Skip to main content

Posts

Showing posts from September, 2010

काय झालंय तुम्हाला?

काय झालंय तुम्हाला?
कंटाळा आलाय..
मग? त्यात काय एवढा? मजा येईल असं करा काहीतरी...
पण मला माझाच कंटाळा आलाय....
म्हणजे?
म्हणजे मला 'मी' अशी एक काही कल्पना माझ्यावर लादता येत नाहीये. आता दुसरं काही बनून पाहावंसं वाटतंय.
काय बोलताय तुम्ही हे?
नाही म्हणजे, जाणवतं म्हणजे काय किंवा वाटतं म्हणजे नेमक काय वाटतं असे प्रश्न पडायला लागले आहेत....
तुम्ही पुस्तकं वाचता वाटतं आणि तीही नको ती....
म्हणजे?
तुम्हीच सांगा काय वाचता ते.... सध्या काय वाचताय?
मार्क्वेझचं 'हंड्रेड इअर्स ऑफ सोलीट्युड' .. पण याचा काय संदर्भ....
कळेल... पुढे सांगा...
तेच.... मला कळत नाहीये कि मी नेमका खरा केव्हा असतो....
आणि मध्ये मध्ये तुम्हाला तुम्ही वाचलेल्या पुस्तकातल्या पात्रांसारखा वाटत असेल किंवा तुम्ही लिहित असाल ते त्या पुस्तकातल्या शब्दांची किंवा त्यांच्या अर्थाची फेरमांडणी असेल... असं होतंय का?
हो... तुम्हाला कसं माहित?
राहू द्या... पुढे सांगा... नवे प्रश्न घेऊन उधारी वाढवू नका.
मध्ये मध्ये कानापाशी नुसती गुणगुण ऐकू येते आवाजांची... आणि कुठल्याच आवाजाचा अर्थबोध होत नाही.... आणि जे थोडाफार कळत ते आवाज मी जिथे बसलेलो …

पारदर्शक एकटेपणात

कुणीच सोबतीला नसणाऱ्या
पारदर्शक एकटेपणात
माझा खरं असणंही माझ्यासाठी बनत जातंय
एक सोयीस्कर गृहीतक,
अगदीच हादरून जाऊ नये अस्तिवाचा ढाचा म्हणून

कुणाशी बोलताना मला जाणवत राहतो
मधला तरल पडदा,
आणि समोरचा माणूस बनतो माझ्या मनातल्या
प्रतिमांची नाचती गाती कठपुतली

माझ्या टीचभर कॅनव्हासावर
उमटलेली का निसटलेली रंगनक्षी
आणि मला दिसतात माझेच हात रंगवताना
माझा एक एक अवयव

मितींच्या मर्यादा, काळाचा कायदा
संभ्रमाच्या रेषेवर अर्थाचा वायदा

कुठलाही स्पर्श आता दिसतो आधी मला
आणि मग स्पर्शतो
माझ्या सैरभैर कवितांना दिलंय कल्पनेचं अस्तर
असं होतंय म्हणालो तर निघून जाईल तुमच्या
चेहेर्यावरची ओळ्ख

झोंबी झालाय माझा हसर्या चेहेर्याने फिरणारा
टक्क जाग्या रात्री सुरांच्या वाडग्यात पिणारा

तर्काच्या सुया आणि संदर्भांचे व्हेनटिलेटर
कितीवेळ जगवणार कंटाळ्याचा कोमा

वाजू लागलीये गिटार
आणि मोकळा झालाय रस्ता
आता मला अनोळखीची झूल पांघरुन
भेटायला जाता येईल मला

