र्यात येत म्हणाला.
नाही. मी नाही. अहिमहिष तुला मारणार आहे. त्याचे साथीदार घेऊन तो इथे लपला आहे. आणि आपले बोलणे होईतो त्यांनी तुला नीट वेढाही घातला असेल.
गजेन्द्राने आजूबाजूला बघितलेही नाही. त्याने फक्त सोंडेतून पाण्याचा एक क्षीण फवारा उडवला.
आणि तू मेल्याने तुझ्या वारस कोल्ह्यांचीही सोय होईल. आणि मी तुमच्या आणि माणसांच्या वाटाघाटींचा मोहरा आहे. असंच ना?’
होय गजेंद्रा. तुला हा डाव पुरता उलगडला आहे.
एवढे बोलणे होईस्तोवर जख्खला भडकन उलटी झाली आणि तो एकदम गप्पगार पालथा पाडला. झाडीतून माणसांचे चक्र गजेन्द्राच्या जवळ येऊ लागले आणि गजेंद्र तसाच संथ झुलत राहिला. जख्ख आणि गजेंद्राचे बोलणे ऐकणारे दिर्घी कासव तळ्याच्या दूरच्या टोकाशी जाऊन काय घडते ते पाहू लागले.
---
       अजा बोकड निवांत पाने चघळत बसला होता. काल पौर्णिमा होऊन गेली. खरं म्हणजे कसायाच्याकडून पौर्णिमेच्या उत्सवाला त्याच्या शेळ्यांच्या कळपातल्या सर्वात उमद्या बोकडाचे मांस आणि सोबत बाकी भाकड शेळ्यांचे मांस जंगलात जायचे. काल अजा दिवसभर भीतीने मुकाट मान खाली घालून बसला होता. पण काल त्याच्या मानेवर सुरी फिरलीच नाही. आज सकाळपासून अजा खुशीत आला होता. त्याच्याच बालबच्च्यानी बनलेला त्याचा कळप त्याच्या आजू बाजूला सुख-निवांत होता. नव्या दमाचा बाजा बोकड एका झुडपामागे त्याची बहिण वा मावशी असलेल्या शेळीशी जुगत होता. अजाच्या पोक्त प्रौढ शरीरात उगाच लाट आल्यासारखी झाली. कसायाचा म्हातारा बाप अजूनही कोयत्याच्या धाकाने सहज पोरी अंगाखाली घ्यायचा त्या इथे शेरडांच्यामध्ये आणूनच, तिचा ओरडा लपवायला. मग आपलं वय झालं तर काय? खुशीत त्याने एक हिरवी काडी तोंडात घेतली तेवढयात त्याच्या मानेला कसायाचा जोरदार हिसका बसला.
---
       हातात अंकुश, भाले, काठ्या घेतलेले माणसांचे वर्तुळ सोंडेच्या आतल्या अंतरावर आले तसे गजेन्द्राने गोल फिरून एकेकाला भिरकवायला सुरुवात केली. त्याच्या वयाला न पेलणाऱ्या आवेशाने, एका एका पळाला थकत थकत तो मत्त गज माणसांना लीलया घुमवू लागला. त्याच्या पदाघाताखाली, त्याच्या सोंडेच्या फटकाऱ्याने माणसांचे वर्तुळ सैलावू लागले. त्या वर्तुळातला एकजण मागे पळू लागला तसा एका झाडावरून आलेल्या बाणाने त्याला वेधले. मागचा रस्ता बंद आहे हे जाणून ते वर्तूळ परत गजेन्द्राला भिडू लागले. आणि समोरच्या झाडावर लपलेल्या मरणाची जाणीव होऊन गजेन्द्र अजून चेवाने त्या समोरच्या मोहऱ्यांशी खेळू लागला. पण त्याने मदतीची आरोळी दिली नाही. त्याच्या मस्तकात, त्याच्या भरदार गंडस्थळात वेदना घुमत होती. आणि ती विसरायला तो समोरच्या निरर्थक झुंजीत उतरला होता.
       तो झाडाच्या टप्प्यात आला तसे बाण त्याच्या अंगाला घासून जाऊ लागले. काही रुतू लागले. त्यांची पर्वाही गजेन्द्राला नव्हती. त्याला त्याच्या बाबांचे जोमदार काफ्रिली सुळे आठवत होते. त्याला तळ्याच्या पाण्यातले त्यांचे संथ डुंबणे आठवत होते, त्याला रक्तांश आठवत होता, त्याला काही प्रहरांपूर्वी त्याच्यापासून दुरावून खालमानेने उभा त्याचा कळप आठवत होता. त्याला बैचैन अरूगज आठवला. आणि ह्या सगळ्या तुकड्या-तुकड्या मागे काय हे आधी कधीच न समजल्याची वेदना एकदम त्याच्या मस्तकात शूळ होऊन आली. त्याचवेळी अहिमहिषाच्या बाणाने त्याच्या गंडस्थळाला गाठले. स्वतःलाही न आवरता येणारी प्रदीर्घ किंकाळी देत गजेंद्र कोसळला.
       दिर्घी कासव शांतपणे तळ्याच्या तळाकडे परतले.
       कसायाचा सुरा झर्रकन फिरल्याने वेगळे झालेले अजा बोकडाचे धड तोच मुर्ख आश्चर्यचकित भाव घेऊन गडगडत गेले. कसायाच्या लहानग्या पोराने ते उचलून एका बाजूला नेऊन ठेवले.

--                                      

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...