Thursday, March 14, 2013

साहिब, बीबी आणि...... ब्लॉगपोस्ट

     मी पहिल्यांदा 'साहिब, बीबी और गँगस्टर पाहिला तेव्हा एका परक्या शहरात वेळ घालवणं हा माझा उद्देश होता. पण एकदम ते जुगनी सुरु झालं, मग एकदम ते निवांत रस्ते, खानदान, राज्य अशा तमाम ऐतिहासिक धुंदीत जगणारी माणसे, इशाऱ्यागणिक उडणाऱ्या गोळ्या, आणि अदमास न येणारा शेवट असं आलं आणि मला तो साहिब, बीबी आणि गँगस्टर लक्षात राहिला. मग तीग्मांषु धुलिया भेटले ते गँग्स ऑफ वासेपूर मध्ये रामाधीर बनून, 'बेटा, तुमसे न हो पायेगा' ,'जबतक ये सानिमा है हिंदुस्तान मे लोग चुत्या बनते रहेंगे' वगैरे खास बोलताना. सोबत पानसिंग तोमर, आणि आता 'साहिब, बीबी अन्ड गँगस्टर रिटर्न्स'  ..
     मला तर हा पिक्चर आवडलेला आहे. तो मी तीन दिवसांत दोनदा पाहिलेला आहे. पण हे तर आत्मचरित्रपर झालं, आपण थोडं ब्रॉड होऊया.
    तर 'हासिल' मी जेव्हा पाहिला तेव्हा माझा भ्रमनिरास झालेला. माझ्या एका मित्राने युनिव्हर्सिटी पोलिटीक्स वगैरे कसं जबरदस्त आहे त्यात वगैरे सांगून मला तो बघायला लावला होता. आणि पहिला हाफ होताही ग्रीपिंग, छा जानेवाला इरफान खान असलेला. पण नंतर कुंभमेळा, हिरो-हिरोईन यांचं शाश्वत वगैरे मिलन अशा धोपट प्रकारात तो संपतो. त्यामुळे तीग्मांशू धुलिया प्रकाराबाबत मी जरा साशंक होतो. म्हणजे थोडं असं आहे की आपण रोहित शेट्टी घेऊ शकतो कारण तो काही लपवत नाही. मी चुत्या, तुम्ही बघायला आलेले चुत्ये आणि चला आता एकमेकांना चुत्या बनवत हिट चित्रपट करूया, सोपा सरळ मामला. पण बांधीव स्टोरी सुरु करून एकदम तिला धोबी-पछाड देऊन एक हिरो, एक व्हिलन, एक हिरोईन आणि दुर्जनांचा नाश, सज्जनांचे प्रतिपालन वगैरे आलं की माझी जरा गडबड होते. (इंडियात राहिल्याचा परिणाम म्हणा...!) साहिब,बीबी हे अशा वाटेला जात नाहीत. त्यात सारेच कमी-जास्त डिग्रीचे स्वार्थी आहेत, आणि ते बिनदिक्कत त्यांच्या आकांक्षा, त्यांचे स्वार्थ आणि यांच्या अधे-मध्ये असणाऱ्या त्यांच्या भावना यावर जगतायेत. आणि त्यांच्या या खेळापाठी कॅनव्हास आहे तो जुन्या संस्थानिकांचा सुंभ जाळून उरलेला पीळ आणि त्याचवेळी नव्या लोकशाही राजकारणात तगून राहायची धडपड ह्याचा. आणि तीग्मांशू धुलियाचे संवाद, दिग्दर्शन, लोकेशन्स आणि माही गिल, जिमी शेरगिल ह्यामुळे हा प्रकार लक्षणीय झाला आहे.
    मुळात साहिब, बीबी.. हे नावच एका क्लासिकची आठवण करून देणारं. आणि चित्रपटाचा प्राथमिक ढाचा त्या क्लासिकशी मिळता-जुळता. एक रंगेल साहिब, एक त्यावर बायको म्हणून प्रेम करणारी आणि त्याचवेळी स्वतःचे म्हणून डंख असलेली बीबी आणि मग त्या दोघांच्या मध्ये येणारा अजून एक. साहिब, बीबी और गुलाम मध्ये केवळ छोटी बहूच्या वैवाहिक आणि व्यक्तिगत जीवनाच्या एकमेकांना घासणाऱ्या प्रतालांची आणि त्यात आलेल्या भूतनाथ नावाच्या संवेदनशील पण निरुपद्रवी गुलामाची गोष्ट होती. तीग्मांशू धुलियाने ह्या गोष्टीच्या पाठी राजकारण, लालसा, आकर्षण आणि महत्वाकांक्षा यांचा अस्सल देसी मसाला घालून मजा आणला आहे. आणि पाहिला भाग रणदीप हुड्डाच्या राकट अभिनयाने लक्षात राहिला असेल, तर दुसरा भाग इरफान खान नामक जबरी प्रकारासाठी बघायला हवा.
     आपण संस्थानिक होतो ह्या माजावर जगणारा, रगेल आणि रंगेल पण त्याचवेळी भावनाविवश इंदरजीत सिंग इरफान खानने उभा केला आहे. पण ही ओळख पुरेशी नाही. चित्रपटातले प्रभू तिवारीच्या मुलाखतीचे आणि शेवटचा इंदरजीत सिंगच्या अल्टीमेट गॅम्बलचा प्रसंग पाहिला तर इरफान खानच्या ताकदीची कल्पना येईल. यातला शेवटचा प्रसंग तर एकदम घिसापिटा भावूक आहे, पण इरफान खानच्या सुजल्यासारख्या डोळ्यांनी, त्यात असणऱ्या हे होतं माझं पण मला मिळालं नाही ह्या घायाळ भावनेने तो प्रसंग लक्षात राहण्याजोगा झाला आहे.