Shadow Lines

भूतकाळ जसा आहे तसा कळतच नाही. जसा वर्तमान उलगडत जातो, तसे भूतकाळाच्या विस्तीर्ण पसरलेल्या आणि बर्याचश्या अनाकलनीय रानात बघण्याचे कवडसे मिळत राहतात. जेव्हा हा भूतकाळ एका माणसाचा नसतो, तर नात्यांच्या मृदू-कोरड्या धाग्यांच्या जाळ्यांचा असतो, तेव्हा तर एखाद्या साध्याश्या घटनेचा अन्वयही सोपा रहात नाही. आणि जर हा त्या आठवणींचा सारीपाट एखाद्या संवेदनाक्षम मनात साठला असेल, आणि आयुष्याच्या विस्तारत जाणार्या परिघात ते मन एखाद्या अबोध भावनेचा किंवा एखाद्या मनाला मुळापासून हादरवून गेलेल्या घटनेचा जेव्हा शोध घेतं, तेव्हा त्या शोधात काय सापडतं ह्या पेक्षा ते शोधत राहणंच गुंतवून टाकते. अमिताव घोष ह्यांची 'Shadow Lines' हा असाच एक शोध, खरतर पाहणार्याच्या स्वतःच्या, आणि त्याने मनाशी अलगद जपलेल्या संवादातून उलगडणारी गोष्ट. केवळ कोलाकात्तात वाढलेल्या आणि मग लंडनच्या रस्तांवर आणि रुंद-अरुंद वळणांवर चालणाऱ्या एकाची नाही, तिला कोलाकात्तामधल्या भद्र बेंगाली आणि ब्रिटीश यांच्या मैत्रीची, ढाका आणि कोलकत्ता या अंतराने जवळ पण इतिहासाने दुरावलेल्या शहरांची, परंपरा आणि स्वातंत्र्य यांच्या ताणात राहणाऱ्या …

समोरच्या बाकावर

समोरच्या बाकावर एक भिरभिर डोळ्यांची अल्लड मुलगी
बापाला विचारणारी प्रश्न दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूशी जोडलेला
खिडकीतून बाहेर बघणारी, धावत्या इमारतींच्या लुकलुक दिव्यांना

तिच्या बाजूला मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमलेली तरुणी
शरीराची वळणे जाणीवपूर्वक जपलेली
समोरच्या मित्राच्या डोळ्यात पहात खोडकर हसणारी
त्याच्या स्पर्शाचा शहारा क्षणभरात दडवणारी

तिच्याही बाजूला खिडकीवर कलंडून झोपलेली बाई
स्वस्त साडीच्या झिरझिरीत लपवलेले व्रण
रापल्या चेहेर्याच्या कडांवर थोपावलेल्या चिंता
क्वचित मिळालेल्या एकुलत्या एक खिडकीच्या
अलगद वार्यावर मिटून घेतलेले डोळे

न सापडलेल्या जगण्याचे दंश

अवेळी जन्मलेल्या बालकासारखा सुरु होणारा
प्रत्येक दिवस, आणि जागं होण्याच्या पहिल्या क्षणावर
उमटलेले डंख, कुस्करलेल्या स्वप्नांचे
मग त्यानंतर निसटत जाणारा दिवस, स्वतःच्या प्रतिमांच्या
लंपट पाठलागात
स्पष्टीकरणे आणि गनिमी कावे यांनी उभारलेली सोयीस्कर तटबंदी

गुरफटून घेणं स्वतःला एखाद्या बिनडोक चादरीत
आणि आढ्याकडे बघून प्रोजेक्ट करत राहणं नकोनकोसा भूतकाळ
हव्याहव्याश्या उद्यामध्ये
स्वतःभोवती आखत राहणं मिस्टिक वर्तुळे आणि झाकत राहणं आतला
फाटका कारभार
शब्दांच्या ढीगभर उदबत्त्यांच्या धुरात
शब्दांच्या वळत जाणार्या हारात
दररोज निरोप देणं स्वतःला, आणि नंतर स्वतःच्याच मानगुटीला बसणं
त्रस्त समन्धासारखे

दररोज घेणं वर्तमानपत्री दैनिक उत्तेजक
आणि पळवू पाहणं आपला घोडा भरधाव
शाबित करू पाहणं आपलं त्यांच्यातलं एक असणं
त्यांच्या स्पर्शाचा विटाळ जपत बसताना

