Thursday, September 3, 2020

हा फक्त गोठलेला काळ आहे

हा फक्त गोठलेला काळ आहे.

बदललेलं काहीच नाही.

आपण प्रतीक्षा करतोय

ती आपल्याला स्तिमित करणारी कूसपालट नाही ही.

हा फक्त कोमा आहे, जिथे आपण आहोत पहडून

पण आपली बोटं, आपले पाय, आपल्या किडन्या, आपली आतडी

जिवंत आहेत, धीर धरून आहेत कि

हा माणूस उठेल आणि परत धावू लागेल,

परत बकाबका खाऊ लागेल,

परत खदाखदा हसू लागेल,

गळ्यात गळे घालून रडू लागेल,

विकत घेईल, विकत देईल,

स्वप्ने रचील, कर्जे घेईल

दिवस-रात्र एक करेल, परत म्हणेल

हवंय, हवंय

त्या भरोश्यावर हा आहे मेडीकली इंड्यूसड कोमा

उठेल तेव्हा हा नवबाजारसमाजसमूह

आपल्या अंगभूत पाशवी चैतन्याने

भरून टाकील शहरे,

वितळवून टाकेल हजारो वर्षे थिजलेले बर्फ

आपल्याच आकांक्षांच्या असह्य गरमीने.

तोवर,

मरणाच्या आदिम भीतीने

सुखाच्या शोधात घातलेला नवा खोडा

चुकवता यावा, सोडवता यावा ह्यासाठी

आपण दबा धरून आहोत.

आपण तेच जनावर असू, जे आधी होतो,

हा फक्त पॉज आहे,

पृथ्वीच्या अनभिषिक्त सम्राटाने पुढची एन्ट्री घ्यायच्या आधीचा.

Sunday, July 5, 2020

आपणही वाट पहावी आपल्या पाण्याने आपल्याला पोटाशी घेण्याची

पाऊस पडतोय बाहेर. म्हणजे मी तो बघतही नाहीये. त्याचा आवाज ऐकायला येतोय फक्त, इमारतींच्या पत्रा-झडपांच्या वरून अनेकगुणित होणारा पावसाचा मूळ आवाज. दिवसभर पडतोय पाऊस, ओल आल्यागत हवा, आणि जाग न आलेला दिवस.

फार प्रखर उजेड येत नाही ह्या घरात, आणि अशा पावसाच्या दिवसात दिवसाही घरात उबदार अंधार, खिडकीसमोरचे भाग सोडले तर. उजेड येत नाही, पाऊस येत नाही, खिडकीतून दिसतात बाकीच्यांच्या घरांच्या खिडक्या, आवाज ऐकू येतो पावसाचा, तडतड.

आता आवाज ऐकायला येतोय तो ऐकत झोपणार. पावसाच्या आवाजाचं भय आदिम आहे का आपल्यात? म्हणजे आपण झोपलो, आपलं लक्ष चुकलं आपल्या भवतालावरचं आणि मग हे पाणी एकदम आपल्या गळ्याशी आल्यावरच जाग येणार आपल्याला?

आपला बिछाना हे बेट आहे आणि त्यावर आपण अर्भकासारखे पडलो आहोत आहोत आणि हा अविरत पडणारा पाऊस शेवटी खिडक्यांतून आत येईल, हळूहळू साचत जाईल आपल्याभोवती. आपल्याला त्याचा आवाज आणि आपल्या स्वप्नांचा आवाज कळणार नाही वेगळा. ते पाणी आपल्या बिछान्याला स्पर्श करेल, आपल्याला स्पर्श करेल, आपल्याला सामावत घेईल.

ग्रेस म्हणतो,

नाहीच कुणी रे आपले

प्राणांवर नभ धरणारे

दिक्काल धुक्याच्या वेळी

हृदयाला स्पंदविणारे

एकटा आहे मी, हाक मारावी कोणाला ते एक वेगळं बेट, आणि सगळेच पाहतायेत वाट केव्हा पाणी त्यांना स्पर्शेल. आपणही वाट पहावी आपल्या पाण्याने आपल्याला पोटाशी घेण्याची.

 


Thursday, February 20, 2020

Parasite: उपभोगरम्य स्वप्नांचा paradox


शेवटी मी Parasite पाहिलेला आहे. आणि अनेक दिवसांनी टोरेंट शोधून डाऊनलोड करून तो पाहिला, म्हणजे परजीवी प्रकाराने परजीवी अशा नावाचा चित्रपट!
तर parasite मध्ये एक प्रसंग आहे. घर पावसाच्या पाण्यात बुडाल्याने बाप आणि मुलगा रात्रीच्या निवाऱ्याची सोय केलेल्या हॉलमध्ये झोपलेले आहेत. ह्या प्रसंगाच्या आधी येणाऱ्या प्रसंगात कुटुंबावर ओढवलेल्या एका कठीण संकटाला कसं तोंड द्यायचं ह्याची चर्चा चालू असताना बापाने माझ्याकडे काही plan आहे असं म्हटलेलं असतं. आता त्या हॉलमध्ये, पुराने बाधित शेकडो लोकांच्या मध्ये झोपलेले असताना, मुलगा बापाला विचारतो कि काय आहे तुमचा plan. बाप एकूणच कुटुंबासोबत जे घडलं त्याच विचारात असतो. मुलाच्या प्रश्नाला तो त्याच्याच धुंदीत उत्तर देतो. तो म्हणतो कि हे इतके बेघर लोक असा रात्री कॉमन हॉलमध्ये झोपायचा plan करून आले नव्हते.
बापाचे dialogues
Ki-woo, you know what kind of plan never fails? No plan at all. No plan. You know why? If you make a plan, life never works out that way. Look around us. Did these people think, “let’s all spend the night in the gym?” But look now. Everyone’s sleeping on the floor, us included. That’s why people shouldn’t make plans.
With no plan, nothing can go wrong. And if something spins out of control, it doesn’t matter. Whether you kill someone or betray your country. None of it fucking matters.
मला हा सीन बघताना गली बॉय मधला असाच बाप मुलाचा संवाद आठवला.
बाप म्हणतो – तेरेको वही सिखा रहा है जो मै सिखा है. तेरा सपना तेरी सच्चाईसे मेल खाना चाहिये.
मुलगा – मै नही बदलेगा अपना सपना अपनी सच्चाई से मेल खाने के वास्ते. मै अपना सच्चाई बदलेगा जो मेरे सपने से मेल खाये.
--

