Saturday, February 2, 2013

मिडनाईटस् चिल्ड्रेन: बराचसा पोकळ सौन्दर्याविष्कार

    काल रात्री झोपताना 'डेव्हिड' बघावा का 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' अशा द्विधा मनस्थितीत झोपी गेलो. उठलो तेव्हा ९.१० वाजलेले. १०.१५ चा ९० रुपये तिकिटात पाहता येणारा 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' पहायला गेलो. ३० एक जण चित्रपट बघायला होते. त्यात दोन ७-८ जणांचे ग्रुप, बाकी नवरा बायको, मित्र-मित्र प्रकारचे काही. माझ्या शेजारच्या सीटवर मिलिंद शिंदे.
     मी जवळपास ४ वर्षामागे जेव्हा सिरीअसली वाचायला लागलो तेव्हा वाचलेली पाहिली कादंबरी 'मिडनाईटस् चिल्ड्रेन'. तेव्हा त्यातला मॅजिकल  रिअॅलिझ्म' खूप वेगळा वाटला होता. आणि मुख्य थीम, १५ ऑगस्ट १९४७ च्या रात्री, १२ ते १ च्या दरम्यान जन्मलेली मुले. त्यातला एक , एकदम १२ च्या ठोक्याला जन्मलेला कथानायक. त्याची गोष्ट. खरंतर १९४७ ते १९८० या काळातला भारताचा इतिहास. रश्दींनी १९८१ साली ही कादंबरी लिहिली. म्हणजे ३२ वर्षांपूर्वी. मला ही कादंबरी आवडली. त्यानंतर मध्यपूर्वेतल्या इतिहासावर आधारित रश्दींची एक फिक्शन मी वाचायचा प्रयत्न केला होता. पण ती फिक्शन इतिहास, फिक्शन आणि सेक्स यांत जाम फसून गेली आहे. मग मी ती अर्धवट सोडून दिली. 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' मात्र लक्षात राहिली. म्हणजे तपशील तसे ढासळत गेले. पण मुख्य थीम, रश्दींची वास्तविकतेला जादुई अस्तर देऊन सांगण्याची बेमालूम हातोटी, आणि सुमारे ३३ वर्षांचा एका देशाचा इतिहास, कोरडा, रुक्ष नाही, तर त्या इतिहासाशी बांधलेल्या काही माणसांच्या आयुष्यातून पडलेले त्या इतिहासाचे कवडसे.
    दीपा मेहता यातल्या फार काही दाखवू शकलेल्या नाहीयेत असं म्हणावं लागेल. चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणजे कथा नायकाच्या जन्माच्या अगोदरची पार्श्वभूमी मांडताना चित्रपट फारच वेगाने सरकतो. म्हणजे कसलीच मजा येत नाही, अनुपम खेरने साकारलेला काश्मिरी खानदानी सोडला तर. चित्रपट थोडा स्थिरावतो तो अहमद सिनाई आणि अमिना सिनाई मुंबईत येतात तिथपासून.
    खरंतर इतक्या मोठ्या आवाक्याच्या फिक्शनवर चित्रपट काढणं ह्याला काय म्हणावं? मला स्वतःला चित्रपट हा कथा या प्रकारच्या जवळ जातो असं वाटतं. म्हणजे प्रेक्षक किती वेळ चित्रपट पाहू शकतो, अगदी तीन तास म्हटलं तरी, फार मोठा कालखंड चित्रपटात घेणं हे धाडस आहेच. अनुराग कश्यपने 'वासेपूर' मध्ये ते केलंय. पण तिथे हा फार मोठा कालखंड प्रामुख्याने एका छोट्या शहराभोवती फिरतो, त्यात बिहारचे, भारताचे संदर्भ नाहीत असं नाही, पण ते पार्श्वभूमीला. 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' कादंबरीत जी खोली आहे, त्यात वास्तविकता आणि जे सांगायचं आहे त्याच्या सोयीसाठी घेतलेला जादुई वास्तववाद यांचं जे मिश्रण आहे ते तसं, किंवा अगदी थोडं बदलून का होईना पडद्यावर आणणं हे तसं तर वेडं धाडस. दीपा मेहतांनी ते केलं आहे, तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीत , स्वतः सलमान रश्दी यांचा आवाज अशा अनेक बाबतीत ते सुंदर आहे. पण चित्रपट संपताना, कादंबरी जशी अपुऱ्या स्वप्नांच्या जखमेची, आणि तरीही पुन्हा नव्याने स्वप्न पाहणाऱ्या मानवी स्वभावाची किंवा अपरिहार्यतेची रुखरुख लावून संपते तसा चित्रपट संपत नाही.
