Monday, March 4, 2013

चाळेगत- कदाचित १


      हा मला मिळालेला एक प्राचीन खो आहे. जिथून हा खो उगम पावला आहे तिथे दोन प्रकारच्या गोष्टी उगम पावल्या आहेत, एक अशा कथा-कादंबऱ्या ज्या वाचक वर्गाने डोक्यावर तर घेतल्या आहेत, पण तशा त्या काही फार खास नाहीत. किंवा अशा काही कथा-कादंबऱ्या ज्यांत काहीतरी वेगळं, वाचनीय, अस्वस्थ करणारं किंवा आपल्याला न स्पर्श केलेलं आहे, पण अजून त्या कादंबऱ्यांना हवं तेवढं नाव, वलय, प्रसिद्धी नाही.
      पहिला कोणाची मारण्याचा प्रकार, वैयक्तिकरित्या मला खूप आवडत असला तरी आत्ता मला तो नेमका कशावर वापरावा हे सुचत नसल्याने बाद आहे. मग राहिला दुसरा.
      ‘चाळेगत’ बाबत मी पहिल्यांदा वाचलं होतं ते शांता गोखल्यांनी ‘मिंट’ नावाच्या एका पिंक पेपरच्या शनिवार पुरवणीत दिलेल्या एका मुलाखतीत. त्यात मराठीत दोन नवे उमदे लेखक कोण वाटतात ह्या बाबतीत त्यांनी दोन नवे लेखक आणि त्यांची आवडलेली पुस्तकं सांगितली होती. त्यात एक होते (जरी त्यांनी ‘अय्या’ नावाचा जबरी कलात्मक चित्रपट काढून मज सारख्या चाहत्यांच्या थोतरीत दिल्यासारखी केली होती) ते सचिन कुंडलकर आणि त्यांचे ‘कोबाल्ट ब्ल्यू’ आणि दुसरे म्हणजे प्रवीण बांदेकर आणि त्यांचे ‘चाळेगत’. मला ते नाव जाम आवडलं. त्याचा अर्थ भुताटकी सदृश्य काहीतरी होतो असंही शांता गोखल्यांनी म्हटलं होतं. त्यात हा लेखक मराठी विद्येचे, त्यामुळे विद्येतून प्रसावणाऱ्या लेखन, विचार, कला आदि (चौसष्ट बरं) कलांचे माहेरघर असं की असल्याने, किंवा अशा कलांचे कदरदान सासर, किंवा यार असणाऱ्या, अनुक्रमे पुणे आणि मुंबई अशा कोणत्याच ठिकाणचा नाही असं दिसत असल्याने तर माझे कुतूहल जामच चाळवले गेले होते. पण तेव्हा ‘चाळेगत’ कुठेच मिळाले नाही. मग एक दिवशी माहेरघरात ते मिळालं.
      मी हे पुस्तक विकत घेतलं तेव्हा माझी मनस्थिती काय होती? म्हणजे तात्कालिक म्हणा. तेव्हाची. मी आणि माझा मित्र, सांगली जिल्ह्यातल्या एका गावी चाललो होतो. तिथल्या पाणी प्रश्नाबाबत छापून येत होतं सारखं, तर काय आहे ते पाहू म्हणून. आणि सहा एक तासांचा बसप्रवास करताना मी चाळेगत वाचायला सुरुवात केली.
