Friday, February 1, 2013

ग्रेटर एलिफंट

        हा चित्रपट आहे, हिंदी. तुमच्यापैकी काही जणांनी ऐकला असेल, आणि बऱ्याच जणांनी नाही. मला पण काहीच माहिती नव्हतं. पण माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचा चित्रपटाच्या निर्मितीत बराच भाग आहे. तिने सांगितलं म्हणून आम्ही काही मित्र गेलो पिच्चर बघायला.
       एक जण तर मध्येच झोपून गेला. मी आणि उरलेला एक असे आम्ही मध्ये मध्ये कंटाळत पाहिला. इंटर्वल नाही, ९० मिनिटांचा पिक्चर. खूप फ्रेश टायटल सॉंग आणि तुम्हा आम्हाला दिसणाऱ्या वास्तविकतेत खोचलेली एक संपूर्ण फिक्शन. संपूर्ण. क्लीशेड, जाणीवपूर्वक क्लीशेड. जे चाललंय त्यावर उपरोध करणारी आणि काहीवेळा स्वतःचा रस्ता पकडणारी. अशी फिक्शन पाहणं ही एक वेगळी गोष्ट असते. एकदा मी असंच बऱ्याच मोठ्या ग्रुप सोबत 'वेटिंग फॉर गोदो' पाहायला गेलो होतो. हे जागतिक रंगभूमीवर गाजलेलं नाटक आहे, त्याला पोस्ट-मॉडर्निस्ट, अॅबस्ट्रॅक्ट ड्रामा वगैरे म्हणतात असं. सुमारे दोन तास आणि थोडा जास्त हा प्रयोग चालतो. नसरुद्दिन शाहने काम केलं होतं. म्हणाल तर चार ओळींची गोष्ट, म्हणाल तर खूप खोल काही दर्शवू शकतील अशी. तो प्रयोग संपवून बाहेर पडताना बहुतेक जण 'काय होतं हे' अशा अवस्थेत होते.
        काही गोष्टी, म्हणजे चित्रपट, पुस्तकं जबरदस्त हिट करतात. कशामुळे होत असावं असं? अभिनय, गोष्ट, आपल्या आजूबाजूच्या जगातली झपक्कन अंगावर येणारी एखादी गोष्ट, सादरीकरण. काहीवेळा तर संपूर्ण पिक्चर किंवा पुस्तक डोक्यात जात नाही, एखादा तुकडा डोक्यात अडकून राहतो.
       'वॉल्ट्झ विथ बशीर' चा शेवट, जिथे अॅनिमेटेड असणारा पिक्चर एकदम खऱ्या, अंगावर शहारे आणणाऱ्या फोटोग्राफवर संपतो.
       'ग्रेप्स ऑफ रॅथ' किंवा 'कॅनरी रो' चे शेवट. अगदी 'मायकेल क्लेटन' चा शेवट. ग्रेटर एलिफंटला असा शेवट जमला आहे, अगदी पूर्ण नसेल तरी बराच आणि त्यामुळे आधीच्या ९० मिनिटात जे काही वाटू शकतं ते सारं पालटून एका प्रश्न पडणाऱ्या सुखद अवस्थेत ग्रेटर एलिफंट संपतो.
   स्तुती करण्यासारखं अजूनही काही आहे चित्रपटात. अभिनय, जो मुद्दामून थोडासा नाटकी वाटावा अशा धाटणीने करून घेतला आहे कदाचित. गाणी, वेगळी, साधी, फ्रेश. गोष्ट, जी वास्तवाच्या तीरावरून फिक्शनची जोरदार छलांग घेते. आणि पुण्यातलं शूटिंग!! (बोला हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, हे हे....) आणि बराचसा जाणीवपूर्वक वेगळं रहायचा प्रयत्न. म्हणजे पात्रांचे संवाद, त्यात मध्येच पटकन न समजणारं वेगळं काहीतरी. बरेच शब्द आहेत अशा प्रयोगांना, समांतर, प्रायोगिक, त्यांच्या व्यक्ती तितक्या व्याख्याही. पण ग्रेटर एलिफंट एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो. छोटी, तशी दुर्बळच. पण केवळ वेगळं काही दाखवावं असा 'टोकदार भाष्याचा' अट्टाहास वाटत नाही. येणाऱ्या वेगळेपणात आधी प्रयत्नपूर्वक वाटणारी, पण नंतर जमलेली सहजता आहे.
   मला पडणारा प्रश्न तर नेहमीचा आहे. का बनवतात चित्रपट? एक- खाज म्हणून. दोन- धंदा म्हणून. चित्रपट का बघतात? एक- नोकरी, धंदा, कुटुंब कबिला, प्रेम वगैरे करताना बहुतेक जण करतात असे मनोरंजन आपणही करू म्हणून. म्हणजे जसे बागेत जातात तसे थेटरात. हसा, गुद्दागुद्दी किंवा प्रणय पहा, संपला की घरी या. टिश्यू पेपर फेकावा तसं मनोरंजनाची किंवा पैसे वाया गेले वगैरेची बेगडी ढेकर देऊन फेकून द्या.  दोन- खाज म्हणून. प्रश्न पडावेसे वाटतात म्हणून.
   पिक्चरच्या मध्ये झोपलेला माझा मित्र शेवटी म्हणाला, 'ये तो क्रिएटिव्ह मास्टर्बेशन हुआ' ..
   असेल, त्यांना करताना जाम मजा आली असेल. किंवा त्यांनी करून संपवलं असेल, ठाऊक नाही.  मला बघताना मजा आली, थोडा कंटाळाही जो शेवटी निघून गेला होता. आणि माझ्या प्रश्नाच्या उत्तराची एक बाजू मला परत दिसल्यासारखी वाटली, आपण काहीही करतो ते आपल्याला मजा येण्यासाठी. दॅट इज ग्रेटर एलिफंट.      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...