स्वप्नं बघावीत का नाहीत हा एकदम फंडामेंटल प्रश्न आहे.
एक पिक्चर म्हणतो, बघा, येईल तुमचेही स्वप्न खरे व्हायचा टाईम. आणि एक म्हणतो, जे आहे त्यात असण्याची अवस्था खरी. कसलं स्वप्नं वगैरे!
दोन्ही सिनेमांचे प्रिमाईस सारखेच, बाप ड्रायव्हर, घर म्हणजे जवळजवळ भिंतींमधील थोडी जागा.
पण गली बॉय एकदम capitalist (एवढी झोपडपट्टी दाखवली, पण कॉमन संडास नाही दाखवले!) आणि Parasite एकदम मार्क्सिस्ट (पब्लिक ट्रान्सपोर्टने येणाऱ्या लोकांना एक विशिष्ट वास असतो असं म्हणणारा मालक!)?
स्वप्नं बघायची शर्यत जिंकणाऱ्याना लाभदायी ठरत असेलच, पण समूह म्हणून आपण पर्यावरणाच्या नाशाच्या ज्या टोकाला आहोत त्याला ही उपभोगरम्य आयुष्याचे स्वप्न बघण्याची लतच कारणीभूत नाही का!
समजा आपण एकदम ‘ठेविले अनंते..’ असे जगू लागलो तर?
--

आपण बरेच पिक्चर पाहिले, आता काय किक बसणार असं वाटत असताना एकदम Parasite! आणि मग त्यावर हा तितकाच परपोशी लेखनप्रपंच!!
एक नंबर पिक्चर आहे बाकी.

Thursday, February 13, 2020

किरण गुरव ह्यांचे लिखाण: बाळू आणि जुगाड


किरण गुरव ह्यांच्या ‘जुगाड ह्या कादंबरीला नुकताच महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वी मी आणि माझ्या काही समप्रश्नी मित्रांनी मराठीतल्या समकालीन फिक्शनबद्दल चर्चा/podcast केली होती त्यात किरण गुरव ह्यांचं नाव आलं होतं. त्यामुळे मी त्यांची पुस्तके वाचायचं ठरवलं. 
त्यांचे ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह) आणि ‘जुगाड (कादंबरी) मी वाचले. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ मधली ह्याच नावाची दीर्घकथा तर अधाश्यासारखी वाचली. हाच बाळू/बाळ्या/बाळासाहेब पुढे शशा होऊन ‘जुगाड मध्ये येतो कि काय असं वाटू शकतं! ‘बाळू मधल्या उरलेल्या दोन कथा श्याम मनोहर घाटाच्या आहेत. म्हणजे मेटाकथा टाईपच्या. मलातरी त्या जाम बोअर झाल्या. त्यातला कोडगा सिनिसिझाम आणि अदृश्य तात्विक झोंबी कधीकधी मजेदार असते, पण बहुतेकदा ती सारखी सारखी होते. पण ‘जुगाड मला जाम आवडली आहे.
--
मराठीच्या लेखकांना जवळपास अपरिहार्य असे दोन गुण जुगाडमध्येही आहेत, एक म्हणजे पुणे आणि दुसरे म्हणजे कोसलासदृश घाट. पण जुगाड पहिल्या भागात हे दोन्ही गुण दाखवते आणि मागे सारते. त्यानंतरची कादंबरी ही लेखकाची स्वतःची आहे, अर्थात stream of consciousness सदृश भाग येतातच. पण वर्णन करतानाची ती अपरिहार्यता आहे. विशेषणांचे झुबके लावण्यापेक्षा थंडगार थेट वर्णन कधीही भारी!
तांत्रिक वर्णनांना मराठीत पेश करणे हे जुगाडचे वैशिष्ट्य आहे. मिलिंद बोकिलांच्या ‘यंत्र नावाच्या कथेत अशी वर्णने येतात. असेम्ब्ली लाईन, प्लांट उभारतानाची एकेक टप्प्याची बारकाई गुरवांनी सावकाश उभी केलेली आहे. त्यांचा नायक ह्या कामांना एन्जॉय करणारा, काम उभे राहण्याच्या आनंदाला शोधणारा मनुष्य आहे. तो उगाच तात्विक, ऐतिहासिक भोवरे असलले मोनोलॉग मारत नाही. शिक्षण-नोकरी-भौतिक उन्नती अशी सिधी लाईन मनात असलेला त्यांचा नायक आहे. पण त्याला वाटलं तशी ही सिधी लाईन नाही. टेम्पररी-पर्मनंट-कंपनी बंद ह्या आधुनिक कोड्यात सापडलेला सुशिक्षित श्रमजीवी ‘जुगाड मध्ये सापडतो. मला तसा आधी मराठी कादंबरीमध्ये सापडला नव्हता.
तशी जुगाडला गोष्ट नाही, किंवा आहे ती एकदम छोटी. त्यात मजा आहे ती त्यातल्या मध्यवर्ती पात्राच्या नजरेतून गोष्ट उलगडण्याचीच. सावकाश वर्णने करण्याचा पेशन्स आणि त्याचवेळी गोष्टीतून काळ सरकावण्याचे पानवलकरसदृश्य कसब हे दोन्ही गुरवांच्या लेखनात आहे. त्यामुळे जुगाड वाचताना किक येते.
जुगाड ही आधुनिक कादंबरी म्हणता येईल. कारण त्यातला काळ हा एक दशकभरापूर्वीचा आहे. त्यात स्मार्टफोन नाहीत म्हणून ती अगदी आजच्या काठावरची गोष्ट नाही. जुगाड आधुनिक आहे ती वर म्हटलं तसं ती अगदी खरेखुरे तांत्रिक तपशील गोष्टीत आणू इच्छिते. दुसरं, तिच्यात मागच्या सांस्कृतिक अडगळीचे अर्थ लावण्याचा खास मराठी अट्टाहास नाही. त्यातला नायक हा एक व्यक्ती आहे, गावात वाढलेला आणि आधुनिक इंडस्ट्रीमध्ये उपजीविका शोधणारा. सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, प्रोफेसर, सतत एकामागोमाग एक अडचणींना तोंड देणारा शेतकरी, ह्या खास मराठी पात्रांहून वेगळा!
--
जुगाडची किक अशा समीक्षेत शोधता येणार नाही. आपण ज्या जगात जगतो आहोत त्यात जगताना सतत लागणारे व्यवधान, कायम पुढच्या स्कीम्स आणि त्याची तजवीज, वर जायची ईर्ष्या आणि पडलो तर इन्शुरन्स हे करू पाहण्याचा ताण आपल्यावर आहे. त्या ताणाने खेचलेल्या प्रत्यंचेसारखे आपण कायम बाण सोडायला सज्ज आहोत. पण हे करायचं नसेल तर? आपल्याला आपल्यापुरत्या आनंदाच्या वर्तुळात जगायचे असेल तर? आपल्याला उद्या काय, परवा काय हे प्रश्न सोडून शरीर आणि मनाला मजा देणाऱ्या आजमध्ये जगायचे असेल तर?
जुगाड असे प्रश्न विचारात नाही. पण हे प्रश्न त्या कथेच्या, कथनाच्या पाठी आहेत. उपभोगांची वाढती साखळी, ते उपभोग भोगायला दीर्घायुष्य, त्यातला वेळ भरायला मनोरंजन आणि हे सगळे उत्पन्न करण्यासाठी सट्टेबाज भांडवल. ह्या जगड्व्याळ खेळात प्रत्येकाला टिकायचा जुगाड करायचा आहे. काही जणांना तो सोपा आहे आणि काही जणांना अवघड. पण जुगाड करायला टिकून रहायचं आहे, कारण ते मूळ निसर्गाने भरलेलं आहे आपल्यात, टिकून राहणं, जुगाड करायला.
--
जुगाडचा शेवट चांगदेव चतुष्टयमधल्या शेवटांची आठवण करून देणारा आहे. त्या मध्यवर्ती पात्राला येणारी प्रखर जाणीव आणि तिचे आपल्याकडे येणारे चमचमते तुकडे. त्या ठिणग्या आपलीही जाणीव, आपले प्रश्न झळाळून टाकतात, क्षणभर आपल्याला आपल्यासारखा कोणी असल्याची सुखजाणीव होते आणि मग परत आपण आपल्या रोजमर्रा जिंदगीकडे परततो, मध्ये थोडावेळ असतो, बाहेरचा प्रकाश मालवत जाणाऱ्या आणि घरातले दिवे न लावलेल्या संध्याकाळीसारखा. तिथे नेऊन ठेवलं जुगाडने मला.