अर्थहीन वारुळांच्या गावात बीळ करून राहणं
उपमा-उत्प्रेक्ष्यांच्या काल्पनिक जगात फणा उभारणं,
वास्तवाच्या विस्तवावर पोळलेली कातडी कात म्हणून टाकत

चिंचोळ्या खिंडीवर पहारा देत राहणं
रसद देत राहणं स्वतःला जगत असण्याच्या हमीची

खुरट्या वेदनांच्या लंगड्या कल्लोळात
ओरबाडून घेणं स्वतःला
आणि…

यार...

इथे आलो तेव्हा संध्याकाळ कधीच ढळून गेलेली. मित्रांसोबत गप्पात रंगलो तेव्हासुद्धा एका कोपर्यात कधीही वेडसर होणारा एकटेपण ढुश्या मारत होतं. अर्थात आपलं पैसा जात नव्हता खाण्या-पिण्यात, बस मित्राची बडबड ऐकून घ्यावी लागत होती. आणि तेही बरोबर आहे म्हणा, ते माझी वटवट सहन करतात, मला पार्टी देतात, या सगळ्याचा कृतज्ञ म्हणून ऐकलच पाहिजे. किंवा तिथे आहोत असं भासवून आपल्या भोवती न दिसणाऱ्या तंतूंचा एक जग विणत राहिलं पाहिजे, मध्ये मध्ये हसून, एखादी कोटी करून असणं निभावून नेलं पाहिजे. समोरच्याची स्वप्नं पुरी होत असल्याच्या जल्लोषाची मैफिल आहे ही दोस्त, तिथे आपण एक रिकामी जागा भरली पाहिजे, दोन पेग रक्तात मिसळल्यानंतरच्या उष्ण सुखद धुंदीत आपणही एखाद्या अप्रप्याला स्पर्श करून पाहिलं पाहिजे. उद्या जग येईल तेव्हा जे जाणवेल ते जाणवेल, आत्ता तरी आपल्या आतली रिकामी जागा स्वप्नाच्या क्षणिक फुलोर्याने विसरली पाहिजे. आणि मग मित्र निघून गेल्यावर विरळ माणसांची एक लोकल पकडून इथे समुद्रापाशी येऊन बसला पाहिजे. इथल्या वाळूत उरलेल्या रेघात आधी असणारी जिवंत सळसळती बोटे, ओल्या वार्यावर उडणार्या केसांना सावरणारे हात, द…

नको पाठवू असे कितीदा

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

कवयित्री - इंदिरा संत


एकदम हे पत्र वगैरे का आठवलं मला ते आठवत नाहीये, कदाचित तेच जी.ए. -सुनीताबाई वाचत बसण्याचं व्यसन असावं... पण ही कविता वेगळी आहे.... विशेषतः ३ रे कडवे 'शब्दामधूनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन , नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण' आणि शेवट.... वाचायचे राहून जाते....


आपल्याला दुसरं माणूस काय म्हणून माहित असेल ह्याचं उत्तर बदलत चाल्लय... म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो असे कित्येक जण माझ्यासाठी फोन नंबर किंवा मेल आयडी एवढेच आहेत... प्रत्यक्षात भेटले तर कदाचित मी अडकेनच बोलायला... माध्यम समोरच्याकडे बघायचा नजरिया देतं कदाचित... किं…

