Wednesday, February 6, 2013

डेव्हिड: सनिमा, शेंदूरी दगड आणि गोंधळी प्रयोग

    बिजोय नंबियारचा 'शैतान' मला आवडला होता. माणसाची स्वाभाविक नकारात्मक बाजू, त्याला मजा देऊ शकणारे आसुरी आनंद. नियम तोडायची, संकेत मोडायची उर्मी. 'शैतान' खूप डार्क नव्हता. पण वेगळा नक्की होता. असं ऐकलं होतं की अनुराग कश्यपला अगोदर 'पांच' नावाचा चित्रपट प्रदर्शित करायचा होता जो पुण्यातल्या कुप्रसिद्ध 'जोशी-अभ्यंकर' प्रकरणावर आधारित होता. पण सेन्सॉर बोर्डाच्या दृष्टीने तो फारच होता. तो कधी खुलेआम प्रदर्शित झाला नाही. मग पुढे अनुराग कश्यपने 'शैतान' ची निर्मिती केली.
    शैतान मधले काही प्रसंग आठवतात. एक जेव्हा शिव पंडित, चित्रपट दुष्यंत साहू, रस्त्यावर असलेल्या कडक लक्ष्मिवाल्याला बघून स्वतःचा बेल्ट काढतो आणि बेभान मारून घ्यायला लागतो. दुसरा जेव्हा के.सी. त्याच्या मैत्रिणीशी फ्लर्ट करणाऱ्याच्या डोक्यात टी.व्ही., का काहीतरी टाकतो आणि हसतो. नंतर जेव्हा किडनॅप करून पैसे मिळवायचा प्लॅन फसत जातो आणि त्यांचा ग्रुप खिळखिळा होत जातो तेव्हा एका भांडणाच्या प्रसंगात कल्कीचा थंड चेहरा. 'खोया खोया चांद' चं रिमिक्स तर अफलातून. खरंतर मी त्याच्यासाठी दोनदा पाहिला पिक्चर. चित्रपटात नसलेलं 'हवा हवाई' पण सही होतं. कदाचित राजीव खंडेलवाल च्या साईड स्टोरीने चित्रपटाचा डार्कनेस कमी झाला. कदाचित थोड्याफार व्यावसायिक यशासाठी ते जरूरीपण होतं. आणि राजीव खंडेलवालने विस्कळीत आयुष्याच्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली पण आहे चांगली.
   'डेव्हिड' चे ट्रेलर लक्ष वेढून घेत होते ते नील नितीन मुकेश आणि 'दमा दम मस्त कलंदर' ने. नील नितीन मुकेशचे मी बघितलेले चित्रपट म्हणजे 'जॉनी गद्दार', लफंगे परिंदे, आणि आत्ता डेव्हिड. मला काहीवेळा उगाच हॉलीवूड आणि बॉलीवूड मधले काही अभिनेते एकमेकांशी जुळणारे वाटतात, म्हणजे अमीर खान आणि टॉम हॅंक्स आणि आता नील नितीन मुकेश आणि रायन गोस्लिंग. रायन ग्सोलिंग ची 'ड्राईव्ह' 'आयरिस ऑफ मार्च' किंवा 'गॅंगस्टर स्क्वाड' मध्ये असलेली थंड, मितभाषी अभिनयाची शैली आणि नील नितीन मुकेशचा 'डेव्हिड' मधला १९७५ लंडनचा डेव्हिड हे खूप मिळते जुळते आहेत. विक्रम ने केलेला २०१० चा गोव्यातला डेव्हिडही छान आहे. मुंबईत घडणारी स्टोरी मला घीसीपिटी वाटली. पण जॉन विजय आणि रोहीणी हत्तंगडी यांनी त्यातही छोटे पण सबळ रोल केले आहेत. मुंबईत घडणाऱ्या गोष्टीतले संवाद फार पुस्तकी शैलीतले आहेत. नीलम आणि डेव्हिड ह्यांच्यात होऊ शकणारी गोष्ट खूप अर्धवट संपते, पण बरोबर आहे ते कदाचित.