Tuesday, January 28, 2020

मराठीतील फिक्शन क्षीण होते आहे का: चारचौघांची चर्चा आणि हौशी क्ष-किरण

(मराठीतील फिक्शन, म्हणजे कथा आणि कादंबरी, क्षीण होते आहे का ह्यावर पॉडकास्ट सदृश्य काही बनवावं असा विचार मेघना, आदित्य, नंदन आणि मी केला. त्यातून बनलेले तीन ऑडिओ 
मेघनाने घेतलेली पंकज भोसलेची मुलाखत 
फिक्शन क्षीण होते आहे का – बेसिक मांडणी 
मागच्या 25 वर्षातील लक्षणीय फिक्शन 
ह्या चर्चा रेकॉर्ड करण्याच्या आधी मी मला नेमकं काय वाटतं ह्याबद्दल काही नोट्स काढल्या होत्या. त्या पुढे शेअर करतो आहे. )

मराठी फिक्शनबाबतचा प्रश्न मी माझ्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ च्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मांडला. माझ्या मनात आलेला प्रश्न हा प्रामुख्याने मराठी कादंबऱ्याबाबत होता. त्यातही मी मला झपाटून वाचाव्याश्या मराठी कादंबऱ्या फारच कमी येत आहेत अशा प्रकारची मांडणी केलेली होती. कथा हा विषय माझ्या डोक्यात अजिबातच नव्हता. ह्याचं कारण, subconsciously मला मराठीत फारच जास्त कथा लिहिल्या जातात असं वाटतं हे होतं हे नंतर स्वतःच्या निरीक्षणातून माझ्या लक्षात आलं. 
मी पेशाने समीक्षक नाही. (समीक्षक असणं हे सौंदर्य निर्माण करण्याची कुवत नसल्याने सौंदर्याबद्दल बौद्धिक मैथुन करून आनंद घेण्यासारखं आहे असं काहीकाहीवेळा मला वाटतं. पण अर्थात आनंद नसण्यापेक्षा कसलाही आनंद बराच!) त्यामुळे माझं माझ्या ह्या साहित्यिक प्रश्नाकडे बघायचं फ्रेमवर्क हे माझ्या सामाजिक शास्त्रातील संशोधक असण्याच्या पेशाने प्रेरित झालेलं आहे. ‘मराठी फिक्शन क्षीण होते आहे का? मरू घातली आहे का?’ ह्या प्रश्नाचं उत्तर डिमांड-सप्लाय फ्रेमवर्कमध्ये आणि डिमांड-सप्लाय बनण्याचा प्रक्रियेत आहे असं मला वाटतं. पण मराठीत फेमस असलेले व्यक्तीसापेक्ष क्ष-किरण टाकून व्यक्तीसापेक्ष निदान करण्यापेक्षा वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांचा हार्ड डेटा घेऊन ह्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या ह्या टिपणाच्या शेवटी मी ह्याबाबत जास्त बोलेन. 
मी, मेघना, नंदन आणि आदित्य, हा जो आमचा गट आहे ज्याने थोडा अधिक पद्धतशीर धांडोळा घ्यायचा ठरवला आहे त्या चर्चेत आणि मेघनाने पंकज भोसले ह्यांच्यासोबत केलेल्या चर्चेत फिक्शन घटली आहे ह्यावर एकमत आहे आणि त्याची काही कारणेही पुढे आलेली आहेत. 
त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे: -फिक्शन हे प्रामुख्याने मनोरंजनासाठी केलं जाणारं वाचन आहे. आणि मनोरंजनाचे नवे पर्याय (टीव्ही, स्ट्रीमिंग) हे निर्माण झाल्याने पुस्तकांची स्पेस घटली. हे सारे बदल लक्षणीयरित्या घडले ते १९९० च्या आर्थिक उदारीकरणानंतर. 
 मला स्वतःला हे कारण सुरुवातीला पटलं. पण नंतर विचार करता त्यात थोडी विसंगती आहे असंही वाटलं. 
आर्थिक उदारीकरणानंतर मराठी शिकलेले लोक आणि त्यांची क्रयशक्तीही वाढली. शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोचले, महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-नाशिक त्रिकोणात मध्यमवर्गी आर्थिक सुबत्ता आली. मग हे नवे लोक आणि त्यांचा पैसा वाचनाकडे आलाच नाही का? का फिक्शनकडे आला नाही, पण बाकी मराठी साहित्याकडे विशेषतः सेल्फ-हेल्प, प्रेरणापर, माहितीपर साहित्याकडे गेला? 
समीक्षक आणि क्रिटीकल वाचकांच्या वर्तुळात नावाजली जाणारी फिक्शन आणि बाकी वाचकांना वाचावीशी वाटणारी फिक्शन वेगळी आहे का? उदाहरण घ्यायचं असेल तर ‘कोसला’ चं घेता येईल किंवा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ चं. ‘कोसला’ वर म्हटलेल्या क्रिटीकल वर्तुळात नावाजलेली आहे. पण माझी आजी, जी तिच्या आयुष्याची ७०+ वर्षे सातत्यपूर्ण वाचक होती तिने कोसला वाचलेलं नव्हतं. माझे वडील दर आठवड्याला एक मराठी पुस्तक, प्रामुख्याने फिक्शन(!) वाचतात, त्यांनी कोसला वाचलेली नाही. (त्यांना एकदा देऊन बघावी वाचायला असा प्रयोग डोक्यात येतो आहे!)
म्हणजे कदाचित माझ्या डोक्यात असलेली फिक्शन, जिला आपण ‘तात्विक फिक्शन’ म्हणूया, ती आणि बऱ्याचश्या वाचकांच्या वाचनातली फिक्शन वेगळीच असू शकते. 
ही तात्विक फिक्शन घटली आहे का वाढली आहे हे बघायचं झालं तरी कसं बघणार? एक प्रकार म्हणजे मराठीत १९९५ च्या आधी किंवा १९९० च्या दशकाच्या अगोदर काय अवस्था होती? तेव्हा खरोखरच, उपलब्ध क्रिटीकल वाचकांच्या डिमांडच्या प्रमाणात अशी फिक्शन बरीच येत होती का? का तेव्हाही तोकडी जाणीव होतीच? 
मेघना, नंदन आणि आदित्य ह्यांनी बनवलेल्या यादीत १४२ कादंबऱ्या आहेत. २५ वर्षांत १४२ कादंबऱ्या म्हणजे सरासरी साधारण ६ दरवर्षी. पण ह्या यादीत लोकफिक्शन नाही, म्हणजे विश्वास पाटीलांची ‘चंद्रमुखी’ नाही, ‘लस्ट फॉर लालबाग’ नाही, रहस्यकथा, भयकथा नाहीत, वसंत वसंत लिमये नाहीत. त्यांत आहेत ती सिरीयस वाचकांना भावलेली पुस्तके. 