     चित्रपट बघायला जे दोन ग्रुप आले होते त्यात कोणी बहुतेक मूळ कादंबरी वाचली नव्हती. चित्रपट तंतोतंत मूळ कादंबरीवर घेतलेला नाही, पण मूळ कादंबरीचा ढाचा सोडलेलाही नाही. तर हे दोन्ही ग्रुप शेवटला, जेव्हा आणीबाणीच्या कैदेतून बाहेर आल्यावर सलीम सिनाईला त्याच्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टी योगायोगाने परत मिळतात त्यावेळी हसत होते. मला गंमत वाटली आणि त्याचवेळी दिग्दर्शक फसला याची पावतीही. ते हसले कारण युद्ध, आणीबाणी अशा गंभीर गोष्टींबाबत बोलणाऱ्या चित्रपटात एक क्षुल्लक योगायोग कसा काय घडू शकतो यामुळे? आणि त्या योगायोगामुळे चित्रपट एकदम आशावादी, भावनिक शेवटाला जाऊन संपतो. असं कुठेही वाटत नाही की तो योगायोग काहीतरी जे सांगायचं आहे त्याच्यासाठीच आवश्यक हिस्सा होता. कादंबरी वरून एकदम दैवी कृपेने डोळे येणाऱ्या हिंदी पिक्चर वर उडी येते आणि खास आशावादी डोस देऊन सम्पेश.
     रश्दीना 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' मधून नेमकं काय सांगायचं होतं हे त्यांनी लिहिलेलं मी वाचलेलं नाही. पण मला वाटतं की 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' हा १९४७ ते १९८० दरम्यानच्या एका नव्याने राजकीय अस्तित्व घेणाऱ्या देशातल्या, ह्या नव्या पर्वात जन्मलेल्यांचा, विशेषतः त्यातल्या संवेदनशील गटाच्या अनुभवांचा प्रवास आहे. सलीम सिनाईला आवाज ऐकू येतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येतात, ते या संवेदनशील मनावर त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे उमटणारे घाव, ठसे किंवा स्पर्श आहेत. रश्दींनी ही संवेदनशीलता बेमालूमपणे फिक्शनलाईझ केली आहे. आणि ही संवेदनशीलता सामाजिक आणि वैयक्तिक अशा दोन कधी एकमेकांसोबत जाणाऱ्या तर कधी एकमेकांना कापत जाणाऱ्या प्रवाहांतून जाते. एक आहे सलीम सिनाईचे आयुष्य, त्याचे, स्वतःचे. आणि दुसरे आहे ते नेहरूंच्या 'नियतीशी करार' मधून जन्माला आलेल्या, या देशात जगणाऱ्या माणसांच्या जीवनाची जवळपास सारी अंगे बदलण्याच्या, आधुनिक होण्याच्या स्वप्नांचे आयुष्य. आणि हे स्वप्नांचे आयुष्य राजकीय पटलावर एखाद्या फाश्यासारखे खेळते आहे.
    भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास म्हणजे आपल्याला नेमकं काय ठाऊक असतं? मला वाटतं शाळेत मला इतिहास शिकवला त्यात प्रामुख्याने शिवाजी महाराज आणि भारतीय स्वातंत्र्य लढा यांच्यातल्या रोचक गोष्टी होत्या आणि तपशील. गोष्टी आवडायच्या आणि तपशील कंटाळवाणे वाटायचे. प्रश्न होते, पण ते मुद्देसूद लांब उत्तरांचे जी पाठ करायची होती. पण इतिहासात भूगोल नव्हता, अर्थशास्त्र नव्हतं, सामाजिक प्रश्न तोंडी लावायला होते. सगळं वेगवेगळया पुस्तकांत विभागून ठेवलं होतं. आणि ही पुस्तकं यशस्वी आयुष्याच्या प्रवासात रद्दी होती हे शिकवलं जात होतं. पुढे मी भरकटलो ही बाब अलाहिदा. मागच्या वर्षी रामचंद्र गुहांचा 'इंडिया आफ्टर गांधी' वाचताना कितीतरी गोष्टी नव्या कळत गेल्या, नवे प्रश्न आले, अनुत्तरीत.
   आज चित्रपट पाहून निघताना असे प्रश्न आठवले नाहीत असं नाही. दीपा मेहतांनी इंदिरा गांधी, आणीबाणी हा भाग दाखवताना प्रतीकात्मकता जबरदस्त वापरली आहे. आणि कथा नायकाच्या आयुष्यातून, १९८० साली देशभर जाणवत असेल असं ३३ वर्षांचं फसलेपणही आलं आहे. आज २०१३ साली, आर्थिक उदारीकरणाची २० वर्षे भोगल्यावर त्याचा चटका हवा तेवढा मला बसला नाही कदाचित. माझ्या सोबत बघणाऱ्यानाही बसला नाही बहुतेक.
   तरीही चित्रपट बघावा असा आहे. तो दृश्यात्मकरित्या सुंदर आहे. दर्शील शेफारी आणि सत्या भाभा दोघांनीही ताकदीने काम केलं आहे. सिद्धार्थ त्याच्या निगेटिव्ह रोलमध्येही जमला आहे, आणि पार्श्वसंगीत तर सहीच. पण ह्या सगळ्या सुंदर गोष्टींच्या आत टोचणारं, डाचणारं फार काही मिळत नाही एवढंच.
   टोचणारं, डाचणारं मिळायला हवंच असं नाही. पण ज्या मूळ गोष्टीवर आधारित ही निर्मिती आहे, त्या गोष्टीत, त्या काळात ही फसगत आहे. माणसांच्या आयुष्याचे जवळपास सारे कप्पे व्यापू पाहणारी सरकार नावाची व्यवस्था, त्या व्यवस्थेच्या ताकदीच्या जवळ जाण्यासाठी होणारी धडपड आणि त्या व्यवस्थेचा गदारोळ. भारतातून गरिबी, अज्ञान, रोगराई आणि संधींची विषमता नष्ट करण्याचे स्वप्न कुठे होते? स्वप्न होतेच, त्याचेच गाजर दाखवून निवडणुका लढवल्या जात होत्या. आणि त्या स्वप्नासाठी उभारलेली सरकार नावाची व्यवस्था, वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी राबवली जाणारी राक्षसी यंत्रणा बनते आहे हे वैफल्य.
   आज हे वैफल्य तितकं नसेल. कारण संवेदनशील मन ज्यांच्यात असू शकतं असे बहुतेक मेंदू आणि पोटे आज संपन्नतेच्या इन्क्युबेटरमध्ये आहेत. प्रश्न आहेत, मांडलेही जात आहेत. गरिबी हटली असेल, संधी नक्कीच विषम आहेत. पण या वास्तविकतेकडे पाहू शकणारी संवेदनशीलता आणि वास्तव ह्याच्यामध्ये माध्यमांची काच आहे. ती दाखवते, अगदी भेसू  असंही काही दाखवते, दाखवून दाखवून नम्ब करते. काचेच्या पलीकडे जे चालू आहे ते चालूच रहातं.सरकार आहेच, आणि जोडीला जी.डी.पी.चे गाजर आलं आहे. गंमत म्हणून वाटतं ,२०२५ साली, 'लिबरलायझेशन्स चिल्ड्रेन' लिहिलं जाईल तेव्हा काय असेल?                       

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र  प्रकाशन , ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच ‘ विद्येच्...