   लक्षात राहणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे लंडनच्या गोष्टीत वापरलेला ब्लॅक अन्ड व्हाईट. ह्या दोन रंगानी त्या गोष्टीला खोल परिमाण लाभलं आहे. आणि मर्यादित बाह्य दृश्यांनी सुद्धा ३८ वर्ष जुन्या काळाचा परिणाम बनला आहे. पात्रांची निवड, त्यांना दिलेले वेश, मेकअप, संवाद आणि तीन गोष्टींचे तुकडे सांधतानाही परिणामकारकपणे सांगण्यात आलेली गोष्ट म्हणून लंडनचा डेव्हिड लक्षात राहतो.
  दुसरी गोष्ट चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एकदा येणारं 'गुम हुये' आणि मध्ये येणारं 'युंही रे'. चित्रपटाला एकच एक संगीतकार नाही, तर ५-६ जणांची मोटली आहे. 'गुम हुये' हा तर ट्रांस प्रकारच्या जवळ जाणाऱ्या संगीताचा चांगला नमुना आहे. थेटराच्या अंधारात, ब्लॅक अन्ड व्हाईट मॅजिक मध्ये तर हे गाणं जाम भन्नाट वाटतं. रेमो फर्नांडीसनेही चांगली गाणी दिली आहेत. सतीश कौशिकचा भुताळी बापही सही आहे.
    एक वैयक्तिक सूडकथा, एक सामाजिक-वैयक्तिक टिपिकल भोंदू राजकारणी आणि सच्ची माणसे अशी आजकालची आवडती मेणबत्ती संघर्षकथा आणि एक बऱ्यापैकी हलकी फुलकी विनोदी कथा अशा तीन गोष्टी एकत्र आणणं हे कठीण आहेच. आणि त्यात त्या एकमेकांशी जोडणं तर त्याहून. त्यामुळे त्या एकमेकांशी जोडताना जेनेटिक साधार्म्याच्या किंवा तीव्र हृदयपरिवर्तनाच्या दिग्दर्शकीय उड्या मारल्या गेल्या आहेत त्या अपरिहार्यच आहेत. ह्या गोष्टी जोडायलाच हव्या होत्या का हाही प्रश्नच आहे, पण त्या जोडलेल्या असतात, असायला हव्यात हे तर आधीपासून  जाणवतच होतं एकप्रकारे. तब्बू आणि विक्रम यांची दाखवलेली निरागस मैत्री हा अशा शेवटातही लक्षणीय भाग आहे.
  तर हा झाला अशा प्रकारचा वर्तमानपत्रीय रिव्ह्यू. आपले स्टार्स वगैरे काही नाहीत बरं. हा तर माझा लिखाणाच्या सरावाचा उद्योग आहे किंवा मळमळ. खरेतर एकूणच कला किंवा निर्मिती ह्या प्रकाराबाबत मला काही गंमतीशीर गोष्टी वाटू लागल्या आहेत.
१. निर्मितीच्या, म्हणजे आपण काय दाखवू, चितारू, लिहू शकतो ह्याच्या शक्यता मर्यादित आहेत. छटा असतील अनेक, पण त्या कळण्याची कुवत मर्यादित आहे. त्यामुळे तुम्ही सलग दोन एक वर्षे जगातील वेगवेगळे चित्रपट पाहिले की तुम्हाला बसणारा धक्का खूप कमी होतो. तुम्ही आपोआप चित्रपट प्रेडीक्त करू लागता. हे तसं कुठल्याही सुखाशी होत असावं.
२. तरीही लॅपटॉपच्या १७ इंची पडद्यात आणि थेटराच्या अंधार आणि मोठ्या पडद्यात खूप फरक असतो. थेटराचा पडदा, आवाज तुम्हाला खेचू शकतो. लॅपटॉपवर असं होणं म्हणजे फारच!! म्हणजे बघणारा विपश्यी साधूच हवा किंवा जे चाललंय समोर ते जाम पॉवरफूल . मी पामर काय नेणे...