मग वर्षाला ६ हा आकडा कमी का जास्त? मला स्वतःला असं वाटतं कि माझ्या मराठी वाचनाच्या भुकेला हा आकडा वाईट नाही. पण एखाद्या अधिक कमिटेड वाचकाला तो कमी वाटेल. आणि मुळात प्रश्न आहे कि १९९५ च्या आधी अशी सरासरी काय होती? 
दुसरी तुलना अशी शक्य आहे कि मराठीसारख्या दुसऱ्या भाषेत मागच्या २५ वर्षांत काय अवस्था आहे. मला वाटतं कि कन्नड आणि तमिळ ह्यांची मराठीशी तुलना योग्य राहील. ह्या दोन्ही ताकदवर प्रादेशिक भाषा आहेत, त्यांना मोठा भूभाग आहे, ह्या राज्यांतील शहरीकरण आणि मध्यमवर्ग ह्यांचा महाराष्ट्राशी सारखेपणा असण्याची दाट शक्यता आहे. इंग्रजी शिकणं ही उन्नतीची शिडी हे ह्या राज्यांतील मध्यमवर्गाने मानलेलं असावं. मध्यमवर्गाचा उपजीविकेचा प्रकारही सारखा असावा. पण ह्या राज्यांत भाषिक वैविध्य कमी आहे कारण हिंदी भाषिक कमी आहेत. त्यामुळे ह्या भाषांतील साहित्य व्यवहार अधिक ताकदवान असण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या भाषांची अवस्था ही चांगले टोक (upper bound) अशा अर्थाने वापरता येऊ शकते. 
वर केलेल्या विवेचनाचा दुसरा एक भाग असा कि मी मुळात क्षीण होण्याचा प्रश्न हा तात्विक फिक्शनलाच लावून पहावा. किंवा ‘मला झपाटून टाकणाऱ्या अशा तात्विक फिक्शनलाच’ लावून पहावा. इथे फारच व्यक्तीसापेक्षता आहे आणि त्याची मला जाणीव आहे. झपाटून टाकणं हे बदलत राहू शकतं आणि झपाटल्यागत वाचलं जाणं हाच काही पुस्तक आवडायचा एकमात्र निकष नाही. पण तो एक जोरदार निकष मात्र नक्की आहे. 
--
मी माझ्या ब्लॉगवर सुरु झालेल्या प्रश्नाचा नीट विचार केला. तो प्रश्न अशा मांडणीतून आला कि ७०० ते हजारभर पानांची कादंबरी मराठीत पुढच्या काही वर्षांत निर्माण होण्याची शक्यता काय? असे प्रोजेक्ट किमान २-३ वर्षांचे असू शकते. तेवढा वेळ आपल्या उपजीविकेला सांभाळून देऊ शकतील असे कोण मराठी लेखक आहेत? तेवढी बौद्धिक क्षमता असणारा मनुष्य मराठी कादंबरीकडे वळण्याची काय शक्यता आहे? असं होणार नाहीये असं मला म्हणायचं नाहीये. माझा संशोधकी पेशा मला ठाम विधाने करण्यापासून परावृत्त करतो. ‘असं व्हायची शक्यता कमी आहे’ असा माझा सुरुवातीचा कयास (null hypothesis) आहे. 
असं मला वाटतं ह्याचं कारण मुख्यतः सप्लाय साईडला, म्हणजे लिहिणाऱ्या लोकांच्या बाजूला आहे. वर म्हटलं तसं ज्या पद्धतीने उपजीविकांचा दाब (त्यात घालवायला लागणारा वेळ, शहरी प्रवास, टिकून राहण्यासाठी लागणारे उत्पन्न इ.) वाढतो आहे त्यापासून स्वतःला insulate करून लिहिणारे किती येतील? मागच्या काही दशकांत प्राध्यापकी पेशाने ही मुभा दिली असावी, पण नव्या काळात तशी मिळणार आहे का? आणि ज्यांना मिळणार आहे त्यांना लिहायचे आहे का? 
मला असं वाटतं कि मराठीत लिहू शकणारे लोक प्राध्यापकी पेशांत जायची शक्यता १९९० नंतर कमी झाली आहे. क्षमता असलेल्या मनुष्याला भौतिक उन्नती साधणं हे उदारीकरणाने सोपं करून सोडलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणाच्या निवडीतच ही बाब दिसून येत असावी. थोडीही समज असणारा मनुष्य हा विज्ञान, कॉमर्स अशा शाखा निवडू पाहतो आणि अशी महाविद्यालये खालपर्यंत बनलीही आहेत. (माझ्या मांडणीचा अर्थ आज अकॅडेमिक उपजीविका असणारे मराठी लेखक हे कमी प्रतीचे आहेत असा नाही. आज असे करणारे लोक 1990 च्या आधीच्या प्रमाणाहून कमी आहेत असा आहे.)
हा कयासही तपासता येई. कला शाखेत नावाजलेल्या महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेचा डेटा पाहून हे सांगता येईल. 
मराठीत लिखाण हा हौसेचा मामलाच आहे, विशेषतः मजबूत लोकप्रियतेच्या प्रतलाच्या खाली असलेल्या लेखकांना. (म्हणजे अच्युत गोडबोले, पु.ल. देशपांडे अशी लोकप्रियता!) पंकज भोसल्यांनी त्यांच्या ऑडीओमध्ये हा मुद्दा मांडला आहे. हौस ही वेळेवर आणि स्पेसवर अवलंबून असते. ही वेळ आणि स्पेसच दुर्मिळ झाली आहे. केवळ उपजीविकेच्या दाबानेच असं नाही. कदाचित व्यक्ती म्हणून आपण अधिक impatient झालो आहोत, आपल्याला अधिक रंजक आकर्षणे उपलब्ध आहेत, समविचारी लोकांसोबत वेळ घालवणे शक्य आहे आणि सोशल मिडिया आहे. 
एकूणच का लिहावं (त्याचे आत्मिक-भौतिक फायदे) आणि काय लिहावं (शहरी मराठी लेखकांचे एकजिनसी विश्व आणि ग्रामीण-शहरी किंवा ग्रामीण अशा लेखकांचे वेगळे पण परत एकजिनसी विश्व ह्यांत नाविन्य येणार ते कुठून? बरं, ह्या दोन्ही गटांत फिक्शनला वैयक्तिक साठमारी, जात आणि इतिहास ह्यांवर प्रहार करायचे अस्त्र म्हणून वापरायची ही खास मराठी खुमखुमी आहे तो वेगळा एकजिनसीपणा.) ह्या बेसिक घटकांत आलेला कमकुवतपणा हाच क्षीण प्रवाहाचे कारण असेल का?   
का लिहितात आणि काय लिहितात हे मोठेच तात्विक प्रश्न आहेत. त्यांची ठाम उत्तरे आपल्याकडे नाहीत. पण जगभरातल्या अभ्यासावर हे दिसतं कि जर लेखकांची सांपत्तिक स्थिती बरी होत असेल तर ते अधिक आणि अधिक गुणवत्तेची निर्मिती करतात. आणि त्यांना ही बरी अवस्था पुस्तकांच्या मानधनातूनच मिळत असेल असे नाही. शिष्यवृत्त्या, पाठ्यवृत्त्या ह्यांतूनही त्यांना लिखाणाला लागणारी स्पेस मिळू शकते. अशा सपोर्ट स्ट्रक्चरची उपलब्धता ही समाजाच्या भौतिक आणि बौद्धिक संपन्नतेवर अवलंबून असावी. 
