Thursday, February 7, 2013

हिंदी त्रिकोणी सिनेमाला दिलेली आवडती मराठी भाबडी आदर्शवादी फोडणी: प्रेमाची गोष्ट

    भलतीच चांगली माणसं ,भलतेच आदर्श सुवचन पद्धतीचे संवाद आपल्याला झेपत नाहीत. उदाहरणार्थ 'पटत नसेल (म्हणजे अशा अर्थाचे आदर्श शब्द बरं का) तरी एकत्र राहिलं तर संसार होतो, पण सहवास नाही.' मला हे झ्याट (चालायचंच!)  कळलेलं नाही. अशा पद्धतीचे संवाद माझ्या पालकांत आणि माझ्यात झालेले नाहीत म्हणून असेल कदाचित. अर्थात माझे पालक लोकसत्ता शनिवार चतुरंग पुरवणीतले नसल्याचा हा दुष्परिणाम असावा. पण त्यामुळे मला 'प्रेमाची गोष्ट' जाम आवडलेला नाही, काही गोष्टी वगळून अर्थात.
      आता आपण काही फंडामेंटल सवाल पाहू.
१. साधारण ३०-३५ ची दिसणारी, एक आणि दोन घटस्फोट झालेली माणसे किती वेगाने एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात?
२. आपली एक आदर्श शैक्षणिक समजूत आहे की शिकवणाऱ्याने शिकणाऱ्यावर जाम विश्वास ठेवला की शिकणारा वाट्टेल ते शिकू शकतो. उदाहरणार्थ माझ्यावर माझ्या चित्रकला शिक्षकांनी विश्वास ठेवला असता तर आज मी सहज स्केचेस वगैरे काढली असती. किंवा समजा मी उद्या टेनिस क्लास लावला आणि जर तिथला कोच, जमेल तुला, जमेल, असं (विथ बाकी समजूतदार वाक्य) बगैरे सांगत राहिला तर दोन-चार एस, दोन-चार ड्रॉप तर कुठेच नाहीत. सगळ्यांत सगळी क्षमता असतेच. त्यामुळे वर्ड, एक्सेल, टॅली येत असेल आणि तुम्ही एका समजूतदार पटकथा लेखकाकडे असाल तर तुम्ही आठवड्याभरात पटकथा लिहू शकता? (असेलच. उगाच का एवढे सनिमे येतात?)
३. अपार ठासून भरलेली नैतिकता हा एक सहज आढळणारा सद्गुण आहे. आता आपण ही नैतिकता एका घटस्फोटीत आदर्श पुरुषाला लावू. बायकोला घटस्फोट घेऊ द्यायचा आणि त्याचवेळी ती परत येईल असा अपार विश्वास ठेवायचा. जबरदस्त भाषणीय शब्दांत समोर बसलेल्या अपरिचित व्यक्तीला तो सांगायचा. मग कथा लिहायच्या. त्यातली एक कथा, त्यात एक प्रेम त्रिकोण (ही एक वेगळी कथा आहे बरं! अशा कथा झालेल्याच नाहीत!!) आणि मग आपणहून पडून जाणारा त्रिकोणाचा एक बिंदू आणि मग उरलेल्या दोन बिंदूंची सात्विक समाधानी गट्टी (पडलेल्या बिंदूच्या कृतज्ञ विस्मरणासह). हेच प्रेम. बरं हे भलतंच टिकाऊ प्रेम. लग्न संपलं तरी नातं उरतंच, नातं संपलं तरी प्रेम. असं?
४. काही संदर्भांचे फ्लो. वाईन पिणारी, डिस्कमध्ये नाचणारी, बहुतेक एकटी राहणारी मीरा जोशी, हातातला चीज सदृश्य गड्डा खिसून म्हणते 'पानं घेऊ? म्हणजे एकदम उंच माझा झोकाच झालं माझं. (असो. संस्कार टिकतात ते असेच हो!!) मुंबईचा समुद्र किनारा म्हणून अलिबाग? राम सुब्रमण्यम यांच्या आई सतत एवढ्या तयारीत का असतात? असो. मज वाचाळाला क्षमा असावी.
  आता काही जमेच्या बाजू
१. अतुल कुलकर्णी यांचा चेहरा, विशेषतः पहिल्याच प्रसंगात.
२. गोष्टीत घडत जाणारी गोष्ट ही थीम.
३. सोनलने रामला केलेलं हग, उर्फ मिठी.
४. योगायोग्स  
आता काही हातच्या घालवलेल्या बाजू. रामचं द्वंद्व, म्हणजे स्वतःच्या उद्दात प्रेमाच्या कल्पनेच्या प्रतिबिंबात           असलेला राम आणि सोनलचा सहवास प्रत्यक्षात आवडू लागलेला राम आणि तो आवडत असला तरी आधीच्या नात्याच्या अनुभवाने त्याला पुढे न्यायला कचरणारा राम हे कुठेच पकडलं गेलं नाहीये. एकदा सोनल आणि एकदा रागिणी त्यांच्या संवादात हे द्वंद्व पकडतात, पण तेवढंच.
     नातं म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, लग्न म्हणजे काय यांच्या उदात्त, उन्नत व्याख्यांत खूप वेळ गेला आहे. पण मुळात चित्रपटातली पात्रे या नात्यांपायी अडकताना, धडपडताना फार दिसत नाहीत, अपवाद रागीणीचा एक टेक.
   मला असं वाटतं की जर राम-रागिणी ह्यांना एखादं मूल आहे असं किंवा रामची आई आजारी आहे असं दाखवलं असतं तर पेच नीट पकडता आले असते.