Grapes of Wrath

Grapes of Wrath ही जॉन स्टीनबेकची masterpiece मानली जाणारी कलाकृती. अर्थात जॉन स्टीनबेकला असं One piece wonder समजणं चुकीचं आहे. असो. नेहेमीप्रमाणे हा पुस्तक परीक्षण किंवा समीक्षेचा प्रयत्न नाही. मध्ये नुकत्याच मराठीत आलेल्या एका चर्चित कादंबरीवरची मत-मतांतरे वाचत होतो. त्यावर विचार करतानाजाणवलं कि समीक्षा म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या संगड्याची, तिच्या मासांची मीमांसा नव्हे. वीट वीट सुट्टी केल्याने, किंवा प्रत्येक मनोर्याची अलग चिकित्सा केल्याने एखाद्या महालाचे सौंदर्य सापडणार नाही. एखाद्या गोष्टीच्या सौंदर्याची अनुभूती ही तिच्या मनात पडणाऱ्या प्रतीबिम्बावर, पर्यायाने मनाच्या नितळ-गढूळपणावरही अवलंबून असते. आणि जगात खात्रीने बोलायला सर्वात कठीण किंवा अशक्यच गोष्ट कुठली तर दुसर्या माणसाच्या, विशेषतः मनाचे अनेक स्तर असणर्या लेखाकसादृष्य माणसाच्या मनाचं अनुभूती काय असते हे समजणं. त्यामुळे काही वस्तुनिष्ठ मापदंड लावून सौंदर्य अजमावता येईल किंवा त्याची तुलना करता येईल हा निव्वळ कल्पनाविलास. एखाद्या कलाकृतीने भाषेला काय दिलं हे सांगू पाहणं म्हणजे सिंहगड बांधल्याने महाराष्ट्राचा काय फायदा झाला…

वेळी- अवेळी

अजून का कोसळती धारा
अजून का हा उसळे वारा
अजून का आकाशावरती
मेघांचा करडा पहारा

जेष्ठ ओला, आषाढ कोसळे
रुजला श्रावण होऊन हिरवा
कोमट झाली उष्ण पिपासा
मृदगंध आता ना तितका हळवा

तरीही का ही धुंद असोशी
अतृप्तीचा शाप चिरंतन
चिंब खगांच्या पंखांवरती
नव्या भीतीचे जुनेच किंतन

अजून का ह्या सरी सांगाती
अजून का ढगातून साद
नसशी जेव्हा डंख ताजा
जेव्हा प्राणातून आकुल निनाद

कवेत घेना, मिसळूनी जाना
तोड असे हे मौन अधांतर
उरो न कुठला व्रण स्मरणाचा
जेव्हा करशील तू देशांतर

बा पावसा

बा पावसा,
किती रात्रीं तू अशी सोबत करणार माझी
किती संध्याकाल तुझ्या कृष्णमेघी चौकटीत दडून राहणार
किती कवितांची अनाम बीजे तू मनाच्या इवलाश्या गर्भाशयात रुजवणार
आलास, वेड लावणारा दूर देशीच जादूगार बनून
राहिलास, घरात, वळचणीत. नाल्या-गटारांत,
खड्ड्यांत, डबक्यात, शहरात, शेतात,
माणूस बनून, चिखल बनून
जा ता, तृप्तीचा निसंग फकीर बनून
उरशील, हजारो वर्षांच्या सुपीक गाळाचा ताजा थर बनून
डोंगर उतारांची अप्लाय फुलून मिटणारी हजारो लाळ जांभळी फुले बनून
गाई-गुरांच्या पोटातला वाळलाचार, माणसांच्या हालचालींचे इंधन बनून
कविता बनून, गाणी बनून, डोळ्यातून वाहणारं पाणी बनून

जा आता,
या गच्च शहरात चिखल बनून वाळण्यापेक्षा
बरसून जा अजून बाकी असीम वैरण वाळवंटात
तिथे बनून जा नदीचा इवलासा पण जिवंत प्रवाह
मग परत तुझ्या तीराने वसतील माणसे, राबतील हात-पाय
नव्याने गिरवतील अस्तिवाची मुळाक्षरे
फुलारून येतील जगण्याचे ताजे टवटवीत संदर्भ
या घुसमट शहरातल्या काहीही न उगवणाऱ्या सिमेंटात तडे होऊन उरण्यापेक्षा
कातळ फोड, माती भिजव
कवेत घे तुझ्या अजून तहानलेले करोडो कोपरे
त्यांच्या पापण्यात, देहांत आयुष्य बनून पालवून ये

