Saturday, January 19, 2013

पुणे-५२ मध्ये काय चुकलं असावं?

       तसं माझ्या भरपूर चित्रपट पाहणाऱ्या आणि चित्रपटांविषयी अद्ययावत माहिती ठेवणाऱ्या मित्राने मला अगोदरच या चित्रपटाचा नकारात्मक रिव्ह्यू दिला होता. पण मला ट्रेलर आवडला होता, मला गिरीश कुलकर्णी चा अभिनय आवडतो, आणि त्यात ह्या चित्रपटाला ए रेटिंग आहे (म्हणजे मला ए रेटिंग खास आवडतं असं म्हणून नाही तर मराठीत हे ए रेटिंग का आलं बुवा अशा मर्यादित कुतूहलाने) म्हणून मी खास धावपळ करून गेलो शो बघायला.
        पहिल्या तासाभरातच जेमतेम ३० सीट्सच्या थेटरात कंटाळवाणे उद्गार येऊ लागले होते. आता मॉलमध्ये मराठी चित्रपट पाहायला येणाऱ्या लोकांचे काही भाग असतात. एक, मराठी बाणावाले मराठी, जे काहीही पिक्चर असो, तो मराठी आहे म्हणून शे-दीडशे रुपयांची तिकिटे काढून येतात. दुसरा, अल्फा मराठी, जे पिक्चरच्या आधी, पिक्चरमध्ये, आणि नंतर एकमेकांशी इंग्रजीत किंवा 'किती ओसम होता ना मूव्ही' अशा अल्फा मराठीत एकमेकांशी बोलतात असा. बहुतेकदा त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी, जो फेस्टिवल वगैरेला जाणारा असतो त्याने सुचवल्याने असे लोक चित्रपटाला येतात आणि ते अपार रसिकतेने शेवटपर्यंत आपल्या मताचा थांगपत्ता लागू न देता पिक्चर बघतात. तिसरा, म्हणजे ह्या दोन भागात नसलेले लोक, ज्यांत कदाचित मी असेन.
  तर असे तिन्ही वर्ग हा चित्रपट बघत होते. तासाभराने पाहिला वर्ग कमेंट मारून कंटाळा बाहेर काढू लागला. त्यांच्या कमेंट वाढल्या तशा दुसऱ्या वर्गाने 'विल यू प्लीज कीप क्वाएट' असे म्हणून त्यांना अंग्रेजी दट्ट्या दिल्याने कमेंट खुसफुस या स्वरूपात राहिल्या. पण पिक्चर संपल्यावर बाहेर पडताना कोण आहे रे तो डीरेक्टर असे बहुतेक सगळेच म्हणत होते. मला पिक्चर संपता संपता कंटाळा आला होता. आणि त्याचवेळी असं का होतंय हा प्रश्न मला पडला होता.
१: एकाच वेळी आर्ट हाउस मूव्ही, सामाजिक चित्रपट आणि सस्पेन्स थ्रिलर काढायचा प्रयत्न अंगाशी आला आहे. सामाजिक भाष्य हा मराठी लिखाणाला, चित्रपटांना आणि त्यापेक्षा वाचक, प्रेक्षक किंवा क्रिटिक ह्यांना झालेला अनुवांशिक रोग आहे. मनोरंजन किंवा प्रकटीकरण ह्या पलीकडे जाऊन सामाजिक, राजकीय असं एक अंग प्रत्येक कलात्मक अभिव्यक्तीला असलंच पाहिजे असं काहीतरी. पुणे ५२, हा तर पुण्यातला पिक्चर. त्याच्या हातात सामाजिक विधानाची मशाल हवीच. सुरुवातीला वापरलेल्या वर्तमान पत्रांच्या हेडलाईन्स , १९९२ च्या आर्थिक उदारीकरणाची आकाशवाणी वरची बातमी, सोव्हिअत विघटनाचा संदर्भ आणि चित्रपटात सतत काहीतरी बदलतंय, कुरूप होतंय असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोसा करणारी पात्रे. सस्पेन्स मुळातच फारसा बनत नाही. कदाचित मी जॅक निकोल्सन चा 'चायना गेट' किंवा 'मनोरमा-सिक्स फीट अंडर' पहिल्याने मला मुळातच सस्पेन्स प्रेडिक्टेबल झालं असावं. पण एकूण थेटराचा माहोल बघता मानगुटीवर बसणारी गोष्ट बनतच नाही. आणि जे काही बनलं असतं ते आर्ट हाउस चित्रपटाच्या नादात लांबट आणि कंटाळवाणं झालंय. छाया-प्रकाशाचा खेळ, फ्रेम्सचा बदलता वेग, चांगलं छायाचित्रण ह्या गोष्टी म्हणजे सिनेमा नाही. सिनेमा म्हणजे गोष्ट, इट इज स्टोरीटेलिंग आणि तिथे फसलय.