      शहरात जन्मलेल्या, वाढलेल्या मला, आणि मग कदाचित माझ्यासारख्या बाकी माणसांनाही शहराच्या सीमा विरत विरत डोंगर, नदी, मोकळी पठारे, मैदाने, शांत पहुडल्यासारखी वस्ती असं दिसायला लागलं की हे आपल्या अनुभवकक्षेत अजून आलेलं नाही असं वाटत राहतं. तेव्हा बसमधून जातांनाही असलंच काही वाटायला सुरुवात झालेली. आणि ‘चाळेगत’ चा संकासूर आला एकदम. त्या आधी पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील ह्यांना आणि अन्यांना वाहिलेली अर्पण(का तर्पण)पत्रिका आली. मग एकदम थेट बोलणारा, आणि मी बोलतोय ते कादंबरीतलं वास्तव, त्याचं खरं-खोटं, त्यातल्या भूमिका असं थोडसं गोंधळाचं, आत्मवृत्तपर फिक्शन देणारा नमनाचा भाग आला. मी वाटेत फलटणला प्रायोगिक तत्वावर एक मळीचा बार मारला, त्याचा शहारा अंगभर पसरून घामेघूम होत असतानाच आला एकदम संकासूर. आणि मग हळूहळू ‘चाळेगत’ ची तमाम गोष्ट.
मला इथे त्या गोष्टीबाबत काही फारसं बोलायचं नाही. मला विचार करावासा वाटतोय तो ह्या प्रश्नाबाबत की एखादी कादंबरी हिट, प्रसिद्ध का होते आणि एखादी का नाही. किंवा चाळेगत मी कुठल्या वर्गवारीत ठेवू. मला तिची किक का लागली? आणि माझ्या वैयक्तिक अनुभवापलीकडे तीच्यात खरंच काही आहे का?
एखाद्या कादंबरीचं हिट होणं, म्हणजे आवृत्तीमागून आवृत्ती, किंवा कायम वृत्तपत्रीय चर्चेत. मला स्वतःला एखादी कादंबरी हिट होते याचा चांगला निष्कर्ष म्हणजे तिची माउथ पब्लिसिटी. एक वाचणारा दुसऱ्या वाचणाऱ्याला हे वाचावसं आहे म्हणून कोणती नावं सांगतो ह्याचा विचार केला तर अशा प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या हे लक्षात येईल. मला जिथून ‘खो’ मिळाला आहे तिथे ज्या कादंबरीचा  उल्लेख आहे तीही अशीच, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला अशी सांगून, वाचायला देऊन, शेअर करून माहित झालेली कादंबरी. अर्थात माउथ पब्लिसिटी हा इतका चांगला निष्कर्ष नाही. किंवा त्याच्याशी लागून असलेला लोक एकमेकांना काय वाचायला देतात, किंवा त्याच्या आधी विकत काय घेतात ह्या निकषातही काही गोंधळ आहे. पुस्तकं विकायचा जो काही त्रोटक अनुभव मला आहे त्यात हे स्पष्ट समजतं की वाचकांचे दोन गट आहेत. आणि त्यात फार काही सामाईक नाही. म्हणजे त्यांना काय वाचावसं वाटतं, ते काय विकत घेतात आणि ते कशाला चांगलं वाईट म्हणतात यांत फारसं काही सामाईक नाही. एक गट असा म्हणता येईल जो रंजकता, रिकाम्या वेळेत मन रमवायला वाचतो. आणि दुसरा गट जो कमी जास्त प्रमाणत व्यसनी गट. तो वाचतो तो व्यसनी म्हणून, आणि त्याला त्या व्यसनातून, कदाचित स्वतःला थोडासा त्रासही देणारी एक किक घ्यायला आवडतं. वाचकांचं अशा दोन गटांत वर्गीकरण केलं तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. रंजकता गटात येणाऱ्या माणसांना ते वाचतात त्याच्यातून त्यांचा वेळ मजेत जावा, नॉस्टाल्जिया, अभिमान, भावनिक, लैंगिक आकर्षण अशा सुख देणाऱ्या संवेदनांच्या तारा थोडा वेळ छेडल्या जाव्यात यापलीकडे जेन्युअनली काही नको असतं. कदाचित त्यांच्यातल्या काहीजणांना इतिहासाचे, परंपरांचे सोयीस्कर मर्यादित अर्थ काढायचे असतात. पुस्तक चांगलं का वाईट हा प्रश्न फार तिथे नसतोच. आपल्याला जी वाचणारी माणसे माहित आहेत त्यांच्या रेफरन्सने पुस्तक वाचायचं, काही घंटे मजेत गेले, काम खतम, थोडी उभारी वगैरे आली, रक्त उकळलं थोडा वेळ तर और थोडा मजा.