जा आता…

घटकाभर गम्मत

'भले-बुरे काहीतरी बोलायला कुणी नाही' ... कोणाच्या नसण्याला शंब्द वापरून भरून काढायचं....बोलायला कोणी नाही म्हणून लिहायचं...कोण एका अज्ञात वाचकाला, गणितात 'क्ष' मानून गणित सोडवतात, तसं मला जे सांगायचं आहे ते त्याला कळेल, असं समजून लिहायचं. पण संध्याकाळी कोणासोबत चालत सहज होणार्या गप्पा संध्याकाळी कागद-पेन घेऊन बसलं तर लिहिता येतील? आधी वाचलेल्या गोष्टी, कविता हातात घेतो, परत वाचू पाहतो, त्यातही काही सापडत नाही. मला माझं आयुष्य भोगायचं आहे, जगायचं आहे, दुसर्या कोणाच्या कितीही खोल विचारांनी मी माझ्यातली असोशी भरून काढू शकत नाही. माझ्या अंगात उसळू पाहणाऱ्या जाणीवांना मी दृक-श्राव्य माध्यमे वापरून कितीकाळ थोपवू शकेन? आणि मग एक असेल असा उद्या जेव्हा अशी तगमग उरणार नाही, जेव्हा प्रत्येक कृतीमागे विषादाचा झाकोळ असणार नाही अशा आशेवर तरंगत रहायचं, हात-पाय मारत राहायचे. 'Every misery is in some sense deserved one'... हे म्हणजे कर्मविपाक प्रकारात झालं. आधी चूक म्हणून आत्ता चूक, आणि म्हणून याच्या पुढेही... मग स्वतःला संपवून का टाकायचा नाही... का जगावं याचं उत्तर मिळत नाही…
उसळून येणारे शब्द, फेसाळून येणारे बेभान ओघवते शब्द
संगीताच्या लहरींवर तरंगणारे धुंद शब्द
शरीराच्या भिंतींवर धडका देणारे उन्मत्त शब्द
ओरडत, दंगा करत झिंग आणणारे शब्द

जगून घे जगून घे
क्षण क्षण भोगून घे
उद्या उद्याच्या पोकळ स्वप्नांवर
आजचा सल तोलून घे

उचल पाय जमिनीला स्पर्श सुद्धा होऊ नये
स्वप्नांच्या कळ्यांना कधीच जाग येऊ नये
असे म्हण गाणे ज्याची लय हरवू नये
अर्थामागचा शब्द जन्माआधीच ठरवू नये

मी मलाच सांगितलेली एक कविता

समुद्रावर जाऊन उभं रहावसं वाटतंय...
आता कोणीच नसेल समुद्राजवळ... लाटा निवांत येऊन किनार्याच्या खांद्यावर आपलं मन मोकळं करत असतील
थंडगार वारा वाळूवर त्याने वाहून आणलेल्या कविता उमटवत असेल आणि एका वेडसर क्षणी सारं पुसूनही टाकत असेल..
चांदणं झिरपत असेल ओल्या वाळूत, परतणाऱ्या लाटांत, ओलसर झुळूकीत
मंत्रमुग्ध करणारा मंद हळवा प्रकाश...
मागच्या निर्मनुष्य रस्त्यावर एखादं क्षण येणारी अस्तिवाची खूण
नाहीतर सारंच तरल, नितळ, स्तब्ध आणि म्हणून शब्दांत न येणारं
मी आहे का नाही याचाही प्रत्यय न यावा...
पावलांना स्पर्शत जावं पाणी..चांदण्याच्या प्रतीबिम्बांचे भासस्पर्श
समोरच्या क्षितिजाच्या काजळरेषेवर थांबलेले काही प्रकाश...