    राज बब्बर आणि पदार्पण करणारा प्रवेश राणा ह्यांनीही जमेल तिथे पंच दिला आहे. प्रभू तिवारी, रुडी, कन्हैय्या ह्यांची जोड अचूक आहे.
    आता उरले जिमी शेरगिल आणि माही गिल. शब्दशः आणि सामार्थ्यानेही पांगळा झालेला आदित्य प्रताप सिंग जिमी शेरगिलला जमला आहे. तो अजिबात सज्जन किंवा तत्वे वगैरे असणारा नाही. तो महत्वाकांक्षी आहे, आणि तो चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. डायलॉग मारतानाचा आब. आपल्याला हवे ते करवून घेण्याचा निर्दयी हेकेखोरपणा आणि फारसा स्पष्ट न होणारा भावनांचा गुंता हे सगळं जिमी शेरगिलला जमलं आहे.
  माही गिलच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तिच्या सायको अभिनयाची, तिच्या मिजासीची, तिच्या पैशांसाठी, शरीरसुखासाठी एकदम हपापले होण्याची आणि शेवटी एकदम चीतपट मारत डाव जिंकण्याची गंमत पहायची असेल तर तुम्ही साहिब, बीबी.. पहाच.
   बाकी ही काही 'प्रेमाची गोष्ट' नाही, त्यामुळे यांत खांस साजूक नैतिकता नाही. यांतले पुरुष तमाम इष्कबाजी, अय्याशी करूनही प्रेमात पडतात, त्यात मारतात-मरतात. ह्यातल्या स्त्रिया दारू पितात, त्यांचे यार वगैरे असतात , आणि तरीही त्यांच्या आत प्रेम, वासना आणि महत्वाकांक्षा यांना वेगळं करणारी रेष धगधगत असते.       त्यामुळे डिस्क्लेमर सह पहावा.
   आता थोड्या शिव्या.
     मुग्धा गोडसे का नाचवली आहे हे कळत नाही. तसाच एकदम बांधेसूद फर्स्ट हाफ नंतर चित्रपट इमोशनल वळणे घेत संपतो, का? हा का, अर्थात तीग्मांशू धुलियाच्या बहुतेक चित्रपटांना विचारता येईल. अगदी पानसिंग तोमरलाही.
   आता दोन शेपट्या.
    जुगनी नावाची थिरकती धून चित्रपटात आहे. त्या 'जुगनी' वरून आठवलेलं हे वाचलेलं काही. 'कारवा' नावाच्या अंग्रेजी मासिकात एक विचित्र लेख आला होता. बलात्काराबाबत थोडेसे सामाजिक, तात्विक प्रश्न उभा करणारा हा लेख एकदम जुगनी हा शब्द, त्याच्या छटा अशा काव्यात्म पद्धतीत जातो. पण तो लेख जरा वाचण्यासारखा आहे. किंबहुना हे मासिकच जरा चाळण्यासारखं आहे. ते थोडं डावीकडे जातं, पण तरीही.
   दुसरं, मला एकदमच असं वाटू लागलं आहे की अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, तीग्मांशू धुलिया आदी लोक हे एक खास भारतीय जोनर उभं करत आहेत. कबूल, की गोष्टीचे काही ढाचे, जसे 'द गॉडफादर' हे मूलभूतच आहेत. पण त्यावर जो इमला उभा केला आहे तो खास इथला आहे. आणि मला ही मागच्या २० एक वर्षांत झालेल्या आर्थिक, इंटरनेट (आणि पायरसी) आणि थोड्याफार वैचारिक उघडणीची फळं वाटतात (एकदम वैयक्तिक मत बरं का!) आणि हे जोनर रंजकता आणि गोष्ट या दोन महत्वाच्या गोष्टींशी तडजोड न करणारं आहे हे महत्वाचं. म्हटलं तर ह्या गोष्टी त्याच स्टिरीओटाईप आहेत. तीच मारकाट, तेच शह-काटशह, तसाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेक्स, पण त्याला चांगली-वाईट अशी दोन टोके नाहीत. त्यात माणसे आहेत, आणि मला ते आवडतं. नैतिक संदेश, घाऊक मजा यापलीकडे जाऊन डोक्याला झिणझिण्या देऊ पाहील, आणि चित्रपट बघून आल्यावर इमिटेट करण्याजोगं काहीतरी असेल असं काही बनतं आहे..
 
   आता स्मरणार्थ, उदाहरणार्थ एक तात्पर्यपर वाक्य: 'तुम्हे पता है मर्द इतनी गालिया क्यों देते है, ......, क्योंकी वो रोते कम है'  
  (तळटीप सुद्द्धा: 'मर्द' काढून वाचलंत तरी मजा येऊ शकेल)          

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...