असा गट मोठा आहे फार. संख्येने, क्रयशक्तीने, आणि आपल्या बाळबोध भाबड्या आदर्शवादी वातावरणानेही. म्हणून मराठी हिट पुस्तके म्हणजे महाभारत, शिवाजी महाराज, पेशवे, पानिपत, स्वातंत्र्यलढा आणि मग असंच ह्यांच्या ग्रँडस्केलशी जुळेल असं, किंवा मग एकदम पु.ल., व.पु. आणि.., जुन्या आर्थिक आणि वैचारिक मध्यम वर्गाला कुरवाळणारी, हवे किंवा नको तिथे सुखद चिमटे घेणारी आणि शेवटी आपलं (भारतीय म्हणा, मराठी म्हणा, काही न जमल्याने आलेले स्युडोवैराग्य म्हणा) ते लाल हो असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झेंडा उंचावणारी.
व्यसनी वर्गातली पुस्तकं अगदीच आपल्याला माहित नाहीत असं नाही. कोसलाबद्दल ऐकलेलं तरी असतं, काही पानं वाचून काय रे हे बाबा असं म्हणून बाजूला ठेवलेलं. अजून फार पुढे खोदायलाच नको.  
चाळेगत रंजकतेच्या वर्गात नाही. पण त्यात थेट किक आहे असंही नाही. कारण ते त्याच्या फॉर्मशी सुरुवातीलाच फार प्रयोग करतं. आणि त्याने कदाचित त्याच्या मुळाशी, त्याचं असं ओरिजिनल असं जे आहे ते मिळायला वेळ लागतो. मला आवडलेल्या पुस्तकांच्या बाबतीत माझं एक ढोबळ निरीक्षण आहे. तुम्हाला डोक्यात भिनत जाणारा आनंद देणारं पुस्तक सुरुवातीला, सुरुवातीच्या काही पानांत तुम्हाला दूर लोटू पाहतं. ते जसं काही तुमच्या दमाला, संयमाला जोखत असतं. तुम्हाला खरंच वाचायचं आहे का नुसतंच वेळ घालवायचा आहे असा प्रश्न विचारतं. ती सुरुवातीची पानं ओलांडून तुम्ही टीकलात की मग मजा यायला लागते. ‘चाळेगत’ ह्याला अपवाद नाही. पण एवढंच त्याचं वेगळेपण नाही.
कोसला, चांगदेव चतुष्टय (किंवा असंच काही ते) ह्या लिखाणात जो सांगणारा आहे तो वेगळा आहे, पण त्याच्यावर यकीन ठेवता येतो, तो कोण आहे ह्याचा धक्का बसत नाही. तिथे फॉर्म, सांगण्याची धाटणी वेगळी असली तरी काहीतरी आहे, स्थिर आहे. कथा नसली किंवा जे काही आहे ते तिच्या लयीत घडत राहतं. श्याम मनोहरांचं ‘कळ’, मकरंद साठे यांचं ‘अच्युत आठवले आणि आठवण’, काही प्रमणात कमल देसाई हे फॉर्मलाही अस्तित्ववादी प्रश्न विचारतात. मला स्वतःला ‘कळ’ झ्याट झेपलेलं नाही. ‘अच्युत आठवले आणि आठवण’, ‘रंग-२’ मी वाचू शकलोय, थोडीफार त्यांच्यात काय होतंय हे कळतंय असं वाटलं. पण ते आधीच्या नेमाडीय साहित्याहून वेगळे आहेत, आणि त्यांची किक सुद्धावेगळी आहे. म्हणजे त्याच्या नशेची जातकुळी वेगळी आहे. मला स्वतःला ‘अच्युत आठवले आणि आठवण’ वाचून झाल्यावर तसं फारसं काही वाटलं नाही, अगदी हताश, रिकामा, खिन्न करणारी भरीव जाणीवही नाही. झालं वाचून, इट वॉज डीफ्रंट असं, कदाचित एवढंच. त्यातला सटल उपरोध, त्यातला मध्येच आत-बाहेर होणारा निवेदक, संगणक, नॉर्वे, स्वीडन, अमेरिका हे शैलीचे प्रयोग लक्षात घेऊनही. ‘चाळेगत’ पहिल्यांदा वाचलं तेव्हा एका संवेदनशील माणसांच्या हरवणाऱ्या भोवतालची, त्याच्या आकुंचित, बेगडी होत जाणाऱ्या परिघाची जळती मोहोर सोडण्याइतकं ते ताकदवान वाटलं. मग आत्ता ते परत वाचताना ते वेगळे वाटायला लागलंय. कदाचित मी निब्बर झालोय, पुस्तक तेच आहे.