ये धूप किनारा शाम ढले,
मिलते हैं दोनो वक़्त जहाँ,
जो रात ना दिन, जो आज ना कल,
पल भर को अमर, पल भर में धुआं

विरघळत जावं या आरस्पानी जाणीवेत....
अगदी आपणही आपल्याला काही सांगू शकणार नाही अशा शांततेत

स्वतःला उलगडणं एवढं सोपा नाहीये प्रश्न...माझा असणं म्हणजे माझ्या भोवतालच्या या लक्षावधी माणसांचा असणं
अस्तित्वाचा अर्थ लावायचा म्हणजे केवळ माझ्या एकेरी अस्तिवाचा नाही
क्षणी विस्मित करणारी, क्षणी गुदमरवून टा…

पुनरागमनाय च

समोर दीड दिवसाच्या गणपतीची उत्तरपूजा चालू आहे. मागची काही वर्ष मनातली श्रद्धा खुरटून सुकून गेली आहे. कुणा एका नावावर, मूर्तीवर, मंत्रावर श्रद्धा उरलेलीच नाही. तरीपण अजून पार बुडखा साफ झाला आहे असं वाटत नाही. श्रद्धा ओरबाडली गेली तरी विश्वास कोसळलेला नाही. 'हेची दान देगा देवा' ऐकताना हा देव आहे का नाही हा प्रश्न डाचत नाही, तर तो असेल किंवा नसेल त्याच्याकडे सारं काही सोडायचा अन सारं काही मागायचा आर्त विश्वास जाणवतो. पंढरपूरला जावसं वाटत नाही, पण त्या विठलापायी वेडावलेल्या संतांच्या भक्तीला, रूढार्थाने केवळ दुख मिळत असतानाही त्यालाही 'बरे झाले देवा' म्हणण्याच्या घट्ट रुजलेल्या विश्वासाचा नवल वाटतं. आता उत्तरपूजा संपेल, परडीतली फुले समोरच्या गणेशाच्या मूर्तीवर वाहिली जातील, आणि शब्द उमटतील, 'पुनरागमनाय च' ..... विसर्जित हो नाही, जा आत्ता पुरता, परत येण्यासाठी.... दुख थेट पत्करतच नाही आपण. लहान मुलाला घरात कोणाचा मृत्यू झाला कि त्या मृत्यूची आडवळणाने ओळख करून दिली जाते. देवाघरी म्हणजे कुठे तर खूप लांब, आकाशात, किंवा अशा ठिकाणी जिथे काही दिवसांनी सगळेच परत एकत…

काय म्हणताय राव

या! या!! बरेच दिवसांनी दर्शन दिलात. साहजिक आहे म्हणा, आणि अशा प्रश्नाने सुरुवातीलाच तुम्हाला अडचणीत टाकले आहे मी. राहू द्या, लोकांना अडचणीत टाकणे आणि मग वळचणीत लपणे असं स्वभावच आहे माझा. बसा.
महाराज, दोन चहा घे रे. नको, गरम वगैरे काही म्हणू नका. तो सगळ्या नावानी मुळातला एकच चहा देण्याइतपत अध्यात्मिक आहे. त्यामुळे राहू दे.. सिगारेट पिणार? मग तुम्ही जाऊन आणा. आणि २ आणू नका, जरा जास्त आणा. एवढे दिवसांनी अवतरलात, २ उदबत्यांची ओवाळणी पुरेल का? हा. हि खरी. बाकी नुसते साले जळणारे कागद. हा खरा दम. नाही, बिडी खरी हे बरोबर आहे, पण समजा सिगारेट्स हाच सेट पकडला तर हीच खरी, दम पण भारी आणि जळण्याचा वेळही. गाणी बिनी लावा भाऊ. हि अशी आळशी सकाळ, हा असं कोमट चहा, आणि हे असे.... बरं जाऊ द्या. काय लावताय? 'सरकारच्या आईचा घो' ....अरे सोड ना. जी लढाई लढत नाही, तिचे विश्लेषण कशाला. काही दुखेल असे लाव, जरा हा दिवस अजून मागून सुरु होऊ दे. किंवा स्वप्नांच्या चार चकमक ठिणग्या उडतील असे काही ऐकव. नाही असं काही.... बर थांब. माझ्या मोबाईलमध्ये आहे. ऐक....
काय वाचलास? काहीच नाही? का रे, इतक…