मराठी वाचक, विशेषतः मध्यमवर्गीय वाचक हे भौतिकदृष्ट्या तर संपन्न आहेत. मग वाचनाची डिमांड का घटते आहे? डिमांड घटते आहे हे तसं स्पष्ट आहे. मागच्या दोन महिन्यांत दोन नियतकालिके बंद पडली. (अक्षरधारा आणि अजून एक, ज्याच्या संपादकाने फेसबुकवर आपली भूमिका मांडली होती.) माझ्या शहरातील खाजगी वाचनालये बंद पडली. 
वाचनालयांचा प्रश्न मराठीपुरता मर्यादित नाही. शहरातील जागांचे भाव बघता वाचनालय हा जागेचा वाईट बाजारी उपयोग ठरतो. जागेचा अपव्यय वाचवावा म्हणून मुंबईतील ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीनेही आपली लायब्ररी केवळ ऑनलाईन कॅटलॉग चाळून पुस्तके मागवणे अशी मर्यादित केलेली आहे. 
डिमांड घटण्याचा सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची घटती गुणवत्ता. मध्यमवर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळल्याने मराठी पुस्तकांची, लेखकांची शालेय वयात होणारी ओळख कमी होते. घरातून वाचनाचे बाळकडू असेल तर काही अपवाद असू शकतात. पण फिक्शनमध्ये वापरली जाऊ शकणारी लवचिक मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मराठी पाठ्यपुस्तकातील बाळबोध मराठी हे एकमेकांशी जुळत नाहीत. त्यात जर विद्यार्थी अप्रादेशिक बोर्ड्स (जसे CBSE) असेल तर मराठीची पालकांमुळे तोंडओळख एवढाच प्रकार उरतो. मुंबईतील दाक्षिणात्य कुटुंबातील प्रादेशिक इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या मुलांचा जसा त्यांच्या मातृ-पितृ भाषेशी प्रामुख्याने संवादभाषा म्हणून संबंध राहतो तसं ह्या मुलांचं होतं. नवे मराठी वाचक बनण्याची शक्यता कमी होते किंवा बनतच नाहीत. 
जे मराठी माध्यमांत आहेत तिथे रोल मॉडेल क्रायसिस आहे. मुले इतरांचे पाहून शिकतात. आज मराठी माध्यम हे बहुतांश हुकलेल्या पालकांचे आहे. (पुण्या-मुंबईचे काही अपवाद सोडून!) हे पालक स्वतः फिक्शनवाचक असण्याची शक्यता नाही. ह्या हुकलेल्या पालकांतील महत्वाकांक्षी पालक वाचनाकडे भौतिक उन्नतीची शिडी वेगाने चढायचे साधन म्हणून पाहतात. फिक्शन ह्या शिडीत येईल का, जितके माहितीपर किंवा सेल्फ-हेल्प लिखाण येईल? 
मराठी माध्यमांच्या सुरकुतत चाललेल्या शाळांमधून कसे आणि किती वाचक येतील? प्रादेशिक इंग्रजी माध्यमातून किती येतील? आणि अप्रादेशिक माध्यमातून किती येतील? ह्याची उत्तरे आपल्याला माहित नाहीत. पण ती नकारात्मक असावीत असं मला वाटतं. 
--
मी वर मांडलेले मराठी फिक्शनच्या एका उपविभागाबद्दल मांडलेले कयास हे कदाचित सगळ्याच मराठी फिक्शनला लागू पडत असावेत. पंकज भोसल्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित लोकफिक्शनलाही तो लागू पडत असावा. त्यांनी दिलेलं शृंगारिक साहित्याचे उदाहरण चपखल वाटते. मराठी शृंगारिक साहित्याच्या घटत्या निर्मितीला दृश्य माध्यमाची वाढती उपलब्धता जबाबदार असावी असं वाटतं. डिमांड घटली आणि मग सप्लाय घटला. 
वाचनाची क्षमता असणाऱ्या व्यक्तीची वाचनाची स्पेस घटली आहे. ही घट दोन प्रकारची आहे, फोकस आणि वेळ. लोकांच्या उपजीविका ह्या अधिकाधिक बौद्धिक ताण देणाऱ्या होत आहेत, ज्याने फोकस घटतो आहे. वाचन ही श्रमाची बाब आहे, तात्विक फिक्शन वाचणं ही अधिक श्रमाची. उपजीविकांचा वेळ वाढलेला आहे आणि गंभीर व्यक्तीलाही तात्विक रंजनाच्या बऱ्याच जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. पण अर्थात वाचनाला रंजन म्हणून घेऊ शकणारे लोकही वाढले आहेत. त्यामुळे नक्त इफेक्ट काय आहे हे एखाद्या सर्व्हेनेच समजू शकेल. नितीन रिंढे ह्यांनी नेमकी हीच गरज त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत व्यक्त केली कि वाचणाऱ्या लोकांच्या वर्तनावर अधिक प्रकाश पडायला हवा आहे.
--
मराठी साहित्य, भाषा ह्यांच्याशी आधारित उद्दिष्टांवर कार्यरत संस्था, अशा विषयांत स्वारस्य असणारे लोक ह्यांनी फिक्शनच्या निर्मितीबाबतच्या प्रश्नांना डेटा वापरून उत्तरे देता येण्यासाठी रिसोर्स उभे केले पाहिजेत. विशेषतः वाचकांची निर्णयप्रक्रिया आणि वाचकांच्या विविध उपस्तरांची निर्णयप्रक्रिया समजून घेण्यासाठी विविध भौगोलिक-सामाजिक स्तरात पोचणारे सर्व्हे आवश्यक आहेत. 
का करावा असा अभ्यास? वर म्हटलं तसं, बौद्धिक रंजन म्हणूनच. त्यातून भाषा आणि व्यक्ती संबंधावर अधिक प्रकाश पडेल हे नक्की. पण आपण मराठी भाषा, मराठी लिखाण ह्यांना वृद्धिंगत करणारे फार काही करू शकू असे नाही. 
लोक धोतर सोडून विजारी वापरू लागले, सहावारी सोडून नववारी साडी, साडीच्या ऐवजी ड्रेस वापरू लागले कारण अधिक सोयीचे आहे. तसे लोक भाषेशीही करतील. एकदम प्रोफेटिक व्हायचं झालं तर, मराठी प्रामुख्याने बोलीभाषा होण्याच्या प्रवासात (म्हणजे पुढच्या शतकभरात वगैरे) त्यातली गंभीर/तात्विक फिक्शन कशी क्षीण होऊन एके दिवशी संपली ह्या ह्रासाचा वारसा लिहिणं ही बौद्धिक गंमत, पण उदास करणारी!   