ठीके. एका लेखकाची कथा, त्याच्या लिखाणाची कथा, एक सामाजिक, राजकीय, वैयक्तिक अशा एकांत एक गुंतलेल्या, म्हणाल तर अधुऱ्या, अपुऱ्या वास्तवाची काल्पानिक गोष्ट. आणि ही कथा सरळसोट येत नाही. तिच्यात सामाजिक चळवळींचे, विचारांचे, वादांचे खुंटे ठोकलेले आहेत. ते जाचतील काही जणांना. मराठी हिट साहित्यांत, पुस्तकांत, पिक्चरांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जी एक स्टिरिओटाइप मांडणी आहे त्याला चाळेगत सहज वाकवतं, ते थोडं त्रासदायकही होतं.
‘चाळेगत’ सारख्या पुस्तकावर, आणि त्याच्याच अनुषंगाने म्हणाल तर ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ अशा नाटकांवर फार धुळवड झाली नाही. तसं त्यात वापरलेल्या व्यक्तिरेखा ह्या जरी फिक्शनलाइज केल्या असल्या तरी त्यातले नामसाधर्म्य लपणारे नाही. आणि असं असूनही महाराष्ट्रातले स्वयंप्रेरित सेन्सॉर जागले नाहीत ह्याला काय म्हणावं? म्हणजे आपण कलेच्या स्वातंत्र्याचा, त्यात लेखक वापरू शकतो अशा उपरोधाचा आदर करायला शिकलोय का अशा कलाकारांच्या निर्मितीने मतांच्या, सत्तेच्या गणिताला झ्याट फरक पाडत नाही असा विश्वास स्वयंप्रेरित सेन्सॉरना आला आहे? मला स्वतःला तरी काहीच धुळवड न झाल्याचं वाईट वाटतं. किमान ह्या निर्मितीच्या पाठी जी आयडियालॉजी आहे, आणि ह्या निर्मिती ज्या कथित-तथाकथित आयडियालॉजींचा उपरोध, विरोध करतात त्यांच्या समर्थनाचे, किंवा टीकांचे आवाज येत नाहीत हा मला चांगला सिग्नल वाटत नाही. अशा शांततेने काही तोटेच होतात. जसे ह्या पुस्तकांची, नाटकांची फुकट प्रसिद्धी होत नाही. चौकटीला हादरे देणारं आणि चौकट एक्सपांड करणारं काही कोणाला कळतंच नाही. म्हणा अशा कळण्या- न कळण्यानेही काय होतं? पण नुसत्याच मचूळ संथ शांतातेला हादरे आले तर वाईच मजा.
चाळेगत हे जसं मला एक वाचलं जावसं पण फार कोणाला न कळलेलं पुस्तक वाटतं तसं अजूनही काही पुस्तकांबद्दल वाटतं. त्यात आधी प्रभाकर पेंढारकर यांचं ‘अरे संसार संसार’ होतं, मग त्यात श्री.दा. पानवलकर आले. पण आत्ता ‘चाळेगत’ बाबत एवढंच.                                                           

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...