श्रद्धांजली

कोसळत्या धारा थांबल्यावर उरलेल्या कुंद आभाळाचे शब्दमाणूस मेल्यावर उरलेल्या शोकात्म शांततेचे शब्द घामात भिजलेल्या दुपारचे थकले भागले शब्द प्रश्नाच्या वावटळीत भिरकावलेले शब्द कंटाळ्याचे तेच तेच निबर शब्द जागल्या रात्रीचे जांभईग्रस्त आळशी शब्द तात्विक वादांचे बिनबुडी पोचट शब्द लाचार शब्द, ओशट केविलवाणे शब्द भिक मागणारे बेजान शब्द हरवलेल्या डोळ्यांचे म्हातारे एकाकी शब्द आयुष्याला फुटलेल्या कोम्भांचे हिरवे कोवळे शब्द आणि वठू गेलेल्या धुमारीचे निष्पर्ण वाळले शब्द
आपल्याच शब्दांची जीवाश्मे जुन्या वह्यांत सापडणारी रस्त्यांच्या कोपर्यांवर अचानक भेटणारे जुने ओळखीचे शब्द
शब्दांचे कणखर कातळ, त्यांच्या आतले नितळ झरे शब्दांचा नुसता चिखल, शब्दांची फसवी दलदल
शब्दांची कैद, मूठ भक्कम पोलादी स्वतःशी बोलतानाही मधले भडवे शब्द स्वतःला सोडून जाताना रस्त्याच्या कडेशी स्वतःचेच न लिहिलेले निरागस शब्द
उठून गेलेल्या स्वप्नांच्या गावात उरलेले उनाड बेवारस शब्द आठवणींच्या विझल्या शेकोट्या आणि पडक्या घरांशी पुरलेले शब्द

खूप दिवसानंतरचे उन्ह

पडताच होतं पाउस मागचे किती दिवस. म्हणजे फारसे दिवस नसावा. पण ढगांनी सारं आकाश ताब्यातच घेतलेला. आणि वेळ नुसती संथपणे घरंगळत होती एकापुढे एक. म्हणून वाटलं असं कि बरेच दिवस पडतंच होता पाउस. थेंब-थेंब सुरुवात झाली, पण सतत, न थांबता सतत येणारे थेंब. मग मध्येच त्यांची द्रुत लय, थडा-थडा वाजणाऱ्या खिडक्या, दारे, गळणाऱ्या पागोळ्यांच्या आवाजात प्रसरण पावणारा पाउस. मग कधी विजा,गडगडाट , मग छपराच्या उबदार संरक्षणात उभ्या माणसांच्या चेहेर्यावर प्रश्न, कुठे कोसळला असेल हा लोळ? मग परत एक संथ अनिवार लय, थेंबांचा रिप-रिप आवाज, मध्येच येणारा थंडगार वारा, ओलसर भिंती, न वाळलेले कपडे, केस कोरडे ठेवत निथळत्या छात्र्यामध्ये ओलावणारी माणसे, चहा, गप्पा, गाणी, आणि शेवटी या पावसाचा कंटाळा.
पाउस नुसतंच येत नाही, सोबत मळभ असतं एक. थोडं वेळ ते मळभ सुखावतही. सार्याच गोष्टी स्पष्ट दिसत असतील तर मग इकडे-तिकडे विचार कराच कशाला. सगळं एका आखलेल्या मार्गाने चालेल. पण फारकाळ हि विचारांची स्पष्टता पेलत नाही. मन स्वप्नांच्या धूसर-तलम जगात किंवा आठवणींच्या गूढ-गढूळ डोहात जायला उत्सुक असतंच. त्यात असं पाउस असेल, जिथे थेंबा…