Sunday, November 17, 2019

चिवडा, यादृच्छिक गती, झीनोचा पॅरॅडॉक्स आणि मोहन आपटे


परवाची गोष्ट. भूक लागली म्हणून बायको चिवडा खात होती. चिवडा काही आठवडे अगोदर बनवलेला आहे हे माहित असल्याने मी तिला चिवडा खराब तर झालेला नाही ना असं विचारलं. त्यावर तिने चिवड्याचा अजून एक बकाणा भरत आश्चर्याने मला ‘चिवडा खराब कसा होईल असं विचारलं. तिचा प्रश्न हा खरंतर ‘इतक्यात चिवडा खराब होणार नाही अशा आशयाचा rhetorical प्रश्न होता. पण तिच्या प्रश्नाने आणि त्याआधी वाचलेल्या एका बातमीने मी थोडा विचार करू लागलो.
‘चिवडा खराब कसा होईल?’ ह्याचं उत्तर चिवड्याच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मांचा विचार करून देता येईल. अर्थात हा प्रकार फारच geeky म्हणजे Sheldon Cooper टाईप होईल. आणि अशी उत्तरे आपण सहसा देत नाही. पण अशी उत्तरे देऊ शकणाऱ्या लोकांचे एक जग असते. आपल्यातल्या ज्यांनी कोणी Big Bang Theory पाहिलं असेल त्यांना ह्या जगाची झलक मिळालेली आहे.
मला माझ्या बायकोला असं geeky उत्तर अजिबात द्यायचं नव्हतं, कारण मला ते माहित नाही. पण असं उत्तर द्यायचं असेल तर कसं शोधायचं हे मला नक्की माहित आहे!
मला आठवण आली ती मी वाचलेल्या एका पुस्तकाची. ते पुस्तक म्हणजे डॉ. बाळ फोंडके ह्यांचे ‘अणुरेणु. त्यात ‘कॉफीचा थेंब गोल सांडला तरी उरलेला डाग कोणत्याही आकाराचा का असतो ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. मी ८वी- ९ वीत असताना ते पुस्तक वाचलं असेल. मला कॉफीच्या थेंबाबद्दल असलेला प्रश्न पडलेला नव्हता आणि त्याचं उत्तर नीट appreciate करता आलं नव्हतं.
त्या पुस्तकाची आठवण जरी चिवड्यामुळे आली असली तरी त्यापाठी कारण होतं ते मोहन आपटे ह्यांच्या निधनाच्या बातमीचे. It felt like some sort of loss, जरी मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो. शाळेत असताना मोहन आपटे ह्यांची ‘मला उत्तर हवंय ही शृंखला, विज्ञानवेध, कृष्णविवर, संख्यांचे गहिरे रंग, ब्रह्मांड ही पुस्तकं मी वाचली होती. त्यातून फार काही कळण्यापेक्षा मी बराच वाचतो आहे हा इगोच जास्त शांत झाला. ह्या पुस्तकांत खूप माहिती होती, आणि माहितीच्या पुढे जाऊन  मांडणीही होती. उदाहरणार्थ, मूलकण ह्या गोष्टीची विस्तृत चर्चा मोहन आपटे ह्यांनी ‘ब्रह्मांड ह्या पुस्तकांत केली होती. सहज एक उदाहरण म्हणजे, क्वार्क्स ही संकल्पना मी पहिल्यांदा त्यात वाचली होती.
अशी पुस्तके लिहिणाऱ्या लोकांत मोहन आपटे एकटे नव्हते. बाळ फोंडके, नारळीकर (विज्ञानकथा आणि आकाशही जडले नाते सारखे पुस्तक) ही पण नावे आठवतात.
ही पुस्तकं विद्यार्थी म्हणून मला फार उपयोगी पडली असे नाही. पण शिक्षक म्हणून खूप उपयोगी पडली आणि पडतात. अर्थात इंग्रजी पुस्तके आणि इन्टरनेट असताना अशा पुस्तकांचे मूल्य हे घटते आहे.
ह्या लोकांनी ही पुस्तके नेमकी कोणासाठी लिहिली? विज्ञानशिक्षक आणि विद्यार्थी ह्या पुस्तकांवर उड्या मारत होते अशातला भाग नसावा. एकूण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांतील माहितीपर पुस्तके वाचू पाहणारे विद्यार्थी थोडे, त्यांत आपल्या पाल्याला अशी पुस्तके वाचायची संधी मिळवून देऊ शकणारे पालक अजून कमी. अशा अवस्थेत ही पुस्तके अवतरली ह्याचे खरे कारण लिहिणाऱ्यांची सांगायची कळकळ हेच असावे. बाळ फोंडके, नारळीकर, घाटे ह्यांनी विज्ञानकथा लिहून अधिक मोठा audience मिळवला असावा. पण मोहन आपटे ह्यांनी तो रस्ता चोखाळला नाही. विषयाची क्लिष्टता हाताळताना त्यांनी तडजोड केली नाही आणि मराठी प्रतिशब्द तसेच इंग्रजी संज्ञा ह्या दोन्ही वापरल्या.