३. मनोरंजन हा कितीही म्हटलं तरी माझ्यालेखी चित्रपटाचा आवश्यक भाग आहे. चित्रपट का बनतात, चित्रं का काढली जातात, गोष्टी का लिहिल्या जातात, कविता का लिहिल्या जातात या प्रश्नांना करणाऱ्याची खाज हे उत्तर असेल. पण जेव्हा ह्या गोष्टी थेटरात, दुकानात, प्रदर्शनात ठेवल्या जातात तेव्हा प्रतिसाद हा अविभाज्य भाग बनतो. आणि हा प्रतिसाद केवळ कलेची दाद नाही तर पैसे म्हणूनही हवा असतो. मला तर वाटतं की कलाकाराचेही दोन टप्पे असतात. आर्थिक सुबत्तेच्या आधीचे आणि नंतरचे. आर्थिक सुबत्तेच्या आधी कलाकार एकटा, प्रयोगशील असेल. आर्थिक सुबत्ता, सोबत येणारी प्रसिद्धी आणि त्याच्या निर्मितीला, खरंतर त्या निर्मितीत जे लोकांना आवडलंय त्याला मिळणारी दाद हे सगळं आल्यावर आता जे हिट झालं ते पुढे चालू ठेवायचं, सातत्य आणायचं का परत सगळं झुगारून नव्या शोधात जायचं हा पेच आहे. आणि ह्यात काही दोष नाही. पोट भरून जगावसं वाटणं ही काहीतरी करावसं वाटण्याएवढीच मुलभूत गोष्ट वाटते मला. आणि मग आपल्या निर्मितीला जेव्हा प्रेक्षक, वाचक, बघे यांच्या गर्दीत उतरवलं जातं तेव्हा कलेला दाद मिळावी ह्याबरोबर किंवा याहून अधिक तिला आर्थिक दादही यावी असं असणारच. आणि हे दाद केव्हा येऊ शकते? जेव्हा समजेच्या, जाणीवेच्या साऱ्या स्तरांची सरमिसळ असलेला, आणि सरासरी वकूबाचा समाज त्या निर्मितीला स्वीकारेल. आणि तो स्वीकारेल जेव्हा त्याची मनोरंजनाची गरज भागेल. सरासरीमध्ये सौंदर्य आणि मनोरंजन ह्या दोन गोष्टी एकमेकांत जाम गुंततात असं मला वाटतं. सौंदर्याची जाणीव ही खोल आहे, आणि तिच्या पूर्तीसाठी कंटाळा स्वीकारायला हवा, वाट बघायला हवी. पण मनोरंजांची भूक अधिरी आहे. तिला चटकन येणारे समाधान हवे. हा म्हणजे लक्ष्मणची बॅटिंग आणि सेहवागची यातला फरक झाला. माझ्या स्वतःकरता चित्रपट, पुस्तक हे मनोरंजन आहे आणि सौंदर्यही. पण प्रेक्षक म्हणून माझी मनोरंजनाची निकड जास्त आहे तर लिहिणारा म्हणून सौंदर्याची.
४. काल २७०-३०० क्षमतेच्या चित्रपट गृहात ३०-४० लोक चित्रपट बघायला होते. काहीवेळा मला हा परदेशी आधुनिक निर्मिती कंपन्या, जाहिराती, महाग तिकिटे असलेले मॉल असा नवा डोलारा फार अस्थिर वाटतो. म्हणजे भारतीयांची चित्रपटांची भूक आणि त्याचवेळी पैसे वाचवण्याची अनुवांशिकता ही ओळखण्यात काहीतरी गोंधळ वाटतो मला. म्हणजे समजा आता 'डेव्हिड' चित्रपट बनवायला 4-5 करोड तरी खर्च आला असेल. आणि हा चित्रपट जास्तीत जास्त दोन आठवडे टिकेल. कालचा शो तर स्वतात होता. सरासरी शोचे तिकीट १५० पकडू. आणि ६० लोक येतात असं. झाले ९०००. समजा असे २५ शो झाले. झाले २२५०००. ही झाली पी.व्ही.आर. ओबेरायसारख्या उच्चभ्रू ठिकाणाची कमाई. पी.व्ही.आर. भारतात ४५ ठिकाणी आहे. असे अजून जे काही आहेत ते पकडून असतील २००. समजा अशा सगळ्यांचा गल्ला आहे ५ करोड. छोटी थेटरं असतील अजून ५००, पण तिथे गल्ला अजून कमी असेल. तो समजा २ करोड. हा फायदा मला फारसा वाटत नाही. अर्थात ही फार तकलादू मांडणी आहे. मुद्दा असा की असं होऊ शकतं की काही दिवसांनी मनोरंजन उद्योग जरा कोलमडेल आणि टिपिकल हिंदी चित्रपटच जास्त येतील. हे काही वाईट नसेल, पण..                    
     असो, डेव्हिड च्या दगडाला शेंदूर लाऊन केलेला ह्या गोंधळी प्रयोगाचं चांगभलं हो....

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...