२: मग हा चित्रपट का बनवला? मला वाटतं की ज्याच्या कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली त्याने तिला पुरेसा वेळ दिला नाही. चित्रपट बनवणाऱ्याने दरवेळी बघणाऱ्याना काय हवं असा विचार केला तर फारसं नवं काही होणार नाही. रोहित शेट्टी, डेव्हिड धवन, भट्ट कॅम्प येत जात राहतील. पण मुळात काहीतरी सांगण्यासारखं हवं, छोटंसं का होईना. आणि तेच नाहीये. आर्थिक उदारीकरण आलं, पैसा आला आणि माणसे बदलली. त्या बदलात  एका स्वतःला आवडेल ते करत जगू पाहणाऱ्या प्रांजळ, प्रामाणिक माणसाची वाईट अवस्था झाली. ही गोष्ट नाही. हा निष्कर्ष आहे. चित्रपटात गोष्ट जाते पार्श्वभूमीला आणि निष्कर्ष सतत मांडण्याचा प्रयत्न केला जातो. बालक-पालकने फारसं काही नसलेली गोष्टही तिचे तपशील रंजकपणे मांडत लोकांना आवडेल अशी केली आहे. (भारतमाता थिएटरला खून पडावा एवढे लोक आले बालक-पालकला!.) गोष्ट खुमासदार हवी, रंजक हवी असं नाही. सामाजिक बदलाच्या, त्यात व्यक्ती, तिचे विचार, इच्छा आणि वागणं हे परस्पर विरुद्ध जाण्याच्या गोष्टी सांगणारे पिक्चर आहेतच की. पण मग तिथे सस्पेन्स स्टोरी दाखवत नाहीत.
३. ए रेटिंग. का? कारण २ किसिंग सीन आणि एक अंशात्मक सेक्स सीन. आणि तेही, अगदी केवळ त्या सीन्सचा विचार केला तरी वाईट. आणि सेक्स चालू आहे हे दर्शवणारा जो आवाज वापरला आहे तो तर वाह्यात वाटेल असा. सई ताम्हणकर आणि गिरीश कुलकर्णी हे दोघेही, बाकीचे नंतर हे बघतील तर काय म्हणतील, अशा तऱ्हेने हे सीन्स करतात. जोगवा मधल्या उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वेच्या किसिंग सीनला जे टायमिंग आणि पार्श्वभूमी आली आहे ती तर नाहीच. सुरीने गाऊन चा खांदा टरकावणं तर जाम जमलेलं नाही. असे सीन मराठीत फार होत नसावेत. पण 'सामना' चित्रपटातला श्रीराम लागू आणि (मी चुकत नसेन तर) लालन सारंग ह्यांचा प्रसंग आहे, तो आठवा. आणि पुणे ५२ ला ए रेटिंग म्हणजे बालिशपणाची हद्द आहे. एकीकडे १९८६ मध्ये २ मुलं आणि २ मुली मिळून पोर्न बघतात असा बालक पालक यू/ए रेटिंग घेतो. विचार करा की एक जोडपं आणि त्यांचा ६-७ वर्षाचा मुलगा किंवा मुलगी बालक-पालक बघतायेत, दोन्ही पालक शनिवारची लोकसत्ताची चतुरंग पुरवणी वाचणारे आदर्श पालक आहेत. आणि त्यांचा हुशार, चुणचुणीत मुलगा किंवा मुलगी त्यांना बालक पालक बद्दल प्रश्न विचारत आहे. ए रेटिंग हे जर चित्रपट पाहून वयोमानानुसार घडू शकणाऱ्या परिणामांसाठी असेल तर बालक-पालक ए रेटिंगला हवा. आणि जर तो यू/ए असेल. आणि आपण लैंगिक शिक्षण, सेक्स बाबतचा खुलेपणा असं काही म्हणत असू तर २ चुंबन दृश्ये, आणि १ अंशात्मक सेक्स सीन हे जर ए रेटिंग घेत असतील तर गडबड आहे.
असो.
साठा उत्तरांची मळमळ पाचा उत्तरी निष्फळ अपूर्ण!!                 

दिठी, क्लोजर आणि शोकाचा सामूहिक खेळ

सुमित्रा भावे ह्यांच्या निधनाच्या बातमीनंतर ‘दिठी’ चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झालेली, कितीही कोडगी वाटली तरी अशी बाब आहे. पण मला तो चित...