संवाद साधून, आपल्याला उकललेले दुसऱ्याला समजावून देणे हा एक मोठा आनंद आहे. वर उल्लेखलेल्या लेखकांना geeky गोष्टींची चर्चा करून हाच आनंद मिळालेला असावा. इतिहासाची अविरत धूळवड किंवा सांस्कृतिक टाळ्यांचा व्यक्तीचित्रणपर महोत्सव चालवणारे लोक ह्या दोन प्रबळ लेखन प्रवाहांत सध्या भौतिक प्रश्नांच्या वैज्ञानिक उकलीने आनंदी होऊ पाहणाऱ्यांचा प्रवाह आश्चर्यात पाडणारच आहे.
--

विज्ञानाला अध्यात्मिक झालरी लावणे हा अनेकांचा आवडता छंद आहे. सांख्यिकीच्या वैराण जगात घुसून p-value च्या मृगजळात फसण्यापेक्षा वेदांतील सूक्ते आणि फिजिक्स कसे सारखेच आहे ह्याची हातचलाखी नक्कीच मजेची आहे. मोहन आपट्यांच्या एका पुस्तकाच्या सुरुवातीला, बहुतेक 'ब्रह्मांड',  नासदीय सूक्ताच्या काही भागाचे मराठी भाषांतर आहे. पण नंतरच्या पुस्तकात अध्यात्मिक झिरमिळ्या नाहीत. (विज्ञान आणि अध्यात्म ह्यावर आजही निष्कर्षहीन पण मजेदार चर्चा झडत असतात. स्वामी सर्वप्रियानंद ह्यांची ही एक podcast इंटरेस्टिंग आहे.)
 --
  मोहन आपटे ह्यांनी जशी पुस्तके लिहिली (पॉप्युलर सायन्स प्रकारची) तशा पुस्तकांच्या किती प्रती निघाल्या, ह्या पुस्तकांचे मानधन लेखकांच्या एकूण उत्पन्नाच्या किती पट होते, ह्या पुस्तकांनी विज्ञानाची वाट चोखाळण्याची प्रेरणा आणि आवश्यक माहिती किती जणांना दिली हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. आज अशा प्रकारची पुस्तके कोण लिहितो आणि कोण वाचतो हा अजून एक प्रश्न.
--
एक गमतीचा भाग. मित्रांमध्ये गप्पा मारताना मी एका मित्राला म्हटलं, अरे तू कसा चालतोस. तुझी यादृच्छिक गती पाहून मला चिंता वाटते तुझी. माझ्या यादृच्छिक गती ह्या शब्दावर माझा मित्र एकदम अडखळून गेला.
असे शब्दप्रयोग सहजपणे वापरून लिहू शकणारे लोक मराठीतून हळूहळू नाहीसे होतील हा माझा आवडता हायपोथेसिस आहे. सिरीयस फिक्शन, पॉप्युलर सायन्स ह्या सगळ्याला मराठीत काही वाव उरणार नाही. सिरीयल आणि सिनेमा हेच मराठीत बनतील हाही त्या हायपोथेसिसचा पुढचा भाग. ह्याचं कारण म्हणजे मराठीत catch them young हे घडणं बंद होत आहे. अर्थाभाषा, ज्ञानभाषा ही इंग्रजी, व्यवहारभाषेतही मराठीसोबत हिंदी. मराठी केवळ खाजगीची भाषा, आई-वडिलांची आहे म्हणून आपली. त्यातही इंग्रजी घुसतेच आहे.
--
       Zeno’s paradox नावाने ओळखली जाणारी संकल्पना मला पहिल्यांदा मोहन आपट्यांच्या गणिताबद्दलच्या एका पुस्तकात वाचायला मिळालेली होती. विद्यार्थ्यांना continuity शिकवताना मी ह्या संकल्पनेचा उल्लेख करतो, ज्यामुळे discrete आणि continuous ह्यातला फरक समजावता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांना Zeno’s paradox चं नवल वाटतं. मग त्यातला कोणीतरी प्रश्न विचारतो, कि हे परीक्षेला आहे का. मी हसून नाही म्हणतो. परीक्षेला नाही आणि प्लेसमेंटला उपयोगी नाही अशा रकान्यात ज्या गोष्टी असतात त्यात विद्यार्थी ह्यालाही जमा करत असावेत.
       एखादवेळी मात्र एखादा विद्यार्थी विचार करतो. ह्या विसंगतीचे resolution काय ह्याबाबत विचारायला येतो. तो सारा संवाद मजा असते.
--

मोहन आपटे आणि बाकी लेखकांची पुस्तके आज माझ्याजवळ नाहीत. केव्हातरी ही पुस्तके बिनकामी आहेत, जागा अडवून आहेत म्हणून मी रद्दीत टाकली. काही उदाहरणे, संदर्भ लक्षात आहेत, जे अध्येमध्ये कामी येतात, आपल्याला किंवा अन्य कोणाला समजवायला. त्या कृतज्ञतेसाठी हा ब्लॉग.   