    वैवाहिक जीवन, त्यातले तणाव ह्यावरचे काही चित्रपट मला आठवतायेत- अ सेपरेशन,  इन अ बेटर वर्ल्ड, लिटील चिल्ड्रेन. पण यातल्या कशातही प्रेम, नातं यांचं फार सोज्वलीकरण नाही. अर्थात हॉलीवूडमध्येही असे सोज्वलीकरण, उदात्तीकरण होतंच. आशावादी शेवट हा खास अमेरिकन नशा आहे, आणि थोड्या थोड्या दिवसांनी तो लागतोच. पण हे चित्रण असल्याने काय होतं? लोक मुळात कसे वागतात? नाती, संबंध मुळात कसे असतात?
   अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे लिहिणारा माणूस, वेगळं वगैरे काही लिहू पाहणारा माणूस हा प्रेम, नाती, बाकीची माणसे यांच्या बाबतीत कसा असेल? त्याची प्रेम, नाती, स्त्री-पुरुष संबंध यांच्या बाबतीत काय भूमिका असेल? केवळ चांगली, सात्विक, सौंदर्यवादी प्रकारची भूमिका घेणारे लोक मला भोंदू वाटतात किंवा बालिश किंवा खरंच पार पोचलेले. पण अशी पात्रे लोकांना का आवडतात? ते स्वतः कितीतरी ठिकाणी सोयीस्कर वागत असताना त्यांना अशी दैवी पात्रे का आवडतात? अनेक सिरियल्सच्या नायिका अशाच दाखवलेल्या असतात. ह्यात मागणी तसा पुरवठा आहे की सतत झालेल्या पुरवठ्याने निर्माण झालेली निरंतर आवड?
    स्टेनबेक च्या 'ग्रेप्स ऑफ रॅथ' वर एका टीकाकाराने म्हटलं होतं की यातल्या पात्रांना एकच मिती आहे, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची. त्यांच्या बाकीच्या मिती जवळपास येताच नाहीत, म्हणजे स्त्री-पुरुष संबंध, किंवा आवडी, आठवणी वगैरे. एका चरचरीत वर्तमानात गोष्ट होत राहते. 'प्रेमाची गोष्ट' मध्येही एका प्रचंड आदर्श मितीत नायक आहे, थोड्याफार त्याच प्रकारात बाकीची पात्रे. वास्तवाच्या, किंवा अगदी कल्पनेच्या बाकीच्या मिती नाहीतच जणू. अशी असतात का माणसे? नायक एका ठिकाणी म्हणतो की सिनेमा हा काही आपल्या जगण्यापासून फार वेगळा नसतो. आणि त्याचवेळी 'प्रेमाची गोष्ट' ही फारकत घेतंच राहतो.
  घ्यावीच. गोष्टीने अशी फारकत घ्यावीच. पण ही फारकत आदर्शाचा भुलभुलैय्या नसावी. माणसांच्या वागण्याच्या बऱ्याच शक्यता एकमेकांशी गुंफूनही ही फारकत घेता येते. कदाचित हाच मास्टर दिग्दर्शक आणि यशस्वी दिग्दर्शक यांतला फरक असावा.
  आता उरलेलं तेल. एका स्त्री आणि पुरुषात जे संबंध असतात त्यात खरोखर किती असतं, त्या दोघांच्या मनात एकमेकांच्या ज्या प्रतिमा असतात त्यात किती असतात आणि त्यांच्या समजेत किती असतं? मुळात प्रजोत्पादन सोडलं तर स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते का? आपण ज्याला प्रेम, नाती म्हणतो त्यात सवयीचा भाग किती असतो, गरेजेचा किती? हे प्रश्न रुक्ष आहेत, कदाचित त्यांची उत्तरे निरर्थकतेचे वैराण वाळवंट दाखवणारी आहेत. मला काहीवेळा वाटतं की जर दोन स्त्री-पुरुषांना त्यांना खरोखर प्रेम आहे का नाही हे पहायचं असेल तर त्यांनी वेगळं राहून पूर्ण क्षमतेने जगून पहावं. तरच त्यांना खरोखर काही सांगता येईल. पण मिलन कुन्देरा म्हणतो तसं एकच असतं आयुष्य.मग उगाच कशाला अंगाशी येणारे प्रयोग करा. असतं बुवा प्रेम. परमेश्वरासारखं अव्याख्येय आणि संपूर्णपणे वैयक्तिक.
   आता दोन प्रकारचे तिरसटपणा करून ही ओकारी किंवा वैचारिक मैथुन थांबवू.
   मी लहानपणी असे वाचत असे की पाश्च्यात्य संस्कृतीवरचे एक मोठे संकट, जे त्या संस्कृतीमुळेच आहे ते म्हणजे घटस्फोटांचे वाढते प्रमाण. पण भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्था आहे (जाती व्यवस्था, ना ना, ते इंडियात.) 'प्रेमाची गोष्ट' घटस्फोटाने सुरु होतो. अ अ असो...
    डीडोचं गाणं आहे एक 'व्हाईट फ्लॅग'. प्रेमाची गोष्ट हिट जाणारे बॉस. राजवाड्यांची पुण्याई आहे तेवढी आणि त्यावर कुलकर्ण्यांच्या टाईमली मुलाखतीचे, त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेचे डिव्हिडंड. तुम्हालाही तो चित्रपट बघून वाईट वाटणार नाही. पण समजा अशी फिलिंग आलीच, आणि हा नतद्रष्ट लेख तुम्ही इथपर्यंत वाचाल तर 'व्हाईट फ्लॅग' चा अॅन्टिडोट घ्यावा.
   पुणे-५२ ची क्षमा मागून...
       

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...