Monday, October 21, 2019

सातपाटील कुलवृत्तांत


कुळकथा हा छोटा पण प्रभावी जॉनरच मराठीत पकडला पाहिजे. तुंबाडचे खोत, मुखवटा, कारवारी माती अशी काही नावे आठवतात. ह्या यादीत लक्षणीय भर म्हणजे रंगनाथ पठारे ह्यांचे ‘सातपाटील कुलवृत्तांत’. एखाद्या पुस्तकाची नशा सावकाश पसरत जाणं हा वाचण्याच्या आनंदातला जबरी भाग असतो. तो अनुभव मला ‘सातपाटील कुलवृत्तांत वाचताना आला. दिलचस्प, भौगोलिकदृष्ट्या पसरट, अधिक गंभीर आणि कुळकथा सांगताना ऐतिहासिक तथ्ये, conjectures आणि मानवी जीवनाचे अपरिहार्य पडाव ह्या सगळ्यांना कवेत घेऊ पाहणारी महत्वाकांक्षी कादंबरी म्हणून ‘सातपाटील’ कडे बघावं लागेल.
स्त्रोत: बुकगंगा 

केवळ एक दिलचस्प फिक्शन लिहिणं हेच लेखकाला अभिप्रेत नाही हे कादंबरी वाचताना सतत जाणवतं. लेखक स्वतःला ज्या इतिहास, वंश, जात, परंपरा ह्यांचा भाग मानतो त्याबद्दल लिहिणं ही क्वेस्ट कथेच्या पार्श्वभूमीला सतत जाणवत राहते. पण कादंबरी हे आपल्या सामाजिक कमेंट्रीचे निमित्त असा भैराळ प्रकार त्यात होत नाही. कादंबरीतले भाग, विशेषतः जानराव, शंभुराव ह्यांचे भाग विलक्षण आहेत. कथेचे सुट्टे झालेले काळपदर एकमेकांना जुळून येणं हे कथेत वारंवार घडतं आणि हा तंत्राचा भाग असूनही त्यात कृत्रिमता नाही. कथेचा लेखकाच्या परिचित भूभागात (म्हणजे असा माझा कयास) घडणारा भाग अधिक ताकदवान वाटतो. (पु.शि.रेग्यांच्या ‘मातृका बाबत असं निरीक्षण सारंग ह्यांनी नोंदवलेलं मला आठवतं.)

‘सातपाटील’ ला नेमक्या कुठल्या कप्प्यात ठेवणं कठीण आहे. तिचे साधर्म्य अनेक कथांशी आहे. ज्या कुळाची कथा आहे त्या कुळाची उत्पत्ती विरोधाभासात असणं हे महाभारताशी साम्य आहे. अमिताव घोष ह्याच्या indo-nostalgic कादंबऱ्या, नेमाड्यांची हिंदू (त्यातला शेतकऱ्याचे घर आणि त्याचा रगाडा सांभाळायची कसरत ह्यांचा भाग), मार्खेजचे Hundred Years of Solitude मध्ये वर्तमानाच्या वर्णनांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची झलक जोडणे ह्या साऱ्यांची आठवण ‘सातपाटील वाचताना होते.

शेवटचे प्रकरण आधीच्या रसरशीत कथेला क्लोजर द्यायच्या प्रयत्नात रसभंग करून गेले. म्हणजे कथा म्हणून हे क्लोजर आवश्यक आहे. पण ते देताना कथेच्या प्रतलाहून भरकटून इतिहास आणि जात ह्या मराठी विचारविश्वाला विळखे देऊन राहिलेल्या गर्तांत ते घुसते. ते व्हायलाच हवे होते का?

निम्नमध्यमवर्गांत, शहरातील भाड्याच्या घरात वाढल्याने जात, जमीन, इतिहास, परंपरा ह्यांपेक्षा उपभोगउन्नतीची गर्ता ही माझ्या जास्त ओळखीची आहे. आपल्या घरांत दिसतात ती माणसे एवढेच आपले कुळ, आणि आहेराचे सूड ज्यांच्यासोबत साधले जातात ते नातेवाईक. इतिहास आणि जात ह्या दोन्ही गोष्टी मनुष्य निवडत नाही आणि त्या त्याला बदलताही येत नाहीत. ह्या दोघांचा आपल्या जीवनावर प्रभाव असला तरी त्या प्रभावाहून वेगळे आयुष्य जगण्याची मुभा अद्यापतरी आहे. ह्या गोष्टीना लगटणे ही आपली निवड असते, अपरिहार्यता नाही असं मला वाटतं. त्यामुळे ह्या गर्तांत फिरणाऱ्या लोकांबद्दल मला कुतूहल आहे.

ह्या गर्तांत रंजक, विचक्षण असे काही नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण रंजनापलीकडे आपल्या आजच्या जीवनाचा अर्थ किंवा अर्थहीनता ह्यांना समजू शकणारे त्या गर्तांत काही नाही.
लेखकही असं काही म्हणत नाही. पण तरीही जातीव्यवस्था, कोण लोक नेमके कुठचे, कोणता भूगोल नेमका कोणाचा ह्यावर कादंबरी खूप काही बोलते. ही लेखकाची संदर्भसिद्ध मते आहेत का कादंबरीच्या फिक्शनची गरज म्हणून वापरलेले प्रॉप्स हे कळलं तर मजा येईल.

हा फक्त गोठलेला काळ आहे

हा फक्त गोठलेला काळ आहे. बदललेलं काहीच नाही. आपण प्रतीक्षा करतोय ती आपल्याला स्तिमित करणारी कूसपालट नाही ही. हा फक्त कोमा आहे, जिथे ...